०८ मार्च २०१३

साहिर लुधियानवी । अश्रूंची गाणी । माधव मोहोळकर

साहिर लुधियानवी (८ मार्च १९२१ - २५ ऑक्टोबर १९८०) यांची आज जयंती. त्यानिमित्त आपण 'रेघे'वर ही नोंद करत आहोत.

साहिर लुधियानवी
***

हिंदी चित्रपटांमधली गाणी आपल्याला कळू शकतात. म्हणजे शब्द सरळ कळू शकतात.

कभी खुद पें कभी हालात पें रोना आया
बात निकली तो हर एक बात पें रोना आया

हे साहिरचं म्हणणं आपल्याला कळू शकतं. मग तो मूळ चित्रपट कसाही असला, त्याचं चित्रीकरण कसंही असलं तरी त्या गाण्याचा अर्थ आपल्यापर्यंत पोचू शकतो.

कौन रोता है किसी और की ख़ातिर ए दोस्त
सब को अपनी ही किसी बात पें रोना आया
 
अशा ओळींमधून शक्य तेवढा अर्थ आपल्यापर्यंत पोचत असतो. त्यातून आपल्याला काही मिळत जातं. पण हे झालं हिंदीपुरतं मर्यादित. उर्दू ज्यांना येत असेल त्यांना साहिरमधला कवी उलगडून शोधायला खरी मजा येईल. पण आपल्याला उर्दू येत नसेल, तरी साधारण हिंदीच्या बळावर थोडीथोडी समजू शकेल, अशी अवस्था असू शकते. अशा अवस्थेत आपल्या मदतीला माधव मोहोळकर येऊ शकतात. त्यांचं 'गीतयात्री' हे पुस्तक 'मौजे'नं काढलेलं. सुंदर पुस्तक. मोहोळकर सोलापूरकडचे. नंतर मुंबईत प्राध्यापक होते. बहुधा 'गीतयात्री' नि 'मोहोळ' अशी त्यांची दोनच प्रकाशित पुस्तकं आहेत. आपली ही नोंद मोहोळकरांपेक्षा साहिरबद्दल अधिक आहे, त्यामुळे लगेचच 'गीतयात्री'मधल्या 'अश्कों में जो पाया है वो गीतों में दिया है...' या साहिरवरच्या लेखाकडे वळू. या लेखात मोहोळकर म्हणतात :

कवी आणि गीतकार ही साहिरची दोन्ही रूपं पुढं पुढं माझ्या मनात नकळत एकमेकांत मिसळून गेली होती. पण त्यानं भावजीवनात पहिल्यांदा अकस्मात प्रवेश केला तो कवी म्हणूनच. हिंदी-उर्दूचं आकर्षण नुकतंच मनात निर्माण झालं होतं असा तो काळ. चोरूनमारून पाहता येतील तितके चित्रपट पाहायचे, एखाद्या हॉटेलात बसून रात्री दहा-अकरा वाजेपर्यंत गाणी ऐकायची आणि कुणाकडं तरी बसून मनसोक्त रेडियो ऐकायचा. त्या काळात हैद्राबादला गेलो असताना उन्हाळ्यातल्या एका रात्री सहज रेडियो लावला अन् एका उर्दू कवीचा स्वर कानात आला : ''मेरी महबूब! कहीं और मिला कर मुझसे...''

त्या कवीच्या कवितावाचनात खोटा आवेश नव्हता. जाणूनबुजून केलेले नाटकी चढउतार नव्हते. घोगऱ्या, खालच्या आवाजात तो अगदी सरळपणे कविता वाचत होता. पण त्या सरळपणातही आपण जे सांगत आहोत त्यावरचा त्याचा ठाम विश्वास जाणवत होता. साहिर आपली 'ताजमहाल' कविता वाचत होता. आपल्या प्रेयसीला वारंवार आवर्जून सांगत होता : तू दुसरीकडं कुठं तरी मला भेटत जा... ताजमहालाच्या छायेत प्रेम करावंसं वाटत नव्हतं त्याला. एकमेकांना भेटण्यासाठी संकेतस्थळ म्हणून त्याला ताजमहाल पसंत नव्हता. समोरची बाग, यमुनेचा किनारा, नक्षी कोरलेल्या संगमरवरी भिंती, सुंदर-सुंदर कमानी, या साऱ्यांचं वर्णन करून तो तिला सांगत होता :
ये चमनज़ार, ये जमना का किनारा, ये महल,
ये मुनक्कश दरो-दीवार, ये महराब, ये ताक।
इक शहनशाह ने दौलत का सहारा लेकर,
हम गरीबों की मोहब्बत का उड़ाया है मज़ाक।
          मेरी महबूब! कहीं और मिला कर मुझसे।

उर्दू चांगलं येत नसल्यामुळं कवितेतला शब्द न् शब्द काही कळला नाही, पण कवितेतला भाव मात्र तीरासारखा खोलपर्यंत पोचला. खरं म्हणजे 'शहनशहाच्या मुमताजवरील अमर प्रेमाचं चिरंतन प्रतीक म्हणजे ताजमहाल', असं निबंधात वगैरे लिहायला खूप आवडायचं वय होतं ते. पण साहिरनं ताजमहालविषयीच्या साऱ्या रोमँटिक कल्पनांना हादरा दिला. त्याच्या दृष्टीनं ताजमहाल म्हणजे एका बादशहानं आपल्या संपत्तीचा उपयोग करून गरिबांच्या प्रेमाची केलेली क्रूर थट्टा! ज्यांनी खरोखरच ताजमहाल बांधला ते हजारो शोषित कलावंत जगाला अज्ञातच राहिले. ज्यांनी शहाजहानचं स्वप्न साकार केलं त्यांनीही आपल्या आयुष्यात प्रेम केलं असेलच. त्यांच्या प्रेमाची स्मारकं कुठं आहेत? त्या कबरींवर कुणी दिवा तरी लावला की नाही हेही माहीत नाही :
मेरी मेहबूब! उन्हें भी तो मोहब्बत होगी,
जिनकी सन्नाई ने बख्शी है इसे शक्ले-जमील।
उनके प्यारों के मकाबिर रहे बे-नामो-नमूद,
आज तक उनपे जलाई न किसी ने कंदील।

आपल्याच मनात कुठंतरी खोल-खोल होतं अन् आपल्यालाच माहीत नव्हतं असं काहीतरी साहिर सांगतोय, असं कविता ऐकताना राहून राहून वाटत होतं. पुढं ताजमहालवर बऱ्याच कविता वाचल्या; पण तसं कधी वाटलं नाही. तसं पाहिलं तर सुमित्रानंदन पंतांच्या 'ताज'मध्येही मानवतावादी दृष्टिकोण प्रकट झाला होता :
हाय! मृत्यु का ऐसा अमर, अपार्थिव पूजन?
जब विषण्ण, निर्जीव पड़ा हो जग का जीवन!
स्फटिक सौध में हो शृंगार मरण का शोभन,
नग्न, क्षुधातुर, वासविहीन रहें जीवित जन।

पण पंतांच्या कवितेतील प्रौढ चिंतन आणि संयमशील अभिव्यक्तीपेक्षा साहिरच्या भावुक पोटतिडिकेनं मन अधिक आकर्षून घेतलं होतं. आणि कुसुमाग्रजांच्या 'ताजमहाल'मध्ये तर
कीं कालिंदीवर करण्याला जलकेली
कुणि यक्षलोकिंची रूपगर्विता आली
          त्या नितळ दर्पणीं विवस्त्र होउनि पाही
          निज लावण्याची उसासलेली वेली
यासारख्या एकापेक्षा एक बहारदार उत्प्रेक्षांच्या लडींतच मन गुंतून पडायचं. ताजमहालच्या सौंदर्यवर्णनात कवी इतका रममाण झालेला वाटायचा, की अखेरीस कामांध शहांनी राणीवशात ओढलेल्या 'शत अनामिकांचें त्या हें कबरस्तान' या म्हणण्याचा मनावर फारसा परिणाम व्हायचा नाही. खरं सांगायचं तर त्या शेवटच्या कलाटणीपेक्षा सुरुवातीचं सौंदर्यवर्णनच मन मोहून टाकायचं. साहिर ताजमहालच्या सौंदर्यात स्वतः रमला नाही. आपली प्रतिक्रिया त्यानं तीव्रतेनं व्यक्त केली होती :
इक शहनशाह ने दौलत का सहारा लेकर
हम गरीबों की मोहब्बत का उडाया है मजाक!

या ओळींचा त्या काळात मनावर इतका जबरदस्त परिणाम झाला होता की संधी सापडेल तिथं आम्ही त्यांचा उपयोग करत होतो. वर्गातला निबंध असो, इतिहास असो की वक्तृत्वाची चढाओढ असो, श्रोत्यांना जिंकायला तर ते आमचं हुकुमाचं पान होतं. पण पुढं पुढं त्या ओळी जरा भडक वाटायला लागल्या अन् त्या कवितेतल्या दुसऱ्याच ओळींनी पाठपुरावा करायला सुरुवात केली. त्या ओळींत साहिरनं विचारलेला प्रश्न कुणाच्याही हृदयात दीर्घ काळपर्यंत घुमत राहील असा होता :
अनगिनत लोगों ने दुनिया में मोहब्बत की है,
कौन कहता है कि सादिक न थे जज़्बे उनके?
लेकिन उनके लिए तशहीर का सामान नहीं,
क्योंकि वे लोग भी अपनी ही तरह मुफलिस थे।

... असंख्य लोकांनी जगात प्रेम केलंय. कोण म्हणतो, त्यांच्या भावना सच्च्या नव्हत्या? पण त्यांच्याजवळ जाहिरातबाजीची साधनं नव्हती; कारण ते लोकही आपल्यासारखेच कंगाल होते!

प्रेम करायला लागणारं भावनाप्रधान मन तर जवळ होतं, पण सुखी, ऐषआरामाचं आयुष्य मात्र नव्हतं अशा साऱ्याच तरुणांना साहिर हा आपला कवी वाटला होता...
 (पान ११७-११९)

मोहोळकर बोलत असताना खरंतर आपण साहिरवर वेगळं काय बोलणार असं होतं. तेवढं आपलं त्याबद्दलचं ज्ञान नाही. आपण एक सामान्य प्रेक्षक किंवा वाचक म्हणून पाहिलं तर फक्त भारावून जाता येतं. मोहोळकरांसारखे लोक मदत करतात आणि त्या भारावण्यामागचं लॉजिक थोडंसं स्पष्ट करतात. पण थोडंसंच, कारण ह्याबाबतीत पूर्ण स्पष्टता अशी काही गोष्ट असू शकणं अवघड आहे. आणि बरं हे की, केवळ कवी असण्याच्या स्थितीबद्दल भारावण्याऐवजी आपण साहिरच्या शब्दांनी भारावून जातोय. कवी असणं म्हणजे जे असेल ते साहिरच्या शब्दांना माहीत असतं. पण बहुतेकदा पोकळ शब्दच आजूबाजूला वावरत असतात आणि त्यामुळे कवीही बरेचदा पोकळ असण्याची शक्यता वाढते, आताच्या फेसबुकादींच्या शब्दचुकार, स्वप्रसिद्धीच्या काळात ही शक्यता अधिकच, त्यामुळे आपल्या स्थितीचा गवगवा जास्त, पण शब्दांची स्थिती बिकट अशी परिस्थिती होते.

आपण साहिरबद्दल बोलत होतो आणि मोहोळकरांच्या साक्षीने बोलत होतो. जग ही एक तमाम लोकांच्या सोयीने तयार झालेली गोष्ट आहे आणि अशी सोईसोईनेच ती चालत राहाते. सोईसोईनेच तिथले व्यवहार होतात. मुळात सगळ्या गोष्टी म्हणजे निव्वळ व्यवहारच बनलेल्या असतात आणि नैतिकतेचा व्यवहार, प्रामाणिकपणाचा व्यवहार, समंजसपणाचा व्यवहार, स्तुतीचा व्यवहार, कवितेचा व्यवहार, प्रेमाचा व्यवहार इत्यादी. असे हे झुंडींचे व्यवहार असतात. 'व्यवहार' या शब्दाचा आपण इथे घेतलेला अर्थ आहे तो 'सोईने केलेली कृती'. त्यामुळे साहिरच्या कवितांच्या ओळी 'सुविचारा'सारख्या 'शेअर' केल्या जातील व्यवहार म्हणून. ते सगळं जगात एकीकडे सुरू राहणार हे अगदीच पक्कं असलं तरी साहिरसारखे लेखक या सगळ्यावर आपल्यापुरती शब्दांनी मात करून ठेवतात :

ये  महलों, ये तख्तों, ये ताजों की दुनिया
ये इंसान के दुश्मन समाजों की दुनिया
ये दौलत के भूखे रवाजों की दुनिया
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है।


हर इक जिस्म घायल, हर इक रूह प्यासी
निगाहों में उलझन, दिलों में उदासी
ये दुनिया है या आलम-ए-बदहवासी
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है।

यहाँ इक खिलौना है इसां की हस्ती
ये बस्ती हैं मुर्दा परस्तों  की बस्ती
यहाँ पर तो जीवन से है मौत सस्ती
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है।

जवानी भटकती हैं बदकार बन कर
जवान जिस्म सजते है बाज़ार बन कर
यहाँ प्यार होता है व्योपार  बन कर
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है।

ये दुनिया जहाँ आदमी कुछ नहीं है
वफ़ा कुछ नहीं, दोस्ती कुछ नहीं है
जहाँ प्यार की कद्र कुछ नहीं है 
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है।

जला दो इसे फूक डालो ये दुनिया
मेरे सामने से हटा लो ये दुनिया
तुम्हारी है तुम ही संभालो ये दुनिया
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है।


पण जग काही हटवलं जात नाही, आणि त्या जगाच्या व्यवहारांमधेच साहिरसारख्यांचे शब्द कायम असतात. जगाच्या बोगसपणाच्या जाणिवेची तीव्रता जितकी जास्त तितका शब्दांचा मजबूतपणा जास्त. साहिरच्या बाबतीत असे मजबूत शब्द आले कुठून याचं मोहोळकरांनी त्यांच्या मतानुसार आपल्याला सांगितलेलं उत्तर 'गीतयात्री'मधे संपूर्ण वाचता येईल. तूर्तास, गुरुदत्तच्या 'प्यासा'च्या संदर्भात या उत्तराचे धागे मोहोळकर कसे उलगडतात ते पाहू :

कवीचं मन आणि भोवतालचं जीवन यांतील विसंगती समर्थपणे शब्दांतून व्यक्त करू शकेल असाच गीतकार हवा होता 'प्यासा'साठी. नुसताच गीतकार नव्हे तर कवी वाटेल असा गीतकार! गीत लिहिणारा, पण ते गीत कविताही आहे याची जाणीव ठेवणारा. कवी विजय गातोय ते गाणं नाही तर अनुभूतीची कविता आहे, जिवंत कविता आहे, जातिवंत कविता आहे असं वाटायला लावणारा. गुरुदत्तला नुसता गीतकार नको होता, नुसता कवीही नको होता. त्याला हवा होता गीतकार कवी! पहिल्यांदा कवी, गीतकार नंतर. कवी विजयनं सामान्य गीतं गायली असती तर श्रेष्ठ कवी म्हणून तो विश्वासार्ह वाटला नसता. आणि तो श्रेष्ठ कवी जर वाटला नसता तर त्याच्या उपेक्षेचंही काही वाटलं नसतं. साहिरशिवाय दुसरा कोणीही गीतकार कवी विजयसाठी लिहू शकणार नाही हे गुरुदत्तनं ओळखलं होतं. साहिरजवळ कवी विजयचं मन होतं अन् ते जीवनही तो जगला होता. मग 'प्यासा'सारख्या चित्रपटात कवि-नायकासाठी लिहिताना त्याची प्रतिभा साहजिकच फुलून आली. गीतकार कवीत नकळत मिसळून गेला. त्याच्यासाठी त्याला वेगळं काही लिहावंच लागलं नाही. साहिरनं जे काही लिहिलं ती आत्माभिव्यक्तीच होती. 'ये दुनिया जहाँ आदमी कुछ नहीं है'मधली शोषित-दलित मानवजातीविषयीची आत्मीयता आणि 'इसको ही जीना कहते हैं तो यूँ ही जी लेंगे'मधली असफल प्रेमजीवनातली दारुण निराशा...

सुरुवातीपासून साहिरच्या कवितेत हेच दोन सूर लागले.
 (पान १५१)

यापुढेही मोहोळकर काही सांगतात. साहिरच्या कवितेतले हेच दोन सूर अनेक तरुण-तरुणींच्या हृदयाला भिडले. कारण जगात साहिरसारखंच हृदय असणारी, निष्ठा असणारी माणसं काही कमी नव्हती. आणि तो एकटाच काही जगावर नाराज नव्हता. त्याच्यासारखेच अनेक जण जगावर रुष्ट होते, असं ते म्हणतात.

पण तरी केवळ हृदयातली निष्ठा पुरेशी असते का हो? नसावी. कदाचित साहिरचे शब्द समजून घेण्यापुरतीच ती पुरेशी असेल, पण साहिर होण्यासाठी त्यापलीकडचंही काही लागत असेल का? हृदयातल्या निष्ठेचं आणखी काहीतरी करावं लागत असेल का? तर, याचं उत्तर 'होय' असं असावं.

नोंदीचा शेवट मात्र मोहोळकरांच्या आणि साहिरच्या शब्दांनीच व्हायला हवा :

अश्रूंतून जे मिळालं ते साहिरनं आपल्या गीतांतून, काव्यातून दिलं. जगाची तक्रार असो वा नसो, आपण तर त्याच्यावर प्रेम केलं. त्याच्या दोषांसह. ऐकलेली गाणी मधुर असतात; न ऐकलेली त्याहून मधुर. साहिरनं छेडलेले दोन्ही सूर अंतःकरणाला स्पर्श करून गेले. सुखदुःखांत साथ देऊन गेले. पण तारांवरून निसटून गेलेले सूर ऐकायला मिळाले नाहीत याची हुरहूर मनात आहेच:

अश्कों में जो पाया है वो गीतों में दिया है
इस पर भी सुना है कि ज़माने को गिला है
जो तार से निकली है वो धुन सबसे सुनी है
जो साज़ पे ग़ुजरी है वो किस दिल को पता है
(पान १५१-१५२)


मुखपृष्ठ : पद्मा सहस्त्रबुद्धे । मौज । रू. १५०/-

***

०४ मार्च २०१३

'प्रतिमान' या हिंदी पत्राच्या प्रकाशनासंबंधीचं टिपण

- आदित्य निगम

आदित्य निगम दिल्लीमधल्या 'सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज्' (सीएसडीएस) या संस्थेसोबत काम करतात. त्यांनी 'काफिला'वर लिहिलेल्या 'लीपिंग अक्रॉस अ ट्रबल्ड हिस्ट्री - लाँच ऑफ प्रतिमान' या लेखाचा मराठी अनुवाद त्यांच्या परवानगीने 'रेघे'वर नोंदवून ठेवतो आहे. भाषा आणि माध्यमं यांच्यासंदर्भात काही मुद्दे या लेखातून हाताशी लागू शकतात, म्हणून ही नोंद. 
या अनुवादात 'जर्नल' या इंग्रजी शब्दासाठी 'पत्र' हा मराठी शब्द वापरला आहे.



'प्रतिमान'संबंधीचं प्रसिद्धीपत्रक
'प्रतिमान - समय, समाज, संस्कृती' या नवीन हिंदी संशोधन पत्राच्या आरंभाचा प्रकाशन सोहळा २८ फेब्रुवारी २०१३ रोजी 'सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज्, दिल्ली' इथे पार पडला. अनेक अर्थांनी हा कार्यक्रम ऐतिहासिक मानला पाहिजे. हिंदी आणि उर्दू यांच्यात दीर्घकाळ टिकून असलेल्या दरीचा त्रासदायक इतिहास व हिंदुस्तानी भाषेची हरवलेली परंपरा या पार्श्वभूमीवर 'प्रतिमान'च्या प्रकाशन समारंभात झालेलं विख्यात उर्दू अभ्यासक व कवी शमसूर रहमान फारुकी यांचं व्याख्यान ऐतिहासिक ठरणारं होतं. शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीच्या त्या इतिहासात बुडी मारण्याचा प्रयत्न म्हणजे एका अर्थी अप्रस्तुत आणि क्वचित उर्मटही समजला जाऊ शकतो, कारण उर्दू आणि हिंदी दोन्ही भाषांच्या शुद्धतेबाबत आग्रही असलेल्या संरक्षक मंडळींच्या विरोधात जाणारी ही कृती ठरते. या कृतीतून स्पष्ट झालेली गोष्ट हीच की, भाषा म्हणजे तथाकथित संरक्षक दाखवतात ती नसून सर्जनशीलता आणि आदानप्रदान व्यवहार यांमधून प्रवाहित होत असते तीच भाषा असते.

या कार्यक्रमात फारूकी यांनी 'उर्दू आदबी रवायत की सच्ची त्रिवेणी' या विषयावर बोलण्याचं ठरवलं हे सयुक्तिकच होतं. आपल्या अप्रतिम व्याख्यानात फारूकी यांनी उर्दू काव्य व सौंदर्यशास्त्रीय परंपरेतील तीन प्रवाह (त्रिवेणी) - अनुक्रमे अरबी, पर्शियन व संस्कृत- उलगडून दाखवले. अदृश्य असूनही 'अस्तित्त्वा'त असलेल्या सरस्वती नदीला अलाहाबादमधे गंगा नि यमुना या नद्या सामील होतात, त्या संगमाच्या 'त्रिवेणी'चं रूपक वापरण्यामागे कदाचित फारूकी यांनाही सध्या अदृश्य असलेल्या पण महत्त्वाच्या संस्कृत काव्य परंपरेकडे लक्ष वेधायचं असावं.

अनुकरण व प्रतिनिधित्त्वामध्ये व्यग्र असलेल्या ग्रीक व पाश्चात्त्य परंपरांविरोधात युक्तिवाद करत फारूकी यांनी असं म्हणणं मांडलं की, अरबी किंवा अधिक प्रमाणात पर्शियन आणि संस्कृत परंपरांनी कला / कविता यांच्याकडे त्यांच्या निर्मितीने तयार होणाऱ्या अर्थासंदर्भात व प्रभावासंदर्भात पाहिलं. पर्शियन, उर्दू आणि क्वचित अरबी कवितेच्या प्रांतातून आणि आनंदवर्धन, अभिनवगुप्त व कुंतक या मध्ययुगीन थोर काश्मिरी सौंदर्य अभ्यासकांच्या विचारधारांमधून फारूकी सहजी विहरत होते.
सामाजिक शास्त्रांचा अभ्यास हिंदी भाषेमध्ये व्हावा यासाठी गेल्या दहा वर्षांपासून प्रयत्नशील असलेल्या आमच्यासारख्यांसाठी तर हा कार्यक्रम खूपच महत्त्वाचा होता. दोन्ही बाजूंकडच्या सनातनी विचारांना ओलांडण्यापलीकडेही काही गोष्टी आमच्या कामाचा भाग आहेत, भाषेचं जे रूप आपल्यापर्यंत आलंय त्या रूपाला समोरासमोर आव्हान देणं हा या कामाचा एक महत्त्वाचा भाग आहे. गेल्या दहा वर्षांमधे 'सीएसडीएस'च्या भारतीय भाषा उपक्रमांतर्गत (मुख्यत्त्वे अभय दुबे यांच्या एकहाती परिश्रमामुळे) अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आणि 'दिवान-ए-सराई'सारखी काही पुस्तकं 'सराई' उपक्रमाखाली सिद्ध झाली. या प्रवासात एकेका शब्दावर, संकल्पनांवर अनेक वाद, अनेकदा उग्र भांडणं झाली, अनुवादाच्या कृतीविषयीही मोठे वाद या कालावधीत झाले. 'प्रतिमान' हे पत्र फुटीरतावादी भाषिक कलह टाळून स्पष्ट भूमिका घेणार आहे. हिंदी, हिंदुस्थानी, उर्दू यांच्या विविध शैली व विविध बोलींचा उत्सव म्हणजे 'प्रतिमान'.

'वैचारिक संकटा'बद्दल वारंवार दुःख व्यक्त करत असलेल्या हिंदीसारख्या भाषेत सामाजिक शास्त्रांविषयीचं एक संशोधन पत्र प्रकाशित होणं ही मुळातूनच एक महत्त्वाची घटना आहे. (१९९०च्या दशकात 'हंस' या साहित्यिक नियतकालिकाने हिंदीतील वैचारिकतेबद्दलचा वादाला वाचा फोडली होती आणि नंतर 'हिंदी प्रदेश का वैचारिक संकट' या नावाने हा वाद ओळखला गेला). भारतीय भाषिक वातावरणाशी, मुख्यत्त्वे हिंदी वातावरणाशी ज्यांचा परिचय असेल, त्यांना 'भारतीय भाषा या भावनांच्या अभिव्यक्तीसाठी चांगल्या आहेत, पण वैचारिक कामांसाठी त्यांचा तितकासा उपयोग नाही' हा काही समीक्षकांचा दावा माहीत असेल. भारतीय भाषांमधे झालेलं सामाजिक शास्त्रांसंबंधीचं संशोधकीय काम शोधायला गेलं की हा 'वैचारिकतेचा अभाव' जाणवू लागतो. असं काम फारसं सापडत नाही, हे वेगळं सांगायला नको. हा अभाव त्या भाषेची त्या विषयासंबंधीची 'कमतरता' आहे असं सिद्ध करण्यासाठी वापरला जातो. ज्याप्रमाणे आपली आधुनिकता अपूर्ण आहे, आपला निधर्मीवाद चुकीचा मांडला जातो आणि आपली भांडवलशाहीची कल्पना फोल गेलेय, त्याचप्रमाणे आपल्याला न संपणाऱ्या कमतरतांवरही विश्वास ठेवायला सांगितलं जातं. आमच्या मते, प्रश्न हा नाहीये की, भारतीय भाषांमधे सामाजिक शास्त्रांचा अभ्यास का नाही? तर, प्रश्न हा आहे की, या प्रदेशात सामाजिक विचारधारांची आणि बौद्धिकतेची रूपं कोणती आहेत आणि कोणत्या ठिकाणी असं काम सुरू असतं?

इथे आव्हान दोन पातळ्यांवरचं आहे. पहिलं म्हणजे भारतीय भाषांवर परंपरेतून ज्या विचारधारांचा आणि शैलीचा प्रभाव पडलाय त्यांची ओळख पटवून घेणं. याशिवाय आत्तापर्यंत आपली निष्क्रियता पुरेशी सिद्ध केलेल्या स्वदेशीवादी आणि पाश्चात्त्यविरोधी भूमिकेपासून स्वतःला दूर ठेवणं हे दुसरं आव्हान. त्यामुळे पारंपरिक विचारधारांच्या वैशिष्ट्यपूर्ण रूपांचं भान कायम ठेवून सामाजिक शास्त्रांचं पाश्चात्त्य ज्ञान प्रादेशिक भाषेत आणणं जसं आवश्यक आहे तसंच आपण विविध परंपरांच्या संगमाशी उभे आहोत याचं भान ठेवणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. फारूकी यांच्या 'त्रिवेणी'मध्ये तीन परंपरांच्या संगमाचा संदर्भ असेल तर आपण त्यात चौथ्या संदर्भाची भर घातली पाहिजे, आणि तो म्हणजे पाश्चात्त्य संदर्भ. हा चौथा संदर्भ आता शासकाच्या भूमिकेत नाही, तर आपल्या अभ्यासाच्या चौथ्या संदर्भापैकी एक मानावा असा आहे.

'प्रतिमान' या पत्राद्वारे जे करण्याचा मानस आहे त्यानुसार विद्यार्थ्यांनी सामाजिक शास्त्रांची तंत्रं आणि अभ्यासपद्धती तर आत्मसात करणं अपेक्षित आहेच, शिवाय विचारधारांच्या रूपांकडे लक्ष देणंही आवश्यक आहे. 'प्रतिमान' ज्या अधिक मोठ्या प्रकल्पाचा भाग आहे त्या प्रकल्पांतर्गत गेल्या तीन दशकांमधल्या हिंदी प्रकाशनांचा प्राथमिक अभ्यास केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की, विद्यापीठांबाहेरही यासंबंधी मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. विद्यापीठातल्या शिक्षकांनी योगदान दिलं आहेच, पण ते मुख्यत्त्वे लिट्ल मॅगझिनांमधून, चळवळींमधून, सार्वजनिक वादांच्या व्यासपीठांवरून पुढे आलेलं दिसतं.

त्यामुळे भारतीय भाषांमधे सामाजिक शास्त्रांचा गंभीर अभ्यास (समाजचिंतन) करण्याच्या प्रयत्नात मुळात या भाषांमधून यासाठी उपलब्ध असलेली रूपं व मार्गांचा विचार करणं हे अधिक मोठं आव्हान ठरू शकतं. भाषा ही केवळ कल्पनांचं वाहन म्हणून काम करते यावर आमचा विश्वास नाही, सामाजिक शास्त्रांचा केवळ अनुवाद करून कुठल्यातरी कथित वैश्विक अनुभवाच्या छायेखाली काम करत राहण्यावरही आमचा विश्वास नाही. आम्हाला असं वाटतं की भाषा ज्या कल्पनांना आकार देते व त्यांचा प्रसार करते त्या कल्पनांशी ती अनिवार्यपणे जोडलेली असते. वास्तविक पाहाता, एकोणिसाव्या व विसाव्या शतकाच्या पहिल्या पन्नास वर्षांमधे मोठ्या प्रमाणावर सामाजिक व राजकीय विचारांनी थिट्या अभ्यासांना जन्म दिला याचं मुख्य कारण सामाजिक शास्त्रं इंग्रजीकडे सुपूर्त केली गेली हे आहे. सामाजिक शास्त्रांच्या पवित्र जगामधे जे विहरू शकतील त्यांनाच खऱ्या अर्थाने अभ्यासाच्या जगातही प्रवेश करता येईल. हिंदीमध्ये मोठ्या प्रमाणावर असलेला प्रकाशन व वाचन व्यवहार हा एक संकेत धरला तर त्यातून काही मोठे बदलही दिसण्याची शक्यता आहे. या बदलांच्या प्रक्रियेतून 'सामाजिक शास्त्रं' वेगळी कशी राहतील?

'सीएसडीएस'चा भारतीय भाषा उपक्रम व वाणी प्रकाशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून 'प्रतिमान' हे पत्र दर सहा महिन्यांनी प्रकाशित होईल.

०२ मार्च २०१३

आण्विक धोरण : हितसंबंधांमधला विरोधाभास

- नित्यानंद जयरामन

(नित्यानंद हे कुडानकुलम आण्विक प्रकल्पविरोधी आंदोलनातील चेन्नईस्थित कार्यकर्ता आहेत. त्यांचा हा लेख त्यांनी कालच 'रेघे'कडे पाठवला होता आणि मराठीत तो प्रकाशित व्हावा अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी त्यांच्या पातळीवर एखाद्या मराठी वर्तमानपत्रात तो छापून यावा यासाठी प्रयत्न केले, पण काही कारणांमुळे ते होऊ शकलं नाही. मूळ इंग्रजी लेख 'एशियन एज'च्या मुंबई आवृत्तीतल्या संपादकीय पानावर आज प्रसिद्ध झाला आहे. मराठी भाषांतर 'रेघे'वर प्रसिद्ध होऊ शकत असल्यास पाहावं असं नित्यानंद यांचं म्हणणं होतं. अन्यथा वाया जात असलेल्या या मराठी भाषांतराला 'रेघे'चं व्यासपीठ द्यायला हरकत नाही, असं वाटल्यामुळे ही नोंद. प्रश्न एवढे गुंतागुंतीचे असतात की त्याच्या अनेक बाजू तपासायला हव्यात. आता ही एक बाजू सध्या आपल्याकडे स्वतःहून व्यासपीठाच्या शोधात आलेली आहे, तर तिला ते देणं एवढ्याच भूमिकेतून आपण ही नोंद 'रेघे'वर करत आहोत.)

आण्विक विधी संघटनेच्या (न्युक्लियर लॉ असोसिएशन - एनएलए) इच्छेनुसार सगळं झालं तर आज (२ मार्च) मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय महादेव ठिपसे आणि आण्विक ऊर्जा नियंत्रण मंडळाचे (अॅटोमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड - एईआरबी) अध्यक्ष एस. एस. बजाज 'एनएलए'च्या दुसऱ्या वार्षिक परिषदेला हजर असतील. भारतात होत असलेल्या या सभेच्या कार्यक्रमपत्रिकेवरचा मुख्य विषय आहे : 'भारतातील आण्विक ऊर्जा क्षेत्र : व्यावसायिक संधी आणि कायदेशीर आव्हानं'. या सभेमध्ये 'आण्विक ऊर्जा प्रकल्पांमधे नियंत्रणात्मक सहभाग' या विषयावरच्या परिसंवादात न्यायाधीश ठिपसे अध्यक्षस्थानी असणार आहेत, असं कार्यक्रमपत्रिका सांगते. 'एईआरबी'चे अध्यक्ष एस. एस. बजाज या परिसंवादातील मुख्य व्याख्याते असणार आहेत. आधीच्या नियोजनानुसार मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अध्यक्षीय भाषण करणार होते, पण त्यांचं नाव नंतर वगळण्यात आलं.

कुडानकुलम प्रकल्पानंतर लोकांशी संवाद साधण्याच्या विषयासंबंधी या कार्यक्रमात वक्ते बोलणार आहेत. आण्विक ऊर्जा प्रकल्पांना लोकांनी स्वीकारावं यासाठी कोणते मार्ग अवलंबावे यासंबंधीही यावेळी भाषणं होणार आहेत. आण्विक नुकसान कायद्यासंबंधी वादग्रस्त नागरी उत्तरादायित्त्वाच्या मुद्द्यावरही यावेळी चर्चा होणार आहे. 'एईआरबी'चे अध्यक्ष श्री. बजाज  आणि न्यायमूर्ती ठिपसे यांचा या कार्यक्रमातला सहभाग निश्चित झाला तर त्यातून काही प्रश्न उपस्थित होतात. जैतापूरमधल्या आण्विक ऊर्जा प्रकल्प उभारण्यापासून 'अरेव्हा' कंपनीला कसं रोखावं, या विषयावर कोकण बचाव समितीने परिसंवाद आयोजित केला तर त्याला एखादा न्यायाधीश किंवा 'एईआरबी'चे अध्यक्ष उपस्थित राहू शकतील का? बहुधा नाही.

आण्विक ऊर्जेच्या वादग्रस्त मुद्द्यावरच्या या परिषदेच्या आयोजकांची भूमिका स्पष्ट आहे. भारतात २०५०पर्यंत आण्विक ऊर्जानिर्मिती ४,७८० वॅटपासून पावणेतीन लाख वॅटवर नेण्याचं आश्वासन सरकारने दिलं आहे. या आश्वासनातून निर्माण होणाऱ्या व्यावसायिक संधींपुढच्या कायदेशीर आव्हानांमधला जोर कमी करण्यासंबंधी काय करता येईल याचा शोध, हा आयोजकांचा हेतू आहे. या परिषदेतील व्याख्यात्यांमधे आण्विक ऊर्जा विभाग, आण्विक ऊर्जा नियंत्रण मंडळ, ऊर्जा संशोधन संस्था, अलस्टॉम, अरेव्हा, एनपीसीआयएल आणि एल अँड टी आदी संस्था-कंपन्यांमधले अधिकारी समाविष्ट करण्यात आले आहेत. आण्विक दुर्घटनांमधे संबंधित कंपनीवर असलेले उत्तरादायित्त्व अति बंधनकारक आहे व आण्विक यंत्रणा पुरवठादारांसाठी अडथळा आहे अशी या सर्वांची स्पष्ट भूमिका आहे.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अणुउद्योगाच्या सर्व समस्यांना उत्तर देण्यासाठी त्यांच्या क्षमतेनुसार सर्व त्या गोष्टी केल्या. भारतातील आण्विक कार्यक्रमाचे निरीक्षक आणि भौतिकशास्त्रज्ञ सुव्रत राजू यांनी म्हटल्याप्रमाणे, 'अमेरिकी हितसंबंधांशी प्रामाणिक राहण्याच्या मार्गात देशांतर्गत राजकीय अडथळे येऊ देत नाही ती सरकारं विश्वसनीय ठरतात.' आण्विक उत्तरादायित्त्व कायद्यावर संसदेत मोठ्या प्रमाणावर वाद झाल्यानंतर आण्विक यंत्रणा पुरवठादारांना उत्तरादायी ठरवणारं कलम कायम ठेवण्यात आलं, पण सरकारने आपली 'विश्वसनीयता' सिद्ध करण्यासाठी कायद्यातील नियमावलीमधे पळवाटा घालून ठेवल्या. या पळवाटा घटनाबाह्य असल्यासंबंधीचा खटला सध्या सर्वोच्च न्यायालयात चालू आहे.

आण्विक उत्तरादायित्त्वाचा मुद्दा घालवण्यासाठी कार्यरत असलेल्या परिषदेत एका न्यायाधीशाने व 'एईआरबी'च्या अध्यक्षांनी सहभागी झाल्याने न्यायव्यवस्था व नियंत्रणसंस्था यांच्या निरपेक्ष असण्यावरच शंका उपस्थित होऊ शकते. न्यायाधीशांना आणि 'एईआरबी'च्या अध्यक्षांना स्वतःची मतं असण्याचा अधिकार आहेच, पण आण्विक लॉबीइस्टांच्या व्यासपीठावर ती मांडणं अयोग्यच ठरेल.

आण्विक ऊर्जेसंबंधीचा वाद महत्त्वाचा आहे. पण गढूळ वातावरणात चर्चा होऊ शकत नाही. आण्विक ऊर्जेविरोधात उपोषणाला बसलेले मच्छिमार आणि शेतकरी राष्ट्रविरोधी असल्याचा, त्यांना परदेशांतून निधी येत असल्याचा, ते माओवादी असल्याचा आरोप केला जातो. आण्विक ऊर्जेचा पर्याय स्वीकारताना काळजी घ्यावी अशी मतं मांडणाऱ्या आणि कुडानकुलम प्रकल्पविरोधकांना पाठिंबा देणाऱ्या वैज्ञानिकांना, लेखकांना आणि कार्यकर्त्यांना भारतात येण्यासही बंदी करण्यात येते.

कोलारॅडो विद्यापीठातले विख्यात भूगर्भशास्त्रज्ञ प्राध्यापक रॉजर बिल्हॅम यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात नवी दिल्ली विमानतळावरून परत पाठवण्यात आलं. जैतापूर भागाच्या भूकंपप्रवणतेसंबंधी आपण एक शोधनिबंध लिहिल्यामुळे भारत सरकारने आपल्याला काळ्या यादीत टाकलं असल्याचा आरोप बिल्हॅम यांनी केला होता. गेल्या सप्टेंबरमधे मसाहिरो वतारिदा, शिन्सुके नकाई आणि योगो उनोदा या तीन जपानी कार्यकर्त्यांना चेन्नई विमानतळावरून परत पाठवण्यात आलं. या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी त्यांना विचारलं की, 'त्यांनी कुडानकुलमसंबंधीच्या आंतरराष्ट्रीय निवेदनावर स्वाक्षरी केलेय का, तर मग ते आण्विक ऊर्जाविरोधक आहे'. त्यामुळे त्यांना परत जावं लागलं.

कुडानकुलममधे 'एनपीसीआयएल'च्या आण्विक प्रकल्पाविरोधातील शांततापूर्ण आंदोलन आता दुसऱ्या वर्षात आहे. दोन लाखांहून अधिक लोकांवर तीनशेहून अधिक पोलीस तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील बहुतेक तक्रारी कुडानकुलममधल्या पोलीस स्थानकातच दाखल आहेत. यातील दहा हजारांहून अधिक आरोपी निनावी आहेत आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा किंवा राष्ट्राविरोधात युद्ध पुकारल्याचा खटला दाखल करण्यात आलाय. आंदोलनाचं नेतृत्त्व करणाऱ्या व्यक्तींना इदिन्थकराई या गावात जवळपास कोंडण्यात आलंय. या गावात प्रवेश करणं मुश्किल आहे.

दुसरीकडे, आण्विक ऊर्जेचं समर्थन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय 'एनजीओ'ने मुंबईतल्या फाईव्हस्टार हॉटेलात आयोजित केलेल्या परिषदेत भारत सरकार सहभागी होतं. अशा परिस्थितीत आण्विक ऊर्जेसंबंधीच्या निःपक्ष चर्चेत सरकार सहभागी होईल हे दिवास्वप्न आहे. पण किमान न्यायाधीशांनी आणि नियंत्रक संस्थांच्या अधिकाऱ्यांनी व्यक्तिगत पातळीवर अशा परिषदांना उपस्थित राहाणं टाळावं अशी अपेक्षा तरी आपण करू शकतो.

०१ मार्च २०१३

एका आझाद इसमाची गोष्ट

अमन सेठी
अमन सेठी सध्या 'द हिंदू'चा आफ्रिकेतला प्रतिनिधी म्हणून काम करतोय. आदिस अबाबाला असतो. आधी त्याने याच वर्तमानपत्रासाठी छत्तीसगढमधेही काम केलेलं आहे. मूळचा दिल्लीतला आहे. २००५पासून 'हिंदू'सोबत आहे. 'अ फ्री मॅन' हे अमनचं पहिलंच पुस्तक. 

'रेघे'वर आपण केवळ पुस्तक परीक्षण असं काही काम ठेवलेलं नाही, आणि खरंतर ही नोंद तशी नाहीही. हे पुस्तक म्हणजे पत्रकारितेशी मजबूत संबंधित आणि पुन्हा स्वतंत्र पुस्तक म्हणूनही सुंदर अशी गोष्ट असल्यामुळे आपण तिची नोंद करतोय, माध्यमं आणि साहित्य अशा दोन्ही विभागात बसणारी. आणि सामाजिक समस्येवर लिहिण्याचा आव आणत स्वतःच्या पोकळ संवेदनशीलतेचं प्रदर्शन करणाऱ्या पत्रकारी लिखाणासारखं हे नाही, तर आपण कुठे आहोत आणि एकूण आपला आसपास कुठे आहे याची पुरेशी जाणीव ठेवून लिहिलेलं हे पुस्तक आहे, असं वाटलं म्हणून त्याची नोंद 'रेघे'वर. मुख्य प्रवाह बाजूला ठेवला तरी स्वतंत्रपणे पत्रकारांना काय करता येण्यासारखं आहे, याची नोंद करणं हाही एक हेतू.
***

भारताला स्वातंत्र्य मिळालं १९४७ साली. त्यानंतर आत्तापर्यंत आपण स्वतंत्रच आहोत. आपण म्हणजे भारतातले नागरिक.
पण एकूणच स्वातंत्र्य म्हणजे काय?
***


मोहम्मद अश्रफ मूळचा बिहारमधल्या पाटण्याचा. पण गेली काही वर्षं तो दिल्लीतल्या सदर बाझार परिसरातल्या बारा टूटी चौकात रोजंदारीवर काम करतोय. त्याला हवं तेव्हा तो काम करतो, अन्यथा बिडी फुंकत, कधी दिवसेंदिवस दारू पीत वेळ काढत राहातो. हेच त्याचं स्वातंत्र्य!
म्हणून पुस्तकातल्या पहिल्या प्रकरणाचं नाव 'आझादी'.

अश्रफचं हे स्वातंत्र्य समजून घ्यायला त्या चौकात अमन चार-पाच वर्षं फिरत होता. तिथल्या कामगारांसोबत वेळ घालवत होता. त्यांच्याशी त्याची दोस्तीही जमलेली. पण ही दोस्ती म्हणजेही फारच तकलादू चीज असावी, याचीही जाणीव अश्रफसकट सगळ्यांनाच आहे की काय? कारण सगळे हे कामगार पुन्हा सुटेसुटे एकेकटेच आहेत. मूळचं घर कुठाय, घरी कोण कोण राहातात, लग्न झालंय की नाही, मूळचं ठिकाण सोडून इथे येऊन राहाण्याचं कारण काय, घरी कधी जाता, या प्रश्नांची काही ना काही उत्तरं पुस्तकातून अमन आपल्यापर्यंत पोचवत राहातो. या प्रश्नांमधून हाताशी लागतो तो भयाण एकटेपणा. दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे 'अकेलापन'.

ह्या पुस्तकाची चांगली बाजू काय, तर आपण सामाजिक प्रश्न मांडतोय आणि आपल्याला त्याबद्दल किती कळवळा आहे याविषयी लेखकाने कोणताही आव आणलेला नाही. जी आपसूक कळ कोणत्याही जाग्या असलेल्या डोक्यातून उठेल ती पुस्तकात आहे, पण त्यापलीकडे जाऊन अनावश्यक उरबडवेपणा नाही किंवा आपणच तितके संवेदनशील असला बडेजावही नाही. त्यामुळे अमनभाई बारा टूटीचा एक सुटा का होईना भाग बनू शकतो. तो तिथे पुस्तक लिहायला आलाय आणि आपण त्याच्याशी बोलतोय त्याची नोंद पुस्तकात होणार आहे, आपल्याशी त्याचा वास्ता फक्त पुस्तकातल्या नोंदीपुरताच आहे, याची जाणीव अश्रफभाईला आणि चहाची टपरी चालवणाऱ्या काकाला, लल्लू, रेहान, मुन्ना या इतर मंडळींनाही आहे. त्यांनी अमनला तरीही जितक्यास तितकं तरी स्वीकारलंय.

म्हणजे कधीकधी अश्रफ अमनला मूर्खात काढायलाही कमी करत नाही आणि तेही पुस्तकात नोंदवलेलं असतं. कधी ह्या ग्रुपमधल्या एका कामगाराला टीबी होतो, तेव्हा खरं एकटेपणातलं भयाणपण समोर येतं नि मग हॉस्पिटलसाठी आणि उपचारांसाठी अमनला खटपट करायला लागते. ती तो जमेल तेवढी करतोही. पण तरीही तिसरं प्रकरण नावातच सांगतं ती गोष्ट उरतेच : 'लावारिस'.

मग कोणी वेडा होत चाललेला कामगार मनुष्य अखेरीस ठार वेडा होऊन ट्रकमागे नागडा धावताना दिसतो. पण कोणी काही करू शकत नाही.

आपलं शरीर जोपर्यंत ठिकाठाक आहे तोपर्यंत असलेलं हे स्वातंत्र्य आहे. आपल्याला हवं तेव्हा काम करण्याचं. आपल्याला हवं त्याला फाट्यावर मारण्याचं. अमन ज्या ग्रुपमधे रुळलाय तो ग्रुप रोजंदारी करून पैसे कमावतोय, कुणाकडे कायमस्वरूपी नोकरी करण्यात त्यांना रस नाही. कधी रंगाऱ्याचं काम कर, कधी हमाली, असं त्यांनी कामाचं स्वरूप ठेवलंय. हेच त्यांच्या लेखी स्वातंत्र्य आहे.

पण मग बारा टूटीमधे सरकारी कारवाई होऊन अनधिकृत बांधकाम पाडण्याची सुरुवात झाल्यावर ही मंडळी कुठे जातात? राष्ट्रकुल स्पर्धांसाठी चकाचक होऊ घातलेल्या दिल्लीत अशी कोण कोण मंडळी आणखी कुठे स्थलांतरित झाली?

अश्रफ कोलकात्याला आपल्या जुन्या मित्राकडे गेला. दिल्लीला येण्यापूर्वी तो कोलकात्याला होता तेव्हा त्या दोघांनी एकत्र व्यवसाय केला होता, पण नंतर काही कारणाने अश्रफ दिल्लीला गेला. आता तिथून निघून जावं लागल्यामुळे तो कोलकात्याला परत येतो, पण मित्र तर आधीचा फुटकळ व्यवसाय बंद करून व्यवस्थित दुकान सुरू करून आहे, लग्न झालेलं आहे, व्यवस्थित कुटुंब आहे. अश्रफसाठी तो अजनबी ठरतो. चौथ्या आणि शेवटच्या प्रकरणाचं नाव : 'अजनबी'.
***

गुंतागुंतीचं गणित समजावून सांगितल्यासारखं अश्रफने एकदा सांगितलेलं, ''आदर्श काम तेच ज्यात कमाई आणि आझादी यांचा परफेक्ट बॅलन्स असतो.
''काम हे काम असतं कारण त्यात कमाई असते. कमाई नसेल तर ते काम नाही, तो छंद होईल. काही लोक त्याला सेवा म्हणतात. काही लोक त्याला उपक्रम म्हणतील. पण ते काम नक्कीच नाही. काम म्हणजे जे केलं की माणसाला पैसे मिळतात. ते पैसे म्हणजे त्याची कमाई.
''आमच्यापैकी बरेच जण कमाईकडे पाहून काम निवडतात. महिन्याला सहा हजार रुपये! अशा पैशांनी माणूस श्रीमंत होईल. पण एक महत्त्वाची गोष्ट ते गमावतात. कोणती महत्त्वाची गोष्ट?
आझादी, अमन भाई, आझादी.
''आझादी म्हणजे मालकाला बाझवत गेलास असं सांगण्याचं स्वातंत्र्य. मालक फक्त आपल्या कामावर मालकी सांगू शकतो, तो आपल्यावर मालकी सांगू शकत नाही.''

पान १९


अमन : घर बांधत असताना तुम्ही वेळ कसा घालवता?
कामगार : आम्ही काम करतो.
अमन : पण काम करताना तुम्ही कशाचातरी विचार करत असता का?
कामगार : प्रत्येकच जण करतो.
अमन : तुम्ही कशाचा विचार करता?
कामगार : काम करताना मी कामाचाच विचार करतो
.
पान ३७

रात्रीचे दोन वाजलेत आणि माझा फोन वाजतोय. हल्ली अधूनमधून असं होत असतं. बहुतेकदा तो अश्रफच असतो आणि बहुतेकदा तो प्यालेला असतो. जुन्या दिल्ली रेल्वे स्टेशनजवळ रात्रीही चालू असणारा टेलिफोन बूथ आहे.
''अमन सरजी, फोन करायला खूप उशीर झाला नसेल असं मला वाटतं, पण अश्रफला तुम्हाला 'हॅलो' म्हणावं वाटतंय.''
''हॅलो, अश्रफ.''
''हॅलो, अमनभाई. तुम्ही झोपलेलात काय?''
''होय.''
''हां. मी एवढंच सांगायला फोन केला की, काल चौकात एक मुलगी आलेली आणि तिने किती कामगार आहेत ते विचारलं. मी सांगितलं, 'पन्नास', मग तिने सगळ्या कामगारांना रांगेत उभं राहायला सांगितलं. मग तिने प्रत्येकाच्या हातात दहा रुपयांची नोट दिली आणि ती निघून गेली. हॅलो? ऐकताय ना?''
''हो्.''
''खूप उशीर झालाय ना?''
''होय, अश्रफभाई.''
''मला वाटलं तुमच्या अभ्यासासाठी हे तुम्हाला ऐकायला आवडेल म्हणून मी फोन केला. बाकी, आम्ही सगळे आता पीत बसलोय आणि तुमच्याबद्दलच बोलतोय. म्हणून म्हटलं, तुम्हाला फोनच लावावा.''
''होय. बरंच केलंत.''
''गुड नाईट, अमनभाई.''
''गुड नाईट, अश्रफ.''
पान ४६

''तुम्ही हे काय करताय, अमनभाई?''
''काय करतोय, अश्रफभाई?''
''हेच आमच्यासारख्या लोफर लोकांसोबत वेळ आणि पैसा घालवून दारू पिताय. आम्ही तुम्हाला काय शिकवणारोत?''
''मी पुस्तक लिहायचा प्रयत्न करतोय.''
''पण ते कोण वाचेल?''
''माहीत नाही. कदाचित माझे मित्र ते विकत घेतील किंवा दिल्लीतली आणखी काही माणसं घेतील.''
''पण तुम्हाला पैसा मिळेल का?''
''पैसे मी आत्ताही बऱ्यापैकी मिळवलेत.''
''किती पैसे?''
''एक लॅपटॉप घेता येईल इतके.''
''मग ठिकाय.''
सदर बाझारातल्या इतर लोकांप्रमाणे मलाही पैसे कमावता येतायंत याने सुटल्यासारखं वाटून अश्रफ रस्त्याशेजारी झाडाखाली असलेल्या लहानशा मंदिराजवळ थांबला. ''आईशप्पथ, अमनभाई, तुम्ही खूप पैसे कमवाल.''
''तुम्हीसुद्धा कमवाल, अश्रफभाई.''
''आणि लल्लू - तो माझा मिडियम-टाईप मित्र असला तरी तो माझा एकमेव मित्र आहे, अमनभाई. माझा एकमेव मित्र. आणि रेहानसुद्धा.''
''आणि काकासुद्धा.''
''आपण सगळे श्रीमंत होऊ, अमनभाई.''
''होय, अश्रफ, एके दिवशी आपण सगळे श्रीमंत होऊ.''

पान ८०

व्हिन्टेज / रॅन्डम हाउस इंडिया आवृत्ती - २०१२