Monday 4 March 2013

'प्रतिमान' या हिंदी पत्राच्या प्रकाशनासंबंधीचं टिपण

- आदित्य निगम

आदित्य निगम दिल्लीमधल्या 'सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज्' (सीएसडीएस) या संस्थेसोबत काम करतात. त्यांनी 'काफिला'वर लिहिलेल्या 'लीपिंग अक्रॉस अ ट्रबल्ड हिस्ट्री - लाँच ऑफ प्रतिमान' या लेखाचा मराठी अनुवाद त्यांच्या परवानगीने 'रेघे'वर नोंदवून ठेवतो आहे. भाषा आणि माध्यमं यांच्यासंदर्भात काही मुद्दे या लेखातून हाताशी लागू शकतात, म्हणून ही नोंद. 
या अनुवादात 'जर्नल' या इंग्रजी शब्दासाठी 'पत्र' हा मराठी शब्द वापरला आहे.'प्रतिमान'संबंधीचं प्रसिद्धीपत्रक
'प्रतिमान - समय, समाज, संस्कृती' या नवीन हिंदी संशोधन पत्राच्या आरंभाचा प्रकाशन सोहळा २८ फेब्रुवारी २०१३ रोजी 'सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज्, दिल्ली' इथे पार पडला. अनेक अर्थांनी हा कार्यक्रम ऐतिहासिक मानला पाहिजे. हिंदी आणि उर्दू यांच्यात दीर्घकाळ टिकून असलेल्या दरीचा त्रासदायक इतिहास व हिंदुस्तानी भाषेची हरवलेली परंपरा या पार्श्वभूमीवर 'प्रतिमान'च्या प्रकाशन समारंभात झालेलं विख्यात उर्दू अभ्यासक व कवी शमसूर रहमान फारुकी यांचं व्याख्यान ऐतिहासिक ठरणारं होतं. शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीच्या त्या इतिहासात बुडी मारण्याचा प्रयत्न म्हणजे एका अर्थी अप्रस्तुत आणि क्वचित उर्मटही समजला जाऊ शकतो, कारण उर्दू आणि हिंदी दोन्ही भाषांच्या शुद्धतेबाबत आग्रही असलेल्या संरक्षक मंडळींच्या विरोधात जाणारी ही कृती ठरते. या कृतीतून स्पष्ट झालेली गोष्ट हीच की, भाषा म्हणजे तथाकथित संरक्षक दाखवतात ती नसून सर्जनशीलता आणि आदानप्रदान व्यवहार यांमधून प्रवाहित होत असते तीच भाषा असते.

या कार्यक्रमात फारूकी यांनी 'उर्दू आदबी रवायत की सच्ची त्रिवेणी' या विषयावर बोलण्याचं ठरवलं हे सयुक्तिकच होतं. आपल्या अप्रतिम व्याख्यानात फारूकी यांनी उर्दू काव्य व सौंदर्यशास्त्रीय परंपरेतील तीन प्रवाह (त्रिवेणी) - अनुक्रमे अरबी, पर्शियन व संस्कृत- उलगडून दाखवले. अदृश्य असूनही 'अस्तित्त्वा'त असलेल्या सरस्वती नदीला अलाहाबादमधे गंगा नि यमुना या नद्या सामील होतात, त्या संगमाच्या 'त्रिवेणी'चं रूपक वापरण्यामागे कदाचित फारूकी यांनाही सध्या अदृश्य असलेल्या पण महत्त्वाच्या संस्कृत काव्य परंपरेकडे लक्ष वेधायचं असावं.

अनुकरण व प्रतिनिधित्त्वामध्ये व्यग्र असलेल्या ग्रीक व पाश्चात्त्य परंपरांविरोधात युक्तिवाद करत फारूकी यांनी असं म्हणणं मांडलं की, अरबी किंवा अधिक प्रमाणात पर्शियन आणि संस्कृत परंपरांनी कला / कविता यांच्याकडे त्यांच्या निर्मितीने तयार होणाऱ्या अर्थासंदर्भात व प्रभावासंदर्भात पाहिलं. पर्शियन, उर्दू आणि क्वचित अरबी कवितेच्या प्रांतातून आणि आनंदवर्धन, अभिनवगुप्त व कुंतक या मध्ययुगीन थोर काश्मिरी सौंदर्य अभ्यासकांच्या विचारधारांमधून फारूकी सहजी विहरत होते.
सामाजिक शास्त्रांचा अभ्यास हिंदी भाषेमध्ये व्हावा यासाठी गेल्या दहा वर्षांपासून प्रयत्नशील असलेल्या आमच्यासारख्यांसाठी तर हा कार्यक्रम खूपच महत्त्वाचा होता. दोन्ही बाजूंकडच्या सनातनी विचारांना ओलांडण्यापलीकडेही काही गोष्टी आमच्या कामाचा भाग आहेत, भाषेचं जे रूप आपल्यापर्यंत आलंय त्या रूपाला समोरासमोर आव्हान देणं हा या कामाचा एक महत्त्वाचा भाग आहे. गेल्या दहा वर्षांमधे 'सीएसडीएस'च्या भारतीय भाषा उपक्रमांतर्गत (मुख्यत्त्वे अभय दुबे यांच्या एकहाती परिश्रमामुळे) अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आणि 'दिवान-ए-सराई'सारखी काही पुस्तकं 'सराई' उपक्रमाखाली सिद्ध झाली. या प्रवासात एकेका शब्दावर, संकल्पनांवर अनेक वाद, अनेकदा उग्र भांडणं झाली, अनुवादाच्या कृतीविषयीही मोठे वाद या कालावधीत झाले. 'प्रतिमान' हे पत्र फुटीरतावादी भाषिक कलह टाळून स्पष्ट भूमिका घेणार आहे. हिंदी, हिंदुस्थानी, उर्दू यांच्या विविध शैली व विविध बोलींचा उत्सव म्हणजे 'प्रतिमान'.

'वैचारिक संकटा'बद्दल वारंवार दुःख व्यक्त करत असलेल्या हिंदीसारख्या भाषेत सामाजिक शास्त्रांविषयीचं एक संशोधन पत्र प्रकाशित होणं ही मुळातूनच एक महत्त्वाची घटना आहे. (१९९०च्या दशकात 'हंस' या साहित्यिक नियतकालिकाने हिंदीतील वैचारिकतेबद्दलचा वादाला वाचा फोडली होती आणि नंतर 'हिंदी प्रदेश का वैचारिक संकट' या नावाने हा वाद ओळखला गेला). भारतीय भाषिक वातावरणाशी, मुख्यत्त्वे हिंदी वातावरणाशी ज्यांचा परिचय असेल, त्यांना 'भारतीय भाषा या भावनांच्या अभिव्यक्तीसाठी चांगल्या आहेत, पण वैचारिक कामांसाठी त्यांचा तितकासा उपयोग नाही' हा काही समीक्षकांचा दावा माहीत असेल. भारतीय भाषांमधे झालेलं सामाजिक शास्त्रांसंबंधीचं संशोधकीय काम शोधायला गेलं की हा 'वैचारिकतेचा अभाव' जाणवू लागतो. असं काम फारसं सापडत नाही, हे वेगळं सांगायला नको. हा अभाव त्या भाषेची त्या विषयासंबंधीची 'कमतरता' आहे असं सिद्ध करण्यासाठी वापरला जातो. ज्याप्रमाणे आपली आधुनिकता अपूर्ण आहे, आपला निधर्मीवाद चुकीचा मांडला जातो आणि आपली भांडवलशाहीची कल्पना फोल गेलेय, त्याचप्रमाणे आपल्याला न संपणाऱ्या कमतरतांवरही विश्वास ठेवायला सांगितलं जातं. आमच्या मते, प्रश्न हा नाहीये की, भारतीय भाषांमधे सामाजिक शास्त्रांचा अभ्यास का नाही? तर, प्रश्न हा आहे की, या प्रदेशात सामाजिक विचारधारांची आणि बौद्धिकतेची रूपं कोणती आहेत आणि कोणत्या ठिकाणी असं काम सुरू असतं?

इथे आव्हान दोन पातळ्यांवरचं आहे. पहिलं म्हणजे भारतीय भाषांवर परंपरेतून ज्या विचारधारांचा आणि शैलीचा प्रभाव पडलाय त्यांची ओळख पटवून घेणं. याशिवाय आत्तापर्यंत आपली निष्क्रियता पुरेशी सिद्ध केलेल्या स्वदेशीवादी आणि पाश्चात्त्यविरोधी भूमिकेपासून स्वतःला दूर ठेवणं हे दुसरं आव्हान. त्यामुळे पारंपरिक विचारधारांच्या वैशिष्ट्यपूर्ण रूपांचं भान कायम ठेवून सामाजिक शास्त्रांचं पाश्चात्त्य ज्ञान प्रादेशिक भाषेत आणणं जसं आवश्यक आहे तसंच आपण विविध परंपरांच्या संगमाशी उभे आहोत याचं भान ठेवणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. फारूकी यांच्या 'त्रिवेणी'मध्ये तीन परंपरांच्या संगमाचा संदर्भ असेल तर आपण त्यात चौथ्या संदर्भाची भर घातली पाहिजे, आणि तो म्हणजे पाश्चात्त्य संदर्भ. हा चौथा संदर्भ आता शासकाच्या भूमिकेत नाही, तर आपल्या अभ्यासाच्या चौथ्या संदर्भापैकी एक मानावा असा आहे.

'प्रतिमान' या पत्राद्वारे जे करण्याचा मानस आहे त्यानुसार विद्यार्थ्यांनी सामाजिक शास्त्रांची तंत्रं आणि अभ्यासपद्धती तर आत्मसात करणं अपेक्षित आहेच, शिवाय विचारधारांच्या रूपांकडे लक्ष देणंही आवश्यक आहे. 'प्रतिमान' ज्या अधिक मोठ्या प्रकल्पाचा भाग आहे त्या प्रकल्पांतर्गत गेल्या तीन दशकांमधल्या हिंदी प्रकाशनांचा प्राथमिक अभ्यास केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की, विद्यापीठांबाहेरही यासंबंधी मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. विद्यापीठातल्या शिक्षकांनी योगदान दिलं आहेच, पण ते मुख्यत्त्वे लिट्ल मॅगझिनांमधून, चळवळींमधून, सार्वजनिक वादांच्या व्यासपीठांवरून पुढे आलेलं दिसतं.

त्यामुळे भारतीय भाषांमधे सामाजिक शास्त्रांचा गंभीर अभ्यास (समाजचिंतन) करण्याच्या प्रयत्नात मुळात या भाषांमधून यासाठी उपलब्ध असलेली रूपं व मार्गांचा विचार करणं हे अधिक मोठं आव्हान ठरू शकतं. भाषा ही केवळ कल्पनांचं वाहन म्हणून काम करते यावर आमचा विश्वास नाही, सामाजिक शास्त्रांचा केवळ अनुवाद करून कुठल्यातरी कथित वैश्विक अनुभवाच्या छायेखाली काम करत राहण्यावरही आमचा विश्वास नाही. आम्हाला असं वाटतं की भाषा ज्या कल्पनांना आकार देते व त्यांचा प्रसार करते त्या कल्पनांशी ती अनिवार्यपणे जोडलेली असते. वास्तविक पाहाता, एकोणिसाव्या व विसाव्या शतकाच्या पहिल्या पन्नास वर्षांमधे मोठ्या प्रमाणावर सामाजिक व राजकीय विचारांनी थिट्या अभ्यासांना जन्म दिला याचं मुख्य कारण सामाजिक शास्त्रं इंग्रजीकडे सुपूर्त केली गेली हे आहे. सामाजिक शास्त्रांच्या पवित्र जगामधे जे विहरू शकतील त्यांनाच खऱ्या अर्थाने अभ्यासाच्या जगातही प्रवेश करता येईल. हिंदीमध्ये मोठ्या प्रमाणावर असलेला प्रकाशन व वाचन व्यवहार हा एक संकेत धरला तर त्यातून काही मोठे बदलही दिसण्याची शक्यता आहे. या बदलांच्या प्रक्रियेतून 'सामाजिक शास्त्रं' वेगळी कशी राहतील?

'सीएसडीएस'चा भारतीय भाषा उपक्रम व वाणी प्रकाशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून 'प्रतिमान' हे पत्र दर सहा महिन्यांनी प्रकाशित होईल.

No comments:

Post a Comment