२७ ऑगस्ट २०१२

तुम्हीच जाहिरात आहात!

'मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी' 'टेक्नॉलॉजी रिव्ह्यू' नावाचं एक नियतकालिक काढते. या नियतकालिकाच्या संकेतस्थळावर साधारण वर्षभरापूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका लेखाच्या थोड्या भागाचं हे भाषांतर- (लेखातली आकडेवारीही वर्षभर जुनीच आहे.)

तीन वर्षांपूर्वी, '१-८००-फ्लॉवर्स' ही कंपनी फेसबुकवर पान तयार करणारी पहिली अमेरिकी फूल-व्यावसायिक कंपनी होती. ग्राहकांशी नातं जुळवण्यासाठी आणि काही उत्पादनं विकण्यासाठी त्यांनी या मोफत पानाचा वापर केला. पण फेसबुकवर वेगळी जाहिरात करण्यासाठी मात्र त्यांनी खूपच कमी खर्च केला होता. जानेवारीत मात्र कंपनीनं फेसबुकवर होणाऱ्या आपल्या जाहिरातींच्या खर्चात वाढ केली. एखादं उत्पादन किंवा ब्रँड आपल्याला आवडत असल्याचं दाखवण्यासाठी फेसबुकचे सदस्य जेव्हा 'थम्ब्स अप'ची खूण असलेल्या 'लाईक'वर क्लिक करतात, तेव्हा त्यांच्या मित्रांच्या पानावर साधी जाहिरात येते, उदाहरणार्थ- ज्युलिया लाईक्स '१-८०० डॉट कॉम'. या जाहिरातीवरच्या 'लाईक' बटणावर जे क्लिक करतील, त्यांच्या मित्रांच्याही पानांवर ही जाहिरात दिसू लागते आणि हे चक्र पुढं सुरू होतं.


या जाहिरातींच्या कृपेमुळं सदर कंपनीचे आता फेसबुकवर सव्वा लाखांहून अधिक चाहते आहेत. वर्षाच्या सुरुवातीला होती त्यापेक्षा दुपटीनं ही संख्या वाढलेय. '१-८०० फ्लॉवर्स'चे अध्यक्ष ख्रिस मॅक्कन सांगतात, 'आमच्या मार्केटिंग योजनेच्या केंद्रस्थानी आता फेसबुक असतंच.'

फोर्ड, प्रॉक्टर अंड गॅम्बल, स्टारबक्स, कोका-कोला अशा अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्याही असाच विचार करून फेसबुकवरच्या जाहिरातींसाठी लाखो डॉलर खर्च करतात. शिवाय स्थानिक पातळीवर उद्योगांची भर आहेच. फेसबुकला जाहिरातींच्या माध्यमातून गेल्या वर्षी (२०१०-११) दोन अब्ज डॉलरचं उत्पन्न मिळाल्याचं 'ई-मार्केटर' या व्यावसायिक माहिती सेवा पुरवणाऱ्या कंपनीनं म्हटलंय.






ज्या कंपनीकडून किमान पैसाही कमावला जाणार नाही असा अनेक तज्ज्ञांचा होरा होता, तीच कंपनी जाहिरातीचं मुख्य माध्यम बनल्याचं पाहणं अनेकांना आश्चर्यकारक वाटतंय. पण फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग आणि त्याचे जाहिरात अधिकारी शेरील सँडबर्ग (मुख्य कामकाज अधिकारी) नि डेव्हिड फिशर (उपाध्यक्ष, जाहिरात आणि जागतिक कामकाज) यांनी नुकतीच कुठं सुरुवात केलेय. इंटरनेटवरच्या जाहिरातीचे दोन मुख्य मार्ग आहेत - एकतर 'गुगल'वर 'शोधा'च्या रूपात किंवा दुसरं म्हणजे इतरत्र कुठल्याही संकेतस्थळावर 'बॅनर' किंवा व्हिडियो रूपातल्या जाहिराती करणं. यापेक्षाही वेगळंच काहीतरी करण्याचं फेसबुककर्त्यांच्या डोक्यात शिजतंय.

फेसबुकवर सध्या ज्या जाहिराती दिसतात, त्या मुख्यत्त्वे उजव्या बाजूला आयताकृती स्वरूपात असतात. एखादा लहानसा फोटो आणि १६० अक्षरांपर्यंतचा मजकूर त्यात असतो. सँडबर्क आणि फिशर यांच्या मनात काय आहे याचा अजिबातच अंदाज यातून येत नाही. एखाद्या कंपनीसंबंधीचा संदेश तयार करून त्याचा प्रसार करण्याची सोशल नेटवर्किंगची ताकद वापरून जाहिरातीचा अचाट मार्ग तयार करण्याच्या प्रयत्नात ही मंडळी आहेत. सनातन काळापासून मार्केटिंगचा सर्वांत मूल्यवान मार्ग मानला जातो तो तोंडी प्रसिद्धीचा. कारण मित्रमंडळींच्या शिफारशींना लोक जास्त किंमत देतात - याच गोष्टीचा फायदा उठविण्याचा प्रयत्नात फेसबुक आहे.


तोंडी प्रसिद्धीचा पारंपरिक मार्ग खूपच कमी लोकांपर्यंत पोचतो. फेसबुकचे सध्या ६० कोटी सदस्य आहेत (ही संख्या २०१२मध्ये ९० कोटींवर पोचलेय), त्यातल्या प्रत्येक सदस्याचे सरासरी १३० मित्रमैत्रिणी आहेत. या पार्श्वभूमीवर वैयक्तिक शिफारशीचा प्रसार अफाट स्तरावर नेण्याची कामगिरी फेसबुक करतं. मुळात, एखादी व्यक्ती फेसबुकवर जे काही करेल ते आपसूक त्याच्या मित्रांना कळतं. 'एका अर्थी हा मार्केटिंगचा जादूचा दिवा आहे - तुमच्या ग्राहकांनाच मार्केटिंगमध्ये सहभागी करून घेण्याचा मंत्र देणारा. तोंडी प्रसिद्ध एवढ्या अफाट प्रमाणात करता येण्याची ही पहिलीच वेळ आहे', असं सँडबर्ग सांगतात.

साध्या शब्दांत सांगायचं तर, आपण फेसबुक वापरतो याचा अर्थ आपण केवळ जाहिरात पाहातो असा नाही, तर आपणच जाहिरात झालेलो असतो. खाजगीपणा आणि वैयक्तिक माहितीच्या वापराच्या सामाजिक नियमांना फेसबुक आव्हान देत असल्यामुळं काही लोकांना या म्हणण्याचा त्रास होतो. खरंतर जाहिरातदार फेसबुकच्या प्रेमात पडतात त्याचं एक कारण हे आहे की, लोकांच्या आवडीनिवडींनुसार, त्यांच्या राहण्याच्या ठिकाणानुसार त्यांना हेरून जाहिरात करणं इथं सोपं जातं. 'फेसबुक आणि जाहिरातदार खूप माहिती जमवतात आणि त्यातून पैसा कमावतात, पण फेसबुक-सदस्यांना मात्र त्याची किंचित कल्पनाही नसते', 'सेंटर फॉर डिजीटल डेमॉक्रसी'चे जेफ चेस्टर म्हणतात.

पूर्ण लेख - You Are the Ad

२ टिप्पण्या: