२८ नोव्हेंबर २०१२

-



एक रस्ता. डांबरी. काळा रस्ता.
कुठे एक डबकं. म्हटलं तर पाणी खराब आहे. माणूस पिऊ शकत नाही म्हणून खराब म्हणायचं, पण तसं खराब नव्हे. वेळ पडल्यास माणसालाही प्यायला लागू शकतं असं पाणी. सुंदर त्यात शेवाळ. त्या शेवाळावर पक्षीही बसू शकतो वेळ पडल्यास आणि त्याची तशी ताकद असल्यास. पिवळ्या फिकट चोचीचा लहानसा पक्षी त्यावर बसलेला. ठप्प. आणि त्याच्यावरही पडलेलं काळोखं ऊन.
आजूबाजूला झाडीचा गुंता. एकएका झाडाचं खोड न् फांद्या यांच्यातला फरक कळू नये असा गडद हिरवट गुंता. झाडांची जाळीच.
त्या जाळीत पडलेलं ऊन. जाळीत पडल्यामुळे व्यवस्थित असलेलं. कुठे जखमबिखम झालेली नाही.
काही वेलींसारख्या गोष्टी. वेली म्हणजे नाजूक असतात त्याही आणि मजबूत असतात त्याही. नाजूक वेली कुठेही सरपटत गेलेल्या, एकमेकांवर चढलेल्या, एकमेकांत गुंतलेल्या, दोन झाडांना सांधणाऱ्या. मजबूत वेली जाड्या खोडाच्या, त्यांची त्यांची विचित्र रचना झालेली, काहीतरी गोल एकमेकांत गुंतल्यासारखी रचना, करड्या रंगाच्या खोडांची एकमेकांतली रचना. कधी त्यावरही पडलेलं ऊन, त्यामुळे स्पष्ट होणाऱ्या वेटोळ्या सावल्या. हे सगळं एकत्र एकमेकांत.

फोटो 'रेघे'वरचाच

















ब्रह्म भरलें ते सदोदित पाही। चालावया नाहीं, वाट कोठे।।
चालतां चालतां करें निवारावें। कोठें हे थुंकावे, कोणे ठायीं।।
जळांत मासोळी मासोळींत जळ। ऐसा हा पाल्हाळ, आहे बापा।।
तुका म्हणे वोहे गुरुकृपेविण। ऐसी आहे खूण सत्य बापा।।

संत तुकारामांचे अप्रकाशित अभंग - संपादक : वा. सी. बेंद्रे (कॉन्टिनेन्टल प्रकाशन). पहिली आवृत्ती - २००३
 - या पुस्तकातून वरचा अभंग

३ टिप्पण्या:

  1. चालावया नाहीं, वाट कोठे।।

    And isn't this the summary of great Cormac McCarthy's great 'The Road'?

    उत्तर द्याहटवा
  2. जाळीत पडलेलं ऊन. जाळीत पडल्यामुळे व्यवस्थित असलेलं. कुठे जखमबिखम झालेली नाही...जखम नसलेलं ऊन....आवडलं.

    उत्तर द्याहटवा
  3. वेली म्हणजे नाजूक असतात त्याही आणि मजबूत असतात त्याही....शप्पष..सुरेख..!!

    उत्तर द्याहटवा