Friday 30 November 2012

बाळ ठाकरे, भांडवलदार आणि श्रमिक गरीब

- विद्याधर दाते

'टाइम्स ऑफ इंडिया' आतासारखा व्हायच्या आधी तिथे तीन दशकांहून अधिक काळ पत्रकारिता केलेले विद्याधर दाते अजूनही विविध प्रकाशनांमधून लिहिते आहेत. त्यांचा हा लेख countercurrents.org या वेबसाईटवर प्रसिद्ध झाला होता. त्यांच्या परवानगीने आणि त्यांच्या नजरेखालून हा लेख मराठीत अनुवादित करून 'रेघे'वर नोंदवून ठेवतो आहे. मुंबई आणि तिथल्या घडामोडी सुमारे अर्ध शतक दात्यांनी पत्रकाराच्या नजरेतून पाहिल्या, त्याचा दाखला देणारा हा लेख-
बाळ ठाकरे (फोटो - इथून)
बाळ ठाकरे हे साहजिकपणेच असं व्यक्तिमत्त्व होतं जे भांडवलदारांचं लाडकं होतं आणि त्यांच्यासोबत भांडवलदारांना सहज सोयरिक वाटायची. त्यामुळेच बहुतेक माध्यमांमधे त्यांचं व्यक्तिमत्त्व 'लार्जर दॅन लाईफ' रंगवलं गेलं आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याबद्दल स्तुतीगान झालं.

शेक्सपियरच्या 'ज्युलियस सीझर' नाटकात मार्क अँटनीचा प्रसिद्ध संवाद आहे, 'माणसाची दुष्कृत्यं त्याच्यानंतरही जिवंत राहातात. चांगुलपणा मात्र हाडांसोबत गाडला जातो'. बाळ ठाकऱ्यांचे असे काही प्रश्न नाहीत आणि त्यांनी दृष्कृत्यं केल्येत असं सुचवायचाही इथे हेतू नाही. त्यांच्या समर्थनार्थ लिहिणाऱ्यांची कमतरता नाही. ठाकऱ्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे हे शेक्सपियरचे निस्सीम चाहते होते. त्यांनी आपल्या कमी उत्पन्नातला इतका भाग पुस्तकांवर खर्च केला की त्याने त्यांच्या आईला काळजी वाटू लागली आणि मग ते ग्रंथालयात बसून संशोधनात रमू लागले. बाळ ठाकरे आपल्या वडिलांपेक्षा अनेक प्रकारे वेगळे होते. प्रबोधनकार हे विवेकनिष्ठ, कार्यकर्ता वृत्तीचे आणि महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे समर्थक होते, त्यांनी अनेक पुस्तकंही लिहिली. पण त्यांची आठवण सध्या कोणाला आहे? बाळ ठाकऱ्यांना गंभीर पुस्तकांचा फारसा उपयोग नव्हता.

ठाकऱ्यांना त्यांच्या सांप्रदायिकतेबद्दल, द्वेष पेरणाऱ्या वक्तव्यांबद्दल, अतिरेकी कट्टरतेबद्दल नेहमीच पुरोगाम्यांच्या टिकेला सामोरं जावं लागलं. पण भांडवलदारांशी असलेल्या त्यांच्या मैत्रीबद्दल मात्र त्यांच्या कार्यकाळात आणि नंतरही फारसं बोललं जाताना दिसत नाही. प्रत्येक ठिकाणी व्यवस्थेला लोकांची अशी फौज लागतेच जी दुसऱ्यांशी सामना करू शकेल, विशेषकरून विरोधी मतांशी. डाव्या विचारांचा सामना करायला भांडवलदारांना शिवसेना हा चांगलाच साथी मिळाला.

ठाकऱ्यांच्या मृत्यूनंतर 'फेसबुक'वरच्या पोस्टवरून दोन मुलींना अटक झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर राग व्यक्त केला गेला आणि तो योग्यच होता. पण आपल्याशी सहमत नसलेल्या व्यक्तीचा जीव घेणे हे तर त्यापेक्षाही घृणास्पद कृत्य आहे. शिवसेनेने तेच केलं आणि त्याच मार्गाने त्यांनी राजकारणात आपलं पाऊल टाकलं. शिवसेनेचं दहशतीचं राजकारण १९७० साली कृष्णा देसाई या कम्युनिस्ट आमदाराच्या खुनापासून सुरू झालं. शिवसेनेचं अस्तित्त्व सिद्ध करणारी ही निर्णायक घटना होती. त्या काळी तुलनेनं सक्षम असलेल्या डाव्या चळवळीवर हा ठरवून केलेला हल्ला होता. कम्युनिस्टांव्यतिरिक्तही काही ठिकाणांहून या खुनाविरोधात आवाज उठले. पण ही धोक्याची घंटा आहे याची जाणीव मात्र अजूनही अनेकांना नाही. शिवसेनेबद्दल लिहिणाऱ्या अनेक राजकीय विश्लेषकांनी इतर अनेक वरवरच्या गोष्टींबद्दल लिहिलं, पण बाळ ठाकऱ्यांवर मात्र स्तुतीच उधळली. त्यांचा विनोद, मैत्रीपूर्ण स्वभाव याबद्दल त्यांनी लिहिलं, पण शिवसेनेच्या वर्गीय हितसंबंधांकडे मात्र बहुतेकांनी दुर्लक्ष केलं.

फॅसिस्ट आणि गुंड प्रवृत्तींना विरोध करायचा असो किंवा श्रीमंत आणि साम्राज्यवादी प्रवृत्तींना विरोध करायचा असो याबाबतीत बुद्धिमंत मंडळी घाबरलेली आणि निष्क्रिय असल्याचं बहुतेकदा दिसतं. जर्मनीवर नाझी सावट घोंघावत होतं तेव्हा या निष्क्रियतेबद्दल चिंता व्यक्त करताना जर्मन कार्यकर्ता मार्टिन निएमोलर म्हणाला होता की, दुसऱ्यांवर हल्ला झाल्यानंतर तुम्ही काही करणार नसाल, तर तुमच्यावर हल्ला होईल तेव्हा तुम्हाला वाचवायलाही कोणी नसेल. बाळ ठाकऱ्यांना वाहण्यात आलेल्या भावनातिरेकी श्रद्धांजल्यांमधे एका गोष्टीला मात्र अगदी सार्वत्रिक बगल देण्यात आलेय, ती म्हणजे कष्टकरी लोकांच्या चळवळींवर शिवसेनेने केलेले आघात. त्यावेळी तरुण पत्रकार म्हणून मी काम करत होतो. कृष्णा देसाईंचा एक मारेकरी काय बोलायचा ते 'फ्री प्रेस जर्नल'चे भालचंद्र मराठे सांगत, ते मला अजून आठवतंय. त्याने चाकू घुसवला आणि त्याची मूठ वळवली, कारण त्यानेच आतल्या भागाला पुरेशी इजा होते. ओंगळवाणा खून. बाळ ठाकऱ्यांचं स्मारक होणं आवश्यक असेल, तर कृष्णा देसाईंचं स्मारक होणं त्यापेक्षा जास्त आवश्यक आहे.

श्रीमंतांचे हितसंबंध जपून, गरीबांना हटवून जगभरातील शहरांची पुनर्रचना करण्यात येतेय, यासंदर्भात बाळ ठाकऱ्यांकडे पाहावं लागेल. शहरी जीवन, अर्थकारण आणि राजकारणाचे एक महत्त्वाचे विचारवंत डेव्हीड हार्वे हे या प्रश्नाबाबत मोलाचं बोललेत. शहरावर सामान्य माणसांचा अधिकार असायलाच हवा, शहरातील सेवांचा लाभ घेऊन विकासाला हातभार लावण्याचा अधिकार त्यांना आहे, असं ते म्हणतात. हा एक मूलभूत अधिकार म्हणून पाहण्यात यायला हवा. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'रिबेल सिटीज्' या पुस्तकात ते दाखवून देतात की शहरही निदर्शनांची आणि बदलाची बलस्थानं ठरू शकतात, अमेरिकेत ऑक्युपाय चळवळीच्या बाबतीत असंच झालं.

गरीब मराठी माणूस हा त्यांचा मुख्य मतदार असला तरी ठाकऱ्यांनी गरीबांची बाजू फारशी कधीच लढवली नाही. बोलण्यातून जे यायचं त्याला कृतीची जोड क्वचितच मिळाली. पण मग त्यांच्या अंत्ययात्रेला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाचं विश्लेषण कसं करावं? हा प्रश्न फेसबुकवर जॉन गेम या ब्रिटिश व्यक्तीने अगदी योग्य पद्धतीनं विचारला. ते स्वतः मुंबईत सामाजिक काम केलेले गृहस्थ आहेत. पक्के डाव्या विचारसरणीचे गेम म्हणतात की, शिवसेनेने नागरिकांसाठी काही कामंही केलं हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे.

(अंत्ययात्रेला झालेल्या अफाट गर्दीचंच बोलायचं झालं तर आपण याची आठवण ठेवू शकतो की मार्क्सच्या अंत्यविधीवेळी साधारण अकराच लोक उपस्थित होते).

होय, बाळ ठाकऱ्यांनी सामान्य लोकांच्या समस्या हातात घेतल्या, लोकांचं वैफल्य आणि आर्थिक निकड स्पष्ट बाहेर काढली, पण हे सर्व त्यांनी नकारात्मक पद्धतीने केलं. त्यासाठी त्यांनी पूर्वग्रह पुन्हा पेरले, हिंसाचाराला खतपाणी घातलं. यात बहुतेकदा गरीब लोकच मार खाणाऱ्या बाजूला असत. परप्रांतीयांच्या मुद्द्यावरही हेच झालं. श्रीमंतांनी घाबरावं असं ठाकऱ्यांकडे काही नव्हतं. पिळवणुकीवर जोर देणारी आणि त्यातून लोकांचं लक्ष वास्तवातल्या समस्यांवरून उडवून लावणाऱ्या संघटना उभारणारी व्यवस्था आपण तपासली पाहिजे, त्याशिवाय एका संकुचित दृष्टीकोनातून ठाकऱ्यांवर टीका करणं फारसं बरोबर होणार नाही.

मुंबईतून गरीबांचं होणारं उच्चाटन थांबवण्याची अपेक्षा ठाकऱ्यांकडून ठेवली गेली होती. वाघ, सम्राट, मुंबईचा राजा आणि अशा अनेक उपाध्या त्यांना दिल्या गेल्या. पण गरीबांना मदत करायची वेळ आली तेव्हा हा राजा एवढा दुर्बल का झाला?

मुंबईचं क्रूर उच्चभ्रूकरण झालं आणि श्रमिक शहराची तिची प्रतिमा बदलून गेली ती मुख्यतः ठाकऱ्यांच्या राजकीय कारकिर्दीतच. यातली शिवसेनेची भूमिका धडधडीतपणे दाखवणारं उदाहरण दादरमधल्या शिवसेना भवनासमोरच आहे. तुलनेने पर्यावरणपूरक असलेल्या या परिसरात उभी राहात असलेली काचेच्या तावदानांची पर्यावरणमारक इमारत कोणाच्या नजरेतून सुटू शकत नाही. याच इमारतीच्या अर्धवट बांधकामाच्या इथे उभं राहून शेकडो लोकांनी अंत्ययात्रेला प्रेक्षक म्हणून उपस्थिती लावल्याचं माध्यमांमधल्या फोटोंमधे दिसत होतं.

कोहिनूर गिरणी (फोटो सौजन्य : फ्रंटलाईन / शशी अशिवाल)
नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशनच्या कोहिनूर गिरणीची ही जमीन होती. सार्वजनिक जागांची कमतरता
असलेल्या या शहरात मराठी माणसाच्या बाजूने बोलणाऱ्या कोणीही ही जमीन सार्वजनिक वापरासाठी मिळावी अशीच मागणी केली असती. पण ही जमीन कोट्यवधी रुपयांना विकत घेण्यात आली. कोणी विकत घेतली तर राज ठाकरे आणि शिवसेना नेते मनोहर जोशींचा मुलगा उन्मेश जोशी यांनी. बांधकाम व्यवसायात दोघांचे जवळचे संबंध आहेत. 'इकॉनॉमिक टाइम्स'मधे १५ नोव्हेंबर २००९ रोजी आलेल्या बातमीनुसार या मालमत्तेमधला आपला वाटा विकून ठाकऱ्यांनी प्रचंड नफा कमवला.

माजी कसोटी क्रिकेटपटू माधव आपटे यांचे वडील लक्ष्मणराव आपटे यांच्या मालकीची ही गिरणी होती. आपटे हे मराठी माणूसच होते. आपट्यांची सांपत्तिक बाजू मजबूत होती. त्यांचा पेडर रोडला बंगलाही होता, तिथे आता वूडलँड्स अपार्टमेंटची गगनचुंबी इमारत उभी आहे.

कोहिनूर गिरणीची जागा रिकामी राहिली असती, तर आता शिवसेना ठाकऱ्यांच्या स्मारकासाठी जोरदार मागणी करत असताना सरकारला जागेची शोधाशोध करत राहावी लागली नसती. पण सार्वजनिक स्त्रोतांना गिळंकृत करणं हे तर अगदीच सोपं आहे. त्यामुळे शहरातील तुरळक मोठ्या रिकाम्या ठिकाणांपैकी एक असलेल्या शिवाजी पार्कवर स्मारक व्हावं अशी मागणी होतेय. हे स्मारक म्हणजे सिमेंट-काँक्रिटची कायतरी आक्राळविक्राळ वास्तू म्हणून तयार होण्याऐवजी पर्यावरणपूरक असं कायतरी होईल अशी आता फक्त आशाच ठेवता येईल.

स्मारकं बांधण्याच्या बाबतीत आपल्याकडे आकारउकाराचं अज्ञान आहेच. काही दिवसांपूर्वीच मी नागपूरला गेलो होतो. मृत्यूच्या आणि अंत्यविधीच्या दिवशीही दैनंदिन कामकाज सुरळीत होतं. कुठेही 'बंद' दिसत नव्हता. शहराच्या सीमेवर 'पसायदान' हे एक सांस्कृतिक केंद्र आहे, तिथे संत ज्ञानेश्वरांचा अवास्तव मोठा पुतळा आहे.

महाराष्ट्राची व्यापक उदारमतवादी परंपरा ठाकऱ्यांनी उलट फिरवली. महात्मा गांधींचे गुरू होते गोपाळ कृष्ण गोखले आणि विशेष आवडते शिष्य होते विनोबा भावे. ठाकऱ्यांनी स्वतःला सेनापतीचा किताब दिला, सैनिकी नेतृत्त्वाचा, आणि निर्दयपणे वागले. महाराष्ट्राचे दुसरे सेनापती, सेनापती पांडुरंग महादेव बापट यांच्यापेक्षा हे किती वेगळं होतं! सेनापती बापटांनी इंग्लंडमधे महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान बॉम्ब बनवायचं प्रशिक्षण घेतलं आणि भारतात गांधीवादी मार्ग स्वीकारला. जगातील धरणविरोधी पहिल्या आंदोलनाचे नेतृत्त्व बापटांनी केलं. मावळ प्रांतातील मुळशी सत्याग्रहाचे ते प्रमुख आधार होते. मावळ प्रांतातील या लोकांचे पूर्वजच शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मावळे होते. नुकतंच पश्चिम बंगालमधल्या सिंगूरमधे घडलं, तसं मुळशीतली सुपीक जमीन सरकारने टाटांच्या ताब्यात दिली. ही घटना १९२१ची. गरीबांच्या जमिनीची ही लूटमार आता पुन्हा सुरू झालेय. मावळ्यांची ही जमीन हडपून तिथे नागरी वसाहती वसवण्याचे प्रयत्न सुरू झालेत. नेहमी शिवाजीच्या नावाने घोषणा देणाऱ्या शिवसेनेने याविरोधात एक अक्षरही काढलेलं नाही, कारण राजकीयदृष्ट्या सोईची आणि पिळवणुकीला सोपी अशी ही जागा आहे. श्रमिक वर्गाचा पूर्ण इतिहास आणि वारसा उखडून टाकण्याच्या प्रयत्नांना थोपवण्यासाठीही शिवसेना काहीही करत नाही.

शिवसेना आणि भांडवलदारांमधील जवळकीचे संबंधी बहुतांशी राजकीय विश्लेषणात आणि विद्यापीठीय अभ्यासात दुर्लक्षिले जातात. पण इथेच मला आश्चर्याचा धक्का बसणारा एक लेख वाचनात आला. बजाज समुहाचे अध्यक्ष राहुल बजाज यांच्या लेखातल्या शब्दांमागचा आशय आपण सहजी ओळखू शकतो. 'इकॉनॉमिक टाइम्स'मधे १९ नोव्हेंबरला पहिल्या पानावर छापून आलेल्या लेखात बजाज म्हणतात, 'माझे स्वर्गीय चुलते रामकृष्ण बजाज हे बाळासाहेबांचे खूप चांगले मित्र होते. संसदीय निवडणुका सुरू होत्या तेव्हा बाळासाहेब आणि माझे चुलते दोघेही कम्युनिस्टविरोधी होते. काँग्रेस आणि शिवसेनेच्या तत्त्वांमधे काहीही साम्य नसतानाही त्यांचे संबंध चांगले होते.' निवडणुकांमधे काँग्रेसचा पाडाव झाल्यानंतर देशभर डाव्या चळवळींविरोधात संघटना फोफावत होत्या तो हा काळ. काँग्रेसचं खालावणं आणि डाव्यांची आघाडी याने भांडवलदारांमधे चिंतेचं वातावरण होतं. यातील अमेरिकेच्या सहभागाबद्दल त्या काळचा कोणताही प्रामाणिक पोलीस अधिकारी किंवा राजकीय निरीक्षक यावर प्रकाश टाकू शकेल.

ठाकऱ्यांकडे असलेल्या ताकदीबद्दल अनेक लोकांना अचंबा वाटायचा. 'टाइम्स ऑफ इंडिया'तले माझे वरीष्ठ सहकारी आणि आघाडीचे व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्यामध्येही ही भावना मी पाहिली. त्या दोघांनीही राजकीय व्यंगचित्रकार म्हणून १९४०च्या दशकात 'फ्री प्रेस जर्नल'मधून कारकिर्द सुरू केली. 'ठाकरे बघ किती पुढे गेले, नि मी इथे आहे', असं लक्ष्मण एकदा उदास स्वरात मला म्हणाले होते. लक्ष्मण यांच्याबरोबर मी सहमत नव्हतो अशी ही एकच वेळ.

सध्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल तुलनेने बऱ्यापैकी जागरूकता आहे. पण पूर्वी असं फारसं नव्हतं. पूर्वग्रहदूषित दृष्टीकोनाचं एक लक्ष्य ठरले होते ते इतिहासाचे मार्क्सवादी प्राध्यापक पंढरीनाथ विष्णू रानडे. ते कलासक्त होते, कवी होते आणि त्यांनी अजंठ्यातील कलेसंबंधी पुस्तकही लिहिलं होतं. हे १९७४ साल. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं (१६७४) त्रिशताब्दी वर्ष. महाराष्ट्रात ते मोठ्या उत्साहात साजरं झालं. प्राध्यापक रानड्यांनी 'रणांगण' साप्ताहिकात याविरोधात सूर लावला. शिवाजी महाराजांविषयी त्यांच्या मनात आदराचीच भावना होती पण शिवकालीन सामंतशाही पाहता सध्याच्या लोकशाही व्यवस्थेत अशा प्रकारे भक्ती करू नये असं त्यांचं मत होतं. यामुळे वादळ उठलं. रानड्यांची मराठवाडा विद्यापीठातील नोकरी गेली. भारतीय इतिहास परीषदेतील काही आघाडीच्या इतिहास अभ्यासकांनी या कारवाईचा निषेध केल्यानंतर त्यांना पुन्हा नोकरीवर घेण्यात आलं. एके दिवशी एका ठिकाणी व्याख्यान देऊन ते परतत असताना दादर पुलावर त्यांना शिवसैनिकांनी घेराव घातला आणि धमकी दिली. मी मधे पडायचा प्रयत्न केला तेव्हा मला मारहाण झाली, माझा चष्मा होत्याचा नव्हता झाला. अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर झालेल्या या हल्ल्याचा निषेध करण्याऐवजी 'महाराष्ट्र टाइम्स' या आघाडीच्या दैनिकाने संपादकीयातून रानड्यांवरच टीका केली. ही दुर्दशा आहे. बहुतेक लोकांचं सार्वजनिक आकलन वास्तवाच्या पूर्ण उलट असतं. मी अनेक 'उच्चशिक्षित' लोकांना भेटलोय, ज्यांचा असा पूर्ण विश्वास आहे की, १९९२-९३च्या दंगलींमधे मुस्लीम हिंसाचारापासून हिंदूंचं रक्षण ठाकरेंनीच केलं!

(फोटो सौजन्य : फ्रंटलाईन / विवेक बेंद्रे)
ठाकऱ्यांना ज्यांनी ताकद पुरवली त्या लोकांना दोषी ठरवणं सोपं आहे. पण आपली व्यवस्था मुळातूनच अनाय्य आणि पक्षपाती असल्यामुळे त्यांनी तसं केलं असं मला वाटतं. 'उच्चशिक्षित' लोक जर फॅसिस्ट वृत्तीकडे एवढे आकर्षित होत असतील तर सामान्य जनांनी त्या वृत्तीला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांना दोषी ठरवण्यात काय हशील.

उद्योगपती आणि कलासंग्राहक हर्ष गोएंका यांनी ठाकऱ्यांच्या निधनानंतर 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेली प्रतिक्रिया पाहा. त्यांनी ठाकऱ्यांना क्रांतिकारी म्हटलं. मूळच्या संकल्पनेच्याच हे विरोधात आहे. काही म्हणायचंच असेल तर ठाकरे प्रति-क्रांतिकारी होते, असं म्हणता येईल.

लता मंगेशकरांनी ठाकऱ्यांना दिलेल्या कट्टर समर्थनाची मुळं त्यांच्या वडिलांपर्यंत जातात. मास्टर दिनानाथ हे हिंदू राष्ट्रवादाचे जनक स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे प्रशंसक होते. लताबाईंचे बंधू, संगीतकार हृदयनाथ यांनी विविध दूरचित्रवाणी कार्यक्रमांमधे सावरकरांचा महिमा गायला आहे, अनेकदा ते चौकटीबाहेर जाऊन त्याबद्दल बोलत.

राजकीय पक्षांकडून आलेल्या प्रतिक्रियांपैकी, तात्त्विकदृष्ट्या सर्वांत स्पष्ट प्रतिक्रिया मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र विभागाचे सरचिटणीस डॉ. अशोक ढवळे यांच्याकडून आली. त्यांनी ठाकऱ्यांचं विश्लेषण वर्ग संकल्पनेनुसार केलं.

'टाइम्स ऑफ इंडिया'त असताना मी ठाकऱ्यांच्या अनेक राजकीय मोर्चांचं वार्तांकन केलं. यातले अनेक मोर्चे वेधक होते आणि त्यांच्या कुशाग्र विनोदबुद्धीला दाद द्यावी अशी त्यांची भाषणं असत. काही वेळा माझ्या बातम्यांबद्दल ते खूष असत; त्यांच्या पत्नीचे बंधू आमच्या वृत्तपत्राच्या प्रशासकीय विभागात काम करत होते, त्यांच्याकडूनच हे मला कळे. पण शिवसेनेच्या विश्लेषणाचं बोलायचं तर दृष्टीकोन वस्तुनिष्ठच असायला हवा.

शिवसेनेमधल्या नकारात्मक गोष्टी खूपच मोठ्या आहेत. शिवसेना राज्यात सत्तेवर असताना मुंबईत खारमधल्या एका बैठकीत, ठाकऱ्यांनी एवढे खालच्या पातळीवरचे शब्द वापरले की मी खाजगी संभाषणातही ते वापरू शकलो नसतो. राजकीय वाद त्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर आणून ठेवले. इतर राज्यांमधल्या कट्टर नेत्यांनीही अशी दहशतीची आणि द्वेषाची भाषा कधी वापरली नव्हती, शिवसेनेने ते करून दाखवलं!
***

विद्याधर दाते यांचा ई-मेल पत्ता - datebandra@yahoo.com

दात्यांचं 'ट्रॅफिक इन दी एरा ऑफ क्लायमेट चेंज' हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. 
या पुस्तकाबद्दल 'द हिंदू'मधे आलेला मजकूर.

7 comments:

 1. ठाकरे गेल्यावर वृत्तपत्रांमधून जे काही छापून आलं, वृत्तवाहिन्यांमधून जे काही बोललं गेलं....त्या सगळ्यांपेक्षा खूप वेगळा असा लेख वाचायला मिळाला. उत्तम पत्रकार उत्तम विश्लेषक कसा असू शकतो हे कळलं... विद्याधर दातेंचे आणि 'रेघे'चे आभार...विचार करायला लावणारा लेख.

  ReplyDelete
 2. This is brilliant...Times of India was never much different than what it is today...There were an occasional V Date or RGK then...The real question, I have often asked, is why is otherwise kind and intelligent 'Marathi mind' so much attracted to fascism...In Germany they constantly think about how and why Hitler came to rule Germany...As a kid I have heard Narhar Kurundkar speak at Vasant Vyakhyan Mala, Miraj...He used to say to largely Brahmin audience there that now he was going to praise Gandhiji knowing fully well that most of his audience would not like to hear it...But then Hitler and Gopal Godse outsell Kurundkar thousands of times in books market! In the end : If Indeed R K Laxman said: 'ठाकरे बघ किती पुढे गेले, नि मी इथे आहे',...I feel terrible and wonder what kind of an artist Mr. Laxman is.

  ReplyDelete
 3. An article by Anupama Katakam 'Vanishing mill lands' in Frontline-

  http://www.frontlineonnet.com/fl2219/stories/20050923002304300.htm

  ReplyDelete
 4. Thanks, Date. You have shown great restraint in limiting your article to your personal encounters with Shivsena and Thakre; yet it is a pertinent comment on the harm suffered by Mumbai and the 'Marathi Manoos' on account of Thakre and his Shivsena

  ReplyDelete
 5. अनेक वर्षांपासून खरं तर एक घुसमट मनात होती की, सर्व राजकीय-सामाजिक विश्लेषक कुठल्याही घटनेचं विश्लेषण राजकीय व्यक्ती किंवा समूहाच्या बाजूनेच का करतात? म्हणजे अमुक पक्षाने अमुक मुद्दा अशा प्रकारे हाताळल्यामुळे त्यांना अपयश आलं. किंवा ह्या नेत्याने अमुक धोरण घेऊनच पुढील आखणी करावी इत्यादी. खरं तर एक सामाजिक जबाबदारी म्हणून ह्या विश्लेषकांनी प्रत्येक विषयाची चिकित्सा सामान्य माणसांच्या दृष्टीने करायला नको का? पण दुर्दैवाने कधी असं फारसं वाचनात आलं नाही.

  ह्या पार्श्वभूमीवर आपला लेख वाचून खूप समाधान मिळालं.
  खरंच अगदी प्रामाणिक विश्लेषण आहे. लोकांना काहीतरी अभ्यासलेलं सत्य सांगण्याचा आपला हा प्रामाणिक प्रयत्न वाटतो.

  परवा विजय तेंडुलकरांची एक मुलाखत बघत होतो त्यात ते म्हणाले कि घाशीराम कोतवाल नाटकाला तत्कालीन(म्हणजे ७०-७२ सालातील) राजकीय-सामाजिक परिस्थितीची भक्कम पार्श्वभूमी होती.
  ह्याच काळात शिवसेना डोकं वर काढू लागली होती. घाशीराम कोतवाल हा परीस्थितीने जाणीवपूर्वक निर्माण केला होता. नाना फडणवीसाने त्याचा हवा तसा वापर करून घेतला. तो करून घेताना घाशीरामाला कोतवाल पद बहाल करणंही त्याच्या मोठ्या राजकारणाचा एक भागच होता.
  मुलाखतीत तेंडूलकर म्हणाले कि दुर्दैवाने घाशीराम आजही आपल्या समाजात निर्माण केले जाताहेत, पाळले जाताहेत-मोठे होताहेत.
  ठाकरेसुद्धा भांडवलदार आणि उजव्या राजकारण्यांनी निर्माण केलेला घाशीरामच असेल का?
  त्याला शक्तिशाली बनवून, त्याच्या मार्फत दहशत फैलावून ह्यांचंच फावलं.
  तिथे नानाने घाशीरामला निर्घृण मरण दिलं कारण त्याला मारून पुणेरी जनतेच्या अन पर्यायाने पेशव्यांच्या नजरेतून तो वाचणार होता. आणि तसाही त्याला जिवंत ठेवणं नानासाठी घातकच होतं. म्हणून त्याने घाशीराम मारला.
  पण इथे परिस्थिती वेगळी होती. हा घाशीराम जिवंत असणंच एका वर्गाच्या फायद्याचं असावं. त्याच्या मरणाचा सोहळा करून त्याची दहशत आणखी काही काळ टिकली तर ते ह्यांच्या फायद्याचंच. आणि कालांतराने तो विस्मरणात गेला कि हा अंक संपला.
  आपण मात्र मुर्खासारखे कधी आनंदाचा कधी दुःखाचा सोहळा साजरा करतोय,असं वाटतं. पण ह्या सोहळ्यापासून खूप दूर काहीतरी भयंकर शिजतंय हे आपल्याला कधीच कळणार नाही कदाचित.

  घाशीराम निर्घृणपणे मारला जातो काय किंवा त्याचं स्मारक होतं काय, सगळा फालतूपणा. पण ह्याहून महत्वाचं म्हणजे अशाच घाशीरामाच्या माध्यमातून आपण पिढ्यानपिढ्या मूर्ख बनताहोत.

  खरं दुर्दैव अन दुःख हे कि आपण सतत मूर्ख बनवले जात आहोत अन आपण अगदी सहज मूर्ख बनत आहोत. मग मुर्खांची संख्या खूप मोठी झाली. इतकी मोठी कि ह्या मूर्खांच्या मूर्खपणाचं विश्लेषण सुरु झालंय. मूर्खपणाशी निगडीत मूर्खांच्या भावना लक्षात घेऊन मग काय योग्य-अयोग्य वगैरे ठरवलं जातंय.
  बरं शेवटी योग्य काय ते ठरलं तरी तो मूर्खपणाच.

  मग हळूच एक लक्षात येतं, ते असं कि, ह्या साऱ्या गोंधळात घाशीराम अन नाना पार लांब राहतात. म्हणजे त्यांच्याबद्दलचं अभ्यासलेलं सत्य दुर्लक्षित होतं. विस्मरणात पडतं. आणि मग उघडपणे हे अभ्यासालेलं सत्य पुढे आणणं काहीसं गैरसोयीचं होतं.

  आपण मांडलेलं अभ्यासलेलं सत्य अनेक दशकं दबून राहण्याचं, इतर पत्रकार-विश्लेषकांना हे मांडणं गैरसोयीचं वाटण्याचं हेच कारण असेल का? आपला मूळ लेख थोड्यांना वाचायला मिळाला असेल असं वाटतं. एक रेघ ह्या ब्लॉगच्या माध्यमातून माझ्यासारख्या थोड्या अधिक लोकांपर्यंत हा लेख पोहचू शकला.
  जे काही असेल,पण आमच्यापर्यंत असा लेख पोचला ही बाब खरच आनंददायी आहे.
  पण एकंदरीतच मुर्खांचा आकडा खूप मोठा आहे (टीव्हीवर बघितलाय आपण). त्यामुळे हा आणि असे अनेक लेख मुर्खपणाचं विश्लेषण करणाऱ्यापर्यंत पोचणं अत्यावश्यक आहे असं वाटतं.

  योगेंद्र यादव एका व्याख्यानात म्हणाले होते: "Nations are made and unmade not on the basis of objective realities. Its perceived reality that makes countries and destroys them."

  त्यांना अभिप्रेत असलेली Perceived Reality म्हणजेच ह्या बाबतीत हा मूर्खपणा आहे, असं वाटतं. Reality जे काय असेल, त्याला शहणपणाची किनार असावी ही एक माणूस म्हणून किमान अपेक्षा. त्यासाठी असं लिखाण अधिकाधीकांपर्यंत पोचावं अशीच इच्छा.

  पुन्हा मनापासून आभार!!!
  -नीलेश मोडक

  ReplyDelete
 6. धन्यवाद..भांडवलदारांशी जवळचं नातं या चर्चिल्या न गेलेल्या पैलूवर प्रकाश पाडल्याबद्दल...उत्तम आहे...जास्त लोकांपर्यंत पोहोचायची गरज आहे..आणखी काही वाचण्याजोगे..
  ''Have our journalistic domains turned into cultural grieving rooms?”- Shoma Chaudhary.
  .http://archive.tehelka.com/story_main54.asp?filename=Op011212Editer_cut.asp
  आता आवाज कुणाचा?- रमेश जोशी
  http://www.lokprabha.com/20121130/sradha04.htm#.UK8MoP13-F4.twitter

  ReplyDelete
 7. http://www.countercurrents.org/teltumbde051212.htm

  ReplyDelete