Saturday 3 November 2012

तथागत कवी

- अशोक शहाणे

१९३१च्या १ नोव्हेंबरला अरुण कोलटकरांचा जन्म झाला. त्याचं निमित्त साधून कोलटकरांचे मित्र
आणि प्रकाशक अशोक शहाणे यांचा हा लेख 'रेघे'वर प्रसिद्ध होतोय. कोलटकरांचं ('विकिपीडिया'सह अनेक ठिकाणी) नोंदवलेलं जन्मवर्ष १९३२ आहे, पण ते वास्तविक १९३१ आहे. हा उल्लेख प्रास प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या 'बोटराईड अँड अदर पोएम्स' ह्या कवितासंग्रहात आलेला आहे.
शहाण्यांचा लेख कोलटकर गेल्यानंतरच्या ३ नोव्हेंबर २००४ रोजी 'सकाळ'च्या 'सप्तरंग' ह्या रविवार पुरवणीत प्रसिद्ध झाला होता. आज ३ नोव्हेंबर २०१२ आहे. शहाण्यांच्या परवानगीनं लेख इथं-




अरुण कोलटकर (photo from here)
नाहीतरी प्लेटोनं आपल्या मनातल्या प्रजासत्ताकात कवींसाठी जागा ठेवलीच नव्हती. कवी मंडळी अत्यंत कुचकामी व बेभरवशाची असतात, असं कारण देऊन.

या आक्षेपाला तडाखेबंद उत्तर भवभूतीनं दिलं होतं, की कविताबिविता तुमच्यासारख्यांसाठी लिहिलेलीच नाही मुळी. ती समजणारा आत्ता कुणी नसला तरी पुढं कधीतरी निपजेल. इथं नाही तर आणखी कुठंतरी. माझा 'समानधर्मा' कुणीतरी कधीतरी निपजेलच निपजेल. कारण काळाला काही मर्यादाच नाहीत अन्‌ जगसुद्धा खूप मोठ्ठं आहे.

कवितेसाठी 'धर्म' शब्द वापरणारा बहुधा भवभूतीच पहिला. जरी का तुकोबांना तेच अभिप्रेत असावं त्यांच्या या ओळीत : 'माझीया जातीचे मज भेटो कोणी.' ही जात कोणती? तर अर्थातच कवीची. कारण तसा तर तमाम कवीमंडळींचा जाहीरनामा त्यांनीच तर लिहून टाकला होता : 'आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने.'

हे सगळं भारुड आत्ता आठवायचं कारण म्हंजे कैक वर्षांपूर्वी अरुणनं दिलीपला (चित्रे) टीव्हीवरल्या मुलाखतीत दिलेलं मासलेवाईक उत्तर. दिलीपनं कोणत्याही मुलाखतीत शोभण्याजोगा मामुली प्रश्‍न विचारला होता : 'तू कविता कसा लिहायला लागलास?' यावर अरुणचं उत्तर होतं : 'देवानं मला सांगितलं, अरुण, पृथ्वीतलावर जा अन्‌ कविता लिही.'

यातला देव अर्थात उगाच. प्रश्न करणाऱ्यानं आणखी खोलात शिरू नये म्हणून त्याच्या वाटेत एक भलीथोरली धोंड म्हणून वापरलेला. पण त्याचबरोबर आपली कवितेबद्दलची समज भवभूती-तुकोबांशी जोडणारा.

या तुकोबांबद्दल पण मागं बोलताबोलता अरुण म्हणाला होता, 'विठोबाची न्‌ आपली डायरेक्ट ओळख नाही, तुकारामाची न्‌ आपली आहे, अन्‌ तुकाराम विठोबाला ओळखत होता.'

तुकोबांबद्दल आणखीसुद्धा त्याचं एक बिनछापील विधान मोठं मार्मिक होतं : साक्षात मरण पुढं उभं ठाकलेलं असताना माणसानं मोठ्ठ्यानं हसावं अशी तुकारामाची कविता आहे.

हे कुणा समीक्षकाला सुचणं दुरापास्त आहे. तिथं जातिवंत कवीच हवा.

आमच्या मित्रमंडळींपैकी अरुणनं अन्‌‌‌ दिलीपनं आपापल्या परीनं मराठी माणसाला तुकारामाची कवी म्हणून ओळख करून दिली. तुकाराम जाऊन साडेतीनशे वर्षं उलटून गेल्यावर. एरवी तुकारामाला थोर करून, संत करून, टिळेबिळे लावून, त्याच्या नावानं चमत्कारांची कुभांडं रचून त्याच्या कवितेचा विसर पाडण्यासाठी काय कमी खटपटी-लटपटी झाल्या होत्या का?

दिलीपनं लोकांना समजावणीच्या सुरात, जवळजवळ त्यांची मनधरणी करत, तुकारामाची कविता लावून धरली. अरुणनं त्याचा रोखठोकपणा लावून धरला. इतका, की अरुणच्या बहुतेक कविता प्रत्यक्ष घटनांवर किंवा प्रत्यक्ष माणसांवर रचलेल्या आढळतात. मग ती अगदी पहिल्या पुस्तकातली 'मुंबैनं भिकेस लावलं' असो, की इस्पितळाच्या कवितांची मालिका असो, की 'चिरमिरीत'ल्या तर सगळ्याच कविता, अन्‌‌‌ 'भिजक्‍या वही'तला यच्चयावत्‌ मजकूर. ही सगळीच माणसं खरीच आहेत, या सगळ्याच घटना पण खऱ्याच आहेत. अन्‌ तरी त्यांची कविता बनू शकते. जशी तुकारामाची बनली, जशी त्याच्याआधी नामदेवाची बनली.

अरुणला वस्तुस्थितीच वेगळी दिसायची. कवीच्या चष्म्यामुळंच हे होत असेल. एका बंगाली कवीनं समजून सांगितल्याप्रमाणं : कवीच्या लेखी देशाला काहीच खरेपणा असत नाही; त्याच्या लेखी एक नदी, एक झाड, एक फूल, एक दगड, एक बाई. या गोष्टी कितीतरी जास्ती खऱ्या आहेत किंवा तुकारामानं म्हटल्याप्रमाणं 'देश वेष नव्हे माझा, सहज फिरत आलो.'

हे अरुणमध्ये जोरदार होतं. 'चिरमिरी'त बळवंतबुवा 'त्यापेक्षा मी नाहीच मरत' म्हणतो ते त्यातनंच.
हे कोण म्हणतं? बळवंतबुवा की अरुणच? मरायच्या अठ्ठेचाळीस तास आधी पण तो म्हणत होता, 'ह्या गोष्टी मी मुंबईला परतल्यावर आपण बोलून ठरवू.' म्हंजे मरण त्याच्या लेखी नव्हतंच. तेव्हा तरी. ते प्रत्यक्ष येईल तेव्हाच खरं होणार होतं. त्याच्याआधी ती आपली निव्वळ एक कल्पना. काल्पनिक गोष्ट.

हे म्हंजे बुद्धाच्या 'तथात्व' सिद्धांतासारखं झालं. गोष्ट जशी मुळात आहे तशी ती जाणून घ्यायची. स्वतःला पार वगळून. तिच्या 'तथा'पणाला धक्का न लावता. बुद्धाला ही हातोटी जमून गेली होती. म्हणूनच तर त्याला 'तथागत' नाव पडलं. दुसरा तथागत मी पाह्यला तो अरुण.

6 comments:

  1. "'विठोबाची न्‌ आपली डायरेक्ट ओळख नाही, तुकारामाची न्‌ आपली आहे, अन्‌ तुकाराम विठोबाला ओळखत होता.'"...I don't know Arun Kolatkar directly but I know Ashok Shahane and Shahane knew Kolatkar!

    Brilliant stuff and brief

    But "काळाला काही मर्यादाच नाहीत"...I doubt...one day earth will be a toast...

    ReplyDelete
    Replies
    1. ''one day earth will be a toast...''
      May be..
      But still the time will keep on moving.

      Delete
  2. Very lively language.
    But the basic meaning of 'tathagat' seems to be the one who goes off just as he appears. It seems to have less to do with knowing the 'tathatva'.

    ReplyDelete
  3. कोलटकर हे तुकाराम या कवीचे या शतकातील भाषांतर आहे . कवितेच्या उद्देशापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया ते माझ्या सारख्या सध्या कवीला आपल्या कविते मधून शिकवितात हि माझ्यालेखी खूपच मोठी गोष्ट आहे. सहसा सगळे कवी , कवी म्हणून माझा काय उपयोग या प्रश्नाला बगल देत लिहित राहतात . या बद्दल कोलटकर आपला बाप आहे असे आदर आणि अभिमानाने म्हणावे वाटते . प्रवीण दामले

    ReplyDelete