Wednesday, 27 February 2013

लोकसंस्कृतीच्या अभिव्यक्तीसाठी लहान पत्रं : अनुराधा गांधी

अनुराधा गांधी (फोटो : बीबीसी)
अनुराधा गांधी (२८ मार्च १९५४ - १२ एप्रिल २००८) या नक्षलवादी होत्या. भारत सरकारने बंदी घातलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या पक्षाच्या केंद्रीय समितीच्या त्या सदस्य होत्या. मुंबईत त्यांचा जन्म झाला आणि कोबाड गांधींशी लग्न झाल्यानंतर ते दोघं नागपूरला आणि नंतर आणखी काही ठिकाणी असे राहात व त्यांचं काम करत होते. १२ एप्रिल २००८ला अनुराधा यांचा मलेरियाने मृत्यू झाला, कोबाड यांना सप्टेंबर २००९मधे पोलिसांनी अटक केली आणि ते सध्या तिहार तुरुंगात आहेत. अनुराधा यांचा ज्या संघटनेशी आणि विचारधारेशी संबंध होता त्याच्याशी आपल्या या नोंदीचा संबंध नसल्यामुळे त्याबद्दल फार काही बोलणं नको. तरी, अनुराधा गांधींच्या निवडक लेखनाचा खंड 'स्क्रिप्टिंग द चेंज' या नावाने प्रसिद्ध झाला आहे; या खंडातला 'स्मॉल मॅगझिन्स : अ सिग्निफिकन्ट एक्सप्रेशन ऑफ द पीपल्स कल्चर' हा लेख आपण 'रेघे'साठी मराठीत भाषांतरित करून ठेवतोय. हा लेख मूळ 'अधिकार रक्षा' या नियतकालिकात जुलै-सप्टेंबर १९८२च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. अनुराधा यांच्या कामाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यांचं माध्यमांच्या व्यवस्थेबद्दलचं एक ढोबळ निरीक्षण अशा भूमिकेतून या लेखाकडे पाहाता येईल. ही नोंद 'रेघे'वर येण्यासाठी डॉ. आनंद तेलतुंबडे यांची मदत झाली.

'मॅगझिन' या इंग्रजी शब्दासाठी या मराठी भाषांतरात 'पत्र' हा शब्द वापरला आहे.
***

पल्याकडचे केवळ एक चतुर्थांश लोकच सहजतेने वाचू शकत असले (जनगणनेची आकडेवारी काहीही असू दे), तरी लिखित शब्द हे संपर्काचं आणि विचार मांडण्याचं एक महत्त्वाचं माध्यम मानलं जातं. कारण की, स्वतंत्रपणे पाहिलं तर वाचू शकणाऱ्यांची संख्या खूपच मोठी आहे. आणि यातले काही लोक समाजातल्या आवाज उठवणाऱ्या वर्गापैकी आहेत.

बदलाच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या किंवा त्याबद्दल सहानुभूती असलेल्या लोकांकडून चालविल्या जाणाऱ्या प्रकाशनांची मोठी संख्या पाहिली की लिखित शब्दाला असलेलं महत्त्व दिसून येतं. प्रस्थापित व्यवस्था व सरकार आपल्या स्त्रोतांच्या नि वितरणव्यवस्थेच्या बळावर जितकी प्रकाशनं काढते जवळपास तेवढ्याच संख्येने स्वतंत्र प्रकाशनंही अस्तित्त्वात आहेत. याशिवाय कागदाच्या किंमतीसंबंधीची, प्रकाशनांच्या वितरणासंबंधीची, सेन्सॉरशिपसंबंधीची व जाहिराती देण्यासंबंधीची सरकारी धोरणं पाहिली की लिखित शब्दाचं महत्त्व आणखी स्पष्ट होतं.

देशभर, प्रत्येक शहरात, बऱ्यापैकी मोठ्या खेड्यात स्थानिक पातळीवर प्रकाशनं निर्माण होतात. नोंदणी केलेली किंवा नोंदणी न केलेली ही नियतकालिकंदोनेकशेपासून काही हजारांपर्यंत वाचकवर्ग राखून असतात. प्रतिक्रियावादी दृष्टीकोनापासून क्रांतिवादी दृष्टीकोनापर्यंत वेगवेगळ्या बाजूंनी विषयांचा मागोवा विविध भारतीय भाषांमधून प्रकाशित होणारी ही पत्रं घेत असतात. यांतील काही वर्षानुवर्षं चालू राहातात, काही वर्षभरातच बंद पडतात, आणि तरी आपलं प्रकाशन टिकेल यावर आशा ठेवत नवी पत्रं निघतच राहातात. यातली काही प्रकाशनं आता दर्जेदार म्हणून नावाजलीही गेलेयत आणि त्यांचा दीर्घकालीन प्रभावही दिसतो.

देशभर वितरित होणाऱ्या प्रकाशनांपासून दूर असलेल्या या पत्रांमधेच बहुतेकदा लोकांच्या अभिव्यक्तीला स्थान मिळतं. स्थानिक समस्या मांडण्यासाठी ही नियतकालिकं व्यासपीठ बनतात, स्थानिक सर्जनशील लिखाणही इथे पहिल्यांदा छापून येऊ शकतं, तात्त्विक प्रश्नांवरची चर्चा इथे होऊ शकते. सरकारच्या हुकूमशाही धोरणांविरोधातल्या लोक चळवळीचा भाग म्हणून लहान पत्रं उभी राहिल्याचं दिसून येतं.

पण हे म्हणणं तपासूनही पाहायला हवं. केवळ वितरणाच्या संख्येवर विभाग पाडणं बरोबर होणार नाही. यातली काही प्रकाशनं स्थानिक बड्या धेंडांनी आपल्या फायद्यासाठी किंवा सत्तेत असलेल्यांची भाटगिरी करण्यासाठी काढलेली असतात. त्यांचं वितरण कितीही कमी असलं तरी लोकाभिव्यक्तीचं, लोकांच्या खऱ्या सर्जनशील संस्कृतीचं माध्यमं म्हणून अशा प्रकाशनांकडे पाहता येणार नाही. स्थानिक हितसंबंधांमधून अशा प्रकाशनांना पैसा मिळतो, कधी निव्वळ धंद्याच्या भूमिकेतून तर कधी विरोधकाला उघडं पाडण्यासाठी. बडे राजकारणी आपल्या विरोधकांना नामोहरम करून संबंधित प्रदेशात जम बसविण्यासाठी अशा प्रकाशनांना अप्रत्यक्षपणे मदत करत असतात. मोठ्या कंपन्यांनी चालवलेल्या चकचकीत वृत्तपत्रांना समांतर अशीच या प्रकाशनांची संस्कृती असते.

पण लोकसंस्कृतीची प्रभावी अभिव्यक्ती एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या गटाने काढलेल्या लहानमोठ्या शेकडो पत्रांमधून होत असते. लोकसंस्कृतीची ओढा या पत्रांमधे सापडतो आणि प्रस्थापित संस्कृती व राजकारणाला त्यातूनच आव्हान उभं राहातं. चळवळींना मदत करण्यात आणि नवीन साहित्यिक प्रवाह निर्माण करण्यात अशा पत्रांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. प्रत्येक खऱ्या लेखकाला आणि राजकीय कार्यकर्त्याला लिखाण प्रकाशित करणं किती कठीण आहे याची जाणीव असते, प्रस्थापित हितसंबंधांचा दृष्टीकोन आणि साहित्य उचलून धरमाऱ्या प्रस्थापित नियतकालिकांमधे त्यांची प्रामाणिक मतंही छापून येणार नाहीत याची कल्पना त्यांना असते.

म्हणूनच, लेखकांनी काढलेल्या लहान पत्रांमधूनच, कमलेश्वर व धर्मवीर भारती आदींच्या प्रस्थापित साहित्यिक व्यवस्थेला आव्हान दिलं गेलं, त्यातून नवीन प्रवाह निर्माण झाले. मराठीमधे प्रस्थापित व्यवस्थेविरोधात १९७०च्या आसपास रुजून आलेलं दलित साहित्य आणि आंध्रप्रदेशात १९६०मधे निर्माण झालेलं क्रांतिकारी साहित्य यांनाही मोठ्या प्रमाणावर वितरण असलेल्या प्रस्थापित नियतकालिकांमधे जागा मिळाली नव्हती.

त्याचप्रमाणे, अस्तित्त्वात असलेल्या सामाजिक-आर्थिक रचनेला किंवा सरकारच्या धोरण व कृतींच्या गैरलोकशाही रचनेला आव्हान देणाऱ्या राजकीय मतांची आणि कृतींचीही राष्ट्रीय माध्यमांमधे दखल घेतली जात नाही. आणि घेतली गेलीच तर काही असमाजिक तत्त्वांचं कृत्य असल्याप्रमाणे ही मतं रंगविली जातात. कार्यकर्त्यांचा दृष्टीकोन प्रकाशात आणला जात नाही, कारण बहुतेक प्रस्थापित वृत्तपत्रं कारखानदार चालवतात. त्यामुळे क्रांतिवादी साहित्य व समर्पित राजकीय कार्यकर्त्यांची मतं आणि कृती, त्यांच्यामधे चांगल्या आयुष्याची इच्छा निर्माण होण्यासाठी प्रेरणा देणारं साहित्य, यांना लहान पत्रांमधून व्यासपीठ मिळतं.

आर्थिक मदतीची व वितरण व्यवस्थेची कमतरता आणि वाढत्या किंमती यांनी व्यवस्थाविरोधी नियतकालिकांच्या वाढीसमोर मोठी समस्या निर्माण केली आहे. पण एका अर्थी या कमतरताच त्यांची ताकद बनतात. या प्रकाशनांकडे कोणताही ठोस, सुरक्षित आर्थिक स्त्रोत नसतो. क्वचित मिळणाऱ्या जाहिराती, मित्रमंडळींकडून मिळणाऱ्या देणग्या किंवा वर्गण्या यांवरच ही प्रकाशनं मुख्यत्त्वे अवलंबून असतात. त्यात लिहिणाऱ्यांना लेखनाबद्दल पैसे मिळू शकत नाहीत. पण कोणताही मोठा आर्थिक स्त्रोत नसल्यामुळे त्यांना कोणा उद्योजकाच्या किंवा जाहिरातदाराच्या किंवा अगदी सरकारच्या जवळकीत राहाण्याची गरज त्यांना पडत नाही. पत्र काढणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टीकोनांनुसार आणि दमनाला तोंड देण्याच्या क्षमतेनुसार त्या पत्रातील लेखनाची ताकद व मजकुराची धाटणी ठरते.

आणीबाणीच्या काळात अशी अनेक पत्रं बंद पाडण्यात आली किंवा सरकारच्या बंदीला तोंड देत ती गुप्तरितीने छापावी लागली. यातले अनेक प्रकाशक सरकारच्या किंवा कोणा बड्या उद्योजकाच्या मागे लागून मजकुरात तडजोड करण्याऐवजी स्वतःच्या आयुष्याची कमाई ओतून आपलं काम करत राहातात. सध्याच्या भारतात लोकशाही लढ्यामध्ये सरकार, सत्ताधारी पक्ष व बडे उद्योजक लोकांचं दमन करणारे ठरत असताना समर्पित पत्रांच्या असण्याचं महत्त्व वाढतं.

नेहमीच्या वितरणव्यवस्थांमधून अशा पत्रांची विक्री होऊ शकत नाही. पण हीसुद्धा त्यांची ताकदच ठरते. त्यांची विक्री वर्गण्यांमधून आणि त्यात गुंतलेल्या व्यक्तींच्या प्रयत्नांमधूनच होते. म्हणजे विक्रीसाठी फक्त संबंधित व्यक्ती अधिकाधिक वाचकांना आपल्या नियतकालिकाकडे वळवू शकण्यात किती यशस्वी होतात यावरच अवलंबून राहावं लागतं. याशिवाय नियमित वर्गणीदारांचा पाठिंबा असतो, हे वर्गणीदार अंकांच्या प्रसिद्धीत क्वचित येणारी अनियमितता आणि इतर माध्यमांच्या प्रसिद्धीच्या उड्यांना न भुलता टिकून राहणाऱ्यांपैकी असू शकतात.

या समर्पित पत्रांना सध्या काही गोंधळांना सामोरं जावं लागतंय. कागद, छपाई, शाई आणि बांधणी - निर्मितीचा - खर्च वाढत असताना अशा प्रकाशनांना अधिक आर्थिक निधी गरजेचा आहे. सरकार आपल्या ताकदीनुसार अशी प्रकाशनं धुळीस मिळवण्याचा प्रयत्न करत असतंच. कागदाच्या किंमतीतली आणि टपालखर्चातली वाढ यांमुळे या लहान नियतकालिकांना मोठा फटका बसला आहे. शिवाय, वाचकांचं लक्ष प्रस्थापित प्रकाशनांमधल्या नट-नट्यांच्या नि राजकारण्यांच्या गॉसिपांमुळे विचलित होताना दिसतं. प्रस्थापित व्यवस्थेतला छपाईचा तांत्रिक दर्जा एवढा उंचावत चाललाय की लहान पत्रं आपल्या अपुऱ्या आर्थिक स्त्रोतांद्वारे त्याच्याशी स्पर्धा करू शकत नाहीयेत.

राजकारणाशी थेट संबंध नसलेल्या सामान्य वाचकांपर्यंत पोचणं समर्पित पत्रांना खूप अवघड जातंय. केवळ तात्त्विक प्रश्नांशी संबंधित नियतकालिकांच्याबाबतीत या समस्या फारशा नाहीत, कारण त्यांचा एक ठराविक वाचकवर्ग आहे. लहान पत्रांपुढचं मुख्य आव्हान आहे ते चकचकीत, महागड्या माध्यमांमधून वाचकांचं लक्ष वेधून घेणं. मृत परंपरा आणि पिळवणुकीविरोधातील लोकांच्या कृतींना, अभिव्यक्तींना व्यासपीठ देत मजकूर प्रसिद्ध शोधत राहाणं.

अशा समर्पित पत्रांमधे देशातील अनेक बुद्धिमंतांनी लिहिलेलं आहे. समाजबदलासाठी कटिबद्ध असलेल्या आदर्शवादी लोकांच्या त्यागातून अशी पत्रं टिकून राहिली. झोट, हिम्मत, फ्रंटिअर, श्रीयंस कल्पना, पहल, अर्तार्थ, आमुख, सत्यकती, आणि अशी अनेक पत्र यश-अपयशाची उदाहरणं दाखवत उभी आहेत.

छापील माध्यमांवरची बड्या उद्योजकांची आणि सरकारची एकाधिकारशाही जसजशी वाढत जाईल, आणि छपाईचा खर्च जसजसा वाढत जाईल, तसतसं लोकसंस्कृतीला व्यासपीठ देणाऱ्यांपुढची आव्हानं वाढत जातील. अधिकाधिक पत्रकार पिळवणुकीच्या भीतीने किंवा आर्थिक अडचणींपायी नव्हे तर स्वेच्छेने सरकारच्या आदेशांपुढे झुकत आहेत. या पार्श्वभूमीवर या पत्रांमधून लिहू शकतील, त्यांचे वर्गणीदार होतील, त्यांच्या वितरणाला मदत करतील अशा लोकांची गरज वाढते आहे. या लहान पत्रांना टिकायचं असेल आणि वाढायचं असेल, सध्याच्या लोकशाहीविरोधी व्यवस्थेला आव्हान द्यायचं असेल तर आत्तापर्यंत जे फक्त बोलत राहिलेत, त्यांनी अशा पत्रांना कृतीशील पाठिंबा द्यावा लागेल.
पान ४३३ - ४३७
***


संपादन : आनंद तेलतुंबडे व शोमा सेन
प्रकाशक : दानिश बुक्स
***

Tuesday, 26 February 2013

भालचंद्र नेमाडे आणि रा. रा. टीव्ही

भालचंद्र नेमाडे यांना उद्या २७ तारखेला नाशिकमधे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार मिळतोय. शिवाय कुसुमाग्रजांच्या जयंतीचा हा दिवस मराठी भाषा दिन म्हणूनही मानला जातो. ह्या दोन गोष्टी उद्या आहेत, त्यांची नांदी म्हणून आज ही नोंद. 'उद्या'ऐवजी 'आज' का? तर एकूणच 'उद्या'ची खात्री नसते म्हणून. म्हणजे काय? तर नोंद वाचून पाहा :

सुरुवातीला हा व्हिडियो पाहूया, टीव्ही चॅनलवरच्या एका लहानशा मुलाखतवजा बातमीचा -


चिपळूणमधे झालेल्या ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनादरम्यान राज्यभरातल्या लेखकांना 'एबीपी माझा'ने आवडतं लिखाण कोणतं असं विचारलं, त्यात भालचंद्र नेमाडे यांच्या 'कोसला' आणि 'हिंदू' यांचं आवडती कादंबरी म्हणून लेखकांनी नाव घेतलंय. मराठी साहित्याची चौकट बदलणारे, कादंबरीलेखनाची नवी शैली निर्माण करणारे नेमाडे यांचं वेगळेपण त्यामुळे पुन्हा एकदा समोर आलंय. - असं आपल्याला सुरुवातीला सांगितलं जातं. त्यानंतर नेमाड्यांशी गप्पा मारूया, असं निवेदक आपल्याला सांगतो. 

यात नेमाडे औंरगाबादला कॅमेऱ्यासमोर बसलेले आहेत, तर निवेदक मुंबईतल्या स्टुडियोत उभा आहे. सुरुवातीला 'कोसला'चं गारूड अजूनही कायम का आहे असं वाटतं, असा प्रश्न विचारला जातो. नंतर 'हिंदू'ची वैशिष्ट्यं विचारली जातात. या सर्वांवर नेमाडे उत्तरं देतात, ती मुळातून ऐकता येतील.

त्यानंतर 'हिंदू'च्या दुसऱ्या भागाबद्दलचा प्रश्न विचारताना निवेदक म्हणतो की, मोठा चाहतावर्ग तुमच्या नवीन लिखाणाची आतूरतेने वाट बघतोय, तर दुसरा भाग कधी येईल?

यावरही नेमाडे काहीसं कथानक स्पष्ट करून 'हिंदू'चा दुसरा भाग 'वंशवृक्ष पारंबी' ह्या वर्षीच येईल असा अंदाज देतात. यात नेमाडे म्हणतात की, तसे कच्चे खर्डे खूप झालेत, ते आत्ताही छापता येतील, पण वाचक हल्ली इतके हुशार झालेत तुमच्यासारखे की त्यांना खराब वाचायला देणं आपल्याला परवडणार नाही. ह्याने इतकं थांबून असं खराब लिहिलं तर न लिहिलेलंच बरं, असं लोक म्हणतील. अनेक थरातले, खेड्यातलेपाड्यातले असे खूप वाचक झालेत. 

यानंतर विनोदाला सुरुवात होते. नेमाड्यांना निवेदक त्यांचं अखिल भारतीय साहित्य संमेलनाबद्दलचं मत विचारतो, त्यावर नेमाडे म्हणतात : आधी आपण त्यावर बोलणं बंद करावं. कारण ते आता अगदी शून्याच्या खाली गेलेलं आहे. याच्यापुढे आणखी खाली ते जाईल असं काही वाटत नाही. लोकांनी त्यावर बोलण्यापेक्षा लिहावं - वाचावं. 

मग नेमाडे आणखी अशीच काही हाणाहाणी करतात, जसं की, साहित्य संमेलनाला जाण्याची अट बहुधा हीच असावी की लिहिलं वाचलं नसेल तरच इथे या, वगैरे.

यावर म्हणजे सगळीच साहित्य संमेलनं बंद केली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं का, असं निवेदक विचारतो. त्यावर नेमाडे म्हणतात, लहान संमेलनं हवीत, वगैरे. 

कदाचित म्हणूनच साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणजे तीन दिवसांचा पांढरा हत्ती असं म्हटलं जातं, असं निवेदक म्हणतो त्यावर नेमाडे म्हणतात, हत्ती पण नाही, ती तीन दिवसांची अळीच असते. 

आता या कार्यक्रमात मधे निवेदक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांशीही - नागनाथ कोत्तापल्ले यांच्याशी-  बोलतो. नेमाड्यांकडे लक्ष देऊ नये, असं कोत्तापल्ले म्हणतात. जिवंत समाज असतो तिथे वाद होणार. मिलिटरीमधे एकाने आदेश द्यायचा आणि बाकीच्यांनी मान्य करावं असं होतं, पण समाजात तसं होत नाही, आदी समर्थन करून कोत्तापल्ले काही बोलू पाहातात.

कोत्तापल्लेंनतर लगेचच 'लोकसत्ते'चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांच्याशीही निवेदक संवाद साधतो. कुबेर म्हणतात की, या संमेलनाचा साहित्याशी काहीही संबंध नाही. यासंबंधी 'लोकसत्ते'चा अग्रलेखही वाचता येईल. कारण त्या लेखाचा संदर्भ कुबेर बोलताना देतात.

मधल्या या दोन लहान गप्पांनंतर पुन्हा निवेदक नेमाड्यांकडे येतो आणि साहित्य संमेलनं बंद करायला हवीत, तर साहित्याचा प्रसार कसा करावा याबद्दल विचारणा करतो. त्यावर नेमाडे म्हणतात, की तळागाळात पुस्तकं गेली पाहिजेत, लिहिणं - वाचणं हेच मुख्य करण्यासारखं आहे. मल्याळीमधे पहिल्या आवृत्तीच्या चाळीस हजार प्रती खपतात आणि मराठीत एक-दीड हजार प्रती म्हणजे लाजिरवाणी स्थिती आहे. ती बदलली पाहिजे. कारण वाचणारे आहेत.

या कार्यक्रमात आपल्याला काय सांगण्यात आलं?

तर,

१. नेमाड्यांच्या 'कोसला' आणि 'हिंदू' या अजूनही प्रभाव ठेवून आहेत आणि राज्यभरातून संमेलनाला आलेल्या अनेक लेखकांनी या कादंबऱ्या त्यांच्या आवडत्या असल्याचं सांगितलं.

२. नेमाडे हे साहित्याची चौकट बदलणारे आणि कादंबरीलेखनाची नवी शैली निर्माण करणारे लेखक आहेत.

३.  हल्लीचे मराठी वाचक हुशार झालेले आहेत.

४. 'हिंदू'च्या दुसऱ्या भागाची एक मोठा चाहतावर्ग आतूरतेने वाट पाहातो आहे.

एवढ्या सुंदर माहितीनंतर साधारण सोळा मिनिटांच्या या कार्यक्रमात शेवटी आपल्याला सर्वांत महत्त्वाची माहिती दिली जाते, त्यात निवेदक म्हणतो - भालचंद्र नेमाडे हे कोण आहेत नेमके, ते अतिशय ज्येष्ठ असे लेखक आहेत, नेमके कोण आहेत ते आपण पाहूया? 
त्यानंतर कोसला, बिढार, जरीला, झूल, हिंदू या त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांचे उल्लेख, मेलडी हा त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. हिमाचल प्रदेश सरकारच्या शिफारशीवर गतवर्षी त्यांनी पद्मश्री पुरस्कार देण्यात आला, अशा पाट्या आपल्याला पडद्यावर पाहायला मिळतात .

आणि या पाट्यांबरोबर खाली एक सततची पाटी असते : राहा अपडेट.
***

हे सगळं पाहिल्यानंतर कदाचित काहींना असं कुठेतरी ऐकलेलं आठवू शकेल की, नेमाडे टीव्हीच बघत नाहीत. त्याबद्दल एक म्हणणं सतीश काळसेकरांनी त्यांच्या 'वाचणाऱ्याच्या रोजनिशी'त दिलंय, ते असं :
आताच्या बदललेल्या काळात आणखी एक नवाच ताप आपण स्वतःहून ओढवून घेतला आहे. तो म्हणजे दूरध्वनी आणि त्याची पुढची पायरी, भ्रमणध्वनी, आणखी एक, अखंड चालणारे दूरदर्शन. आपल्यापुरते हे सगळे टाळावे तर ते फक्त आमचे ज्येष्ठ मित्र भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्यांनाच शक्य.
पान २०

नेमाडे टीव्ही पाहत नसले तरी लोकांनी त्यांना टीव्हीवर पाहिलेलं आहे. आणि 'हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ' ही कादंबरी ६०३ पानांची आहे. या दोन वाक्यांचा एकमेकांशी काय संबंध, असं कोणी विचारू शकेल. तर त्यांचा एकमेकांशी काहीच संबंध नसावा. किंवा असेलही.
***

आता आपण 'वाचा' या अनियतकालिकात नेमाड्यांनी १९६८मधे लिहिलेल्या 'हल्ली लेखकाचा लेखकराव होतो तो कां?' या लेखाकडे वळू या. हा लेख नेमाड्यांच्या 'टीकास्वयंवर' या ग्रंथात समाविष्ट केलेला आहे. या लेखाची सुरुवात अशी आहे :
नव्या-जुन्या लेखकांनी व अड्ड्याअड्ड्यांनी एकमेकांचा उथळपणा व अप्रामाणिकपणा सिद्ध करीत राहावे, हे नव्या मराठी साहित्यातले एक आवश्यक दुखणे होऊन बदले आहे. गेल्या दीडशेक वर्षांत इंग्रजीद्वारा आपल्या साहित्याचे पुनरुज्जीवन होण्यापेक्षा पडझडच जास्त झाल्याचे दिसते. पुनरुज्जीवनास लागणारी विद्वत्ता व बुद्धिमत्ता अंगी असणारी निदान एक तरी तेजस्वी लेखकांची टोळी निपजल्याशिवाय साहित्याला उसनवारी पचवून येणारे उमदेपण येत नाही व परंपरा फोफावत नाही, हे आपल्या युगप्रवर्तक म्हणवणाऱ्या व दरवर्षी दिल्लीस जाऊन पद्मश्री घेऊन येणाऱ्या थिट्या लेखकांनी सिद्ध केले आहे. त्यामुळे आपल्या समाजात एक तर विद्वत्ता व बुद्धिमत्ता नसावी किंवा असलीच तर अशी माणसे लिहिण्यात रस घेत नसावी, असे म्हणणे भाग आहे. म्हणजे मग लिहिले जाते ते कोणाकडून? तसेच आपल्या साहित्यातला हिणकसपणा आपल्या लेखकांच्या उथळपणातून व अप्रामाणिकपणातून येतो, हे जर खरे असेल तर आपल्या अशा लेखकांना वेळीच त्यांचे दोष का दाखवले जात नाहीत? शिवाय एक प्रकारचे वाङ्मयीन ठोंबेपण मराठीव्यतिरिक्त अन्य भाषांतही कमीअधिक प्रमाणात दिसत आहे असे इतिहास सांगतो, तर ह्या सार्वत्रिक घसाऱ्याचे कारण काय? ह्याच्या अनेक कारणांची स्पष्ट छाननी करण्याचे येथे योजिले आहे.
(टीकास्वयंवर, पान ३३-३४)

आणि या लेखाचा शेवट असा आहे :
लेखक आता आपल्या जाणिवांशी कितपत प्रामाणिक राहू शकेल हा सगळ्यांत मोठा प्रश्न आहे. लेखकाचे जाणवणे हे मानवी समाजाच्या विकासप्राधान्यामुळे व शास्त्रीय दृष्टिकोनामुळे दुय्यम, संकुचित झाले आहे हे तर खरेच, परंतु तो इतर नागरिकांप्रमाणे भौतिकताप्रिय, सुखलोलुप व स्थैर्यलंड झाल्याने अतिशय अप्रामाणिक असू शकेल. हल्लीची मोठमोठी म्हणून गाजलेली पुस्तकेही निव्वळ 'वाचनीय' तेवढी असतात याचेही कारण हेच आहे. जगातल्या आपल्या वाटेला आलेल्या, उरल्यासुरल्या दुःखावर फक्त 'लिहून' तो एरवी सुखाने जगू इच्छितो. साहित्यापेक्षा अर्थातच जीवनाच्या गरजा जास्त महत्त्वाच्या वाटणे बरोबरच आहे. लेखकाचे कार्य फक्त आरशासारखे, जीवन फक्त दाखवण्याचे आहे, असे कोण्या सराईत टीकाकाराने म्हटले की प्रश्न सुटेल असे नाही. साहित्य सुखासुखी मरत असेल तर मरू द्यावे असेही काही लोक म्हणतील, क्वचित एक चादर मैलीसीमाणदेशी माणसं लिहिणारे मोठे लेखक होऊन जातात, नाही असे नाही. परंतु हे मोठे लेखक पूर्वी 'नाइलाजाने' भोगाव्या लागणाऱ्या दुःखावर मोठे होऊन मुंबईत किंवा पुण्यात आपले दैनंदिन जीवन सुरक्षित, सुखकर करून पूर्वीच्या अनुभवावर सफेती फिरवून इतरांसारखे स्टँडर्डने राहात असल्याचे आढळेल. ह्याला जर कोणी कलाकाराचे अधःपतन म्हणणार नाही तर आमचा सगळा लेखच वाया गेला म्हणावयाचा. त्यातून सर्व मानवी समाज भौतिक राहणी उंचावायला विडा उचलून बसलेले; आणि निरोगी, दुःखरहित प्रजेचे डोहाळे सर्वांना लागलेले. दुःखाला सामोरे जाण्याची कुणाची तयारी नाही. तात्पर्य, सांस्कृतिक विकासात भौतिकतेच्या मोहिनीचा एक प्रवाह साहित्यकलेच्या तटावर कायम धडका मारीत आहे आणि त्यातून साहित्य कसे बचावते हे सांगणे मुश्किल आहे.
ह्या कलेचे हे दुर्दैवी अधःपतन थेट होमर-व्यासादिकांपूर्वीपासूनच हळूहळू आपल्यापर्यंत आले की काय हे आज ताडता आले तरी बिनपुराव्याचे आहे. परंतु आज आपल्या युगातील पुराव्यांनी ह्या अधःपतनाचे निदान करता येते. जीवनाचे व सृष्टीचे रौद्र स्वरूप ज्या भाग्यवंतांच्या वाट्याला आले त्यांनाही ते वरदायी अनुभवविश्व परवडत नाही. मोठमोठ्यांची ही दशा, तर निव्वळ मानमान्यता-नावलौकिकासाठी, भांडवल म्हणून पैसा मिळवण्यासाठी, वाचकप्रियतेसाठी, बंडखोरीसाठी, वर्तमानपत्रे-मासिके भरण्यासाठी व इतर अनेक भौतिक कारणांसाठी फक्त लिहिणाऱ्या आपल्या सार्वजनिक दौलतमंद लेखकांकडून किती टक्के प्रामाणिकपणाची अपेक्षा करावी हे सांगण्याचीसुद्धा गरज नाही. त्यातून धंदेबाजी व अड्डेबाजी ही एक परंपराच झाली आहे.
पण सुदैव हे की अजून कुठेतरी लिहिण्याच्या अवस्थेतला खास आदिलेखक व वाचण्याच्या अवस्थेतला अस्सल वाचक ही दोन्ही खिन्न माणसे भौतिकतेच्या युगातही आपल्यात कशीबशी जिवंत आहेत हे जाणवते. एरवी आपण विकासशील मानवी समाजाचे सुखलोलुप नागरिक होत. आदिलेखकाचे तेज क्वचित कुठे नव्या पुस्तकात जाणवेल तेवढेच. एरवी तो उग्र प्रचंड लेखक नाहीसाच होत आहे. आणखी एक वन्य पशु नामशेष होत आहे. निसर्गाला तो नको आहे. त्याचे रक्षण करा व सप्ताह साजरा करा, पोस्टरे लावा व तिकिटे काढा. PRESERVE WILD LIFE.
(पान ४४-४६)

साकेत प्रकाशन
***

उद्याच्या दिवशीचं निमित्त साधून ही नोंद आज केली याचं एक कारण आपण अप-'डेट' राहू इच्छित नाही हे आहे.

आणि तसंही उद्याची खात्री नाही म्हणून आज ही नोंद केली असली तरी आजचा उद्या हा उद्याच्या दिवशी आजच असणार.

धन्यवाद.

वाचत राहा 'रेघ'.

Thursday, 21 February 2013

मातृभाषा दिन । युनेस्को । ना. गो. कालेलकर

आज २१ फेब्रुवारी. हा दिवस दर वर्षी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. साजरं काय करतात माहीत नाही, पण 'युनेस्को'च्या घोषणेवरून या दिवसाची सुरुवात झाली. बांग्लादेशच्या निर्मितीआधी पूर्व पाकिस्तानात सुरू झालेल्या भाषिक चळवळीशी संबंधित ही तारीख आहे. पाकिस्तानात केवळ ऊर्दू भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णयाविरोधात ही चळवळ सुरू झाली. २१ फेब्रुवारी १९५२ रोजी या बंगाली मंडळींनी मोर्चा काढला, त्याची आठवण ठेवत 'युनेस्को'ने १९९९ साली या दिवसाला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून निश्चित केलं, अशी माहिती आपल्याला त्यांच्या वेबसाइटवर सापडते.

'युनेस्को'च्या या वेबसाइटवर आपण जाणारच असू, तर तिथं एक टीपणही सापडतं, ते असं आहे -
भाषिक वैविध्य आणि इंटरनेटवरची बहुभाषिकता

संपत्तीनिर्मिती, सामाजिक बदल आणि मानवी विकासात माहिती व ज्ञान यांची भूमिका अधिकाधिक मोलाची बनते आहे. माहिती व ज्ञान यांचं प्राथमिक माध्यम आहे भाषा, त्यामुळे इंटरनेटवर आपली भाषा वापरण्याची संधी जितकी मिळेल त्यानुसार एखादी व्यक्ती उगवत्या ज्ञानाधारित समाजांमधे कशी सहभागी होईल ते ठरणार आहे.

इंटरनेटमुळे विविध भाषांमधे माहिती व ज्ञान यांचं आदानप्रदान करण्याची संधी उपलब्ध झाली. तत्त्वतः, सध्याच्या काळात कोणीही मजकूर तयार करू शकतं आणि उर्वरित जगासमोर ठेवू शकतं आणि प्रतिसाद मिळवू शकतं. तत्त्वतः, इंटरनेट जगातल्या सगळ्या भाषांसाठी खुलं आहे, अर्थात त्यासाठी काही तांत्रिक अटी पूर्ण झालेल्या असाव्या लागतात आणि आवश्यक ते मानवी आणि आर्थिक स्त्रोत उपलब्ध असावे लागतात.

तरीसुद्धा, अनेक भाषा इंटरनेटवर आलेल्या नाहीत. सध्या इंटरनेटच्या जगात प्रचंड मोठी भाषिक दरी अस्तित्वात आहे आणि अनेक भाषांच्या तिथे नसण्यामुळे ही दरी वाढतच जाईल. त्यामुळे प्रत्येकाला बहुभाषिक इंटरनेट उपलब्ध असायला हवं. इंटरनेट आणि त्याच्याशी संबंधित स्त्रोतांपासून वंचित असलेली राष्ट्रं, समुदाय आणि व्यक्ती प्रवाहाबाहेर ढकललल्या जातील, कारण हे स्त्रोत टिकाऊ विकासासाठी महत्त्वाचे घटक आहेत. तुलनेने लहान समुहांकडून बोलल्या जाणाऱ्या भाषांमधील लोकांनी आपली अभिव्यक्ती सांस्कृतिकदृष्ट्या अर्थपूर्ण मार्गांनी करण्याची गरज आहे, आणि ती इंटरनेटद्वारे पसरवण्याची गरज आहे. 'डिजिटल दरी'च्या दोन मुख्य बाजू आहेत : एक, प्रत्येकाला इंटरनेट उपलब्ध असणं आणि दुसरी, फक्त आंतरराष्ट्रीय किंवा प्रादेशिक पातळीवरच्या दर्जेदार मजकुराचीच नव्हे तर स्थानिक पातळीवरच्या आणि स्थानिक भाषेतल्या दर्जेदार मजकुराची उपलब्धता असणं. इंटरनेट बहुभाषिक आहे आणि इथे सांस्कृतिक वैविध्यही आहे, इथे प्रत्येक संस्कृतीला आणि भाषेला स्वतःची जागा आहे.

इंटरनेटवरचं सांस्कृतिक वैविध्य आणि बहुभाषिकता यांमुळे विविधतापूर्ण, समन्यायी, खुल्या आणि सर्वसमावेशक ज्ञानाधारित समाजांना प्रोत्साहन मिळेल, अशी खात्री 'युनेस्को'ला वाटते. सर्वांगीण भाषविषयक धोरण आखण्यास, स्त्रोत पुरविण्यास आणि इंटरनेट आदी माध्यमांसह भाषिक वैविध्य व बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक मदत पुरवण्यासाठी 'युनेस्को' आपल्या सदस्य राष्ट्रांना उत्तेजन देते. याचाच भाग म्हणून 'युनेस्को' स्थानिक भाषांना डिजिटल जगतात स्थान मिळण्याला पाठिंबा देते. इंटरनेटवर आणि इतर जनसंवादाच्या माध्यमांमधे स्थानिक भाषांमधे मजकूर तयार व्हावा, यांबरोबरच डिजिटल स्त्रोत विविध भाषांमधे उपलब्ध व्हावेत यासाठीच्या प्रयत्नांनाही 'युनेस्को'चं कायमच प्रोत्साहन राहील.

या टीपणात माहिती आणि ज्ञान हे वेगळे शब्द वापरलेत, ते चांगलं आहे. 'स्थानिक' भाषा हा मात्र थोडा गुळगुळीत शब्दप्रयोग वाटतो आणि त्याचं समर्थन कसं केलं जाईल तेही समजत नाही. याशिवाय, टीपणातली इंटरनेटबद्दलची भूमिका काहीशी अतिरंजित वाटू शकते, कारण कितीही म्हटलं तरी हे सगळं 'सॉफ्टवेअर'च्या पातळीवरचं स्वातंत्र्य, वैविध्य असतं; त्याचं 'हार्डवेअर' ज्यांच्या हातात आहे त्यांची शक्ती बऱ्याच गोष्टी नियंत्रित करते. पूर्व पाकिस्तानचा बांग्लादेश झाला त्यासाठी एक अख्खं युद्धही व्हावं लागलं. त्यामुळे एकूण इंटरनेट ह्या माध्यमाबद्दल बोलताना काही गोष्टींबाबत सावधपणा बाळगावा लागेल. 'समाजनिर्मिती' असं म्हणताना हा सावधपणा असावा असं वाटतं, बाकी 'युनेस्को'ने आवश्यक तिथे 'तत्त्वतः' असा शब्द वापरून पुरेशी काळजी घेतलेली आहे. अर्थात स्वातंत्र्याच्या अशा सॉफ्टवेअराधारित गोष्टींमधूनही खूपच गोष्टी बाहेर पडत असतातच आणि त्यांचं महत्त्वही असतंच. याशिवाय ज्यांचं महत्त्व आपण आजच्या दिवसाच्या निमित्ताने आठवायला पाहिजे अशा एका माणसाला आता 'रेघे'वर बोलवूया. या माणसाचं नाव आहे ना. गो. कालेलकर (११ डिसेंबर १९०९ - ३ मार्च १९८९ ).

माहिती आणि ज्ञानातला फरक अधोरेखित करत राहाण्यासाठी कालेलकरांसारख्या ज्ञानी भाषाशास्त्रज्ञाची आठवण आपण ठेवायला पाहिजे. कालेलकरांचं ज्ञान डेक्कन कॉलेजात आणि मराठी, इंग्रजी, फ्रेंच अशा भाषांमधून कुठे ना कुठे उरलेलं असेलच. त्यातलं आपल्यापर्यंत सहज पोचू शकेल असं ज्ञान तीन पुस्तकांमधे साठवलेलं आहे - 'भाषा आणि संस्कृती', 'भाषा : इतिहास आणि भूगोल', 'ध्वनिविचार'. ही तीनही पुस्तकं 'मौज प्रकाशना'नं प्रकाशित केलेली आहेत.

आत्तापुरतं आपण 'भाषा आणि संस्कृती'मधलं कालेलकरांचं म्हणणं पाहूया.

या पुस्तकाच्या प्रस्तावनेत कालेलकर म्हणतात :
आज आपल्या देशात अनेक प्रश्न आहेत आणि त्याबाबत तीव्र मतभेदही आहेत. भाषा हा त्यांतला एक प्रश्न आहे. म्हणून तिचे स्वरूप समजून घेणे आवश्यक आहे. भाषेच्या प्रश्नाला दोन बाजू आहेत : शास्त्रीय व व्यावहारिक किंवा सामाजिक. पहिली बाजू भावनावश न होता अभ्यासता येते. भाषेचे ध्वनी, त्यांचं वर्गीकरण, त्यांचा वापर, व्याकरण, व्याकरणातील वर्ग, त्यांची संदर्भानुसार होणारी रूपे, वाक्यातली मांडणी, व्युत्पत्ती, भाषेचा पूर्वेतिहास, तिचे मूळ, तिच्यात घडलेले परिवर्तन, तिच्यावर घडलेला इतर भाषांचा परिणाम, आधुनिक प्रगती सामावून घेण्याची तिची क्षमता, इत्यादी गोष्टी पहिल्या प्रकारात येतील. तर तिचे प्रमाण रूप, तिचा विविध क्षेत्रांतील उपयोग, तिची परिभाषा, तिचा शिक्षणक्षेत्रात उपयोग, तिचे लेखन, तिची लिपी, तिचा वापर वाढवण्यासाठी करायचे उपाय, तिचा इतर भाषांशी संबंध, इत्यादी प्रश्न पुष्कळदा अत्यंत वादग्रस्त बनतात.
भाषेच्या वापरासंबंधीचा दृष्टिकोण वास्तववादी असला पाहिजे. तिची स्थानिक, वर्गनिष्ठ, संदर्भनिष्ठ, व्यवसायनिष्ठ, जातिनिष्ठ रूपे लक्षात घेऊन शुद्धाशुद्धता, उच्चनीचपणा, इत्यादी कालबाह्य आणि समाजविरोधी कल्पना टाकून दिल्या पाहिजेत. सर्वांनी एकत्र येऊन समरसतेने करायच्या गोष्टी कोणत्या आणि ज्यात ढवळाढवळ करणे योग्य नाही अशा गोष्टी कोणत्या हे समजण्याची दृष्टी विद्यार्थ्याला येईल असे आपले शिक्षण असले पाहिजे.
जग विज्ञानयुगाच्या दिशेने प्रगती करत असले तरी आपले शिक्षण अजून अज्ञानयुगातच आहे याची जाणीव आपली पाठ्यपुस्तके वाचून होते. इतिहास, भाषा, इतकेच नव्हे तर विज्ञानविषयावरली पुस्तकेसुद्धा याला अपवाद नाहीत. याला कारण या पाठ्यपुस्तकांची भाषाच नसून ती निर्माण करणाऱ्या लेखकांची संकुचित वृत्ती, सामाजिक जीवनाचे अज्ञान आणि सरकारी धोरणाचा पाठपुरावा करण्यासाठी चाललेली धडपड.

खरोखरचंच काही शिकायचं असेल तर शाळेतून बाहेर आल्यानंतर आणि त्यानंतर कॉलेजात जाऊन आल्यानंतर दहा-पंधरा वर्षांत क्रमिक पुस्तकांमधून शिकलेलं बरचंसं 'अनलर्न' करणं ही आपल्याकडे खूप कष्टाची कामगिरी बनते. आणि ते बरचंसं स्वतःचं स्वतःच करावं लागत असणार, पण तसं ते होतही नसावं म्हणून मग आपण एकूण कालेलकर म्हणतात तसे अज्ञानयुगात राहात असू.

तरीही अर्थात सगळ्यांचे सगळे व्यवहार सुरूच असतात. ते कुठल्या पातळीवरून चालतात हे तपासलं जात नसलं तरी व्यवहार चालूच असतात. त्याबद्दलही कालेलकरांचं म्हणणं आहे. पान २९वर ते म्हणतात :
भाषेचे काम व्यवहार चालू ठेवणे हे आहे, तेव्हा बदलत्या व्यवहाराबरोबर तिलाही परिवर्तनक्षम असावे लागते. साधनाचे श्रेष्ठत्व ते अधिकाधिक पूर्ण आणि उपयुक्त असण्यात आहे. म्हणजे ते गतिशील असेल किंवा गतिशील बनण्याला लागणारे धर्म त्यात असतील तरच ते टिकू शकेल. नाही तर टाकून द्यावे लागेल. समाजाची गतिशीलता भाषेला झेपली नाही तर ती भाषा मृत्युपंथाला लागली आहे असे अवश्य समजावे.
पण असे होत नाही. आपल्यात असणारी अपूर्णता भाषा अनेक मार्गांनी भरून काढण्याचा प्रयत्न करते. जुन्या संकेतांना नवे अर्थ देऊन, नवे संकेत बनवून किंवा उसने घेऊन आणि काही ठिकाणी तर आवश्यकतेच्या तीव्रतेनुसार परभाषेचा उपयोग करूनदेखील.
'एक भाषा एक समाज' हे तत्त्व नित्य व्यवहाराच्या पातळीवर खरे असले तरी सामाजिक गरजेच्या वरच्या पातळीवर कित्येकदा ते अपुरे पडते. दोन भाषा वापरू शकणारे वर्ग हीसुद्धा समाजाचीच गरज आहे. पूर्वी आपल्याला धर्मशास्त्रे जाणणाऱ्या संस्कृतज्ञ पंडितांची गरज होती, आज शास्त्रीय वाङ्मयात संपन्न असलेल्या भाषांचे ज्ञान असणाऱ्या तज्ज्ञांची आहे.
देशाभिमानाच्या भरात आणि पुरातन संस्कृतीचे पुनरुज्जीवन व्हावे म्हणून चाललेल्या कोलाहलात एवढी एकच गोष्ट न विसरण्याचा आपण प्रयत्न करू या.
कालेलकरांच्या या पुस्तकाची पहिली आवृत्ती ऑगस्ट १९६२मधे प्रकाशित झाली नि तिसरी मार्च १९९९मधे. पंचाहत्तर रुपयांच्या या पुस्तकात कालेलकर ज्या ज्ञानाबद्दल वरच्या परिच्छेदात बोलून गेलेत आणि त्याबद्दल न विसरण्याचा प्रयत्न करण्यासंबंधी आपल्याला सांगून गेलेत, ते आपण लक्षात ठेवलंय का? नसावं. तरीही गंमत अशी की नुसत्या बोलण्याच्या पातळीवर राहिलेल्या गोष्टी 'विसरल्या'चं नाटक करता येतं, पण लिहून ठेवलेलं असलं की त्याची लक्षात आणून देत राहाण्याची ताकद वाढते, या ताकदीच्या बळावरचं कालेलकरांचं वरचं ज्ञान आपण आजही पसरवू शकतो.
अनुभव व्यक्त करणे, जुने ज्ञान नव्या पिढीपर्यंत पोचवणे, नवे ज्ञान शोधून काढून ते पुढे उपयोगी पडेल अशा रीतीने त्याचा संचय करणे, या गोष्टी समाजजीवनाला आवश्यक आहेत. ज्ञानगंगेचा प्रवाह अखंड चालू ठेवण्याची आणि समाजजीवन प्रगमनशील बनवण्याची ही कामगिरी भाषेला पत्करावी लागते. बदलत्या जीवनप्रवाहाचे आणि अखंड वाढत राहाणाऱ्या ज्ञानभांडाराचे चित्र रेखाटण्याच्या दृष्टीने नवे संकेत, नवे प्रयोग आणि नवे संदर्भ शोधून काढावे लागतील. तसे झाले तरच सुदृढ आणि चिरस्थायी परंपरा निर्माण होऊ शकते आणि याच कारणामुळे प्रगती इच्छिणाऱ्या प्रत्येक समाजाची भाषा बदलत्या परिस्थितीला योग्य अशा दिशेने जाऊन या परिस्थितीला अनुकूल असे रूप धारण करत असते. 
पान ११३वर कालेलकर  वरच्या परिच्छेदातलं मत व्यक्त करतात, आता त्यानंतर आपण काही बोलण्याऐवजी त्यांच्या पुस्तकातल्या शेवटच्या लेखातले शेवटचे दोन परिच्छेद देऊन ही नोंदही संपवू.
जीवनातील प्रवृत्तींची भिन्नभिन्न क्षेत्रे स्वतंत्रपणे पाहिली, त्यात कालक्रमवार आलेल्या नवनव्या शब्दांनी नटलेल्या कल्पनांचा आपण विचार करायला लागलो, तर आपली प्रगती किंवा आपल्या समाजजीवनात झालेले परिवर्तन कसकसे होत गेले याची आपल्याला जाणीव होईल. जीवन टिकवणारी, सुसह्य आणि सुदृढ बनवणारी साधने सारखी वाढत असतात; सुधारत असतात, बदलत असतात. सूर्यचंद्रांच्या प्रकाशावर जीवन आखलेल्या माणसाला आज रात्रीचा दिवस करण्याची शक्ती प्राप्त झालेली आहे; शिकार करून कच्च्या मांसावर राहण्याचे आणि जमिनीतील कंदमुळे खणून काढून खाण्याचे दिवस जाऊन आज तो अनेक प्रकारचे अन्न उत्पन्न करू शकतो आहे; निसर्गाने दिलेले दोन पाय नेतील त्यापेक्षा अधिक मजल मारू न शकणारा माणूस आज अंतराळात कुठपर्यंत जाऊ शकेल याचा तर्क करणेही कठीण झाले आहे.
साधनसमृद्धीच्या या प्रयत्नांतून होणारी प्रगती संग्रहित करून विनिमयासाठी व्यक्त करू शकणाऱ्या भाषेने त्याला साथ दिलेली आहे. गुहेत राहून तिच्या आसपास फिरणाऱ्या माणसाबरोबर ती जन्माला आली आणि आज विराट विश्वाचे दर्शन घेण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या नवमानवाबरोबर ती तितकीच वाढली आहे. शास्त्रीय संशोधनात अग्रेसर अशा ज्या समाजांतून विश्व पादाक्रांत करण्याचे हे प्रयत्न होत आहेत त्या समाजाची भाषा त्या दिशेने समृद्ध होत पुढे चालली आहे. ज्या समाजांजवळ ही झेप नाही त्यांना या आघाडीवर असलेल्या समाजांच्या भाषा आत्मसात केल्यावाचून गत्यंतर नाही. कारण केवळ आपल्या संस्कृतीच्या साधनावर अवलंबून राहून आजच्या क्रांतियुगात आपला निभाव लागणार नाही. एक नवी विश्वसंस्कृती आपणा सर्वांना एकत्र आणू पाहत आहे. तिचे योग्य ज्ञान होण्यासाठी तिला प्रभावी रीतीने व्यक्त करणारी एखादी तरी भाषा आपल्याला शिकावीच लागेल, कारण जीवनाचे नवे अनुभव स्वतःमध्ये साठवून ते व्यक्त करण्याच्या दृष्टीने आणि ज्ञानमार्गावर मानवाची ज्या वेगाने प्रगती होत आहे तिच्या तुलनेने आज कोणतीही भारतीय भाषा समर्थ आहे असे वाटत नाही.
पान १२०


***

Saturday, 16 February 2013

अफझल गुरू : एक नोंद

ही नोंद क्रमवार केली आहे, त्याचं कारण तिची लांबी खूप जास्त आहे. प्रत्येक मुद्दा क्रमांकाने दिल्यामुळे प्रत्येकाला आपापल्या कामाच्या आणि वेळेच्या सोईने यातले त्या त्या वेळी शक्य होतील ते मुद्दे वाचत जाता येतील.


एक  :
ही नोंद सामान्य वाचकांच्या भूमिकेतून करण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे आपल्याला सर्व गोष्टींचा तडा लागलाय आणि आता काही मत मांडायचंय यासाठी ही नोंद नाही.


दोन :
फाशीची शिक्षा हवी की नको या मुद्द्यासंबंधी ही नोंद नाही.


तीन :
भारतीय संसदेवर १३ डिसेंबर २००१ रोजी झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात दोषी ठरलेल्या अफझल गुरूला ९ फेब्रुवारीला दिल्लीतल्या तिहार तुरुंगात फाशी देण्यात आलं. ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखालच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार होतं आणि या हल्ल्यासंबंधी झालेल्या आत्ताच्या फाशीवेळी केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालच्या संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार आहे.

१३ डिसेंबर २००१पासून ९ फेब्रुवारी २०१३ पर्यंत या प्रकरणातील महत्त्वाच्या घडामोडींची नोंद 'द हिंदू'च्या वेबसाइटवर वाचता येईल.


चार :
मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यातला दोषी अजमल कसाब याला दोन महिन्यांपूर्वी फाशी झाली, ती घटना आणि अफझल गुरूच्या फाशीची घटना एकाच पारड्यात तोलणं चुकीचं आहे. कसाब ज्या चित्राचा भाग होता ते चित्र पुरेसं स्पष्ट होतं, त्यासंबंधी सगळ्यांनी दूरचित्रवाणीवर पाहिलेल्या दृश्यांपासून इतर अनेक पुरावे एकूण चित्रात सामान्य वाचकांच्या दृष्टीने आवश्यक ती स्पष्टता आणत गेले, त्यामुळे त्याच्या शिक्षेच्या बाबतीत फाशीच्या शिक्षेसंदर्भात मतमांडणी झाली असली तरी त्याचा दोषच नव्हता असं कोणतंही म्हणणं मांडण्याचा प्रश्न साहजिकपणेच नव्हता. अफझल गुरूच्या बाबतीत मात्र अनेक प्रश्न उपस्थित झालेत.

या दोन्ही घटना काही जणांकडून एकाच पारड्यात तोलल्या जाण्याची काही कारणं अशी असू शकतील-
- १६६ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मुंबईतल्या '२६/११' हल्ल्याचा सूत्रधार हफीझ सईदने कसाबच्या फाशीनंतर पाकिस्तानात श्रद्धांजली वाहिली आणि आता गुरूच्या फाशीनंतरही जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा अध्यक्ष यासिन मलिकने इस्लामाबादला श्रद्धांजली सभा घेतली, त्यात गुरूच्या फाशीचा निषेध करण्यासाठी हफीझ सईद उपस्थित होता. त्यामुळे वरवर पाहाता दोन्ही घटना एकाच पारड्यात तोलल्या जाऊ शकतील.
- एक इथे नोंदवायला हवं, पाकिस्तानात १४ व्यक्तींच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बॉम्बस्फोटात हात असल्याच्या आरोपावरून तिकडे फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या सरबजीत सिंग या भारतीयाला आता फाशी द्यावी, या मागणीने गुरूच्या फाशीनंतर पाकिस्तानात आणखी जोर धरलाय. पण 'सरबजित सिंगच्या फाशीसंबंधी घाईने निर्णय घेऊ नये, कारण तसं करणं म्हणजे गुरूच्या फाशीसारखाच प्रकार होईल. कृपया असला कोणताही निर्णय पाकिस्तान सरकारने घेऊ नये अशी विनंती मी करतो', असं मलिक वरती उल्लेख केलेल्याच सभेत बोलला. यासिन मलिक किंवा हफीझ सईद यांच्या बडबडीवरून किंवा कृत्यांवरून अफझल गुरूसंबंधी निष्कर्ष काढले जाऊ शकतात, कारण ते दोघं त्याला श्रद्धांजली वाहातायंत.
- काही जणांसाठी दोन घटनांमधे फाशी गेलेल्या व्यक्ती मुस्लीम होत्या आणि दहशतवादाशी संबंधित होत्या एवढा एकच मुद्दा दोघांना एकाच पारड्यात तोलण्यासाठी पुरेसा ठरू शकतो.

यात एक महत्त्वाचा फरक असा की, कसाब हा पाकिस्तानी नागरिक होता, तर अफझल भारतीय प्रजासत्ताकातल्या जम्मू-काश्मीर या राज्यामधे राहाणारा भारतीय नागरिक होता. अफझल गुरूसंबंधीचे इतर तपशील नोंदीत आणखी स्पष्ट होत जातील.


पाच :
अफझल गुरूला उच्च न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा कायम ठेवताना सर्वोच्च न्यायालयाने ४ ऑगस्ट  २००५ रोजी दिलेला निकाल न्यायालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. १०७ पानांचं हे निकालपत्र आहे. (पीडीएफ)

या निकालपत्रात नमूद केलेल्यातले काही मुद्दे -
- सरकारी पक्षाकडून ८० साक्षीदार, एस.ए.आर. गिलानीच्या बाजूने १० साक्षीदार सर्वोच्च - न्यायालयात साक्ष देऊन गेले. साधारण ३३० कागदपत्रं साक्षीसाठी न्यायालयापुढे ठेवण्यात आली. (पान १-२)
- पकडण्यात आलेल्या आरोपींपैकी मोहम्मद अफझल गुरू आणि शौकत हुसैन गुरू हे एकमेकांचे चुलत भाऊ. चौथी आरोपी अफसान गुरू (पूर्वाश्रमीची नवजोत संधू) ही शौकतची पत्नी. तिसरे आरोपी एस.ए.आर. गिलानी दिल्ली विद्यापीठात अरबी भाषेचे प्राध्यापक असून शौकत आणि नवजोत यांच्या विवाहाचे विधी पार पाडण्यात ते सहभागी होते. नवजोतने लग्नावेळी इस्लाम धर्म स्विकारला. (पान २)
- पान १४ ते पान २६ दरम्यान गुन्ह्याची कबुली (कन्फेशन) आणि गुन्ह्या केल्याचे मान्य करणे (अॅडमिशन) या शब्दांबद्दलचा कलह आहे. यात इतर पूर्वीच्या काही प्रकरणांचे दाखले देत, गुन्ह्याची कबुली काढून घेण्याच्या पोलिसांच्या मार्गांवर टीप्पणी करत न्यायालय बराच उहापोह करतं. कोणासमोर दिलेलं 'कन्फेशन' पुरावा म्हणून ग्राह्य धरावं हे ठरवताना, त्या भोवतीची परिस्थिती न्यायालय तपासतं. पोलीस अधिकाऱ्यासमोर दिलेलं प्रत्येक 'कन्फेशन' हे ग्राह्य असतंच असं नाही, किंबहुना ते बहुतेकदा ते पुरेसा पुरावा म्हणून उपयोगी नसतं.
- त्यानंतर 'गुन्हेगारी कट' (कट : षडयंत्र) या दोन शब्दांबद्दलचा खल सुरू होतो. त्यासाठी आधीच्या प्रकरणांमधले दाखले दिले जातात. एकत्रितपणे एखाद्या गुन्ह्याचा आराखडा रचणं म्हणजेच इथे उल्लेख केलेला 'गुन्हेगारी कट.' आता एखादा आरोपी या कटात सहभागी आहे हे कसं सिद्ध होईल, याबद्दलही न्यायालय खल करतं. त्यात असं सिद्ध होण्यासाठी थेट पुरावा सापडणं अवघड आहे, कारण कट कायम गुप्तरितीनेच रचला जाणार. त्यामुळे परिस्थितीजन्य पुराव्यांनी अशा कटातील आरोपीचा सहभाग निश्चित करावा लागू शकतो. अर्थात, हा परिस्थितीजन्य पुरावा वाजवी संशयापलीकडे जाऊन घटनांची मालिका स्पष्ट करणारा असावा, असं न्यायालय म्हणतं. साधारण पान ३६पर्यंत ही चर्चा सुरू राहाते.
- त्यानंतर संसदेवरच्या हल्ल्याच्या कटातल्या आरोपींचा कटातील सहभाग, या मुद्द्यावर खल सुरू होतो. एका आरोपीने पुढे ठेवलेल्या माहितीतलं 'तथ्य' आणि कटातील सहभागाच्या संदर्भात 'तथ्य' (फॅक्ट) तपासणीच्या निमित्ताने 'तथ्य' या शब्दावर खल सुरू होतो. वरती उल्लेख केलेल्या आरोपींपैकी गिलानीतर्फे न्यायालयात असं सांगण्यात आलं की, संबंधित मोबाइल फोन हे अफझल आणि शौकत यांचे आहेत, शौकत याने हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी मोहम्मद याची आधी दिल्लीत ख्रिश्चन कॉलनीत राहायची व्यवस्था केली होती आणि शस्त्रांचा साठा लपविण्याची जागाही उपलब्ध करून दिली होती, इत्यादी. या माहितीवरून शस्त्र सापडली नसली तरी गिलानीला या सर्व घडामोडींची माहिती होती हे यावरून निश्चित होतं.
- शौकतचे वकील शांतिभूषण आणि अफझलचे वकील सुशील कुमार यांनी कटामधे नोंदवण्यात आलेले दूरध्वनी क्रमांक आपल्या अशिलांचे नसल्याचे सांगितलं, त्यावरचा खल साधारण पान ४८पासून सुरू होतो. शेवटी मोबाइल कंपन्यांच्या रेकॉर्डवरून क्रमांकाची मालकी आरोपींचीच असल्याचं निश्चित होतं.
- पान ५६च्या दरम्यान अफझलला कनिष्ठ न्यायालयातील सुनावणीदरम्यान योग्य ती कायदेशीर मदत न मिळाल्याचा त्याच्या सर्वोच्च न्यायालयातील वकिलांनी उपस्थित केलेला मुद्दा निकालपत्रात चर्चिला आहे. या मुद्द्यामधे काहीही तथ्य नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. तथ्य का नाही, याचा उहापोह पुढची काही पानं केला आहे. यातलं प्रत्येक वाक्य इथे नोंदवणं शक्य नाही, पण निकालपत्रातल्या या भागात म्हटलेल्या  गोष्टींचा साधा अर्थ असा की, अफझल गुरूला कनिष्ठ न्यायालयाने योग्य ते कायदेशीर सहाय्य देऊ केले होते. त्याला पहिल्यांदा जो वकील नेमून दिला त्याने काम करण्यास नकार दिला, त्यामुळे बदलून दुसरी वकील नेमण्यात आली, त्यांनीही नंतर यातून माघार घेतली आणि दरम्यान त्यांनी अफझलशी काहीही संवाद साधलेला नव्हता. पण सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, पहिला वकिलाने काम करण्यास नकार दिल्यानंतर दुसरा वकील नेमण्यापर्यंत (१५ मे २००२) काही प्राथमिक प्रक्रियेपलीकडे सुनावणीची प्रगती झाली नव्हती. आणि दुसऱ्या वकिलांनी अफझलशी संवाद साधला नसला, तरी जेवढे दिवस त्यांच्याकडे वकीलपत्र होतं त्या काळात त्यांनी पुरेशी कायदेशीर मदत त्याच्या बाजूने केलेली आहे. यात संवाद न साधता दुसऱ्या वकिलांनी ज्या गोष्टी केल्या, त्यात काही गोष्टी पुरावे म्हणून मान्य करण्यात आल्या (५ जून २००२). उदाहरणार्थ, पंचनाम्याचे अहवाल, शस्त्रास्त्रांच्या जप्तीविषयीची कागदपत्रं आणि दहशतवाद्यांची अफझलने ओळख पटवून दिली ही घटना. शिवाय या प्रक्रियेला अफझलने सुनावणीदरम्यान कोणताही आक्षेप घेतला नाही. शिवाय ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख त्याने पटवून दिली हे स्वतंत्रपणे सरकारी पक्षाच्या साक्षीदारांकडून सिद्ध झालेलं आहे.
दुसऱ्या वकिलांनी अफझलचं वकिलपत्र सोडताना असं कारण दिलं की, त्यांना दुसरे आरोपी गिलानीनी त्यांची बाजू लढविण्याची विनंती केली आहे.
त्यानंतर दुसऱ्या वकिलांसोबत काम करणाऱ्या वकिलाला २ जुलै २००२ रोजी अफझलचं वकीलपत्र देण्यात आलं. यावर अफझलने कोणताही आक्षेप घेतलेला नव्हता.८ जुलै २००२ला अफझलने आपण वकिलांच्या कामगिरीबद्दल समाधानी नसून वरिष्ठ वकिलाची नेमणूक करण्यासाठीचा अर्ज दाखल केला. त्याने चार वकिलांची नावं पुढे ठेवली होती आणि त्यापैकी एक नेमावा अशी विनंती न्यायालयाला केली होती. पण त्यापैकी कोणीही त्याच्या बाजूने खटला लढण्यास तयार नसल्याचं कनिष्ठ न्यायालयाने त्याला सांगितलं आणि तिसरा वकीलच कायम ठेवण्यात आला. याशिवाय अफझलला स्वतःलाही सरकारी पक्षाच्या साक्षीदारांना प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली.
- पान ५८पासून अफझलविरोधातल्या पुराव्यांबद्दलची मांडणी निकालपत्रात सुरू होते. यात पोलीस उपायुक्तांनी नोंदवलेला अफझलचा कबुलीजबाब आणि काही परिस्थितीजन्य पुरावे यांचा समावेश होतो. यानंतर कबुलीजबाबाची संपूर्ण प्रक्रिया आणि त्यातला तपशील निकालपत्रात नोंदवलेला आहे.
- अफझलच्या कबुलीजबाबाचा निकालपत्रात दिलेला गोषवारा असा : तो १९८९-९० च्या दरम्यान जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट या संघटनेत सामील झाला, त्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमधे जाऊन त्याने प्रशिक्षण घेतलं आणि शस्त्रांसह भारतात परतला. त्यानंतर काही काळाने तो आपला भाऊ शौकत याच्यासह अभ्यासासाठी दिल्ली गाठली, दिल्ली विद्यापीठात शिकत असताना तो एस.ए.आर. गिलानीच्या संपर्कात आला. १९९३मधे आपल्या कुटुंबियांच्या सल्ल्यावरून त्याने सीमा सुरक्षा दलासमोर शरणागती पत्करली.  व सोपोर भागातल्या आपल्या मूळ घरी परतला. त्यानंतर त्याने त्याचा कमिशन एजन्टचा व्यवसाय सुरू केला. याच काळात अनंतनाग भागातल्या तारीक नावाच्या माणसाशी त्याची ओळख झाली. त्यानेच अफझलला काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी 'जिहादा'मधे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलं. तारीकने अफझलची गाठ गाझीबाबाशी घालून दिली. त्यानेच अफझलला आपल्या कारवायांमधे सामील करून घेतलं आणि भारतातल्या संसदेबरोबरच, दूतासवासीय आस्थापनांवर हल्ल्याच्या कटात सहभागी करून घेतलं.
यानंतर दिल्लीला अफझलने दहशतवाद्यांच्या राहाण्याची सोय केली, त्यांना स्फोटकं बनवण्यासाठी आवश्यक सामग्री पुरवण्यासाठी बाजारहाट केला, राहाण्याची ठिकाणं बदलताना आवश्यक ती कामं केली, आदी तपशील आलेला आहे. कटाच्या अंमलबजावणीसंबंधीच्या बैठका शौकतच्या घरीच होत असत, याच काळात अफझल हा शौकत आणि गिलानीना जिहादासाठी प्रोत्साहित करत होता. या बैठकांना शौकतची पत्नीही उपस्थित असायची.
दिल्ली विधानसभा, संसद, इंग्लंड आणि अमेरिकेचे दूतावास, विमानतळ अशी काही लक्ष्य हल्ल्यासाठी ठरवण्यात आली. शेवटी संसदेवरचा हल्ला करण्याचा कट निश्चित करण्यात आला. अॅम्बेसेडर गाडीची खरेदी, तिच्यामधे स्फोटकं लपवणं, इत्यादी तपशील त्यानंतर येतो.
१२ डिसेंबर २००१ या दिवशी रात्री शौकत आणि गिलानीबरोबर अफझल गांधीविहारमधल्या दहशतवाद्यांच्या राहाण्याच्या ठिकाणी गेला. तेव्हा पाचही दहशतवादी उपस्थित होते. त्यावेळी मोहम्मदने अफझलला एक लॅपटॉप आणि दहा लाख रुपये दिले आणि लॅपटॉप गाझीबाबापर्यंत पोचवण्यास सांगितलं. दहा लाख रुपये अफझलसाठी होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संसदेवर हल्ला होईपर्यंत अधूनमधून त्यांचा मोबाइलवर संपर्क होता.
- वरच्या मुद्द्यात जे आपण पाहिलं ते अफझलने एका पोलीस अधिकाऱ्यासमोर 'स्वतःहून' दिलेल्या कबुलीजबाबातलं निकालपत्रात जे नोंदवलं गेलंय ते. या संदर्भात आरोपींच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादाची निकालपत्रात घेतलेली दखल अशी : अफझलसारखा कथितरित्या दहशतवाद्यांशी संबंध ठेवून असलेला माणूस अटक झाल्यावर लगेच स्वतःहून आपला कबुलीजबाब देऊन टाकेल, हे शक्य कोटीतलं वाटत नाही. शौकतच्या घरी झालेल्या कथित बैठकांमधेही तथ्य नाही, कारण जे दहशवादी संसदेवर हल्ला करण्यासाठी आले असतील ते इकडेतिकडे फिरत बसणं शक्य नाही, आणि गिलानी किंवा नवजोत (शौकतची पत्नी) यांसारख्या कटाच्या आखणी किंवा अंमलबजावणीत काहीच सहभाग नसलेल्या लोकांसमोर याबाबत चर्चा करून अनाठायी जोखीम पत्करतील हेही अविश्वसनीय आहे. या कबुलीजबाबातील घटना सुसंगत वाटत नाहीत आणि त्यातली भाषेवरून असं वाटतं की हा कबुलीजबाब आरोपींच्या पाठीमागे आधीच तयार करून ठेवलेला असावा.
- यानंतर गिलानीचे वकील राम जेठमलानींचं म्हणणं निकालपत्रात नोंदवलंय की, टीव्हीच्या वार्ताहरांसमोर अफझलने दिलेल्या कबुलीजबाबानुसार गिलानी कुठल्याच कटात सहभागी नसल्याचं दिसतं. यासंदर्भात 'आज तक' वाहिनीच्या वार्ताहराचीही साक्ष घेण्यात आली. टीव्ही वार्ताहरासमोर गिलानीचा कटात सहभाग नसल्याचं म्हटलं असलं तरी प्रदर्शित झालेल्या मुलाखतीत ते नाही. मुळात ही मुलाखत पोलिसांच्या उपस्थितीत झाली आणि अशा पद्धतीने कबुलीजबाबाचं प्रदर्शन ही अतिउत्साही कृती असल्याचा आरोपीच्या वकिलांनी मारलेला शेरा न्यायालयाने नोंदवला आहे. पण पोलिसांच्या या एका चुकीच्या कृत्यामुळे त्या पुराव्यातलं तथ्य कमी होत नसल्याचं न्यायालय म्हणतं. (पान ६१)
- यानंतर पोलीस अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अफझलला जबाब नोंदवण्यासाठी घेऊन गेले. तिथे त्याने आपण दबावाखाली कबुली दिली असं काही सांगितलेलं नाही. शिवाय या दरम्यान त्याची वैद्यकीय तपासणी झाली त्यातही त्याला कोणतीही शारीरिक मारहाण झाल्याचं दिसलं नाही.
- पान ६४पासून अफझलविरोधातल्या परिस्थितीजन्य पुराव्यांची तपासणी सुरू होते. पहिली गोष्ट अशी की, त्याला ठार झालेल्या पाचही दहशतवाद्यांना ओळखता येत होतं. त्यानंतर मोहम्मदशी मोबाइलद्वारे झालेले अफझलचे संवाद हा दुसरा परिस्थितीजन्य पुरावा. अफझलला ज्या ट्रकमधून प्रवास करताना ताब्यात घेण्यात आलं तिथे सापडलेला मोबाइल आणि त्यातलं सिम या संवादांमधून हाताशी लागलेल्या क्रमांकाशी जुळत होतं. त्यानंतर मोबाइल क्रमांक आणि हँडसेट यांच्या तपशिलांसंबंधीची माहिती निकालपत्र नोंदवतं. अफझलविरोधातला तिसरा पुरावा म्हणजे ठार झालेले दहशतवादी कुठे लपलेले होते याची माहिती त्याला होती, कुठल्या वस्तू कुठल्या दुकानातून घेतल्या हे त्याने सांगितलं. त्यानंतर दहशतवादी राहिले ती ठिकाणं, वस्तू घेतलेली दुकानं, तिथे पोलिसांनी केलेला तपास, ओळखी पटवण्यासंबंधीचे तपशील अशी नोंद निकालपत्रात आहे. अफझल आणि शौकतनी दुकानांची माहिती सांगणं आणि तिथे नेऊन पोलिसांच्या समोर दुकानदारांनी अफझलला ओळखणं व ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी मोहम्मदची ओळख त्यांना पटणं, या प्रक्रियेचे तपशील आहेत. पान ७५पर्यंत हा तपशील सुरू राहातो. यात अफझल आणि शौकतला ज्या ट्रकमधून प्रवास करताना ताब्यात घेण्यता आलं, तेव्हा त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉपच्या खरेदीचाही उल्लेख आहे.
यातून न्यायालयाने काढलेला निष्कर्ष असा की, अफझल गुरू हा ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या संसदेवरील हल्ल्यासंबंधीच्या जवळपास प्रत्येक कृतीमधे सहभागी होता. आणि वाजवी संशयापलीकडे तो या कटात सहभागी होता हे त्यातून स्पष्ट होतं.
- पान ७७पासून अफझलच्या शिक्षेसंबंधी न्यायालयाने खल सुरू केला आहे. कुठल्या कलमाखाली कोणती शिक्षा अशा पद्धतीने हा खल सुरू होतो. कनिष्ठ न्यायालयाने व उच्च न्यालयाने अफझलला दिलेली फाशीची शिक्षा कायम ठेवावी किंवा कसं, यावर खल सुरू होतो. 'पोटा'च्या कलमांसंबंधी चर्चा यात आहे.
- पान ८०दरम्यान फाशीची शिक्षा योग्य कशी ठरते या मुद्द्यावर न्यायालय येतं. भारतीय लोकांच्या जीवनात आणि सरकारच्या कामात अडथळा आणण्यास कारणीभूत ठरलेल्या आणि कित्येक मृत्यूंची शक्यता असलेल्या या गुन्ह्याचं गांभीर्य शब्दांत मांडता येणार नाही. पूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या या घटनेमधे फाशीची शिक्षा दिली तरच समाजाची एकत्रित विवेकबुद्धी समाधानी होऊ शकेल, असं न्यायालय म्हणतं.
- त्यानंतर पुन्हा काही पानं गुन्ह्याच्या स्वरूपासंबंधीच्या चर्चेची आहेत. मुख्यत्त्वे दहशवादासंबंधीच्या प्रकरणांसाठी वापरण्यात येणाऱ्या 'पोटा'संबंधी चर्चा, सरकारविरोधात 'युद्ध छेडणं' म्हणजे काय आदी गोष्टींचा खल यात आहे, शिवाय शौकतचे वकील शांतिभूषण, गिलानीचे वकील राम जेठमलानी यांच्या युक्तिवादाची काही नोंद आहे.
- पान ९३दरम्यान शौकतचा कबुलीजबाब आणि त्याच्या सहभागासंबंधीची चर्चा आहे. पान १०० दरम्यान गिलानीसंबंधीची चर्चा सुरू होते. अगदी शेवटाकडे पान १०५वर अफसान गुरू (पूर्वाश्रमीची नवजोत संधू) हिच्याबद्दल चर्चा आहे.
- पान १०७वरच्या शेवटच्या परिच्छेदात न्यायालय म्हणतं : मोहम्मद अफझची याचिका फेटाळत आहोत आणि त्याला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात येत आहे. शौकतची याचिका काही प्रमाणात ग्राह्य धरण्यात येतेय. त्याला दहा वर्षांचा सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंड (दंड न भरल्यास आणखी एक वर्षाची शिक्षा) अशी शिक्षा देण्यात येते. एस.ए.आर. गिलानी आणि अफसान गुरू यांच्या मुक्ततेविरोधात सरकारतर्फे दाखल करण्यात आलेले अर्ज फेटाळण्यात येत आहेत.

(निकालपत्रातून वर नोंदवलेले मुद्दे हे केवळ त्यातील आशय समजून घेण्यासाठी वाचावेत. मूळ निकालपत्र वाचावं वाटलं तर त्यासाठी मदतीला येतील म्हणून, आणि तपास व खटल्याची सरकारी बाजू पुरेशी स्पष्ट होण्याच्या दृष्टीने वरचे मुद्दे वाचता येतील.)



सहा :
संसदेवर झालेला हल्ल्यादरम्यान 'द हिंदू'साठी ज्यांनी वार्तांकन केलं त्या अंजली मोदी यांनी गुरूच्या फाशीनंतर लिहिलेल्या लेखात म्हटलंय की, 'शनिवारी ज्या माणसाला फाशी देण्यात आलं तो एका वाजवी संशयापलीकडे दोषी नव्हता.'

'हल्ल्यानंतर तीनच दिवसांनी १६ डिसेंबरला पोलिसांनी मोहम्मद अफझल गुरू, त्याचा चुलत भाऊ शौकत हुसैन आणि एस. ए. आर. गिलानीना माध्यमांसमोर पेश केलं आणि कारवाईचा तपशील सांगितला.

यानंतर सहाच महिन्यांनी राष्ट्राविरुद्ध युद्ध छेडण्याच्या आणि दहशतवादी कृत्याचा कट रचण्याच्या आरोपांखाली मोहम्मद अफझलसह इतर दोघं आणि शौकतची गरोदर पत्नी अफसान यांच्यावर खटला सुरू झाला.

अफझल गुरू पूर्वी जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा सदस्य होता, त्या माध्यमातून काश्मीरला 'स्वातंत्र्य' मिळून देण्यासाठी सीमापार गेलेल्यांमधे तो होता, आणि भ्रमनिरास होऊन पुन्हा भारतातल्या आपल्या घरी परतलेल्या अनेकांपैकी तो एक होता. या १९९०च्या दशकातील सुरुवातीच्या घडामोडी. परत आल्यानंतर त्याला काश्मीरमधल्या विशेष कृती दलाच्या ठाण्यात नियमितपणे हजेरी लावावी लागत असे. म्हणजे संरक्षण दलांच्या नजरेखाली असलेला हा माणूस होता. संरक्षण दलं लक्ष ठेवून असलेल्या या माणसाच्या (संसदेवरील हल्ल्यासंबंधीच्या) कारवाया त्यांच्या नजरेतून सुटल्या हे कसं शक्य आहे?

अफझलच्या विरोधात कोणताही साक्षीदार नव्हता. किंबहुना, तोच त्याच्याविरोधात साक्षीदार ठरला.  त्याने स्वतःच गुन्हा मान्य करून पोलिसांना आपण कुठे कुठे गेलो, कोणा कोणाला भेटलो याची माहिती दिली. त्याच्याविरोधातला पुरावा म्हणजे त्याला पोलिसांनी अटक केली तेव्हा त्याच्याकडून ताब्यात घेण्यात आलेले फोन आणि सिम कार्डं.'

मोदी यांनी असंही म्हटलंय की, गुरूला आपली बाजू मांडण्यासाठी आवश्यक आणि योग्य कायदेशीर मदत मिळाली नाही. इतर तिघांची बाजू मांडण्यासाठी बुद्धिमान वकील होते तर गुरूची बाजू मांडण्यासाठी नेमलेला वकील त्याच्याच विरोधात होता. (कनिष्ठ न्यायालय व उच्च न्यायालयातल्या सुनावण्यांसंदर्भात ही माहिती आहे). त्याने गुरूला फाशीऐवजी इंजेक्शनद्वारे मृत्युदंड द्यावा अशी विनंती केली, वास्तविक गुरूला जगण्यासाठी खटला लढवायचा होता.


सात :
अफझल गुरूला सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी मिळालेल्या वकिलाला त्याने जे पत्र लिहिलं होतं, त्यात त्याने म्हटलं होतं की, 'काश्मीरमधल्या विशेष कृती दलाने (स्पेशल टास्क फोर्स - एसटीएफ) मला यात अडकवलंय. याशिवाय माध्यमांसमोर मला जबरदस्तीने गुन्ह्याची कबुली द्यायला लावली. यावेळी विशेष पोलीस उपायुक्त राजबीर सिंग मला धमकावत होते आणि त्यासंबंधी दूरचित्रवाणीचे पत्रकार (शम्स ताहिर - आज तक) यांनीही न्यायालयात साक्ष दिली आहे. मी त्यांच्या इच्छेनुसार बोललो तर ते माझ्या कुटुंबाला त्रास देणार नाहीत, असं पोलिसांनी मला सांगितलं.

श्रीनगरमधे मला पकडून एसटीएफ मुख्यालयात नेलं आणि तिथून दिल्लीत आणलं. श्रीनगरमधे पारिम्पोरा पोलीस स्थानकात माझ्याकडचं सगळं सामान काढून घेण्यात आलं, मला मारण्यात आलं. मी खरं बोललो तर माझ्या कुटुंबीयांना संकटांना सामोरं जावं लागेल अशी धमकी मला देण्यात आली. कोणत्याही वॉरन्टशिवाय माझा भाऊ हिलाल अहमद गुरू याला दोन-तीन महिने पोलीस कोठडीत डांबण्यात आलं. हे सगळं मला पहिल्यांदा पोलीस उपायुक्त राजबीर सिंग यांनी सांगितलं.

'एसटीएफ'कडून काश्मिरी लोकांवर कसे अत्याचार होतात हे मी गेली सात वर्षं अनुभवत आहे, त्यामुळे मी माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं. ज्यांना पैसे देणं शक्य असतं ते अशा अत्याचारांपासून सुटण्यासाठी तो मार्ग अवलंबू शकतात. यापूर्वी पारिम्पोरा पोलीस स्थानकातल्याच अकबर नावाच्या पोलिसाने माझ्याकडून पाच हजार रुपये उकळले होते. मी बनावट औषधं विकतोय अशा आरोपाखाली मला अटक करण्याची धमकी त्याने दिली होती. तोच इथे न्यायालयात येऊन माझ्याविरोधात साक्ष देऊन गेला. संसदेवरच्या हल्ल्लापूर्वीपासून तो मला ओळखतोय. न्यायालयातही त्याने मला आधी सांगितलं की, 'माझं कुटुंब सुरक्षित आहे', ही एका अर्थी मला सूचना होती. माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी मी काम केलं आणि आता मी इथे मृत्यूच्या दारात उभा आहे.

१९९७-९८मधे मी औषधविक्रीचा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठीही अधूनमधून विशेष पोलीस अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागायची. १९९८ ते २००० या काळात दोनशे रुपयांपासून ते कधीकधी पाचशे रुपयांपर्यंत पैसे मला त्यांना द्यावे लागत. याच काळात एका दिवी सकाळी दहा वाजता एसटीएफच्या लोकांनी मला उचललं आणि पालहलन कॅम्पात नेलं. तिथे पोलीस उप-अधीक्षक विनय गुप्ता यांनी मला मारहाण केली, इलेक्ट्रिक शॉक दिले, थंड पाण्यात घातलं. त्यांनी मला सांगितलं की, माझ्याकडे शस्त्रं लपवलेली आहेत. त्याच दिवशी संध्याकाळी तिथलाच पोलीस निरीक्षक फारूक याने मला सांगितलं की, मी साहेबांना दहा लाख रुपये दिले तर मला सोडण्यात येईल.

त्यानंतर मला हमहामा कॅम्पावर नेण्यात आलं. तिथे पोलीस उप-निरीक्षक दविंदर सिंग यांनी मला मारहाण केली. त्यांच्या एका निरीक्षकाने तीन तास मला नग्न करून इलेक्ट्रिक शॉक दिले. अखेर मी त्यांना दहा लाख रुपये देण्यास राजी झालो. आणि माझ्या पत्नीने दागिने विकून ८० हजार रुपये जमवले. मग त्यांनी माझी दोन-तीन महिन्यांपूर्वीच मी विकत घेतलेली स्कूटर नेली, मी ती २४ हजार रुपयांना विकत घेतली होती. अशा प्रकारे एक लाख रुपये घेतल्यानंतर त्यांनी मला सोडून दिलं.'

यानंतर अफझल म्हणतो की, 'पोलीस उप-अधीक्षक दविंदर सिंग यांनी मला एका लहान कामासाठी बोलावलं आणि एका माणसाला दिल्लीला घेऊन जायला सांगितलं. तो माणूस काश्मिरी नसल्याची शंका मला आली, कारण तो काश्मिरी भाषेत बोलत नव्हता, पण दविंदर यांनी सांगितल्यामुळे मी त्याला दिल्लीला घेऊन गेलो. तिथे त्याने मला एकदा कार घेण्याविषयी सांगितलं. तेव्हा मी त्याच्यासोबत करोल बाग परिसरात गेलो, तिथे त्याने कार विकत घेतली. दिल्लीत तो अनेक लोकांना भेटत असे. मोहम्मद असं त्याचं नाव होतं. या काळात मला दविंदर यांचे अनेक फोनही येत असत. मोहम्मदने मला ३५ हजार रुपये दिले आणि ते भेट म्हणून असल्याचं सांगितलं.'

अफझलच्या म्हणण्यानुसार, पैसे दिल्यानंतर मोहम्मदने त्याला काश्मीरला परतण्याची सूट दिली. त्यानंतर परत जात असताना अफझलला श्रीनगर पोलिसांनी सोपोर इथे ताब्यात घेतलं.

अफझलने पुढे दिल्लीत पोलिसांच्या चौकशीसंबंधीचा तपशील लिहिलाय आणि त्याने मोहम्मदविषयी सांगितलं, पण त्यानंतर पोलिसांनीच त्याला तो (अफझल), शौकत, शौकतची पत्नी आणि गिलानी हेच संसद हल्ल्यामागचे लोक आहेत, असं सांगितलं. त्यानंतरच काही दिवसांनी त्याला टीव्ही वाहिन्यांसमोर कबुलीसाठी नेण्यात आलं. माध्यमांसमोर गिलानीसंबंधी काहीही बोललं तर राजबीर सिंग मधेच तोडत असल्याचं अफझलचं म्हणणं आहे. गिलानी निरपराध असल्याचं त्याने एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. त्यावर गिलानीसंबंधीचा भाग प्रदर्शित न करण्याची विनंती राजबीरनी पत्रकारांना केली.


यानंतर न्यायालयात आपलं म्हणणं मांडायला आपल्याला संधी न मिळाल्याची तक्रार अफझलने केली आहे. या पत्राचा साधारण आशय आणि नोंदीत इतरत्र न येणारी माहिती असा भाग आपण या मुद्द्यामधे पाहिला. पूर्ण पत्र स्वतंत्रपणे वाचता येईल. पत्र कच्च्या स्वरूपातलं आहे. (पत्रात दहा लाख ही संख्या आकड्यांमधे लिहिलेली आहे आणि पुढे एक लाख दिल्याचा उल्लेख अक्षरांमधे आहे. कदाचित पहिल्या दहा लाखांच्या उल्लेखात एक शून्य अधिकचं पडलं असेल. पण अखेरीस पोलिसांनी एक लाख रुपये दिल्याचं त्याने म्हटलंय. पत्राच्या कच्च्या स्वरूपामुळे राहून गेलेला हा विरोधाभास इथेही कायम ठेवलाय.)

अफझलची पत्नी तबस्सुम हिने लिहिलेलं खुलं पत्र 'काश्मीर टाईम्स'मधे प्रकाशित झालं होतं. काही अधिकाऱ्यांची नावं घेऊन तिने अफझलवर झालेल्या अत्याचारांसंबंधी काही त्या पत्रात म्हटलंय, त्याच्या लिंगाला इलेक्ट्रिक शॉक देण्यात आले, त्याला उलटं लटकाविण्यात आलं. यातला काही तपशील संसद हल्ल्यापूर्वीचाही आहे.


आठ :
सध्या 'कॅरव्हॅन' मासिकाचे संपादक असलेल्या विनोद के. जोस यांनी २००६मधे अफझल गुरूची मुलाखत घेतली होती, तीही अफझलच्या पत्राच्या संदर्भातले आणखी काही तपशील जाणून घेण्यासाठी वाचता येईल : मुलाकात अफझल.

नऊ :
संसदेवरील हल्ला आणि त्यानंतरचा खटला आणि अखेरीस अफझलला देण्यात आलेली फाशीची शिक्षा यासंदर्भात 'इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली'मधे २००६च्या ऑक्टोबरमधे एक लेख आला होता. 'अटॅक ऑन पार्लमेन्ट' अशा शीर्षकाच्या या लेखात काही मंडळींच्या म्हणण्यांचे गोषवारे एकत्र केलेले आहेत.


दहा :
'ओपन' साप्ताहिकामधे राहुल पंडिताने काय लिहिलंय हे आता आपण पाहू. अफझलला आत्ता फाशी देण्यामागचे राजकीय हेतू, एकूण खटल्यातल्या काही त्रुटी यांचा ओझरता संदर्भ देऊन तो लिहितो की, (तरीसुद्धा) अख्ख्या राज्याला इंटरनेट आणि एसएमएस सुविधा बंद करून वेठीस धरणं, कोणतंही वर्तमानपत्र किंवा स्थानिक केबल नेटवर्कला काम करताच येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करणं हे बरोबर नाही.
(काश्मीरमधे संचारबंदी लागू केल्यामुळे वर्तमानपत्र निघू शकली नाहीत, त्या संदर्भात राहुलचं वरचं विधान आहे.)

आपल्या लेखाचा शेवट करताना राहुल म्हणतो, 'काश्मिरी लोकांनीही हे समजून घेतलं पाहिजे की, अफझल गुरूच्या फाशीचा निषेध करण्यासाठी जंतर मंतरला मोर्चा काढताना 'आझादी'च्या घोषणा देऊन भारताने आपल्याला सहानुभूती दाखवावी अशी अपेक्षा ते करू शकत नाही.आणि काश्मीरमधल्या दुर्गम खेड्यात सुरक्षा दलांच्या चकमकीत ठार झालेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याचं प्रेत लग्नाच्या मिरवणुकीप्रमाणे दहनासाठी नेलं जाताना पाहाणं हीसुद्धा काही सुखकारक गोष्ट नसते.'
(अफझलच्या फाशीच्या निषेधार्थ जंतर मंतरमधे घोषणाबाजी झाली, त्याबद्दल वरचा परिच्छेद आहे.)

राहुल पंडिता हा स्वतः काश्मिरी पंडीत असून त्याचं 'अवर मून हॅज ब्लड क्लॉट्स' हे पुस्तक नुकतंच प्रसिद्ध झालंय. चौदाव्या वर्षी त्याला आपल्या कुटुंबाबरोबर श्रीनगर सोडावं लागलं होतं. त्याच्या पुस्तकातले काही भाग दोन ठिकाणी वाचता येतील - एकदोन

अकरा :
आता आपण अरुंधती रॉय आणि प्रवीण स्वामी यांनी 'हिंदू'मधे लिहिलेल्या लेखांकडे वळू. रॉय यांच्या लेखाचं खंडन करणारी प्रतिक्रिया म्हणून स्वामींचा लेख आहे. या दोन्ही लेखांसंबंधी प्रत्येकाने आपापलं वाचून काय तो निर्णय घ्यावा. पण त्यातला तपशील इथे वेगळा नोंदवून काही साध्य होईल असं वाटत नाही. पण दोन्ही लेख वाचता येतील. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा पाकिस्तास्थित म्होरक्या मौलाना मसूद अझर याला कधी अटक झाली तर अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील, असं स्वामींनी म्हटलंय, एवढंच इथे नोंदवू.

बारा :
शेवटाकडे आपण मिहीर श्रीवास्तवनी 'ओपन' साप्ताहिकात लिहिलेल्या लेखाकडे वळू. मिहीर यांनी २००५ पासून या प्रकरणातलं वार्तांकन केलेलं आहे. यापूर्वी २००६मधे 'तेहेलका'साठी काम करत असताना त्यांनी 'गिल्टी ऑफ अॅन अनसॉल्व्ह्ड क्राइम' असा लेख याच प्रकरणासंबंधी लिहिला होता. शिवाय त्याच काळात त्यांनी ज्येष्ठ विधीज्ञ राम जेठमलानी यांची मुलाखतही 'तेहेलका'साठी घेतली होती. संसद हल्ल्यातील आरोपींना सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवर कायदेशीर मदत पुरवलेल्या जेठमलानींच्या म्हणण्यानुसार अफझल गुरूला कनिष्ठ न्यायालयाच्या पातळीवर पुरेशी कायदेशीर मदत मिळाली नव्हती. आधीच्या या दोन गोष्टींचे फक्त उल्लेख करून आता आपण मिहीर यांच्या आत्ताच्या लेखाकडे वळू. या लेखाचं शीर्षक आहे 'द क्वेश्चन ऑफ रिझनेबल डाउट' (वाजवी संशयाचा प्रश्न).

मिहीर आपल्या लेखात म्हणतात :

'या प्रकरणातली काही प्राथमिक तथ्यं पाहू -

संसदेवर ज्यांनी हल्ला केला ते पाच जण - मोहम्मद, तारीक, हमझा, राणा व राजा यांना संसदेच्या आवारातच ठार करण्यात आलं.

त्या दिवशी संसदेवर हल्ला करण्याच्या कटात कथितरित्या सहभागी असलेल्या बारा जणांपैकी फक्त चारच जणांना अटक करण्यात आलं : अफझल गुरू, त्याचा चुलत भाऊ शौकत हुसैन गुरू, शौकतची पत्नी अफसान गुरू आणि दिल्ली विद्यापीठाच्या एका महाविद्यालयात अरबी भाषेचे शिक्षक असलेले एस.ए.आर. गिलानी. अफझल आणि शौकत यांना दोषी ठरवण्यात आलं, तर अफसान आणि गिलानीची मुक्तता करण्यात आली. दहशतवाद प्रतिबंधक कायद्यातील (प्रिव्हेन्शन ऑफ टेररीझम अॅक्ट - पोटा) कलमांखाली दाखल केलेले या चारही जणांविरुद्धचे कोणतेच गुन्हे न्यायालयीन चाळणीत टिकू शकले नाहीत. सर्व तपासाचा पाया पोलीस कोठडीतल्या कबुलीजबाब हा होता आणि न्यायालयाने हा कबुलीजबाब पुरावा म्हणून गृहीत धरला नाही. हल्ल्याच्या वेळी अफझल कोणत्याही दहशतवादी संघटनेचा भाग नव्हता याची नोंद न्यायालयाने केली.

या हल्ल्याचे तीन 'सूत्रधार' - गाझी बाबा, मसूद अझर आणि तारीक, जे लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदचे सदस्य आहेत, त्यांना कधीच अटक करण्यात आली नाही. यापैकी गाझी बाबाला २००४ साली सुरक्ष दलांनी चकमकीत ठार केलं. त्याचं शव अफझलने आपल्या पूर्वीच्या बंडखोरीच्या दिवसांमधल्या अनुभवाच्या जोरावर ओळखलं.

गिलानीच्या दाव्यानुसार त्यांना कनिष्ठ न्यायालयाच्या पातळीवर चांगल्या वकीलांची साथ मिळाली नसती तर त्यांचीही अवस्था अफझलसारखीच झाली असती. अफझलचा चुलत भाऊ याला कटाची माहिती असल्याच्या दोषावरून दहा वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा झाली.'

'या प्रकरणात मला २००५ साली रस वाटू लागला, तेव्हा मी बनावट चकमकींसंबंधी एक वृत्तमालिका लिहीत होतो. त्यावेळी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने अफझलच्या प्रकरणाचा उल्लेख 'भारतातलं सगळ्यात बनावट एन्काउन्टर' असं केल्याचं मी ऐकलं. हे मी कधीच सिद्ध करू शकलो नाही, पण त्यानिमित्ताने या प्रकरणाच्या जवळ केल्यानंतर त्यातील त्रुटी समोर येऊ लागल्या. या प्रकरणाचा तपास अत्यंत गडबडीत केला गेला आणि पोलिसांच्या विशेष विभागाने तयार केलेली थिअरी विविध विरोधाभासांनी भरलेली होती

त्याच वर्षी मी दिल्ली विद्यापीठातले तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक निर्मलांग्शू मुखर्जी यांच्याकडे काही मदत मागायला गेलो. त्यांनी या प्रकरणाचा जवळून मागोवा घेतला होता आणि न्यायालयातील बहुतेक सुनावण्यांवेळी ते उपस्थित होते. आम्ही त्यासंबंधी तपशिलात चर्चा केली. तेव्हा ज्या गोष्टीने आमचं लक्ष वेधलं ती ही : विशेष विभागाने २००२ साली दाखल केलेल्या आरोपपत्र म्हटलं होतं की, जैश-ए-मोहम्मदचा भारतातला म्होरक्या गाझी बाबा हा ८८२१६५१५००५९ या उपग्रह दूरध्वनी क्रमांकाद्वारे आणि ४९१७२२२९०१०० या स्विझ दूरध्वनी क्रमांकाद्वारे अफझल आणि शौकत यांच्या संपर्कात होता. अफझलचा भाऊ शौकत याचा दहशतवादी हल्ल्याशी संबंधित असल्याचा पुरावा म्हणून या गोष्टीचा उपयोग झाला. पण यातली गोम अशी की, या धाग्यावर पुढे कोणताच तपास विशेष विभागाने केला नाही. आरोपपत्रात म्हटलंय : आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक व उपग्रह दूरध्वनी क्रमाकांवरच्या कॉलचे तपशील मिळवण्यासाठी 'इंटरपोल'ला विनंती करण्यात आली आहे, पण त्यांचा अहवाल अजून मिळालेला नाही. खटल्यादरम्यान कधीही या मुद्द्याचा उल्लेख झाला नाही. 'इंटरपोल'चा अहवाल जर मिळाला असेल तर तो गुप्त आहे का?

विशेष विभागाचा तपास हा अफझल गुरूच्या 'कबुलीजबाबा'वर केला गेला, पण वरती सांगितलेला मुद्दा आणि अफझलचं त्यासंबंधीचं म्हणणं यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. 'दूरध्वनी क्रमांकांचे रेकॉर्ड काळजीपूर्वक तपासले तर ते दूरध्वनी क्रमांक 'एसटीएफ' असल्याचं न्यायालयात स्पष्ट झालं असतं. पण खरी कहाणी सांगण्याची संधी मला मिळाली नाही', असं अफझलने त्याचे सर्वोच्च न्यायालयातील वकील सुशील कुमार यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं. त्याला ही संधी मिळाली नाही कारण कनिष्ठ न्यायालयातील सुनावणीदरम्यान त्याला कायदेशीर मदतीला कोणीही नव्हतं.

अफझलच्या म्हणण्यानुसार, हमहामा (जम्मू-काश्मीर) इथले पोलीस उप-अधीक्षक दविंदर सिंग यांनी संसद हल्ला प्रकरणातला सह-आरोपी मोहम्मदला दिल्लीला घेऊन जाण्याची व त्याच्या राहण्याची सोय करण्याची सूचना अफझलला केली होती. 'मला तो माणूस माहीत नव्हता, आणि तो काश्मिरी भाषा बोलत नव्हता, त्यामुळे तो काश्मिरी नसावा असा संशय मला आला', असं अफझल म्हणतो. या पत्रातले तपशील कधीही न्यायालयातल्या मांडले गेले नाहीत, असं नंदिता हकसार यांनी दाखवून दिलं आहे.

यापुढे ही गोष्ट आणखीच भीषण वळण घेते. संसद हल्ला होण्याच्या एक वर्ष आधी अफझल जम्मू-काश्मीर पोलिसांच्या कोठडीत होता. गाझी बाबाशी संबंध असल्याच्या आरोपावरून त्याला 'एसटीएफ' कॅम्पवर ताब्यात घेण्यात आलं होतं. हे संबंध असल्याचं आधीपासूनच माहीत होतं, तर 'एसटीएफ'ने त्याला मोकळं का सोडलं?

राजबीर सिंग यांनी माध्यमांना सांगितलं की, त्यांचे वरिष्ठ अधिकारी अशाक हुसैन बुखारी यांच्या सांगण्यावरून त्यांनी अफझलला सोडून दिलं. यासंबंधी मी बुखारींना विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला त्यांचं एकच उत्तर होतं : 'मला आठवत नाही.'

पण अफझलने या सुटकेसंबंधी पत्रात दिलेल्या तपशिलानुसार त्याच्या कुटुंबीयांनी एक लाख रुपयांची लाच दिल्यानंतर त्याची सुटका झाली.

अफझल गुरूवरचे संसद हल्ल्यातले आरोप खरे असतील तर जम्मू-काश्मीर पोलिसांची आधीची त्याच्या संदर्भातली कृती प्रचंड गंभीर ठरते. अफझल जर आधीपासूनच दहशतवादी कृत्यांमधे सहभागी होता तर दविंदर सिंग किंवा बुखारी यांना आपल्या कर्तव्यात कसूर केल्याबद्दल दोषी धरावं लागेल.

जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष कृती दलाशी आपण नियमितपणे संपर्कात होतो, असं अफझलने अनेकदा सांगूनही विशेष विभागाने त्यासंबंधी कोणताही तपास केला नाही.

दविंदर सिंग यांचं नाव ना प्राथमिक माहिती अहवालात नोंदवलं गेलं ना आरोपपत्रात. या खटल्यात साक्षीदार म्हणूनही त्यांचं नाव आलं नाही. एकूण खटल्यात त्यांचा कोणताही उल्लेख आला नाही.'

मिहीर यांच्या लेखातला एक संदर्भ हा यापूर्वी आपण नोंदवलेल्या अरुंधती रॉय आणि प्रवीण स्वामी यांच्या लेखस्वरूपातील वादात आला आहे. मिहीर यांनी तो आणखी स्पष्ट करायचा प्रयत्न केलाय :

'हल्ला करणाऱ्या व ठार झालेल्या पाच दहशतवाद्यांची नाव प्रसिद्ध केल्यानंतर, ठाणे पोलिसांनी काही गोष्टींचं स्पष्टीकरण मागितलं. ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त एस. एम. शांगरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, ठाणे पोलिसांनी डिसेंबर २०००मधे लष्कर-ए-तोयबाच्या चार दहशतवाद्यांना अटक केलं होतं, त्यातल्या एकाचं नाव - अबू हामझा - संसद हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्याशी जुळणारं आहे. फक्त नावच नाही तर शांगरी यांच्या म्हणण्यानुसार, ठाण्यात पकडण्यात आलेल्या चौघांकडून जे ब्लूप्रिंट, नकाशे, शस्त्रास्त्रं जप्त करण्यात आली होती, ती आणि नवी दिल्लीतल्या ठार झालेल्या पाच दहशतवाद्यांजवळ सापडलेल्या वस्तू यांच्यातही साम्य होतं. ठार झालेला दहशतवादी म्हणजे आपण पूर्वी पकडलेलाच इसम  होता का याची खातरजमा करण्यासाठी आयुक्तांनी त्याचं छायाचित्र दिल्लीला पाठवलं.

ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांना ८ डिसेंबर २००० रोजी जम्मू-काश्मीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं होतं. संसद हल्ल्याच्या एक वर्षाआधीची ही घटना आहे.

तरीही, शांगारींनी संसद हल्ल्यांनंतर मागितलेली स्पष्टीकरणं जम्मू-काश्मीरचे पोलीस प्रमुख के. राजेंद्र यांनी फेटाळली. हमझा हे मोठ्या प्रमाणात वापरलं जाणारं मुस्लीम नाव आहे आणि चुकीची ओळख घेतल्याचं हे प्रकरण आहे असं राजेंद्र यांनी सांगितलं. तसं असेलही, पण मग ठाणे पोलिसांनी जम्मू-काश्मीर पोलिसांच्या ताब्यात दिलेल्या दहशतवाद्यांचं काय झालं? त्यांना ठाण्यात हजर करावं अशा अनेक नोटिसा ठाण्यातल्या न्यायालयाने जम्मू-काश्मीर पोलिसांना पाठवल्या, पण त्यावर कोणतीही अंमलबजावणी झाली नाही.

याचा तपास करण्यासाठी मी 'तेहेलका'तल्या माझ्या वरिष्ठ सहकाऱ्याबरोबर काश्मीरला गेलो. आम्ही काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटलो, शिवाय गुप्तचर खात्यातल्या काही अधिकाऱ्यांना भेटलो. आपल्या ताब्यात असलेल्या या चारही जणांबद्दल कोणतीही माहिती देण्यास अधिकारी तयार नव्हते. संसदेवरील हल्ल्याबद्दलही ते एवढंच सांगत की, 'अफझल त्यात सामील होता', पण कसा, याचं उत्तर त्यांनी दिलं नाही.

ठाण्यात पकडलेले चौघे १३ डिसेंबर २००१ रोजी संसद हल्ल्यात ठार झालेले पाच जणांमधे होते का, याचा तपास करण्यासाठी शांगारी जे करू इच्छित होते ते करण्याचा मी प्रयत्न केला. या सर्व व्यक्तींचे छायाचित्रांसह उपलब्ध तपशील मी जमवला. यातून हाताला लागलेली माहिती अशी होती की, आधी पकडलेल्या चौघांपैकी एक जण आणि नंतर ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एक जण यांच्यात प्रचंड साम्य होतं. यासाठी मी 'एम्स'मधल्या फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेतली. त्यांनी छायाचित्रांची, उपलब्ध शारिरीक तपशिलांची तपासणी केली. संसद हल्ल्यानंतरच्या पंचनाम्यात नोंदवलेली त्या माणसाची उंची फक्त एका इंचाने वेगळी होती, बाकी केसांचं वळण, नाक आदी तपशील तंतोतंत जुळले.

यासंदर्भात, 'द हिंदू'मधे अरुंधती रॉय यांच्या लेखावर प्रतिक्रिया देताना प्रवीण स्वामींनी म्हटलंय की, 'मोहम्मद यासिन फतेह मोहम्मद, ज्याला रॉय यांच्या म्हणण्यानुसार 'ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी संसद हल्ल्यातील एक म्हणून ओळखलं', त्याला कोठडीतून पळून जात असताना पोलिसांनी ठार केलं. उर्वरित दोघांना - मोहम्मद तय्यब आणि मोहम्मद अफझल शहीद हेही अशाच प्रयत्नात ठार झाले. या चकमकी कायद्याचं उल्लंघन करून झाल्या असण्याची शक्यता आहे पण त्या १९ डिसेंबर २००० आणि १३ फेब्रुवारी २००१ यांमधल्या कालावधीत झाल्या. म्हणजे मोहम्मद हा संसदेवरच्या १३ डिसेंबर २००१ हल्ल्यापूर्वी गाडला गेला होता (जानेवारी २००१).'

स्वामी म्हणतात ते खरं असेल तर असा प्रश्न उपस्थित होतो की, या चौघांनी घेऊन येण्यासंबंधी जम्मू-काश्मीर पोलिसांना अनेकदा नोटिसा बजावूनही ठाणे न्यायालयाला यासंबंधी का सांगण्यात आलं नाही? कदाचित हे असं असेल की, जे तपशील जम्मू-काश्मीर पोलिसांना पूर्वी ठाणे न्यायालयाला द्यायचे नव्हते, ते आता स्वामींना द्यायला त्यांची हरकत नाहीये!'

मिहीर यांचा पूर्ण लेख इच्छुकांना वाचता येईल. त्यात २२ डिसेंबर २००० मधे लाल किल्ल्यावर झालेल्या हल्ल्यासंबंधी त्यांनी काही तपशील दिला आहे. वर आपण नोंदवला तो त्यांच्या लेखाचा दीर्घ गोषवारा आहे. आणि आपण यापूर्वी जे तपशील बघितले त्यात आणखी स्पष्टता यावी, या हेतूने जे आवश्यक होतं, ते फक्त यात दिलं आहे.

तेरा :
आता आपण नोंदीचा शेवट करू.

फाशी कधी द्यावी यासंबंधीचा निर्णय राजकीय हेतूंनी झाल्याचं इंग्रजीत बऱ्यापैकी प्रमाणात आणि मराठीत 'लोकसत्ते'ने काही प्रमाणात स्पष्ट केलेलं आहे. पण त्या व्यतिरिक्त ज्या पद्धतीने बातम्या वाचकांपर्यंत आल्या, त्यावरून पत्रकारितेची भीषण अवस्था तरी स्पष्ट व्हायला हरकत नाही.

माजी पंतप्रधान राजीव गांधीसोबत किमान चौदा जणांचे प्राण घेण्यास कारणीभूत ठरलेल्या गुन्हेगारांच्या फाशीच्या शिक्षेविरोधात तामिळनाडू विधानसभा ठराव मंजूर करते, त्यासंबंधी देशभरात / माध्यमांमधे फारसा गदारोळ होत नाही. पंजाबचे माजी मुख्यमंत्री बिआन्त सिंग यांच्या मारेकऱ्याचा चेहराही 'दहशतवादा'चा चेहरा म्हणून प्रसिद्ध नसतो. याचं एक कारण या घटना घडल्या तेव्हा माध्यमांची वाढ जेवढी नव्हती तेवढी संसदेवरच्या हल्ल्यावेळी झालेली आहे आणि ही माध्यमांची सूज आणखी वाढतच जाणार आहे. अफझल गुरूचा चेहरा सगळ्यांच्या डोक्यात ठसला आणि त्याच्या फाशीनंतर न्याय मिळाल्याची भावना कित्येक वर्तमानपत्रांनी संबंधित बातमीच्या मथळ्यातच व्यक्त करून टाकली.

यात मुस्लीम मंडळींची स्वतःसंबंधीची समस्या विचारात घेणं गैर नाही. त्यातल्या एका बिंदूसंबंधी आपण यापूर्वी नरहर कुरूंदकरांच्या साक्षीने एक नोंद केलेली आहे. पण ती समस्या एका न्यायालयीन खटल्याच्या आणि त्यासंबंधीच्या वार्तांकनाच्या मधोमध उभी करणं बरोबर नाही. काश्मीरशी संबंधित मुस्लीम आणि त्या संदर्भातील पूर्वग्रह, हा अफझल गुरूच्या माध्यमांनी उभ्या केलेल्या चेहऱ्यामागचा मोठा संदर्भ होता, हे कसं नाकारता येईल? जो पिसाटपणा आपण या आठवड्यात पाहिला त्या मागे हा संदर्भ होता का? विचार करायला हवा. आणि चोवीस वर्षांपूर्वी फाशी देण्यात आलेल्या काश्मिरी मकबूल भट याच्या कबरीशेजारी आता अफझल गुरूची हुतात्मा म्हणून कबर होईल, त्याचा वापर काश्मीरपासून हैदराबादपर्यंत काही कट्टर इस्लामी नेते करून घेतील त्याची जबाबदारी कोणाची?

मुस्लिमांचं लांगूलचालन, मानवाधिकाराचा कथित 'भाबडा' दृष्टीकोन या गोष्टींना आपण जरा बाजूला ठेवू. त्यांचे संदर्भ वेगळ्या ठिकाणी येतीलही किंवा अफझल गुरूच्या संदर्भात ज्यांनी ज्यांनी लिहिलं त्यात कुठेतरी हे संदर्भ लपलेले असतीलही. पण आपण एक सामान्य नागरिक आणि सामान्य वाचक असलो तरी अफझल गुरू हा फाशीचा गुन्हेगार होता असं छातीठोकपणे म्हणणं बरोबर ठरणार नाही. या हल्ल्यात सुरक्षा दलांचे आठ जवान आणि एक माळी यांना प्राण गमवावे लागले हे जितकं दुःखदायक आहे तितकंच आत्ता फाशीनंतर काश्मिरमधे संचारबंदीदरम्यान झालेल्या हिंसाचारात तीन जणांचा झालेला मृत्यूही दुःखदायकच आहे. याशिवाय यानिमित्ताने जो हिंसाचार होत राहील तोही दुःखदायकच.

'हिंदुस्तान टाईम्स'चे सल्लागार संपादक इंद्रजित हजारा यांनी 'न्यूजलाँड्री'वर यासंबंधी लिहिलेल्या लेखात म्हटलंय : 'मी फाशीच्या शिक्षेच्या विरोधात नाही, पण तरी या प्रकरणात मला या शिक्षेवर शंका घ्यावीशी वाटली. आणि तेही मानवाधिकाराच्या मुद्द्यावरून नाही, तर कायदा आणि न्याय या मुद्द्यांवरून मला ही शंका घ्यावीशी वाटली, कारण या दोन गोष्टींमुळे सामाजिक सुव्यवस्था अराजकापासून वेगळी राखता येते.'

अफझलच्याच निकषांवर जर १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटांच्या आणि आधीच्या दंगलींच्या खटल्याचा विचार केला तर मग शे-दीडशे लोकांना फाशीच्या रांगेत उभं करावं लागेल. कदाचित संजय दत्तलाही दीडेक वर्षांच्या कालावधीपुरत्या तुरुंगवासावर सुटायला मिळालं नसतं. पण तो सुटला आणि त्याचे गांधीगिरीचे भिकार चित्रपट पाहून आपण नागरिक गहिवरतही असतो.

कसाबच्या बरोबरीने अफझलच्या प्रकरणाचा विचार करणं चूक, हे आपण आधी नोंदवलंय. त्याचं कारण असं की, कसाब हा एका विशिष्ट कारवाईसाठी प्रशिक्षित दहशतवादी होता. त्याचे पाकिस्तानस्थित संघटनेशी असलेले संबंध स्पष्ट होते, त्याने केलेलं कृत्य स्पष्ट होतं. तसं अफझल गुरूच्या बाबतीत पुरेसं स्पष्ट केलं गेलं नाही. मुख्यत्त्वे तपासाच्या पातळीवर अस्पष्टता असल्याचं दिसू शकतं. कसाबच्या फाशीने जो संदेश पाकिस्तानातील दहशतवाद्यांना दिला गेला, असं आपण मानतो, तसलं काहीही अफझलच्या फाशीने झालेलं नाही. कारण तो एक काश्मिरी नागरिक होता, आणि त्याच्यासाठी कुठल्याही दहशतवादी संघटनेने विमान पळवण्याचे किंवा असले कुठलेही प्रयत्न केले नसते. अफझलसंबंधी जे स्पष्ट तपशील आपल्यापुढे आहेत त्यावरून तो गुन्हेगारच नव्हता असं म्हणता येणारच नाही. तो गुन्हेगार होताच, पण फाशीचा गुन्हेगार नव्हता. परिस्थितीजन्य गोष्टींचा भाग म्हणून तो ह्या कटाच्या चित्रात होता असं आपल्याला सामान्य वाचक म्हणून लक्षात येतं.

सध्या माध्यमांचं काम त्यांना पुरवण्यात आलेलं किंवा त्यांच्यापर्यंत वरवरचं पोचलेलं चित्र रंगवत बसणं एवढंच उरलेलं आहे. त्यामुळे पत्रकारांनी करायची कामं आपल्याला सामान्य वाचक म्हणून करावी लागली, आणि त्यातून ही नोंद तयार झाली, ही या नोंदीची एक मोठी मर्यादा आहे.
***

कारुण्य आणि क्रौर्य
एकाच चिंचोळ्या पुलावरून
परस्परांच्या विरुद्ध दिशेने
प्रवास करीत आहे
- गुरुनाथ धुरी ('लालकोवळा काळोख'मधून)
***

Sunday, 10 February 2013

अध्यक्षीय भाषण : दुर्गा भागवत

दुर्गा भागवतांची आज जयंती. त्यानिमित्त 'रेघे'वर-



आज आपणापुढं उभं राहताना माझं मन फार संकोचून गेलं आहे. ज्यांच्या लेखनातून मला खूप स्फूर्ती मिळाली, त्या इतिहासाचार्य राजवाड्यांचं स्मरण मला उत्कटपणं होत आहे. इतिहास-संशोधन तर राहू द्याच, पण भाषा, व्याकरण आणि साहित्य यांची खोल जाण असणारा लेखक राजवाड्यांच्या काळी कुणीही नव्हता. अजूनही त्या कसाला उतरेल असा कुणी मला तरी दिसत नाही. त्या राजवाड्यांना संमेलनाचं अध्यक्षपद मिळालं नाही ही महाराष्ट्र सारस्वताच्या इतिहासातली एक बोलकी घटना आहे. महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या इतिहासातली ती फार मोठी हानी आहे असंच नव्हे, तर हा महाराष्ट्राच्या साहित्याभिरुचीला लागलेला कायमचा कलंकच आहे असं मला तर वाटतंच, पण कुणाही अभ्यासू साहित्यप्रेमिकाला असंच वाटेल अशी माझी खात्री आहे. राजवाड्यांची ही कथा, तर बिचाऱ्या चिं. वि. जोश्यांची स्थिती तर काय वर्णावी?

मंडळी, मी बोलते आहे ते दोषदिग्दर्शन म्हणून नव्हे, तर खरोखर पोटात ढवळतं म्हणून सांगते आहे. राजवाड्यांचं महाराष्ट्रावर अपार ऋण आहे. त्यांची चोखंदळ दृष्टी नि निःस्पृह वृत्ती मला नेहमीच प्रेरक ठरली आहे. त्याचप्रमाणे चिं. वि. जोशी यांचा प्रसंगनिष्ठ निरोगी विनोद कुणाला आवडत नाही? चिमणरावानं कुणाला जिंकलं नाही? पण मला पाली भाषेचे, बौद्ध वाङ्मयाचे अभ्यासक म्हणून ते आठवतात. त्यांचं जातककथांचं पुस्तक लहानसंच आहे, पण त्यात निखळ भाषांतराचा उत्कृष्ट नमुना आढळतो. मला तो फार उपयोगी पडला. असे हे दोन थोर साहित्यसेवक ज्या पदावर चढले नाहीत, त्या पायरीवर पाऊल ठेवताना मला संकोच वाटतो आहे.

परंतु गतगोष्टीबद्दल पश्चात्ताप करण्यापेक्षा आपल्या हाती काही नाही, हेही तितकंच खरं आहे. म्हणून या दोघांचं आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांसमक्ष मी अत्यंत आदरानं आणि कृतज्ञतेनं स्मरण करते.

राजवाड्यांचं स्मरण करताना 'चारित्र्ये तुझिया तुझ्यासम जमा लाभोत संशोधक' असे एक मुकुंदराय कवी यांनी त्यांना उद्देशून जे उद्गार काढले आहेत, ते म्हटल्याशिवाय माझ्याच्यानं राहावत नाही. राजवाड्यांचं स्मरण एवढ्यासाठी मी प्रामुख्यानं करते की राजवाडेच काय ते ग्रंथांचं कार्य निःसंदिग्धपणे सांगून गेले. एकाच वाक्यात त्यांनी सांगितलं की, 'ग्रंथसमूह हे समाजसुख आहे.' सूत्रासारखंच हे वाक्य आहे. सूत्राइतकंच विश्वव्यापकही आहे.

ठाण्याच्या ग्रंथसंग्रहालयात त्यांनी भाषण केलं, त्यातलं हे सूत्र. राजवाडे विचार करीत तेव्हा एखादा लहान मानवगण त्यांच्या डोळ्यांपुढे नसे. सर्वच समाज ते कालाच्या विशिष्ट पार्श्वभूमीवर पाहू शकत असत. 'ग्रंथ हे समाजसुख आहेत' असं ते म्हणतात, तेव्हा त्यांना समाजाचं निरोगीपण, तृप्त भाव, विचारक्षमता आणि रसरशीतपणा अभिप्रेत असतो. ग्रंथ हे आपले गुरू आहेत, हे अनेकांनी सांगितलं. ग्रंथ हे मित्र आहेत, हे वाक्यही आता शिळं झालं आहे. पण 'ग्रंथ हे समाजसुख आहेत' ही उक्ती कधी कालबाह्य ठरणार नाही. कारण राजवाडेच त्याचं स्पष्टीकरण असं करतात की, ''ग्रंथ वाचल्याने मनुष्य विचार करू लागतो. विचारांचा खल झाल्यावर आचार बनतात व नंतर समाजाचे पाऊल पुढे पडते.''

राजवाड्यांना त्यांच्या काळी जे विद्वान केवळ इंग्रजीत लिहीत, त्यांचा राग येई. ते म्हणतात की, डॉक्टर भांडारकर, न्यायमूर्ती तेलंग हे पाश्चात्यांच्या तोडीचे, पण त्यांनी मराठीत लिहिलं नाही. (भांडारकरांची धर्मपर व्याख्यानं तेवढी मराठीत झाली, पण त्यांचा उल्लेख राजवाड्यांनी केला नाही.) राजवाड्यांचं म्हणणं असं की, ''त्यांनी जर मराठीत लिहिले असते तर भाषांतररूपाने ते परकीयांना कळते. जरा वेळ मात्र लागता.'' ते पुढे म्हणतात की, ''आमचे राष्ट्र आहे. आमचा समाज आहे. आम्हास काही काम करायचे आहे, हा अभिमान धरून कल्पक पुरुष निघाला तर त्यास या सर्व गोष्टी समजतील. त्यास त्रास पडेल; खायला मिळायचे नाही; आगगाडीत धक्के खावे लागतील, तरी पण ज्ञानमार्गात तो मोठा पुरुष होईल व त्यामुळे राष्ट्राचे हित होईल. परकी भाषेत केलेले कार्य चिरकालाचे नाही. केशवचंद्र सेन, राममोहन राय ही मंडळी आमच्या देशात व्हावी पण स्वभाषेत होऊ नयेत हे दुर्दैव नव्हे काय? मान-अपमान, लहानसहान गरजा, ह्यांची परवा न करिता ज्या समाजात आपण उपजलो आहो त्याची भाषा आहे हे लक्षात धरून तिच्याद्वारे आपण असे दाखविले पाहिजे की आम्हास विचार करण्याची ताकद आहे. जो कोणी असा तयार होईल त्यास ग्रंथसंग्रहालयासारख्या संस्था पाहिजे आहेत; नुसत्या पैशाने कार्य होतेच असे नाही. इंग्लंडातही कादंबऱ्यांशिवाय इतर ग्रंथ लिहिणारास अन्नाची मोताद आहे. अशांचे अन्न ब्रिटिश म्युझिअम असून तिच्या जोरावरच ते काम करतात.''

ज्ञानवंताच्या खऱ्या भुकेचं हे जे राजवाड्यांनी वर्णन केलं, ते मराठी साहित्यात अजोड असंच आहे.

यावेळी मला स्वतःला एक उदाहरण आठवतं आहे ते सांगते. डॉक्टर (श्री. व्यं) केतकर वारल्यावर शीलवतीबाईंची काय अवस्था होती ते सांगायला नकोच. मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयात मी त्यावेळी बसत असे. शीलवतीबाई आपल्या छोट्या मुलीला घेऊन त्या खोलीतच भाषांतराचं काम करायच्या. त्या मला म्हणाल्या, ''भुकेनं नि विवंचनेनं डोकं फिरून जाऊ नये म्हणून मी ग्रंथालयात वाचायची नि काम करायची सवय लावून घेतली आहे.''

उपाशीपोटी अधाशासारखं वाचन करणाऱ्या सानेगुरुजींचंही उदाहरण आपल्या सर्वांना माहीत नाही असं नाही.

विद्येची उपासना करणाऱ्यानं कंगाल असावं असं कुणी म्हणणार नाही. पण विचार हे फार प्रखर असतात. सत्याची बूज राखणं हे विचारवंताचं ब्रीद असतं. सत्य सांगताना अनेकांच्या रोषाला बळी पडण्याचे प्रसंग अशांना येतात. वृद्धापकाळी बर्ट्रांड रसेल यांनाही तुरुंगवास भोगावा लागला हे सर्वश्रृतच आहे. तेव्हा उद्याचं समाजहित लक्षात घेऊन आज झगडणं विचारवंताला आपोआपच प्राप्त होतं. तीच त्याची कसोटी असते. तेव्हा आर्थिक स्वास्थ्याला विचारवंत कधी मुकेल याचा नेम नसतो.

राजवाड्यांनी आपल्या काळातल्या ज्ञानाच्या क्षेत्रातल्या परिस्थितीचा सूक्ष्म विचार केला होता. पारतंत्र्याच्या त्या काळी त्यांनी विचारवंताला कर्तव्याची जाणीव दिली. स्वत्वाची ओळख करून दिली. किंबहुना स्वत्व नसलं तर तेजच नाही ही जाण त्यांनी समाजाला नव्यानं करून द्यायचा प्रयत्न केला. होय, तोही प्रयत्नच. कारण जे हे त्यांचे बोल कुठल्याही काळी विचारवंतांच्या उपयोगी पडावेत, त्यांचंच नेमकं विस्मरण आम्हाला घडलेलं आहे. तेव्हा त्यांचे ते अतुल समर्थ बोल आपल्यापुढे मी सादर करते :
हा कोंबट प्रकार महाराष्ट्रातील दमल्याभागल्या उच्च लोकांचा व उदार मनाच्या सरकारचा झाला. परंतु सरकारच्या मानभावी कळवळीवर भिस्त न ठेविता व महाराष्ट्रातील उच्च मंडळींच्या पूर्ववयातील अनास्थेकडे दुर्लक्ष न करिता, आपल्याला आपले कर्तव्य यथाशक्ती बजावले पाहिजे. त्याची हलगर्जीपणाने आपण हेळसांड केली तर पुढील पिढीचे अभिश्राप आपल्याला घ्यावे लागतील आणि आपल्या कर्तव्यशून्यतेबद्दल व मनाच्या दुबळेपणाबद्दल इहलोकी आपला विशेष बोज न राहता परलोकी आपल्याला झाडा द्यावा लागेल. दुनिया आबादीआबाद असतानाही मनुष्याला आपल्या कर्तव्याला जपावे लागते. मग सर्व बाजूने कालचक्र फिरले असता, राष्ट्रातले एकोनएक लोक देशोधडीला लागले असता, उलट्या काळजाच्या शत्रूने सर्वतोपरी नागवले असता, मतलबी लोकांच्या गोड बोलण्याला उच्च मंडळी भुलून गेली असता, परकीय मंडळींनी सुचविलेल्या अभूतपूर्व विषयांची निष्फल वाटाघाट करण्यात सर्व लोक गुंग होऊन गेले असता निष्काम बुद्धीने व एकतानतेने कर्तव्य बजाविण्याची आवश्यकता विशेषच असते हे निर्विवाद आहे. अशा वेळी लहानसहान संकटांना भिऊन जाऊन किंवा जुजबी व अल्पकालीन फायद्याकडे नजर देऊन, जो मनुष्य कर्तव्याला विसरेल त्याने आत्मघात केला एवढेच नव्हे तर देशघात केला असेही होईल.

ह्यावर कोणी असा प्रश्न विचारील की, हे असे खडतर कर्तव्य तरी कोणते? तर ते स्वत्वरक्षण होय, असे आम्ही उत्तर करतो. हे स्वत्व म्हणजे काय? तर ते फार मिश्रस्वरूपी आहे. त्यात देशाचा, भाषेचा, धर्माचा, आचाराचा, विचाराचा, विकाराचा, गोत्राचा, हवेचा, पूर्ववृत्ताचा, सुधारणेचा व खोडींचा अंतर्भाव होतो. ह्या सर्व गोष्टी हजारो वर्षांच्या अनुभवांचे फल होत.

'भाषांतर' मासिकाच्या दुसऱ्या वर्षाच्या आरंभीच्या अंकात राजवाड्यांनी हे उद्गार काढले आहेत. त्यात त्यांनी भाषेचा प्रामुख्यानं विचार केला आहे. ते म्हणतात :
भाषा ही समाजाचे बंधन आहे. भाषा ही विचाराचे वाहन आहे. भाषा ही धर्माचे पुरस्करण आहे. भाषेशिवाय मनुष्यप्राणी संभवत नाही. भाषा व मनुष्य ह्या दोन वस्तूंचे सामान्याधिकरण आहे. ह्या ईश्वरी देणगीच्या द्वारे एकमेकांची सुखदुःखे आपण एकमेकांस कळवितो. ही मायादेवी उच्चनीच जे जे स्वरूप धारण करील त्या त्या प्रमाणे उच्चनीच विकारांची मोहिनी मनुष्यमात्रावर पडते. सर्व मानवी शक्तता हिच्या कृपाकटाक्षावर अवलंबून आहे. उदार विचारांचे अंकुर या अमृतकळीलाच तेवढे फुटतात. हिच्या अभावी सर्वत्र स्तब्धता व शून्यता राज्य करते. ह्या देवतेची मनोभावेकरून आराधना केली असता सर्व काही प्राप्त होते व वर सांगितलेले बहुरूपी जे स्वत्व त्याचेही रक्षण होते.

मंडळी, राजवाड्यांचा संदेश आपल्यापर्यंत पोचवण्यात मला जो आनंद वाटतो आहे, तो कसा सांगावा? राजवाडे ज्याला स्वत्व म्हणतात, त्याला आज अस्मिता म्हणतात.

ऐंशी वर्षांपूर्वी राजवाड्यांनी मांडलेले विचार आजही ताजे वाटतात, याचं कारण समाजप्रवाहांनी ओळख त्यांना स्वतःच्या अनुभवांनीच झाली होती. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यानंतरची परिस्थिती पडताळून पाहताना आपल्याला असं आढळून येतं की, पारतंत्र्याच्या त्या काळात लेखकाला जेवढी प्रतिष्ठा होती, तेवढी नंतर राहिलेली नाही. सुरक्षिततेचा आभास निर्माण झाला. पैसा जास्त मिळतो. सरकारदरबारी मानाची स्थानं, पारितोषिकं मिळतात. किताबही मिळतात. पण वैचारिक क्षेत्रात, जनमानसात लेखकांना अधिकारित्व राहिलेले नाही. कारण या परिस्थितीत स्वत्वाची कसोटी लेखकाला स्वतःलाच आवश्यक वाटत नाही. स्वातंत्र्यानंतर कल्पकतेला व साहित्यगुणांना वास्तविक फार मोठा उठाव मिळायला हवा. जनतासंपर्काची साधनं आता अधिक प्रमाणात उपलब्ध झाली. परंतु यातून जनतेच्या अभिरुचीचा विविध अंगांनी विकास करून नवनवी कला व ज्ञानक्षेत्रं यांचा वाढता परिचय लोकांना घडवण्यासाठी, स्वतःची प्रतिभा व ज्ञानमान वाढवण्यासाठी झटण्याचा प्रयत्न करण्याऐवजी अनेक थोर लेखकांनी व विचारवंतांनी रेडिओ, टीव्ही व इतर जनता-माध्यमांचा वापर करताना त्यासाठी काही मूल्यं, कसोट्या नि मानदंड यांचा त्याग करणं अपरिहार्य आहे अशी समजूत करून घेऊन, स्वतःची मूळ पातळी मात्र गमावलेली आढळते. ज्या यंत्रणेत सुधारणा घडवण्यासाठी प्रारंभी हे सज्ज झाले होते, तिचेच ते दास झाले. अमेरिकेतदेखील हे दृश्य दिसतं असं मेल्विन ट्रूमिनसारखे विचारवंत सांगतात. मग आमची स्थिती तर काय वर्णावी?

सांगण्याचा हेतू काय की, माणसाची स्वत्वाची स्वतःच ठरवलेली कसोटी असल्याशिवाय सर्वसामान्य लोकांच्या नाममात्र कसोट्यांवर भिस्त ठेवून लौकिक यश कितीही पदरात पडलं, तरी त्यामुळे त्या तथाकथित विचारवंताला भविष्यकाळाचं निदान करणं जमत नाही. भविष्यकाळात बघण्याची दृष्टी असल्याशिवाय कुठलीही मानवी समस्या खऱ्या रितीनं आकलन करणंही शक्य नसतं. उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी, आपला व समाजाचा अभिमान व अस्मिता टिकवण्यासाठी संघर्षमय इतिहासाच्या अनुषंगानंच बुद्धिजीवी माणसं वर्तमान परिस्थितीचं वास्तवदर्शन घेऊ शकतात, आणि आपला रास्त अभिमान कायम राखू शकतात. 'स्वतःच्या लायकीच्या जाणिवेतच आपली खरी सुरक्षितता असते' हे ट्रूमिनचं वाक्यदेखील या संदर्भात विसरता येत नाही.

लेखकाचं समाजाच्या जडणी-घडणीत काय स्थान आहे हे त्याच्या अस्मितेवर आणि त्याचं समाजमनाशी जे ताद्रूप्य घडतं, त्यावरच अवलंबून असतं. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी लेखक हा एकप्रकारे वैचारिक अधिष्ठाता समजला जात असे. नेत्याचं भाग्य त्याला लाभत असे. (वि. स.) खांडेकर, (ना. सी.) फडके वगैरेंच्या सभांना राजकीय सभांसारखीच गर्दी व शान असे. पण आता हे मानबिंदू ढळल्याचं दिसतं. लेखकाच्या पुस्तकापेक्षाही रेडिओ, टीव्ही व वर्तमानपत्रं यांतून होणारं त्याचं दर्शन अधिक महत्त्वाचं गणलं जाऊ लागलं आहे. ही सार्वजनिक माध्यमं त्यांचं-त्यांचं तंत्र लेखकाला आत्मसात करायला लावीत आहेत. तत्काळ धनप्राप्ती, प्रसिद्धी व प्रसार यांना लेखकही सहज वश होतो. आणि निखळ लेखनाचं जुनं तंत्र बाजूला ठेवून तो इतर प्रसंगीही या तंत्रांच्या चौकटीतच फार खोलवर न जाता, त्यांच्या विषयाच्या व आशयाच्या मर्यादा जणू त्याच दूरवर परिणाम करणाऱ्या आहेत असा समज करून घेऊन चुरचुरीत भाषा, थोडी करुणा, थोडा विनोद, माहितीचे अपुरे तुकडे वगैरेंचा एक रंगीन आकृतिबंध निर्माण करून लोकांचं रंजन करतो. त्याच्या आविष्काराचं सूत्रच बदलतं. त्याची भूमिका विचारवंतापेक्षा, कलावंतापेक्षा रंजकाची होऊन बसते. लोकही मग रंजनालाच प्राधान्य देतात. साहित्यिकाच्या ज्या सभांना गर्दी होते, ती त्याच्या गमतीच्या मालमसाल्यासाठी होते. कथाकथनाच्या गर्दीवरूनही साहित्याचे निकष कळावेत. यावरून मी कथेला तुच्छ मानते असं कुणी समजू नये. कथाकथनात रंजक, ठरीव कथांनाच अग्रक्रम मिळतो म्हणून गर्दी होते.

अशा परिस्थितीत साहित्य ही श्रेष्ठ कला राहात नाही. ती दुय्यम दर्जाची कला होते, नव्हे झालीच आहे असं पॉल गुडमन म्हणतात ते काही खोटं नाही.

साहित्याला दुय्यम कलेचं स्थान येऊ न देण्याचं एक रहस्य आहे. ते म्हणजे लेखकाचं लोकांची बोलभाषा आत्मसात करण्याचं कसब. अभिव्यक्तीची नवी घडण. बोलभाषा सदैव अस्तित्वात असते, आणि बोलीतले प्रयोग वाङ्मयाला ताजेपणा आणतात व संवादसूत्र साधतात. मराठी व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, आनंद यादव वगैरे अनेक लेखकांना जे यश मिळालं, ते याच बोलभाषेच्या आत्मसातीकरणामुळे.

या परिस्थितीत स्वतःच्या इमानाला जपणाऱ्या विचारवंताची स्वतःला लोकप्रिय माध्यमांच्या करवी सत्तास्पर्धेकडे खेचू न दिल्यामुळे काय स्थिती होते, ती 'लोकांचा पाठिंबा नसलेल्या मूठभर विद्वानांना विचारतो कोण?' अशा बिरुदानंही होते. पण हे खरं नाही. या मूठभरांचाच वचक सत्ताधाऱ्यांना वाटतो. सेन्सॉरशिपची नियंत्रणं कडक बनतात ती ज्यांना लोकप्रियता नाही त्यांनाच वचक बसावा म्हणून ना?

उदाहरण मार्क्सचंच घेऊ. तो जिवंत होता, आपले विचार सांगत होता, त्या वेळी काही मूठभर विचारी लोक सोडल्यास बाकी कुणी त्याचं कौतुक करीत नव्हतं. तरीही मार्क्सच्या विचारांची धास्ती वाटली म्हणून जर्मन शासनानं त्याला हद्दपार केलं. परंतु लोकशाही असलेल्या इंग्लंडात त्यानं आपल्या सिद्धान्तावर भरपूर लिखाण करून त्याचा प्रचार केला, तरी ब्रिटिश शासनाला त्यापासून आपल्याला धोका आहे असं वाटलं नाही. त्याला लोकप्रियता लाभली नव्हती. त्याच्या प्रेतयात्रेला अवघे बाराच लोक होते. परंतु तो मेल्यावर जेव्हा त्याचे विचार देशोदेशी रुजू होऊ लागले, तेव्हा इंग्लंडातही त्याच्या विचारांबद्दल धास्ती उत्पन्न झाली आणि मार्क्सवाद्यांवर शासनाची अवकृपा झाली. म्हणून ज्या ज्या विचारवंतांवर असं शासकीय नियंत्रण येतं, ते त्यांचा लोकांच आदर आहे म्हणूनच येतं हे उघड आहे.

साहित्याचा पाया म्हणजे जाणीव. शंकराचार्यांनी शास्त्राचा गुण 'ज्ञापकता' म्हणून सांगितला आहे. तीच ज्ञापकता म्हणजे जाणीव साहित्यालाही लागू आहे.

साहित्याचे दोन भाग असतात :  अभ्यासू लेखन आणि ललित लेखन. अभ्यासू लेखनात चेतन मन जागता पहारा ठेवून असतं, तर ललित साहित्यात स्वप्नभूमी तळातून वर आल्यासारखी वाटते. कल्पना, विचार, स्मृती व भान या साऱ्यांचं रसायन होऊन ललित लेखनाची निर्मिती होते. त्या निर्मितीचा केवळ भावनेशीच नव्हे तर देहाशी व आगच्यामागच्या जीवनाशीही घनिष्ठ संबंध असतो. कारण हेच अनुभवाचं अधिष्ठान असतं. अनुभव जेवढा बलिष्ठ तेवढा त्याचा आविष्कार समर्थ होतो. तो अधेमधेच तुटला तर दुबळा होतो. लेखकाची खरी कमाई म्हणजे ललित लेखन तयार होत असताना येणारा उल्हास, व्यावहारिक पातळीवरचा ताण आणि मनाला शांत करणारी दमणूक. अशा आविष्काराचा संबंध कुठल्याही ऐहिक सिद्धीशी नसतो, हेच लेखकाचं परमभाग्य आहे. व्यवहाराशी आविष्काराची सांगड पडली की लेखन उणावतं आणि लेखकही घसरू लागतो.

कवितेप्रमाणेच ललित लेखनाला भाववृत्तीत डूब घेण्याची आवश्यकता असते. किंबहुना, भाववृत्ती नसेल तर सृजनाचा अंकुर उगवणारच नाही. प्रीती, मृत्यू, प्रत्यक्ष जीवन आणि सृष्टीचा विराट पसारा यांच्यातल्या अबोल रहस्यांची बोचणी लागल्यावाचून भाववृत्ती जागी होत नाही. ही बोचणी सांभाळायची तर अनेक व्यावहारिक व्यवधानं खड्यासारखी बाजूला टाकावी लागतात. एकदा भाववृत्तीनं मनाचा कबजा घेतला की मग तिच्याच सांगीप्रमाणं लेखकाला चालणं पडतं व पडावं. आधी जे तंत्र लेखक आत्मसात करू म्हणतो, ते प्रत्यक्षात क्वचितच घडतं. पण अंतःचक्षूनं जे पाह्यलं, मनानं जे अनुभवलं, त्यांचं एकीकरण झालं की एक वेगळंच तंत्र त्यातून साकारतं. हा रूपबंध ज्याचा त्याचा वेगळा असतो.

साहित्याची मूळ प्रेरणा ज्ञापकता असते, यातच माणसाच्या आपल्या मनाशी होणाऱ्या तादात्म्यातलं संवादसूत्र आलं. 'काया-वाचा-मने' या आपल्याला परिचित अशा शब्दप्रयोगातच या संवादसूत्राचं रहस्य दडलेलं आहे. माणूस प्रथम स्वतःशी सुसंगत झाला नाही, तर तो कुणाशीच सुसंगत होत नाही. त्याचा संवाद इतरांशी पण जुळत नाही. संवादाला प्रारंभ स्वतःपासूनच होतो. लेखन करतानाही लेखक अलिप्त दृष्टीनं स्वतःकडे व स्वतःच्या कृतीकडे पाहू शकला, तरच त्याच्या उक्तीला प्रत्ययकारिता येते. अशा लेखकातच वाचकही असा सुप्तपणे सतत वसत असतो. बाकीचे मूर्त वाचकदेखील या मूळ वाचकाचीच प्रतिरूपं असतात. हा मूर्त वाचकच साहित्याची सिद्धी-असिद्धी ठरवतो. ती लेखकानं ठरवायची नसते. वाचकही लेखकाप्रमाणंच साहित्यकृती घडवतो अशी माझी श्रद्धा आहे.

लेखक-वाचकातल्या संवादामुळेच वाल्मीकीचा शोक आपलाही शोक होतो. त्याचा श्लोकदेखील आपलाच असतो. 'रामायण' हे नाव आपल्या कृतीला दिलं तरी 'न हि रामन्य चरितं, सीतायाच्चरितं त्विदम्' असं तो आपल्याला सांगतो. ते आपण मानतो. 'सीतायन'ऐवजी 'रामायण'च नाव आपण पत्करतो. संवादाच्या आधारावर हवी तेवढी रामायणं रचली जातात नि ती सारीच तोलाची ठरतात.

वाल्मीकीनं वाङ्मयाच्या फलुश्रुतीचे आणखी एक प्रात्यक्षिक आपल्यापुढं उभं केलं आहे. भविष्यकालीन घटना त्यानं मांडली आहे. पुढे ती प्रत्यक्ष घटनाच झाली. भविष्यात पाहण्याची दृष्टी सृजनशील लेखकाला किती आवश्यक असते हे कुठलाही सिद्धांत न मांडता, साहित्यिक क्रियाप्रक्रियांचा घोळ न घालता आपल्याला फार प्राचीनकाळीच रामायणाच्या बाबतीत घडलेलं दिसतं.

वाङ्मयात मिथ ऊर्फ पुराकथा किंवा दंतकथा घडवण्याची शक्ती ज्या प्रमाणात जास्त व सतत चालू असते, त्या प्रमाणात ते वाङ्मय व पर्यायानं तो समाजहीह अधिक समर्थ आणि प्रवाही आणि जिवंत बनतो. या पुराकथांच्या निर्माणात माणसाची कल्पकता, प्रतीकप्रियता, त्याच्या आवडीनिवडी, त्याचे आदर्श आणि त्याची कलात्मक अभिरुचीही व्यक्त होत असते.

या पुराकथाही एका ठशाच्या नसतात. त्यांचे रूपबंधही सारखे नसतात. काही कथात्मक असतात, तर काही प्रथात्मक असतात, तर काही संकल्पनात्मक असतात. उदाहरणार्थ, रामाची कथा आहे, चातुर्वर्ण्यही प्रथा आहे आणि प्रारब्ध ही संकल्पना आहे.

पुराकथेमुळे, मिथमुळे जीवनातला विस्कळीतपणा जातो, जीवनात सुसूत्रत येते. मिथमुळे समाजातल्या घटकांचं सहज सुसंघटन होतं. आचार-विचारांना दिशा लागते.

परंतु दैवतकथा किंवा मिथ ही माणसाला जखडून टाकते. ज्या समजुतीमुळं माणसाची पूर्वी मुक्तता झालेली असते. तीच त्याला अवजड होऊ लागते. उदाहरणार्थ, रामराज्य, चातुर्वर्ण्य या कल्पना आता बदलत्या जाणिवांमुळे कालबाह्य झालेल्या आहेत. माणसाचं जीवन तर पुढपुढेच जातं. त्याचं मनदेखील नवे अनुभव घेत असतं. त्याच्या मानसिक नि आत्मिक गरजा उत्तरोत्तर अधिक मूर्त स्वरूप घेतात, नव्या प्रेरणा जुन्या प्रतीकांना नि समजुतींना छेद देतात. नि मग आपोआपच हे नव्या प्रेरणांनी भरलेलं मन नवी प्रतीकं नि कल्पकथा बनवू लागतं. त्या कथाही अशाच आग्रही असतात. कधी जुन्या कथांत नवा अर्थ भरला जातो. उदाहरणार्थ, (सिग्मंड) फ्रॉइडनं इडीपसच्या कथेला दिलेला नवा संदर्भ. चातुर्वर्ण्याची जागा नव्या काल्पनिक संपूर्ण मानवी समतेच्या कल्पनेनं घेतलेली आहे.

जुन्या पठडीप्रमाणे जगातल्या सर्व आदिवासी जमातींच्या मूळ नावांचा अर्थ 'माणूस' असा आहे. आणि आपली जात हीच मानववंशाची मूळ जात अशी दृढ कल्पना आहे. जेव्हा ख्रिस्ती, हिंदू वगैरे समाजात हे लोक शिरतात, तेव्हा त्यांची मनोभूमी विस्कळित होते. एकतर ते जातिव्यवस्थेचा इन्कार करून आपल्या जुन्या कल्पनांना सार्वत्रिक रूप देऊ पाहतात किंवा आपापल्या समाजाची पुराकथाकल्पनाची शक्तीही गमावून बसतात.

विज्ञानानंही अनेक कल्पकथा पुरवलेल्या आहेत. उदाहरणार्थ, डार्विनचा माकडाचा माणूस होतो या सिद्धांतातला लुप्त झालेला दुवा. ग्रेटेस्ट गुड ऑफ द ग्रेटेस्ट नंबर ही एकोणिसाव्या शतकातल्या अर्थशास्त्रज्ञांची श्रद्धा. गोऱ्या माणसाचं ओझं ही कल्पना.

सांगायचा मुद्दा असा की कल्पकथा किंवा मिथ दुहेरी काम करते. ती नव्या, येऊ घातलेल्या जीवनाची सूचना देते, त्याला आशय पुरवते. पण जुनी झालेली कल्पकथा जीवन ठोकळेबाज करते.

विचारवंत आणि साहित्यिक जुन्या कल्पकथा मोडतात नि नव्या घडवतातदेखील.

याच कल्पकथांतून म्हणी, गाणी, प्रथा यांचं गुंतागुंतीचं भव्य शिल्प सर्व भाषांच्या आणि बोलींच्या समाजात सदैव आढळून येतं.

उदाहरणार्थ, हिंदू माणूस स्वतःकडे बघताना नकळत आपण राम व्हावं असं चिंतीत असतो. एकवाणी, एकवचनी नि एकपत्नी राम हाच आदर्श असतो. बायकांपुढे आपण सीतासावित्री व्हावं हाच आदर्श असतो. बौद्धांना बोधिसत्त्व आधार देतो.

माणूस स्वतःसाठी आणि दुसऱ्यासाठी अनेक भूमिका धारण करतो. माणसाचं अस्तित्व अनेकपदरी आहे. ते खुलं आहे, अनिर्बंध आहे. माणूस दुसऱ्याच्या भूमिकेत स्वतःला पाहू शकतो. जड वस्तू व प्राणी यांचं अस्तित्व त्यांच्यापुरतं आणि बंदिस्त असतं. तिथं देहाचंच अस्तित्व असतं.

माणसाला जबाबदारी घेता येते, तशी ती टाळताही येते. पण तिथंही त्याला निर्णय घ्यावा लागतो. निर्णयशक्तीचा वापर करण्यातच माणसाची खरी पारख असते.

ज्या कल्पकथेनं पूर्वी जीवनाला अर्थ दिलेला असतो, तीच कल्पकथा माणसाचा कोंडमारादेखील करते. ती मोडल्याशिवाय कुठलंच नवनिर्माण होत नाही. पण कल्पकथा ही माणसाला संपूर्ण वेढून टाकणारी असते. ती दूर करता येत नाही. तरी ती मोडून अगर तिला नवा अर्थ विचारवंत अगर कलावंत प्राप्त करून देत असतो आणि सामुदायिक आणि वैयक्तिक जीवनाला नवी प्रतिष्ठा प्राप्त करून देत असतो.

पण कल्पकथेचं निर्माण ठरवून करता येत नाही. जीवन स्वयंप्रेरणेन, असतं तसं सहज जगल्यानंच ती घडते.

अमुक एक गोष्ट तू लिही, असेच विचार मांड, असंच परिस्थितीचं चित्रण कर, असं लेखकाला सांगणं बरोबर नाही. पीनलकोडप्रमाणे साहित्याला नियमबद्ध करणं नुसतं हास्यास्पदच नाही, तर धोकादायकदेखील आहे.

कवची प्राणी असतात. त्यांची वाढ जास्त की कवच गळून पडतं. पण माणसाची मानसिक वाढ अनिर्बंध असल्यानं त्याला ही कवचं धोरण आखून काढून टाकावी लागतात.

अनिर्बंध सुरक्षितता कल्पिण्याची शक्ती माणसात असते. तिच्यापायीच तो असुरक्षितपणाचं आव्हानही स्वीकारतो, धोक्याचं जीवन पत्करतो आणि भावी सुखाची रम्य चित्रं रेखाटतो.

या कल्पकतेतूनच रोमँटिसिझम येतो. खरा रोमँटिसिझम स्वागतार्ह असतो. नकली रोमँटिसिझम आपल्याकडच्या लिखाणात फार आढळतो. पण नकरी रोमँटिसिझम किंवा तशी कल्पनारंजित साहित्यकृती वगैरे जीवनातल्या समस्यांसाठी खोट्याच उताऱ्यांचं सूत्रचालन करतात. पण वास्तव ते वास्तव. स्वप्नरंजन आपणा साऱ्यांनाच अतिशय प्रिय असतं. पण ते प्रिय असलं तरी इष्ट नव्हे. त्यात फार मोठा धोका आहे. हा धोका स्वप्नरंजनाच्या पूर्ण आहारी जाण्याचा आहे. वास्तव शोधण्यात खरं आश्वासन असतं. कारण वास्तवाला मर्यादांचं बंधन असतं आणि त्या मर्यादांचं भान आपण राखतो. अतिस्वप्नरंजन शेवटी भयकारक ठरतं. कारण त्याला मर्यादाच माहीत नाहीत. ऐतिहासिक व चरित्रात्मक वाङ्मयात त्याचा पडताळा येतो.

काही माणसं भूतकाळात रमतात, तर काही वर्तमानातच असतात. या दोघांनाही भविष्यात संचार करण्याची ताकद नसते. अशांचे विचार एकांगी बनतात. भूत, वर्तमान नि भविष्य या तिहींतही संचार करण्याचं सामर्थ्य रोमँटिसिझममधून येतं. अद्याप हा प्रकार आपल्याकडे रूढ झालेला नाही.

ललित साहित्याचा जो प्रभाव माणसाच्या मनावर होतो, त्याचं कारण त्यातल्या आशयाला असणारे अनेक स्तर, अनेक पदर. त्याची अनेकविध स्पंदनं. हे स्तर, पदर, स्पंदनं त्या त्या माणसाशी त्याच्या त्याच्या भाषेत त्याच्या त्याच्या भावनांत बोलतात. त्याला सुजाण करतात. त्याला आतून घडवतात. इथे आशय शब्दाची फोड करायला हवी. आशय म्हणजे विषय नव्हे. माझ्या कवितेचा विषय झाड असेल, तर आशय कदाचित् माणसाचं नित्यनिरंतर एकटेपण असेल. कदाचित् कधीही आणि कशालाही हार न जाणारी त्याची जिद्द, त्याची जबर हिंमत असेल. हा आशय मोकळा असावा लागतो. पण त्यासाठी तो सांगणारा कवी, कादंबरीकार, कलावंत मोकळा ठेवावा लागतो. हा आशय जर केवळ संदेश झाला किंवा ठाम आणि निश्चित आदेश झाला, तर कवी संपतोच, पण ज्याच्या कवितांतून भावी पिढ्या घडणार असतात, त्या पिढ्याही संपतात.

प्रत्येक कलाकृती म्हणजे आशय आणि आकार यांचा लग्नबंध.

मात्र यावरून या आधुनिक केवळ वीस-पंचवीस वर्षांची, प्रामुख्यानं स्पेंगलरनं वर्णन केलेली आधुनिक संस्कृतीची भ्रामकता व स्खलनशीलता दाखवण्यासाठी व तिच्यातून बाहेर पडण्यासाठी विविध समस्यांचा विचार करून मानवाचं भवितव्य सुघटित होईल, या हेतूनं लिहिलं गेलेलं वाङ्मय हे रामायणाच्या पातळीवरचं आहे असं कुणी समजू नये. रामायणातली भवितव्याची जाण देशकालाला भेदून जाणारी, दैवतकथेची सर्वत्र प्रेरणी करणारी आहे. आधुनिक कादंबरीतूनदेखील काही ठिकाणी मिथचा आश्रय केला जातो. युलिसिसप्रमाणं. पण दैवतकथेची तर्कातीत व तरीही सुसंगत पातळी तिला लाभत नाही. पौराणिक वाङ्मयात रामायण ही या दृष्टीनं अजोड कृती आहे.

लेखक जेव्हा त्या त्या काळाचा मागोवा घेऊन अधिकारितेनं लिहितो, तेव्हा पुढल्यांना त्यातल्या कालिकतेतून सिद्ध झालेल्या प्रत्ययांचा पडताळा येतो. विसाव्या शतकातल्या लेखकांत यूरोपमध्ये बरीच हिंसकता, वैफल्य आलेलं दिसतं त्याचं कारण ह्या काळच्या वाढत्या मानसशास्त्रीय, भौतिक व सामाजिक शास्त्रांच्या ज्ञानाबरोबर लेखकांच्या मनातले मागच्या परंपरेतून आलेले कृत्रिम बंधही फुटले. मनात नवे प्रवाह खेळू लागले. चिंतनाला व भावनांना नवी आव्हानं आली. त्या परिस्थितीचा स्वीकार करून त्यांनी लिहिलं. म्हणून आता आपल्याला अमुक एक लेखक जे लिहितो ते त्याच्या काळात जे प्रवाह होते त्यांच्या जाणिवेपोटीच लिहितो हे पटतं. आपल्याकडचं उदाहरण जयवंत दळवींच्या 'संध्याछाया'चंच घेऊ. त्यातलं म्हातारं जोडपं पारंपरिक भावनांचं प्रतीक आहे. त्यांना घरगड्याजवळ बोलावंसं वाटतं. पण तो बोलत नाही. यंत्रासारखं काम करून चालता होतो. पुढे येऊ घातलेल्या भावनाहीन पण कार्यक्षम यांत्रिक संस्कृतीचंच प्रतीक तो आहे.

साहित्यनिर्मिती व परिस्थिती यांच्याबाबतीत अन्नदाशंकर राय यांचं एक विधान लक्षात घेण्याजोगं आहे. ते म्हणतात :
अमुक एका विशिष्ट परिस्थितीत आपण हजर असायला हवं असं वाटलं की आपण लिहितो. आपण लेखक असल्यानं आपली हजेरी म्हणजेच लिखाण.

अन्नदाशंकर आणखी असंही म्हणतात की,
कठीण परिस्थितीत कलावंत किंवा साहित्यिक हा गर्भार बाईसारखा असतो. बाहेर काय वाटेल ते होवो, त्यानं आपला गर्भ जपावा.

अर्थात लेखकाची निर्मिती किती खोलवरून येते, ती बाहेर पडायला काय कष्ट पडतात आणि ती बाहेर आल्यावर वाचक आपली भर टाकून तिला पुरता आकार कसा देतो - हीच साहित्यनिर्मितीची नैसर्गिक प्रक्रिया आहे. याशिवाय अन्य बाह्य संबंध व बंधनं ही केवळ साहित्यबाह्य आहेत असं नव्हे, तर ती संपूर्णपणे गैरलागूही आहेत.

कथासाहित्याचा आविष्कार द्वंद्वात्मक असतो. त्यातले रूपबंध असे : ताण आला की मागून शैथिल्य येतं, वेदनेमागून तिचं निराकारण येतं, भीती आली की पळ किंवा आव्हान आलंच, वैषयिक क्षोभ आला की वासनातृप्ती आलीच, दुःखामागून सांत्वन येतंच. या जोड्यातलं जे अतूट नातं असतं, त्यातूनच आकृतिबंध निर्माण होत असतात. मानवी भावनांत विकास आणि स्थगन, प्रवाहीपणा आणि साचीवपणा, संघर्ष, गती आणि बंदिस्तपणा, अकस्मात आलेली उत्तेजकता, स्वप्निल शैथिल्य, सुख नाही नि दुःखही नाही अशी बधीरता - पण त्यातही दोन्ही अवस्थांत कुठंतरी असणारी बोच हे या आकृतिबंधांचं सामान्य स्वरूप असतं. या आकृतिबंधांची परिपूर्ती व्हायला मात्र माणसाला जे जे आपल्याला भावतं आहे ते क्षणिक असलं तरी थोर आहे आणि हे सारंच्या सारं अनंत काळपर्यंत माणसापासून कायम निघूनच जाणार आहे, ही जाण आवश्यक असते. 'संयोगा विप्रयोगान्ताः' म्हणतात ते हेच.

अवतीभवती अनावश्यक गोष्टींचं अस्ताव्यस्त कोठार भरलेलं असतं. त्यातून आपल्याला हव्या त्या प्रसंगासाठी आवश्यक तेवढाच भाग घेऊन बाकीचा छाटून टाकणं हीच लेखकाची किमया असते. प्रसंग जितका कमी रेखांत पण परिणामकारक दाखवता येईल, तितकं लेखकाचंयश महनीय उरतं.

या विवेचनाची मुख्य गरज अशी की कलात्मक आविष्कार जाणिवेच्या अनेक पातळ्यांना स्पर्शून जात असतो. कलात्मकतेची संवादशीलता ती किती स्तरांवर पोचू शकते यावरच अवलंबून असते.

गेल्या जागतिक युद्धानंतर एका नव्याच जीवनसंघर्षाचा अनुभव बऱ्याच लेखकांना आला. हा संघर्ष मनोमय आहे. त्यात सुसंगत वाटणाऱ्या जीवनातील विसंगतीच मानवी मन पाहू लागतं. एका जीवनसमस्येचं स्वरूप आकलन करू पाहतं. ती समस्या म्हणजे सध्याच्या जगात जगभर तरुणांना जाणवणारी प्रखर शून्यमनस्कता. पाश्चात्य राष्ट्रात दोन महायुद्धांचा परिपाक म्हणजे विज्ञानाची बेसुमार वाढ आणि त्याबरोबर व्यक्तिमात्राला आपलं केंद्र हरवल्याची प्रखर जाणीव. मानवी अस्तित्वाचं मूल्य हरवल्याची वेदना व निष्फळता. प्रेम, निर्मळ व्यवहार, आर्थिक प्रामाणिकपणा, कशावर तरी निष्ठा ही जुनी मूल्यं माणसाला आशान्वित करीत राहतातच. त्यांनीच तो काही काळ तरारतो, थरारतो. पण वाट्याला येते ती केंद्र हरवलेल्या विराट मानवसमूहांच्या भ्रांत क्रियाप्रक्रियांतून उद्भवलेली भकास जाग. हा माणूस कुठल्याही देशातला असो, संस्कृतीतला असो - त्याच्या अस्तित्वाचा परीघ केंद्र गमावलेल्या चाकोरीचा असतो. तिथं उत्कटता असते, हर्षाची नि उदासीनतेची गती असते ती आधुनिक जीवनाच्या स्पर्धामय वेगाची. तो वेग माणसाला धावायला लावतो. केंद्र असणारा माणूस त्या वेगाला आकार देतो, विकास हुडकतो. पण हे अल्पकाळ. त्या जीव घेणाऱ्या वेगात केंद्रच हुकतं. माणूस धापा टाकतो. पूर्वीची नियतीची जागा आता या मानवग्रासी वेगानं घेतली आहे. या धावपळीत विजयी वीरदेखील केंद्र हरवल्यानं अपेशीच असतात. मानवी मन अस्वस्थ असतं. ते स्वतःला चकवतं, दुसऱ्याला चकवतं, नि मग वंचनेलाही विटतं. नाहीतर ते क्षणप्रेमी बनतं. क्षणाक्षणात भरलेल्या अलगअलग सुखाच्या गोळ्या गिळून ते उत्तेजित होऊन जगतं.

धार्मिक, आर्थिक, सामाजिक आणि लैंगिक व्यवहार हे माणसाच्या मनाच्या शुद्धाशुद्धतेवर अवलंबून असतात. माणूस हाच सर्व व्यवहारांचा निर्माता, साक्षी आणि निर्णायकदेखील असतो. सर्व सुसंगत-विसंगत जीवनानुभवांना वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर एकत्र आणताना ही भूमिका एक आकार देत असते. जितका हा आकार स्वच्छंद, तितकी नीतीची जाण तरल आणि सर्वस्पर्शी बनत जाते. कारण इथं आता मूल्य जन्म घेत असतं. मूल्य हे विचारांच्या जगात फार महत्त्वाचं असतं. कारण त्याच्याशी तर व्यक्तीच्या व समूहाच्या अनुभवाचं सूत्र अनुस्यूत असतं. मूल्य हे भावनांची लय साधतं, विचारांचा तोल राखतं आणि माणसाच्या व्यक्तिगत कृतिउक्तींतूनदेखील त्याच्या समाजाच्या स्थितिगतीचं दिग्दर्शन करू शकतं.

या संमेलनाचे एक पूर्वीचे अध्यक्ष औंधचे राजे भवानराव पंतप्रतिनिधी होते. राजेराजवाडे अध्यक्ष कसले? हा सूर पुष्कळदा ऐकू येतो. आणि त्यात वावगं नाही. परंतु त्यातही त्यांच्या कर्तुत्वाची छाननी कधी निसटून जाते. याच राजेसाहेबांनी अखेरच्या काळात आपलं आत्मचरित्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी राजघराण्यातली मुलं का बिघडतात त्याचं अतिशय उघडंनागडं दर्शन केलं होतं. पंसवीस-तीस वर्षांपूर्वी तर असं लिहिणं म्हणजे परम अश्लील होतं. आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यातले असंबद्ध उतारे वृत्तपत्रांत अत्यंत कुटाळकीच्या स्वरूपात इतस्ततः अवतरले. त्याचा परिणाम ते पुस्तक कायमचे जप्त होण्यात झाला.

मी ते पुस्तक वाचलेलं आहे. सत्यस्थितीचं वास्तव व विदारक दर्शन त्यात आहे. परंतु लोकांच्या भावना चाळवण्यासाठीच जी चावट पुस्तकं लिहिली जातात, त्यांत राजेसाहेबांच्या या कृतीची गणना करणं अन्यायाचं होईल. त्या लेखनात लेखनाची शिस्त आणि शैली नसली तरी पोटतिडीक आहे आणि चित्रकला, इतिहास वगैरे विषयांत गती असलेल्या, सामाजिक प्रगतीची जाणीव असलेल्या एका पुरुषानं स्वतःच्या अनुभवांचं व विचारांचं आलेखन करण्यासाठी ते लिहिलेलं आहे. लोकांच्या मनाला उबग आणतील, हादरा देतील व स्वतःची सामाजिक प्रतिष्ठाही उणावेल असं प्रामाणिक लेखन एखाद्या संस्थानिकानं करणं ही मुळातच एक प्रचंड घटना होती. लहान संस्थानिकांच्या जीवनात असणारे ताणतणावे इथं दिग्दर्शित होतात. कला, न्याय, शरीराचं आरोग्य या विषयांत प्राण ओतून काही घडावं यासाठी धडपडणाऱ्या या राजानं स्वतःच्या आयुष्यातलं भलंबुरं न लपवताना आपलं जीवन झाडामाडासारखं जनतेपुढं ठेवलं. बालमानसशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ व राजकारणाचे अभ्यासक यांनाही हा वृत्तांत उपयुक्त असाच होता. पण आमचे अपसमज आडवे आले. मानवी सोवळेपणाला तो प्रामाणिक आलेख बळी पडला. अश्लीलतेचा भयंकर बभ्रा झाला. आणि या पुस्तकावर बंदी आली ती अजून उठली नाही.

या गोष्टीचा मी उल्लेख केला तो अशासाठी की, इतक्या त्रयस्थ वृत्तीनं आत्मचरित्र सहसा कुणी लिहीत नाही. समाजाला त्यामुळे बोध व्हावा ही तळमळदेखील क्वचितच आढळते. आपल्याकडची आत्मचरित्रं बहुशः एकांगी व आत्मविसंगत असतात. पुष्कळांची शैली चांगली असते. पण शैली म्हणजे सत्य नव्हे. राजकारणी पुरुषदेखील आत्मचरित्र लिहिताना प्रामाणिकपणा पाळीत नाहीत. त्यांच्यात दृष्टीचाही अभाव अनेकदा आढळतो. आपण कसे घडलो, आपल्याला आपल्या त्रुटीमुळे अगर बाह्य परिस्थितीमुळे काय भोगावं लागलं, ते ते सांगत नाहीत. त्यांच्यात न्यायीपणाच आढळत नाही. स्वतःची प्रतिमा घडवण्यासाठीच लोक झटत असतात. अपवाद फक्त गांधींचा.

आता राजेरजवाडे उरलेले नाहीत. परिस्थितीत बदल झालेला आहे. लैंगिक गोष्टींकडे पुष्कळच सामजस्यानं पाहिलं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ह्या पुस्तकाचं पुनर्मुद्रण प्रौढांसाठी होणं आवश्यक आहे.

एकेकाळी अश्लीलतेचं बळी झालेलं हवलॉक एलिसचं 'सायकॉलॉजी ऑफ सेक्स' हे सप्तखंडात्मक पुस्तक आज अगदीच मंद, मर्यादांतर्गत वाटतं. फ्रॉइड वाचून आता कुणाला धक्का बसत नाही. हा काळाचा महिमा आहे. कारण विज्ञानयुगात ज्ञानाच्या कक्षा अपरिहार्यपणे वाढल्या आहेत.

एखाद्या कृतीला अश्लील म्हणून किंवा अन्य साहित्येतर कारणांनी त्याज्य ठरवलं व तिच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींना शासन करून ती कृती लोकांच्या दृष्टिआड करून तिच्याविषयी भल्याभल्यांनी बोभाटा केल्यानं ती त्याज्य होते असं नाही. कालाचा निर्णय नेहमी बदलत असतो. याचं उत्कृष्ट उदाहरण पाश्चात्य कादंबरीकार जेम्स जॉइस ह्याच्या कादंबऱ्यांचंच आहे. 'गटार' म्हणून सज्जनांनीही त्या काळी वर्णिलेली 'युलिसिस' ही त्याची कादंबरी प्रथम मार्गारेट अँडरसन या संपादिकेनं अमेरिकेत 'लिटल रिव्ह्यू'त प्रसिद्ध केली. खटला, दंड वगैरेंना ती कचरली नाही. यानंतर टीकाकारांचंच नव्हे तर लोकमतदेखील पालटलं. आज जोसेफ कँबेल हे अतिशय गंभीर लेखन करणारे विद्वान आपल्या 'मिथ्स टु लिव बाय' या ग्रंथात म्हणतात की, विसाव्या शतकातला सर्वांत प्रतिभाशाली लेख जेम्स जॉइस असून त्याला नोबेल प्राईज मिळालं नाही. १९३० साली त्याची 'फिनेग्न बेक' ही कादंबरी अनाकलनीय म्हणून निकालात काढण्यात आली. पण त्या कादंबरीची सहीसही भ्रष्ट नक्कल करणाऱ्या 'द स्किन ऑफ द टीथ' या कादंबरीबद्दल थॉर्नटन वाइल्डर या लेखकाला मात्र पुलित्झर प्राईज मिळालं.

याबाबतीत राजवाड्यांची साक्ष देखील महत्त्वाची ठरते. 'कादंबरी' या निबंधात ते म्हणतात :
जाज्ज्वल्य मनोवृत्तीशिवाय कादंबरी होणार नाही. कादंबरीकाराने समाजाची इच्छा काय आहे ते समजून घेतले पाहिजे; त्याचे स्वरूप जाणले पाहिजे.
कादंबरीकार आपल्या कामाला जारीने लागला की, लहान मुलांना पशु-पक्ष्यांच्या गोष्टी सांगून त्यांच्या मनात तो युक्ती व साहस यांचे बीजारोपण करील; स्त्रीजनांना संसारसुखाची गुरुकिल्ली पटवील; तरुणांना राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेचे रहस्य कळवील; आणि वृद्धांना आयुष्याच्या इतिकर्तव्यतेचे दिग्दर्शन करील; आणि इतकेही करून ते कसे व केव्हा केले हे कोणाला समजून देणार नाही. अशी या मयासुराची करणी आहे. युधिष्ठिराप्रमाणे ती ज्या लोकांना साधली ते लोक धन्य होत.

राजवाडे कादंबरीकाराला कुठलाही अविषय नाही याबद्दल सांगताना,
समाजातील नीतीने, वर्तनाने, विचाराने, राहणीने व दारिद्र्याने गलिच्छ असा जो भाग त्याचे प्रदर्शन करणे सत्कादंबरीचे काम नव्हे.
असा सामान्य समज सांगून ते म्हणतात की,
परंतु असा समज निसर्गाच्या विरुद्ध आहे. उजेड आणि अंधार, ईश्वर आणि सैतान, चांगले आणि वाईट, सद्गुण आणि दुर्गुण ह्या जोड्या ब्रह्माने सृष्टीच्या प्रारंभापासूनच निर्माण केल्या आहेत. त्यांपैकी एकीचा निषेध कोमल मनाच्या कादंबरीकारांनी केला म्हणजे ती नाहीशी होते असे थोडेच आहे? डोळे गच्च मिटून धरले म्हणून अस्वल अंगावर चालून यावयाचे थोडेच राहते? तेव्हा समाजातील हा जो पतित भाग आहे, त्याच्या स्थितीचे प्रदर्शन करणे हे प्रत्येक कादंबरीकाराने आपले आद्य कर्तव्य समजले पाहिजे. श्रीमंतीत अंध झालेल्या राष्ट्रातील कादंबरीकारांना तसे वाटले तर खुशाल वाटो. परंतु हिंदुस्थानातील व महाराष्ट्रातील कादंबरीकारांना तसे वाटून परिणाम लागावयाचा नाही. ह्या देशातील दारिद्र्याने गांजलेल्या, रोगाने पीडलेल्या, विद्येने मागासलेल्या सामान्य जनसमूहाचा कैवार सहृदयतेचे मूर्तिमंत पुतळे जे कादंबरीकार त्यांनी घेतला नाही तर दुसरा कोण घेईल? लोकांची खरी स्थिती लोकांच्या मनात यथास्थित बिंबविण्याला कादंबरीसारखे दुसरे साधन नाही.

कादंबरीत अद्याप संविधानाला महत्त्व आहे. संविधानात काहीतरी मूलाधार  प्रसंग असतात. या प्रसंगांचे किती आद्य प्रकार किंवा आकृतिबंध संभवतात? जर्मन कवी गटेनं असे प्रकार एकंदरीत छत्तीसच असतात असं नमूद केल्याचं आर्थर कोइस्लर 'अॅक्ट ऑफ क्रिएशन' या ग्रंथात सांगतात व ते आपल्याला मान्य असल्याचंही काही उदाहरणं देऊन सांगतात. या मूलबंधांच्याच विविध पर्यायांची आवर्तनं अद्यापही कादंबरीत आढळतात. कादंबरी अजून त्या पलीकडे गेलेली नाही असं मत त्यांनी नमूद केलं आहे. हे बऱ्याच प्रमाणात खरं असलं तरी आधुनिक कादंबरी आता संविधानकाच्या साच्यातून सुटण्याचा प्रयत्न करते आहे यात शंका नाही.

शिष्ट किंवा प्रमाण अगर लेख्य भाषा हीच काय ती सौंदर्यपूर्ण व अभिव्यक्तीसाठी उचित भाषा आणि बोलीभाषा अगर ग्रामीण भाषा ही अभिव्यक्तीला कमीपणा आणणारी भाषा - असं आजही काही संस्थांच्या व्यासपीठांवरून बोललं जातं, ते पाहून आश्चर्य वाटतं. शिष्ट भाषा व बोलीभाषांचं अभिसरण साहित्यिक वातावरणाला पोषक आहे, मारक नाही. अशिष्ट भाषेचं शिष्टीकरण कसं होतं ते डॉक्टर केतकरांनी पूर्वीच सांगितलं आहे. पण शिष्ट भाषादेखील सदैव बदलत असते. चिपळूणकरांचं मराठी त्या काळी अत्यंत सुंदर होतं. पण आज ते पुरं पडणार नाही व तेवढं आकर्षकही वाटत नाही. पोषाखाप्रमाणे भाषादेखील सतत बदलत असते. बदल हाच भाषेचा स्वभाविक धर्म आहे. भाषा अनुभवाला अनुसरते आणि अनुभव तर सतत वेगवेगळ्या रूपांत येत असतो.

परंतु शिष्टाचाराप्रमाणे शिष्ट अगर प्रमाणित भाषा उचलण्याकडेच लोकांचा कल असतो. बोलभाषेत कितीही लिहिलं आणि प्रमाणित भाषेनं लोकभाषा कितीही आत्मसात केली तरी जिथं असंदिग्ध, विदग्ध आणि शास्त्रीय अभिव्यक्ती लागते, तिथं प्रमाणित भाषाच काय ती उपयुक्त होते व ती टिकूनही राहते.

शास्त्रीय वाङ्मय तर याच भाषेवर जगभर अवलंबून आहे. त्याला पर्याय नाही. लोकांच्या ज्ञानाची कक्षा वाढते तसं प्रमाणित वाङ्मय लोकांना दूरचं किंवा सोवळं वाटत नाही. शास्त्रकाराला तर काहीच परकं नसतं. नाटक, कथाकादंबऱ्या व कवितांत मात्र बोलभाषेचा वापर अधिक वास्तवपूर्ण व प्रत्ययकारी होतो यात शंका नाही. परंतु एवढं मात्र खरं की, भाषेचे हे दोन स्तर परस्परपूरक आहेत.

विज्ञान आणि साहित्य यांचे संबंध अतूट असायला हवेत. कारण विज्ञान नवी क्षितिजं स्पर्शीत आहे आणि सर्व तऱ्हेच्या साहित्यात नवी क्षितिजं यावीत ही आजची प्राथमिक गरज आहे. मानवाच्या भवितव्याची चाहूल या जाणिवेतून लागायची आहे.

धर्मात श्रद्धा मूलभूत असते. धर्मानं आजवरच्या साहित्याला प्रेरणा दिली आहे. त्याची जागा विज्ञान घेईल काय असं अनेकांना वाटतं. पण तसं पाहिलं तर विज्ञानातदेखील श्रद्धा असतेच. आणि सत्याची तीव्र जाणीव ही श्रद्धा निर्माण करीत असते. विज्ञानाचा हेतू श्रद्धामयता नसतो हे खरं असलं तरी सत्यावाचून धर्म, कला, विज्ञान नाही - तसंच साहित्यही नाही.

विज्ञानात वैश्विक दृष्टी अभिप्रेत असते. ते प्रासंगिक व प्रादेशिक नसतं. साहित्यात भाषाच ठरीव लोकसमूहाची प्रातिनिधिक असल्यानं ते सदैव प्रादेशिक पोशाख घालून बसलेलं दिसतं. पण त्यातली ती मर्यादा त्याच्यातल्या वैश्विक जाणिवांमुळेच नाहीशी होण्यासारखी आहे. भाषा कुठलीही असो, जोवर लेखक शास्त्रपूत वैश्विक दृष्टी ठेवून लेखन करतो, तोवर ते लेखन योग्य दिशेनंच वाटचाल करतं व योग्य तो परिणाम साधू शकतं.

विज्ञानाच्या विकासाबरोबर मानवाच्या अहंकाराला हादरे बसू लागले. कोपर्निकसनं प्रथम आपल्याला जाणीव करून दिली की, मानव काही विश्वाचं केंद्र नव्हे. दुसरा हादरा मानवाचा अनुल्लंघनीय पाशवी आविष्कार दाखवून डार्विननं दिला. मानवाचं अस्तित्व भविष्यकाळी लोप पावण्याचा संभव असल्याचं त्यानं दाखवून दिलं. आणि फ्रॉइडनं तर जबरदस्तच तडाखा हाणला. मानवी अहंकाराला त्यानं दाखवून दिलं की, 'बाबा, ज्या मनोभूमीत तू राहतोस, तिच्यात क्षणोक्षणी घडणाऱ्या गतिशील हालचालींचं - ज्या हालचालींवर तुझी नियती अवलंबून आहे - तुला यत्किंचितदेखील ज्ञान नाही.'

तेव्हापासून माणूस आपले मनोव्यापार भयग्रस्त होऊन तपासू लागला. ही भाराक्रांत अवस्था पाश्चात्य कादंबरी-वाङ्मयात फ्रॉइडमुळेच आविर्भूत झाली. एकोणिसाव्या शतकातल्या कादंबरीशी नव्या कादंबरीचं कुठंच जुळत नाही. तसं पाहिलं तर ही नवी कादंबरी जुन्या ठसठशीत कादंबऱ्यांप्रमाणे मनोरंजक नसते. तिला संविधान नसतं. विश्लेषण मात्र भरपूर असतं. ह्या कादंबरीच्या मानसशास्त्रीय बैठकीमुळे सवंग लोकप्रियता हे बाह्य मूल्य आपोआपच तिच्यापासून दूर राहू लागलं. आणि काही अस्वस्थतेचा शोध घेणाऱ्यांनाच तिच्यातलं मूल्य ओळखता येऊ लागलं. आपल्याकडेही केंद्र हरवलेल्या माणसाची चित्रणं आता कुठं सुरू होऊ लागली आहेत. भाऊ पाध्ये, चिं. त्र्यं. खानोलकर, जयवंत दळवी वगैरे लेखक असा प्रयत्न करताहेत. पण अजून त्यांच्या कृती यशस्वी होण्याइतकं सामर्थ्य त्यांच्यात आलेलं नाही. अनेक लेखक जेव्हा नव्या प्रवाहात स्वतःला झोकतात, तेव्हा एखाद्यालाच कालांतरानं सिद्धी प्राप्त होते. कारण मनुष्य काय आहे आणि मानव्य अंगी येणं म्हणजे काय आहे हे दोन प्रश्न, विल्यम सॅडलर 'एक्झिस्टन्स अँड लव' या ग्रंथात म्हणतात त्याप्रमाणे, आताच्या लेखकांपुढे येत राहतात. सामाजिक मानसशास्त्राच्या आधारे आता आपण मानवप्राणी आणि त्याच्या जीवनाचं उद्दिष्ट यांचा विचार करायला उद्युक्त होत आहोत.

माणसा-माणसांतले परस्परसंबंध, क्रिया-प्रतिक्रिया, प्रेरणा आणि उद्गार यांच्यातली नवी नाती आपण नव्यानंच हुडकतो आहोत. तत्त्वज्ञानदेखील एक शास्त्रच आहे. मानवाच्या ध्येयसृष्टीविषयी, त्याच्या वैयक्तिक आणि समष्टियुक्त जीवनातल्या सुसंगती आणि विसंगतींबद्दल हे शास्त्र आपल्याला आता नव्या वाटा दाखवतं आहे.

नवी क्षितिजं निर्माण करण्याची आत्यंतिक गरज आज विज्ञान आपल्याला पटवून देतं आहे.

कुठल्याही लेखकाला आपापल्या विषयाचं शास्त्रीय आकलन काही प्रमाणात तरी असल्याशिवाय त्याचं आज निभणार नाहीी.

वैज्ञानिक कथाकादंबऱ्यांची आज नितांत गरज आहे. दि. बा. मोकाशी, नारायण धारप वगैरेंनी अशा स्वरूपाच्या काही कथा दिल्या आहेत. त्या सद्यःपरिस्थितीत आपण स्वीकारतोच आहोत आणि असे प्रयत्नही होतील तेवढे व्हायलाच हवेत. परंतु मराठीत वैज्ञानिक कथेचं खरंखुरं क्षितिज जर कुणी प्रथमच खोललं असेल तर ते डॉक्टर जयंत नारळीकरांनी. ते स्वतः विश्वविख्यात वैज्ञानिक आहेत. त्यांचं मी स्वागत करते आणि त्यांना मनःपूर्वक यश चिंतिते.

'द इल्यूजन'मध्ये डेव्हिड काउटे (Caute) म्हणतात, ''आजच्या लेखनाचं वैशिष्ट्य हे की उद्गारपूर्व अनुभव, 'मी'च्या जाणिवेपूर्वीचा अनुभव शब्दांकित करण्याचा प्रयत्न. 'मी'ला आपल्या साक्षित्वाची अगर भावनांची जाणीव होण्यापूर्वीचा हा क्षण असतो.''

दुर्बोधता इथं अटळ असते. आक्षेप येण्याचा संभवही खूपच असतो. रंजकतेपासून हे साहित्य दूर असतं.

पण वास्तवाची पकड ते सोडीत नाही. वास्तव म्हणजे काय तर तपशिलाला सत्यपणा, आणि प्रातिनिधिक आणि वैशिष्टयपूर्ण पात्रांचं वैशिष्ट्यपूर्ण प्रसंगांतलं सत्य चित्रण.

हे करायचं तर लेखकाचा मानसशास्त्राशी चांगलाच परिचय हवा.

कथाकादंबरी वाङ्मयात - अगर चरित्रलेखनातही - पात्रांचे व्यवसायानुसार व स्वभावानुसार ठसेच बनत असतात. विसाव्या शतकात दुभंग अगर भग्न व्यक्ती दाखवण्याची प्रथा बळावलेली आहे, यात शंका नाही. माणूस माणसाला कणाकणांनी हुडकतो आहे. नि समग्र मानव त्याला आढळत नाही. पूर्ण मानव कसा असावा याची कल्पना नसली तरी अपेक्षा त्याला आहे. मग पुरातन काळातले आदर्श तो घेतो, त्यांत नवे नमुने करतो. कधी लहान आणि अपवादांनीच गांजलेल्या लहानांनाच तो मोठं परिमाण देतो किंवा चक्क अ-नायक उभे करतो.

भग्न व्यक्तित्वाचे ठसे आपल्या कथाकादंबऱ्यांत नुकतेनुकतेच रुजू घातले आहेत. खानोलकरांची सर्वच पात्रं लैंगिक विकृतीनं पछाडलेली आढळतात. या पात्रांतल्या विकृती निसर्गनिर्मित असतात. जयवंत दळवींची पात्रं अनेकदा परिस्थितीनिर्मित असतात. 'स्वगत' ही कादंबरी त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. आता तर त्यांनी साऱ्या अर्धवट अगर पूर्ण वेड्यांच्याच दुःखपूर्ण जाणिवा-नेणिवा रेखाटल्या आहेत. विजय तेंडुलकर आपल्या नाटकांत लैंगिक हिंसाचार दाखवतात. अर्थात त्या कुठल्याही कृतींना अद्याप ते-ते माणसाचे उत्कृष्ट नमुने बनवून कथेला समाधानकारक कलाकृतीचं स्वरूप देता आलेलं नाही. अजून आमचे लेखक चाचपडतच चालले आहेत. असे नमुने कलापूर्ण करायला कालावधी लागतो, व सामुदायिक जाणदेखील लागते. 'मला प्रेमकथा लिहिता आली नाही, कारण प्रेमाची भाषा अद्याप मराठीत घटलेली नाही' असं डॉक्टर केतकर म्हणायचे. सराईत दृष्टीखेरीज निर्मिती होत नाही हे सत्य आहे.

परंतु काही स्वभाववैशिष्ट्यांबद्दल या मंडळींना अंदाज चांगलाच लागला आहे यात शंका नाही.

पण राजकीय कादंबरीत मात्र अद्यापि कामगार चळवळीखेरीज दुसरं कथानक क्वचितच येतं. स्वतंत्रपणं राजकारणाचं शास्त्र जाणल्याखेरीज आणि अशा जटिल पार्श्वभूमीवर राजकारण्याचं चित्र रेखाटताना त्याच्या स्वभावाचा केंद्रबिंदू कुठला, हे अद्याप आमच्या कादंबरीकाराला अगर नाटककाराला व्यवस्थित उमगलेलं दिसत नाही. पाश्चात्य कादंबरीत ते तंत्र बरोबर बसून गेलं आहे. मानसशास्त्राची गहन प्रमेयं तिथल्या लेखकांनी अवगत केल्यानं त्यांना राजकारणी पात्राची उभारणी तिथल्या पार्श्वभूमीवर मुक्तपणे रंगवता येते.

अँथनी स्टोर यांनी 'द डायनॅमिक्स ऑफ क्रिएशन'मध्ये अशा माणसाची मनोभूमी विशद केली आहे. ती अशी :
महत्त्वाकांक्षी माणसं असतात त्यांना कामाशिवाय घटकाभरदेखील राहता येत नाही. त्यांना रिलॅक्सेशन माहीतच नसतं. त्यांना वैयक्तिक संबंधांकडे लक्ष द्यायलाही फावत नाही. कलावंतापेक्षा मुत्सद्दी आणि उद्योगपती यांच्यात या प्रवृत्ती अधिक असतात असं सायकिअॅट्रिस्ट्सना आढळून आलं आहे..... राजकारणी पुरुष जागा असलेला सर्व वेळ कार्यात व्यग्र असतो.
... ज्यांना सारा वेळ काम करीत राहायची मानसिक गरज असते, त्यांना राजकारणाचं जीवन आदर्श असतं. राजकारणी माणसं अंतर्गत असुरक्षिततेच्या जाणिवेमुळेच सत्ता काबीज करायला बघतात. व्यक्तिगत संबंधांतून पोसलं जाणारं आत्मभान बाजूला सारून त्याच्या जागी ते बाह्य कार्यव्यापृततेचा वापर करतात.

आता आपल्याकडे राजकारणी पुरुषाच्या या मुख्य वैशिष्याचीच जाण नसल्यामुळे, अगर असल्यास ती प्रकट करणं सोयीचं नसल्यामुळे, शिवाजी, माधवराव पेशवे ते टिळक यांच्यापर्यंत ढोबळ व्यक्तिपूजेसाठी कादंबरीनिर्मिती झाली आहे. राजकीय हालचालींचा व व्यक्तींचा यथातथ्य मागोवा घेणाऱ्या चरित्रात्मक वाङ्मयाची आपल्याकडे वाण आहे. तरी आता ती भरून निघण्याची सुचिन्हं कुठं कुठं दिसत आहे. उदाहरण वि. श्री. जोशी यांनी लिहिलेल्या वासुदेव बळवंत व चाफेकर बंधूंच्या चरित्रांचंच आहे. आता कुठल्याही कादंबरीकाराला लेखन करायला हा कालखंड उपलब्ध झाला आहे.

राजकीय व्यक्तीच्या चित्रणाकडे वरील शास्त्रपूत दृष्टिकोनातून पाहिल्यास आता राजकीय माणसाचा असा नमुनाही सद्यःपरिस्थितीत लेखनावर बंधनं आलेली असताना लेखकाला करता येत नाही. राजकारणाच्या चर्चेची समस्त दालनंच बंद झाल्यावर व्यक्तिचित्रण कुठलं? डोळ्यांसमोर घडणाऱ्या घटनांना आम्ही साहित्यबद्ध करू शकत नाही. साहित्याची ही अपरिमित हानी आहे. आधी विसावं शकत मागच्या सर्व शतकांपेक्षा मानवाला अधिक उत्तेजित करणारं, क्षोभांनी भरलेलं शतक आहे. ज्ञानाची क्षितिजं हरघडी रुंदावताहेत. हिंसाही वाढते आहे. जग एकत्रित होऊ पहातं आहे आणि देशांची शकलंही पडताहेत. त्याचे परिपाक डोळ्यांसमोर आहेत. पण त्यांचं वर्णन सत्ताधीशांच्या केवळ गुणगौरवाखेरीज आपल्याला करता येत नाही. ही अपरिमित हानी आहे. आत्ताच कुठं आमचा लेखक विविध क्षेत्रांतल्या लहान-मोठ्या घटना व व्यक्ती यांना अपुऱ्या ज्ञानानं का होईना पण चापसून पाहू लागला होता. राजकारणाला हात घालावा असं आता आताच कुणाच्या क्वचित मनात येत होतं. गंभीर वृत्तीनं राजकारण्यांकडे बघावं हे कुतूहल निर्भर होतं. त्याच सुमारास बंधनं आली की विचारांचा ओघच खंडित होतो. नुकतंच ऐकलं की विजय तेंडुलकर व जयवंत दळवी यांची राजकीय समस्यांना किंचित स्पर्श करणारी नाटकं अडकून पडली आहेत.

मानवाला अनेक दुःखं भोगावी लागतात. अनेकांची दुःखं मुकी पण खोल असतात. त्यांना वाचा देणं हेच साहित्यिकाचं कार्य असं कामू म्हणतो. परंतु आपल्याकडे साहित्यिकांनी अशा प्रचंड दुःखांना वाचा पुरवली नाही. त्यांना वाचा दिली ती महात्मा गांधींनी व तीही राजकीय पार्श्वभूमीवर. तेव्हापासून आमच्याकडे राजकारण आणि साहित्य ह्यांचं कार्य अतूट झालं आहे. म्हणूनच साहित्य हे आता राजकारणापासून तोडता यायचं नाही. परस्परसंबंध व सामंजस्य हे दोन गुण अशा साहित्याचं व्यवच्छेदक लक्षण समजले पाहिजेत.

तेव्हा सांगायचा मुद्दा असा की, भारतातल्या लेखकाला लेखनावर जगण्यासारखी परिस्थिती अजून आलेली नाही. बहुसंख्य लेखकांना जगण्यासाठी दुसरे साहित्येतर उद्योग करणं भागच पडतं. हे तर मोठंच बंधन त्यांच्यावर कायमचं आहेच. ते पत्करल्यावर आपल्या या चिमुकल्या विश्वात त्यानं आणखी काही बंधनं लादून घेणं उचित नाही. तसं झालं तर त्यांच्या अस्तित्वाचाच लोप होईल.

मराठी लेखकांना मी काय संदेश देणार? संदेश तर दरिद्री संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांनी पूर्वीच दिलेला आहे. शिवाजीमहाराजांसारख्या लोकोत्तर राजानं भेटीला या असं म्हटलं तेव्हा त्यांनी जे म्हटलं, तोच संदेश आम्ही शिरोधार्य मानावा - 
तुम्हांपाशी आम्ही येऊनियां काय। 
वृथा सीण आहे चालण्याचा।।

सतराव्या शतकात तुकाराममहाराजांनी सांगितले त्याच तऱ्हेचे विचार विसाव्या शतकातदेखील उमटल्याशिवाय राहिलेले नाहीत. पण त्यांची दिशा वेगळी आहे. मानवी सामाजिक प्रतिष्ठा माणसाच्या कामी येत नाही, थोरामोठ्यांपुढे धावून माणसाला फारसं काही गाठता येत नाही, असा अनुभव आधुनिक विचारवंतांनी घेतला आहे. आता तुकारामासारखा संदेश देणं लेखकाला परवडणारं नाही. नीत्शेनं मानवाचं एकटेपण अटळ आहे हा शोकसूचक सूर काढला. त्याचेच सादपडसाद माणसाच्या एकलेपणाच्या विविध स्वरूपांच्या निर्मितीत उमटलेले दिसतात. पूर्णपुरुष कृष्ण आज आम्हाला उपयोगी पडायचा नाही हे मी याच अर्थानं म्हटलं होतं. हा माणूस कितीही गुणी असला तरी त्याची धडपड त्याचं एकटेपण घालवू शकत नाही. मानसशास्त्रज्ञांनी माणसाच्या मनाचे जे गूढ खेळ आहेत, ते याच पार्श्वभूमीवर चितारलेले आहेत. आधुनिक लेखक माणूस इतका हिंस्र, दुबळा स्खलनशील का दाखवतात - या प्रश्नाचं उत्तर या पार्श्वभूमीतच सापडतं.

शोकात्मकतेच्या अटळतेचा भाव आधुनिक वाङ्मयाचं एक प्राणभूत तत्त्वच झालेलं आहे. हे निर्मितीचं बीज आहे. माणसाच्या नियतीतच विनाश आहे ही दुःखपूर्ण जाणीव हाच विसाव्या शतकातल्या साहित्याचा स्थायी भाव आहे. या स्थायी भावामुळे माणूस अलिप्त आहे आणि तो स्वतःची धारणा मूल्यमापनासाठी वापरतो हे दिसून येतं. रवींद्रनाथांनीदेखील 'एकला चलो रे' असं म्हटलं आहे, ते उगीच नव्हे.

या सर्वांतून एक गोष्ट प्रतीत होते ती अशी की जो निर्माणकार आहे, त्याला निर्मितीसाठी एकटंच जाणं प्राप्त होतं. त्याची व्यथा, वेदना, शोक, सारं काही त्यालाच सोसावं लागतं. जीवनातल्या संकटांबरोबर झुंजताना तडजोड त्यानं केली तर कदाचित भौतिक स्वास्थ्य त्याला मिळेल. कदाचित मानसिक निर्धास्तपणा मिळेल. पण निर्मिती कोंडून त्याला सुख निश्चित मिळणार नाही आणि मोठ्या श्रेयाला तो मुकेल. पुढच्या पिढ्यांच्या भवितव्याचीच हानी तो करील.

१८ नोव्हेंबर १९७५
***

दुर्गा भागवत (१० फेब्रुवारी १९१० - ७ मे २००२ )
(फोटो - महाराष्ट्र टाइम्स : 'मैफल' पुरवणी : रविवार, ६ फेब्रुवारी २०००)