Sunday 21 April 2013

वेश्यावस्तीतली आई आणि फोटोग्राफर मुलगा । दोन कविता

एखाद्या सभ्य माणसाला कशाबद्दल बोलताना सर्वाधिक आनंद होईल? < उत्तर : स्वतःबद्दल. < बरंय, तर मग मीही स्वतःबद्दलच बोलत जाईन. : या दस्तयेवस्कीच्या 'नोट्स फ्रॉम अंडरग्राउन्ड' कादंबरीतल्या शब्दांचा आणि त्या कादंबरीचाही संदर्भ 'रेघे'वर मागे एकदा माध्यमांसंबंधी येऊन गेलाय.

एका पातळीवर माध्यमं आता व्यक्तीला जोडली जातायंत आणि 'स्वतः'भोवती फिरतायंत. पण स्वत:बद्दल काय बोललं की आनंद होईल ते आधी ठरवूनच माध्यमातून ते व्यक्त केलं जात असावं. किंवा काय बोलल्यावर लोकांकडून आपल्याला आनंद मिळेल तेही आधी ठरवलं जात असेल. 

शंकर सरकार
शंकर सरकारने स्वतःबद्दल आणि स्वतःच्या आईबद्दल फोटोग्राफीच्या माध्यमातून बोलताना आतमधून काय ठरवलं  असेल त्याची कल्पना आपल्याला येऊ शकत नाही. शंकरची आई वेश्याव्यवसाय करत असे. 

कविता सरकार यांना ओडिशातल्या माल्कनगिरीमधून कोलकात्यातल्या सेठबागान परिसरात आणलं गेलं आणि या 'रेड लाइट एरिया'  म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात त्यांना शरीरविक्री करावी लागली. त्या ओडिशात असतानाच शंकरचा जन्म झाला होता. अगदी सुरुवातीची वर्षं तो ओडिशातच होता. पण तीन वर्षांचा असताना तो आपल्या आईच्या शोधात आजीच्या सोबत कोलकात्यात आला. दोन महिन्यांच्या शोधानंतर त्यांना कविता यांचा पत्ता सापडला. मोठं होत जाताना शंकरला आपली आई आणि तिचा व्यवसाय यांच्याबद्दल मनात गोंधळाची भावना निर्माण होत गेली. ही भावना त्याने तपासायला सुरुवात केली ती कॅमेऱ्याच्या लेन्समधून आणि त्यातून त्याला आईशी नव्यानं भावनिक बांध जोडता आला.

साधारण २००० सालच्या आसपास सेठबागान परिसरातल्या मुलांना फोटोग्राफीच्या मदतीने व्यक्त होता यावं यासाठी  'युनिसेफ'ने उपक्रम राबवला. त्यात सहभागी झालेल्या शंकरने तेव्हापासून आपल्या आईचे फोटो काढायला सुरुवात केली. आता शंकर बावीस वर्षांचा आहे. त्याच्या छायाचित्रांची प्रदर्शनं देशात आणि परदेशातही भरून गेली. आता त्याची आई वेश्याव्यवसाय करत नाही.

शंकरचे फोटो आपल्याला 'गल्ली'वरती 'फेसिंग वन्स ओन' या शीर्षकाखालच्या फोटोमालिकेत पाहता येतील. काही फोटो 'रेघे'वरच्या नोंदीत वापरण्यासंबंधी आपण केलेल्या विचारणेला शंकरने आनंदाने परवानगी दिल्यामुळे खाली त्याचे काही फोटो देतो आहे.


शंकरची आई, सेठबागान परिसरातील इमारतीजवळ उभी असताना, जानेवारी २०००



''माझ्या आईशेजारी झोपलेला इसम माझे वडील नाहीत. मी त्यांना 'काका' म्हणतो.''
जानेवारी २०००




''आई आणि काकांनी आयुष्य असं सोबतीनं घेतलं होतं.''


शंकरही आपल्या आईला विकतोय, असे आरोप त्याच्यावर केले जातात. पण त्याच्या आईचा त्याला पाठिंबा आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो फोटोंच्या माध्यमातून ही गोष्ट सांगतो, कारण त्याला माहीत असलेली हीच सगळ्यांत मोठी गोष्ट आहे. ही गोष्ट त्याला अजूनही कधी कधी स्तब्ध करून सोडते. ('तेहेलका'मधला लेख). कविता सरकार आता कापडनिर्मिती कारखान्यात काम करतात.

''या सहा बाय सहाच्या खोलीत आम्ही झोपतो, आई जेवण बनवते, आम्ही जेवतो.'' (जुलै २०१०)


''माझी आई कविता सरकार, माझे काका आणि आमचे शेजारी.'' जून २०१२


'मी आणि माझ्या आईमधला कॅमेऱ्याच्या माध्यमातून साधलेला हा संवाद आहे', असं शंकर म्हणतो. आपल्या भावना या फोटोंमध्ये साठवलेल्या आहेत, असं सांगून तो म्हणतो, ''मी लहान असतानापासून आईचे फोटो काढायला सुरुवात केली. हे सगळं मी, आई आणि आम्ही राहतो ती जागा यांनी व्यापलेल्या एखाद्या प्रकल्पामध्ये पूर्णत्वाला जाणार आहे याची मला कल्पना नव्हती.'' ('संडे गार्डियन'मधला लेख.)

शंकरची आई कविता सरकार, त्यांनी पाळलेला पिंजऱ्यातला पोपट आणि एक मुलगी. सप्टेंबर २०११

'फोटोग्राफीचा तुला उमजलेला अर्थ काय?' असा प्रश्न आपण 'रेघे'मार्फत शंकरला विचारला, त्यावर तो म्हणाला, ''फोटोग्राफी हा माझा जग धुंडाळण्याचा मार्ग आहे. आयुष्यभर शिकण्याची भूमिका घेतलेल्यासाठी हे एक शिक्षणाचं सर्वोत्तम साधन आहे. नवीन काहीतरी शिकण्यासारखं कायमच असतं. त्यातली सर्जनशीलता आणि आव्हान मला भावतं.''

शंकरने आपल्याला त्याचे फोटो वापरायची परवानगी दिल्याबद्दल त्याचे आभार मानून नोंदीचा हा भाग संपवू. 'फेसबुक'वर शंकरच्या फोटोग्राफीचं पान : www.facebook.com/shankarsarkarphoto

शंकरने त्याची आई कविता सरकार यांच्यावर फोटोंच्या माध्यमातून केलेली कविता पाहिल्यानंतर आता नामदेव ढसाळांची एक कविता आपण वाचू.

नामदेव ढसाळ : गोलपिठा : पान ४-५


उघडझाप चालूहे

          उघडझाप चालूहे
          झाडे सादळलेली
          लूत पसरलेली दवदारी चौखूर
कुत्रं हुंगतंय भिंत : भिंत डचडचतेय ओलीचिक
या आर्द्रतेत तुम्हांवर फुल्ली मारणं
आत्यंतिक सोयिस्कर
परंतु तुमचे स्थितिस्थापक इतिहास बदलता येत नाहीत
मला माझ्या भल्याबुऱ्यासह
इथल्या कुंडात पडलेली सूर्यचंद्राची प्रतिबिंबं
          अस्खलित व्यभिचारी निघालीयत
या बेदिल हिवलाटेत
तुमच्या गुदमरत्या छात्या मी करतोय स्क्रिनिंग
भाडोत्री रिलेशन्सपेक्षा मी पहातोय
तुम्हाला निकटवर्ती आणि आसपास
तुमचं उतवणी गंगेच्या पाण्याहून पवित्र
बिनखोलीचा माणूस फिरवला जावा शहरभर तसा मी
तुमच्या उंचावत जाणाऱ्या हाडीव्रणावर सपटलोशन
तुम्ही माझ्या आया व्हा
तुमच्या फदफदत्या कुशीत मला निवारा द्या
मी माझे ३।। इंची प्रसरण पसरतोय तुमच्या बेमतलब
सेन्सस करतोय तुमच्या यारांना बाप म्हणून
तुमचे छपरी भडवे माझे खापरपंजोबा
आणि तुमचे लवंडे - काका, मामा, चुलते वगैरे
या जडजंबाल अंधारात तुम्ही पेरून ठेवलीय क्रांतीची ऋचा
तुम्ही ध्वनी सुधारकांचा पहिला आणि शेवटचा
मी नमतोय फक्त तुमच्यापुढे प्रारंभ आणि अस्त
टंकन करतोय तुमचे संभोगशिल्प
मी तुमच्यापुढे स्वच्छ निरागस
अंगावरली मखमल ढाळून
माझ्या क्रिएटिव्ह अंगरख्यांनो
तुमचे अश्रू जुलमी रुस्तमाना करतोय नमूद मी
कारण मंदिर मस्जिद चर्च तुम्ही एका दोऱ्यात ओवलीयत
तुम्हाला गिळत सुटलेलं बदफैली संस्कृतीकरण
लांडंभुंडं पहातोय चिरफाळलेल्या डोळ्यांनी
          खद्र्या मैनांनो
तुमच्या उद्ध्वस्त पुच्यांचा मी निःपक्ष भाष्यकार
समस्त वारकऱ्यांचा कर्दनकाळ
मी सावरतोय तुमच्या वरंगळलेल्या रक्तबंबाळ धुरा
तुमच्या गांडीचे कानवले कुरतडलेत ज्यांनी
त्यांच्या नाशासाठी मी पिकू घातलीय आढी
तुम्ही छिन्नभिन्न पंखांनी पिसारत या
माझा देहोदय मी मांडलाय रस्त्यात
आणि भिरभिरताहेत माझ्या काळजात
कुणीतरी हागून ठेवलेली ओयासिसं
          उघडझाप चालूहे
          झाडे सादळताहेत
          लूत पसरते चौखूर दवदारी

4 comments:

  1. फोटोग्राफी या माध्यमाचा अंतर्मुख करत स्वतःला मांडण्याचा शोध… चांगला वाचनीय लेख.

    ReplyDelete
  2. 'रेघे'वरचे बरेचसे लेख डोळे उघडणारे आणि डोकं अधिक खुलं करणारे असतात.

    ReplyDelete
  3. Even I have a nice story but do not have a prof. camera like yours can you click and publish a story for me....

    ReplyDelete
  4. हा लेख वाचून गलबलून गेलो. अप्रतिम

    ReplyDelete