Tuesday, 18 June 2013

जंगलनामा व उत्तराशिवायचा प्रश्न

परवाच्या रविवारी 'लोकसत्ते'च्या 'लोकरंग' पुरवणीतील एका लेखामध्ये आपल्याला ही वाक्यं सापडतात : ''नक्षलवाद ही आजची अतिशय ज्वलंत राष्ट्रीय समस्या आहे. त्यावरचं मराठीतलं पहिलं पुस्तक साधनानं प्रकाशित केलं. हे इतर कुठल्याही प्रकाशकाला सुचलं नाही. अजूनही या विषयावर मराठीत लेखन होण्याची नितांत गरज आहे''.

या वाक्यांमध्ये 'साधना प्रकाशना'च्या ज्या पुस्तकाचा उल्लेख आहे त्याचं नाव 'नक्षलवादाचे आव्हान : दंडकारण्यातील अस्वस्थ वर्तमान'. देवेंद्र गावंडे यांनी लिहिलेलं हे पुस्तक.

पण हे नक्षलवादावरचं मराठीतलं पहिलं पुस्तक नसावं. कारण या पुस्तकाची पहिली आवृत्ती ८ जुलै २०११ची आहे. तर 'सुगावा प्रकाशना'ने जुलै २००९मध्ये 'जंगलनामा' हे पुस्तक प्रकाशित केलं होतं. हे अनुवादित पुस्तक आहे, आणि आपण बोलतोय त्या लेखात कदाचित मुळातून मराठीत लिहिलेलं पुस्तक अपेक्षित असेल, अशीही शक्यता आहे. याशिवाय, हेमंत कर्णिक यांचं 'कोंडी आदिवासींची आणि नक्षलवाद्यांची' असं एक पुस्तक आपल्याला सापडतं. ते वाचनात आलेलं नसल्यामुळे त्याच्या प्रकाशन तारीखेचा अंदाज नाही. याशिवायही काही मराठी पुस्तकं उडत उडत दिसतात, पण त्याबद्दल काही माहिती आपल्याकडे आत्ता इथे नोंदवायला नाही.

लेखातील सूचनेनुसार या विषयावर अजून लिखाण व्हायला हवंय, आणि त्यात लेखात उल्लेख केलेल्या पुस्तकाबरोबर आणखी दोन पुस्तकांच्या उल्लेखाची भर टाकावी हा नोंदीचा एक हेतू. कर्णिकांचं पुस्तक वाचनात आलेलं नसल्यामुळे त्याबद्दल या नोंदीत काही बोलता येणार नाही. आपण 'जंगलनामा'बद्दल एक बारीक नोंद करू. एकशेचौऱ्याऐंशी पानांचं आणि दीडशे रुपये किंमतीचं हे पुस्तक मूळ पंजाबीत लिहिलेलं. सतनाम या लेखक-पत्रकाराचं हे पुस्तक आता इंग्रजीतही आलेलं आहे. मराठीतील अनुवादासंबंधीचा पहिला गुन्हा हा की, मूळ लेखकाचा उल्लेखही अख्ख्या कव्हरवर कुठेही नाही.

'जंगलनामा' ह्या पुस्तकात काय आहे, याचं पहिलं स्पष्टीकरण नावाखालच्या ओळीतच आहे, 'बस्तरच्या जंगलात'. सतनाम हे डाव्या विचारांच्या चळवळीतले एक ज्येष्ठ गृहस्थ आहेत आणि त्यांना नक्षलवादी चळवळीविषयी आणि आता 'इंडियन कम्युनिस्ट पार्टी-माओइस्ट' यांच्या नेतृत्त्वाखाली जे काही चाललंय त्याबद्दल पूर्ण आस्था आहे, जिव्हाळा आहे. ह्या दृष्टिकोनातून सतनाम बस्तरच्या जंगलात गेले, तिथे माओवादी बंडखोरांसोबत त्यांनी दोनेक महिने काढले आणि तिथला बंडखोरांचा जीवनक्रम, त्यांच्यासोबतच्या बोलण्यातून उलगडलेले संदर्भ यांची एकत्रित मांडणी सतनाम यांनी या पुस्तकात केलेली आहे. हे कशाप्रकारचं पुस्तक आहे याचा अंदाज सतनाम पुस्तकाच्या सुरुवातीलाच 'मनोगता'मधे देतात :

सुगावा प्रकाशन
'जंगलनामा' हे काही जंगलाबद्दलचे संशोधनपर पुस्तक नाही; तसेच ही कल्पनाशक्तीच्या भरारीने निर्माण केलेली, अर्धी सत्य आणि अर्धी काल्पनिक अशी एखादी साहित्यकृती नाही. बस्तरमधील जंगलातील क्रियाशील कम्युनिस्ट गरीलांचे दैनंदिन जीवन आणि तेथील आदिवासींच्या जीवन-परिस्थितीचे हे वर्णन आहे, जे मी माझ्या जंगलयात्रेच्या दरम्यान बघितले. वाचक याला एखाद्या डायरीची पाने किंवा मग प्रवासवर्णन म्हणू शकतील. यातील पात्रे हाडामांसाची बनलेली खरीखुरी माणसे आहेत, जी आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवू पाहात आहेत. सरकारकडून बंडखोर आणि अटकपात्र ठरविलेली ही पात्रे नवीन युग, नवीन जीवन साकार करू पाहात आहेत. इतिहासात त्यांच्यासाठी काय वाढून ठेवले आहे हे तर येणारा इतिहासच सांगू शकेल; पण इतिहासाला ते कोणते वळण लावू पाहत आहेत हे त्यांच्या शब्दांतच मांडले आहे. आपल्या ध्येयासाठी जिवाची बाजी लावायला तयार असलेली ही मंडळी कशाप्रकारचे जीवन जगत आहेत याचा अंदाज वाचक हे पुस्तक वाचून सहज लावू शकतील.
- सतनाम
ऑक्टोबर २००३

सतनाम यांचा हेतू इतका सरळ आहे, त्यामुळे त्यात शंकेला जागा नाही. म्हणजे आपल्यासोबत असलेल्या चाळिशीपर्यंत पोचलेल्या आदिवासी माणसाला रेल्वे कशी असते हे माहीत नाही आणि तो माओवादी 'नव-लोकशाही'च्या निर्मितीसाठी शस्त्र घेऊन का लढतोय? किंवा इथले अर्ध्याहून अधिक मृत्यू मलेरियाने होतायंत, यावर केवळ काही महिन्यांसाठी बाहेरून येणारा सेवाभावी डॉक्टर करून करून काय करू शकेल? 'सध्याच्या परिस्थितीत आदिवासी औषधांची किंमत देऊ शकत नाहीत म्हणून त्यांना आरोग्यसेवा उपलब्ध नाही' असं सतनाम लिहितात. पण माओवादी नियंत्रणाखालच्या परिसरामध्येही ही परिस्थिती अशीच का आहे? तिथेही औषधाच्या किंमतीवरच आरोग्यसेवा अवलंबून आहे का? आणि असेल तर तसं का आहे? असे प्रश्न ते मांडतही नाहीत आणि त्यामुळे उत्तरं शोधण्याची गरजही उरत नाही. हेच प्रश्न आरोग्याशिवाय अनेक बाबतीत विचारता येतील. प्रस्थापित लोकशाही सरकार क्रूरपणे वागतं आणि आत्ता बंडखोर असलेलं माओवादी सरकार आदिवासींना सहानुभूती दाखवतं, वगैरे मुद्दे पुस्तकात येतात, पण त्याची किमान तपासणी त्यात नाही. म्हणून मग पुस्तकाचा ब्लर्बही असा आहे :
श्रीकांत आणि त्याच्या सारख्यांचे जग हे एक वेगळेच जग आहे. एक लहानसे जग, जे त्यांनीच निर्माण केले आहे, ते सर्वत्र पसरू पाहत आहेत. मी अनेक वेळा विचार केला की, इतक्या छोट्या शक्तीच्या आधारे ते सर्वत्र कसे पसरू शकतील? एक छोटीशी शक्ती लाखो करोडो लोकांवर प्रभाव कसा पाडू शकेल? पण त्यांचा विश्वास आहे की हे अशा प्रकारेच होईल. इतिहास अशा प्रकारेच पुढे जाईल. ते स्वतःला एका नव्या भविष्याचे बीज मानतात. ते बीज उगवत आहे, ज्याची भविष्यात वाढ होऊन विशाल वृक्षात रूपांतर होणार आहे. त्यांच्या समुद्रासारखा अथांग आत्मविश्वास आहे. त्यांच्या आत्मविश्वासाची ही परीक्षा आहे. हा आत्मविश्वास असा की जो कोणत्याही अडचणींवर मात करण्यासाठी सदैव तयार असतो. त्यांच्याकडे इतिहासातील अनेक उदाहरणे आहेत ज्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ते या उदाहरणांमध्ये एका उदाहरणाची भर घालू इच्छितात. आमचे ध्येय सर्वोच्च आहे. मानवतावादी आहे असे ते म्हणतात. मानवी इच्छा आकाशांच्या नुसार आहेत. ध्येयाचे पावित्र्य आणि अटळतेमुळे त्यांना मृत्यूच्या डोळ्याला डोळा भिडवण्याची हिम्मत मिळाली आहे. ते मृत्यूची पर्वा करत नाहीत. म्हणून आयुष्य समाधानात जगत आहेत. हे जगणेही मोठे आश्चर्यकारक आहे. जेवण चांगले नाही, आजारापासून संरक्षण नाही, सुख नाही, सोयी-सवलती नाहीत. वेगळ्याच प्रकारचे अन्न. आज चूल इथे तर उद्या तिथे. परवा कुठे ते ठाऊक नाही. कदाचित उपाशीही रहावे लागेल. असे हे लोक, अशी त्यांची स्वप्ने आणि असे त्यांचे जीवन.

असा हा 'जंगलनामा' आहे. गावंडे यांच्या 'नक्षलवादाचे आव्हान' या पुस्तकामध्ये जे येतं ते साधारपणे वृत्तपत्रांमधल्या बातम्यांमधून जे येतं ते. या माहितीत साधारणपणे 'आव्हान' म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ते वरकरणी दिसतं तेच. म्हणजे त्यात मोठ्या प्रमाणावर तो वरकरणी भागच येतो, असं वाटतं. पण तरीही त्याच्याकडे दुर्लक्ष करावं असं नाही, म्हणजे माहितीच्या पातळीवर या पुस्तकातून हाताला खूप गोष्टी लागू शकतात. आणि विषयाची एकूण गुंतागुंत लक्षात घेता एक टप्पा म्हणून ह्या पुस्तकाला महत्त्व असावं. शिवाय, 'नक्षलवादाचे आव्हान' ह्या पुस्तकात माओवादी प्रवक्ते आझाद यांचा लेख, नक्षलवादावर संशोधन प्रकल्प केलेल्या बेला भाटीया यांचा लेख, असाही ऐवज आहे. हे दोन्ही 'इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली'मधले ऐवज आहेत. दुसऱ्या बाजूला 'जंगलनामा'मधली पर्यायी-माहितीही वरकरणी दिसते तशीच आहे. उलट, ह्या पुस्तकातली माहिती जास्तच अशा प्रकारातली आहे. त्यामुळे अशा करूण परिस्थितीत वाचकांनी काय करावं? हा पुन्हा आपल्याला उत्तराशिवायचा प्रश्नच सापडला. अशा प्रश्नांना उभं करण्यातूनच काही उत्तर निघतं का, असा प्रयत्न आपण 'रेघे'वर आपल्या मर्यादेत करतो आहोत. ही नोंद हाही त्याचाच भाग.

No comments:

Post a Comment