Monday, 24 June 2013

वसंत तुळपुळे जन्मशताब्दी : एक नोंद

वसंत तुळपुळे
(२० मे १९१३ - १८ ऑक्टोबर १९८७ )
वसंत तुळपुळे यांच्याबद्दल फारशी माहिती नसेल त्या वाचकांसाठी सुरुवातीलाच त्यांच्या प्राथमिक ओळखीचं एक टिपण देऊ :

वसंत तुळपुळे यांचा जन्म २० मे १९१३ रोजी पुणे येथे झाला. शालेय शिक्षण पुण्यात. मुंबईत सिडनहॅम कॉलेजात बी.ए., बी.कॉम. आणि एलएल.बी. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ते 'फुल टायमर' कार्यकर्ता होते. १९३५पासून पुण्यात ट्रेड युनियनचे काम ते पाहत होते. १९३६च्या आसपास कम्युनिस्ट पक्षाचं सदस्यत्त्व घेतलं. पक्षातल्या ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या सांगण्यावरून ते नगरला काम करण्यासाठी गेले.  १९३९ - १९४८ तिकडेच. त्या काळात कोपरगावात दुसऱ्या महायुद्धाविरोधात भाषणं दिल्यामुळे दीड वर्षं तुरुंगवास. १९४१ साली तुरुंगातून सुटका. त्यानंतर महागाईविरोधात परिषदा, साखर कामगार संघटनेची उभारणी, खेडोपाडीच्या शेतकऱ्यांचं संघटन, वगैरे कामं केली. १९४२च्या भारत छोडो आंदोलनात कम्युनिस्टांचा पक्षीय धोरण म्हणून सहभाग नव्हता. ते न पटलेल्या मंडळींना नंतर पक्षशिस्तीचा भंग केल्यामुळे कारवाईला सामोरं जावं लागलं. तुळपुळ्यांनाही या कारवाईत १९४४ साली पक्षातून काढून टाकलं. मग फेब्रुवारी १९४६मध्ये पुन्हा पक्षात प्रवेश देण्यात आला. पुढे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कम्युनिस्ट कार्यकर्त्यांची धरपकड झाली, त्यात पुन्हा तुळपुळ्यांना तुरुंगात जायला लागलं. दरम्यान, पुन्हा पक्षधोरणांना विरोध केल्यामुळे पक्षाबाहेर. १९४८ साली शेतकरी कामगार पक्षाच्या बांधणीत सहभाग. १९५२मध्ये पुन्हा कम्युनिस्ट पक्षात. गोवामुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ - हे सगळं मग पुढे इतर डाव्या लोकांप्रमाणे सुरळीत. ट्रेड युनियनमधलं कार्य बराच काळ सुरू होतं. पक्षाच्या राज्य कमिटीवरही विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. १९६४ साली भारतीय कम्युनिस्ट पक्षातून फुटून भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सिस्ट) वेगळा झाल्यानंतर बरीच समीकरणं बदलली. नि त्यामुळे वैयक्तिक राजकीय पदाबद्दल फारसा रस नसलेल्या तुळपुळ्यांना राजकीय कार्यकर्तेपणापासून तुलनेने लांब राहात वेगळ्या कामात मन गुंतवता आलं. १८ ऑक्टोबर १९८७ साली मृत्यू.

('कॉ. वसंतराव तुळपुळे, कॉ. मालिनीबाई तुळपुळे' या मालिनीबाई तुळपुळे व सक्षम कुलकर्णी यांनी लिहिलेल्या आणि 'लोकवाङ्मय गृहा'ने प्रकाशित (मार्च २०१०) केलेल्या पुस्तिकेच्या मदतीने ही ओळख करून दिली आहे.)

लोकवाङ्मय गृह
कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते वसंत तुळपुळे, हा झाला एक भाग. पहिल्या प्राथमिक ओळखीत आपण त्यांच्या राजकीय कार्यकर्ता असण्याबद्दल थोडक्यात बोललो. आपली नोंद त्याबद्दल फारशी नाही. आपली नोंद आहे ती अनुवादक वसंत तुळपुळे यांच्याबद्दलची. १९६४ सालापासून त्यांना दुसऱ्या कामांमध्ये मन गुंतवला आलं, असं जे वरती म्हटलं ती कामं मुख्यत्त्वे अनुवादाबद्दलची होती. अर्थात त्यांच्या अनुवादक असण्यात त्यांच्या पहिल्या ओळखीमागची भूमिका आहेच. त्यामुळे त्यांनी केलेले सर्व अनुवाद डाव्या विचारसरणीच्या मजकुराचे आहेत. मार्क्सचं 'पॅरिस कम्यून', 'गोथा कार्यक्रमावरील टीका', लेनिनचे 'मार्क्सचे सिद्धांत', 'डावा कम्युनिझम: एक बालरोग', 'शासनसंस्था आणि क्रांती', 'मार्क्स आणि एंगल्सचे धर्मविषयक विचार', मार्क्सचे 'तत्त्वज्ञानाचे दारिद्र्य', अशी तुळपुळ्यांनी केलेल्या अनुवादांची यादी आपल्याला सापडले. यादी सापडली तरी ती अनुवादित पुस्तकं सापडतील असं नाही. कारण, ती मराठीत आहेत! पण तरी दामोदर धर्मानंद कोसंबी यांचं तुळपुळ्यांनी अनुवादित केलेलं 'पुराणकथा आणि वास्तवता' हे पुस्तक अजून मिळतं. ते आपल्या वाचनात आलेलं नसल्यामुळे त्याबद्दल बोलण्याऐवजी आपण तुळपुळ्यांच्या सगळ्यात मजबूत कामाकडे वळू. हे मजबूत काम म्हणजे कार्ल मार्क्सच्या 'दास कॅपिटल' या ग्रंथाचा तुळपुळ्यांनी केलेला अनुवाद.

लोकवाङ्मय गृह. आवृत्ती : ६ ऑक्टोबर २०११
मार्क्सच्या 'दास कॅपिटल' या ग्रंथाच्या तीन खंडांचा अनुवाद  तुळपुळ्यांनी केला. 'भांडवला'च्या या तीन अनुवादित खंडांच्या एकत्रित पानांची संख्या साधारण अडीच हजार आहे. आणि ज्यांनी इंग्रजीतून किंवा मराठीतून किंवा कुठल्याही भाषेतून यातल्या एखाद्या मूळ खंडाची काही पानं वाचण्याचा प्रयत्न तरी केला असेल त्यांना हा मजकूर एका भाषेतून दुसऱ्या भाषेत नेणं किती अवघड आहे याचा अंदाज येईलच. मुळात त्याचं वाचन हीच एक एवढी अवघड गोष्ट आहे, त्यात ते वाचून पचवणं आणि त्याचा मराठीत अनुवाद करणं, हे महाकाय काम तुळपुळ्यांनी केलं. आणि हे सगळं मराठीत आणण्याचं काम तुळपुळ्यांनी अगदी नेटकेपणाने केलेलं आहे, हे इंग्रजी खंडाशी त्यातला तपशील पडताळून पाहिल्यावर आपल्या लक्षात येतं. मराठी वाचकाला कळण्याच्या दृष्टीनेही हा अनुवाद सुटसुटीत आहे आणि मुळातल्या मजकुराशी इमान राखलेलं आहे. (तपशील पडताळण्याचं किंवा अनुवादाबद्दल निरीक्षणं नोंदवण्याचं काम आपण सध्यातरी फक्त पहिल्या खंडाच्या संदर्भातच करू शकतोय, कारण त्याच्याच वाचनाचा अनुभव आपल्याला आहे. पण त्यावरून एकूण अनुवादाचा अंदाज यावा). पहिल्या खंडाच्या पानांची संख्या आहे नऊशे आठ! आकाराने आणि आशयाने या खंडांचं वजन मजबूत आहे. शिवाय, उपयोग-उपयुक्तता, वर्क-लेबर, किंमत-मूल्य अशा कित्येक शब्दांमधले अर्थांचे फरक समजून घेणं, पाच-सहा ओळींची मूळ वाक्यं मराठीत आणताना ती उथळ होणार नाहीत याची काळजी घेणं, काळाच्या संदर्भांचं भान ठेवणं, एवढ्या मोठ्या पसाऱ्यातला एखादा तपशील गाळला जाणार नाही याच्याकडे लक्ष ठेवणं, कित्येक तळटीपा, मूळ लिखाणातली उपहासाची शैली, किंवा एखादी गोष्ट सोपी करून सांगताना मार्क्सने लावलेलं आवश्यक पाल्हाळ - असं सगळं मुळाबरहुकूम करण्यासाठी खूप काळजी घेऊन तुळपुळ्यांना हे काम करावं लागलं असणार. आणि ते त्यांनी केलं. आपल्या नोंदीत आहेत त्यापेक्षा वेगळी निरीक्षणं कदाचित कोणाला सापडू शकतील. पण तुळपुळ्यांच्या कामाच्या चोखपणाबद्दल बहुधा शंका नसावी.

तुळपुळ्यांची आठवण काढताना आपण आणखीही एक बारीक आठवण ठेवायला हवेय, आणि त्यासाठी आपल्याला राम बापट (११ नोव्हेंबर १९३१ - २ जुलै १९१२) यांना बोलवायचंय. बापट यांनी एका ठिकाणी असं म्हटलंय :
''एखाद्या सिद्धांताचा अभ्यास करणे ही एक 'एन्गेजमेन्ट' असते. त्या सिद्धांताला भिडावे लागते, संघर्ष करावा लागतो. सिद्धांत बाजूला ठेवून जगता येत नाही. सिद्धांत रचणारे मार्क्स, वेबर, गिडन्स यांसारखे विचारवंत आपल्या विचारांना त्रिकालाबाधित सत्य मानत नाहीत. त्यांच्या मते हवे ते घ्यावे, बाकीचे सोडून द्यावे. परंतु घेताना व सोडताना त्याची कारणमीमांसा द्यावी. याला 'थिअरी' करणे असे म्हणतात.''
('राज्यसंस्था, भांडवलशाही आणि पर्यावरणवाद'. लोकवाङ्मय गृह. २०१३)

बापट यांचं म्हणणं समजून घ्यायला खूपच गोष्टी समजावून घ्यायला लागतील. हे सगळं समजावून घेण्यासाठी आवश्यक सामग्री मराठी भाषेतून उपलब्ध असावी असं तुळपुळ्यांना वाटल्यामुळे असेल, शिवाय त्यांच्या राजकीय निष्ठांचाही भाग असेल, शिवाय त्यांच्याकडे तेवढी भाषिक ताकद होती हेही असेलच, अशा सगळ्यामुळे तुळपुळ्यांनी हे अनुवाद केले असावेत. त्या सामग्रीचं वाचन करण्यासाठी आपण तुळपुळ्यांच्या राजकीय निष्ठांच्या जवळचं असण्याची काहीच गरज नाही. खरंतर तसं नसणंच बरं. पण तुळपुळ्यांनी केलेल्या कामाची किमान आठवण ठेवणं एवढं तरी काम आपण करावं, असं वाटलं म्हणून तुळपुळ्यांच्या आत्ताच्या २० मे रोजी संपलेल्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आपण 'रेघे'वर ही नोंद करून ठेवली.

बाकी, तुळपुळ्यांच्या श्रम-शक्तीतून तयार झालेल्या 'भांडवल'च्या तीन खंडांच्या या भाषिक क्रय-वस्तूचं उपयोग-मूल्य मराठीच्या संदर्भात किती आहे, याचा पत्ता मार्क्सलासुद्धा लावता येणार नाही - असा ज्योक समजा कोणी केला तर आपण हसायचं की रडायचं?

No comments:

Post a Comment