१९ ऑक्टोबर २०२५

अरविंद कृष्ण मेहरोत्रांच्या कबिराचं कवित्व : काही प्रश्न

अरविंद कृष्ण मेहरोत्रा हे दीर्घ काळ इंग्रजीतून कविता, निबंध, इत्यादी लेखन करत आलेले आहेत. त्यांच्या पुढाकाराने १९६०-७०च्या दशकांत 'एझरा' आणि 'डॅम यू' अशी इंग्रजी लिट्ल मॅगझिनंही निघाली होती. शिवाय, ते हिंदीतून अनेक कवितांची इंग्रजी भाषांतरं करत आले आहेत. त्यात कबिराच्या काही रचनांचाही समावेश आहे. 'साँग्स ऑफ कबीर' हे त्यांचं पुस्तक प्रकाशित आहे. या कबिराच्या भाषांतराबद्दल काही निरीक्षणं आणि प्रश्न नोंदवण्याचा हा प्रयत्न आहे. यातला पहिला भाग त्यांच्या भाषांतरातल्या काही निवडींबद्दल निरीक्षणं नोंदवणारा आहे आणि दुसरा भाग या निवडींमागच्या भूमिकेविषयी त्यांनी केलेल्या विधानांबद्दलचा आहे.

एक 

Hachette India, 2011

साधारण पंधराव्या शतकात होऊन गेलेल्या भक्ती परंपरेतल्या  एका संताच्या कविता विसाव्या-एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर भाषांतरित करताना 'मुळाबरहुकूम' राहावं किंवा कसं, हा एक स्वाभाविकच प्रश्न असतो. खासकरून कबिराच्या काव्याची परंपरा प्रवाही, लवचिक, आणि अनेकदा संबंधित कवितेची रचनाकार व्यक्ती कोण असेल याविषयी संदिग्धता बाळगणारी असल्यावर 'मूळ' काय, याबद्दलच फारशी शाश्वती उरत नाही. मौखिक परंपरेमुळे या रचना म्हणणाऱ्यांनी आपापल्या परीने केलेले बदल, कधी संकलकांनी केलेले बदल, इत्यादी लक्षात घेता 'मुळाबरहुकूम' भाषांतराचा दावा तसाही डळमळीत होतो. मेहरोत्रा यांनी या डळमळीतपणाचा आढावा त्यांच्या प्रस्तावनेत घेतला आहे. तरीही, संदर्भाच्या सोयीकरता त्यांनी कोणत्या हिंदी स्त्रोतसंहितेचा वापर केला, त्याचा तपशीलही त्या-त्या ठिकाणी दिला आहे. 

मेहरोत्रांनी काही ठिकाणी कबिराच्या ओळी पुढे-मागे करणं, काही रचनांमधली शब्दयोजनांची पुनरावृत्ती टाळणं, आणि काही वेळा वेळा पूर्णच वेगळ्या शब्दयोजनांची भर घालणं, अशा रीतीने निवडी केल्याचं दिसतं. एका अर्थी, हिंदी रचनांचा गाभा टिकवून त्यांनी इंग्रजीत समांतर पद्यरचना केल्या आहेत, असं जाणवतं. त्यांच्या या निवडीबद्दल इथे आक्षेप घेतलेला नाही. मौखिक परंपरेतला कवी लिखित परंपरेत आणतानाही स्वाभाविकपणे काही सर्जनशील निवडी कराव्या लागतात, त्यात इथे भाषांची नि धर्मपरंपरांची सरमिसळही बरीच आहे. त्यामुळे काही मोकळीक सजगपणे वापरावी वाटणं, यात काही गैर नाही. पण मोकळीक घेताना भाषांतरकार कोणत्या विचाराने निवडी करत असेल आणि त्यातून भाषांतरातल्या अर्थावर कोणता परिणाम होतो, याबद्दल काही नोंदवणं गरजेचं वाटतं. उदाहरणासह पाहू.

मेहरोत्रांनी भाषांतरासाठी वापरलेली कबिराची (मानली जाणारी) एक हिंदी रचना अशी : 

मन रे संसार अंध कुहेरा । सिरि प्रगटा जम का पेरा।।

बुत पूजि पूजि हिंदू मूए तुरुक मुए हज जाई।। जटा धारि धारि जोगी मूए तेरी गति किनहुं न पाई।।
कबित पढे़ पढि़ कबिता मूए कापड़ी कैदारे जाई। केस लूंचि लूंचि सुए बरतिया इनमैं किनहुं न पाई।।
धन संचते राजा मूए गड़िले कंचन भारी। बेद पढे पढि पंडित मूए रूप देखि देखि नारी।।
राम नाम बिनु सभै बिगूते देखहू निरखि सरीरा। हरि के नाम बिन किनि गति पाई कहै जुलाह कबीरा।।

मेहरोत्रांचं इंग्रजी भाषांतर असं: 

To tonsured monks and dreadlocked Rastas,
To idol worshippers and idol smashers,
To fasting Jains and feasting Shaivites,
To Vedic pundits and Faber poets,
The weaver Kabir sends one message:
The noose of death hangs over all.
Only Rama's name can save you.
Say it NOW.

मूळ रचनेचा साधारण धावता मराठी अर्थ असा (यातही अर्थातच मोकळीक घेतली आहे) :

मनाचा कारभार म्हणजे तळापर्यंत अंधारच अंधार. भोवताली वेढा घालून राहिलाय मृत्यूचा संसार. मूर्तींची पूजा करणारे हिंदूही मरणार, हजची यात्रा करणारे मुस्लीमही मरणार, जटाधारी साधूही मरणार, तीर्थस्थळांची यात्रा करणारेही मरणार, कविता म्हणणारे कवीही मरणार, वेदपठण करणारे पंडितही मरणार, संपत्ती साठवणारा राजाही मरणार, स्वतःच्या रूपावर खूश असणारी स्त्रीही मरणार. यात आता मुक्ती हवी तर उपाय एकच : मुखी असू दे रामाचं नाव!

आधी म्हटल्याप्रमाणे मेहरोत्रांनी घेतलेली मोकळीक ही भाषांतरकाराची रास्त निवड मानता येते. वरच्या कवितेतही त्यांनी ओळींचा क्रम बदलून त्यात एक प्रकारची लय आणलेली आहे. कबिराने केलेला मरण्याचा सततचा उल्लेख टाळून इंग्रजी मजकुरात मृत्यूची दोरी सगळ्यांच्या गळ्याभोवती असल्याचं शेवटून तिसऱ्या ओळीत एकदाचंच स्पष्ट केलंय. तरी, मनातल्या अंधाराचा उल्लेख असणारं अर्थवाही धृवपद इंग्रजीत का गाळलं, याचा अंदाज नाही. पण एकंदरित मेहरोत्रा यांनी आधुनिक काळातल्या वेगळ्या लयबद्धतेची सांगड कबिराच्या कवितेशी घातल्याचं जाणवतं. त्यात मग 'आजचे' असणारे अनेक शब्दप्रयोग पाचशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या कबिराच्या तोंडी जातात, किंवा इंग्रजीतला हा कबीर फक्त त्या विशिष्ट उत्तर भारतीय भूसांस्कृतिक परंपरेपुरता न उरता इतरही जगभरातल्या परंपरांमधले शब्दप्रयोग करतो, हेही स्वाभाविक. उदाहरणार्थ, 'जटाधारी जोगी'चं मेहरोत्रांनी 'dreadlocked Rastas' असं केलंय. याबद्दल शोध घेतल्यावर, जमैकामध्ये १९३०च्या दशकात 'रास्टफेरी' हा धार्मिक पंथ सुरू झाल्याचं कळतं. त्या पंथाच्या अनुयायांनी 'रास्ट' असं संबोधलं जात होतं, त्यांच्यात केस अगदी बारीक वेण्या घातल्यासारखे ठेवण्याची पद्धत प्रचलित होती- जटाधारी वाटावं, अशीच ही केसांची रचना होती, इत्यादी. म्हटलं तर रूढ ख्रिस्ती धर्मापेक्षा वेगळं, पण तरी त्यातल्या प्रचलित खुणाही काही प्रमाणात स्वीकारणारा, असा हा पंथ. त्यामुळे 'जटाधारी जोगी'चं  इंग्रजीमध्ये 'dreadlocked Rastas' होणं, हे कबिराच्या शब्दयोजनेतला अर्थ शाबूत ठेवत निराळ्या संस्कृतीतल्या खुणांना त्याच्याशी जोडणारं ठरतं. हा काही प्रमाणात त्या कवितेला आधुनिक काळात आणि इंग्रजी भाषेत आणत असतानाच झालेला तिचा भूसांस्कृतिक विस्तारही मानता येईल. 

पण 'Faber Poets' या शब्दयोजनेबद्दलही तसंच म्हणता येईल का? मूळ संहितेत 'कबित पढे पढि कबिता' इतकंच आहे- म्हणजे साधारणपणे कविता म्हणणारे सर्वच कवी त्यात आले. मग इंग्रजीत फक्त 'फेबर पोएट्स' कसे? 

'फेबर अँड फेबर' ही प्रकाशनसंस्था १९२९ साली लंडनमध्ये सुरू झाली आणि सुरुवातीच्या काळात या संस्थेने प्रकाशित केलेली कवितांची पुस्तकं विशेष नावाजली गेली. यात टी. एस. एलियट, एझरा पाउंड, डब्ल्यू. एच. ऑडन, असे इंग्रजी आधुनिक कवितेतले आघाडीचे लोक होते. यातले जवळपास सर्वच युरोपीय किंवा अमेरिकी कवी आहेत. त्यातून 'फेबर पोएट्स' अशी संज्ञा आली. पण या संज्ञेमध्ये जगाच्या इतर भागांमधील आधुनिक इंग्रजी कवींचा समावेश करता येईल का? इतर भाषांचं तर सध्या बाजूला  ठेवू, पण निव्वळ इंग्रजीत लिहिणारे आफ्रिकेतले किंवा भारतीय उपखंडातले कवीही 'फेबर पोएट्स'मध्ये गणले जाणार नाहीत. मग मेहरोत्रांनी आधारभूत मानलेल्या कबिराच्या संहितेत सर्वसाधारण अर्थाने आलेल्या कवींना इंग्रजीत एका संस्थेच्या विशेषनामासह पेश करून काय साधतं? इथे त्या म्हणण्याचा अर्थसंकोच होतो, असं वाटतं. कबीर हिंदू किंवा मुस्लीम असे उल्लेख करतो तेव्हा त्याच्या डोळ्यांसमोर विशिष्ट धार्मिक संप्रदाय आहेत, आणि तो राजे, कवी, सुंदर स्त्रिया असे उल्लेख करतो तेव्हा तो हेतूपूर्वक सर्वसाधारण अर्थाने बोलताना दिसतो. त्यामुळे त्याच्या ओळींमध्ये उल्लेख येणारे कवी हे एका अर्थी त्यांच्या सर्जनशीलतेच्या ताकदीवर किंवा पठणशक्तीवर भाविकांप्रमाणे श्रद्धा असणारे आहेत आणि ते त्यात गुंतलेत किंवा अडकलेत. अशा कवींना निव्वळ एका प्रकाशनसंस्थेच्या संदर्भासह 'फेबर पोएट्स' केल्यामुळे मूळ अर्थाचा विस्तार चांगलाच अरुंद होतो.

भाषांतरातल्या शब्दनिवडींमधली कोणती लवचिकता आणि कोणती मोकळीक रास्त मानायची, असा हा प्रश्न आहे. एखादा सर्वसाधारण उल्लेख विशेषनामात बदलणं, तसं बदलताना अर्थसंकोचाकडे जाणं, किंवा पूर्णच विजोड संदर्भ वापरणं, हे रास्त मानता येईल, असं वाटत नाही. मग 'रामा'ऐवजी 'येशू ख्रिस्त' केलं, किंवा पाश्चात्त्य मिथकांमधलं एखादं मिथक तिथे वापरलं, तरीही रास्त मानता येईल का? हे शेवटी काळं-पांढरं असं पाहता येणार नाही. पण तरी जे काही आहे त्याचं काहीएक मूल्यमापन आवश्यक वाटतं. इथे 'फेबर पोएट्स' हे 'कबित पढे पढि कबिता' या मूळ शब्दयोजनेचा अर्थसंकोच करणारं भाषांतर का वाटतं, ते नोंदवलं.

शिवाय, मेहरोत्रांनी ओळींचा क्रम बदलताना केलेल्या काही निवडी अशाच विवादास्पद वाटतात. उदाहरणार्थ, वैदिक पंडितांची आणि फेबर या प्रकाशनसंस्थेने प्रकाशित केलेल्या कवींची सांगड घालून काय हाताला लागतं? 'फेबर पोएट' म्हणून गणले जाणारे कवी असे वैदिक पंडितांचे समानधर्मा मानण्यासारखे आहेत किंवा तो कवितेचा व्यवहार तसा होता, असं काही जुळतं का? मग यातून नक्की काय साधलं? उलट, 'फेबर'चा इथला उल्लेख विनाकारण त्या संपूर्ण कवितेला संकुचित करण्यासोबत एका असंबद्ध संदर्भात गुंतवतो. 

असंच आणखी एक उदाहरण:

इथे मेहरोत्रांनी भाषांतरासाठी वापरलेली हिंदी कविता अशी:

जिहि नर राम भगति नहिं साधी । सो जनमत कस न सुध्रो अपराधी।।
जिहि कुल पूत न ग्यांन बिचारी । वाकी बिधवा कस न भई महतारी।।
मुचि मुचि गरभ भई किन बांझ। बुडभुज रूप फिरै कलि मांझ।।
कहै कबीर नर सुंदर सरूप। राम भगति बिनु कुचिल कुरूप।।

मेहरोत्रांचं इंग्रजी भाषांतर असं :

Those who are not
Devotees of Rama
Should be in Sing Sing
Or have been stillborn.

Better their mothers
Had been widows
Or barren
Than to have given birth
To these smartly dressed
Pigs who, lacking Rama,
Are like cripples

In rags.

साधारण मराठी अर्थ असा:

रामाची भक्ती न करणारा माणूस म्हणजे कायमचा अपराधी. अशा अविचारी माणसाला जन्माला घालण्यापेक्षा त्याची आई विधवाच झाली असती किंवा वांझच असती, तर बरं खरं. तसा तर माणूस सुंदर असतो, पण तो रामाचा भक्त नसेल तर तो कुरूपच ठरतो.

इथे रामभक्त नसल्यामुळे कबिराच्या लेखी अपराधी ठरलेल्या माणसाला मेहरोत्रांनी 'सिंग सिंग' इथे पाठवलंय. 'सिंग सिंग करेक्शनल फॅसिलिटी' हा अमेरिकेतला जुना तुरुंग आहे, हे इंटरनेटवर शोधल्यानंतर कळतं. मुद्दा अशी शोधाशोध करावी लागते हा नाही. ती इतरही संदर्भांसाठी करावी लागते, आणि वाचकाने तेवढं करायला हरकत नाही. पण ही संदर्भांची भर भाषांतरात घालताना त्यामागचा विचार नक्की काय? इथेही कबिराने रामभक्तीचा अभाव असणारा मनुष्य 'अपराधी' ठरवत सर्वसाधारण अर्थाने हा शब्द वापरला. अशा वेळी 'सिंग सिंग' हा अमेरिकी तुरुंग या कवितेत आणून अर्थसंकोच होतो, किंबहुना अर्थाचा विपर्यासच होतो, असं वाटतं. एखादं विशेषनाम सर्वसाधारण अर्थाने वापरण्याइतकं रूढ झालेलं असतं, तसं 'सिंग सिंग' या तुरुंगाबाबतीत इंग्रजी भाषेत झालंय, असा दावा करता येईल? किंवा 'फेबर पोएट्स'बाबत तसं म्हणता येईल? जटाधारी जोगी जसे रास्टफेरी पंथीयांशी काहीएक समविचारी नातं राखणारे वाटतात आणि प्रत्यक्ष रूपांमध्येही काही समान खुणा दिसतात, तसं काही 'सिंग सिंग' आणि 'फेबर पोएट्स' या संज्ञांबाबतीत म्हणता येत नाही.

कवयित्री युनिस डी'सूझा यांनी मेहरोत्रांच्या या भाषांतराबाबत लिहिताना मात्र असं म्हटलं होतं की, 'फेबर पोएट्स' ही 'कविता वाचणाऱ्या कवीं'साठीची आधुनिक समतुल्य संज्ञा आहे. ("Throw me the key", Mumbai Mirror, 25 August 2011) पण सरसकटपणे सर्व आधुनिक कवींसाठी 'फेबर पोएट्स' असं कुठे म्हटलं जाईल? म्हटलं गेलं तरी ते वाजवी किंवा न्याय्य आहे का, इत्यादी प्रश्न विचारात घेण्यासारखे वाटतात.

कबिराचं हिंदी पुरेसं सहजपणे न कळल्यामुळे इंग्रजीचा आधार घेत त्याच्या कवितांपर्यंत जाणाऱ्या वाचकांना किंवा इतरही कारणाने या कवितांचं इंग्रजी भाषांतर वाचणाऱ्यांना मेहरोत्रांचं पुस्तक उपयुक्त ठरणारं आहे. त्यांनी आधी खुलासा करून भाषांतरावेळी घेतलेली सर्जनशील मोकळीकही समजून घेण्याजोगी असल्याचं आधी नोंदवलंच. पण त्यातल्या त्यांच्या काही निवडींबाबत जाणवणाऱ्या शंकाही वरती नोंदवल्या. आता या शंकांची कारणं शोधण्यासाठी मेहरोत्रांच्या कवितांबाहेरच्या विधानांकडे जाऊ.

दोन

'साँग्स ऑफ कबीर'च्या प्रस्तावनेत मेहरोत्रा म्हणतात, "ऐतिहासिक काळातील कबीर दुष्प्राप्य आहे, तर कबिराच्या रचनांची अधिकृत संहिता त्याहून दुष्प्राप्य आहे. कबिराच्या जीवनकाळापर्यंत मागे नेता येईल असं त्याच्या कवितांचं एकही हस्तलिखित आजतागायत सापडलेलं नाही. त्यामुळे कबिराचं कवित्व म्हणजे मुळातच एखादीच विशिष्ट संहिता नसून संहितांचं कुटुंब आहे." मग त्याच्या संहितांच्या तीन प्रमुख परंपरा आणि इतर आवृत्त्या यांचा आढावा त्यांनी घेतला आहे. ("Translating Kabir", Partial Recall: Essays on Literature and Literary History, Permanent Black, 2012, pages: 276-287)

त्यानंतर एका मुलाखतीत मेहरोत्रा म्हणाले, कबिराच्या कवितांचं भाषांतर करताना "त्या परंपरेमध्ये भाषांतरकार म्हणून प्रवेश करावा, अशी कल्पना होती. अन्यथा, आपण एखादी परंपरा घ्यायची आणि तिच्या बाहेर राहून काम करायचं, असं होतं. त्याऐवजी आपण संबंधित परंपरेच्या आत जाऊन कवितेची आतून पुनर्रचना करावी, आणि अशी आतून पुनर्रचना करत असताना एखादा समकालीन वापरातला शब्द मनात आला तर तो वापरावा, असं डोक्यात होतं," असं मेहरोत्रा एका मुलाखतीत म्हणाले (गुफ्तगू जर्नल, १३ सप्टेंबर २०१८, यू-ट्यूब).

मेहरोत्रांची ही दोन विधानं आणि आपण पहिल्या भागात नोंदवलेले मुद्दे यांचा एकत्रित विचार करून असं म्हणता येईल : 'जटाधारी जोगी'चं 'टोन्श्यूअर्ड रास्टाज्' करणं, हे एका अर्थी इंग्रजीच्या माध्यमातून कबिराच्या संहिताकुटुंबात नि त्याच्या परंपरेत सर्जनशील भर टाकणारं आहे, त्यात विसंगत स्वैरपणा नाही.

पण 'कबित पढे पढि कबिता'चं 'फेबर पोएट्स' करणं, किंवा रामभक्त नसल्यामुळे अपराधी ठरलेल्या मनुष्याला अमेरिकेतल्या 'सिंग सिंग' तुरुंगात टाकणं, या निवडी मात्र कबिराच्या संहिताकुटुंबाचा नि परंपरेचा विपर्यास करणाऱ्या वाटतात, कारण त्यात मूळ अर्थाचा संकोच करणारा विसंगत स्वैरपणा जाणवतो.

Penguin, 2014

मेहरोत्रांच्या 'साँग्स ऑफ कबीर'मधली काही निवडक भाषांतरं या पुस्तकातही आली आहेत; प्रस्तुत नोंदीत ती तिथूनच उद्धृत केली आहेत : Arvind Krishna Mehrotra, Collected Poems : 1949-2014, Penguin Books, 2014, pages 207-225.

गांधीनगर इथे ६-१० ऑक्टोबर दरम्यान  'सेकंड यंग रिसर्चर्स नॅशनल वर्कशॉप ऑन कन्टेम्पररी ट्रेन्ड्स इन इंडियन लिटरेचर्स : मॅपिंग इंडियन लिटरेचर्स इन ट्रान्स्लेशन : कन्टेम्पररी अँड बीयाँड' अशी परिषद झाली. पंडित दीनदयाळ एनर्जी युनिव्हर्सिटी, गांधीनगर इथे झालेल्या या परिषदेचे सहआयोजक बनारस हिंदू युनिव्हर्सिटी हे विद्यापीठ होतं, आणि 'सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल तामिळ' व 'नॅशनल ट्रान्स्लेशन मिशन' या संस्थांनीही त्यासाठी सहाय्य केलं. आयोजकांनी तिथे ७ ऑक्टोबर रोजी खुल्या सत्रात बोलावं, असं सुचवलं. तिथे वाचलेल्या निबंधातल्या एका भागावर आधारित ही नोंद आहे. मूळ निबंधाचं शीर्षक 'एथिकल क्वान्डरीज् ऑफ अ ट्रान्स्लेटर' ('भाषांतरकारासमोरचे नैतिक पेच') असं होतं.

१७ सप्टेंबर २०२५

'माणदेशी माणसे'मधल्या 'मी'च्या मर्यादा

एक

मुखपृष्ठ : दिनानाथ दलाल (कॉन्टिनेन्टल प्रकाशन, २०११)

'माणदेशी माणसे' हे व्यंकटेश माडगूळकर यांचं १९४९ साली पहिल्यांदा प्रकाशित झालेलं पुस्तक मराठी साहित्यात सातत्याने नावाजलं गेलेलं आहे, आणि ते अजूनही वाचलं जातं. पंच्याहत्तर वर्षांनंतरही त्याच्या नवीन आवृत्त्या निघताना दिसतात. (या नोंदीसाठी कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने २०११ साली प्रकाशित केलेली आवृत्ती वापरली आहे.) 

पुस्तकाच्या शीर्षक-पानावर 'माणदेशी माणसे' या नावाखाली 'शब्दचित्रे' असं पुस्तकातल्या मजकुराचं वर्णन केलेलं आहे. पुस्तकात आलेली सर्व सोळा शब्दचित्रं म्हणजे कल्पित गोष्टी आहेत, एवढं माडगूळकरांनीच या पुस्तकावर लिहिलेल्या लेखाच्या आधारे म्हणता येतं ("माणदेशी माणसं", 'प्रवास एका लेखकाचा', मॅजेस्टिक प्रकाशन, २००७[१९९७]: पानं २६-३१). यात कधी लहानपणापासून प्रत्यक्षात पाहिलेल्या "दोन-तीन व्यक्तींचं रसायन एकत्र झालेलं आहे", कधी निव्वळ ऐकिवात असलेल्या एखाद्या व्यक्तीबद्दल माहिती घेण्यासाठी ते माणदेशातील गावात पुन्हा हिंडले, "मधमाशीने मध गोळा करावा, तसं खपत" लोकांशी बोलून तपशील गोळा केला, असं त्यांनी नोंदवलं आहे ("माझ्या लिखाणामागची कळसूत्रे", 'रानमेवा', आर्यन प्रकाशन, २०१०: पानं १९-२१). या तपशिलाची मांडणी करण्यासाठीची भाषा त्यांना जगण्यातून अवगत होती.

पुस्तकाचं निवेदन प्रथमपुरुषात आहे. काही ठिकाणी निवेदकाचं नाव 'व्यंकटेश' असल्याचं सूचित होतं, किमान एकदा निवेदक स्वतःचं गाव म्हणून 'माणदेशातल्या माडगूळ'चा (म्हणजे लेखकाच्या खऱ्याच गावाचा) उल्लेख करतो, तर काही ठिकाणी फार काही सूचित न करता 'मी' या सर्व व्यक्तींविषयी वाचकांशी बोलतो. याला केवळ पुस्तकात क्रमाने चौदावी येणारी 'माझा बाप' ही गोष्ट अपवाद आहे : इतर पंधरा व्यक्तिचित्रांशी फारसा मेळ न बसणारं हे प्रकरण वाटतं. इतर पंधरा ठिकाणी 'मी' तरुण वयातला, उच्चजातीय, कमी-अधिक मध्यमवर्गीय असलेला दिसतो; त्याच्या कथनाची विशिष्ट भाषा आणि शैली आहे. तीच भाषा नि शैली 'माझा बाप' या गोष्टीत कायम राहते. पण प्रत्यक्षात या गोष्टीतला 'मी' हा गावातल्या कष्टकरी नरसू तेल्याचा, मराठी शाळेत चौथीत शिकणारा मुलगा आहे. त्याचं कथन नि अगदी संवादही प्रमाणभाषेत यायला स्वतंत्रपणे हरकत नव्हती, पण या एकंदर पुस्तकातल्या कथनाशी त्या विशिष्ट व्यक्तिचित्रातल्या तेली जातीय, कष्टकरी कुटुंबातल्या, पोरवयीन 'मी'चा मेळ बसत नाही- त्याची दृष्टी, भाषा नि शैली सगळंच अकाली प्रौढ आणि अस्थानी वाटतं. उदाहरणार्थ, इतर ठिकाणी निवेदक आणि तो वर्णन करत असलेलं पात्र यांच्यात काहीएक अंतर सूचित केलेलं जाणवतं. निवेदक गावापासून दूर राहायला गेल्यामुळे खूप वर्षांनी भेट होणं- म्हणजे काळाचं अंतर, सामाजिक-सांस्कृतिक स्थानांमधलं अंतर, एकंदर भूसांस्कृतिक जवळीक नि जिव्हाळा असला तरी रोजमर्राच्या भाषावापरातलं अंतर, इत्यादी. ही अंतरं सूचित करणं हे एक लेखकीय कौशल्यच आहे, त्यामुळे ती उणीव नाही. इथला मुद्दा इतकाच की, या अंतरामुळे पंधरा गोष्टींमधला 'मी' केवळ निरीक्षक म्हणून काही वेळा जी अलिप्तता राखतो ती 'माझा बाप'मध्येही डोकं वर काढते नि विसंगती उघड होते. उदाहरणार्थ, नरसू तेल्याचा मुलगा रोजच्यासारखा सहजपणे घरी आलेल्या बापाचं वर्णन असं करतो : "काही वेळाने माझा बाप आला. कमरेच्या धोतराखेरीज तो उघडाच होता. उघडा राहून राहून त्याचे अंग उन्हाने करपून गेले होते. पण तो चांगला जवान होता. घाण्यातली लाट उचलून त्याचे दंड भारी तयार झाले होते." (पान १२८) साधारण दहाएक वर्षांचा हा मुलगा रोज बापाला बघतोय, मग आजच अचानक नव्याने पाहिल्यासारखं त्याच्या देहाचं वर्णन तो का करेल? तसा काही प्रसंगही इथे घडलेला नाही. निव्वळ घराच्या दारातून आत आलेला बाप पुस्तकाच्या वाचकांना पहिल्यांदा 'दिसत' असला तरी त्या मुलाला अगणित वेळा दिसत आलेला आहे. इतर ठिकाणी निवेदक अमूर्त वाचकांशी बोलत असल्याचं स्पष्ट होतं, तसंच आधी नमूद केलेल्या अंतरामुळे ते अंतर भरून काढण्याच्या हिशेबाने निवेदक गोष्ट सांगत जातो, त्यामुळे पात्राची ओळख सांगताना अशा तऱ्हेची वर्णनं ओघात येतात. 'माझा बाप'मधल्या कथनात नि वर्णनात मात्र निवेदक मुलाचं कथन काळाचं किंवा इतर अंतरं सुचवणारं नाही, त्यामुळे त्याच्या भाषावापराचा नि विशिष्ट शैलीचा आधार डळमळत राहतो. 

आधी म्हटल्याप्रमाणे इतर गोष्टींमध्ये निवेदक 'मी' आणि वर्णनाखाली येणारी पात्रं यांच्यातलं अंतर कसं सूचित होतं ते आता पाहू. पहिलंच शब्दचित्र धर्मा रामोशी या व्यक्तीचं आहे. धर्मा "आयुष्यातले अखेरचे दिवस कसेबसे ढकलतो आहे," हे स्वतः त्याला नि गावातल्या बहुतेक लोकांना माहिती आहे. "नोकरीधंद्यापायी परगावी राहणाऱ्या आणि वर्षातील एखादा-दुसरा महिना घरी येणाऱ्या माझ्यासारख्यालासुद्धा माहीत होतं, पण ते तीव्रतेनं जाणवलं अगदी अलीकडं. धर्माला अगदी जवळून न्याहाळलं अगदी कालपरवा", असं निवेदक 'मी म्हणतो (पान ४). इथे निवेदक पात्रं राहतायंत त्या गावापासून आता दूर अंतरावर असल्याचं कळतं, तसंच संबंधित पात्रापासूनचं त्याचं शारीर स्वरूपाचं अंतरही कळतं. 'झेल्या' या शब्दचित्रात तीन महिन्यांचा बदली शिक्षक म्हणून गावात आलेला 'मी' निवेदक आहे, तर 'रामा मैलकुली'मध्ये रस्त्यावरच्या अंतरांच्या दगडावर आकडे टाकायला आलेला कर्मचारी म्हणून गावात आलेला 'मी' निवेदन करतो. 'नामा मास्तर'मध्येही नोकरीधंद्यापायी शहरात राहणारा 'मी' निवेदक आहे. मांग जातीतला नामा आणि 'मी' शाळेतले वर्गमित्र, पण "मध्यंतरी बरीच वर्षं आमची गाठ पडली नव्हती. माझ्यात आणि नामात आता अंतर निर्माण झालं होतं. पण नामा अद्यापही माझ्या मनात घर करून राहिला होता," असं निवेदक म्हणतो (पान ३६). 

'रामा मैलकुली' हे व्हरल (होलार) जातीमधलं पात्र आहे. कातड्याच्या पारंपरिक पेशात पोट भरणं बिकट झाल्यामुळे रामा रस्त्याची निगराणी राखण्याचं सरकारी काम स्वीकारतो. किरकोळ पगारावर उपजीविका भागवायचा प्रयत्न करतो. तो निवेदक 'मी'ला 'अंमलदार' असं संबोधतो, पण 'मी'नेही पोटापाण्यापुरतं रस्त्यावरच्या अंतरांच्या दगडांवर आकडे नि नाव घालायचं काम स्वीकारलेलं असतं. रस्ता दाखवायला रामा सोबत जातो तेव्हा 'मी'च्या हातातल्या पिशवीचं ओझं स्वतःकडे घेण्याबाबत विचारणा करतो. पण 'काय शिवन्यासारकं न्हाई नव्हं?' असंही रामा विचारतो. त्यात जेवणाचा डबा असेल तर तेवढा काढून घ्यावा, मग बाकीचं ओझं- म्हणजे रंगाचा डबा- आपल्याला घेता येईल, असं रामा सांगतो. यावर 'मी' जेवणाच्या डब्यासह पिशवी रामाने घ्यायला हरकत नसल्याचं सांगतो. "शिवाशीव पाळत नाही मी!" असंही 'मी' स्पष्ट करतो (पान २३). जातीय पातळीवरची ही अंतरं लेखकाने स्वाभाविकपणे दाखवली आहेत. उदाहरणार्थ, कालांतराने शाळामास्तर झालेला शाळेतला मित्र नामा हा मूळचा मांग आहे, त्यामुळे तो 'मी'सोबत चहा प्यायला हॉटेलात जातो तेव्हाचं वर्णन असं आहे : "चहा तयार झाला. काळपट फडक्यातून एका मोठ्या किटलीत गाळला गेला. एक कानतुटका कप भरून धोंडीआप्पानं मला दिला. हॉटेलाच्या बाहेरच्या बाजूला लोंबणाऱ्या शिंक्यातून नामानं अस्पृश्यासाठी ठेवलेली कपबशी काढून घेतली. धोंडीआप्पानं त्यात चहा ओतला. आणि निखाऱ्यालगत किटली ठेवून दिली." (पान ३४)

साहित्यात अशा निवेदकांनी (आणि अर्थातच पात्रांनी) गुणी, नैतिक आणि सामाजिक संकेत पाळणारं, किंवा राजकीय हुशारी जपणारं असायलाच हवं, असं अर्थातच नाही. वरचा परिच्छेद देण्याचं कारण इतकंच की, हा निवेदक जाणिवेच्या पातळीवर काही सामाजिक पूर्वग्रह सोडून वागताना दिसतो. शाळेत असताना लावणी म्हटल्याबद्दल नामाला शिक्षक निरगुडाच्या छडीने फोडून काढतात, तेव्हा शाळा सुटल्यावर त्याची समजूत काढत ओढ्यापाशी जाणारा 'मी' नामाच्या पाठीवरच्या वळांवरून हात फिरवतो नि नामाचा हात धरून त्याला घरापर्यंत सोडून येतो. इतर गोष्टींप्रमाणे इथेही निवेदक 'मी' स्वतःपेक्षा भिन्न जातीय अवकाशाच्या राहणीमानाचं, घराचं सहज वर्णन येतं, भाषिक लकबीही तंतोतंतपणे पकडलेल्या दिसतात. त्याने रेखाटलेल्या या 'शब्दचित्रां'मधली एखादा अपवाद वगळता सर्व मंडळी निम्नस्तरीय जातसमूहांमधली आहेत. 

थोडक्यात- लेखकाचा अनुभव, तसंच पात्रनिर्मितीसाठी लागणारा अधिकचा तपशील गोळा करण्यासाठी त्याने घेतलेले कष्ट, यातील जाणिवेची पातळी विचारात घेतली तर तो काही पूर्वग्रह ओलांडून जातो. त्यामुळे माणदेशी गावाकडचं बहुजातीय-बहुधार्मिक जगणं, घरांची भिन्न रचना, भिन्न पोशाख, भिन्न बोलीभाषा, यांचा वापर करून अस्सल शब्दचित्रं लेखक 'मी' या निवेदकाच्या माध्यमातून उभारतो. लेखकाने जाणिवेने काही पूर्वग्रह ओलांडले, तरी निवेदक त्याहून वेगळा असू शकतो. शिवाय, निवेदकाव्यतिरिक्त एकंदर त्या संहितेतून लेखक आणखी काही शोधू पाहतोय का, अशा दृष्टीने 'माणदेशी माणसे'कडे पाहताना आपल्याला जाणिवेव्यतिरिक्त नेणिवेचा विचार करावा लागतो.

बौद्ध व हिंदू परंपरांमधील काही दर्शनं आणि आधुनिक मनोविज्ञान, तसंच मार्क्सविचार यांचा आधार घेत शरद् पाटील यांनी माणसाच्या कलात्मक अभिव्यक्तीविषयी काही अभिनव मांडणी केली (परंपरांविषयीचे शब्द त्यांनीच वापरलेले आहेत). ते अनेक निर्णायक विधानं करतात, पण ती प्रत्येक वेळी रास्त असतीलच असं नाही. तरीही काही बाबतीत त्यांनी नोंदवलेली मर्मदृष्टी विचारात घेण्यासारखी आहे, त्यामुळे निर्णायक विधान न करता एक उल्लेखनीय शक्यता म्हणून त्यांच्या युक्तिवादाचं सार इथे नोंदवतो (यातला काही भाग मनोविज्ञानाची प्राथमिक ओळख असलेल्यांना माहीत असेल, तरी-) : माणसाच्या मेंदूत जाणीव (conscious) आहे तशीच नेणीवही (subconscious) आहे. माणसाची कलात्मक अभिव्यक्ती जाणीव आणि नेणीव यांच्या परस्परसंबंधांमधून होत असते. 'जाणीव व नेणीव ही विरोधांची एकजूट आहे आणि त्यांच्या फलदायी संघर्षाची उपज प्रतिभा आहे' (शरद् पाटील, 'जातिव्यवस्थाक सामंती सेवकत्व', मावळाई प्रकाशन, २०१४[१९९६], पान २०८). जाणिवेत अनेकदा सनियमी प्रतिक्रियांचा (conditioned reflex) संचय होतो- बदलत्या परिस्थितीनुसार बदलणाऱ्या जगण्याच्या नियमांच्या खुणा त्यात गोळा होत जातात, व्यक्तीच्या वागण्यात त्या दिसतात. नेणिवेत अनेकदा अनियमी प्रतिक्रियांचा (unconditioned reflex) संचय होत असतो- त्यात सहजप्रेरणा, अर्थात 'इन्स्टिन्क्ट'ही आली. ती मानवेतर प्राण्यांमध्येही सामान्यपणे असल्याचं मानलं जातं. पण माणूस अनियमी प्रतिक्रियेसोबत सनियमी प्रतिक्रियेनेही घडत असतो. 'माणसाचा मेंदू ही केवळ शरीरशास्त्रीय उपज नसून माणसाच्या ऐतिहासिक विकासक्रमाचीही उपज आहे'. म्हणजे मेंदू काही केवळ जीवशास्त्रीय घडामोड नसते तर भवतालातल्या भौतिक सामाजिक-ऐतिहासिक घटनाक्रमांच्या प्रभावातूनही मेंदूच्या घडणावळीवर परिणाम होतो. भारतीय संदर्भातील भौतिक-ऐतिहासिक सामाजिक विकासक्रमात जातिव्यवस्था निर्माण झालेली असल्यामुळे इथल्या व्यक्तींच्या अनियमी प्रतिक्रियांमध्येही त्या व्यवस्थेच्या खुणा गोळा होत जातात. ('अब्राह्मणी साहित्य आणि कलांचे सौंदर्यशास्त्र', मावळाई प्रकाशन, २०१७[१९८८] पानं २१९-२२४). (या मांडणीत पाटलांनी केलेले काही शब्दप्रयोग वेगळे आहेत. मी त्यात बदल का केला, याबद्दल दुसऱ्या भागात बोलू).

मूळ मुखपृष्ठ : दिनानाथ दलाल । शरद् पाटलांचं छायाचित्र : मराठी विश्वकोश
फेरफार : रेघ

पाटलांचा युक्तिवाद विचारात घेऊन परत माडगूळकरांच्या माणदेशी माणसांकडे वळू.

'माणदेशी माणसे'मधील 'बाबाखान दरवेशी' या शब्दचित्रात तापट स्वभावाच्या दरवेशी माणसाचं वर्णन येतं. त्याने संतापून रात्रीबेरात्री बायकोला मारल्यावर तिच्या रडण्याने गावं जागं झाल्याच्या प्रसंगानेच या कथेची सुरुवात होते. शेवटाकडे बाबाखानचा लहान मुलगा घराशेजारी बांधलेल्या त्यांच्या अस्वलाच्या तावडीत सापडतो आणि मुलगा जखमी होतो, पण वाचतो. तेव्हा 'सणाट्याने' घरी दाखल झाल्यावर बाबाखान रागाने लाल होतो, तो मोठा दांडुका घेऊन घरातून बाहेर येतो, तेव्हा अस्वल मरतंय आता, असं तिथे उपस्थित असलेल्या निवेदक 'मी'च्या मनात येतं. पण बाबाखान अस्वलाला काठीने खुणावून दुसऱ्या जागी नेऊन बांधतो. यावर दुसऱ्या दिवशी 'मी' बाबाखानला विचारणा करतो- "एवढ्याशा कारणावरून बायकोला ढोरासारखा तुडवतोस आणि काल ते जनावर पोटच्या पोराला जीवं मारीत होतं तर त्याला चार बोटांनी शिवलासुद्धा नाहीस?" (पान ११३). पुढे निवेदक म्हणतो : "माझ्यासारख्या माणसाकडून असले प्रश्न विचारले गेले म्हणून खरोखरीच बाबाखान अति खजील झाला होता!" (जाडा ठसा रेघेचा). या गोष्टीत 'मी' वाड्यात राहणारा असल्याचा एकच उल्लेख निवेदकाच्या ओळखीशी जोडलेला आहे. पण पुस्तकातल्या इतर कथांशी सांगड घालूनच ही कथा वाचायची तर इथेही निवेदक शाळामास्तर किंवा किरकोळ सरकारी कर्मचारी किंवा शेतजमिनीची मालकी राखणाऱ्या ब्राह्मण कुटुंबातला असेल, असं मानता येईल. याबाबत लेखक स्पष्ट खुलासा करत नाही. पण मग 'माझ्यासारख्या माणसाकडून' हा उल्लेख का झाला असेल? आपण समोरच्या माणसाला एखाद्या अपमानास्पद खाजगी बाबीविषयी काहीतरी विचारल्यावर तो माणूस खजील होईल, असं आपल्याला कोणत्या धारणेतून वाटेल? माडगूळकरांच्या 'माणदेशी माणसे'मधला निवेदक 'मी' या ठिकाणी 'माझ्यासारखा माणूस' बाबाखान दरवेश्याहून नैतिकदृष्ट्या वा सामाजिकदृष्ट्या उन्नत स्थानी असल्याचं सूचित करतो, त्यामागची नेणीव सरंजामी जातीय रचनेचा स्पष्ट निर्देश करते. 

'गणा महार' हा तमाशात ढोलकी वाजवण्याचं कसब असलेला मनुष्य 'मी'ला मुंबईत बसस्टॉपपाशी भेटतो आणि त्यांचं बोलणं सुरू होतं. दोघांची गावं माणदेशातली असल्याचं कळल्यावर चांगल्या गप्पा होतात. मग ते चहा प्यायला 'एका कळकट कोंगाड्याच्या हॉटेलात' जातात. निवेदक सांगतो : "मालक गणाच्या ओळखीचा असावा. माझ्यासारखा माणूस घेऊन गणा हॉटेलात आला ही गोष्ट त्याला विशेष वाटली असावी. तो डोळे मिचकावून बोलला- 'अरे गणाजी, काय लय् गडबड?'" (पान ११८; जाड ठसा रेघेचा). याही गोष्टीत निवेदक 'मी'ची वेगळी काहीच ओळख पटेलसा तपशील नाही. तो नोकरीधंद्यामुळे मुंबईत राहतोय आणि मूळ गाव सातारकडे आहे, एवढं गणासोबतच्या त्याच्या गप्पांमधून कळतं. मग इथे पुन्हा 'माझ्यासारखा माणूस' हा उल्लेख का झाला असेल? आपण एखाद्या हॉटेलात तमासगीर माणसासोबत गेल्यावर आपलं तिथे असणं हॉटेलमालकाला विशेष वाटेल, ही धारणा कशातून आली? पोशाखामुळे प्रथमदर्शनी कोणी यात वेगळेपण शोधू शकेल, त्वचेच्या रंगावरूनही वेगळेपण सूचित होत असेल. या प्रश्नांची उत्तरं निवेदकानेच द्यायला हवीत असं अर्थातच नाही. पण लेखकही इतर कुठल्याही मार्गाने त्या प्रश्नांकडे जात नाही. गणा महार आणि ब्राह्मण 'मी', हे अंतर धूसरपणे सूचित करणारे उल्लेख कथेत आहेत, तेवढंच. कथेच्या शेवटी निवेदक म्हणतो, "तमासगिरांच्या खाजगी जीवनाविषयी मला मोठं कुतूहल. त्यासंबंधी विचारलं असताना गणानं उत्तर दिलं- 'साहेब, आमा लोकांना तुमी बघावं तमाशाच्या थेटरात, बोर्डावर उभं राहिल्यावरच. त्याचं बाकीचं काय बघू नये. मिठाई खावी पण मिठाईचा कारखाना कधी बघू नये!'" (पान १२३)

माडगूळकरांच्या लेखनात आलेल्या गणा महाराने केलेली टिप्पणी 'माणदेशी माणसे'मधल्या त्यांच्याच निवेदनालाही लागू होऊ शकते. माडगूळकर त्यांची लेखकीय क्षमता माणदेशातील माणसांच्या नि त्यांच्या जगण्याच्या बाह्य वर्णनात इतक्या कुशलपणे वापरतात, की ती-ती व्यक्ती ठळकपणे वाचकांपुढे 'सादर' होते. पण कथेतल्या केंद्रस्थानी असलेल्या व्यक्तीचे इतर व्यक्तींसोबतचे आंतरसंबंध, असतीलच तर निवेदकासोबतचे त्या व्यक्तीचे संबंध अगदी अपवाद वगळता फारसे उलगडलेच जात नाही. काही बाह्य व्यवहारापुरतंच ते उरतं.

उदाहरणार्थ, मुख्य पात्र 'बाबाखान दरवेशी' आहे म्हटल्यावर त्याच्यावर पूर्ण लक्ष केंद्रित. मग त्याच्याकडून मार खाणाऱ्या बायकोचं वर्णन असं : "नाहीतरी बाबाखानची बायको वेडसरच होती. वेडसर म्हणण्यापेक्षा भोळीभाबडी म्हणा." (पान ११०). एकतर वेडसर म्हणावं किंवा भोळीभाबडी म्हणावं, किंवा भोळंभाबडं असण्याला हे जग वेडं मानतं असं म्हणावं. निवेदक 'मी' तितक्या गुंत्यात जात नाही, ते ठीक. पण लेखकसुद्धा या बाईच्या पात्राचं काही करत नाही. तो निवेदकाला त्याच सुरात पुढे बोलायला लावतो : "अंगावर कसंतरी गुंडाळलेलं सुडकं, बाबाखानची बायको म्हणजे खरोखरच एक ध्यान होतं. पोरांचं लेंढार मागे घेऊन ती कुठंतरी भटकत असे गावात. बाबाखानला पोरंही उदंड. तीन पोरी आणि चार पोरं. त्यातली निम्मी अधिक आईसारखी वेडीबिद्री होती. पण थोरली एक पोरगी आणि धाकटं एक पोर दिसायला चांगलं होतं. म्हशीमागून रानोमाळ चिंध्या उडवीत हिंडताना त्यांना पाहिलं की मला नेहमी वाटायचं, न्हाऊ माखू घातलं आणि एखादं धुवट चिरगूट अंगावर घातलं तर ही पोरं एखाद्या कोकणस्थ ब्राह्मणाच्या मुलांच्या तोंडात मारतील रूपानं!" (पान ११०). इथे आदल्याच पानावर बाबाखानाने बायकोला मध्यरात्री बडवलंय नि तिच्या रडण्याभेकण्याने गाव जागं झालेलं आहे, एवढं लक्षात ठेवू. निवेदक गावातल्या सर्वजातीय पूर्वग्रहांनुसार बोलतो, हे वावगं नाही; किंबहुना ते या कथनात काही वेळा जुळणारं आहे. पण लेखकाला आदल्या पानावरच्या हिंसक प्रसंगातून पुढे आल्यावर "आणि नाही तरी" असं म्हणून बाबाखानाची बायको कशी दिसायला वेडीबिद्री होती, हे निवेदकाच्या तोंडून सांगावं वाटतं, यात त्या बाईच्या पात्राविषयीची सपशेल अनास्था दिसते. वेडीबिद्री असेल तर तिचं पुढे काय करायचं, हे लेखकाने ठरवलं तर निवेदकालाही कथनात त्यावर काही करावं लागलं असतं. 

नाहीतर एकीकडे निवेदक कसा वागतो पाहा : 'तांबोळ्याची खाला' या गोष्टीत जेव्हा 'सहा वर्षांनी भेटलेली' (पुन्हा एकदा काळाचं अंतर) खाला निवेदकाला 'लगीन केलंस का', असं विचारते तेव्हा तो एकदम भावूक होतो. "माझा चेहरा एकदम गोरामोरा झाला. भरत आलेल्या जखमेवरची खपली निघाली. त्या भाबड्या म्हातारीला काय सांगणार? आणि सांगून तिला ते काय समजणार? तिच्या तरुणपणी असलं काही असेल का?" हे निवेदकाच्या मनात येतं नि वाचकांना तो हे सांगून गोष्ट संपवतो. कोणत्याही कथेत उल्लेख येणाऱ्या प्रत्येक पात्राबद्दल लेखकाने सविस्तर लिहायलाच हवं, निवेदक पूर्वग्रहदूषित असू नये, अशा उद्देशाने हे लिहिलेलं नाही. पण 'तांबोळ्याची खाला'मध्ये कुंकू, हळद, बुक्का, दातवण, शेंगदाणे, फुटाणे, चुरमुरे, असे जिन्नस आठवडा बाजारात विकणारी मुस्लीम बाई हे पात्र केंद्रस्थानी आहे. अशा वेळी खुद्द गोष्टीत किंवा पुस्तकात कुठेच संदर्भ नसलेली, गोष्टीच्या कथनात काहीच भर न टाकणारी नि वाचकालाही काहीच कळू न देणारी तरुण निवेदकाच्या बहुधा प्रेमभंगाची खपली काढून लेखक गोष्टीचा शेवट करतो. पण 'बाबाखान दरवेशी'मध्ये आदल्या पानावर मार खाल्लेल्या बाईच्या अशा कित्येक खपल्या तो पाहात नाही, उचकटून जखमेची खोली मोजत नाही. (एक-दोन वाक्यांतसुद्धा ही खोली गाठणं लेखकाला शक्य होतं).

दुसरं उदाहरण- 'बन्याबापू' हे शब्दचित्र एका ब्राह्मण इनामदार व्यक्तीचं आहे. त्याचा सरंजामी थाट आता ओसरलेला आहे, पण वागणुकीत मात्र सरंजामी अवशेष टिकून आहेत. त्या संदर्भात निवेदक 'मी' म्हणतो : "व्यवहारी जगात बापूंची किंमत 'एक भंपक' माणूस म्हणून होईल. त्यांचा चांगुलपणा वजा टाकूनच लोक बोलतील, 'हं, या अशा उधळेपणानंच सारं गमावलं! आता चार जमिनी राहिल्या आहेत त्याही पुरी-बासुंदीपायी फुंकून टाकतील आणि बसतील झालं!' अशा शब्दांनीच त्यांची संभावना होईल. होईना बापडी! पण बापूंची दानत सुटणार नाही. अभिमान संपणार नाही. जवळचं सारं दुसऱ्याला वाटून टाकून निष्कांचन होऊन बापू एके दिवशी समाधानानं हसतील, असं मला नेहमी वाटतं!" (पान ५४)

'दानत', 'जवळचं सारं दुसऱ्याला वाटून टाकून समाधानानं हसणं', हे एकंदर सरंजामी व्यवस्थेविषयीचं निवेदक 'मी'चं आकलन! या गोष्टीच्या सुरुवातीलाच देशमुख-देशपांड्यांचे (ब्राह्मण) किंवा गायकवाड-धायगुड्यांचे (मराठा) अवाढव्य वाडे लहानसहान खेड्यात अवशेषरूपात कसे दिसतात, याचा उल्लेख येतो. "वेळप्रसंगी साऱ्या गावकऱ्यांनी त्याच्यात खुशाल आश्रय घ्यावा," असे हे वाडे होते असल्याचं निवेदक म्हणतो (पान ४९). सरंजामी व्यवस्थेविषयीचं आश्रयदातृत्वावर भर देणारं हे वर्णन आहे. आधी म्हटल्याप्रमाणे, निवेदकाचं आकलन काहीही असू दे, लेखकसुद्धा या गुंतागुंतीच्या सामाजिक नि व्यक्तिगत व्यवहारांबद्दल अधिक काही सुचवत नाही, शोधत नाही, आणि या संबंधांमध्ये झालेल्या बदलांविषयी आठवणीपलीकडे काही बोलत नाही. भाषा, अनुभव, तपशील, यांचं सामर्थ्य असलेल्या माडगूळकरांसारख्या लेखकाला काही ठिकाणी ही अशी नेणिवेची मर्यादा पडली असावी. त्यामुळे गोष्टींची व्याप्ती नि खोली आणखी कितीतरी विस्तारण्याच्या शक्यता खुंटल्या. शिवाय, '(जाणीव सुखावणारी) मिठाई खावी, (नेणीव दुखावणारा) मिठाईचा कारखाना बघू नये', अशा दृष्टीने 'माणदेशी माणसे'चं वाचन होण्याचा धोकाही बहुधा वाढला. 

दोन

व्यंकटेश माडगूळकर (५ एप्रिल १९२७ - २८ ऑगस्ट २००१) स्मृतिदिन परवाच्या २८ ऑगस्टला होऊन गेला, आणि आज १७ सप्टेंबर रोजी शरद् पाटील (१७ सप्टेंबर १९२५ - १२ एप्रिल २०१४) यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा शेवट होतो आहे, हे या नोंदीचं निमित्त. 

मुखपृष्ठ : मेहबूब शेख (मावळाई प्रकाशन, २०१७)

पाटलांच्या इतिहासविषय मांडणीप्रमाणे कलाविषयक जाणीव-नेणिवेसंदर्भातली मांडणीही अनेक ठिकाणी अतिशयोक्तीपूर्ण, तर काही वेळा सरसकट विधानांनी ग्रासलेली आहे. एका पुस्तकाचं २००० साली परीक्षण करताना ते भारतात 'जातिव्यवस्था आसन्नमरण झालेली आहे', असं विधान करून जातात; तिथे न थांबता लेखिकेचं नाव अरुंधती असल्यामुळे 'अरुंधती' या शब्दाचा प्रााचीन स्त्रीसत्तेशी कसा संबंध आहे याबद्दल निरीक्षणं नोंदवून या विसाव्या-एकविसाव्या शतकातल्या लेखिकेच्या लेखनकृतीशी त्याची सांगड घालण्याचा धोकादायक प्रयत्न करतात ("अरुंधती रॉयची जातिविरोधी प्रेमाची शाश्वत कादंबरी", साधना साप्ताहिक, ६ मे २०००). किंवा भालचंद्र नेमाडे यांची 'हिंदू' कादंबरी आवडल्यावर पाटील तिचा त्यांच्या मतानुसार मोठेपणा सांगण्यासाठी अतार्किक कारणं नोंदवतात : "ही कादंबरी महाराष्ट्राचा मिरासदार शेतकरी 'मराठा' लिहू शकला नसता,... जसे फुले माळी या दुय्यम शेतकरी जातीतून निघाले, तसे नेमाडे लेवा या दुय्यम शेतकरी जातीतून निघाले. हे कारण पहिले. ... दुसरे कारण त्यांच्या जन्माचे. त्यांना एका नवप्रसूत अस्पृश्य मातेने एक थाना पाजून जगविले. तिने त्यांना , 'अनन्य', 'स्वलक्षण' भारतीय समाजाकडे पाहायची अब्राह्मणी दृष्टी दिली."('अब्राह्मणी साहित्याचे आणि कलांचे सौंदर्यशास्त्र, पान २४३). अशा  कल्पनारम्य विधानांना ते कोणताही आधार देत नाहीत. यात सर्वांत मोठा धोका म्हणजे- लेखकव्यक्तीच्या चरित्रात्मक माहितीच्या आधारावरच निर्णायक दावे केले जातात. मग एखाद्या वेळेस चरित्रात्मक माहिती चुकली की निष्कर्षही कोलमडतात (शरद् पाटलांनी इतिहासकार वा. सी. बेंद्रे यांच्या जातीबाबत आधी चुकीच्या माहितीआधारे विधानं केली, आणि मग जात वेगळी असल्याचं त्यांना कळलं. ते त्यांनी कबूलही केलं. पण अशा गोष्टींमुळे त्यांच्या मांडणीचं महत्त्व उणावण्याचा धोका समजून घ्यायला हवा).

अशा वेळी पाटलांचा मूळ मुद्दा लक्षात घेऊन संहितेचं वाचन करण्यावर लक्ष केंद्रित करणं हे अधिक उपयोगी ठरू शकेल असं वाटतं. या नोंदीच्या पहिल्या भागात 'माणदेशी माणसे'बाबतीत तसा प्रयत्न केला आहे. त्यामुळे माडगूळकरांच्या चरित्रात्मक माहितीचे दाखले फारसे दिलेले नाहीत. त्यांच्या गावाकडच्या अनुभवासंदर्भात आणि 'माणदेशी माणसे'च्या लेखनाआधी त्यांनी कोणती तयारी केली यासंदर्भात त्यांच्याच लेखनातले काही उल्लेख आले तेवढेच. बाकी, खुद्द संहितेत कोणत्या संवेदना आणि जाणिवा किंवा नेणिवा प्रतिबिंबित होतात, त्याचा शोध घेणं बरं वाटतं.

पाटलांनी काही सखोल परीक्षणं लिहिली आहेत. उदाहरणार्थ, 'कोसला : भारतीय परात्मतेचा परमोत्कर्ष ('अब्राह्मणी साहित्या आणि कलांचे सौंदर्यशास्त्र, पानं ३ ते ८) या निव्वळ पाच-सहा पानी लेखात ते खुद्द 'कोसला' कादंबरीविषयी काहीच बोलत नसले तरी त्यातल्या नायकाच्या परात्मतेमागची सामाजिक-ऐतिहासिक पार्श्वभूमी उत्कृष्टपणे उलगडून दाखवतात. मग एकेका वाक्यात 'कोसला' तसंच 'चांगदेव चतुष्टया'तील कादंबऱ्यांमध्ये नायकांच्या विशिष्ट स्थितीबद्दल टिप्पणी करून लेख संपतात. इथे ते लेखकाच्या चरित्राबद्दल अवाजवी दावे करायला जात नाहीत, तर कादंबरीतल्या पात्रांच्या पार्श्वभूमीचं साधार विश्लेषण करतात आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिणामाबद्दल बोलतात, त्यामुळे ते प्रस्तुत आणि मार्मिक ठरतं. 

व्यंकटेश माडगूळकरांनी दलित जीवनावर लिहिलेल्या कथांचं 'ओझं' या नावाचं एक स्वतंत्र पुस्तकच गो. मा. पवार यांनी संपादित केलेलं आहे (मेहता पब्लिशिंग हाऊस, २०२० [१९८७]). माडगूळकरांच्या साहित्यात अस्पृश्य मानल्या गेलेल्या, तसंच भटक्या व आदिवासी समूहांमधली पात्रं कशी आली, याची चर्चा पवारांनी केली आहे. त्यातल्या काही कथांबाबतीत विश्लेषण करताना आपण 'माणदेशी माणसे'सारखेच निष्कर्ष काढू शकतो असं नाही. तिथे त्या संहितेलाही जाणीव-नेणिवेचा पाटलांना अपेक्षित तर्क लावता येईल आणि वेगळे निष्कर्ष निघाले तर ते स्वीकारता येतील, अशी तयारी ठेवायला हवी. (तसंच, गांधीहत्येनंतर झालेल्या ब्राह्मणविरोधी दंग्यांच्या पार्श्वभूमीवरचं कथानक मांडणाऱ्या 'वावटळ' या त्यांच्या कादंबरीचंही मूल्यमापन करता येईल. विषय नि लेखकव्यक्ती, यांबद्दलची आपली मतं संहितेवर लादण्याऐवजी त्या संहितेतली गुंतागुंत उकलणं, त्यात वरील तर्कानुसार समोर येतील ते निष्कर्ष पडताळणं, असं शक्य आहे). अन्यथा, कोणत्याही व्यक्तीने काय लिहिलं हे न बघताच फक्त तिच्या सामूहिक संलग्नतेबद्दलच्या अनुमानाआधारे थेट दावे करायला जाणारी तथाकथित समीक्षापद्धती रूढ होण्याचा धोका आहे. मग मराठा मिरासदार जातीतल्या व्यक्तीला अमुक लिहिता येणार नाही, दुय्यम शेतकरी जातीतला असल्यामुळे नि अस्पृश्य आईच्या एका थानाचं दूध प्यायल्यामुळे अमुक लिहिता येतं, किंवा दलितांना तमुक लिहिणं शक्य होत नाही- अशीही सरसकटीकरणं समीक्षेच्या नावाखाली होत जातात. शिवाय, सामाजिक जाणिवेच्या नावाखाली कथा-कादंबऱ्यांमधल्या पात्रांना आपल्या विचारसरणीच्या सोयीची (पुरोगामी भासणारी) वाक्यं बोलण्यापुरतं वापरलं जातं आणि कवितांमधली लय नि प्रतिमा जाऊन गद्य घोषणा उरतात.

"आत्यंतिक स्वीकारात जसे सर्वच ग्राह्य, तसे आत्यंतिक नकारात सर्वच त्याज्य. पण, आत्यंतिक नकारातून उलटा सूड (Nemesis) उद्भवतो, अस्वीकृत तत्त्वज्ञानातील नेमके कालबाह्य वा प्रतिगामीच विद्रोहींच्या बोडख्यावर बसते," असा इशारा पाटलांनीच देऊन ठेवला होता ('अब्राह्मणी साहित्य आणि कलांचे सौंदर्यशास्त्र', पान ६७).

या नोंदीच्या पहिल्या भागात पाटलांच्या दोन पुस्तकांमधल्या प्रस्तुत आणि महत्त्वाच्या वाटलेल्या भागांना एकत्र करून काही सारांश दिला आहे. त्यात 'सनियमी प्रतिक्रिया' आणि 'अनियमी प्रतिक्रिया' असे शब्दप्रयोग अनुक्रमे 'conditioned reflex' आणि 'unconditioned reflex'साठी केले. पाटलांनी त्यासाठी वापरलेले शब्द अनुक्रमे 'सोपाधिक प्रतिक्रिया / प्रतिक्षेप' आणि 'निरुपाधिक प्रतिक्रिया / प्रतिक्षेप' असे आहेत (शासकीय कोशांमध्येही साधारण हेच शब्दप्रयोग दिलेले आहेत). 'सनियमी' आणि 'अनियमी' हेसुद्धा रोजच्या वापरातले शब्द नाहीत, पण ते 'सोपाधिक' आणि 'निरुपाधिक' यांच्यापेक्षा तुलनेने सुबोध मानले जातील, अशी आशा वाटते. अशा पद्धतीच्या विश्लेषणासाठी लागणारी परिभाषा रुळवण्यासाठीचे मंच मराठीत जवळपास संपलेले आहेत. त्यावर काही चिकित्सक चर्चा / संवाद करण्यासाठीच्या जागाही दिसत नाहीत. शरद् पाटलांसारख्या विचारवंताच्या बाबतीत मतभिन्नता आणि सहमती यांच्या आधारे चर्चा झाली, तर आपला भवताल समजून घेण्यासाठी काही उपयोगी साधनं हाती लागू शकतील, असं वाटतं. "मतभेदातूनच एकूण ज्ञानाचा विकास होत असतो. मतभेदांचा संघर्ष करण्यासाठी व्यक्तिस्वातंत्र्य लागतं. व्यक्तिस्वातंत्र्य परमतसहिष्णूतेतून व परमतआकलनातून" वापरायला हवं, असं पाटलांनीच एका ठिकाणी म्हटलं आहे ('अब्राह्मणी साहित्य आणि कलांचे सौंदर्यशास्त्र', पान १३३). हे नाही केलं तर, त्यांच्या ठराविक व्यक्तिगत विधानांचं आणि वादग्रस्त मुद्द्यांचं त्यांच्याच भाषेसह पठण केलं जाईल, त्यातून व्यक्तिस्तोम होऊन आणखी एका पंथाची भर पडेल, असं वाटतं. किंवा या कशातच फार पडण्यात रस नसलेली मंडळी जमेल तितपत, परवडेल तितपत 'मिठाई' खात राहतील, त्यातल्या साखरेने छान गुंगी येईल. बाकी, 'मिठाईचे कारखाने' आपले आहेत तसे सुरू.

*

या सूत्राशी संबंधित आधीच्या दोन नोंदी:

०९ ऑगस्ट २०२५

आदिभारती : सक्तीऐवजी सह-अनुभूती राखणारं भाषाशिक्षण!

'हिंदीसक्ती' आणि त्यानिमित्ताने समोर आलेल्या काही मुद्द्यांना धरून एक नोंद ३ ऑगस्टला केली : 'मराठमोळ्या माधुरीचं मराठी' ऐकणारे एंगूगींचं म्हणणं ऐकतील का? एकीकडे 'भारतीय भाषां'चा कैवार घेतल्यासारखं दाखवताना एकसाची राष्ट्रवादातून केवळ 'हिंदी'ला वरचढ स्थान दिलं जातंय. तर, दुसरीकडे मराठी अस्मितेबद्दल केवळ वरवरच्या बाह्य खुणांपुरतंच राजकारण होतंय- अशा परिस्थितीबद्दल ती नोंद होती. यात इंग्रजीचा मुद्दाही येत राहिला- त्यात मग व्यावहारिक गरज म्हणून इंग्रजी पहिलीपासून एक विषय म्हणून शिकवणं आणि शिक्षणाचं माध्यमच सुरुवातीपासून इंग्रजी असणं, यासंबंधीचे मुद्दे नोंदवले. प्राथमिक शिक्षणाचं माध्यम म्हणूनच इंग्रजी स्वीकारण्यातले विरोधाभास आणि स्वातंत्र्य गमावणं, वगैरे त्यात आलं. पण हे सगळं बोलताना मराठी अवकाशात राहावं लागणाऱ्या इतर भाषांविषयीही बोलायला हवं. त्याला धरून आजची नोंद आहे. आज आदिवासी दिवस असल्यामुळे तसे काही प्रातिनिधिक दाखले इथे देतो आहे.

आधीच्या नोंदीत भाषावैज्ञानिक अशोक केळकरांचा उल्लेख आला; इथे त्यांच्या विधानाने सुरुवात करणं आवश्यक वाटतं. 'भाषा आणि शिक्षण' या लेखात केळकर लिहितात :
प्राथमिक शाळेत तरी स्वभाषेला पर्याय नाही. आदिवासी मुलांना प्राथमिक शाळेत शिक्षण द्यायचे तर एकदम प्रादेशिक भाषेत त्यांना डुब्या खायला लावण्यापेक्षा प्रारंभीची दोनतीन वर्षे तरी विद्यार्थ्यांची घरची भाषा आणि प्रादेशिक भाषा ह्या दोन्ही भाषा जाणणारे शिक्षक त्यांना मिळणे जरूर आहे. [...] शालेय शिक्षणात स्वभाषा हे माध्यम असावे ह्याला एक कारण आहे. त्या शैक्षणिक अवस्थेत अमुक इतके ज्ञान मुलाला द्यायचे एवढाच प्रश्न नसतो, तर ज्ञान घ्यायची ओढ मुलांमध्ये उत्पन्न करणे आणि ज्ञान ग्रहण करण्याचा सराव त्याला होणे ह्याही गोष्टी साधायच्या असतात. त्या अशा साधायच्या तर मुलांमध्ये स्वानुभवाचे, स्वभाषेतून आकार घेणारे विश्व आणि शाळेतून मिळणाऱ्या ज्ञानाचे विश्व ह्यांचा सांधा जुळला पाहिजे. स्वभाषेतून शिक्षण घेणे ह्यासाठी आवश्यक आहे. प्राथमिक शाळेतच इंग्लिश माध्यमाचा सामना करणाऱ्या सधन वर्गातील मुलाची स्थिती त्या आदिवासी मुलाइतकीच दयनीय आहे. ('वैखरी : भाषा आणि भाषाव्यवहार, स्नेहवर्धन प्रकाशन, दुसरी आवृत्ती: २००७ [पहिली आवृत्ती: १९८३], पान ७७) (जाड ठसा रेघेचा)
वरच्या अवतरणात ठळक ठशात केलेल्या महत्त्वाच्या वाक्याला धरून पुढे जाऊ. शाळेत पूर्ण परकेपणाला सामोरं जाणं लहान मुलांना दयनीय करून सोडतं, एवढ्याच मुख्य अर्थापुरतं ते वाक्य पाहता येईल. त्यातल्या दयनीय स्थितींमध्ये इतर काही सामाजिक पूर्वग्रहांची वगैरे भर पडून भेदही दिसत जातात. पण सध्या परकेपणाचा मुख्य मुद्दा धरून ठेवता येईल. महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत राहणारं एखादं आदिवासी मूल मराठी माध्यमाच्या शाळेत जातं, तेव्हा बहुतांशाने त्याला पूर्णपणे परकी असलेली भाषा समोर येते. सर्वच शिक्षण त्या भाषेत घेण्याची सक्ती झाली तर ते मूल शाळेपासूनच दुरावण्याची शक्यता निर्माण होते, अशा समस्या आदिवासी क्षेत्रांमध्ये काम करणारे आदिवासी आणि बिगरआदिवासी शिक्षक नोंदवतात.

शिक्षणशास्त्र संस्था, पुणे- १९८४ । मुखपृष्ठ व आतील चित्रं : अनंत सालकर
या समस्यांचा सखोल सहानुभूतीपूर्वक आणि 'डोळस' विचार करून केळकरांनी 'आदिवासींच्या प्रश्नाची भाषिक बाजू' हा लेख १९७२ साली प्रकाशित केला. त्यानंतर तीन वर्षांनी, १९७५ साली महाराष्ट्र शासनाच्या शिक्षणशास्त्र संस्थेने 'आदिवासी बोलीभाषा प्रकल्प' हाती घेतला. या प्रकल्पांतर्गत काही मोजकी प्रकाशनं निघाली. त्यातलं 'आदिभारती : माडिया-गोंडी' हे १९८४ सालचं एक पुस्तक होतं [आभार : पुस्तकाची प्रत आणि छायाचित्रं प्रभू राजगडकर यांनी उपलब्ध करून दिली]

"आदिवासी मुलांना प्रारंभिक शिक्षण त्यांच्या बोलीभाषेतून मिळाल्यास त्या भागात प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होण्यास मदत होऊ शकेल. त्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यातील काही निवडक जिल्ह्यांमध्ये  आदिवासी विभागासाठी त्यांच्या बोलीभाषेतून पूरक वाचनपुस्तके तयार करण्याचा प्रकल्प शिक्षणशास्त्र संस्थेने हाती घेतला," यात सुरुवातीला केवळ माडिया-गोंडी या बोलीभाषेपुरतं पुस्तक काढण्यात आलं, असं या संस्थेचे तत्कालीन संचालक का. पा. सोनवणे यांनी पुस्तकातल्या निवेदनात नोंदवलंय. पुस्तकाच्या श्रेयनामावलीत 'आदिवासी बोलीभाषा प्रकल्पा'चे विभागप्रमुख म्हणून केशव भडक यांचं नाव दिसतं. या प्रकल्पाच्या सल्लागार मंडळात अशोक केळकर आणि पेरी भास्करराव हे दोन भाषावैज्ञानिक होते, तर आदिवासी संस्कृतीचे अग्रगण्य अभ्यासक आणि भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी राहिलेले (स्वतः महादेव कोळी समुदायातून आलेले) गोविंद गारे यांचाही त्या मंडळात समावेश होता. या पुस्तकाचं लेखन सुनिता ज. जोशी यांनी केलं होतं.

या प्रकल्पात क्षेत्रीय पाहणी करणं, जमवलेल्या सामग्रीचं भाषावैज्ञानिक विश्लेषण करणं, मग साहित्यनिर्मिती करणं आणि पुढे प्रशिक्षणवर्ग घेणं, यात जोशी यांचा सहभाग होता. त्या प्रक्रियेची सविस्तर ओळख करून देणारा 'आदिवासींच्या भाषा-शिक्षणाच्या कार्याची वाटचाल' हा लेख त्यांनी 'साधना' साप्ताहिकाच्या १५ ऑगस्ट १९८५ रोजीच्या अंकात लिहिला. पाचेक वर्षं क्षेत्रीय पाहणी करताना अनेक गावांना-पाड्यांना भेट देणं, स्थानिक लोकांकडून शब्द गोळा करणं, त्यानंतर त्या-त्या बोलीभाषांचं काहीएक व्याकरण निश्चित करून त्यानुसार पुढे साहित्यनिर्मिती करणं, अशी ही प्रक्रिया किती जिकिरीची राहिली असेल, हे त्यांच्या लेखावरून कळतं. पुस्तक लिहिणारी व्यक्ती आदिवासी नव्हती आणि तिला या भाषाही मुळातून येत नव्हत्या, पण भाषातज्ज्ञ म्हणून त्यांचा यात सहभाग होता. त्यामुळेच स्थानिक लोकांशी संवाद साधून पुस्तक लिहिलं असलं तरी, पुस्तकांचं हस्तलिखित तयार झाल्यावर पुन्हा ती भाषा येणाऱ्या लोकांच्या मदतीने त्यात सुधारणा करण्यात आल्या, शाळांमध्ये जाऊन त्यांची चाचणी घेण्यात आली, त्यानंतरही पुस्तकांमध्ये बदल करण्यात आले. संबंधित शिक्षकांना व विद्यार्थ्यांना ही पुस्तकं मोफत दिली गेली. "या पुस्तकांचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आदिवासी जीवनाशी, परिसराशी अनुबंध साधणारी अशी ही पुस्तके आहेत. ही पुस्तके हातात पडल्यावर विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर झळकलेला आनंद केवळ अवर्णनीय आहे तर, ‘फार दिवसांची गरज पूर्ण झाली.’ असे शिक्षकांचे उद्गार आहेत," असं जोशी नोंदवतात. 

तीस पानांच्या या 'आदिभारती' पुस्तकात सुरुवातीला अगदी दोन शब्दांच्या, दोन ओळींच्या पाठांपासून सुरुवात करत पहिले पंचवीस धडे माडिया-गोंडी भाषेतले आहेत. तर पुढे पाच-सहा पानं प्रमाण मानल्या जाणाऱ्या मराठीतल्या साध्या कविता आहेत. मजकुराचे विषय (मराठीतल्या काही ओळी वगळता) त्या परिसरातले आहेत, आशय स्थानिक लयीतला आहे, आणि प्रत्येक ठिकाणी माडिया-गोंडी ओळीसोबतच त्याचं मराठी भाषांतर दिलेलं आहे. त्याला धरून मग प्रमाण मराठीची सहज ओळख होईल, अशी मांडणी केलेली आहे.

आदिभारती, पाठ १
आदिभारती, पाठ ७
 
आदिभारती, पाठ १५
आदिभारती, पाठ ३०

वारली (ठाणे जिल्हा; आता पालघरही), कोलामी (यवतमाळ व नांदेड जिल्हा), माडिया-गोंडी (गडचिरोली जिल्हा) अशा तीन भाषांच्या संदर्भात हे काम सुरू झालं. त्यात माडिया-गोंडी आदिभारती या पुस्तकानंतर कोलामीतही आदिभारती पुस्तक, वारली-मराठी शब्दकोश, शिक्षकांसाठी हस्तपुस्तिका, असं काही साहित्य तयार करण्यात आल्याचं जोशींच्या लेखावरून कळतं. पण हा प्रकल्प पुढे शासकीय अनास्थेपायी संपत गेला. अशोक केळकरांचा मूळ लेख त्यांच्या 'वैखरी' या पुस्तकात आहे. त्या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९८३ साली आली. त्यात हा प्रकल्प सुरू झाल्याबद्दलचा आश्वासक 'ताजा कलम' जोडलेला आहे. पण २००७ सालच्या दुसऱ्या आवृत्तीत त्यांनी जोडलेले 'ताजा ताजा कलम' आणि 'ताजा ताजा ताजा कलम' मात्र योजनेची वाताहात झाल्याचं सुचवणारे आहेत. या योजनेचे पंख कापण्यात आल्याचा आणि मग २००० सालापासून ही योजना जवळजवळ बंद करण्यात आल्याचा उल्लेख केळकर करतात.

हा प्रकल्प हाती घेणाऱ्या शिक्षणशास्त्र संस्थेचं रूपांतर पुढे काही टप्प्यांमधून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमध्ये झालं. या संस्थेच्या वतीने १९९६ साली प्रकाशित केलेली चाळीस पानी 'गोंडी-मराठी-माडियागोंडी संवाद-पुस्तिका'ही पाहायला मिळते. [आभार : संवाद-पुस्तिकेची प्रत आणि छायाचित्रं प्रभू राजगडकर यांनी उपलब्ध करून दिली]. नागपूर विभागाचे तत्कालीन शिक्षण उपसंचालक भाऊ गावंडे आणि गडचिरोलीचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) घोनमोडे यांनी मुळात प्रश्नोत्तररूपात ही पुस्तिका तयार केली होती. पुढे सुनिता जोशी यांनी बी. आर. आत्राम, एम. एल. समुद्रालवार व एम. बी. शेख या स्थानिक शिक्षकांच्या सहाय्याने पुस्तिकेवर संस्करण केलं, असं शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे तत्कालीन संचालक विजय देऊस्कर यांनी पुस्तकातल्या निवेदनात नोंदवलंय.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, १९९६

आदिभारती या पुस्तकात माडिया-गोंडी अशी एकच भाषा गृहित धरून मजकूर आहे, तर या संवाद-पुस्तिकेत मात्र गोंडी आणि माडियागोंडी अशा दोन बोलीभाषा गृहित धरून मजकुराची मांडणी केली आहे. त्यातही पुढे जाऊन 'माडियागोंडी'ऐवजी फक्त 'माडिया' असाच शब्द वापरणं अधिक रास्त असल्याचं म्हणता येईल. गोंडी आणि माडिया या  द्राविडकुळातल्या एकमेकींच्या अगदी जवळ जाणाऱ्या भाषा असल्या तरी त्यांच्यात भेदही आहेत. तसंच इंडो-युरोपीय भाषाकुळातल्या मराठीपासून त्या पूर्णपणे भिन्न आहेत. या संवाद-पुस्तिकेत स्थानिक मंडळींचा लेखनातला सहभागही वाढल्याचं दिसतं. पण शेवटी भाषा शिकवता शिकवता आधुनिक शिक्षण इतरही काही विपरित गोष्टी कशा पेरत जातं याचा एक दाखला या पुस्तिकेत सापडतो, तो असा:

गोंडी-मराठी-माडिया गोंडी संवाद-पुस्तिका, पान १४

'शिक्षणाचं महत्त्व' सांगणाऱ्या भागात पहिला मुद्दा 'शिकलं की नोकरी मिळते' असा कोरडा व्यवहार मांडणारा आहे. त्यामुळे रानातल्या वस्तू गोळा करायला लागतं ते शिक्षण नाही (पर्यायाने ज्ञानही नाही) आणि नोकरी करणाऱ्यांना जे मिळालंय ते मात्र शिक्षण (पर्यायाने ज्ञान), असा भेद आपोआप त्यातून ध्वनित होतो. रानातलं असतं ते आधुनिक शिक्षण नाही हे खरंच, ते परंपरेतून जमत गेलेलं शिक्षण किंवा ज्ञान. पण मग आधुनिक शिक्षण का घ्यायचं, तर नोकरी मिळेल, पैसा कमावता येईल म्हणून, असं या पानावरच्या गुरुजी-भीमा संवादात स्पष्टपणे बोललं गेलंय. पण रानात काम करणारा भीमा पुन्हा पेचात पाडणारा प्रश्न टाकतोच : 'नक्की मिळेल का त्याला नोकरी?' या प्रश्नाचं उत्तर अनेक माणसं वर्षानुवर्षं शोधत राहतात. पण गुरुजी मात्र 'हो, अगदी नक्की मिळेल. तू काळजी नको करूस' असं म्हणतात. मग भीमा उद्यापासून मुलाला शाळेत पाठवायला तयार होतो. शिक्षण आणि रोजगार यांचा संबंध आहेच, पण एखाद्याला शिकण्याचं महत्त्व पटवून देताना पहिल्यांदा नोकरी नि पैसा हे कारण द्यायचं असेल तर मग बाकी बऱ्याच गोष्टींबद्दल बोलणंच खुंटतं.

'शिक्षणाचं महत्त्व' या भागातला दुसरा मुद्दा 'शिकून शहाणं व्हायचं!' असा आहे. त्यात गुरुजी आणि भागीची आई नि बाबा यांचा संवाद आहे. गुरुजी भागीला शाळेत पाठवण्याबद्दल सांगतात. तर, भागीची आई म्हणते, 'गुरुजी, ती मला कामात मदत करतीयं. ती नाही येणार शाळेत!' यावर गुरुजी म्हणतात, 'अगं, पण तुझी लेक हुशार आहे. शिकली तर आईवडिलांचं नाव काढेल. तुमच्यासारखी अडाणी नाही राहायची.' यावर भागीची आई म्हणते, 'खरय गुरुजी, तुम्ही म्हणता ते. आम्ही अडाणी. आम्हाला लिहिता वाचता येत नाही. म्हणून सगळी आम्हाला फसवितात. माझी पोरगी माझ्यासारखी अडाणी राहायला नको. मी पाठवीन तिला शाळेत.' हे तर थेटच अपमानास्पद आहे. मुलीला चूल-मूल एवढ्यापुरतं ठेवू नये, हे बरोबर. या विशिष्ट संदर्भात निरक्षर माणसांना फसवलं जातं, हेही बरोबर. पण हे सगळं बोलताना समोरच्या निरक्षर माणसाला अडाणी म्हणणं, हे तर अनौपचारिक संवादातही साधारणपणे योग्य मानलं जाणार नाही. इथे औपचारिक संवादपुस्तिकेत या उद्गारांना स्थान मिळालं. शिवाय, लिहिता-वाचता न येणाऱ्यांना फसवणारे कोण असतात, तर लिहिता-वाचता येणारे शिक्षित! मग यातून पुन्हा आधुनिक व्यवहारांमधला गर्विष्ठ विरोधाभासच समोर येत नाही का? आपण सध्या या प्रश्नामध्ये न जाता भाषाशिक्षणापुरता धागा धरून पुढे जाऊ.

'महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे'ने पुढे 'आदिवासी बोलीभाषा प्रकल्प' चालवला नसला तरी या भाषांसाठी काही पूरक सामग्री अधूनमधून निघत आलेली आहे. परिषदेने दहा आदिवासी भाषांमध्ये गोष्टींची द्विभाषिक (संबंधित आदिवासी भाषा नि मराठी अशी) पुस्तकं काढल्याची माहिती, 'बहुभाषिक परिस्थितीतील अध्ययन-अध्यापन शिक्षक मार्गदर्शिका' या २०१६ सालच्या पुस्तिकेत मिळते. या पुस्तिकेत परिषदेशिवाय इतर काही संस्थांनी काढलेल्या अशा पूरक सामग्रीचीही नोंद आहे. पण ही सामग्री विखुरलेली असून एका जिल्ह्यातल्या प्रयत्नाची माहिती शेजारच्या जिल्ह्यात नसेल, याची कबुलीही पुस्तिकेत दिलेली आहे (पान १७). 

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद
(चित्रातील पुस्तिकांचं लेखन : वर्षा सहस्रबुद्धे)
ही पुस्तकं मिळवता आली नाहीत. त्यामुळे त्यातल्या आशयाविषयी काही बोलता येत नाही. पण त्या-त्या भागात ही पुस्तकं पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत, किंबहुना त्याबद्दलची माहितीसुद्धा त्या-त्या भागांमध्ये पोचलेली नाही, असं संबंधितांशी बोलल्यावर जाणवतं. या सर्व प्रयत्नांना शासकीय योजनेचा भाग म्हणून सार्वत्रिक स्वरूपात अंमलात आणण्याचं काम झालेलं नाही.

काही शिक्षकांनी स्वतःच्या स्तरावर असे प्रयत्न केल्याचंही दिसतं. उदाहरणार्थ, सध्या पालघरमधील वरचापाडा इथे जिल्हा परिषदेच्या शाळेत उपशिक्षक असणाऱ्या राजन गरुड यांनी २०१५च्या दरम्यान पहिल्या इयत्तेचं मराठीचं पुस्तक वारली भाषेत भाषांतरित केलं. लहानपणापासून मुख्यत्वे मुंबईतल्या काही भागांमध्ये राहिलेले गरुड २००९ साली पालघरला खोरीचा पाडा इथे जिल्हा परिषदेच्या शाळेत रुजू झाले, तेव्हा त्यांना वारली भाषा येत नव्हती, पण कामातून ते ही भाषा शिकले. स्थानिक वारली मुलं शाळेत आल्यावर थेट मराठीला सामोरं जाताना बिचकतात आणि पुढे याच कारणाने शाळागळतीही वाढते, हे गरुड यांना जाणवलं. त्यामुळे पहिलीत आलेल्या मुलांना शाळेत टिकवणं हे आव्हान होतं. मग गरुड यांनी त्या मुलांच्या परिसरातील वस्तू, गोष्टी आणि भाषेचा वापर सुरू केला. गणितात 'बेरीज' म्हणण्याऐवजी सुरुवातीला 'जमव', 'गोला कर' असे शब्दप्रयोग केले. त्या भागात सर्रास अननस पाहायला मिळत नसताना 'अ अननसाचा' असं शिकवून उपयोग नाही, मग त्यापेक्षा तिथे तुलनेने अधिक दिसणारं फळ असलेल्या सीताफळाचा दाखला ते अक्षरओळखीसाठी देऊ लागले. त्यामुळे या मुलांना 'अ अनुनाचा' (अनुना म्हणजे सीताफळ) अशी चौदाखडीची सुरुवात करता आली. या उपक्रमांमुळे त्यांच्या शाळेची पटसंख्या (पहिली ते चौथीची विद्यार्थीसंख्या) २००९ साली २३ होती, ती वाढून २०११ साली ४८पर्यंत पोचली. काही पालकांनी आश्रमशाळेत शिकणारी मुलंही तिथून काढून या शाळेत घातली, असं गरुड यांनी 'रेघे'शी बोलताना सांगितलं.

वारलीतून मराठीचं पुस्तक
सौजन्य : राजन गरुड
सुरुवातीला काही संकल्पना, गोष्टी मुलांना शिकवण्यासाठी सहा महिने लागायचे, पण त्यांच्या मातृभाषेतून शिक्षणाची सुरुवात केल्यावर हे काम दोन महिन्यात व्हायला लागलं, असंही गरुड म्हणतात. "शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाही, त्यात आपल्या संस्कृतीसोबत येणाऱ्या अनेक गोष्टी असतात. इथे मुलं लग्नसमारंभासाठी तीन-तीन दिवस शाळेतून सुट्टी घेत असल्याचं माझ्या लक्षात आलं. लग्नाच्या निमित्ताने होणाऱ्या सांस्कृतिक गोष्टी त्यांच्यासाठी जिव्हाळ्याच्या होत्या. पण त्यासाठी शाळा इतके दिवस बुडवण्याऐवजी त्यातल्या काही सांस्कृतिक गोष्टींना शालेय अवकाशातच वाव देता येईल का, असा विचार मनात आला. त्यातून मग विविध सांस्कृतिक गोष्टींच्या जतनासाठी 'आदिवासी बोलीभाषा मंचा'ची स्थापना केली," असं गरुड यांनी सांगितलं. त्यांना अभिनयाचीही आवड असल्यामुळे त्याचा वापर प्रत्यक्ष अध्ययनात करून मुलांना शाळेची गोडी लावणं, वारली-मराठी शब्दकोश तयार करणं, अशा तऱ्हेच्याही कल्पना त्यांनी राबवल्या. 

गरुड यांनी २०१५च्या दरम्यान 'शिक्षणाची वारी' या राज्य शासनाच्या उपक्रमात सहभाग घेतला. राज्यातील विविध विभागांमध्ये राबवण्यात आलेल्या या उपक्रमात शिक्षकांना शैक्षणिक प्रयोगांची माहिती देणं, इतर प्रयोगांची देवाणघेवाण, अशा गोष्टी होत होत्या. त्यातून गरुड यांना त्यांच्या प्रयत्नाला आणखी आखीव रूप द्यावं असं वाटतं. मग त्यांनी 'बालभारती'चं पहिल्या इयत्तेचं पुस्तक मराठीत भाषांतरित केलं. त्यांच्याच स्तरावर त्यांनी या पुस्तकाची मांडणी करून मागणी होईल त्यानुसार पीडीएफ स्वरूपात वितरणही केलं, किंवा कोणीही त्याची छापील प्रतही काढू शकतं अशी सोय होतीच. त्यांच्या या प्रयत्नाला शासनाचा किंवा इतर संस्थांचा आर्थिक हातभार नाही. 

गडचिरोलीतील भामरागड तालुक्यात २०१९ साली गटशिक्षण अधिकारी अश्विनी सोनावणे यांच्या पुढाकाराने इयत्ता पहिलीच्या मराठी व गणित या पुस्तकांचं भाषांतर माडिया भाषेत करून घेण्यात आलं. त्या विभागापुरत्याच या प्रकल्पाला राज्य शासनाने अर्थसहाय्यही केलं आणि 'बालभारती'ने पुस्तकं छापून दिली, बातम्याही आल्या! पण ही पुस्तकं प्रत्यक्षात काही महिनेही वापरली गेली नसल्याचं स्थानिक स्तरावर काम करणाऱ्या शिक्षकांकडून व कार्यकर्त्यांकडून कळतं. प्रस्तुत लेखकाला ही पुस्तकं पाहायला मिळाली नाहीत. पण या भाषांतराच्या कामात सहभागी झालेल्या तीन शिक्षकांचे अनुभव आणि निरीक्षणं मात्र स्वतंत्रपणे नोंदवणं आवश्यक ठरावं.

हेमलकसा इथल्या लोकबिरादरी संस्थेच्या माध्यमातून गेली सोळा वर्षं शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या समीक्षा गोडसे-आमटे या मूळच्या पुण्याच्या. गडचिरोलीत आल्यावर त्या माडिया शिकून बोलू लागल्या. वरील भाषांतरप्रकल्पात त्यांचा सहभाग होता. त्या 'रेघे'शी बोलताना म्हणाल्या, "मी इथे काम करायला लागले तेव्हा सुरुवातीच्या काळात शाळेत समोर येणाऱ्या मराठी भाषेचं स्थानिक माडिया मुलांना अनावश्यक ओझं होत असल्याचं जाणवलं [पाहा : 'भाषेच्या कुंपणापलीकडची मोहफुलं']. पण गेल्या सोळा वर्षांमध्ये साधारण दोन पिढ्या माझ्या समोर शिकून गेल्या. आता जवळपास सगळ्या मुलांना मराठी बोलता येतं. अनेक मुलांचे पालक घरीच प्राथमिक अंक आणि बाराखडीदेखील शिकवून पाठवतात. खाणकामासोबत इथे मोबाइलचं ३-जी नेटवर्क पसरलं. त्यातूनही लोकांना स्वतःच्याच पातळीवर काही गोष्टी शिकणं शक्य झाल्याचं दिसतं." माडियात सातपर्यंतच अंक मोजण्यासाठी स्वतंत्र शब्द आहेत, त्यापुढे मराठीतले अंक वापरले जातात. शिवाय, माडियातली मापन पद्धती आधुनिक प्रमाणकांनुसार नाही. अशा काही गोष्टींमुळे गणिताच्या पुस्तकाचं माडिया भाषांतर करताना विशेष अडचणी आल्याचं त्या नमूद करतात.

या भाषांतरप्रकल्पात सहभागी दुसरे शिक्षक मारुती वाचामी म्हणाले, "मुख्यत्वे बाहेरून आलेल्या शिक्षकांना स्थानिक भाषा समजताना अडचण येत होती. त्या अनुषंगाने या पुस्तकांचा उपक्रम सुरू झाला. पण पुढे त्यांचा वापर म्हणावा तितका करून घेतला गेला नाही." वाचामी हे गेली सुमारे तेहेतीस वर्षं या भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकवत आहे. इतर ठिकाणांप्रमाणे या भागातही इंग्रजी माध्यमाकडे कल वाढत असल्याचं त्यांनी नमूद केलं.

या मराठीच्या पुस्तकाचं भाषांतर करणाऱ्या उज्ज्वला बोगामी यांनी एकंदरच आदिवासी समुदायाच्या भाषिक आणि सांस्कृतिक प्रश्नांविषयी 'रेघे'शी सविस्तर संवाद साधला. गेली एकवीस वर्षं गडचिरोलीत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. मराठी शाळेत येणाऱ्या माडिया मुलांना पाठ्यपुस्तकात येणाऱ्या अनेक गोष्टी, वस्तू, संकल्पना जास्त परिचयाच्या नसतात. अशा वेळी मराठी भाषा वापरता येत असली तरी त्यात अधे-मधे अडखळायला होऊ शकतं, असं सांगून या संदर्भातला एक अनुभव बोगामी यांनी नोंदवला. त्या म्हणाल्या, "एकदा आमच्या शाळेत एक पाहुणे आले होते. तर त्यांच्यासमोर एका मुलाने पुस्तकातलं एक पान सलग वाचलं, पण एका लांब वाक्यात एका शब्दावर तो अडखळला. तर पाहुणे म्हणून आलेले सर म्हणाले, 'याला नीट वाचता येत नाही.' हा प्रसंग घडला तेव्हा मला लगेच काही बोलायचं लक्षात आलं नाही. पण त्या सरांना माडिया किंवा संस्कृत मजकूर समोर देऊन वाचायला सांगितला असता तर सलगपणे वाचता आला असता का? त्यांच्यासाठी या परक्या भाषा होत्या. तसंच, त्या मुलासाठी मराठी ही परकी भाषा होती, तरीही तो पानभर सलग वाचत होता, याचं कौतुक करण्याऐवजी एका शब्दावर तो अडखळला यावरून त्याला बाद ठरवण्यात आलं."

या भागातील मध्यमवर्गीय किंवा इतरही आदिवासी घरांमध्येही मराठी बोलण्याकडे कल वाढतोय, इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडेही ओढा आहे, याबद्दलही बोगामींनी प्रांजळपणे मत व्यक्त केलं. "मला माडिया येते, पण मी माझ्या मुलाशी सुरुवातीला सहजपणे माडियातून बोलले नाही. तो इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलेला नाही तर, मराठी माध्यमाच्या शाळेत शिकला, पण घरात आम्ही अधिक सहजपणे माडिया बोलायला हवं होतं. आता मात्र मी ते माझ्या मुलाबाबतीत जाणीवपूर्वक करतेच, पण इतर पालकांनाही ते सुचवते. अद्ययावत ज्ञान घेण्यासाठी इतर भाषाही शिकाव्या लागतातच. पण फक्त तेवढंच पुरेसं आहे का? यातून जगण्यामध्ये खूप औपचारिकता येतेय, यांत्रिकता येतेय, आणि जमिनीशी जोडलेल्या गोष्टी आपण सोडून देतोय. मातृभाषेत आपण अधिक अनौपचारिकपणे वागतो, बोलतो. ती अनौपचारिकता संपत जाते. क्लास-वन अधिकारी होणं, आंतरराष्ट्रीय पातळीवर काही करणं, यातली औपचारिकता वरचढ मानली जाते, पण घरातल्या अनौपचारिक भावनेचं काय?"

औपचारिकता आणि अनौपचारिकतेचा मुद्दा महत्त्वाचा वाटतो. भाषेच्या वापरातून निर्माण होणारा परकेपणा आणि आपलेपणा, सक्ती आणि सहानुभूती, अशा दिशेनेही तो जोडता येईल.

गेल्या वर्षी 'बालभारती'ने पहिल्या इयत्तेची मराठीची पुस्तकं काही 'बोलीभाषां'मध्ये भाषांतरित करून घेतली. ही पुस्तकं अजून शाळांपर्यंत पोचलेली नाहीत. या भाषांतरप्रकल्पांमध्ये स्थानिक आदिवासी भाषांतरकार असल्याचं दिसतं. यातील गोंडी आणि माडिया या बोलीभाषांमध्ये भाषांतरित केलेली मराठीच्या पुस्तकांची मुखपृष्ठं पुढे पाहता येतील :

बालभारती, २०२४
बालभारती, २०२४
पण अशा भाषांतरात त्या-त्या परिसरातला आशय, बोलीभाषेतून किंवा मराठीतून येत नाही. त्यामुळे माध्यम स्वभाषेचं, पण आशय परभाषेचा, असं ते होतं.  मराठी शाळेत शिकणाऱ्या मुलांना इंग्रजीचं पहिलीचं पुस्तक मराठीत भाषांतरित करून दिलं, तर कसं वाटेल, तसा हा प्रकार होतो. त्यापेक्षा प्राथमिक स्तरावर मराठीऐवजी या मुलांना माडिया, गोंडी, वारली, कातकरी, इत्यादी भाषांची स्वतंत्र पुस्तकं उपलब्ध करून देणं, आणि त्या जोडीने मराठीची ओळख करून देणं, ही दिशा 'आदिभारती'च्या प्रयोगातून दाखवण्यात आली होती, त्या दिशेने पुढची वाटचाल करणं अधिक योग्य ठरलं असतं. त्यात दुरुस्त्या, सुधारणा गरजेच्या होत्या, हे वरती नोंदवलेल्या काही ओझरत्या मुद्द्यांवरूनही स्पष्ट होईल. उदाहरणार्थ, खुद्द लेखनात स्थानिकांचा सहभाग वाढवला तर अधिक स्पष्टता येईल. जसं- गेल्या वर्षीच्या या बालभारतीच्या पुस्तकांमध्ये स्पष्टपणे 'गोंडी' आणि 'माडिया' ही (भाषांतरापुरती का असेना) दोन स्वतंत्र पुस्तकं काढली गेली. ऐंशीच्या दशकातील 'आदिभारती'मध्ये 'माडिया-गोंडी' ही एकच भाषा असल्याप्रमाणे एकच पुस्तक निघालं. तर, आधीच्यात दुरुस्ती करून तज्ज्ञांना सोबत घेत, तसंच स्थानिक जाणकारांचा सहभाग वाढवून भाषेची पाठ्यपुस्तकं काढणं अधिक समजुतीचं ठरेल.

इथे आदिवासी भाषांच्या शालेय शिक्षणातील समावेशासंदर्भातल्या मोजक्याच प्रयोगांची दखल घेता आली. यातून काही प्रातिनिधिक चित्र स्पष्ट व्हायला मदत होईल अशी आशा. 'हिंदीसक्ती'चं अतिरेकी राष्ट्रवादी राजकारण किंवा इंग्रजी माध्यमाचा तथाकथित जागतिकतावादी सोस, यात ठराविक प्रवाहाचं प्रभुत्व कबूल करून मान तुकवणं आहे. पण मातृभाषेत प्राथमिक शिक्षण घेत बहुभाषिकताही स्वीकारत जाणं, यात तुलनेने बहुप्रवाहीपणा टिकवण्याचा प्रयत्न दिसतो. हा प्रयत्न मराठीप्रमाणेच आदिवासी भाषांबाबतही प्रामाणिकपणे होईल का?
आधीच्या काही निवडक नोंदी:
। नवीन नोंदींची माहिती आणि ऐच्छिक वर्गणी, 
या तपशिलासाठी उजवीकडचा समास पाहावा।

०३ ऑगस्ट २०२५

'मराठमोळ्या माधुरीचं मराठी' ऐकणारे एंगूगींचं म्हणणं ऐकतील का?

माधुरी 'राजश्री मराठी' या यूट्यूब वाहिनीवरून;
एंगूगी यांची प्रतिमा 'विकिमीडिया कॉमन्स'वरून

'मराठमोळ्या माधुरी'चा विरोधाभास

समजा, अभिनेते भरत जाधव यांची मुलाखत एखाद्या मराठी यू-ट्यूब वाहिनीवर असेल तर 'मराठमोळ्या भरतचंही मराठी ऐकावंसं वाटतं' असा संबंधित व्हिडिओचा मथळा आपल्याला बघायला मिळेल का? शक्यता वाटत नाही. साधारणपणे कोणत्यातरी परकेपणाचा, दुरावलेपणाचा, काहीएका अंतराचा किंवा मराठी अवकाशाबाहेरचा संदर्भ असतो, तेव्हा एखाद्या मराठी गोष्टीच्या वर्णनात 'मराठमोळे'पणाचा ठळक उल्लेख येतो. उदाहरणार्थ, 'मराठमोळ्या दिव्या देशमुखने रचला इतिहास : बुद्धिबळाच्या विश्वचषकात विजय!' ही अलीकडची बातमी. इथे स्पर्धा आंतरराष्ट्र्रीय पातळीवरची होती आणि ती जॉर्जियात झाली, ही पार्श्वभूमी असल्यामुळे नागपूरच्या बुद्धिबळपटूचं यशाचं वर्णन करताना मराठमोळेपणाचा संदर्भ स्वाभाविकपणे मनात येतो आणि नोंदवला जातो. इथे दिव्या यांचं महाराष्ट्राशी अजून असलेलं नातं आणि तरीही दूर अंतरावरच्या प्रदेशात, एका आंतरराष्ट्रीय मंचावर त्यांनी यश मिळवलं, याचा आनंद साजरा करताना 'मराठमोळं' हे विशेषण जुळतं. पण 'मराठमोळे लिओ वराडकर आयर्लंडच्या पंतप्रधानपदी' (एबीपी माझा, २ जून २०१७), ही काही वर्षांपूर्वीची बातमी पाहिली तर काय म्हणता येईल? वराडकरांचं आडनाव आणि वडिलांच्या बाजूने कौटुंबिक इतिहास तेवढा महाराष्ट्राशी जोडलेला आहे, बाकी व्यक्तीशः लिओ यांच्यात 'मराठमोळं' काही नाही. किंबहुना, मुंबईत डॉक्टरकी शिकून १९६० साली भारतातून इंग्लंडला नि मग आयर्लंडला गेलेल्या त्यांच्या वडिलांनाही आता मराठीत बोलता येत नाही. ते ज्या ठिकाणी राहत आले तिथले झाले, हे स्वाभाविक. पण मग आपण त्यांचं वर्णन नुसतं 'मूळचे मराठी वराडकर आयर्लंडच्या पंतप्रधानपदी' असं वस्तुस्थितीपुरतं करत नाही. त्यात प्रत्यक्षात नसलेलं 'मराठमोळे'पण आणतो.

या पार्श्वभूमीवर आता नोंदीच्या सुरुवातीला चिकटवलेली प्रतिमा पाहता येईल. त्यात माधुरी दीक्षित या अभिनेत्रीची 'बकेट लिस्ट' या मराठी चित्रपटानिमित्त महाराष्ट्रातच मुलाखत होत असताना तिचं 'मराठमोळं' असणं अधोरेखित केलंय. या 'मराठमोळ्या' व्यक्तीचं मराठी बोलणं स्वाभाविक न उरता त्यात काहीतरी विशेष आहे, 'ऐकावंसं वाटतं' असं वेगळं आहे, असं मथळ्यात सुचवलंय. काहीएक सांस्कृतिक दुरावा गृहित धरल्याशिवाय हा मथळा शक्य नाही. माधुरी दीक्षित आधी महाराष्ट्रात राहात असल्या तरी दीर्घ काळ हिंदी चित्रपटांमध्ये काम करत होत्या, अमेरिकेत कार्यरत असलेल्या मराठी पुरुषाशी लग्न झाल्यावर त्या अमेरिकेत गेल्या, मग आता गेली काही वर्षं  सहकुटुंब मुंबईत स्थायिक होऊन एका मराठी चित्रपटात अभिनय, दोन मराठी चित्रपटांची निर्मिती, काही महाराष्ट्रीय उत्पादनांच्या जाहिराती- असं मराठीपण त्यांच्या सार्वजनिक व्यवहारात दिसतंय. त्यामुळे इतक्या वर्षांच्या सांस्कृतिक अंतरांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आताच्या बातमीत 'मराठमोळे'पणा अधोरेखित केला जातो. शिवाय, त्यांच्याबाबतीत प्रत्यक्ष बोलण्यात स्वाभाविक न राहिलेली मराठी भाषा 'ऐकत राहावी', इथपर्यंत बातमीतून सुचवलं जातं. या विरोधाभासाचं खापर माधुरी दीक्षित यांच्यावर फोडण्यापेक्षा मराठी सार्वजनिक व्यवहाराचा अंदाज त्यातून बांधावा, असं वाटतं. यात एकीकडे काही मराठी मानल्या जाणाऱ्या बाह्य खुणा ठळक करायची हौस आहे, पण सहज-स्वाभाविक मराठी वावर मात्र नाही.

वर्ल्डव्ह्यू पब्लिकेशन्स, २००७ [१९८१]
नोंदीच्या सुरुवातीच्या प्रतिमेत दुसरी व्यक्ती आहे एंगूगी (न्गुगी) वा थ्योंगो. केनियातले एंगूगी सुरुवातीला इंग्रजी भाषेत साहित्य लिहू लागले, इंग्रजीचे प्राध्यापक तर ते होतेच. पण केनियात राज्य करून गेलेल्या वसाहतवाद्यांची भाषा वापरून आपण काहीतरी गमावतोय आणि आपण कोणासाठी लिहितोय तेही स्पष्ट होत नाही, अशा जाणिवेतून त्यांनी इंग्रजी लेखन (खासकरून कल्पित साहित्याचं इंग्रजीतून लेखन) सोडून दिलं आणि ते स्वतःच्या गिकुयू या मातृभाषेत लिहू लागले. त्यांना आधीही आंतरराष्ट्रीय म्हणता येईल अशी प्रसिद्धी मिळाली होतीच, अमेरिकेतल्या विद्यापीठांमध्ये ते साहित्यही शिकवत आले होते, आणि पुढेही गिकुयूतील कादंबऱ्या स्वतःच इंग्रजीत भाषांतरित करून त्यांनी समतोल टिकवून ठेवला, पण स्वतःच्या मूळ अवकाशाशी जोडून घेणं, आपल्या स्वतःच्या म्हणता येईल अशा ओळखीवरचा ताबा निसटू न देणं, हे त्यांना आवश्यक वाटलं. देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळालं तरी मनाच्या पातळीवरचं वासाहतिक पारतंत्र्य मात्र कायम राहतं, हे पारतंत्र्य नंतरही विविध जागतिक वर्चस्वाच्या व्यवहारांमुळे टिकवलंही जातं, याला प्रतिकार करण्याची इच्छाही त्यांना पुन्हा गिकुयूकडे घेऊन गेली. त्यांच्या या सर्व प्रवासाचा आणि त्यामागच्या विचारांचा दस्तावेज  'डिकलोनायझिंग द माइंड : द पॉलिटिक्स ऑफ लँग्वेज इन आफ्रिकन लिटरेचर' (वर्ल्डव्ह्यू पब्लिकेशन्स, २००७) या पुस्तकाच्या रूपात वाचायला मिळतो. इंग्रजी वापरण्यामुळे आपल्याला कोणत्या विरोधाभासांना सामोरं जावं, हेही त्यात त्यांनी नोंदवलंय. पुढे गिकुयूतून लिहायची निवड केल्यावर एंगूगी यांना अनेक गोष्टी पणालाही लावाव्या लागल्या. त्यांच्या काही कृतींमुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. तरीही ते अखेरपर्यंत- म्हणजे अगदी अलीकडे, २८ मे २०२५ रोजी वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी निधन होईपर्यंत त्यांच्या भूमिकेला धरून बोलत राहिले. या पुस्तकात एका ठिकाणी एंगूगी लिहितात :
लोकांच्या संपत्तीचं नियंत्रण करणं - म्हणजे लोक कशाचं उत्पादन करतायंत, काय उत्पादन करतायंत, आणि त्याचं वितरण कसं होतंय याचं नियंत्रण करणं-, हे वसाहतवादाचं खरं उद्दिष्ट होतं. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, लोकांच्या वास्तव जगण्याच्या भाषेचा संपूर्ण प्रांत ते नियंत्रित करू पाहत होते. वसाहतवादाने संपत्तीच्या सामाजिक उत्पादनावरचं हे नियंत्रण लष्करी मोहिमांद्वारे आणि त्यानंतर राजकीय हुकूमशाहीद्वारे लादलं. पण वसाहतवाद्यांच्या वर्चस्वाचा सर्वांत महत्त्वाचा प्रदेश वसाहतींमधील लोकसमूहांचं मानसिक विश्व हा होता. हे मानसिक नियंत्रण संस्कृतीच्या माध्यमातून प्रस्थापित करण्यात आलं. यातून लोकांचं स्वतःविषयीचं आकलन आणि त्यांचे जगाशी असणारे संबंध नियंत्रित केले गेले. मानसिक नियंत्रण नसेल तर आर्थिक नि राजकीय नियंत्रण कधीही पूर्ण किंवा परिणामकारक होऊ शकत नाही. एखाद्या लोकसमूहाच्या संस्कृतीचं नियंत्रण करणं म्हणजे इतरांच्या संदर्भात स्वतःची ओळख निश्चित करताना हे लोक जी काही साधनं वापरत असतील त्या साधनांचं नियंत्रण करणं. (पान १६)
'मराठमोळ्या' राजकारणातला विरोधाभास

'मराठमोळे'पणाच्या काही उल्लेखांमध्ये विरोधाभास का निर्माण होतो आणि तो विरोधाभास 'स्वतःची ओळख निश्चित करण्या'शी संबंधित कसा आहे, हे वरच्या भागावरून स्पष्ट होईल असं वाटतं. या विरोधाभासाची अनेक रूपं आपल्याला आपल्या राजकारणात आणि समाजकारणात दिसतात. अलीकडे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या (स्टेट बोर्ड) शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी ही भाषा सक्तीची किंवा अप्रत्यक्ष सक्तीची करण्यावरून बराच वाद झाला, त्या वेळी हा विरोधाभास दिसलाच. 

मराठी माध्यमाच्या शाळांपुरतं बोलायचं तर, पहिलीपासून (खरंतर नवीन शैक्षणिक धोरणानुसार, बालवाडीपासूनच) इंग्रजी भाषा हा विषय आहे, आणि पाचवीपासून हिंदी हाही विषय येतो. इंग्रजी पहिलीपासून सुरू करण्यात आली, त्यामागे काही व्यावहारिक कारणं होती (त्यावर आपण नोंदीत पुढे बोलूच); पण हिंदीच्या पहिलीपासून होणाऱ्या अप्रत्यक्ष सक्तीमागची कारणं कोणती, हेतू कोणते, उद्दिष्टं कोणती, याबद्दल अनेकांना रास्त शंका वाटत आली आहे. महाराष्ट्र शासनाने १६ एप्रिल २०२५ रोजी हिंदी अनिवार्य करणारा निर्णय जाहीर केला, त्यावर विरोध झाला. त्यामुळे १७ जूनला त्यात 'दुरुस्ती' करून हिंदीशिवाय इतर काही भारतीय भाषाही पहिलीपासून शिकता येतील असं शासननिर्णयात नमूद करण्यात आलं, पण त्यातल्या चमत्कारिक अटी बघता व्यवहारात ती अप्रत्यक्ष हिंदीसक्तीच होईल, हे लक्षात घेऊन याही निर्णयाला विविध स्तरातून विरोध झाला. मग राज्य सरकारने निर्णय मागे घेतला नि त्रिभाषासूत्राबद्दल विचारविनिमय करायला एक समिती नेमली. या समितीचा अहवाल तीन महिन्यांनी येईल, असं कळतं. पण त्याआधीच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पुढील विधान ऐकायला मिळालं :
पण एक गोष्ट निश्चित सांगतो की, तीन भाषा सूत्र हे महाराष्ट्रात लागू होईलच... त्रिभाषासूत्र शंभर टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करू माझा सगळ्यांत जास्त विरोध कशाला असेल तर, इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि भारतीय भाषांना विरोध करायचा, भारतीय भाषांना विरोध मी सहन करणार नाही.(मुंबई तक, १६ जुलै २०२५)
पाचवीपासून आधीच लागू असलेलं त्रिभाषासूत्र पुन्हा लागू होणार म्हणजे त्याआधी कधीतरी होणार, असा निकाल मुख्यमंत्र्यांनी सांगून टाकलेला आहे. आता समिती फक्त कितवीपासून हे सूत्र लागू होणार, हे ठरवेल, असा त्याचा अर्थ निघतो. त्यांच्या वरच्या विधानातला उत्तरार्ध ढोंगीपणाचा आहे. आत्ताच्या वादातला मुख्य मुद्दा मराठी शाळांमध्ये पहिलीपासून हिंदीची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सक्ती कशाला, असा होता. इंग्रजीला पायघड्या, इतर भारतीय भाषांना विरोध, हे मुद्दे इथे आणणं दिशाभूल करणारं आहे. इतर भारतीय भाषा शिकवणं ही खरंतर भारतासारख्या देशात स्वागतार्ह बाब ठरू शकते. तसं करायचं तर पाचवी-सातवीपासून प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन पद्धतीने विविध भाषांशी ओळख करून घेण्याची काही सोय करून देणं, त्या निर्णयांबाबतीत तज्ज्ञांशी सल्लामसलत करणं, आदी गोष्टी करता येतील. ते न करता फक्त हिंदीला पाचवीऐवजी पहिलीपासून स्थान देणं हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या एकसाची राष्ट्रीयत्वाशी सुसंगत धोरण अनेकांना स्वाभाविकपणे धोकादायक वाटलं. हा एकसाची अस्मितेचा वसाहतवादच होऊन जातो. एकच वंशसांस्कृतिकता (एथ्निसिटी), एकच राष्ट्रवादी मूल्यधारणा, त्याला सोयीच्या एकाच भाषिक, धार्मिक धारणांना अधिक प्राधान्य (दाखवण्यापुरतं तरी), मग त्यासोबत येणारी नियंत्रणं- यात इतर अस्मितांशी निगडीत संघर्ष तीव्र होत जाताना दिसतात. 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, २०२४
विशेष म्हणजे खुद्द फडणवीस यांची मुलगी दहावीची परीक्षा पास झाल्याच्या बातम्या काही महिन्यांपूर्वी आल्या, तेव्हा ती मुंबईतल्या कॅथेड्रल स्कूल या ख्रिस्ती मिशनरी शाळेतून सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम शिकून दहावी झाल्याचं कळतं. सीबीएसई शाळांमध्ये इंग्रजी पहिली भाषा, हिंदी दुसरी भाषा आणि महाराष्ट्रातली प्रादेशिक भाषा म्हणून मराठी ही तिसरी भाषा असते. या इंग्रजीला पायघड्या आहेत की नाही? अगदी अलीकडे, २२ जुलैला मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी त्यांच्या हस्ते गडचिरोलीत लॉयड मेटल्स कंपनीच्या पुढाकाराने सुरू झालेल्या एका सीबीएसई शाळेचं उद्घाटन झालं. मुंबईत आणि महाराष्ट्रात बंद पडणाऱ्या मराठी शाळांची मोजदाद करायची तर वेगळा लेख लागेल.  राज्यकर्त्यांची धोरणंच मराठीसारख्या (आणि गोंडी, भिलोरी, गोरमाटी, इत्यादींसारख्या) भारतीय भाषांविरोधात जाणारी आहेत!

सरकारने हिंदी अनिवार्य करण्यासंबंधीचा पहिला शासननिर्णय एप्रिल महिन्यात काढला, पण त्याआधीच मार्च महिन्यात 'राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे'ने शिक्षकांसाठीचं एक मार्गदर्शन-पुस्तक छापलं. त्यात पहिलीतही हिंदी ही तिसरी भाषा गृहित धरून मार्गदर्शन केलंय. ही पुस्तकं अजूनही शाळांकडे आहेतच. त्यामुळे तात्पुरता मागे घेतलेला निर्णय परत पुढे येण्याची भीती काही जण वर्तवतायंत ती खरीच आहे.

राज्य सरकारने हिंदीसक्तीचा निर्णय तात्पुरता मागे घेतल्यानंतर या निर्णयाला विरोध करणाऱ्यांपैकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचे उद्धव ठाकरे यांचा एक विजयी मेळावा मुंबईत ५ जुलैला झाला. 'आवाज मराठीचा' असं त्या वेळी स्टेजच्या मागे लिहिलं होतं. खुद्द ठाकरेबंधूंची मुलं इंग्रजीत शिकली यावर काही जण आक्षेप घेतात, त्याबद्दल प्रत्युत्तर देताना या वेळी राज ठाकरे म्हणाले, "कोणी कुठे शिक्षण घेतलं त्याचा काय संबंध! ... तुमचा कडवटपणा तुम्ही शिक्षण कुठे घेतलं याच्यावर नसतो, तो तुमच्या आतमध्ये असावा लागतो."
 
राज आणि उद्धव या दोन्ही ठाकरेबंधूंची मिळून चार मुलं बॉम्बे स्कॉटीश स्कूल या सीबीएसई बोर्डाच्या, ख्रिस्ती मिशनरी संस्थेच्या शाळेत शिकली आहेत. पण मराठीविषयीचा 'कडवटपणा' हा काही शालेय माध्यमाशी संबंधित प्रश्नच नाही, असं राज ठाकरे बिनधास्त म्हणू शकतात, त्यावर शेकडो लोक टाळ्याही वाजवतात. हा विरोधाभास 'मराठमोळ्या माधुरीच्या मराठी'सारखाच आहे. यात स्वतःच्या भाषेविषयीचा सहजभाव नाही तर कडवट भावच आहे. त्यात मग 'खळखट्याक' राजकारणाला प्राधान्य मिळतं. मे २००८ मध्ये अशाच 'कडवट' कार्यकर्त्यांनी  'बॉम्बे स्कॉटीश स्कूल'च्या पाटीवरच्या 'बॉम्बे' शब्दाला काळं फासून तिथे 'मुंबई' लिहिलं, त्या वेळी तिथे राज ठाकरे यांची धाकटी मुलगी आणि उद्धव ठाकरे यांचा धाकटा मुलगा शिकत होते (टाइम्स ऑफ इंडिया, मे २००८). त्याच्या आदल्या वर्षी शिवसेनेने 'बॉम्बे' शब्द असलेल्या संस्थांविरोधात मोहीम राबवली होती, पण त्यातून बॉम्बे स्कॉटीश शाळेला सूट देण्यात आली, असं कळतं. हा विरोधाभासही फक्त टाळ्या किंवा कानाखाली वाजवून समजून घेतला की आपण 'मराठमोळे' होतो!

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वालील शिवसेना पक्ष बृहन्मुंबई महानगरपालिकेची धुरा गेली पंचवीस वर्षं सांभाळतोय. गेल्या दहा वर्षांत एकट्या मुंबईत महानगरपालिकेच्या शंभराहून अधिक मराठी शाळा बंद पडल्या (हिंदुस्तान टाइम्स, १३ मे २०२५). त्यावर उपाय म्हणून आधीच्या राज्य सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने महानगरपालिकेच्या काही शाळांना सीबीएसईशी जोडण्यात आलं. म्हणजे त्या शाळांचं रूपांतर मराठी माध्यमातून इंग्रजी माध्यमात झालं! हे स्वतःहून अभिमानास्पद असल्याप्रमाणे त्यांनी जाहीर केलं (फेसबुक, १५ डिसेंबर २०२१ची पोस्ट). खुद्द राज्य सरकारचं पाठ्यपुस्तक मंडळ सक्षम करण्यापेक्षा एखाद्या केंद्रीय किंवा तथाकथित आंतरराष्ट्रीय पाठ्यपुस्तक मंडळाशी शाळा जोडणं, त्यातली इंग्रजी-हिंदी-मराठी ही उतरंड मान्य करणं, याचा हा अभिमान होता.

मुंबई महानगरपालिका ही भारतातली सर्वांत श्रीमंत नगरपालिका आहे. महाराष्ट्र हे राज्यही सकल घरेलू उत्पन्नाच्या निकषावर देशातील पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. एकीकडे इतकी आर्थिक श्रीमंती, इतकं भांडवल असलेल्या या प्रदेशातल्या स्थानिक भाषांची अवस्था कायम रड असल्यासारखी का, या प्रश्नाचं काही अंशी उत्तर एंगूगी यांच्या वर नोंदवलेल्या अवतरणात आहे : "मानसिक नियंत्रण नसेल तर आर्थिक नि राजकीय नियंत्रण कधीही पूर्ण किंवा परिणामकारक होऊ शकत नाही. एखाद्या लोकसमूहाच्या संस्कृतीचं नियंत्रण करणं म्हणजे इतरांच्या संदर्भात स्वतःची ओळख निश्चित करताना हे लोक जी काही साधनं वापरत असतील त्या साधनांचं नियंत्रण करणं." एखाद्या लोकसमूहाकडील इतक्या भांडवलाचं नियंत्रण करताना भाषेच्या माध्यमातून नागरिकांच्या मनांचं, आपल्या मूल्यसाठ्याचं नियंत्रण करणंही संबंधितांना आवश्यक वाटतं, मग त्यातून हा एक प्रकारचा नवा वसाहतवाद किंवा साम्राज्यवाद कार्यरत राहतो.

इंग्रजी माध्यमाचा विरोधाभास

कूमी कपूर या पन्नासहून अधिक वर्षं इंग्रजी पत्रकारितेचा अनुभव असणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांनी अलीकडे 'इंडियन एक्सप्रेस'मध्ये 'इन्साइड ट्रॅक' या त्यांच्या सदरातून मुंबईतल्या हिंदी-मराठी वादावर टिप्पणी केली (इंडियन एक्सप्रेस, १३ जुलै २०२५). 'मराठा लेटकमर' या शीर्षकाखाली त्या म्हणतात, "माझा जडणघडणीचा बहुतांश काळ मुंबईत गेला असला तरी माझी मराठी अगदी बेताचीच आहे, ही शरमेची बाबही मला कबूल करायला हवी." त्यानंतर त्या मुंबईच्या बहुसांस्कृतिक इतिहासाविषयी लिहितात, इतर भाषक लोकही मुंबईत मोठ्या प्रमाणात असल्याचं नोंदवतात, आणि खुद्द बाळ ठाकऱ्यांच्या अनेक मुलाखती आपण इंग्रजीतच कशा घेतल्या हेही लिहितात! मुंबईचा बहुसांस्कृतिक वारसा नाकारता येणार नाही आणि रस्त्यावर येता-जाता कोणालाही मराठी बोलता येतेय की नाही यावरून कानाखाली वाजवणं हेही बरोबर नाही. पण कपूर यांचा लेख एवढं बोलून थांबत नाही. 'मराठी माणूस प्रत्यक्षात मुंबईमध्ये उशिराने स्थलांतरित झाला,' असा दावा त्या करतात. पुढच्या वाक्यात मुंबईतल्या बेटांवरचे मूळ रहिवासी कोळी मच्छिमार नि आगरी शेतकरी असल्याचं नोंदवतात, पण हे लोक कोणत्या भाषेत बोलत आले, हे मात्र नोंदवत नाहीत! या मूळ रहिवाशांची भाषा मराठी (ती तथाकथित प्रमाण मराठीच असायला हवी असं नाही) असेल तर, मग मराठी माणूस मुंबईत 'लेटकमर' कसा ठरतो! महाराष्ट्रातच नव्हे सगळ्या भारतात बहुतांश प्रांत बहुसांस्कृतिक आहेत, मुंबईतल्या पैशामुळे बहुसांस्कृतिकतेची रूपं वेगवेगळ्या तऱ्हेने आणि ठळकपणे दिसतात, पण तो इथला मुद्दा आहे का? 

लेखाच्या शेवटी कपूर लिहितात, इंग्रजीत बोलणं हा वसाहतवादाचा दुष्परिणाम असल्याचं म्हणणं ही सध्याच्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची राजकीय फॅशन आहे, पण "बहुतांश भारतीयांसाठी इंग्रजी ही आकांक्षेची आणि महत्त्वाकांक्षेची भाषा आहे. आपल्या मुलांना खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पाठवता यावं आणि शिकवण्यांची फी भरता यावी म्हणून आपण जास्त कमाईसाठी काम करतो, असं माझ्याकडचे जवळपास सर्वच घरगुती मदतनीस (घरगडी, मोलकरणी!) मला अभिमानाने सांगत आले आहेत!"

आपल्या घरात काम करायला येणाऱ्या लोकांना त्यांची मुलं इंग्रजीत शिकवण्यासाठी जास्त काम करावं लागतं, हे ती माणसं 'अभिमानाने' सांगतायंत, असं कपूर यांच्यासारख्या इतक्या ज्येष्ठ पत्रकाराला वाटतं, याचा संबंधही एंगूगींच्या अवतरणाशी जोडता येईल. 'इंडियन एक्सप्रेस'मध्ये प्रदीर्घ काळ लेखन करत आलेल्या कपूर यांच्या वाचनात याच वृत्तसमूहाचा 'लोकसत्ता' हा मराठी पेपर येत नसणार, नाहीतर आठवडाभर आधी तिथे आलेली पुढील बातमी कदाचित त्यांच्या नजरेसमोरून गेली असती :

लोकसत्ता, ५ जुलै २०२५

पंच्याहत्तरी ओलांडलेले अंबादास पवार शेतजमिनीच्या मशागतीसाठी बैलांऐवजी स्वतःच्या खांद्यावरून जू ओढत असल्याचा व्हिडिओ जुलै महिन्याच्या सुरुवातीला समाजमाध्यमांवरून मोठ्या प्रमाणावर फिरला. मग त्यांना कोणी ट्रॅक्टरची मदत केली, कोणी कर्ज भरायला मदत केली, इत्यादी बातम्या येत राहिल्या. त्यातच ठाकऱ्यांचा विजयी मेळावा झाला त्याच दिवशी आलेल्या वरील बातमीत अंबादास पवार म्हणतात :
शेतीचं जमवून आणू हो, पण दोन नातवांच्या इंग्रजी शाळेचं शुल्क देण्यामुळे हैराण झालो. ... इंग्रजी शाळेचं शिक्षण काही परवडत नाही.
कूमी कपूर यांना त्यांच्या घरातील कामगार जी गोष्ट अभिमानाने सांगतायंत असं वाटत होतं, त्या गोष्टीचा प्रत्यक्षात त्या व्यक्तींना जाच होत असण्याची शक्यता आहे, हे प्रातिनिधिक 'जू' त्यांना झेपत नसण्याची शक्यता आहे! 

आधीच शेतीमुळे दयनीय आर्थिक अवस्था अनुभवणाऱ्या अंबादास पवार यांच्या कुटुंबियांना स्वाभाविकपणे त्यांच्या घरातली पुढची पिढी इंग्रजीतून शिकावीशी वाटते, किमान इंग्रजी शिक्षणाने आपल्या मुलांना रोजगाराची संधी मिळेल, त्यातून किमान स्थैर्य येईल, ही आशा स्वाभाविकच आहे (काहींच्या बाबतीत ते घडतही असतं; पण प्रमाणानुसार हे पाहायला हवं). ही अशी विरोधाभासाने ग्रासलेली दयनीय परिस्थिती निर्माण करण्यात राजकीय नेते, पत्रकार-विचारवंत-तज्ज्ञ यांच्यासारखे बुद्धिजीवी, आणि अर्थातच आर्थिक नाड्या हातात असणारे वर्ग, तसंच 'मराठमोळे'पणाच्या फक्त बाह्य खुणांमध्ये मश्गूल मध्यमवर्ग यांचा अधिक हातभार असल्याचं दिसतं. पण शेवटी अंबादास पवार यांची समस्या तर खरी आहे, पण त्यावर इंग्रजी माध्यम हा उपाय आहे की इंग्रजी ही एक भाषा म्हणून शिकवून त्या समस्येवर उपाय शोधता येईल, या प्रश्नाला धरून पुढच्या भागाकडे जाऊ.

मराठी शाळांमध्ये पहिलीपासून इंग्रजी हाही विरोधाभासच का?

साधना, १५ जानेवारी २०००
राज्यातील मराठी शाळांमध्ये पहिलीपासून इंग्रजी हा एक विषय म्हणून लागू करण्याचा निर्णय २००० साली लागू झाला. त्या वेळीसुद्धा वाद झाला होता. या वादाच्या विविध बाजू धुंडाळण्याचं काम 'साधना' साप्ताहिकाच्या १५ जानेवारी २००० रोजीच्या अंकात करण्यात आलं. त्यात तत्कालीन शिक्षण मंत्री रामकृष्ण मोरे यांची हरी नरके यांनी घेतलेली सविस्तर मुलाखत, भाषावैज्ञानिक अशोक केळकर यांचा पहिलीपासून इंग्रजीच्या निर्णयाला विरोध करणारा लेख, सरकारच्या निर्णयाचं समर्थन करणारा शिक्षणतज्ज्ञ मीना चंदावरकर यांचा लेख, इत्यादी मजकूर आहे. या तिघांचाच मजकूर पूर्ण वाचण्यासारखा आहे. 

या निर्णयाची घोषणा नोव्हेंबर १९९९मध्ये करण्यात आली आणि जून २०००मध्ये सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून तो लागू झाला. दरम्यानच्या काळात येणाऱ्या उन्हाळी सुट्टीत शिक्षकांना यासंबंधी आवश्यक प्रशिक्षण देणं, इत्यादी गोष्टी मोरे यांच्या मुलाखतीत नोंदवलेल्या आहेत. शाळांशी संबंधित आवश्यक आकडेवारीपासून इतरही मुद्दे त्यांनी नोंदवले आहेत. त्यांचे काही मुद्दे असे: 
  • मातृभाषेमुळे कोणत्याही विषयाचं आकलन लवकर होतं. त्यामुळे प्राथमिक स्तरावर मातृभाषेतूनच शिक्षण मिळणं आवश्यक आहे. 'इंग्रजी माध्यमातून शिक्षण' आणि 'इंग्रजी इतर विषयांप्रमाणेच एक विषय म्हणून अभ्यासणं' यात गल्लत करता कामा नये. आम्ही माध्यम म्हणून नव्हे तर भाषा म्हणून हा निर्णय घेतलेला आहे..
  • इंग्रजी माध्यमात शिकणारी मुले कोणत्या आर्थिक व सामाजिक स्तरातील असतात याचा शोध घेतल्यास असे आढळून येते की, इंग्रजी माध्यमवाले म्हणजे समाजातले उच्चवर्णीय ठरतात. इतर भाषिक आपोआपच हलके ठरतात. हा दृष्टिकोन बदलायचा असेल तर इंग्रजीचे फॅड दूर करावे लागेल. मात्र ते 'इंग्रजी हटाव'ने दूर होईल का? इंग्रजीच्या अध्ययनामुळे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व येईल व सर्व ज्ञान आपोआप प्राप्त होईल असा माझा भ्रम व दावा नाही. तरीही इंग्रजी भाषा हा एक विषय इयत्ता पहिलीपासून सुरू केल्यास विद्यार्थ्यांना तो अतिशय उपयोगी ठरून त्यांच्या पालकांची सध्या होणारी पिळवणूक थांबेल आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास यातून त्यांची स्पर्धेत टिकून राहण्याची पात्रता उंचावेल. ही नवीन वर्णव्यवस्था मोडून काढून सर्व क्षेत्रांत मराठी भाषिक आघाडीवर रहावेत, म्हणून आम्ही ही उपाययोजना करीत आहोत.
  • एवढा महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी मी या क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी तपशीलवार साधकबाधक चर्चा केलेली आहे. या निर्णयाचे होणारे सारे परिणाम अभ्यासून मगच विचारपूर्वक पावले टाकलेली आहेत. शिक्षण तज्ज्ञांबरोबरच शेतमजूर, मोलकरणी, हमाल, टॅक्सी-ड्रायव्हर, कामगार, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांतल्या अनेकांशी मी स्वतः बोललो असता त्यांनी या निर्णयाचे खुल्या दिलाने स्वागत केले आहे. महाराष्ट्रात या निर्णयाचे सर्व स्तरांतून व्यापक स्वागत तर काही प्रमाणात विरोधी सूर असे सर्वसाधारण चित्र आहे. ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्यातल्या काही 'सद्हेतूने' दिलेल्या आहेत, तर काही 'सहेतुक' आहेत, अर्थात मी सर्वांचे स्वागत करतो. त्यांचा आदरपूर्वक अभ्यास करूनच मी पुढे जाईन. कालच आम्ही या संदर्भात अभ्यासक्रम तयार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त केलेली आहे. राज्याच्या सर्व भागांतील या विषयातील नामवंत तज्ज्ञ या समितीत असून, 'संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद' हे या समितीचे अध्यक्ष आहेत. २३ नामवंत तज्ज्ञांची ही समिती ३१ जानेवारी २००० पर्यंत इयत्ता पहिलीचा अभ्यासक्रम तयार करील व तोच जून २००० पासून कार्यान्वित होईल.
पहिलीपासून हिंदी नको, मग इंग्रजी कशी चालते? यात विरोधाभास नाही का? असे प्रश्न मराठीसंबंधी काम करणाऱ्या काही मंडळींनी पूर्वीही विचारले आहेत. इंग्रजीसंबंधीचा हा निर्णय जगाच्या बदललेल्या व्यवहाराच्या अनुषंगाने झालेला आहे. या बदलाची चिकित्सा वेगळी करता येईल. पण सध्या जे काही समोर आहे त्यात एखाद्या मुला-मुलीला आयटीआयचा कोर्स करायचा असेल किंवा आयआयटीमध्ये जायचं असेल, तरी इंग्रजीची किमान ओळख व्हावी लागते. ही ओळख मराठी शाळांमध्ये पाचवीपासून होत होती (त्याआधी आठवीपासून होत होती), पण त्यापेक्षा ती ओळख पहिलीपासूनच झाली तर एक भाषा म्हणून मराठी अवकाशातली मुलं इंग्रजीला बिचकणार नाहीत, अशा उद्देशातून हा निर्णय झाल्याचं मोरे म्हणतात. मीना चंदावरकर यांनी याच भूमिकेतून पहिलीपासून इंग्रजी शिकवण्याचं समर्थन केलं आहे. त्यातले मुद्दे मोरे यांच्याशी जुळणारे आहेत आणि चंदावरकरांनी स्वतःच्या अनुभवातील काही निरीक्षणांची आवश्यक जोडही त्याला दिली आहे..

अक्षरलेखन : र. कृ. जोशी, मॅजेस्टिक, १९८३
या आवृत्तीचं मुखपृष्ठ सापडलं नाही
या निर्णयाला विरोध करणारे तीन लेख वरील अंकात आहेत, त्यातला भाषावैज्ञानिक अशोक केळकर यांचाच लेख महत्त्वाचा आहे. 'साधना'तल्या लेखाव्यतिरिक्त 'वैखरी' (मॅजेस्टिक बुक स्टॉल, १९८३) आणि 'मध्यमा' (मेहता पब्लिशिंग हाऊस, १९९६) या त्यांच्या इतर दोन पुस्तकांमध्ये या मुद्द्यावरचं त्यांचं लेखन आलंय, त्याचेही संदर्भ इथे विचारात घेऊ. त्याआधी, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून असण्याची आवश्यकता इतर अनेकांप्रमाणे केळकरांनीही अर्थात नोंदवलीच आहे. पण पुढे-पुढे शिक्षणातल्या विषयांच्या वैविध्यानुसार इतर भाषाही स्वीकारण्याबद्दल ते मांडणी करतात, ती स्वतंत्रपणे वाचण्यासारखी आहे. आत्ता एकाच मुद्द्यापुरतं बोलू.

पहिलीपासून इंग्रजी हा विषय शिकवण्याला विरोध करताना केळकरांनी 'साधना'तल्या लेखात मांडलेला एक मुद्दा असा : "स्वभाषेचा पाया पक्का व्हायच्या आधीच दुसरी भाषा घुसवणे म्हणजे लहान वयात मुलांवर ताण पडणे, स्वभाषेचा पाया कच्चा राहणे, आणि इंग्रजीचा पायाही कच्चा राहणे अशा तिहेरी अन्यायाला आमंत्रण देणे आहे." 

पण १९८९ साली केळकरांनी लिहिलेला दुसरा एक लेख या संदर्भात पाहायला हवा. 'महाराष्ट्र राज्य शिक्षण क्षेत्रातील मराठी भाषेचे स्थान' या विषयावर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी एक बैठक बोलावली होती (पवारांच्या नेतृत्वाखालील विद्या प्रतिष्ठानाने बारामतीत १९७२ सालीच इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली, हेही एक जाताजाता लक्षात ठेवता येईल! पण किमान मुख्यमंत्री असताना तरी ही बैठक बोलावली, एवढं आहे). या बैठकीसमोर तीन टिपणं ठेवली होती. त्या टिपणांना प्रतिसाद देत केळकरांनी लिहिलेला लेख 'मध्यमा' या त्यांच्या पुस्तकात समाविष्ट आहे. यात ते लिहितात :
[बैठकीत तज्ज्ञांसमोर विचारार्थ ठेवलेल्या टिपणांपैकी] टिपण क्रमांक, १..मध्ये सुचवलेला बदल ('पूर्वप्राथमिक व प्राथमिक शिक्षणात इंग्रजी हा फार तर विषय म्हणून ठेवावा. पण माध्यम म्हणून अजिबात राहू देऊ नये') रास्त आणि सध्याच्या विपरीत अवस्थेशी जरुरीपुरतेच जमवून घेणारा म्हणून व्यवहार्य वाटतो.
मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक शिक्षणात इंग्रजी हा फार तर विषय म्हणून ठेवावा, पण माध्यम म्हणून अजिबात राहू देऊ नये, हा बदल रास्त आणि सध्याच्या विपरीत अवस्थेशी जरुरीपुरतेच जमवून घेणारा म्हणून व्यवहार्य वाटतो- असं विधान १९८९ साली करणाऱ्या केळकरांना २००० साली मात्र पहिलीपासून इंग्रजी शिकवली गेल्यास मराठीचाही पाया कच्चा राहील असं वाटतं, हे कसं?  विविध कारणांमुळे अवस्था विपरीत आहे, हे ते मान्य करतात. या परिस्थितीशी जरुरीपुरतं जमवून घेण्यासाठी पहिल्या इयत्तेपासून इंग्रजी आणली तर ते 'व्यवहार्य' असल्याचंही मान्य करतात. मग २००० साली त्यांचा आक्षेप नक्की कोणत्या आधारावर आहे. याबद्दलचे त्यांचे आक्षेप भाषाविज्ञानाच्या अंगाने जाणारे नाहीत, तर मुख्यत्वे आपल्या एकंदर शैक्षणिक संस्थांच्या कमकुवत कसाशी संबंधित आहेत. ते मुद्दे स्वतंत्रपणे रास्त असले तरी ते केवळ भाषाविषयांना लागू होणारे नाहीत; आपल्या एकंदर शिक्षणव्यवस्थेसंबंधी ते बोलता येईल (खरंतर, याबाबतीत प्रस्तुत लेखकाचं मत टोकाचं आहे, कारण या देशातल्या किंवा परदेशातल्याही आधुनिक शिक्षणव्यवस्थेत व्यक्ती नक्की कुठपर्यंत स्वतंत्र विचार करू शकते, याविषयी शंका वाटत राहते. कागदोपत्री 'जरुरीपुरतं' जमवून घ्यायचा व्यवहार म्हणून ठीक आहे). शिवाय, पुढे केळकरांनी शाळांचा कस अनुमानाच्या आधारे देऊन शिक्षणसंस्थांची वर्गवारी केलेय, त्या वर्गवारीतल्या भयंकर धोकादायक विरोधाभासांवर स्वतंत्रपणे बोलावं लागेल. पण एकदा एखादी गोष्ट व्यवहार्य म्हणून 'जरुरीपुरती' योग्य वाटली असताना अकरा वर्षांनी तिला पूर्ण विरोध करण्याऐवजी केळकरांसारख्या विद्वानाने त्या व्यवहारात दुरुस्त्या सुचवणं अधिक रास्त वाटतं. विशेषतः या अकरा वर्षांच्याच दरम्यान भारताने आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं, इतर बऱ्या-वाईट बदलांचा वेग वाढायला सुरुवात झाली, जागतिकीकरणाचा मुद्दा अधिक चर्चेत आला, इत्यादी. म्हणजे भाषेच्या या मुद्द्यातली 'विपरित' परिस्थिती आणखी तीव्र झाली. मग त्यावरच्या व्यावहारिक उपायाचाही आणखी धड विचार त्यांनी तरी करायला हवा होता. [अशोक केळकरांच्या लेखनाविषयी खूप आस्था आणि आदर वाटत असूनही या विशिष्ट बाबतीत त्यांनी सुचवलेल्या काही गोष्टींशी सहमत होता आलं नाही. त्या असहमतीची मांडणी करत गेल्यावर ही नोंद दुपटीने वाढली, शिवाय विषयांतरही होऊ शकतं. त्यामुळे सध्या वरच्या एका मुद्द्यावरून केळकरांच्या मांडणीतील विरोधाभास स्पष्ट होईल, असं वाटतं.]

एका आदिवासी समूहाच्या भाषेत पाच किंवा सातपर्यंतच अंक मोजण्यासाठीचे शब्द आहेत. त्या समूहाच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीत याहून अधिक अंकमोजणी गरजेची भासली नाही, त्यामुळे ते स्वाभाविक. त्यात मागास किंवा प्रगत असा मूल्यनिवाडा नको. पण आता सध्याचं गणित शिकावंसं वाटलं तर त्या समूहातल्या मुला-मुलीला पाच वा सातच्या पुढे दुसऱ्या भाषेतले अंक घ्यावे लागतात. तसं मराठीलाही एका ठराविक टप्प्यानंतर गणित किंवा विज्ञान या विषयांसाठी इंग्रजी स्वीकारावी लागते. पण पहिले पाच अंक माझ्या आदिवासी भाषेतून येणं, त्यासोबतचा मूल्यसाठा आणि स्मृतिसंचय माझ्यासोबत असणं आवश्यक आहे की नाही? शेवटी, गणित नि विज्ञान यांचं उपयोजन आपण कोणत्या समाजात आणि संस्कृतीत करतोय याविषयीचं सजग भान कशातून येईल? असे प्रश्न विचारात घेता येतील. त्याहून महत्त्वाचं म्हणजे गणित नि विज्ञान हे सोडूनही बरेच विषय जगात आहेत, त्यासाठी मातृभाषा/स्वभाषा यांचं स्थान किती नि कसं महत्त्वाचं आहे हे अनेकांनी नोंदवलं आहेच. "ज्ञानाची खिडकी इंग्रजीची असली तरी या खिडकीतून पाहणारे डोळे स्वभाषेचेच पाहिजेत. नाहीतर ज्ञानाचे रूपांत माहितीच्या अडगळीत," अशी केळकरांची या मुद्द्यावरची अगदी समर्पक टिप्पणी आहे (मध्यमा, पान २१).

इतरही कारणाने माणूस दुसऱ्या भाषांचा स्वीकार करतो. उदाहरणार्थ, एक साधारण पस्तिशीतला मारवाडी माणूस. त्याला दोन मुलगे नि एक मुलगी. राजस्थानात शेतजमीन आहे, पण कुटुंबातली खायची तोंडं वाढल्यावर जमिनीचा आकार उपजीविकेसाठी पुरेसा न ठरल्यामुळे माणसं इतर राज्यांमध्ये रोजगाराच्या शोधात गेली. हा माणूस, त्याच्याआधी त्याचा भाऊ अशी मंडळी कोकणात आली. कपड्यांच्या दुकानात तो काम करतो. पंधराएक वर्षं होऊन गेली. त्याला मराठी येते, बायकोला मराठी येत नाही, तीनही मुलं मराठी शाळेत शिकतात. शेवटी आपण व्यवसाय ज्या समाजात करतोय तिथली भाषा यायला हवी, इतपत त्यामागचा उद्देश. या शाळेत मुलांना औपचारिक इंग्रजी संभाषणाचं कौशल्य शिकवण्यासाठी प्राथमिक इयत्तांसाठी एक शिक्षिका नेमली. तिला हा मारवाडी मनुष्य म्हणाला, "हे बडं आहे. आता ते टेन्शन नाई. मुलाला इंग्लिश शाळेत घातलं का नाई, आता तो प्रॉब्लेम नाई." या माणसाची मातृभाषा मराठी नसूनही त्याला उपजीविकेच्या कारणामुळे मराठी कामापुरती स्वीकारावी लागते, पण इंग्रजी ही जगात गरजेची होत असल्याचं ओझंही जाणवतं, ते मुलांसाठी हलकं होणार असल्याची शक्यता त्याला दिलासा देते. त्यात अध्यापनाच्या दृष्टीने दुरुस्ती सुचली तर सुचवायला हवीच, पण त्या माणसाच्या जगण्याची दखल घेऊन यावर बोललेलं बरं.

आणखी एक उदाहरण : स्टेट बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दुसरीमध्ये शिकणारा, सात वर्षांचा मध्यमवर्गीय मराठी घरातला एक मुलगा. त्याला विचारलं, "शाळेत इंग्रजी बोलतोस का?" तो म्हणाला, "आमाला शाळेत इंग्लिशच बोलायला लावतात, आणि कसंय ना, टीचर सगळे एकमेकांशी मराठीत बोलतात, मग काय. आमाला इंग्लिश." हे दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा भेटल्यावर मी विचारलं नसतानाही स्वतःहूनच तक्रारीच्या सुरात सांगितलं. ही तक्रार कशाबद्दलची आहे? आपण स्वाभाविकपणे बोलतो ती भाषा, आपले शिक्षक स्वाभाविकपणे बोलतात ती भाषा  शाळेत मात्र अजिबात बोलायची नाही, याला काय म्हणतात? याला पारतंत्र्याचंच एक रूप म्हणता येतं. एंगूगी म्हणतायंत ते मनाचं नियंत्रण यातून होत असतं. "इंडियाने भारतावर राज्य करावे असा हा भयावह अंतर्गत साम्राज्यवाद रुजतो आहे, पाळेमुळे घट्ट करतो आहे," अशी केळकरांची टिप्पणीही इथे आठवते (मध्यमा, पान २१). 

हे पेच 'मराठमोळ्या माधुरीचं मराठी' ऐकून सुटणारे नाहीत. प्रसारमाध्यमं, राजकीय नेते, आणि इतरही अनेक धुरीणांना मराठीच्या केवळ बाह्य बटबटीत खुणा पुरेशा वाटतात. कोणी एकसाची धर्मसांस्कृतिक राष्ट्रवादी (आणि अंतर्गत वसाहतवादी) विचारातून या खुणांचा वापर करतंय, तर कोणी केवळ तात्कालिक अस्मितेच्या राजकारणापुरतं त्याकडे बघतंय. अशा वेळी भाषेसोबत येणारा मूल्यसाठा, सामूहिक स्मृतिसंचय, संस्कृतीसाठी लागणारा संवाद, हे एंगूगींचे मुद्दे कोणी ऐकेल का? [मराठीबद्दल बोलताना अर्थातच मराठी अवकाशात राहावं लागणाऱ्या इतर भाषांबद्दलही बोलायला हवं. त्याबद्दल ९ ऑगस्टच्या नोंदीत काही प्रातिनिधिक उदाहरणांसह बोलायचा प्रयत्न करतो].