Thursday, 2 January 2025

वर्षभरातल्या नोंदींनिमित्त

२००९-१० साली केलेलं मुखपृष्ठ

गेली सुमारे पंधराएक वर्षं एखादं अनियतकालिक चालवावं तशा धारणेतून 'रेघ' ओढत आणली आहे. त्यात २०२५ हे नवीन वर्षं. सध्याच्या माध्यमव्यवहारात सतत सक्रिय राहण्याची सक्ती दिसते. लिहिणं-बोलणं-ऐकणं-बघणं, या सगळ्याच अर्थाने ते दिसतं. आपण इथे स्वतःवर किंवा वाचकांवरही तशी सक्ती असू नये, अशा समजुतीतून काही खटपट करत आलो आहोत. त्यात गेल्या वर्षभरात दहा नोंदी केल्या- कधी एखाद्या पुस्तकाविषयी, कधी माध्यमांविषयी, कधी आजूबाजूच्या राजकीय कोलाहलाचा निवडणुकांवरच्या तात्कालिक गप्पांपलीकडे थांग लावायचा प्रयत्न म्हणून, कधी आदिवासी अवकाशातल्या काही शोकांतिकांची बखर म्हणून या नोंदी झालेल्या आहेत. साधारणपणे गेल्या पंधरा वर्षांमध्ये ही सूत्रं कायम राहिल्याचं दिसतंय. अशी गेल्या वर्षातल्या नोंदींची सलग यादी नवीन वर्षाच्या सुरुवातीला देऊन ठेवू. 

नवीन नोंदींची माहिती वाचकांपर्यंत पोचवण्यासाठीचे मार्ग मर्यादित आणि अडथळ्यांनी भरलेले आहेत. पूर्वी 'फीड बर्नर'ची सेवा इथे गुगलने दिली होती, त्यामुळे नवीन नोंदी वाचकांना ई-मेलमध्ये मिळायची सोय होती, ती सेवा आता बंद झाली. त्यानंतर 'ट्विटर', 'फेसबुक' आणि 'इन्स्टाग्राम' इथेही 'रेघे'ची पानं उघडली, पण तिथेही सतत सक्रिय राहिलं तरच काहीएक स्वीकार लाभू शकतो. महिन्याभरात एखादी लिंक शेअर करून तिथे टिकाव लागणं तसंही शक्यच नसतं. त्यात लिंक बाहेर जाणारी असल्यावर या मंचांवर ती मागेच पडते, हे आता साधारण सर्वांनाच माहीत आहे. त्यात मग सर्वांत कमी प्रतिसाद होता ते 'ट्विटर'चं पान बंद केलं, तसंच 'इन्स्टाग्राम'च्याही बाबतीत आपलं होईल असं दिसतं. तिथून इथे येणारा वाचक फारसा नाहीच, असं 'ॲनेलेटिक्स'वरून दिसतं. या माध्यमांचा वापर त्यांच्या शर्थीवर केला तर त्यातून काही वाचकांपर्यंत पोचणं अर्थातच शक्य असेल, पण त्या वापरासाठी लागणारा वेळ आणि यंत्रणा आपल्याकडे नाही. शिवाय, स्वतःच्या शर्थी इतक्या सहज सोडून देऊन शरण जाणं बरं वाटत नाही. त्यामुळे आहे त्यात जमेल तितपत ठीक. त्यातल्यात्यात 'व्हॉट्स-ॲप'वरून नवीन नोंदीची माहिती वाचकांपर्यंत पोचत असावी, असं दिसतं. या मार्गांचा तपशील शेजारी समासात दिला असला तरी त्याकडे बहुधा सहजपणे वाचकांचं लक्ष जात नसल्याचं जाणवलं. त्यामुळे इथे पुन्हा त्याचा तपशील लिंकसह चिकटवतो आहे. तुम्हाला काय सोयीचं असेल त्यानुसार आणि मनापासून वाटलं तर खालच्या पानांवर नोंदणी करून पाहता येईल-




गेल्या वर्षी केलेल्या नोंदींपैकी 'पांडू नरोटे यांचं काय झालं?' यासारखी एखादी नोंद आपण स्वतःच्या स्तरावर माहिती मिळवून, संपर्कांकडून तपशील घेऊन, संबंधित घटनेशी जोडलेल्या माणसांशी सलग संवाद साधून लिहिली. ती थोडी सविस्तर बातमीसारखी किंवा वार्तालेखासारखी लिहिली होती. कधी तसं शक्य झालं नाही, तर इतर ठिकाणाहून भाषांतरित करून अशी नोंद करायचा प्रयत्न असतो, तो गेल्या वर्षीच्या शेवटच्या नोंदीत होता. त्याहून अधिक लांब पल्ल्याचा प्रयत्न त्याच्या आदल्या वर्षाअखेरीला 'तोडगट्ट्यातल्या आदिवासींचं म्हणणं काय होतं?' या दीर्घ नोंदीत केला होता. प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन लोकांचं म्हणणं नोंदवणं, काही आजूबाजूची तथ्यं गोळा करून त्यात मांडणं, अशा पत्रकारी स्वरूपाचा हा प्रयत्नही आपण चौदा वर्षांमध्ये शक्य होईल त्या-त्या वेळी करत आलो आहोत. तोडगट्ट्याच्या नोंदीवेळी पहिल्यांदा व्हिडिओ स्वरूपातही काही गोष्टी नोंदवल्या. त्यासाठी आवश्यक उपकरणही घेतलं आणि रेघेचं यू-ट्यूबवर चॅनलही सुरू केलं. नोंदींना पूरकपणे काही व्हिडिओ त्यावर तयार करता येऊ शकतील, पण अजून त्यासाठी आवश्यक संसाधनांची जुळवाजुळव करता आलेली नाही. हे फक्त आर्थिक कारणाने अडलेलं असतं असंही खरंतर नाही, पण इतर कामं करताना या नवीन जुळवाजुळवीसाठी प्राधान्याने वेळ काढणं शक्य होत नाही. पण ते ठीक आहे. तरीही, आपण शेजारच्या समासात ऐच्छिक वर्गणीचा एक कोड चिकटवलेला आहे, त्याचं कारण पूर्वीही नोंदवलं होतं. 'रेघे'वर नोंदी करणाऱ्याचा उत्पन्नाचा स्वतंत्र मार्ग आहे, ते त्याचं समाधानाने सुरू आहे. पण तरीही, एखाद्या अनियतकालिक प्रकाशनाने ऐच्छिक वर्गणीची वाट ठेवायला हवी, कारण शेवटी यात माणूस खर्च करतच असतो. तो खर्च तथाकथित उदात्त सामाजिक बांधिलकीपोटी असतो, असं मानणं फिजूल आहे. आपण आपल्या इच्छेपोटी आणि समाधानापोटी हे करतो. त्यामुळे वाचकानेही त्याच्या इच्छेने आणि समाधानाने यात बरं वाटेल ती निवड करावी. वर्गणीच्या बाबतीतसुद्धा सक्ती असायला नको. साधारणपणे यासाठी वेळोवेळी आवाहनं केली जातात किंवा तुम्ही पर्यायी माध्यमांच्या कामावर विश्वास ठेवत असाल, तर असं आर्थिक योगदान द्यावं असं सांगितलं जातं. त्या-त्या यंत्रणेचीही ती गरज असेल. पण तसं काही सतत आवाहन करणंही इथे 'रेघे'वर शक्य झालं नाही. इतर कोणी अशा पर्यायी माध्यमव्यवहारावर विश्वास नाही दाखवला तरीही जमेल तोवर 'रेघ' ओढत राहायची, इतपतच उद्देश त्यामागे आहे.

याशिवाय, रेघेसोबत केलेली काही जुनी कामं आणि काही समांतरपणे सुरू असणारी कामंही या पानाच्या तळात नोंदवली आहेत. त्या जोडीने हे इथलं पत्रकारी-लेखकीय स्वरूपाचं काम म्हणून या वर्षीही जमेल तितपत सुरू ठेवू. 

No comments:

Post a Comment