Thursday 25 July 2013

विलास सारंग, फ्रान्झ काफ्का व पत्रकारिता

विलास सारंगांबद्दल 'रेघे'वर आज नोंद होतेय तिचं निमित्त काय? तर, रोजचं वृत्तपत्र / वर्तमानपत्र / पेपर! आणि आणखी एक असं की, सारंग गेल्या ११ जूनला ७१ वर्षांचे झाले. आपण महिन्याभराने, म्हणजे तशी उशिरा नोंद करू शकतोय. पण तरी ठीक आहे. सारंगांच्या या निमित्ताने 'रेघे'वरच्या एका जुन्या नोंदीचे आणखी संदर्भ स्पष्ट होतील असंही आपण पाहतोय. 'रस्त्याकडची खिडकी' अशी एक नोंद आपण गेल्या वर्षा अखेरीस केली होती. फ्रान्झ काफ्काबद्दलशी ती एक लहानशी नोंद होती. त्या नोंदीत आपण सारंगांच्या 'सिसिफस आणि बेलाक्वा' या पुस्तकातलं एक वाक्य नोंदवलं होतं, ते असं :
आजचं वर्तमानपत्र वाचता वाचता आपण काफ्का वाचतो आहोत असं जोपर्यंत वाटू शकतं, तोपर्यंत काफ्का ताजाच राहणार.
पाहा, किती हा गुंता!
मुखपृष्ठ : बाळ ठाकूर. प्रास प्रकाशन
'नॉन-फिक्शन' सारंगांची काही मतं, निरीक्षणं आपल्याला 'रेघे'पुरती पटणारी नाहीत. (पण हा एक स्वतंत्र मुद्दा आहे आणि यातल्या एका लहान बिंदूबद्दल आपण 'रेघे'वर यापूर्वी लिहिलेलं आहे). पण तरी सारंगांचं म्हणणं ऐकून घ्यावं, आपल्याला काय पटतंय ते घ्यावं, नाही पटतंय ते समोर ठेवून त्याबद्दल बोलावं, पटण्याच्या नि न पटण्याच्या अधेमधे असेल तर तसंही सांगावं - हे सगळं सारंगांच्या बाबतीत शक्य वाटतं. म्हणजे तेवढा सहिष्णूपणा त्यांच्या लिखाणात आहे. त्यामुळे त्यांची निरीक्षणं टाळणं आपल्याला बरं वाटत नाही आणि जमेल तिथे, आपल्या ताकदीनुसार आपण त्याबद्दल बोलतो. मुळात सारंग प्रामाणिकपणे अभ्यास वगैरे करून निरीक्षणं नोंदवतात, कोणत्याही कंपूबाजीत सामील न होता, आपल्या परीने ते इतकी वर्षं खटपट करत राहिलेत, १९९९ला पॅरलिसिसचा अटॅक आल्यानंतरही त्यांचं लिखाण थांबलं नाही - हे सगळं मराठीतल्या ह्या एका चांगल्या मोठ्या माणसाबद्दल नोंद करायला 'रेघे'साठी पुरेसं कारण आहे. शिवाय, सारंगांची काही निरीक्षणं एकदम थेट बसणारी आहेतच. काफ्काबद्दलचं जे निरीक्षण वरती नोंदवलं ते त्यातलंच.

आता हे 'थेट बसणारं निरीक्षण' म्हणजे काय? ह्या प्रश्नाच्या एका उत्तरासाठी आपण 'तेहेलका' ह्या इंग्रजी साप्ताहिकाचे संपादक तरुण तेजपाल यांचं काय म्हणणं आहे ते पाहूया. 'तेहेलका' जेव्हा फक्त संकेतस्थळाच्या रूपात होतं तेव्हा, २००१ साली त्यांनी 'ऑपरेशन वेस्ट-एन्ड'द्वारे भारतीय संरक्षण मंत्रालयातला भ्रष्टाचार उघडकीस आणला होता. त्यानंतर 'तेहेलका'चं संकेतस्थळ बंद करण्यापर्यंत अवस्था आणली गेली, वगैरे तपशील आता बऱ्यापैकी सर्वांच्या माहितीतला असू शकतो; 'रेघे'वरचीही एक मागची नोंद यासंबंधी संदर्भासाठी पाहता येईल. भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय लोकशाही आघाडीला हे प्रकरण जबरी शेकलं होतं. किंवा असं नागरिकांना वाटत आलंय. तर, ह्या प्रकरणाचा संदर्भ घेऊन तेजपाल यांना काही म्हणायचंय, ते त्यांनी 'बीलेटेड लेसन्स फ्रॉम लिटरेचर' या २००४मधल्या एका लेखात म्हटलंय. काय म्हणतात ते, तर हे :
मी वयाच्या एकोणिसाव्या-विसाव्या वर्षी फ्रान्झ काफ्काचं सगळं लिखाण वाचून काढलं, पण मला आत्ता कुठे ते समजतंय असं वाटतं. वीस वर्षं मी खाजगी संभाषणांमधे काफ्का हा माझा आवडता लेखक असल्याचं सांगत आलो, कारण चटकन पकडीत न येणारी सत्यं त्याने मांडून ठेवल्येत हे मला दिसत होतं. दीडेक वर्षाने 'तेहेलका'ने - अनिरुद्ध बहल आणि सॅम्युअल मॅथ्यू यांच्या भन्नाट तपासातून - 'ऑपरेशन वेस्ट-एन्ड' प्रकाशात आणलं. आणि मी काफ्काच्या अफाट बुद्धीने चाट पडलो. आपण काय बोलतोय हे ह्या माणसाला चांगलंच माहीत होतं.

साध्या भाषाशैलीमध्ये आणि चक्रावून टाकणाऱ्या कथनशैलीमध्ये 'द ट्रायल' आणि 'द कॅसल' (या काफ्काच्या कादंबऱ्या) आपल्याला सत्तेच्या स्वरूपाबद्दल, विशेषतः राजकीय सत्तेच्या स्वरूपाबद्दल आवश्यक ते सारं काही सांगून जातात. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जगभर लोकशाही आणि जुलूमशाही यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू होती, तेव्हा हा वेदनांनी ग्रासलेला झेक लेखक योग्य प्रकारे सांगून गेला की, सर्व प्रकारची सत्ता ही गुन्ह्यात सहभागी आणि आकसी असते.

एका माणसाला दुसऱ्या माणसावर नियंत्रण ठेवण्याची शक्ती दिली की त्याच्या मनातलं चक्र वाकड्या दिशेने फिरायला सुरुवात होते. (एखादा हट्टी सरकारी कारकून विद्वान माणसांना रडायची पाळी आणू शकतो). एका माणसाला अनेक माणसांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती दिली की त्याच्या मनाच्या विकृत चक्राचा वेग वाढतो. आणि काही मूठभर लोकांना मोठ्या लोकसंख्याच्या नियंत्रणाची शक्ती दिली की, मग तर हे चक्र म्हणजे भोंवडून टाकणारी भपकेबाजी आणि विकृतीचं वंगण मिळून आणखी वेगाने फिरू लागतं. चांगल्या माणसांच्या बाबतीतही हे होतं. दुर्दैवाने मोजकी माणसं दुय्यम प्रतीची असतील तर ही (सत्तेची) चक्रं खरोखरच विनाशकारी भयंकरापर्यंत नेऊ शकतात. क्वचित एखादा माणूस सत्ता मिळाल्यावरही आपलं डोकं थाऱ्यावर ठेवू शकतो. अशी माणसं अर्थातच असतात, आणि तीच जग पूर्ण नियंत्रणाबाहेर जाण्यापासून थोपवत असतात. पण त्यांच्या मार्गात अनेक अडथळे रचलेले असतात. या सगळ्यात आपल्या शिक्षणाचा हा दोष नाही - आपल्या पुस्तकांमध्ये तर पवित्र नैतिक उपदेश ठासून भरलेला असतो. हा दोष त्या पशूच्या स्वरूपातच मौजूद आहे.

काफ्काच्या कादंबरीतल्या 'के'ला दर पानासोबत या पशूचं स्वरूप सापडत जातं आणि ते नैसर्गिकपणेच अनाकलनीय आहे. सत्तेच्या मठ्ठ यंत्रणेमध्ये त्याचं रूपांतर झालं की तर या अनाकलनीयतेत भरच पडते. आयकर विभागाला आमच्या मागावर कोणी सोडलं? आमच्या विरोधातली प्रकरणांमध्ये गफलती करायला अंमलबजावणी संचालनालयाला कोणी सांगितलं? ('तेहेलका'च्या मालकीत भागधारक असलेल्या) 'फर्स्ट ग्लोबल'च्या निर्लज्ज आणि बेसावधपणे करण्यात आलेल्या विध्वंसामागे कोणाचे आदेश होते? आमचे फोन 'टॅप' करण्याचे आदेश कोणी दिले? तपास आयोगासमोर आमच्या विरोधात खोटी प्रतिज्ञापत्रं सादर करण्याचे आदेश कोणी दिले? शंकर शर्मांना अटक करा, असं कोणी सांगितलं? कुमारल बादलना अटक करा, असं कोणी सांगितलं? अनिरुद्ध बहलला अटक करा, असं कोणी सांगितलं?.... असे प्रश्न मला अनेक लोकांनी दिवसांत अनेक वेळा विचारले.

मला त्यांची उत्तरं माहीत नाहीत आणि मला ती कधीच कळणार नाहीत. आणि आता त्याचा काही उपयोगही नाही. यंत्राचे भाग समजून घेतल्यामुळे तुम्हाला यंत्राबद्दल ज्ञान मिळेल किंवा त्याचं नियंत्रण तुमच्याकडे येईल असं काही होत नाही..
सारंगांनी जे निरीक्षण 'सिसिफस आणि बेलाक्वा'मध्ये १९८२ सालच्या आसपास नोंदवलंय, तेच आहे की नाही हे? पण सारंगांच्या पुस्तकाची पहिली आवृत्तीच आत्ता-आत्तापर्यंत खपत होती असं पुस्तकांच्या दुकानात चौकशी केल्यावर आपल्याला समजतं. तरी ठीकच. आता बहुधा ती पूर्ण संपलेय, असा अंदाज आहे, त्यामुळे कोणी तरी नवीन आवृत्ती काढायला हवी. कशाला? तर वरती चिकटवलेल्या त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठातला गुंता नक्की काय आहे ते समजून घ्यायला. या पुस्तकात काफ्काशिवाय इतरही तीन जणांबद्दल सारंगांनी मतं मांडलेयत, पण त्याबद्दल आपण आजच्या नोंदीत, आपल्या मर्यादेमुळे काहीच नोंदवू शकलो नाही. तरी काफ्काच्या लिहिण्याबद्दल आणि रोजच्या वर्तमानपत्रात काफ्का सापडण्याबद्दल त्यांनी जे निरीक्षण नोंदवलंय, त्याबद्दल आपण काही अधिकचं बोललो. 'मिस्टर ग्लाड'चं काय करायचं? - या शीर्षकाखाली काही नोंदी आपण 'रेघे'वर मागे केलेल्या आहेत, त्याही कदाचित ह्या संदर्भात शोधता येतील. किंवा आता पुढच्या वर्षी पुन्हा निवडणुका आहेत, तेव्हाही हे सगळं आठवू शकेल. किंवा नोंदीच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे रोजचा पेपर आहेच आपण बोलतोय त्याची आठवण ठेवायला. आता नोंदीच्या शेवटाकडे, सारंगांनी काफ्काच्या लेखाचा शेवट ज्या मजकुराने केलाय तेच देऊया. हा मजकूर असा आहे :
अधिकृतरित्या, आर.टी.ओ.च्या ऑफिसात मान्यताप्राप्त एजंट नाहीत. परवानाधारक एजंट ठेवण्याच्या पद्धतीचा सरसहा दुरुपयोग होऊ लागल्याने सात वर्षांपूर्वी ती बंद करण्यात आली, असे दहामधल्या एका आर.टी.ओ.ने मला सांगितले. तो म्हणाला : ''अनधिकृत अधिकाऱ्यांसारखे ते वागू लागले. परवानगीशिवाय ते आमच्या केबिन्समध्ये घुसायचे, आमच्या स्टाफला हुकूम देऊ लागायचे. त्यांच्यापैकी काहींनी तर बेकायदेशीररित्या रबर स्टँप आणि सह्यांचे नमुने तयार करून घेतले. ते इतके शेफारले की स्वतःला ते 'आर.टी.ओ.' म्हणवून घेऊ लागले-- 'रेकग्नाइज्ड ट्रान्सपोर्ट ऑफिसर्स' असा अर्थ लावून.''

परवाने रद्द केल्याने ज्यांचा धंदा बसला असे काही मान्यताप्राप्त एजंट कोर्टात गेले, परंतु तिथे हरले. तरीही ते अजून आर.टी.ओ.च्या ऑफिसात आणि ऑफिसाभोवती तथाकथित 'एजंट' म्हणून, आणि कधी 'रेकग्नाइज्ड' एजंट म्हणूनही वावरतात. आ.टी.ओ.च्या ऑफिसात सुमारे तीनशे अनधिकृत 'एजंट' आहेत. त्यांची तीन गटांत विभागणी करता येते : आर.टी.ओ.च्या आवारामध्ये ज्यांनी ऑफिसे थाटली आहेत असे प्रस्थापित एजंट (सुमारे पंचाहत्तर आहेत), आवाराच्या आत स्वैरपणे गिऱ्हाइके गाठू पाहणारे दोनशे 'फिरते' एजंट, आणि एजंटांचे 'साहाय्यक' म्हणून वावरणारे नवे उमेदवार, जे आवाराच्या बाहेर घोटाळत असतात.

असे म्हटले जाते की प्रस्थापित एजंट अतिशय सामर्थ्यवान आहेत आणि सरकारमध्ये प्रभाव असल्याने एखाद्या न बधणाऱ्या अधिकाऱ्याची ते बदली करून घेऊ शकतात. आर.टी.ओ.च्या ऑफिसात त्यांना त्यांच्या खऱ्या नावाने ओळखले जात नाही; 'बॅटरीवाला', 'कोळसेवाला' असा टोपणनावांनी त्यांचा उल्लेख केला जातो. '''कोळसेवाला' सर्वांत विख्यात एजंट आहे'' असे मला सांगण्यात आले.

- काफ्काच्या कथेतील उतारा? छे; ११ डिसेंबर १९८०च्या 'टाइम्स ऑफ इंडिया'मधील बातमीतील काही भाग.
***
विलास सारंग
(फोटो : अमित हरळकर / आउटलूक)

7 comments:

  1. ही नोंद आवडली. प्रकाश नारायण संतांच्या नोंदिसारखं, यातून काय मिळालं हे इथं नीट शब्दबद्ध करता येईल असं वाटत नाही. पण एकूण समजुतीत भर पडते एवढं मात्र नक्की.

    ReplyDelete
  2. 'रेघे'मुळे बाळ ठाकुर यांच्या विषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. या नोंदीतलं पहिलं मुखपृष्ठ असो किंवा सैली असो...अधिक जाणून घ्यावसं वाटतं.

    ReplyDelete
  3. काफ्का आणि सारंग दोन्ही वाचून कैक वर्ष लोटली - काहीसे विस्मरणात गेले आहेत माझ्यासाठी .. आता पुन्हा वाचायला हवेत :-)

    ReplyDelete
  4. जबरदस्त काम आहे हे. रेघच्या कर्त्याला शतशः धन्यवाद

    ReplyDelete
    Replies
    1. सगळ्याच नोंदी महत्वाच्या आहेत. थँक्यू

      Delete
  5. खूप दिवसानी काफ्का बद्दल चांगले वाचले.

    अजय वाळिंबे

    ReplyDelete
  6. http://kafila.org/2013/11/21/sexualized-workplaces-predatory-men-and-the-rage-of-women/

    ReplyDelete