वृत्तछायाचित्रकार किंवा फोटोजर्नलिस्ट रघू राय यांचं काल (२६ एप्रिल) वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी निधन झालं. ते एक महान फोटोग्राफर होते. त्यांनी शब्दांच्या भाषेचा वापर करून मांडलेली काही मतं न पटणारी असली तरी कॅमेऱ्याचा वापर करून प्रकाश नि सावल्या यांच्या साक्षीने मांडलेली निरीक्षणं बरीचशी पटत राहिली, भावत राहिली. त्यामुळे ते गेल्यामुळे एक प्रकारचा अभाव जाणवला.
![]() |
| रघू राय (१९४२ - २०२६) छायाचित्र सौजन्य : इंडिया टुडे |
'खिडकीचा आरसा' या नावाच्या कादंबरीत एक फोटोग्राफर असतो. हळूहळू त्याच्या फोटोग्राफीविषयीच्या धारणा कोलमडतात आणि तो आधी मनापासून करत असलेली पत्रकारी फोटोग्राफी सोडतो आणि फक्त पैशापुरती लग्नसमारंभांपुरती फोटोग्राफी सुरू करतो. त्याचा एक संदर्भ रघू राय यांच्याशी जोडलेला असतो, तो असा (मूळ मजकुरात थोडा बदल केला आहे) :
रघू रायचं ‘एक्स्पोजर: पोर्ट्रेट ऑफ ए कॉर्पोरेट क्राइम’ नावाचं एक फोटोंचं पुस्तक आहे. ते त्याला एका प्रदर्शनात स्वस्तात मिळालं. त्यातले फोटो बघून तो हलला होता. १९८०च्या दशकात भोपाळमध्ये युनियन कार्बाइड या कंपनीच्या कारखान्यातून विषारी वायूची गळती झाली. घटना घडली तेव्हा त्याचे दुष्परिणाम लोकांवर झालेच, पण नंतरही तसे परिणाम होत राहिले. रायने घटना घडल्यावर लगोलग काढलेले काही फोटो आणि सतरा वर्षांनी पुन्हा भोपाळमध्ये जाऊन काढलेले फोटो, असं ते पुस्तक. सर्व फोटो काळे-पांढरे.
Raghu Rai / Greenpeace असे फोटो आपण काढावेत, असं त्याला वाटलं. हे का वाटत असतं? असे फोटो बघून बघणारे हेलावतील, त्यांच्या संवेदनांना हात घातला जाईल, कुठल्या तरी समस्येकडे लक्ष वेधलं जाईल, ती समस्या सुटेल, किमान त्याबद्दल बोललं जाईल- ही बाहेरची कारणंच फक्त असतील? आपण चांगले फोटो काढतोय, समोरच्या दुःखालाही सुंदर चौकट देऊ पाहतोय, आपलं फोटोग्राफर म्हणून कुठेतरी नाव नोंदवलं जाईल, आपल्याला आत्ताच्याआत्ता समोरच्या परिस्थितीत हवा तसा तत्काळ बदल करता येत नसेल तर परिस्थिती गोठवण्याची महत्त्वाकांक्षा- ही आतली कारणंही असतील? त्याने पंधरा वर्षांपूर्वी या प्रश्नांचा विचार केला नव्हता. पहिल्यांदा त्याने रघू रायचं पुस्तक बघितलं, इतर फोटोग्राफरांनी काढलेले फोटो बघितले, तेव्हा हा विचार त्याच्या मनात आला नव्हता. आपल्याला शब्द न वापरता काहीतरी सांगायला मिळतंय, जगाशी संवाद साधायचं माध्यम मिळतंय, असा त्याचा फोटो काढतानाचा समज होता. पण तो समज हळूहळू विरत गेला.
रघू राय भोपाळमधे रघू रायने काढलेला एक फोटो खूप गाजला. गॅस गळती झाली तेव्हा तत्काळ तीनेक हजारांहून अधिक लोक मेले, नंतरही त्या परिणामांनी किमान तितकेच लोक मेले, मग नंतरच्या काळात मरतही राहिले, इतरही लाखो लोकांच्या आरोग्यावर त्या आपत्तीचे विपरित परिणाम होत राहिले. या सगळ्या परिणामांची ठोस प्रतीकात्मक प्रतिमा म्हणून रघू रायचा एक फोटो ओळखला गेला. फोटो काळा-पांढरा. दोन डिसेंबर १९८४ला गॅसगळती झाली, चार डिसेंबरला काढलेला हा फोटो आहे. पाचेक वर्षांच्या एका मुलीचं प्रेत पुरलं जातंय. अर्धं मातीतच आहे. थोडा पोटाचा भाग, आणि चेहरा, कपाळ, डोक्याचा काही भाग वर आहे- दिसतंय. ओठ किंचित विलग. डोळे उघडे स्फटिकासारखे पांढरे मोठे. कपाळापाशी कोणत्यातरी माणसाचा उलटा पंजा तेवढा दिसतो. ते मूल कोणाचं होतं, हे कळू शकलं नाही. पुस्तकात फोटोखालच्या ओळींमध्ये लिहिलं होतं: ‘बरिअल ऑफ अॅन अननोन चाइल्ड: हे अनोळखी मूल युनियन कार्बाइड या अमेरिकी रासायनिक कंपनीमुळे घडलेल्या जगातील सर्वांत भयंकर औद्योगिक आपत्तीची खूण ठरली. या मुलाचे पालक कोणालाही माहीत नाहीत आणि कोणीही या छायाचित्रावर दावा सांगण्यासाठी पुढे आलेलं नाही.’मेलेलं मूल हा मुलगा असल्याचं त्या पुस्तकातल्या उल्लेखावरून वाटतं. प्रत्यक्षात ती मुलगी असल्याचं इतर ठिकाणी नोंदवलेलं आढळतं. लिंग काहीही असलं तरी ते मूल कोणाचं होतं, हे कळलं नाही. अज्ञात, निनावी मेलेली मुलगी. राय या अनुभवाबद्दल म्हणाले, 'आम्ही, छायाचित्रकार गिधाडांसारखे मृतदेहांच्या शोधात होतो. नाट्यमय छायाचित्रं तिथेच मिळत होती.'
वरच्या उद्गारांसारखी भावना त्याला स्वतःबाबत जाणवायला लागली, तेव्हा तो उदासीन होत गेला.
![]() |
| मुखपृष्ठ : अवधूत डोंगरे / प्रफुल्लता प्रकाशन |
रघू राय २०२३ साली दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाले :
तुम्ही संबंधित गोष्टीच्या पुरेसे जवळ नसाल, तर तुमचं छायाचित्र पुरेसं चांगलं येणं शक्य नाही.
पण एखाद्या माणसाला क्लिक करण्यासाठी आवश्यक 'पुरेसं' अंतर गाठलं गेल्याचं वाटलंच नाही तर काय होईल? हे प्रश्न आता रघू राय गेल्यावर आणि अधिकाधिक हातांमध्ये स्मार्टफोनांच्या माध्यमातून कॅमेरा असल्यावर नोंदवण्यात कितपत अर्थ आहे, माहीत नाही. रघू राय यांनी कित्येक छायाचित्रं काढली आहेत, त्यांच्याबद्दल आता बरंच लिहूनही आलं आहे. त्यांच्या नावाचं सर्च मारल्यावर अनेक छायाचित्रंही गुगलवर पाहायला मिळतात. ही नोंद फक्त त्यांचा परिणाम झालेल्या एका कोपऱ्याबद्दलची.
यापूर्वी रेघेवर आलेले रघू राय यांचे फोटो :




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा