जानेवारीत करायची नोंद आता एप्रिलमध्ये होते आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे उशीर झाला.
'अॅमेझॉन इंडिया'ने सध्या 'और दिखाओ' अशा घोषवाक्यासह काही जाहिराती केलेल्या दिसतात. आधीही केल्या होत्या काही वर्षांपूर्वी. या जाहिरातींमध्ये तरुण मुलं-मुली अॅमेझॉनची वेबसाइट उघडून स्वतःला काय विकत घेता येईल, ते बघत असतात. मग त्यांना सतत काही ना काही वस्तू दिसतच राहते, त्याने कधी त्यांचे डोळे चमकतात, कधी त्यांना अत्यानंद होऊन ते हसत सुटतात, कधी नाचत राहतात. एकंदर आनंदच आनंद आत-बाहेर सर्वत्र. आपल्या पसंतीचं, आपल्या खिश्याला परवडेलसं आणि अगदी वेळेत आपल्यापर्यंत पोचवणारं संकेतस्थळ म्हणून अॅमेझॉनची ही जाहिरात समोर येते. तसं म्हटलं तर, काही वस्तूंबाबत तिथून खरेदी सोयीस्कर असल्याचा अनुभव येतोही. पण त्याची वखवख सुटण्याचीही शक्यता असते- जाहिरातीत वखवख दाखवलेली आहे, सोय नाही.

![]() |
| अॅमेझॉन जाहिरात |
असं बरंच काही बघायला असण्याच्या काळात रेघेवर लिहून केलेल्या नोंदी आहेत. तीस वर्षांपूर्वी अॅमेझॉनची सुरुवात झाली तेव्हा ते मुळात पुस्तकविक्रीचं ऑनलाइन दुकान होतं. मग हळूहळू इतर वस्तूंचा विस्तार त्यात केला गेला. आत्ताही अनेक पुस्तकं इतर कुठे मिळणं शक्य होत नाही ती तिथे मिळतात, स्वस्तात मिळतात. पण पुस्तकंही कदाचित इतर वस्तूंसारखीच होऊन जाण्याची शक्यता आहेच (किंबहुना खुद्द लिहिणंच तसं होण्याची शक्यता उघडच आहे). नुसतं विकत घेत सुटायचं, बघायचं त्यांच्याकडे, सोशल मीडियावर त्यांचे फोटो टाकायचे, मग पुन्हा इतर वस्तूंकडे किंवा प्रतिमांकडे किंवा पॉडकास्टांकडे किंवा नुसतंच इकडून तिकडे कुठेतरी कशाततरी वळायचं. (त्यात आज 'पुस्तक दिन' आहे!) पण हे सगळं बहुधा 'और दिखाओ'च्या काळात स्वाभाविकच.
त्याआधी जून महिन्यात छत्तीसगढमधील बस्तर इथले आदिवासी नेते मनिष कुंजाम यांची खास 'रेघे'साठी फोनवरून घेतलेली मुलाखत प्रसिद्ध केली. कुंजाम हे छत्तीसगढमधील बस्तर भागात गेली जवळपास चार दशकं राजकीय-सामाजिक कार्यकर्ता म्हणून सक्रिय आहेत. छत्तीसगढ राज्याची निर्मिती होण्याआधी तत्कालीन मध्य प्रदेश विधानसभेमध्ये ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकप) वतीने दोन वेळा आमदार म्हणून निवडून गेले. त्यांनी आदिवासी प्रदेशांमध्ये विकासाच्या नावाखाली विध्वंस होऊ नये, याबद्दल काही सावधानतेच्या सूचना देत मत मांडलं. ती नोंद अशी : आदिवासी गावाच्या गोष्टीतून विकासाची दृष्टी यावी : मनिष कुंजाम. मध्य भारतातल्या नक्षलवादी चळवळीचा जवळपास बिमोड होत आला असतानाच्या परिस्थितीविषयी त्यांनी काही निरीक्षणं नोंदवली.
या व्यतिरिक्त केलेल्या नोंदींचा तपशील असा :
एकीकडे गडचिरोली हे पोलादाचं केंद्र होऊ घातल्याच्या जाहिराती बघितल्या आणि दुसरीकडे 'जोरम' नावाचा एक चित्रपट बघितला, मग बस्तरमध्ये पत्रकाराची हत्या झाल्याची बातमी वाचली, आणि मराठीतले आद्य पत्रकार गणले गेलेले बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दर्पण'चा पहिला अंक काढला त्या ६ जानेवारीचं निमित्त आलं, मग नोंद केली : जाहिराती, 'जोरम', जर्नलिस्ट, जांभेकर.
किंवा, गडचिरोलीतच गोंडी माध्यमाची शाळा सुरू करायचा प्रयत्न मोहगावच्या ग्रामसभेने केला, तर त्याला प्रोत्साहन देण्याऐवजी प्रशासनाने त्यावर कारवाईचा बडगा का उचलला, याबद्दलची नोंद : गोंडी शाळेला प्रति दिवस १० हजार रुपये दंडाची नोटीस कशासाठी?
किंवा मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याची सक्ती करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला, त्या संदर्भात केलेल्या तीन नोंदी : (१) 'हिंदीसक्ती'बाबत एक निवेदन, (२) 'मराठमोळ्या माधुरीचं मराठी' ऐकणारे एंगूगींचं म्हणणं ऐकतील काय? आणि (३) आदिभारती : सक्तीऐवजी सह-अनुभूती राखणारं भाषाशिक्षण!
माध्यमांविषयी अधूनमधून नोंदी करत राहाव्या असं आधीपासूनच ठरून गेलेलं असल्यामुळे त्यासंबंधीच्या दोन नोंदी : (१) तुकाराम बीज : माध्यमांच्या 'मसाजा'मध्ये माणूस मश्गुल! आणि (२) मोदी, मुस्लीम, माओवादी, मेकॉले आणि माध्यमं. यातली एक नोंद एकंदरच माध्यमव्यवहारासंबंधीची होती, तर दुसरी नोंद सध्याच्या राजकीय वातावरणाच्या संदर्भात माध्यमांबद्दल टीकाटिप्पणी करू पाहणारी होती.
दरम्यान, साहित्याविषयीच्या काही नोंदी केल्या. शरद् पाटलांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि व्यंकटेश माडगूळकरांच्या स्मृतिदिनानिमित्त ''माणदेशी माणसे'मधल्या 'मी'च्या मर्यादा' अशी नोंद केली. काफ्काची शेवटची प्रेयसी ठरलेल्या डोरा डायमन्टच्या चरित्राला धरून केलेली 'काफ्काच्या शेवटच्या प्रेयसीने सांगितलेली गोष्ट' ही एक नोंद; अरविंद कृष्ण मेहरोत्रांनी कबिराच्या काही रचनांचं इंग्रजी भाषांतर केलंय, त्याबद्दल काही टीकात्मक निरीक्षणं नोंदवण्याचा प्रयत्न करणारी 'अरविंद कृष्ण मेहरोत्रांच्या कबिराचं कवित्व' ही नोंद; आणि भाऊ पाध्यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालं, त्या निमित्ताने केलेली 'भाऊ पाध्यांच्या सुंदर 'बगीचा'तलं सौंदर्य' ही नोंद, असाही काही मजकूर लिहिला गेला.
बेला भाटिया यांच्या 'इंडियाज् फरगॉटन कंट्री' या पुस्तकाचं परीक्षण 'विस्मृतीच्या विरोधात' या शीर्षकाखाली लिहिलं. वृत्तवाहिन्यांच्या, वृत्तपत्रांच्या, किंवा आपल्या एकंदरच माध्यमव्यवहाराच्या प्रकाशाबाहेर राहणाऱ्या, आणि मुख्यप्रवाही राजकीय-अर्थकारणामध्ये विसर पडलेल्या काही भागांविषयीचे आणि प्रश्नांविषयीचे लेख भाटियांच्या पुस्तकात आहे. त्यात कुठे क्वचित मतभिन्नताही वाटली, तरी त्यासकट त्यांचं काम आपला परिसर समजून घेण्यासाठी महत्त्वाचं असल्यामुळे या पुस्तकाबद्दल लिहिलं.
या सगळ्यांत काही सूत्रं समान असल्याचं दिसतं. ती सूत्रं 'दिसणं', 'दाखवणं', 'बघणं', या कृतींशीही जोडलेली आहेत. माध्यमांनी या कृतींबाबतीत घडवलेले बदल गुंतागुंतीचे आहेत, त्यामुळे त्याबद्दल इथे बोललं जातं. तसंच, या प्रक्रियेत मग कोणत्या गोष्टी नजरेआड होतात, याबद्दल थोडं बोलून आपल्या मर्यादित समजुतीनुसार काही गोष्टींकडे लक्ष वेधायचाही प्रयत्न केला जातो. त्यासाठी आपण भाषा वापरतो, म्हणून भाषावापराचा मुद्दा येतो. तर, भाषा नि अर्थ यांचं सहितपण साहित्यात अपेक्षित असल्यामुळे साहित्य तर आहेच आहे. कोणी ना कोणी या सहितपणाशी संवाद साधू पाहतं. वेळ घालवायला बोलण्यापुरतं तरी.
नवीन नोंद इथे प्रसिद्ध झाल्याचं कळण्यासाठी व्हॉट्स-अॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक इथे रेघेची पानं उघडली. पण साधारपणे सतत सक्रिय राहिलं तर यांचा उपयोग होतो. तेवढी सक्रियतेची सक्ती स्वतःवर नि वाचकांवरही शक्य नसल्यामुळे फेसबुक-पानाचा काहीच उपयोग नाही खरं म्हणजे. त्या तुलनेत व्हॉट्स-अॅप नि इन्स्टाग्राम इथल्या पानांवरून इच्छुक वाचकांना रेघेच्या नोंदींची माहिती मिळू शकेल. उजव्या समासात त्यांच्याकडे जायचे दुवे दिले आहेतच, इथे हे परत.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा