Monday, 3 December 2012

कुठली सीता, कुठला राघव?

- अनिरुद्ध गोपाळ कुलकर्णी

ही नोंद करण्यामागची निमित्तं तीन आहेत : १ डिसेंबरला (१९०९) कवी बा. सी. मर्ढेकर यांची जयंती होती. त्यानंतर २-३ डिसेंबर (१९८४) म्हणजे भोपाळमधे वायुगळतीनं जो भयानक प्रकार घडला त्या तारखा. आणि ५ डिसेंबर (२००७) ही म. वा. धोंड यांची पुण्यतिथी. अशी तीन निमित्तं साधून ही नोंद करतो आहे. मूळ नोंद अनिरुद्ध कुलकर्णींच्या 'लुकिंग अॅट कार्टून्स, गेटींग अलाँग' या ब्लॉगवर ६ डिसेंबर २००७ रोजी प्रसिद्ध झाली होती. मूळ पोस्ट इंग्रजीतली. कुलकर्णींच्या परवानगीने तिचं मराठी भाषांतर 'रेघे'वर प्रसिद्ध होतं आहे. बाकी संदर्भ नोंदीतून आपसूक स्पष्ट होतील बहुतेक. काही ठिकाणी सध्याच्या संदर्भांनुसार 'रेघे'तर्फे भर घातलेय आणि तसा उल्लेख केलाय. एकूण भरपूर निमित्तं एकाच नोंदीत घेतली गेल्येत. पण परस्पर संबंध स्पष्ट झाला तर झाला.कुठली सीता, कुठला राघव?
-अनिरुद्ध गोपाळ कुलकर्णी (searchingforlaugh.blogspot.in)
६ डिसेंबर २००७

ही मूळ नोंद मी दोन दिवसांपूर्वी लिहिली. मला तिच्यात आता भर घालावी लागतेय त्याचं कारण दुःखद आहे. म. वा. धोंड यांचं वयाच्या ९३व्या वर्षी ५ डिसेंबर २००७ला निधन झालं. द. ग. गोडसे आणि दुर्गा भागवत यांच्याबरोबरीचे म. वा. धोंड हे जगातील काही महान कला समीक्षकांपैकी एक होते. त्यांच्या निधनामुळे ही नोंद आता त्यांना वाहिलेली श्रद्धांजली ठरतेय.

धोंड यांच्याबरोबर मला खूपदा संवाद साधायला मिळाला. त्याबद्दल यापूर्वी मी ब्लॉगवर लिहिलं आहेच, अजूनही लिहीनच. त्यांचं मला आलेलं एक पत्र खाली देतो आहे.त्यांच्या 'ज्ञानेश्वरी : स्वरूप, तत्त्वज्ञान आणि काव्य' या 'क्लासिक' पुस्तकाची एक प्रत २००१ साली त्यांनी मला सही करून भेट दिली होती. ती प्रत घेताना मला जवळपास रडायला आलं होतं.

६ डिसेंबर २००७च्या 'पुढारी'मधल्या बातमीचा मथळा आहे : 'म. वा. धोंड अनंतात विलीन'.

नास्तिक असलेल्या धोंडांनी नक्कीच याबद्दल आक्षेप घेतला असता! पण ते नशिबवान ठरले, स्वर्ग आहे की नरक आहे की फक्त नथिंगनेस आहे याचा पत्ता आता त्यांना लागला असेल.

-- हा झाला धोंड गेल्यानंतर मूळ नोंदीला जोडलेला मजकूर

आता मूळ नोंद--

३ डिसेंबर २००७च्या 'एशियन एज'मधे एक हादरवून टाकणारा फोटो आहे-

'एशियन एज'मधला फोटो (३ डिसेंबर २००७)
 ''भोपाळ वायू दुर्घटनेची झळ पोचलेल्या मुलाला उचलून उभी असलेली आई... १९८४ साली भोपाळमधे झालेल्या जीवघेण्या वायू दुर्घटनेनंतर हजारो मुलं जन्माला आली, पण त्या रात्री ज्यांचे प्राण वाचले ते सांगतात की, त्या दुर्घटनेमुळे त्यांची मुलं कायमची पंगू झाली.''
फ्रंटलाईन : ७ डिसेंबर, २००७ रोजी आलेला मजकूर असा आहे-
''भोपाळमधे १९८४ला झालेल्या वायूगळतीच्या घटनेत वाचलेल्यांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जूनमधे माहिती अधिकाराच्या कायद्याखाली पंतप्रधान कार्यालयातून काही कागदपत्रं मिळवली आहेत. या दुर्घटनेच्या उत्तरादायित्त्वातून डाऊ केमिकल कंपनीला सूट देण्यास सरकार किती आतूर झालंय ते या कागदपत्रांधून स्पष्ट होतं.

...युनियन कार्बाईड कॉर्पोरेशनकडून भोपाळच्या दुर्घटनेसंबंधीची कोणतीही जबाबदारी घेण्यासंबंधी डाऊने सतत हात झटकले आहेत. पण अमेरिकेत मात्र कार्बाईडच्या अधिग्रहणामुळे निर्माण होणाऱ्या अॅस्बेस्टॉससंबंधीची जबाबदारी स्वीकारून त्यावर उपाय म्हणून या कंपनीने २.२ बिलियन डॉलरची तरतूद केलेली आहे. 'इंटरनॅशन कॅम्पेन फॉर जस्टीस इन भोपाल' या संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेत अॅस्बेस्टॉसने निर्माण होणाऱ्या आजारांनी ग्रस्त असलेल्यांची जबाबदारी ही कंपनी घेत असेल, तर भोपाळच्या दुर्घटनाबाधितांची जबाबदारी ती का घेत नाही.''
***

आता जरा वेगळा विषय -
म. वा. धोंडांनी 'ललित'च्या दिवाळी अंकात (२००७) एक उत्तम लेख लिहिलाय. तुकाराम आणि बा. सी. मर्ढेकर यांच्या गरीबीसंबंधीच्या कविता वाचून त्याचा आस्वाद घेताना एकूण पददलितांबद्दल असलेल्या आपल्या समाजातील अनास्थेवर त्यांनी ताशेरे ओढलेत.

खाली मर्ढेकरांची एक मराठी कविता देतो आहे. यात शर्वरी ही एक कष्टकरी महिला शेणाचे गोळे करताना रामभक्त शबरीला सांगतेय की, तिची (शबरीची) भेट स्वीकारण्यासाठी राम आणि सीता आता काही अयोध्येतून दंडकारण्यात येणार नाहीत.

खप्पड बसली फिक्कट गाल
तळभिंतीवर घेउन जख्खड
मातीची ही जुनी झोपडी
आंबट मिनिटें चाखित रद्दड.

मधेंच दचकुनि बघते वरती,
अष्टदिशांचा सासुरवास;
चंद्रमौळि परि बेढब शबरी
क्षण-बोरांची रचिते रास.

मातीवरती करीत मात;
मिनिटांमधुनी काढित व्याधि;
तापकिरि-पिवळ्या मउ सालीचें
बोर गवसतां जरा सुगंधी,

कुरवाळित तें बोटांनी मउ
मिनिट सुवासिक हसते शबरी;
माणुसकीच्या दंडकांत अन्
गौर्या थापित वदे शर्वरी:

येइल का कधि सीतापति ग
चुकून तरि पण ह्या वाटेला?
घेइल का अन् रुजू करूनी
ह्या बोरांच्या नैवेद्याला?

कुठली सीता, कुठला राघव?
पुसे खडीचा रस्ता फक्कड़;
आंणि ठेविते गाल झोपडी
तळभिंतीवर फिरून खप्पड.


('आणखी काही कविता'मधून. मौज प्रकाशन)
***


'रेघे'ची भर : 'युनियन कार्बाईड' २००१मध्ये 'डाऊ केमिकल'ने विकत घेतली पण 'युनियन कार्बाईड'ने भोपाळमधे घातलेल्या धुमाकूळाची जबाबदारी स्वीकारताना मात्र हात झटकले. आता सरकारने आणि न्यायव्यवस्थेनेही या प्रकरणात कायमचे हात झटकले असून 'डाऊ' जबाबदारीमुक्त झाली आहे.
यासंबंधी 'इंडियन एक्सप्रेस'मधे आलेल्या विविध बातम्या इथे एकत्र सापडतील. 'हिंदुस्तान टाइम्स'मधे काल आलेली बातमी. 'विकिपीडिया'वरची नोंद.

भोपाळ दुर्घटनेचा उल्लेख निघालाच आहे तर रघू रायला बोलवायलाच पाहिजे. रघू राय यांनी भोपाळमधल्या त्या घटनेची भयानकता कॅमेऱ्यातून कायमची गोठवून ठेवलेय. पण आपण बहुधा एकूण व्यवस्था म्हणूनच गोठून गेलोय, त्यामुळे आपल्याकडे 'हृदयद्रावक'सारखे शब्द पुस्तकांमधून, लेखांमधून खूप वाचायला मिळतील, पण प्रत्यक्षात तसला भाबडेपणा कोण करेल!

भोपाळ : रघू राय यांनी काढलेला फोटो

1 comment:


  1. आधी नोंदिमधला संबंध लक्षात आला नाही...नंतर परत-परत वाचल्यावर कळला...मर्ढेकरांची कविता छान आहे...फक्त सोयीस्कर दुखः व्यक्त करण्याशिवाय भोपाल दुर्घटनेबाबतीत आपण काय करू शकतो?

    ReplyDelete

डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ट अथवा नेट बँकिंगद्वारे रेघेची 'ऐच्छिक वर्गणी' भरायची असल्यास इथे क्लिक करावं.