'फ्रंटलाइन' या पाक्षिकाच्या १५-३० जूनच्या अंकात 'द सेक्युलर सेफ स्पेस' हा हुझैफुल रियाझ यांचा लेख छापून आला. त्याला प्रतिसाद म्हणून लिहिलेल्या इंग्रजी टिपणाचं हे मराठीकरण आहे. मूळ टिपणाचं संपादकांनी संक्षिप्त केलेलं रूप 'फ्रंटलाइन'च्या १-१५ जुलैच्या अंकात वाचक-पत्रांमध्ये प्रसिद्ध झालं (मूळ टिपण नोंदीखाली प्रतिक्रिया म्हणून दिलंय). या मुद्द्यावर स्वतंत्रपणे वेगवेगळी म्हणणी मांडली गेली आहेत, याची कल्पना असूनही एका पाक्षिकात लेख आल्यावर त्यावर वाचक म्हणून प्रतिक्रिया द्यावी वाटली, म्हणून हे पत्र लिहिलं. तितपतच त्याकडे पाहावं.
![]() |
| Frontline, 15 July 2026 |
"सेक्युलर" मुस्लीम विचारवंतांनी इस्लामी परंपरेतून मिळालेली दृष्टीभूमी (व्हॅन्टेज पॉइन्ट) सोडून दिली, पण प्रत्यक्षात "आधुनिकतेत स्वतंत्रपणे ज्या संसाधनांचा ठळक अभाव जाणवतो ती या परंपरेमध्ये आहेत", असा युक्तिवाद हुझयफुल रियाझ यांनी 'द सेक्युलर सेफ स्पेस' (फ्रंटलाइन, ३० जून) या लेखात केला. त्यांच्या मते, अशा "सेक्युलर" मुस्लीम विचारवंतांनी परंपरेतून येणारी दृष्टीभूमी सोडून दिल्यामुळे कोणताही "अस्सल" विचार शोधण्याची शक्यताही त्यांच्या हातून निसटली, कारण "अस्सल विचारासाठी अस्सल दृष्टीभूमी लागते, आपल्याला उभं राहता येईल अशी स्वतःची जागा लागते."
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली वैचारिक मांडणी अशा दृष्टीभूमीतून असल्याचा दावा रियाझ करतात. आंबेडकरांचा विचार "दलित समुदायाच्या अनुभवाधारित परंपरेवर उभारण्यात आला," असं त्यांचं म्हणणं आहे. पण आंबेडकरांनी केवळ अनुभवजन्य ज्ञानाच्या आधारे सैद्धान्तिक मांडणी केली नाही, तर पाश्चात्त्य राजकीय विचारपरंपरांमधली काही सूत्रं आणि बौद्ध परंपरा यांचाही आधार त्यांनी घेतला. यातील कोणत्याही परंपरेत ते जन्माला आलेले नव्हते, त्या अर्थी या परंपरा त्यांच्या "स्वतःच्या" / जन्मजात नव्हत्या. याउलट, रियाझ यांनी मात्र आपण ज्या परंपरेत जन्माला आलो तीच परंपरा आपलीशी करण्याच्या कल्पनेवर भर दिला आहे. असा युक्तिवाद करायचा तरी मग त्याच्या विविध नैतिक व अस्तित्वलक्ष्यी आयामांबाबत चर्चा करायला हवी. (आपण स्वतःची परंपरा खऱ्या अर्थाने सोडू शकतो का आणि कितपत सोडू शकतो, याचीही चर्चा कदाचित त्यात करता आली असती). पण तसं न करता रियाझ यांनी अस्सल सत्व नि स्वत्व यांबाबतीत निरपवाद आग्रह धरणारी भूमिका घेतल्याचं दिसतं. सेक्युलर मुस्लीम विचारवंतांनी कधीही "भारतातील मुस्लीम परिस्थितीशी अनुरूप स्वायत्त राजकीय सिद्धान्त" मांडण्याचा प्रयत्न केला नाही, अशी खंतही ते नोंदवतात. हे तर आंबेडकरांच्या विचारव्यूहाला छेद देणारं आहे.
आंबेडकरांनी स्वतःच्या जन्मजात समुदायाच्या परिस्थितीशी "अनुरूप" ठरेल असा "स्वायत्त" राजकीय सिद्धान्त मांडायचा प्रयत्न केला की, त्यांच्या दृष्टीनुसार आधुनिक लोकशाही जगण्यासाठी आवश्यक वाटणारे विचार उभारण्याची त्यांची खटपट होती? 'बुद्ध अँड हिज् धम्म' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत आंबेडकर लिहितात : "विज्ञान येणाऱ्या आधुनिक माणसाला धर्म हवाच असेल तर, त्याला केवळ बुद्धाचाच धर्म आपलासा करण्याजोगा आहे. [...] आधुनिक जगाला स्वतःचा बचाव करायचा असेल तर त्याला बौद्ध धर्माशिवाय दुसरा पर्याय नाही." आंबेडकरांच्या या दाव्याशी सहमत व्हायचं की नाही, हा वेगळा मुद्दा. पण आधुनिक माणसाने स्वतःची परंपरा निवडायला हवी, ही त्यांची इच्छा त्यांच्या लेखनात आणि भाषणांमध्ये सातत्याने व्यक्त झालेली दिसते. किंबहुना, बौद्ध धर्मात प्रवेश करण्यासंबंधी अनुयायांना आवाहन करत असतानाही ते 'स्वतः विचार करून' परंपरा निवडण्याचा मुद्दा अधोरेखित करत होते. (बौद्ध धर्म हाच आधुनिकतेचा एकमेव तारणहार असल्याचा आग्रह वेगळ्या वादाचा विषय होऊ शकतो, पण तो निराळा मुद्दा). शिवाय, आंबेडकरांच्या मांडणीमधल्या सामाजिक लोकशाही व सामाजिक सद्सद्विवेकबुद्धी यांसारख्या संकल्पना सर्व समाजघटकांना संबोधून मांडलेल्या होत्या, केवळ त्यांनी जन्म घेतलेल्या समुदायाबद्दलचा तो "स्वायत्त" विचार नव्हता.
भारतीय संदर्भात "सेक्युलर" या शब्दाचा अर्थ कसा घ्यायचा, हाही प्रश्न इथे कळीचा ठरतो. उदाहरणार्थ, मराठीत "सेक्युलॅरिझम"साठी अनेक पर्यायी, किंबहुना मूळच्या म्हणाव्यात अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. भारतीय संविधानाच्या अधिकृत मराठी भाषांतरात 'धर्मनिरपेक्षता' हा शब्द येतो- यात राज्यसंस्था कोणत्याही विशिष्ट धार्मिकतेशी जोडून न घेता स्वतंत्रपणे कार्यरत राहील, असा गर्भितार्थ आहे. या व्यतिरिक्त 'इहवाद' ही संज्ञा 'या लौकिक जगातल्या' घडामोडींना केंद्रस्थानी ठेवणारा अर्थ मांडते. 'सर्वधर्मसमभाव' हा सर्व धर्मांना समान अंतरावरून किंवा समान जवळिकीने समजून घेण्याची इच्छा मांडणारा शब्द आहेच. तर, काही जण 'निधर्मीवाद' असाही शब्द यासाठी वापरतात- त्यातून कोणत्याच धर्माशी काही देणंघेणं नसल्याचा अर्थ सूचित होतो. 'धर्मनिरपेक्षते'सह यातील सर्व संज्ञांचा विचार केला तर, रियाझ यांना खटकणाऱ्या पाश्चात्त्य आधुनिकतेतील 'सेक्युलर' या संकल्पनेपेक्षा काही वेगळे (आणि काही सारखे) अर्थ हाताला लागतात.
अशा वेळी आपण "आपल्या स्वतःच्या" भाषांची दृष्टीभूमी वापरून या गुंतागुंतींकडे पाहिलं तर कदाचित या वैविध्यपूर्ण परंपरेकडे पाहण्याचा अधिक धड दृष्टीकोन सापडण्याची शक्यता आहे. नाहीतर, वारकरी परंपरेत मुस्लीम संत असणं आणि सुफी दर्ग्यांवर दर्शनासाठीच्या रांगेत हिंदूही असणं, यांसारख्या घडामोडींचं वर्णन करणारे शब्द कुठून सापडतील? यात फक्त सरमिसळच आहे की अधिक काही 'भाव' व्यक्त होतो? या परंपरा आहेत म्हणून वैरभाव नसतो, असंही नाही. तोही असतोच. पूर्वग्रह असतात, त्यानुसार आग्रह धरले जातात, अन्यायही होतात. पण परंपरेतला दुसराही एक भाव आहे, तो कोणता? यावर बोलण्याऐवजी "स्वायत्त" राजकीय विचार मांडण्यासाठी स्वतःच्या जन्मजात परंपरेलाच प्राधान्य देण्याचा मुद्दा रियाझ यांच्या लेखात मांडलेला आहे. हाच मुद्दा कमी-अधिक प्रमाणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या किंवा विनायक दामोदर सावरकरांच्या हिंदुत्ववादात अनुस्यूत आहे. त्यात बहुसंख्याक हिंदू समुदाय "आपला" असल्याचं सांगितलं जातं आणि आता या विचारसरणीला आपलं मानणारं सरकार देशात बहुसंख्य ठिकाणी सत्तेत आहे. हिंदू धर्मपरंपरेसंदर्भात "स्वायत्त" राजकीय विचारांची इच्छा धरणारा लेख कोणी लिहिला, तर तो 'फ्रंटलाइन'मध्ये छापून येईल का, असा आक्षेप हिंदुत्ववाद्यांनी घेतला, तर त्यावर काय उत्तर देणार? मग 'सेक्युलर' शब्दावरून टिंगलटवाळीही सुरू राहते. हे इंग्रजी शब्दामुळे अधिक सोयीचं होतं. तसंच, यातून काही सरधोपट पुरोगामी वाटणारे साचेही तयार होतात.
उदाहरणार्थ, परवाच एका पत्रकाराने राज्याचे विद्यमान अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना असा प्रश्न विचारला : "हा शाहू-फुले-आंबेडकरांचा, किंवा शिव-शाहू-भुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र, धर्मनिरपेक्षता मांडणारा सेक्युलर महाराष्ट्र अशी ओळख आहे, अशा महाराष्ट्रात या विचाराला टक्कर देणारा उजवा विचार इतक्या स्टाँगपणे प्रस्थापित होईल, नव्हे पंधरा-पंधरा वर्षं सत्तेत राहील, असा विचार तुम्ही कधी केला होतात का?" भुजबळांनी शांतपणे बोलायला सुरुवात केली आणि व्यवहारामध्ये हा विचार मागे पडत नसल्याचं सांगितलं. त्यांच्या उत्तरानंतर पुन्हा 'सेक्युलर' हा शब्द वापरून पत्रकाराने साधारण तोच प्रश्न उत्कटपणे विचारला. त्यावरही भुजबळांनी काही तथ्यं मांडून उत्तर दिलं. साधारणपणे, पत्रकार ज्या सरकारला 'प्रतिगामी', 'उजव्या विचारां'चं, 'सेक्युलर वा धर्मनिरपेक्ष विचारांच्या विरोधी विचारां'चं म्हणत होता, ते सरकार व्यवहारामध्ये काही तसं विपरित करत नसून अनेक गोष्टी आमच्या (म्हणजे शाहू-फुले-आंबेडकरी) विचारांनुसार होत असल्याची ग्वाही भुजबळांनी दिली. त्यासाठी त्यांनी दाखलेही दिले. मग मधे एकदा पत्रकाराने काही धार्मिक उन्मादाची उदाहरणं देऊन थोडी स्पष्टता आणली. पण या घडामोडी आधीपासूनच घडत असल्याचं आणि प्रत्येक काळात असे प्रतिगामी लोकही असतात, असं सांगून मुद्दा पुढे नेण्यासाठी फारसा वाव उरणार नाही, अशी काळजी भुजबळांनी सफाईदारपणे घेतली. तरीही, पत्रकार शेवटी म्हणाला, "आजचा विषय थोडासा अकॅडमिक वाटला असेल, पण तो अत्यंत महत्त्वाचा विषय होता." मग त्याने उपस्थित प्रेक्षकांना आणि एकंदरच तरुणाईला संदेश दिला की, त्यांनी नुसतं रीलमध्ये अडकून राहू नये, पुस्तकं वाचावीत! जाताजाता, "आपण या पेहरावामध्ये.. मॉडर्न अंदाजामध्ये आहोत", त्याचं श्रेय या आधीच्या मंडळींना आहे, असाही उल्लेख त्याने केला. थोडक्यात- आपल्या आत्ताच्या आधुनिकतेची पायाभरणी केलेला विचार सध्या मागे पडतोय, असं हे धडपणे मांडलं न गेलेलं सूत्र होतं. पण, शेवटी आधुनिकतेचा सकारात्मक अर्थ म्हणून पेहरावाकडे बोट दाखवण्यात जी मर्यादा आहे, तशी विचारसरणीच्या मुद्द्याची मर्यादा 'सेक्युलर' या शब्दाने सुरुवातीलाच निश्चित केली. सुमारे अर्धा तासाचा हा संपूर्ण कार्यक्रम 'सेक्युलर विचारसरणी' या मुद्द्यावरचा होता. पण खुद्द त्या मुद्द्यावर स्पष्टता येण्याकडे बोलणं गेलं का?
शाहू महाराज ब्राह्मणांचं वर्चस्व टाळून वैदिक धर्माचा व्यवहार उभा करता येईल का, असा कृतीच्या पातळीवरचा प्रयत्न करत होते. शिवाय, त्यांची राज्य हाकतानाची धोरणं सर्वधर्मसमभाव राखणारी होती. जोतीराव फुले यांनी सार्वजनिक सत्य धर्माच्या रूपात काही कल्पक मांडणी करून पुरोहित वर्गाची मध्यस्थी नसलेलं, 'निर्मिका'शी थेट नातं सांगणारं असं एक सामाजिक अध्यात्म मांडलं. आंबेडकरांनी त्याही पलीकडे विविधांगी धार्मिक विश्लेषण केलं आणि शेवटी हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्माचा विचार स्वीकारून तोच आधुनिक युगात योग्य मार्ग असल्याचं प्रतिपादन केलं. या तिघांच्याही विचार-व्यवहारात धर्म ही संकल्पना होतीच. यात रूढार्थाने पाश्चात्य 'सेक्युलॅरिझम' नाही! मग तो शब्द वापरून आपण खोलात विचार करणंच टाळतो का, हे पाहायला हवं.
दुसरीकडे, सावरकरांचा हिंदुत्ववाद 'इहवादी' आहे (म्हणजे त्यात कर्मकांडाला नि पारलौकिकतेला मध्यवर्ती स्थान नाही), पण तो विचार 'धर्मनिरपेक्ष' किंवा 'सर्वधर्मसमभाव' या संज्ञांशी जोडता येत नाही. त्यात एका विशिष्ट धर्मपरंपरेशी जोडलेली बहुसंख्याक वंशसांस्कृतिक राष्ट्रीयत्वाची मांडणी आहे. याउलट, गांधींचं स्वतःलं हिंदू म्हणवून घेत असतानाच सर्वधर्म प्रार्थना करणं, आणि त्यांचेच सहप्रवासी असणाऱ्या विनोबांचं 'सर्व धर्म प्रभूचे पाय' असं म्हणणं, हे 'सर्वधर्मसमभाव' राखणारं, पण काटेकोरपणे 'इहवादी' दृष्टीवर भर न देणारं होतं. तर, आंबेडकरांनी 'सर्व धर्म एकसारखेच सत्य नि चांगले असल्याची धारणा धडधडीतपणे चुकीची' असल्याची भूमिका घेतली (बुद्ध अँड हिज् धम्म, पान २४) आणि आधुनिक लोकशाही समाजातल्या माणसाने स्वतःचा धर्म स्वतः निवडायला हवा, असं मत मांडलं. त्यानुसार त्यांनी बौद्ध धम्मापर्यंतची वाटचाल केली. पण ते या धर्मविचारावर राज्यसंस्थेच्या कारभाराचा सिद्धान्त मांडत नव्हते किंवा यानुसार त्यांनी राष्ट्रीयत्वासंबंधीचे आग्रह धरले नाहीत. शिवाय, यात काही विधींना जागा असली तरी पारलौकिकतेला जवळपास वाव नसल्यामुळे इहवादी बाजू होतीच. या व्यतिरिक्तही नंतरच्या काळात हमीद दलवाईंसारखे 'इंडियन सेक्युलर सोसायटी'चे सदस्य असणारे आणि 'मुस्लीम सत्यशोधक मंडळा'ची स्थापन करणारे लोकही झाले. यात सांस्कृतिक अंगाने स्वतःचं मुसलमान असणं मोकळेपणाने स्वीकारताना धार्मिक बाजूच्या काही सुधारणा अभिप्रेत होत्या. या सगळ्या विचार-व्यवहाराला फक्त 'सेक्युलर' या एका शब्दात कसं गुंफणार. त्यात गुंफण्यापेक्षा कोंबणंच होतं आणि ते फक्त शब्दापुरतं न उरता विचारही कोंबले जातात. 'सेक्युलर' हा शब्दच वापरू नये, अशा अर्थाने हे टिपण लिहिलेलं नाही, पण त्याचे आपल्या परिसरातले अनेकरंगी अर्थ विसरून जाण्याइतका एकसाची वापर बरा वाटत नाही.
०
नवीन नोंदींच्या माहितीसाठी : व्हॉट्स-ॲप । इन्स्टाग्राम
ऐच्छिक वर्गणीसाठी उजवीकडचा समास पाहावा

मूळ इंग्रजी टिपण:
उत्तर द्याहटवाWhat is “Secular” in India?
Huzaiful Reyaz makes an interesting argument about “secular” Muslim intellectuals surrendering a vantage point provided by the Islamic tradition, which, according to Reyaz, “has resources that modernity, left to itself, demonstrably lacks” (“The secular safe space”, June 30). Such a surrender also entails relinquishing the possibility of exploring any “original” thought, because, according to him, “Original thought requires a genuine vantage point, a place to stand that is actually yours.”
He appreciates Dr. B. R. Ambedkar’s intellectual contribution as one made from such a vantage point, “which was founded on a tradition of the experience of Dalits as a community”. However, Dr. Ambedkar did not base his theoretical arguments solely on the empirical knowledge; he also built upon certain strands of Western political thought and the Buddhist tradition, none of which was “his own” in a sense that he was not born into either of these traditions. Reyaz’s argument, by contrast, is more inclined towards the idea of owning the tradition into which one is born. He could have pursued this argument by engaging with its various ethical and existentialist dimensions (perhaps, by discussing whether, and to what extent one can truly disown one’s tradition). However, he seems to turn essentialist when he laments that secular Muslim intellectuals never sought to produce “an autonomous political theory adequate to Muslim conditions in India.” This is also contrary to the spirit of Ambedkar’s thought.
Did Ambedkar seek to construct an “autonomous” political theory “adequate to” the condition of only the community into which he was born, or was he attempting to produce a body of thought that he believed was necessary for the modern democratic world as he envisaged it? In the preface to his seminal work Buddha and His Dhamma, Ambedkar wrote: “If a modern man who knows science must have a religion, the only religion he can have is the Religion of the Buddha. […] For the modern world Buddhism was the only religion which it must have to save itself.” Whether one agrees with Ambedkar’s proposition or not, it is clear from many of his writings and speeches that he wanted modern human beings to choose their traditions. In fact, he insisted on this in many of his speeches appealing to his followers to convert to Buddhism. (One may debate his insistence on Buddhism as the sole saviour of modernity, but that is a different topic). Furthermore, his ideas regarding social democracy and social consciousness were addressed to all sections of society.
Also crucial is the question of what we mean by “secular” in the Indian context. For instance, in Marathi, there are several alternative, or rather, original terms that are used for “secularism” : Dharma-nirapekshata, used in the official Marathi translation of the Indian Constitution implies that the state would operate independently of any religious affiliation. Then there are other terms like Ihavaad which means “worldliness”, and Sarva-dharma-sambhaav which means “equal respect for all religions”, and some even use Nidharmivaad which means “having nothing to do with religion at all”. All these terms, including Dharma-nirapekshata signify something different from the notion of “secular” that emerged from the Western modern experience and theory against which Reyaz argues.
If we look at these complexities from the vantage points of “our own” languages we will perhaps find more heterogenous yet cohesive approach to understanding the traditions which produced Kabir and Muslim Bhakti saints and Sufi saints and many others. For us (“us” here would include anyone who shares a similar, though not necessarily identical vantage point described here), the spirit of secularism need not be constrained by the Western modernity.
Avadhoot Dongare