२४ जुलै २०२६

रत्नागिरीतील मोर्च्याचा सचित्र वृत्तान्त

'झुरळांच्या काळात राजकारणाची भुरळ आणि जिज्ञासा' या नोंदीत कॉक्रोच जनता पार्टी आणि त्या संदर्भात पुढे घडत गेलेल्या घटनांबद्दल काही बोलणं झालेलं आहे. या घडामोडींबद्दल गेले काही दिवस विविध मंडळी विविध मंचांवर आपापल्या दृष्टीने काही अंदाज बांधतच आहे.

सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि त्यांची मातृसंस्था असणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनीच हे आंदोलन लोकांच्या संतापाला थोडीशी वाट मिळावी म्हणून उभं केलं आहे- अशा कटकारस्थानाची शंका व्यक्त करणारे लोक एकीकडे आहेत. मग, विविध विरोधी पक्षांनीही या आंदोलन पाठिंबा दिला आणि शेवटी प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसने पाठिंबा दिला, त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी आता या आंदोलनाला योग्य वळण देतील, अशा दिशेने बोलत जाणारे आहेत! काँग्रेस आणि राहुल गांधी या मुद्द्यांवर आधीपासूनच बोलत होते, त्यांना टाळून 'कॉक्रोच जनता पार्टी'ला आणि त्याचे संस्थापक अभिजीत दिपके श्रेय देणं चुकीचं आहे, असाही काहींचा  सूर दिसतो. दिल्लीतील आंदोलनात सोनम वांगचुक यांच्या व्यतिरिक्त डाव्या विद्यार्थी संघटनांचे काही विद्यार्थीही उपोषणाला बसले, तिथल्या आंदोलनात डाव्या संघटनांचा पाठिंबा ठळकपणे दिसला, त्यामुळे या संघटनांचा सहभाग अधोरेखित करणारेही लेख आलेत. तसंच, दुसरीकडे भाजप आणि पंतप्रधान यांच्या समर्थनार्थही बोलणारे आहेत. उदाहरणार्थ, पेपर फोडणाऱ्यांबरोबरच पेपर विकत घेणारे दोषी नाहीत का, आपण व्यक्ती म्हणून नैतिक वागलो तर देश नैतिक होईल, तोवर अशा आंदोलनांच्या समर्थनार्थ 'सोशल मीडिया स्टेटस'वर बोलणं म्हणजे दिखाऊ देशभक्ती आहे, वगैरे स्वरूपाचं पुन्हा 'स्टेटस'च ठेवणारेही आहे. यू-ट्यूबवरच्या वाहिन्यांपासून सुट्या-सुट्या व्यक्तींच्या समाजमाध्यमांवरच्या कृतींपर्यंत हा गदारोळ दिसतोय.

आधीच्या नोंदीत म्हटल्याप्रमाणे, हाच शेवटी 'सार्वजनिक चर्चावकाश' असेल, तर त्याची उकल करायचा प्रयत्न करायला हवा. ही उकल करण्यासाठीचे शब्द केवळ आक्रस्ताळे असून पुरणार नाहीत, त्यासाठी जमलं तर काही संकल्पनाही समजून घ्यायला हव्यात, असं त्या नोंदीतलं म्हणणं. पण या संकल्पनांची सांगड 'सर्वसामान्य' अवकाशातल्या म्हणण्याशी घातली तर एकंदर सार्वजनिक चर्चावकाशाचा कानोसा घेतल्याचं म्हणता येईल. नाहीतर नुसतं साचेबद्ध संकल्पनांचं बोलणं होतं. त्यामुळे ही नोंद आधीच्या नोंदीला पूरक, पण रस्त्यावरच्या अवकाशाची दखल घेणारी आहे. लोक काय म्हणतायंत, हे शक्य तितकं तटस्थपणे नोंदवायचा पत्रकारी पातळीवरचा हा प्रयत्न आहे. 

दिल्लीत २० जुलै रोजी संसदेच्या दिशेने मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला, अश्रुधुराचाही वापर करण्यात आला. या कठोर कारवाईच्या निषेधार्थ रत्नागिरी इथे २३ जुलै रोजी सकाळी अकरा ते दुपारी दीड या वेळेत एक मोर्चा काढण्यात आला (या वृत्तान्तातील सर्व फोटो आणि व्हिडिओ या मार्गावर काढलेले आहेत). जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन निषेधाचं निवेदन देण्यात आलं. 'शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचा'च्या वतीने या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे), थोडंफार काँग्रेस, अशा विरोधी पक्षांची मंडळी; समाजवादी विचारसरणीचे शिक्षणसंस्थांचे संचालक, त्यांचा कर्मचारीवर्ग, विद्यार्थी; काही मुस्लीम मोहल्ल्यांमधील नागरिक- यांची ठळक उपस्थिती होती (कोणाचेही झेंडे त्यात नव्हते). पण या व्यतिरिक्त स्वयंप्रेरणेनेच यात दाखल झालेले इतर संस्थांमधले विद्यार्थी आणि नागरिकसुद्धा लक्षणीय प्रमाणात होते. त्यामुळे मोर्चा अपेक्षेपेक्षा खूपच मोठा निघाल्याचं मत ठिकठिकाणी व्यक्त होताना दिसलं. केवळ काही पक्षांच्या नि संस्थांच्या सहभागाने हे घडलं नसतं. एक हजारांच्या आसपास लोक यासाठी येतील, असा अंदाज मोर्च्याची सुरुवात झाली तिथे तैनात असलेल्या एका पोलिसाने अनौपचारिक बोलण्यात वर्तवला. पण प्रत्यक्षात अडीच हजार ते तीन हजार लोक या मोर्च्यासाठी हजर होते.

या मोर्च्याने शहरातील मारुती मंदिरच्या चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सुमारे सव्वादोन ते अडीच किलोमीटरची वाटचाल तुलनेने शांततेने केली. क्वचित काही वेळा पंतप्रधानांच्या नावाने एकदम थेट शिवराळ घोषणा देण्यात आल्या, तेव्हा पोलिसांनी आणि आयोजकांनीही सूचना करून या घोषणा शमवण्याचा प्रयत्न केला. (तरीही, तुरळकपणे काही मंडळी मधेच अशा घोषणा देत राहिली). पण त्याहून मोठ्या प्रमाणात घोषणा लोकशाही, हुकूमशाही, शिक्षणाचं क्षेत्र, लोकांशी संवाद न साधणाऱ्या सरकारची वृत्ती, अशा सूत्रांना धरून होत्या. याच सूत्रांसंबंधी विविध प्रकारचे फलक मोर्चेकरी तरुण-तरुणींनी हातात धरलेले होते. त्याचे दाखले इथे चिकटवलेल्या छायाचित्रांवरून मिळतील.

मोर्चेकरी तरुणी (फोटो : अश्विनी कांबळे)


लोकमत, २३ मे २०२६ (पुणे आवृत्ती)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलनी यांच्या नावांना धरून 'मेलडी' असा एक हॅशटॅग समाजमाध्यमांवर चालतो. आंतरराष्ट्रीय बैठकांमधील त्यांच्यातल्या स्नेहाचं सूचन करणारा हा हॅशटॅग आणखी अधोरेखित करत खुद्द मोदींनी मेलनी यांना 'मेलडी' या चॉकलेटचं पाकीटच मे २०२६मध्ये भेट दिलं, त्याचा फोटो स्वतः सोशल मीडियावर टाकला, त्याबद्दल दोघं हसत बोलले. याला धरून त्या चॉकलेटच्या मालककंपनीने त्याच महिन्यात पेपरांमध्ये पानभर जाहिरातीसुद्धा केल्या. उदाहरणार्थ, शेजारी चिकटवलेल्या जाहिरातीत 'भारताने जगाला एक प्रश्न भेट केला आहे' असं सांगत पंतप्रधानांचं नाव घेत त्यांचे आभार मानलेले आहेत. शिवाय, 'आता जगही ह्यात सहभागी झालं आहे,' अशी जोडही दिली आहे. एका अर्थी राजकीय अवकाशातल्या वक्तव्यं / कृती किती उथळ पातळीला जाऊ शकतात, आणि त्यातून राजकीय व्यक्ती स्वतःचंच विडंबन कसं करू शकतात, याचा हा नमुना होता.

त्यामुळे या घडामोडींची टर उडवणारीही काही पोस्टरं कालच्या मोर्च्यात होती. "न्याय? (तो कुठे मिळणार आहे!) मेलडी हवी तर सांगा" असं इंग्रजी पोस्टर घेतलेला (आणि सोबत काही मेलडी ही चॉकलेटंही वाटणारा) मोर्चेकरी तरुण राजापूर या दुसऱ्या तालुक्याच्या ठिकाणावरून रत्नागिरीत केवळ या मोर्च्यासाठी आला होता. वातावरण बऱ्यापैकी पावसाचं होतं, सकाळी बराच पाऊस पडून गेला होता, तरी बसने प्रवास करून हा तरुण रत्नागिरीपर्यंत आला. त्यामुळे त्याला विचारलं, "एवढ्यासाठी आलात का?" तर तो म्हणाला, "एवढ्यासाठी!" विद्यार्थ्यांच्या मागण्या बरोबर आहेत, सरकारने त्यासंबंधी कार्यवाही करायला हवी, असं त्याचं म्हणणं होतं. या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांशी सरकारने संवाद न साधता पोलिसी कारवाई केली, यामुळे तो अस्वस्थ होता. कोणत्याही संघटनेशी थेट संबंध नसतानाही केवळ स्वतःच्याच इच्छेपोटी तो या मोर्च्यात सहभागी झाला. 
  

"मेलडी खा, पण देशाचं भवितव्य खाऊ नका" अशीही घोषणा काही पोस्टरांवर होती :

मोर्चेकरी विद्यार्थिनी (फोटो : अश्विनी कांबळे)

वर उल्लेख केलेल्या मुद्द्यांव्यतिरिक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज यांच्या नावाने घोषणा दिल्या जात होत्या. काहींच्या हातात संविधानातील उद्देशिका होती, काहींनी या आंदोलनाच्या निमित्ताने 'संविधान वाचवा'चाही नारा दिला. 'संविधान वाचवा, विद्यार्थ्यांचं भविष्य घडवा', अशाही घोषणांचे फलक दिसत होते. एकूण मिळून विद्यमान सरकारी व्यवस्था अपेक्षेनुसार (म्हणजे संविधानात म्हटलंय त्यानुसार) काम करत नसल्याची धारणा सूचित करणारी ही विधानं होती. मोर्च्याच्या वाटेत आंबेडकरांचा पुतळा लागतो, तिथेही काही मिनिटं मोर्चा थांबवून आंबेडकरांच्या पुतळ्याला हार वगैरे घालून घोषणा देण्यात आल्या.




आंबेडकर पुतळ्याजवळ मोर्चेकरी (फोटो : रेघ)

मोर्चेकरी तरुण (फोटो : रेघ)
शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, ही दिल्लीतील आंदोलनातली मागणी ठिकठिकाणी मोर्चेकऱ्यांनी हातात धरलेल्या फलकांवर लिहिलेली होती, घोषणांमध्ये ती दिली जात होती. एका मंत्र्यासाठी सरकार इतकी जोखीम का उचलतंय, असाही प्रश्न मोर्चेकऱ्यांच्या बोलण्यात आला. यासंबंधीची पोस्टरंही पॉप्युलर कल्चरमधल्या काही खुणांचा वापर करणारी होती. 'तू झूठा मैं मक्कार' या चित्रपटाचा संदर्भ देत पंतप्रधान आणि शिक्षण मंत्र्यांची टर उडवणारं पोस्टर; किंवा 'माझ्या आधीच्या प्रियकराला/प्रेयसीला (नातं तोडण्यासंबंधीचा इशारा) वेळीच कळला, पण शिक्षण मंत्र्यांना मात्र (पद सोडण्यासंबंधीचे) इशारे कळेना झालेत' असं सुचवणारं पोस्टर, इत्यादी या मोर्च्यात पाहायला मिळालं.

तानाशाही सें आझादी, भ्रष्टाचार सें आझादी, इत्यादी घोषणाही या वेळी दिल्या जात होत्या. (याचा व्हिडिओ रेघेच्या यूट्यूबवरच्या पानावर दिला आहे). काही वर्षांपूर्वी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात 'आझादी'ची घोषणा वादग्रस्त ठरली. पण ती घोषणा (काश्मीर इत्यादी संदर्भात) देश फोडण्याशी संबंधित नसून विविध समस्यांपासून 'आझाद' होण्याशी संबंधित असल्याचं अधोरेखित करत रत्नागिरीतील कालच्या मोर्च्यात ती घोषणा दिली जात होती.

मोर्चेकरी विद्यार्थी (फोटो : रेघ)

अकरावीत शिकणाऱ्या एका मुलीने सोनम वांगचुक यांचं छायाचित्र असलेलं पोस्टर हातात घेतलं होतं. तिच्या मते, वांगचुक यांच्यासारखा संशोधक उपोषणाला बसतो आणि फारसं शिक्षण नसलेला माणूस शिक्षण मंत्री होतो, हे बरोबर नाही. पंधरा-सोळा वर्षांच्या मुलीचं हे मत आहे, इतपत लक्षात घेऊन तिचं म्हणणं रेघेच्या यूट्यूबवरच्या पानावर पाहता येईल. ही मुलगी तिच्या आईसोबत मोर्च्यात सहभागी झाली होती. दुसरी एक, शिक्षण पूर्ण झालेली आणि आता नोकरी करणारी फार्मसिस्ट तरुणी रजा घेऊन तिच्या वडिलांसोबत या मोर्च्यात सहभागी व्हायला आली होती. तिने स्वतः आधी वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेशपरीक्षा (नीट) दिलेली होती, तसंच तिच्या भावानेही ही परीक्षा दिली आणि तो सध्या वैद्यकीय शिक्षण घेतो आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांना समर्थन द्यावं, असं आवाहन तिने केलं. 

या मोर्च्यामध्ये सहभागी नसलेली, पण त्या रस्त्यावरून कॉलेजला जाणारी चार-पाच अकरावीतल्या मुलं-मुली दिसली. त्यातल्या एका मुलाला या मोर्च्याबद्दल मत विचारलं. तो म्हणाला, "मुद्दा बरोबर आहे. त्या मुलांचं नुकसान झालं. काहींनी आत्महत्या केल्या. मग त्यावर कारवाई तर व्हायला हवी. असं घडायला नको"

दुसरे एक पन्नाशी ओलांडलेले गृहस्थ काही सामान घेऊन चालत जात होते. ते म्हणाले, "आपले लोक थोडे कमी दिसतायंत (मोर्च्यामध्ये मुस्लिमांच्या तुलनेत हिंदूंची संख्या कमी असल्याचा संदर्भ)." असं मत मोर्च्यात सहभागी एका शिक्षिकेनेही व्यक्त केलं. तसंच, दोन आंबेडकरी संघटनेचे तरुण मोर्च्यात मधे मुस्लीमबहुल गटाच्या भागात आले, तेव्हा तेही हेच म्हणाले ("आपण दोघेच दिसतोय इथे!"). मग ते थोडं पुढे जाऊन मोर्च्याच्या अधिक मिश्र भागात चालू लागले. या भागातील मुस्लीम महिलांचं बुरखा वापरण्याचं प्रमाण आणि मुस्लीम पुरुषांचा विशिष्ट पायजमा, मोठा कुर्ता आणि गोल टोपी घालण्याचं प्रमाण दोन-तीन दशकांपूर्वी अत्यल्प होतं- पण दरम्यानच्या काळात ते वेगाने आणि प्रचंड वाढलं आहे- त्याचा एक परिणाम असा होतो की, मुस्लीम व्यक्तींची संख्या पोशाखातील सारखेपणामुळे सार्वजनिक ठिकाणी अधिक उठून दिसते. या प्रदेशातील मुस्लीम समूहामधले अंतर्गत बदल (त्यातले प्रभाव आणि मर्यादा), हा या नोंदीचा विषय नाही. पण या मोर्च्यासंदर्भात आलेल्या बातम्यांमध्येही मुस्लिमांची उपस्थिती अधोरेखित केलेली आहे आणि काही मोर्चेकऱ्यांच्या बोलण्यातही हे आलं (त्यातला सूर शत्रुभावी नव्हता. आजूबाजूला काय दिसतंय याबद्दल ते बोलत होते), म्हणून फक्त इथे हा मुद्दा नोंदवला आहे. केवळ पोशाखामुळे उपस्थिती जास्त दिसत नव्हती, उपस्थिती तुलनेने जास्त होती, पण पोशाखामुळे ती आणखी उठून दिसली.

दीड वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्च्याच्या आयोजकांनी निवेदन नेऊन दिलं. तिथेच मग सामूहिकरीत्या राष्ट्रगीत म्हणून मोर्च्याची सांगता झाली.


मोर्चा पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीतले दोन जण एकमेकांशी बोलत होते. त्यांच्या बोलण्यात एकंदर उदासीनता दिसत होती. त्यामुळे "प्रत्येक जण आपापल्या फायद्याचं बघतो", असं म्हणून त्यातला एक जण निघूून गेला. त्या-त्या वेळी सत्तेवर येणाऱ्या सरकारांबद्दलचा त्याचा शेरा होता. वर उल्लेख आलेले पन्नाशी ओलांडलेले गृहस्थ म्हणाले, "मी गेली पस्तीस वर्षं खाजगी शाळेत नोकरी करतोय (शिपाई म्हणून). माझं काय झालं? सरकारला एवढं या मुलांचं ऐकून घ्यायला काय होतंय! कामं नकोत द्यायला माणसांना!"

मोर्च्याच्याच रस्त्यावर एका ठिकाणी बीएस.सी. झालेला पंचविशीतला तरुण फळांचं दुकान चालवतो. सगळं शांत झाल्यावर, संध्याकाळी त्याला या मोर्च्याबद्दल मत विचारलं. तो म्हणाला, "बरोबर आहे ना. एका माणसासाठी सरकारपण का अडून बसलंय? मोर्चा बराच मोठा होता. अपेक्षेपेक्षा मोठा होता. दहा-बारा वर्षं असंच वागतायंत. काय एका माणसाला राजीनामा द्यायला सांगितलं तर!" या आंदोलनात गेले काही दिवस विरोधी राजकीय पक्षही उतरताना दिसतात, पण राजकारण्यांना सोडून द्या, त्याआधी महिनाभर मुलं मागणी करत होती, तेव्हा का ऐकलं नाही, असा प्रश्न त्याने नोंदवला.
पंतप्रधानांनी काल मध्यरात्री एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर टाकला- पेपरफुटीसंदर्भात जलदगती न्यायालयं स्थापन केली जातील, आणि यासंबंधी अधिक कठोर कारवाईसाठीची तरतूद करणारं विधेयक संसदेत मांडलं जाईल, इत्यादी गोष्टी या अडीच मिनिटांच्या व्हिडिओत ते बोलले. वांगचुक यांनी यानंतर काही वेळाने केंद्रीय मंत्र्यांच्या हजेरीत उपोषण सोडलं. मग त्यांच्या नावाचा उल्लेख करत परत पंतप्रधानांनी समाजमाध्यमांवर काही आश्वासनपर विधान प्रसिद्ध केलं. विरोधी पक्षांचे विविध नेतेही जंतर-मंतरवर ये-जा करत आहेत, तसंच देशभरात ठिकठिकाणी कमी-अधिक तीव्रतेची आंदोलनं होत असल्याच्या बातम्या आहेत. पुढेही काही ना काही घडत राहील. यातूनही अर्थ-अनर्थ लावले जातील. पण हा फक्त नेत्यांच्या वागणुकीचा किंवा वैयक्तिक लहरीपणाचा मुद्दा नाही.

इथे आपण केलेला प्रयत्न लोकांमध्ये विशिष्ट आंदोलनाबद्दल कोणते पडसाद उमटतात, ते समजून घेण्याचा आहे. या आंदोलनांबद्दल कोणत्या भाषेत बोलावं आणि ऐकावं, याबद्दलचा हा प्रयत्न होता. या आंदोलनाला विशिष्ट चेहरा नाही, दीर्घ काळ प्रस्थापित झालेलं नेतृत्व नाही, विशिष्ट विचारसरणी नाही- त्यामुळे बहुधा विश्लेषक किंवा पत्रकार आपापला आशय त्यात भरत राहतात. कॉक्रोच जनता पार्टीच्या दिपके यांनी त्यांची विचारसरणी म्हणून 'गांधी-आंबेडकर' यांची नावं घेतली आणि ते खरंही असेल, तरी ते एक व्यक्तिगत विधान उरतं. किमान या संदर्भात तरी त्यांच्या निमित्ताने सुरू झालेल्या आंदोलनाच्या एकंदर विचारसरणीचं ते विधान ठरेलच असं नाही. (वांगचुक हेही एक निमित्त असल्यासारखे यात दिसतात. काल त्यांनी उपोषण सोडलं तरी त्यामुळे या घडामोडींवर थेट काहीच परिणाम झाला नाही, हा याचा एक दाखला म्हणता येईल. त्यांच्या वैयक्तिक निर्णयांबद्दलचे तर्कवितर्कही सुरूच राहिले आहेत). व्यापक स्तरावर संघटना, तिची विचारसरणी, त्यानुसार होणारी उभारणी- असा या आंदोलनाचा प्रवास नाही. पेपरफुटीसारख्या एका विशिष्ट मुद्द्याच्या निमित्ताने राज्यसंस्थेविरोधातला रोष वेगवेगळ्या तऱ्हेने उत्स्फूर्तपणे व्यक्त करणारं हे आंदोलन दिसतं. 

शिक्षणाचा आणि रोजगाराचा प्रश्न इतर अनेक सामाजिक चिरफळ्यांना पुरून उरत असल्यामुळे लोक यात उत्स्फूर्तपणे सहभागी होताना दिसतात. याचा शेवट काय होईल, त्याबद्दल भाकित वर्तवणारी ही नोंद अर्थातच नाही.  पण आधी नोंदवल्याप्रमाणे, लोकशाही व्यवस्थेचं रूप कसं असायला हवं, त्यातील राज्यसंस्थेने उत्तरदायित्व राखलं नाही तर त्याचा कोणता परिणाम होऊ शकतो, याबद्दलचे प्रश्न अत्यंत ठळकपणे या आंदोलनाच्या निमित्ताने आपल्या सार्वजनिक अवकाशात विचारले जात आहेत. लोक आपापल्या परीने त्यावर काही उत्तरं देत आहेत, आपापली मतं मांडत आहेत, हेच रत्नागिरी इथल्या कालच्या मोर्च्यातही दिसलं. अशा घडामोडींबाबत त्या घडत असताना बरीच उत्तेजीत विधानं होतच असतात. पण त्या विधानांपलीकडे काही थांग लावायचा प्रयत्न आधीच्या नोंदीत आणि या वृत्तान्तात केला. 
मोर्च्याच्या आसपास पोलीस कर्मचारी तैनात होतेच. तसंच मोर्च्यापाठोपाठ बरीच सामग्री असणारी पोलिसांची गाडी संथपणे जात होती. त्यातल्या सामग्रीचा वापर करायची वेळ आली नाही. 

०४ जुलै २०२६

'सेक्युलर' : शब्दाचा साचा नि कोंबलेले अर्थ

'फ्रंटलाइन' या पाक्षिकाच्या १५-३० जूनच्या अंकात 'द सेक्युलर सेफ स्पेस' हा हुझैफुल रियाझ यांचा लेख छापून आला. त्याला प्रतिसाद म्हणून लिहिलेल्या इंग्रजी टिपणाचं हे मराठीकरण आहे. मूळ टिपणाचं संपादकांनी संक्षिप्त केलेलं रूप 'फ्रंटलाइन'च्या १-१५ जुलैच्या अंकात वाचक-पत्रांमध्ये प्रसिद्ध झालं (मूळ टिपण नोंदीखाली प्रतिक्रिया म्हणून दिलंय). या मुद्द्यावर स्वतंत्रपणे वेगवेगळी म्हणणी मांडली गेली आहेत, याची कल्पना असूनही एका पाक्षिकात लेख आल्यावर त्यावर वाचक म्हणून प्रतिक्रिया द्यावी वाटली, म्हणून हे पत्र लिहिलं. तितपतच त्याकडे पाहावं.
Frontline, 15 July 2026

"सेक्युलर" मुस्लीम विचारवंतांनी इस्लामी परंपरेतून मिळालेली दृष्टीभूमी (व्हॅन्टेज पॉइन्ट) सोडून दिली, पण प्रत्यक्षात "आधुनिकतेत स्वतंत्रपणे ज्या संसाधनांचा ठळक अभाव जाणवतो ती या परंपरेमध्ये आहेत", असा युक्तिवाद हुझयफुल रियाझ यांनी 'द सेक्युलर सेफ स्पेस' (फ्रंटलाइन, ३० जून) या लेखात केला. त्यांच्या मते, अशा "सेक्युलर" मुस्लीम विचारवंतांनी परंपरेतून येणारी दृष्टीभूमी सोडून दिल्यामुळे कोणताही "अस्सल" विचार शोधण्याची शक्यताही त्यांच्या हातून निसटली, कारण "अस्सल विचारासाठी अस्सल दृष्टीभूमी लागते, आपल्याला उभं राहता येईल अशी स्वतःची जागा लागते."

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली वैचारिक मांडणी अशा दृष्टीभूमीतून असल्याचा दावा रियाझ करतात. आंबेडकरांचा विचार "दलित समुदायाच्या अनुभवाधारित परंपरेवर उभारण्यात आला," असं त्यांचं म्हणणं आहे. पण आंबेडकरांनी केवळ अनुभवजन्य ज्ञानाच्या आधारे सैद्धान्तिक मांडणी केली नाही, तर पाश्चात्त्य राजकीय विचारपरंपरांमधली काही सूत्रं आणि बौद्ध परंपरा यांचाही आधार त्यांनी घेतला. यातील कोणत्याही परंपरेत ते जन्माला आलेले नव्हते, त्या अर्थी या परंपरा त्यांच्या "स्वतःच्या" / जन्मजात नव्हत्या. याउलट, रियाझ यांनी मात्र आपण ज्या परंपरेत जन्माला आलो तीच परंपरा आपलीशी करण्याच्या कल्पनेवर भर दिला आहे. असा युक्तिवाद करायचा तरी मग त्याच्या विविध नैतिक व अस्तित्वलक्ष्यी आयामांबाबत चर्चा करायला हवी. (आपण स्वतःची परंपरा खऱ्या अर्थाने सोडू शकतो का आणि कितपत सोडू शकतो, याचीही चर्चा कदाचित त्यात करता आली असती). पण तसं न करता रियाझ यांनी अस्सल सत्व नि स्वत्व यांबाबतीत निरपवाद आग्रह धरणारी भूमिका घेतल्याचं दिसतं. सेक्युलर मुस्लीम विचारवंतांनी कधीही "भारतातील मुस्लीम परिस्थितीशी अनुरूप स्वायत्त राजकीय सिद्धान्त" मांडण्याचा प्रयत्न केला नाही, अशी खंतही ते नोंदवतात. हे तर आंबेडकरांच्या विचारव्यूहाला छेद देणारं आहे.

आंबेडकरांनी स्वतःच्या जन्मजात समुदायाच्या परिस्थितीशी "अनुरूप" ठरेल असा "स्वायत्त" राजकीय सिद्धान्त मांडायचा प्रयत्न केला की, त्यांच्या दृष्टीनुसार आधुनिक लोकशाही जगण्यासाठी आवश्यक वाटणारे विचार उभारण्याची त्यांची खटपट होती? 'बुद्ध अँड हिज् धम्म' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत आंबेडकर लिहितात : "विज्ञान येणाऱ्या आधुनिक माणसाला धर्म हवाच असेल तर, त्याला केवळ बुद्धाचाच धर्म आपलासा करण्याजोगा आहे. [...] आधुनिक जगाला स्वतःचा बचाव करायचा असेल तर त्याला बौद्ध धर्माशिवाय दुसरा पर्याय नाही." आंबेडकरांच्या या दाव्याशी सहमत व्हायचं की नाही, हा वेगळा मुद्दा. पण आधुनिक माणसाने स्वतःची परंपरा निवडायला हवी, ही त्यांची इच्छा त्यांच्या लेखनात आणि भाषणांमध्ये सातत्याने व्यक्त झालेली दिसते. किंबहुना, बौद्ध धर्मात प्रवेश करण्यासंबंधी अनुयायांना आवाहन करत असतानाही ते 'स्वतः विचार करून' परंपरा निवडण्याचा मुद्दा अधोरेखित करत होते. (बौद्ध धर्म हाच आधुनिकतेचा एकमेव तारणहार असल्याचा आग्रह वेगळ्या वादाचा विषय होऊ शकतो, पण तो निराळा मुद्दा). शिवाय, आंबेडकरांच्या मांडणीमधल्या सामाजिक लोकशाही व सामाजिक सद्सद्विवेकबुद्धी यांसारख्या संकल्पना सर्व समाजघटकांना संबोधून मांडलेल्या होत्या, केवळ त्यांनी जन्म घेतलेल्या समुदायाबद्दलचा तो "स्वायत्त" विचार नव्हता.

भारतीय संदर्भात "सेक्युलर" या शब्दाचा अर्थ कसा घ्यायचा, हाही प्रश्न इथे कळीचा ठरतो. उदाहरणार्थ, मराठीत "सेक्युलॅरिझम"साठी अनेक पर्यायी, किंबहुना मूळच्या म्हणाव्यात अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. भारतीय संविधानाच्या अधिकृत मराठी भाषांतरात 'धर्मनिरपेक्षता' हा शब्द येतो- यात राज्यसंस्था कोणत्याही विशिष्ट धार्मिकतेशी जोडून न घेता स्वतंत्रपणे कार्यरत राहील, असा गर्भितार्थ आहे. या व्यतिरिक्त 'इहवाद' ही संज्ञा 'या लौकिक जगातल्या' घडामोडींना केंद्रस्थानी ठेवणारा अर्थ मांडते. 'सर्वधर्मसमभाव' हा सर्व धर्मांना समान अंतरावरून किंवा समान जवळिकीने समजून घेण्याची इच्छा मांडणारा शब्द आहेच. तर, काही जण 'निधर्मीवाद' असाही शब्द यासाठी वापरतात- त्यातून कोणत्याच धर्माशी काही देणंघेणं नसल्याचा अर्थ सूचित होतो. 'धर्मनिरपेक्षते'सह यातील सर्व संज्ञांचा विचार केला तर, रियाझ यांना खटकणाऱ्या पाश्चात्त्य आधुनिकतेतील 'सेक्युलर' या संकल्पनेपेक्षा काही वेगळे (आणि काही सारखे) अर्थ हाताला लागतात.

अशा वेळी आपण "आपल्या स्वतःच्या" भाषांची दृष्टीभूमी वापरून या गुंतागुंतींकडे पाहिलं तर कदाचित या वैविध्यपूर्ण परंपरेकडे पाहण्याचा अधिक धड दृष्टीकोन सापडण्याची शक्यता आहे. नाहीतर, वारकरी परंपरेत मुस्लीम संत असणं आणि सुफी दर्ग्यांवर दर्शनासाठीच्या रांगेत हिंदूही असणं, यांसारख्या घडामोडींचं वर्णन करणारे शब्द कुठून सापडतील? यात फक्त सरमिसळच आहे की अधिक काही 'भाव' व्यक्त होतो? या परंपरा आहेत म्हणून वैरभाव नसतो, असंही नाही. तोही असतोच. पूर्वग्रह असतात, त्यानुसार आग्रह धरले जातात, अन्यायही होतात. पण परंपरेतला दुसराही एक भाव आहे, तो कोणता? यावर बोलण्याऐवजी "स्वायत्त" राजकीय विचार मांडण्यासाठी स्वतःच्या जन्मजात परंपरेलाच प्राधान्य देण्याचा मुद्दा रियाझ यांच्या लेखात मांडलेला आहे. हाच मुद्दा कमी-अधिक प्रमाणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या किंवा विनायक दामोदर सावरकरांच्या हिंदुत्ववादात अनुस्यूत आहे. त्यात बहुसंख्याक हिंदू समुदाय "आपला" असल्याचं सांगितलं जातं आणि आता या विचारसरणीला आपलं मानणारं सरकार देशात बहुसंख्य ठिकाणी सत्तेत आहे. हिंदू धर्मपरंपरेसंदर्भात "स्वायत्त" राजकीय विचारांची इच्छा धरणारा लेख कोणी लिहिला, तर तो 'फ्रंटलाइन'मध्ये छापून येईल का, असा आक्षेप हिंदुत्ववाद्यांनी घेतला, तर त्यावर काय उत्तर देणार? मग 'सेक्युलर' शब्दावरून टिंगलटवाळीही सुरू राहते. हे इंग्रजी शब्दामुळे अधिक सोयीचं होतं. तसंच, यातून काही सरधोपट पुरोगामी वाटणारे साचेही तयार होतात.

उदाहरणार्थ, परवाच एका पत्रकाराने राज्याचे विद्यमान अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना असा प्रश्न विचारला : "हा शाहू-फुले-आंबेडकरांचा, किंवा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र, धर्मनिरपेक्षता मांडणारा सेक्युलर महाराष्ट्र अशी ओळख आहे, अशा महाराष्ट्रात या विचाराला टक्कर देणारा उजवा विचार इतक्या स्टाँगपणे प्रस्थापित होईल, नव्हे पंधरा-पंधरा वर्षं सत्तेत राहील, असा विचार तुम्ही कधी केला होतात का?" भुजबळांनी शांतपणे बोलायला सुरुवात केली आणि व्यवहारामध्ये हा विचार मागे पडत नसल्याचं सांगितलं. त्यांच्या उत्तरानंतर पुन्हा 'सेक्युलर' हा शब्द वापरून पत्रकाराने साधारण तोच प्रश्न उत्कटपणे विचारला. त्यावरही भुजबळांनी काही तथ्यं मांडून उत्तर दिलं. साधारणपणे, पत्रकार ज्या सरकारला 'प्रतिगामी', 'उजव्या विचारां'चं, 'सेक्युलर वा धर्मनिरपेक्ष विचारांच्या विरोधी विचारां'चं म्हणत होता, ते सरकार व्यवहारामध्ये काही तसं विपरित करत नसून अनेक गोष्टी आमच्या (म्हणजे शाहू-फुले-आंबेडकरी) विचारांनुसार होत असल्याची ग्वाही भुजबळांनी दिली. त्यासाठी त्यांनी दाखलेही दिले. मग मधे एकदा पत्रकाराने काही धार्मिक उन्मादाची उदाहरणं देऊन थोडी स्पष्टता आणली. पण या घडामोडी आधीपासूनच घडत असल्याचं आणि प्रत्येक काळात असे प्रतिगामी लोकही असतात, असं सांगून मुद्दा पुढे नेण्यासाठी फारसा वाव उरणार नाही, अशी काळजी भुजबळांनी सफाईदारपणे घेतली. तरीही, पत्रकार शेवटी म्हणाला, "आजचा विषय थोडासा अकॅडमिक वाटला असेल, पण तो अत्यंत महत्त्वाचा विषय होता." मग त्याने उपस्थित प्रेक्षकांना आणि एकंदरच तरुणाईला संदेश दिला की, त्यांनी नुसतं रीलमध्ये अडकून राहू नये, पुस्तकं वाचावीत! जाताजाता, "आपण या पेहरावामध्ये.. मॉडर्न अंदाजामध्ये आहोत", त्याचं श्रेय या आधीच्या मंडळींना आहे, असाही उल्लेख त्याने केला. थोडक्यात- आपल्या आत्ताच्या आधुनिकतेची पायाभरणी केलेला विचार सध्या मागे पडतोय, असं हे धडपणे मांडलं न गेलेलं सूत्र होतं. पण, शेवटी आधुनिकतेचा सकारात्मक अर्थ म्हणून पेहरावाकडे बोट दाखवण्यात जी मर्यादा आहे, तशी विचारसरणीच्या मुद्द्याची मर्यादा 'सेक्युलर' या शब्दाने सुरुवातीलाच निश्चित केली. सुमारे अर्धा तासाचा हा संपूर्ण कार्यक्रम 'सेक्युलर विचारसरणी' या मुद्द्यावरचा होता (मधेच थोडा वेळ संदर्भाशिवाय समताही येऊन गेली). पण खुद्द त्या मुद्द्यावर स्पष्टता येण्याकडे बोलणं गेलं का?

शाहू महाराज ब्राह्मणांचं वर्चस्व टाळून वैदिक धर्माचा व्यवहार उभा करता येईल का, असा कृतीच्या पातळीवरचा प्रयत्न करत होते. शिवाय, त्यांची राज्य हाकतानाची धोरणं सर्वधर्मसमभाव राखणारी होती. जोतीराव फुले यांनी सार्वजनिक सत्य धर्माच्या रूपात काही कल्पक मांडणी करून पुरोहित वर्गाची मध्यस्थी नसलेलं, 'निर्मिका'शी थेट नातं सांगणारं असं एक सामाजिक अध्यात्म मांडलं. आंबेडकरांनी त्याही पलीकडे विविधांगी धार्मिक विश्लेषण केलं आणि शेवटी हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्माचा विचार स्वीकारून तोच आधुनिक युगात योग्य मार्ग असल्याचं प्रतिपादन केलं. या तिघांच्याही विचार-व्यवहारात धर्म ही संकल्पना होतीच. यात रूढार्थाने पाश्चात्य 'सेक्युलॅरिझम' नाही! मग तो शब्द वापरून आपण खोलात विचार करणंच टाळतो का, हे पाहायला हवं.

दुसरीकडे, सावरकरांचा हिंदुत्ववाद 'इहवादी' आहे (म्हणजे त्यात कर्मकांडाला नि पारलौकिकतेला मध्यवर्ती स्थान नाही), पण तो विचार 'धर्मनिरपेक्ष' किंवा 'सर्वधर्मसमभाव' या संज्ञांशी जोडता येत नाही. त्यात एका विशिष्ट धर्मपरंपरेशी जोडलेली बहुसंख्याक वंशसांस्कृतिक राष्ट्रीयत्वाची मांडणी आहे. याउलट, गांधींचं स्वतःला हिंदू म्हणवून घेत असतानाच सर्वधर्म प्रार्थना करणं, आणि त्यांचेच सहप्रवासी असणाऱ्या विनोबांचं 'सर्व धर्म प्रभूचे पाय' असं म्हणणं, हे 'सर्वधर्मसमभाव' राखणारं, पण काटेकोरपणे 'इहवादी' दृष्टीवर भर न देणारं होतं. तर, आंबेडकरांनी 'सर्व धर्म एकसारखेच सत्य नि चांगले असल्याची धारणा धडधडीतपणे चुकीची' असल्याची भूमिका घेतली (बुद्ध अँड हिज् धम्म, पान २४) आणि आधुनिक लोकशाही समाजातल्या माणसाने स्वतःचा धर्म स्वतः निवडायला हवा, असं मत मांडलं. त्यानुसार त्यांनी बौद्ध धम्मापर्यंतची वाटचाल केली. पण ते या धर्मविचारावर राज्यसंस्थेच्या कारभाराचा सिद्धान्त मांडत नव्हते किंवा यानुसार त्यांनी राष्ट्रीयत्वासंबंधीचे आग्रह धरले नाहीत. शिवाय, यात काही विधींना जागा असली तरी पारलौकिकतेला जवळपास वाव नसल्यामुळे इहवादी बाजू होतीच. या व्यतिरिक्तही नंतरच्या काळात हमीद दलवाईंसारखे 'इंडियन सेक्युलर सोसायटी'चे सदस्य असणारे आणि 'मुस्लीम सत्यशोधक मंडळा'ची स्थापन करणारे लोकही झाले. यात सांस्कृतिक अंगाने स्वतःचं मुसलमान असणं मोकळेपणाने स्वीकारताना धार्मिक बाजूच्या काही सुधारणा अभिप्रेत होत्या. या सगळ्या विचार-व्यवहाराला फक्त 'सेक्युलर' या एका शब्दात कसं गुंफणार. त्यात गुंफण्यापेक्षा कोंबणंच होतं आणि ते फक्त शब्दापुरतं न उरता विचारही कोंबले जातात. 'सेक्युलर' हा शब्दच वापरू नये, अशा अर्थाने हे टिपण लिहिलेलं नाही, पण त्याचे आपल्या परिसरातले अनेकरंगी अर्थ विसरून जाण्याइतका एकसाची वापर बरा वाटत नाही. 
नवीन नोंदींच्या माहितीसाठी : व्हॉट्स-ॲपइन्स्टाग्राम 
ऐच्छिक वर्गणीसाठी उजवीकडचा समास पाहावा