![]() |
| कोंग स्पिलिटी लिंगडोह लँगरीन यांचं छायाचित्र : तरुण भारतीय । त्यांच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ । राखणदार चिन्ह : राखणदार संघ । मांडणी : रेघ |
डोमिस्याट, वेस्ट खासी हिल्स, मेघालय
मेघालयाची राजधानी शिलाँगपासून सुमारे दीडशे किलोमीटरांवर असणाऱ्या डोंगराळ भागात डोमिस्याट नावाचं गाव. त्या गावात राहणाऱ्या कोंग स्पिलिटी लिंगडोह लँगरीन यांचं २८ ऑक्टोबर २०२०मध्ये त्यांच्या वयाच्या पंच्याण्णवाव्या वर्षी निधन झालं. तेव्हापासून खासी स्टुडन्ट्स युनियन या संघटनेच्या पुढाकाराने स्थानिक लोक २८ ऑक्टोबर हा युरेनियमविरोधी दिवस म्हणून साजरा करत आले आहेत. अणुऊर्जेसाठीचा प्रमुख कच्चा पदार्थ युरेनियम हा असतो.
कोंग स्पिलिटी यांनी त्या हयात असताना कायमच युरेनियमच्या खाणींसाठी स्वतःची जमीन विकायला ठाम नकार दिला, त्याची गोष्ट तरुण भारतीय यांच्या 'एम, नो, नहीं' या छायाचित्रांच्या पुस्तकातून उलगडते (यारबाल बुक्स, डिसेंबर २०२५). खासी भाषेत 'एम'चा अर्थ 'नाही' असा होतो. डोमिस्याट गावात सातच घरं आणि ती सर्व कोंग स्पिलिटी यांच्याच विस्तारित कुटुंबाची. तिथल्या दोनेक टेकड्यांचा विशाल परिसर या कुटुंबाच्या 'मालकी'चा आणि कुटुंबातील अशा निर्णयाची धुरा कोंग स्पिलिटी या वृद्ध स्त्रीकडे. या भागातील जमिनीखाली युरेनियमचे साठे असल्याचा तपास १९७०च्या दशकात लागला असला तरी डोमिस्याट गावाखालच्या प्रचंड साठ्यांचा शोध पहिल्यांदा १९८६-९२ या दरम्यान घेतला गेला. "या शोधकामासाठी सरकारच्या आण्विक खनिजं विभागाचे लोक यायचे. या कामादरम्यान कोंग स्पिलिटी यांच्याकडची एकोणनव्वद गुरं मेली. गावात काही स्त्रियांची मुलं जन्मतःच मृत असल्याचं लक्षात आलं. शोधकामाला येणाऱ्या लोकांनी स्त्रियांना छळल्याच्याही काही तक्रारी आल्या. त्यामुळे कोंग स्पिलिटी यांनी या सरकारी माणसांना हाकलून लावलं. करार नको. कसल्या भूलथापाही नकोत," अशी भूमिका कोंग स्पिलिटी यांनी घेतली (पान ३९). शिलाँगमध्ये आपल्या कुटुंबासह राहणारे तरुण भारतीय २००७ साली पहिल्यांदा या भागात गेले आणि मग पुढे दोन-अडीच दशकं जात राहिले, तिथली छायाचित्रं काढत राहिले, कोंग स्पिलिटी यांच्याशी बोलायचा प्रयत्न करत राहिले. त्यातून आलेले थोडेसे शब्द आणि बरीचशी छायाचित्रं सुमारे २०० पानांच्या या पुस्तकात आहेत.
![]() |
| कोंग स्पिलिटी लिंगडोह लँगरीन (१९२५-२०२०) छायाचित्र : तरुण भारतीय (एम, नो, नहीं- पानं ६४-६५) |
यातील काही छायाचित्रं- विशेषतः भौगोलिक अवकाशाची छायाचित्रं- स्वतंत्रपणेही लक्षवेधी आहेत (त्यातलीच निवडक इथे लेखासोबत दिली आहेत), तर काही छायाचित्रं मुख्यत्वे पुस्तकातलं कथन पुढे नेण्यासाठीचा तपशीलच देऊन थांबतात. या कथनाची सुरुवात २०२० साली कोंग स्पिलिटी यांच्या अंत्यसंस्कारापासून होते, त्यानंतर तरुण भारतीय या भागात जायला लागले त्या प्रवासाला धरून तिथल्या प्रदेशाची, कोंग स्पिलिटी यांच्या घराची व कुटुंबियांची छायाचित्रं येतात. तसंच त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन उभ्या राहिलेल्या काही आंदोलनांची छायाचित्रं येतात. काही ठिकाणी खाणकाम सुरू झालं, तिथल्या खाणींची छायाचित्रं येतात.
दोन डोंगरांची मालकीण असूनही "मी श्रीमंत नाही", असं कोंग स्पिलिटी तरुण यांना एकदा सांगतात. पण मग युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने दिलेला प्रस्ताव त्यांनी का नाकारला? कोंग स्पिलिटी यांनी स्वतःची जमीन तीस वर्षांच्या भाडेकरारावर खाणकामासाठी उपलब्ध करून दिली तर त्यासाठी ४५ कोटी रुपयांचा प्रस्ताव कंपनीने त्यांच्या समोर ठेवला होता. तरुण यांच्या प्रश्नावर त्या उत्तर देत नाहीत. न बोलता त्यांना झाडांच्या राईमध्ये घेऊन जातात. तिथे एक धबधबा नि पाण्याचा डोह असतो. कोंग स्पिलिटी म्हणतात, "पैशाने ही नदी विकत घेता येईल का? ही जमीन? हे स्वातंत्र्य विकत घेता येईल?" (पान ४९)
![]() |
| डोमिस्याट गावाचा भाग छायाचित्र : तरुण भारतीय (एम, नो, नहीं : पान ३१) |
तरुण यांची युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडियातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याशी ओळख होते. त्याला ते खाणकामामुळे विस्थापित होणाऱ्या लोकांविषयी विचारतात. यावर तो चकित होऊन त्यांना म्हणतो की, कसलं विस्थापन? आम्ही त्यांचं पुनर्वसन करू. अगदीच सोपं आहे ते. किती जणांचं पुनर्वसन करावं लागेल? जास्तीत जास्त एक हजार. आम्ही त्यांना पैसे देऊ, त्यांच्यासाठी घरंही बांधू, काही पगारी नोकरी देऊ. तसंही या लोकांकडे जमीन असली तरी त्यांना तिची किंमत कळत नाही (पान ९३).
जमीन, किंमत, मूल्य, परिसर याच्याबद्दलचे निरनिराळे प्रश्न आणि या गोष्टींकडे पाहण्याचे भिन्न दृष्टिकोन वरच्या उद्गारांमधून समोर येतात, तसेच या पुस्तकातल्या छायाचित्रांमधूनही काही प्रमाणात समोर येतात. काही छिन्नविछिन्न झालेले भूप्रदेश त्यात आहेत, तर काही दूरदूरपर्यंत 'मोकळी' असणारी जमीन आहे.
![]() |
| पुस्तिका (Yaarbal Books, 2025) |
पुस्तकाला शेवटी तरुण यांच्या पत्नी आणि राजकीय-सामाजिक कार्यकर्त्या अँजेला रंगद यांनी लिहिलेलं टिपण जोडलं आहे. त्यात या छायाचित्रांमधून उलगडणाऱ्या कथनाची पार्श्वभूमी सांगताना तरुण यांच्याविषयीच्या आठवणीही थोडक्यात नोंदवल्या आहेत. तरुण यांचं जानेवारी २०२५मध्ये निधन झालं. त्यामुळे त्या वर्षअखेरीला प्रकाशित होऊ घातलेलं हे पुस्तक त्यांना पाहायला मिळालं नाही.
या पुस्तकासोबत रंगद यांनी युरेनियम आणि अणुऊर्जा या संदर्भात लिहिलेली वीस पानांची प्राथमिक माहितीपर पुस्तिकाही आहे- त्यात मुद्देसूदपणे युरेनियमचं खाणकाम आणि अणुऊर्जा या संदर्भात मांडणी केली आहे. हे प्रकल्प परिसरातील जलस्त्रोत प्रदूषित करतात, त्यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट दीर्घकालीन पातळीवर लावता येत नाही, किरणोत्साराचा धोका सतत असतो, आणि यातून बाहेर पडणारे कण शरीरात गेल्यास माणसांमध्ये ल्यूकेमियासारख्या आजारांच्या शक्यता वाढतात, इत्यादी माहिती आकडेवारीसहित सोप्या भाषेत या पुस्तिकेत दिली आहे. अशा आर्थिकदृष्ट्या महागड्या आणि प्रत्यक्षात त्या प्रमाणात परतावा न देणाऱ्या, तसंच सजीव सृष्टीवर दीर्घकालीन घातक परिणाम करू शकणाऱ्या प्रकल्पांपेक्षा पवनऊर्जा, सौरऊर्जा यांसारख्या स्त्रोतांसंदर्भातील संशोधनावर अधिक खर्च केल्यास हितकारक ठरेल, असा निष्कर्ष त्यांनी शेवटी नोंदवला आहे. तरुण यांचं पुस्तक आणि ही पुस्तिका यातल्या इंग्रजी मजकुरासोबतच त्याचं खासी भाषांतरही समांतरपणे त्या-त्या पानांवर किंवा पानांशेजारी दिलं आहे.
![]() |
| एम, नो, नहीं : मुखपृष्ठ |
मेघालय राज्यातील बहुतांश भागांप्रमाणे खासी हिल्सचा भाग संविधानाच्या सहाव्या सूचीअंतर्गत येतो. त्यामुळे तिथे तुलनेने अधिक प्रमाणात प्रशासकीय, कायदेमंडळीय व न्यायिक स्वायत्तता लाभलेली 'ऑटोनॉमस डिस्ट्रीक्ट कौन्सिलं' आहेत. तर, खासी हिल्समधल्या अशा कौन्सिलने काही गावांमधून युरेनियमच्या खाणकामासाठी परवानगी मिळवली आणि त्यातून गावा-गावांमध्येही संघर्षाचं वातावरण निर्माण झालं, इत्यादी तपशील या पुस्तकाअखेरीच्या टिपणात आला आहे. यातले काही गुंते आणखी शोधण्यासारखे आहेत. पण तो निराळा विषय होईल. या पुस्तकात मुख्यत्वे कोंग स्पिलिटी यांनी दिलेल्या ठाम नकाराची गोष्ट सांगण्याला प्राधान्य आहे. त्यामुळे त्यातला भावात्मक आशय अधिक ठसेल अशा पद्धतीने आला आहे.
सप्टेंबर २०२५मध्ये पर्यावरण, वनं व हवामान बदल मंत्रालयाने सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या, आण्विक प्रकल्पांसाठी गरजेच्या खनिजांचं उत्खनन करण्यासंदर्भात जनसुनावणी घेण्याची गरज नसल्याचा निर्णय 'कार्यकारी आदेशा'द्वारे घेऊन टाकला (डाउन टू अर्थ, ११ सप्टेंबर २०२५). इथे या पुस्तकातलं कथन संपतं. आता कोंग स्पिलिटीसारख्या लोकांनी कितीही 'नकार' दिला, तरी त्याकडे काणाडोळा करत प्रकल्प पुढे नेणं सत्ताधाऱ्यांना अधिक सोयीचं झालं, असा या निर्णयाचा अर्थ आहे.
असं होणार असेल तर मग कोंग स्पिलिटी यांच्या नकारामागे मुळात कोणता सखोल स्वीकार असतो, त्याचा विचार होण्याची शक्यता आणखी मंदावते. विकासाच्या प्रस्थापित कल्पनेबाबत प्रश्न उपस्थित करणं हे अव्यवहार्य, अप्रस्तुत किंवा थेट विकासविरोधीच ठरवण्याकडे कल असतो. तरीही, असे प्रश्न विचारणारी मंडळी पुढे येतच राहतात.
कोकण किनारपट्टी, महाराष्ट्र
महाराष्ट्र-कर्नाटक-गोवा यांच्या सीमेवरील कणकुंबी या गावापासून सिंधुदुर्गातील बांदा शहराजवळच्या सोनुर्ली या गावापर्यंत एक ‘राखणदार यात्रा’ १३ जूनपासून सुरू झाली . ‘जल-जंगल-जमीन’ ही मध्य भारतातील आदिवासी समुदायांनी रूढ केलेली घोषणा स्वीकारत कोकणातील स्थानिक परंपरांमधील निसर्गपूरक खुणा ठळक करू पाहणारी, ‘विकासा’च्या प्रश्नांबाबत लोकसंवादाचा प्रयत्न करणारी ही यात्रा असल्याचं संयोजकांशी बोलल्यावर लक्षात येतं. यू-ट्यूबवर 'कोकणी रानमाणूस' या नावाने वाहिनी चालवणाऱ्या प्रसाद गावडे यांनी यात पुढाकार घेतला आहे, पण त्याचसोबत निसर्गसंवर्धनासंबंधी दीर्घ काळ काम करणारे तरुण, काही शेतकरी आणि कार्यकर्ते या यात्रेत आहेत.
![]() |
| श्रेय : राखणदार संघ |
मे महिन्यात महाराष्ट्र शासनाने कोकणातील साडेपंचवीस हजार मेगावॅट क्षमतेच्या प्रस्तावित आण्विक ऊर्जाप्रकल्पांसाठी विविध खाजगी व सरकारी कंपन्यांशी सुमारे साडेसहा लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले (हिंदुस्तान टाइम्स, २० मे २०२६). वास्तविक, जैवविविधतेच्या दृष्टीने संपन्न असलेला इथला सुमारे ६० ते ७० टक्के भाग ‘पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र’ असल्याचं गाडगीळ आयोगाने (२०११) नमूद केलं होतं. त्यामुळे इथे खाणकाम, मोठे ऊर्जाप्रकल्प आणणं विध्वंसक ठरेल; त्याऐवजी इथे निसर्गपूरक उद्योजकतेची वाट चोखाळावी, त्यासंबंधीच्या निर्णयप्रक्रियेत स्थानिकांचा अधिकाधिक सहभाग असावा, इत्यादी शिफारसी आयोगाने केल्या. पण त्याची अंमलबजावणी झाली नाही.
या पार्श्वभूमीवर 'राखणदार यात्रे'च्या निमित्ताने 'विकासा'बद्दल पर्यायी चर्चा घडवण्याचा प्रयत्न दखलपात्र आहे. यात विकासाच्या विशिष्ट प्रस्थापित रूपाला नकार देतानाच काहीएका पर्यायी कल्पनेचा स्वीकार आहे, असं सध्या दिसतं. त्यासाठी जाणीपूर्वक वापरलेली चिन्हं परंपरेतली आहेत. या यात्रेचं बोधचिन्ह कोकणात काही ठिकाणी सापडलेल्या आदिम कातळशिल्पांचा सर्जक वापर करणारं आहे. ही चिन्हं, त्यासोबत येणारी भाषा वर्तमानातल्या सामाजिक-राजकीय-आर्थिक घडामोडींवरच्या चर्चेसाठी आणि पर्यायी विकासाची दृष्टी मांडण्यासाठी करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. एका अर्थी कोंग स्पिलिटी लिंगडोह लँगरीन याही 'राखणदारा'चीच भूमिका मांडत होत्या, त्यामुळे या यात्रेचं नातं त्यांच्याशीही असल्याचं म्हणता येईल.
![]() |
| कोंग स्पिलिटी लिंगडोह लँगरीन (१९२५-२०२०) छायाचित्र : तरुण भारतीय (एम, नो, नहीं : पानं १७२-१७३) |
०
काही जुन्या नोंदी :
- 'पाडा'तले प्रश्न, पालघर, बारसू आणि पश्चिम पापुआ
- जीव देऊ, पण जमीन नाही
- आदिवासी गावाच्या गोष्टीतून विकासाची दृष्टी यावी : मनिष कुंजाम
०
नवीन नोंदींच्या माहितीसाठी : व्हॉट्स-ॲप । इन्स्टाग्राम
ऐच्छिक वर्गणीसाठी उजवीकडचा समास पाहावा







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा