Tuesday 26 March 2013

थँक्स मायकल । रेघ : एक टप्पा

'झेड कम्युनिकेशन्स' ही मॅसेच्युसेट्स (अमेरिका) इथली माध्यमसंस्था तुमच्या माहितीची असेल तर तुम्हाला लगेच हे सांगायला हरकत नाही की, 'रेघे'वर आता 'झेड-नेट' व 'झेड-मॅगझिन' या दोन प्रकाशनांमधला मजकूर योग्य ते सौजन्य दाखवून आपण प्रकाशित करणार आहोत, त्यासाठी आवश्यक परवानगी आपण त्यांच्या संपादकांकडून घेतलेली आहे. त्यांचे सह-संस्थापक व सह-संपादक मायकल अल्बर्ट यांनी 'रेघे'ला ही परवानगी देत असल्याचं कळवलंय, त्यामुळे आता अधूनमधून त्यांच्या मदतीने आपण काही मजकूर इथे नोंदवू. हा मजकूर कोणाचा असू शकतो, तर रॉबर्ट फ्रिस्क, नोम चोम्स्की, जॉन पिल्जर या नि अशाच काही महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मंडळींचा असू शकतो. हे लोक 'झेड-नेट'हून 'रेघे'द्वारे आपल्यापर्यंत आता अधिकृतरित्या पोचू शकतील.

केवळ एका लहानशा ई-मेलला सहज प्रतिसाद देत मायकल यांनी 'रेघे'ला त्यांच्या प्रकाशनांमधले लेख मराठीत अनुवादित करण्याची परवानगी दिली, त्याबद्दल आपण आधी मायकल यांना 'थँक्स' म्हणूया. स्वतःच्या नावावर पंधराएक प्रकाशित पुस्तकं असलेल्या मायकल यांनी केवळ परवानगीच दिली असं नव्हे तर 'आमच्यासाठीही ही मोठी गोष्ट असेल' असं म्हटलं. एकूण चांगलं झालं.


मायकल अल्बर्ट आणि लिडिया सार्जन्ट या दोघांनी १९८६मधे 'झेड कम्युनिकेशन्स'ची स्थापना केली. तेव्हाच त्यांनी 'झेड मॅगझिन' या मासिक नियतकालिकाचीही सुरुवात केली. त्यानंतर १९९५ साली 'झेड-नेट', १९९८ साली 'झेड व्हिडियो' असा या संस्थेचा प्रवास होत आलेला आहे. याशिवाय 'झेड-बुक्स' असाही त्यांचा उपक्रम आहे. थोडक्यात सांगायचं तर, माध्यमांच्या बाजारापासून अंतर राखून चालणाऱ्या पर्यायी माध्यमांच्या प्रवाहांची गरज भागवण्याचे अनेक प्रयत्न जगभर सुरू असतात, त्यातला 'झेड कम्युनिकेशन्स' हा एक प्रयत्न आहे.
'झेड-नेट' व 'झेड-मॅगझिन' या दोन्ही ठिकाणी आंतरराष्ट्रीय राजकारणापासून माध्यमांच्या व्यवहारापर्यंत विश्लेषणाच्या पातळीवरचा मजकूर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध होतो. अनेक मुलाखती, लेख यांच्या मदतीने जागतिक घडामोडींच्या प्रकाशात न येणाऱ्या बाजू 'झेड'च्या माध्यमातून वाचकांपुढे आणल्या जातात हे कोणीही तपासून घेऊ शकतं. मोठ्या प्रमाणावर स्वतंत्रपणे काम करणारी पर्यायी माध्यमांची एक व्यवस्था 'झेड-कम्युनिकेशन्स'वाल्यांची आहे.

'रेघे'पुरतं आपण 'झेड-नेट' व 'झेड मॅगझिन' यांनी प्रकाशित केलेला मुख्यत्त्वे माध्यमांसंबंधीचा मजकूर मराठीमधे अनुवादित करू, असं सध्या ठरवलंय. यात काही प्रमाणात जागतिक घडामोडींमधले काही इतर दृष्टिकोन वाचकांपुढे ठेवायलाही त्यांची मदत होईल. पण त्यांच्याकडून इथे येणारा मजकूर मुख्यतः माध्यमांविषयीचा असेल. आणि 'झेड'मधले लोक डाव्या विचारसरणीकडे झुकलेले आहेत, हे वाचक म्हणून काहींच्या लक्षात येऊ शकेल, किंवा या नोंदीमधे चिकटवलेल्या त्यांच्या 'लोगों'मधील विधानंही काही 'विरोध', 'बदल' अशा गोष्टींबद्दल बोलू पाहातायंत. कदाचित संस्थात्मक पातळीवर मोठी रचना करायला अशी विधानं आवश्यक असतील, पण 'रेघे'वर आपण असं काही करत नाही.'रेघे'साठी काही मजकूर तयार करण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर काही लोकांशी बोलून आपण अनेक प्रयत्न केले, पण त्यात काही फारसं जमून आलं नाही. आता 'झेड-कम्युनिकेशन्स'शी ही एक ढोबळ सहकार्याची बोलणी पक्की झाल्यामुळे वेगळा मजकूर येण्याच्या पातळीवर 'रेघे'ला मदत होईल. अधिक वेगळे दृष्टिकोन वाचकांपर्यंत पोचवण्याच्या प्रवासात एक वेगळा टप्पा आता येईल, असं दिसलं म्हणून आणि मायकल यांचे विशेष आभार मानणं आवश्यक आहे म्हणून ही नोंद.

2 comments:

  1. Excellent news..! I am a regular reader of Z-Net.

    ReplyDelete
  2. दररोज नव-नवीन काहीतरी मिळतंय 'रेघे'वरून. इतक्या आरामात एवढी महत्त्वपूर्ण माहिती, एक नवीन दृष्टीकोन मिळतो, त्यासाठी आभार. हा दृष्टीकोन डावा आहे कि नाही याच्याशी माझं तरी काही विशेष देणं-घेणं नाही. सगळचं पटावं असं ही नाही. पण जे सुरु आहे त्याकडे डोळे उघडे ठेवून बघायला मदत होते एवढं नक्की.

    ReplyDelete