जॉन पिल्जर |
जॉन पिल्जर कोण, याची प्राथमिक किंवा तपशिलातली माहिती ज्यांना हवी असेल ती त्यांना त्यांच्या वेबसाइटवर जाऊन सापडू शकेल. तिथे त्यांची पुस्तकं, त्यांनी बनवलेले माहितीपट अशा विविध गोष्टींची माहिती आहे.
इथल्याइथे थोडक्यात सांगायचं तर, १९३९ साली ऑस्ट्रेलियात जन्मलेले पिल्जर इंग्लंडमधे गेली अनेक वर्षं पत्रकार म्हणून वावरतायंत. व्हिएतनामच्या युद्धापासून त्यांनी अनेक युद्धांचं वार्तांकन केलंय. पिल्जर यांनी सुरुवातीला वर्तमानपत्रांमधे काम केलं, शिवाय त्यांना ज्या विषयाचा अधिक खोलवरचा तपशील लोकांसमोर ठेवायचाय त्यासंबंधी ते स्वतंत्रपणे माहितीपटही बनवत आलेत. 'इयर झिरो : द सायलन्ट डेथ ऑफ कम्बोडिया' हा त्यांचा बहुधा पहिला माहितीपट होता. दोन वर्षांमागे त्यांचा 'द वॉर, यू डोन्ट सी' हा माहितीपट गाजला होता. त्यांच्या माहितीपटांचाही तपशील त्यांच्या वेबसाइटवर सापडू शकेल; त्यातील काही तिथे पाहाताही येतील. या शिवाय पिल्जर इंग्लंडमधल्या 'न्यू स्टेट्समन'साठी सदरही लिहितात.
आपण 'रेघे'वर जी नोंद करतोय ती त्यांनी 'झेड मॅगझिन'ला दिलेल्या मुलाखतीतल्या फक्त तीन प्रश्नोत्तरांची. गेल्या १६ फेब्रुवारीला ती तिथे प्रसिद्ध झाली होती. आता बरोब्बर महिन्याभराने त्यासंबंधी 'रेघे'वर नोंद. वरच्या थोडक्यातल्या ओळखीतूनही वाचकांच्या लक्षात आलं असेल की, मुख्य प्रवाहातल्या माध्यमांमधून सांगता न येणाऱ्या गोष्टी पिल्जर सांगू पाहात आहेत.
एखादं मराठी वर्तमानपत्र फुटपाथवर बसून गजरा विकणाऱ्या व्यक्तीपासून ते राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीपर्यंत विविध पातळ्यांवर वाचलं जाईल. इंग्रजी वर्तमानपत्र असेल तर विद्यापीठात शिकणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्यापासून ते देशाच्या पंतप्रधानापर्यंत विविध पातळ्यांवर ते वाचलं जाईल. टीव्ही चॅनलांच्या बाबतीत बोलायचं तर त्यांचाही प्रेक्षक असाच विविध पातळ्यांवर लाखोंच्या संख्येने पसरलेला असेल आणि त्यातून जी माहिती प्रसिद्ध होत राहील, तो माहितीचा मुख्य प्रवाह. कारण अधिकाधिक लोकांना तो सहजी उपलब्ध आहे, तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोचतो. या मुद्द्याभोवती मुख्य प्रवाहाचं महत्त्व एकदा आपण निश्चित केलं की मग त्यातल्या त्रुटी काढणं हेही एक महत्त्वाचं काम बनतं. आणि आता माध्यमांची जी रचना आहे त्या रचनेत तर (मुख्य प्रवाहात असलेल्यांना आणि नसलेल्यांनाही) ही जागरूकता अतिशयच आवश्यक आहे हे समजून घेऊन आणि त्यासाठी विविध मतं किमान ऐकून घेण्याची ताकद कमावून आपण पिल्जर यांचं म्हणणं काय आहे ते वाचायचा प्रयत्न करूया.
***
प्रश्न : तुमची पत्रकारिता गेल्या काही वर्षांमधे कशा प्रकारे बदलल्याचं तुम्हाला जाणवतं? विशेषकरून इंटरनेटची वाढ किंवा अलीकडे गुगल, फेसबुक, ट्विटर यांच्या येण्यानं काही फरक पडला असेल तर तो कसा आहे? तुमच्या स्वतःच्या कामासंदर्भात निश्चित केलेली मूलभूत लक्ष्यं आणि पद्धती यांच्यावर कोणता परिणाम झाला किंवा त्यांच्या परिणामकारकतेवर कोणता परिणाम झाला? 'सोशल नेटवर्किंग'चा उदय आणि त्याचा पत्रकारितेवर आणि माहितीच्या प्रवाहावर पडलेला प्रभाव याकडे तुम्ही कसं पाहता?
पिल्जर : रोज सकाळी मी काही ठराविक वर्तमानपत्रं घ्यायचो. आता मी इंटरनेटवर जातो. हा बदल झालाय. गुगल अर्थातच भन्नाट आहे, पण त्यामधे आणि एखाद्या विषयाचा खोलवर अभ्यास करण्यासाठी गुंतवावा लागणारा वेळ, त्यासाठी आवश्यक असलेली धीर धरण्याची वृत्ती आणि कठोर परिश्रम यांच्यामधे फरक आहे. ट्विटर आणि फेसबुक हे तर मुख्यत्त्वे 'स्वतः'बद्दलच्याच गोष्टी आहेत; त्यातून लोकांना स्वतःशीच बोलता येतं आणि बहुतेकदा स्वतः मूर्ख बनता येतं. खरं तर ते आपल्याला एकमेकांपासून अजून विभक्तही करू शकतात : आणि स्मार्ट फोन, तुटक माहिती, फुटकळ मतबाजी यांच्या बुडबुड्यांच्या जगात आपल्याला गुरफटून टाकू शकतात. (त्यापेक्षा) विचार करणं ही जास्त आनंददायी गोष्ट आहे, असं मला वाटतं.
प्रश्न : मुख्य प्रवाहातील माध्यमांमधे सतत वावर असूनही त्यांच्यावर कठोर टीका करणाऱ्यांपैकी तुम्ही एक आहात. शिवाय पर्यायी माध्यमांचं समर्थनही तुम्ही जोमाने करत आलायंत. पर्यायी माध्यमांशी संबंधित व्यक्तींचं काय चुकलं असं तुम्हाला वाटतं? या माध्यमांना अधिक लोकांपर्यंत पोचणं न जमण्यामागे, संवादाची अधिक मोठी माध्यमं उभी करता न येण्यामागे काय कारणं असतील? त्यांच्या रचनेत, धोरणांमधे, मजकुरामधे काही घोळ असेल का? त्यात काही सुधारणा हवेय का?
पिल्जर : तुमच्या म्हणण्याशी मी सहमत नाही. 'पर्यायी' माध्यमांनी त्यांचा वाचक/प्रेक्षक निर्माण केलेला आहे, त्यांच्यापर्यंत ती पोचतातही आणि त्याचे काही सकारात्मक परिणामही दिसून आलेत. लॅटिन अमेरिकेत कित्येक वस्त्यांमधल्या लोकांना कम्युनिटी रेडियोचं व्यासपीठ मिळालंय. व्हेनेझुएलामधे 'स्वतंत्र' माध्यमांवर (म्हणजे एकाधिकारशाही असलेल्या माध्यमांवर) ह्युगो चावेझ दबाव आणतायंत असा प्रचार करणारे लोक तिथल्या कम्युनिटी रेडियोच्या अभूतपूर्व वाढीकडे पाहात नाहीत. इक्वेडोर, बोलिव्हिया, अर्जेन्टिनामधेही हेच चित्र आहे. अमेरिकेत 'पॅसिफिका रेडियो' हे याचं खूपच प्रेरणादायी उदाहरण ठरेल. डेनिस बर्नस्टनचे कार्यक्रमही यात धरता येतील. इंटरनेटवर 'झेड-नेट' अनेक लोकांपर्यंत पोचतं. शिवाय टॉम फीलीचं 'इन्फर्मेशन क्लिअरिंग हाउस', 'ट्रूथ-आउट', आणि 'द रिअल न्यूज' अशी अनेक उदाहरणं आहेत.
प्रश्न : भविष्यात अधिकाधिक लोकांपर्यंत टीकात्मक व दूरदर्शी मजकूर पोचेल याच्या कोणत्या शक्यता तुम्हाला दिसतात? असं होण्यासाठी पर्यायी माध्यमांमधे कोणत्या सुधारणा करता येतील किंवा मुख्य प्रवाहातल्या माध्यमांना त्यांच्या हेतू आणि तर्कसंगतीविरोधात असूनही चांगलं काम करण्यासाठी भाग पाडता यावं यासाठी काय करावं लागेल?
पिल्जर : तथाकथित मुख्य प्रवाहातील माध्यमं आपल्या तर्कसंगतीविरोधात काहीही करणार नाहीत. प्रस्थापित व्यवस्थेचीच एक पुरवणी म्हणून ती असतात; एडमण्ड बर्कनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे ते 'चौथा स्तंभ' वगैरे नाहीत. पण ते अखंडही नाहीत. मी माझी पूर्ण कारकिर्द मुख्य प्रवाहात घालवली. माझी जागा आणि माझा कोपरा जपण्यासाठी मला खूप ऊर्जा खर्च करावी लागली. बहुतेकदा ती शब्दशः लढाई असते. पण मी त्यातून मार्ग काढायला शिकलो, कधीकधी कामाचं ठिकाण बदलूनही ते करावं लागलं. तरुण आणि मूल्य मानणाऱ्या पत्रकारांनी मार्ग काढायला शिकणं आवश्यक आहे.
आत्ता आपल्याला तातडीने काय पाहिजे असेल तर ते म्हणजे 'पाचवा स्तंभ'. कॉर्पोरेट माध्यमांच्या एकाधिकारशाहीला आव्हान देऊ शकणारा, लोकांच्या म्हणण्याला व्यासपीठ देऊ शकणारा, टीव्ही - वर्तमानपत्रं - माध्यम शिक्षण देणाऱ्या संस्था यांच्या उद्ध्वस्ततेवर मात करून उभा राहणारा, पत्रकार आणि पत्रकारिता शिकवणाऱ्या शिक्षकांना आपली बोटचेपी भूमिका सोडण्याचं आवाहन करणारा आणि वेगळी दृष्टी देणारा पाचवा स्तंभ. व्यावहारिक पातळीवरून बोलायचं तर नवीन व स्वतंत्र पत्रकारितेच्या प्रयत्नांना लोकांच्या माध्यमातून निधी पुरवण्याची व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. स्कॅन्डेनेव्हियामधे हे यशस्वी झालेलं दिसतंय.
***
- पिल्जर यांच्या वेबसाइटवर उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूच्या पट्टीवर हे सापडतं.
संदेशामधील लपलेले हेतू आणि त्याला वेढून असलेली कल्पितं यांची जाणीव न ठेवता केवळ संदेशवाहक म्हणून पत्रकारांनी स्वतःकडे पाहणं पुरेसं नाही : जॉन पिल्जर
***
Thank you very much for this post.
ReplyDelete