मनोहर ओक : निधन १० मार्च किंवा ११ मार्च १९९३ : त्यानिमित्त 'रेघे'वर नोंद -
दुर्गा भागवत, 'दुपानी'मधे, पान क्रमांक शंभर :मन्या ओक वारल्याची बातमी सतीश काळसेकरने दिली. तुकाराम-बीज टाळून मन्या दहा मार्चला, खाणे-औषध वगैरे सोडून स्वेच्छेनेच हे जग सोडून गेला. एक दिवस मध्ये गेला आणि बारा तारखेला मुंबईत बॉम्बस्फोटांची मालिका लागली.आजचा लोकसत्ता, दैनंदिनी प्रकारच्या सदरामधली नोंद : ११ मार्च १९९३ मनोहर ओक यांचे निधन.
***
'झौझंझः' या अनियतकालिकात अंदाजे १९७०च्या सुमारास प्रसिद्ध झालेला मजकूर ('नवाक्षर दर्शन'च्या मदतीने) :
मनोहर ओक याचा मजकूर
...हे स्थानांची अफरातफर करून राहिलेल्या लेखकांनो! हे लांड्या प्रकाशकांनो! तुमची वेळ भरत चालली; ठेपून चुकली! एक तर तुमचे लांडे उद्योग ताबडतोब बंद करा, नाहीतर - स्वतःच्या पोटव्यासपीठावरून चालवलेली तुमची बडबड, फडफड, चित्-तूप करा- नाहीतर ठोकबंद व्यापार सोडून खुल्ले- रोख आरपार व्हा. नाहीतर जे केलंत त्याबद्दलचं काय? जे न केलंत त्याबद्दलच घ्या! लेखकांचे (अर्थात आधुनिक) लाईफ इन्श्युरन्स कॉर्पोरेशन बनणे सोडून द्या. पार्ट टाईम जॉब तुम्हाला लांच्छनास्पद आहे. न पेक्षा हेरा! हेरा टिपून एकेक! शिकारी कुत्रे व्हा! सांस्कृतिक मंडळांच्या दलालांनो, पगाराच्या नेच्यावर पुढे डकलणारं तुमचं तट्टू चणे खाऊ द्या. मी म्हणतो चणें! चणचंणित चंद हे बेलपत्रकारांनो, उद्धरा उद्धरा तुमचे सहज अवघ्याची तळी उचला. रडीं, गाणी, गाऱ्हाणीं. चूक, तक्रार आणि विराणीं. हे टुकारांनो! ह्यातून वखारी पिकतात, बुखारी फणफणून द्यात. साजरे होऊ द्यात सण-ताप तुमचे. लेखणीमागे उभे रहा न ढेकणीं. नाहीतर शहाणे व्हा. सिक्युरिटीच्या कडेकोट वेढ्यातील मरण आरास-विचकूं नका कवळी तुमचीं. फोडा तुरुंग नाहीतर हे पाणी तुमच्या नाकातोंडात घुसेल. पायातून गळ्यापर्यंत गळवंड घुसळून येतील भोंवरे. फटाफट कानांचे पडदे फाटतील तुमच्या. टचाटच डोळ्यांची द्राक्षं उडतील नाहीतरी- पाहिजे तर रुद्राक्ष धरा.
***
'अंतर्वेधी' : सुरुवातीचा (पान सात व आठवरचा) मजकूर :
कादंबरी. प्रास प्रकाशन. मुखपृष्ठ : बाळ ठाकूर |
समजा कीं तुम्ही एका हजार पाकळ्या असलेल्या कमळाच्या मध्यभागीं बसलांत. एक एक एकेक पाकळ्यांनी टोकं वळत मोडत-मुडपत मिटत्ये संध्याकाळ. सगळा सांवल्यासांवल्यांचा जमणारा सघन काळोखसमुद्र. वेढणारा अंवतालभंवताल. आणि एकाएकी नादानुसंधान बांधलं जातं, जें असतं तुमच्या जागरतेचं- आवरून बसणारं अवधान वेध घेतं. छिद्रांत जाऊन बुटून मुरूं पाहणारं पाणी. तो सूक्ष्म आवाज. अवघ्या पाण्याचे लोट थोपवून निमूट निमुळतं होऊन अणी एवढ्या छिद्रांत ओपनिंग शोधत सर्वस्व व्यापून टाकणारा गुंजारवभारव.
आणि टक्कन डोळे उघडून तुम्ही बाहेर येतां. एकटक झालेली नजर एकदम पुसली जाते. एकदमच भलत्या प्रदेशांतून भलत्या प्रदेशांत डिपोर्ट केल्यासारखे तुम्ही येऊन पडतां. असं कांहीं दिवस होतं.
पुढं असेच कांही दिवस गेले कीं गुंजारव हळूंहळूं मोठा होणारा. ओंठ मिटून मोठा होणारा फुगा. एक वरल्यावर वावरणारा ढग. निर्लिप्त. कोंडींत प्रेशराइज करणारा आणि - अणी - भुंगा - गाज वाढत, गाजत तुमचं कडबोळं वळून सुरगांठ न सोडवतांच तडक आरपार. तुटकतुटक रेषांचे अनुकार, अनुनाद, दाखव वाजवणारा.
परत येयची खूण तुम्हांला माहीत नसते. तुमच्या गतीची तुम्हाला कल्पनाहि नसते. येतांना भलभलते पदार्थ, वस्तू दिसतात. हांती लागतात. कधींच न पाहिलेल्या वस्तूंचा अजबखाना. एक और तळघर मोकळं झालेलं. लाख सिद्धी-इलमांची भांडारं. जडजड कुलपांच्या अवजड चाव्या. सगळे शिकराव तिथं सुप्त झालेले. एक पसरलेलं वाळवंट. कुठूनहि कुणीकडे रस्ते. सगळ्या निरुद्देश दिशा. चमचमलेले पुंजके. पोरस सफेद, काळे भुजंग, लाल निखर, नीळ-नवले, पिवळेप्रखर. भुळभुळलेले जांभुळे. कुळकुळलेली करड, भरड भरड पडलेली ड्राय पिग्मेंट पावडर. आणि भेलकांडत झोंके खात जागीं गच्च होणारं विमान. अडून उघडतात डोळे. मिट्ट काळोखांत चमचमत्या चांदण्या पसरलेल्या. असे दिवस कांहीं प्रकारचे.
एखादवेळेस असेच तुम्ही पडलां असतां समजा पाकळ्या मिटून बंदी झालेल्या कमळांत आणि रानांतून एका हत्तीनं येऊन देठ पिरगळून कमळ सोंडेंत धरून तें फेंकून दिलं तर - तुम्ही काय कराल?
***प्रकाशक : लोकवाङ्मय गृह. दुसरी आवृत्ती : १९९९ संपादन : चंद्रकान्त पाटील / तुळसी परब मुखपृष्ठावरील चित्र : जॉर्जीओ मोरांडी, इटली |
माणसानं बोल्लेलं आठवावं पण...
माणसानं बोल्लेलं आठवावं पण
सगळंच आठवलं तर
बोलताच येणार नाही
बोलणं आणि वागणं यांचा
अर्थाअर्थी संबंध नसतो
वाटणं आणि बोलणं आणि वागणं यांचाही
निष्कर्ष काढण्यात आपण
मागे राहतो
आणि आयुष्य फोफाटत पुढे
निष्कर्षही आपमतलबी असतात
मनसुब्याच्या कोषात रेशीम लपेटून
इच्छा आपली असोन द्यावी
अपेक्षेत सक्तीचे गुलाम खिंकाळतात
नजरेच्या पुलावर स्मितं झेलावी
एक बहर दरम्यान विखरून जावी
क्षणाग्रावरून मारावे सूर
आता, नंतर, विसरावे तीर
जे घडलं त्यास तिथेच
मोहर लावावी
जे न घडलं ते
भापवू नाई
हे सर्व म्हणताना
एकटक असावं
मग काय म्हणता याची
पर्वा नाही.
पान ३१
***
मनोहर ओक चित्र : बाळ ठाकूर ('...ऐंशी कविता'च्या मलपृष्ठावरून) |
मनोहर ओक : पुस्तकं -
आयत्या कविता - बाजारात अनुपलब्ध
अंतर्वेधी (कादंबरी) - बाजारात अनुपलब्ध
चरसी (कादंबरी) - बाजारात अनुपलब्ध
मनोहर ओकच्या ऐंशी कविता - बाजारात उपलब्ध
***
सगळंच आठवलं तर
ReplyDeleteबोलताच येणार नाही....yes that happens a lot...and I am not complaining !...निष्कर्षही आपमतलबी असतात...and hence just see...what a beautiful cover by Bal Thakur...He made me meet Mr. Oak...share more of his poems as we go along and you get time and the mood...once again I had not read a line of Mr. Oak...what a loser I am turning out to be
माणसानं बोल्लेलं आठवावं पण...
ReplyDeleteमाणसानं बोल्लेलं आठवावं पण
सगळंच आठवलं तर
बोलताच येणार नाही
बोलणं आणि वागणं यांचा
अर्थाअर्थी संबंध नसतो
वाटणं आणि बोलणं आणि वागणं यांचाही
निष्कर्ष काढण्यात आपण
मागे राहतो
आणि आयुष्य फोफाटत पुढे
निष्कर्षही आपमतलबी असतात
मनसुब्याच्या कोषात रेशीम लपेटून
इच्छा आपली असोन द्यावी
अपेक्षेत सक्तीचे गुलाम खिंकाळतात
नजरेच्या पुलावर स्मितं झेलावी
एक बहर दरम्यान विखरून जावी
क्षणाग्रावरून मारावे सूर
आता, नंतर, विसरावे तीर
जे घडलं त्यास तिथेच
मोहर लावावी
जे न घडलं ते
भापवू नाई
हे सर्व म्हणताना
एकटक असावं
मग काय म्हणता याची
पर्वा नाही.
काय कविता आहे. अफलातून. मी पहिल्या काही ओळी ऐकल्या होत्या.एकाकडून. संपूर्ण कविता इथंच वाचली. शब्द नि शब्द पुनःपुन्हा वाचावासा.
नमस्कार,
ReplyDelete'मनोहर ओकच्या ऐंशी कविता' या संग्रहाची तिसरी आवृत्ती नुकतीच लोकवाङ्मय गृहातर्फे प्रसिद्ध झाली आहे.