Friday, 30 November 2012

बाळ ठाकरे, भांडवलदार आणि श्रमिक गरीब

- विद्याधर दाते

'टाइम्स ऑफ इंडिया' आतासारखा व्हायच्या आधी तिथे तीन दशकांहून अधिक काळ पत्रकारिता केलेले विद्याधर दाते अजूनही विविध प्रकाशनांमधून लिहिते आहेत. त्यांचा हा लेख countercurrents.org या वेबसाईटवर प्रसिद्ध झाला होता. त्यांच्या परवानगीने आणि त्यांच्या नजरेखालून हा लेख मराठीत अनुवादित करून 'रेघे'वर नोंदवून ठेवतो आहे. मुंबई आणि तिथल्या घडामोडी सुमारे अर्ध शतक दात्यांनी पत्रकाराच्या नजरेतून पाहिल्या, त्याचा दाखला देणारा हा लेख-
बाळ ठाकरे (फोटो - इथून)
बाळ ठाकरे हे साहजिकपणेच असं व्यक्तिमत्त्व होतं जे भांडवलदारांचं लाडकं होतं आणि त्यांच्यासोबत भांडवलदारांना सहज सोयरिक वाटायची. त्यामुळेच बहुतेक माध्यमांमधे त्यांचं व्यक्तिमत्त्व 'लार्जर दॅन लाईफ' रंगवलं गेलं आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याबद्दल स्तुतीगान झालं.

शेक्सपियरच्या 'ज्युलियस सीझर' नाटकात मार्क अँटनीचा प्रसिद्ध संवाद आहे, 'माणसाची दुष्कृत्यं त्याच्यानंतरही जिवंत राहातात. चांगुलपणा मात्र हाडांसोबत गाडला जातो'. बाळ ठाकऱ्यांचे असे काही प्रश्न नाहीत आणि त्यांनी दृष्कृत्यं केल्येत असं सुचवायचाही इथे हेतू नाही. त्यांच्या समर्थनार्थ लिहिणाऱ्यांची कमतरता नाही. ठाकऱ्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे हे शेक्सपियरचे निस्सीम चाहते होते. त्यांनी आपल्या कमी उत्पन्नातला इतका भाग पुस्तकांवर खर्च केला की त्याने त्यांच्या आईला काळजी वाटू लागली आणि मग ते ग्रंथालयात बसून संशोधनात रमू लागले. बाळ ठाकरे आपल्या वडिलांपेक्षा अनेक प्रकारे वेगळे होते. प्रबोधनकार हे विवेकनिष्ठ, कार्यकर्ता वृत्तीचे आणि महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे समर्थक होते, त्यांनी अनेक पुस्तकंही लिहिली. पण त्यांची आठवण सध्या कोणाला आहे? बाळ ठाकऱ्यांना गंभीर पुस्तकांचा फारसा उपयोग नव्हता.

ठाकऱ्यांना त्यांच्या सांप्रदायिकतेबद्दल, द्वेष पेरणाऱ्या वक्तव्यांबद्दल, अतिरेकी कट्टरतेबद्दल नेहमीच पुरोगाम्यांच्या टिकेला सामोरं जावं लागलं. पण भांडवलदारांशी असलेल्या त्यांच्या मैत्रीबद्दल मात्र त्यांच्या कार्यकाळात आणि नंतरही फारसं बोललं जाताना दिसत नाही. प्रत्येक ठिकाणी व्यवस्थेला लोकांची अशी फौज लागतेच जी दुसऱ्यांशी सामना करू शकेल, विशेषकरून विरोधी मतांशी. डाव्या विचारांचा सामना करायला भांडवलदारांना शिवसेना हा चांगलाच साथी मिळाला.

ठाकऱ्यांच्या मृत्यूनंतर 'फेसबुक'वरच्या पोस्टवरून दोन मुलींना अटक झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर राग व्यक्त केला गेला आणि तो योग्यच होता. पण आपल्याशी सहमत नसलेल्या व्यक्तीचा जीव घेणे हे तर त्यापेक्षाही घृणास्पद कृत्य आहे. शिवसेनेने तेच केलं आणि त्याच मार्गाने त्यांनी राजकारणात आपलं पाऊल टाकलं. शिवसेनेचं दहशतीचं राजकारण १९७० साली कृष्णा देसाई या कम्युनिस्ट आमदाराच्या खुनापासून सुरू झालं. शिवसेनेचं अस्तित्त्व सिद्ध करणारी ही निर्णायक घटना होती. त्या काळी तुलनेनं सक्षम असलेल्या डाव्या चळवळीवर हा ठरवून केलेला हल्ला होता. कम्युनिस्टांव्यतिरिक्तही काही ठिकाणांहून या खुनाविरोधात आवाज उठले. पण ही धोक्याची घंटा आहे याची जाणीव मात्र अजूनही अनेकांना नाही. शिवसेनेबद्दल लिहिणाऱ्या अनेक राजकीय विश्लेषकांनी इतर अनेक वरवरच्या गोष्टींबद्दल लिहिलं, पण बाळ ठाकऱ्यांवर मात्र स्तुतीच उधळली. त्यांचा विनोद, मैत्रीपूर्ण स्वभाव याबद्दल त्यांनी लिहिलं, पण शिवसेनेच्या वर्गीय हितसंबंधांकडे मात्र बहुतेकांनी दुर्लक्ष केलं.

फॅसिस्ट आणि गुंड प्रवृत्तींना विरोध करायचा असो किंवा श्रीमंत आणि साम्राज्यवादी प्रवृत्तींना विरोध करायचा असो याबाबतीत बुद्धिमंत मंडळी घाबरलेली आणि निष्क्रिय असल्याचं बहुतेकदा दिसतं. जर्मनीवर नाझी सावट घोंघावत होतं तेव्हा या निष्क्रियतेबद्दल चिंता व्यक्त करताना जर्मन कार्यकर्ता मार्टिन निएमोलर म्हणाला होता की, दुसऱ्यांवर हल्ला झाल्यानंतर तुम्ही काही करणार नसाल, तर तुमच्यावर हल्ला होईल तेव्हा तुम्हाला वाचवायलाही कोणी नसेल. बाळ ठाकऱ्यांना वाहण्यात आलेल्या भावनातिरेकी श्रद्धांजल्यांमधे एका गोष्टीला मात्र अगदी सार्वत्रिक बगल देण्यात आलेय, ती म्हणजे कष्टकरी लोकांच्या चळवळींवर शिवसेनेने केलेले आघात. त्यावेळी तरुण पत्रकार म्हणून मी काम करत होतो. कृष्णा देसाईंचा एक मारेकरी काय बोलायचा ते 'फ्री प्रेस जर्नल'चे भालचंद्र मराठे सांगत, ते मला अजून आठवतंय. त्याने चाकू घुसवला आणि त्याची मूठ वळवली, कारण त्यानेच आतल्या भागाला पुरेशी इजा होते. ओंगळवाणा खून. बाळ ठाकऱ्यांचं स्मारक होणं आवश्यक असेल, तर कृष्णा देसाईंचं स्मारक होणं त्यापेक्षा जास्त आवश्यक आहे.

श्रीमंतांचे हितसंबंध जपून, गरीबांना हटवून जगभरातील शहरांची पुनर्रचना करण्यात येतेय, यासंदर्भात बाळ ठाकऱ्यांकडे पाहावं लागेल. शहरी जीवन, अर्थकारण आणि राजकारणाचे एक महत्त्वाचे विचारवंत डेव्हीड हार्वे हे या प्रश्नाबाबत मोलाचं बोललेत. शहरावर सामान्य माणसांचा अधिकार असायलाच हवा, शहरातील सेवांचा लाभ घेऊन विकासाला हातभार लावण्याचा अधिकार त्यांना आहे, असं ते म्हणतात. हा एक मूलभूत अधिकार म्हणून पाहण्यात यायला हवा. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'रिबेल सिटीज्' या पुस्तकात ते दाखवून देतात की शहरही निदर्शनांची आणि बदलाची बलस्थानं ठरू शकतात, अमेरिकेत ऑक्युपाय चळवळीच्या बाबतीत असंच झालं.

गरीब मराठी माणूस हा त्यांचा मुख्य मतदार असला तरी ठाकऱ्यांनी गरीबांची बाजू फारशी कधीच लढवली नाही. बोलण्यातून जे यायचं त्याला कृतीची जोड क्वचितच मिळाली. पण मग त्यांच्या अंत्ययात्रेला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाचं विश्लेषण कसं करावं? हा प्रश्न फेसबुकवर जॉन गेम या ब्रिटिश व्यक्तीने अगदी योग्य पद्धतीनं विचारला. ते स्वतः मुंबईत सामाजिक काम केलेले गृहस्थ आहेत. पक्के डाव्या विचारसरणीचे गेम म्हणतात की, शिवसेनेने नागरिकांसाठी काही कामंही केलं हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे.

(अंत्ययात्रेला झालेल्या अफाट गर्दीचंच बोलायचं झालं तर आपण याची आठवण ठेवू शकतो की मार्क्सच्या अंत्यविधीवेळी साधारण अकराच लोक उपस्थित होते).

होय, बाळ ठाकऱ्यांनी सामान्य लोकांच्या समस्या हातात घेतल्या, लोकांचं वैफल्य आणि आर्थिक निकड स्पष्ट बाहेर काढली, पण हे सर्व त्यांनी नकारात्मक पद्धतीने केलं. त्यासाठी त्यांनी पूर्वग्रह पुन्हा पेरले, हिंसाचाराला खतपाणी घातलं. यात बहुतेकदा गरीब लोकच मार खाणाऱ्या बाजूला असत. परप्रांतीयांच्या मुद्द्यावरही हेच झालं. श्रीमंतांनी घाबरावं असं ठाकऱ्यांकडे काही नव्हतं. पिळवणुकीवर जोर देणारी आणि त्यातून लोकांचं लक्ष वास्तवातल्या समस्यांवरून उडवून लावणाऱ्या संघटना उभारणारी व्यवस्था आपण तपासली पाहिजे, त्याशिवाय एका संकुचित दृष्टीकोनातून ठाकऱ्यांवर टीका करणं फारसं बरोबर होणार नाही.

मुंबईतून गरीबांचं होणारं उच्चाटन थांबवण्याची अपेक्षा ठाकऱ्यांकडून ठेवली गेली होती. वाघ, सम्राट, मुंबईचा राजा आणि अशा अनेक उपाध्या त्यांना दिल्या गेल्या. पण गरीबांना मदत करायची वेळ आली तेव्हा हा राजा एवढा दुर्बल का झाला?

मुंबईचं क्रूर उच्चभ्रूकरण झालं आणि श्रमिक शहराची तिची प्रतिमा बदलून गेली ती मुख्यतः ठाकऱ्यांच्या राजकीय कारकिर्दीतच. यातली शिवसेनेची भूमिका धडधडीतपणे दाखवणारं उदाहरण दादरमधल्या शिवसेना भवनासमोरच आहे. तुलनेने पर्यावरणपूरक असलेल्या या परिसरात उभी राहात असलेली काचेच्या तावदानांची पर्यावरणमारक इमारत कोणाच्या नजरेतून सुटू शकत नाही. याच इमारतीच्या अर्धवट बांधकामाच्या इथे उभं राहून शेकडो लोकांनी अंत्ययात्रेला प्रेक्षक म्हणून उपस्थिती लावल्याचं माध्यमांमधल्या फोटोंमधे दिसत होतं.

कोहिनूर गिरणी (फोटो सौजन्य : फ्रंटलाईन / शशी अशिवाल)
नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशनच्या कोहिनूर गिरणीची ही जमीन होती. सार्वजनिक जागांची कमतरता
असलेल्या या शहरात मराठी माणसाच्या बाजूने बोलणाऱ्या कोणीही ही जमीन सार्वजनिक वापरासाठी मिळावी अशीच मागणी केली असती. पण ही जमीन कोट्यवधी रुपयांना विकत घेण्यात आली. कोणी विकत घेतली तर राज ठाकरे आणि शिवसेना नेते मनोहर जोशींचा मुलगा उन्मेश जोशी यांनी. बांधकाम व्यवसायात दोघांचे जवळचे संबंध आहेत. 'इकॉनॉमिक टाइम्स'मधे १५ नोव्हेंबर २००९ रोजी आलेल्या बातमीनुसार या मालमत्तेमधला आपला वाटा विकून ठाकऱ्यांनी प्रचंड नफा कमवला.

माजी कसोटी क्रिकेटपटू माधव आपटे यांचे वडील लक्ष्मणराव आपटे यांच्या मालकीची ही गिरणी होती. आपटे हे मराठी माणूसच होते. आपट्यांची सांपत्तिक बाजू मजबूत होती. त्यांचा पेडर रोडला बंगलाही होता, तिथे आता वूडलँड्स अपार्टमेंटची गगनचुंबी इमारत उभी आहे.

कोहिनूर गिरणीची जागा रिकामी राहिली असती, तर आता शिवसेना ठाकऱ्यांच्या स्मारकासाठी जोरदार मागणी करत असताना सरकारला जागेची शोधाशोध करत राहावी लागली नसती. पण सार्वजनिक स्त्रोतांना गिळंकृत करणं हे तर अगदीच सोपं आहे. त्यामुळे शहरातील तुरळक मोठ्या रिकाम्या ठिकाणांपैकी एक असलेल्या शिवाजी पार्कवर स्मारक व्हावं अशी मागणी होतेय. हे स्मारक म्हणजे सिमेंट-काँक्रिटची कायतरी आक्राळविक्राळ वास्तू म्हणून तयार होण्याऐवजी पर्यावरणपूरक असं कायतरी होईल अशी आता फक्त आशाच ठेवता येईल.

स्मारकं बांधण्याच्या बाबतीत आपल्याकडे आकारउकाराचं अज्ञान आहेच. काही दिवसांपूर्वीच मी नागपूरला गेलो होतो. मृत्यूच्या आणि अंत्यविधीच्या दिवशीही दैनंदिन कामकाज सुरळीत होतं. कुठेही 'बंद' दिसत नव्हता. शहराच्या सीमेवर 'पसायदान' हे एक सांस्कृतिक केंद्र आहे, तिथे संत ज्ञानेश्वरांचा अवास्तव मोठा पुतळा आहे.

महाराष्ट्राची व्यापक उदारमतवादी परंपरा ठाकऱ्यांनी उलट फिरवली. महात्मा गांधींचे गुरू होते गोपाळ कृष्ण गोखले आणि विशेष आवडते शिष्य होते विनोबा भावे. ठाकऱ्यांनी स्वतःला सेनापतीचा किताब दिला, सैनिकी नेतृत्त्वाचा, आणि निर्दयपणे वागले. महाराष्ट्राचे दुसरे सेनापती, सेनापती पांडुरंग महादेव बापट यांच्यापेक्षा हे किती वेगळं होतं! सेनापती बापटांनी इंग्लंडमधे महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान बॉम्ब बनवायचं प्रशिक्षण घेतलं आणि भारतात गांधीवादी मार्ग स्वीकारला. जगातील धरणविरोधी पहिल्या आंदोलनाचे नेतृत्त्व बापटांनी केलं. मावळ प्रांतातील मुळशी सत्याग्रहाचे ते प्रमुख आधार होते. मावळ प्रांतातील या लोकांचे पूर्वजच शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मावळे होते. नुकतंच पश्चिम बंगालमधल्या सिंगूरमधे घडलं, तसं मुळशीतली सुपीक जमीन सरकारने टाटांच्या ताब्यात दिली. ही घटना १९२१ची. गरीबांच्या जमिनीची ही लूटमार आता पुन्हा सुरू झालेय. मावळ्यांची ही जमीन हडपून तिथे नागरी वसाहती वसवण्याचे प्रयत्न सुरू झालेत. नेहमी शिवाजीच्या नावाने घोषणा देणाऱ्या शिवसेनेने याविरोधात एक अक्षरही काढलेलं नाही, कारण राजकीयदृष्ट्या सोईची आणि पिळवणुकीला सोपी अशी ही जागा आहे. श्रमिक वर्गाचा पूर्ण इतिहास आणि वारसा उखडून टाकण्याच्या प्रयत्नांना थोपवण्यासाठीही शिवसेना काहीही करत नाही.

शिवसेना आणि भांडवलदारांमधील जवळकीचे संबंधी बहुतांशी राजकीय विश्लेषणात आणि विद्यापीठीय अभ्यासात दुर्लक्षिले जातात. पण इथेच मला आश्चर्याचा धक्का बसणारा एक लेख वाचनात आला. बजाज समुहाचे अध्यक्ष राहुल बजाज यांच्या लेखातल्या शब्दांमागचा आशय आपण सहजी ओळखू शकतो. 'इकॉनॉमिक टाइम्स'मधे १९ नोव्हेंबरला पहिल्या पानावर छापून आलेल्या लेखात बजाज म्हणतात, 'माझे स्वर्गीय चुलते रामकृष्ण बजाज हे बाळासाहेबांचे खूप चांगले मित्र होते. संसदीय निवडणुका सुरू होत्या तेव्हा बाळासाहेब आणि माझे चुलते दोघेही कम्युनिस्टविरोधी होते. काँग्रेस आणि शिवसेनेच्या तत्त्वांमधे काहीही साम्य नसतानाही त्यांचे संबंध चांगले होते.' निवडणुकांमधे काँग्रेसचा पाडाव झाल्यानंतर देशभर डाव्या चळवळींविरोधात संघटना फोफावत होत्या तो हा काळ. काँग्रेसचं खालावणं आणि डाव्यांची आघाडी याने भांडवलदारांमधे चिंतेचं वातावरण होतं. यातील अमेरिकेच्या सहभागाबद्दल त्या काळचा कोणताही प्रामाणिक पोलीस अधिकारी किंवा राजकीय निरीक्षक यावर प्रकाश टाकू शकेल.

ठाकऱ्यांकडे असलेल्या ताकदीबद्दल अनेक लोकांना अचंबा वाटायचा. 'टाइम्स ऑफ इंडिया'तले माझे वरीष्ठ सहकारी आणि आघाडीचे व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्यामध्येही ही भावना मी पाहिली. त्या दोघांनीही राजकीय व्यंगचित्रकार म्हणून १९४०च्या दशकात 'फ्री प्रेस जर्नल'मधून कारकिर्द सुरू केली. 'ठाकरे बघ किती पुढे गेले, नि मी इथे आहे', असं लक्ष्मण एकदा उदास स्वरात मला म्हणाले होते. लक्ष्मण यांच्याबरोबर मी सहमत नव्हतो अशी ही एकच वेळ.

सध्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल तुलनेने बऱ्यापैकी जागरूकता आहे. पण पूर्वी असं फारसं नव्हतं. पूर्वग्रहदूषित दृष्टीकोनाचं एक लक्ष्य ठरले होते ते इतिहासाचे मार्क्सवादी प्राध्यापक पंढरीनाथ विष्णू रानडे. ते कलासक्त होते, कवी होते आणि त्यांनी अजंठ्यातील कलेसंबंधी पुस्तकही लिहिलं होतं. हे १९७४ साल. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं (१६७४) त्रिशताब्दी वर्ष. महाराष्ट्रात ते मोठ्या उत्साहात साजरं झालं. प्राध्यापक रानड्यांनी 'रणांगण' साप्ताहिकात याविरोधात सूर लावला. शिवाजी महाराजांविषयी त्यांच्या मनात आदराचीच भावना होती पण शिवकालीन सामंतशाही पाहता सध्याच्या लोकशाही व्यवस्थेत अशा प्रकारे भक्ती करू नये असं त्यांचं मत होतं. यामुळे वादळ उठलं. रानड्यांची मराठवाडा विद्यापीठातील नोकरी गेली. भारतीय इतिहास परीषदेतील काही आघाडीच्या इतिहास अभ्यासकांनी या कारवाईचा निषेध केल्यानंतर त्यांना पुन्हा नोकरीवर घेण्यात आलं. एके दिवशी एका ठिकाणी व्याख्यान देऊन ते परतत असताना दादर पुलावर त्यांना शिवसैनिकांनी घेराव घातला आणि धमकी दिली. मी मधे पडायचा प्रयत्न केला तेव्हा मला मारहाण झाली, माझा चष्मा होत्याचा नव्हता झाला. अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर झालेल्या या हल्ल्याचा निषेध करण्याऐवजी 'महाराष्ट्र टाइम्स' या आघाडीच्या दैनिकाने संपादकीयातून रानड्यांवरच टीका केली. ही दुर्दशा आहे. बहुतेक लोकांचं सार्वजनिक आकलन वास्तवाच्या पूर्ण उलट असतं. मी अनेक 'उच्चशिक्षित' लोकांना भेटलोय, ज्यांचा असा पूर्ण विश्वास आहे की, १९९२-९३च्या दंगलींमधे मुस्लीम हिंसाचारापासून हिंदूंचं रक्षण ठाकरेंनीच केलं!

(फोटो सौजन्य : फ्रंटलाईन / विवेक बेंद्रे)
ठाकऱ्यांना ज्यांनी ताकद पुरवली त्या लोकांना दोषी ठरवणं सोपं आहे. पण आपली व्यवस्था मुळातूनच अनाय्य आणि पक्षपाती असल्यामुळे त्यांनी तसं केलं असं मला वाटतं. 'उच्चशिक्षित' लोक जर फॅसिस्ट वृत्तीकडे एवढे आकर्षित होत असतील तर सामान्य जनांनी त्या वृत्तीला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांना दोषी ठरवण्यात काय हशील.

उद्योगपती आणि कलासंग्राहक हर्ष गोएंका यांनी ठाकऱ्यांच्या निधनानंतर 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेली प्रतिक्रिया पाहा. त्यांनी ठाकऱ्यांना क्रांतिकारी म्हटलं. मूळच्या संकल्पनेच्याच हे विरोधात आहे. काही म्हणायचंच असेल तर ठाकरे प्रति-क्रांतिकारी होते, असं म्हणता येईल.

लता मंगेशकरांनी ठाकऱ्यांना दिलेल्या कट्टर समर्थनाची मुळं त्यांच्या वडिलांपर्यंत जातात. मास्टर दिनानाथ हे हिंदू राष्ट्रवादाचे जनक स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे प्रशंसक होते. लताबाईंचे बंधू, संगीतकार हृदयनाथ यांनी विविध दूरचित्रवाणी कार्यक्रमांमधे सावरकरांचा महिमा गायला आहे, अनेकदा ते चौकटीबाहेर जाऊन त्याबद्दल बोलत.

राजकीय पक्षांकडून आलेल्या प्रतिक्रियांपैकी, तात्त्विकदृष्ट्या सर्वांत स्पष्ट प्रतिक्रिया मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र विभागाचे सरचिटणीस डॉ. अशोक ढवळे यांच्याकडून आली. त्यांनी ठाकऱ्यांचं विश्लेषण वर्ग संकल्पनेनुसार केलं.

'टाइम्स ऑफ इंडिया'त असताना मी ठाकऱ्यांच्या अनेक राजकीय मोर्चांचं वार्तांकन केलं. यातले अनेक मोर्चे वेधक होते आणि त्यांच्या कुशाग्र विनोदबुद्धीला दाद द्यावी अशी त्यांची भाषणं असत. काही वेळा माझ्या बातम्यांबद्दल ते खूष असत; त्यांच्या पत्नीचे बंधू आमच्या वृत्तपत्राच्या प्रशासकीय विभागात काम करत होते, त्यांच्याकडूनच हे मला कळे. पण शिवसेनेच्या विश्लेषणाचं बोलायचं तर दृष्टीकोन वस्तुनिष्ठच असायला हवा.

शिवसेनेमधल्या नकारात्मक गोष्टी खूपच मोठ्या आहेत. शिवसेना राज्यात सत्तेवर असताना मुंबईत खारमधल्या एका बैठकीत, ठाकऱ्यांनी एवढे खालच्या पातळीवरचे शब्द वापरले की मी खाजगी संभाषणातही ते वापरू शकलो नसतो. राजकीय वाद त्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर आणून ठेवले. इतर राज्यांमधल्या कट्टर नेत्यांनीही अशी दहशतीची आणि द्वेषाची भाषा कधी वापरली नव्हती, शिवसेनेने ते करून दाखवलं!
***

विद्याधर दाते यांचा ई-मेल पत्ता - datebandra@yahoo.com

दात्यांचं 'ट्रॅफिक इन दी एरा ऑफ क्लायमेट चेंज' हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. 
या पुस्तकाबद्दल 'द हिंदू'मधे आलेला मजकूर.

Wednesday, 28 November 2012

-



एक रस्ता. डांबरी. काळा रस्ता.
कुठे एक डबकं. म्हटलं तर पाणी खराब आहे. माणूस पिऊ शकत नाही म्हणून खराब म्हणायचं, पण तसं खराब नव्हे. वेळ पडल्यास माणसालाही प्यायला लागू शकतं असं पाणी. सुंदर त्यात शेवाळ. त्या शेवाळावर पक्षीही बसू शकतो वेळ पडल्यास आणि त्याची तशी ताकद असल्यास. पिवळ्या फिकट चोचीचा लहानसा पक्षी त्यावर बसलेला. ठप्प. आणि त्याच्यावरही पडलेलं काळोखं ऊन.
आजूबाजूला झाडीचा गुंता. एकएका झाडाचं खोड न् फांद्या यांच्यातला फरक कळू नये असा गडद हिरवट गुंता. झाडांची जाळीच.
त्या जाळीत पडलेलं ऊन. जाळीत पडल्यामुळे व्यवस्थित असलेलं. कुठे जखमबिखम झालेली नाही.
काही वेलींसारख्या गोष्टी. वेली म्हणजे नाजूक असतात त्याही आणि मजबूत असतात त्याही. नाजूक वेली कुठेही सरपटत गेलेल्या, एकमेकांवर चढलेल्या, एकमेकांत गुंतलेल्या, दोन झाडांना सांधणाऱ्या. मजबूत वेली जाड्या खोडाच्या, त्यांची त्यांची विचित्र रचना झालेली, काहीतरी गोल एकमेकांत गुंतल्यासारखी रचना, करड्या रंगाच्या खोडांची एकमेकांतली रचना. कधी त्यावरही पडलेलं ऊन, त्यामुळे स्पष्ट होणाऱ्या वेटोळ्या सावल्या. हे सगळं एकत्र एकमेकांत.

फोटो 'रेघे'वरचाच

















ब्रह्म भरलें ते सदोदित पाही। चालावया नाहीं, वाट कोठे।।
चालतां चालतां करें निवारावें। कोठें हे थुंकावे, कोणे ठायीं।।
जळांत मासोळी मासोळींत जळ। ऐसा हा पाल्हाळ, आहे बापा।।
तुका म्हणे वोहे गुरुकृपेविण। ऐसी आहे खूण सत्य बापा।।

संत तुकारामांचे अप्रकाशित अभंग - संपादक : वा. सी. बेंद्रे (कॉन्टिनेन्टल प्रकाशन). पहिली आवृत्ती - २००३
 - या पुस्तकातून वरचा अभंग

Thursday, 8 November 2012

७ नोव्हेंबर १९०५ : ७ नोव्हेंबर १९१३ : झपूर्झा

७ नोव्हेबर १९०५ रोजी केशवसुत यांचं निधन झालं. त्यांच्या कवितेबद्दल आपण शाळेत ऐकलं असेल, आपली त्याबद्दल कायतरी मतं असतील ती असतील. त्यांचं मराठी आधुनिक कवितेतलं स्थान काय असेल ते असेल. त्यांनी काय केलं, कोणाचा त्यांच्यावर प्रभाव होता त्याबद्दलही कायतरी असेल. मग ते म्हणाले 'एक तुतारी द्या मज आणुनि फुंकीन ती मी स्वप्राणाने', तर त्यावर असाही युक्तिवाद केला गेलाय, की तुम्हाला एवढी स्वप्राणानेच फुंकायची होती तुतारी, तर मग ती दुसऱ्यानं कशाला आणून द्यायला हवी? - असं ते सगळं एका बाजूनं सुरू राहील आणि राहूदे. आपला इथला हेतू आत्ताचा वेगळा आहे.

आपण काल अल्बेर कामूचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालं त्याबद्दल नोंद केली. ७ नोव्हेंबर १९१३ ही त्याची जन्मतारीख. (४ जानेवारी १९६०ला अपघातात त्याचा मृत्यू झाला.)
ती नोंद केल्यानंतर सदानंद रेग्यांनी कामूवर केलेली कविता आठवली. ती जाऊन शोधली. ती अशी -

निरर्थालाहि अर्थ येऊ पहात होता...
(आल्बेर कामू यांच्या स्मृतीस)
त्या दिवशी अचानक
          असे काय झाले?
तुझ्या मोटारीचे डोके
          अकस्मात् कसे फिरले?
अचानक...
अकस्मात्...
अघटित...
अपघात...
निरर्थालाहि काही अर्थ येऊ पहात होता.
पण तो झाला भस्मसात्...

तुला विचारले तर तू काही बोलत नव्हतास.
चुरगाळलेल्या बगळ्यासारखा मान टाकून बसला होतास.
गाठाळत चाललेल्या रक्ताच्या नुक्त्यावर
एक डास तेवढा गुं गूं करीत होता.

म्हटला तर या साऱ्याला अर्थ होता.
म्हटला तर काहीच नव्हता.
नुसता अॅब्सर्ड काळोख...


('देवापुढचा दिवा'मधून)


ही कविता शोधताना रेग्यांची '७ नोव्हेंबर १९०५' असं शीर्षक असलेली कविता दिसली. ती पाहिली तेव्हा लक्षात आलं की काल केशवसुतांची पुण्यतिथी होती.
केशवसुतांबद्दल 'मराठी विश्वकोश' इतर माहिती देतोच, पण रेग्यांच्या कवितेतले काही संदर्भ स्पष्ट व्हावेत म्हणून विश्वकोशातली ही माहिती - केशवसुतांनी 'मॅट्रिकनंतर (१८८९) मुंबईला १८९७ पर्यंत निरनिराळ्या हंगामी नोकऱ्या केल्या. पुढे प्लेगमुळे मुंबई सोडून ते खानदेशात गेले. आरंभी भडगावच्या नगरपालिकेच्या शाळेत दुय्यम शिक्षकाची नोकरी केली. १९०१ पासून फैजपूरला मुख्याध्यापक म्हणून नेमणूक झाली. १९०४ मध्ये धारवाडच्या सरकारी शाळेत मराठीचे शिक्षक म्हणून बदली झाली. १९०५ साली हुबळीला गेले असताना प्लेगने त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागून आठच दिवसांनी त्यांची पत्नीही मरण पावली.'

ही आता रेग्यांची कविता -

७ नोव्हेंबर १९०५

प्लेग... प्लेग... प्लेग...
जणू उभ्या हुबळी गावाच्याच
आली आहे खाकेत
                    प्लेगची गाठ
लोक मरताहेत त्याला काही सुमार!
सकाळपास्नं प्रेतांचे पास लिहून लिहून
                    दुखायला आले हात...
आणखी एक आलं हे तशात!
करीत होता म्हणे धारवाडला मास्तरकी
मग इथं कशाला आला
                    मरायला फुकाफुकी?...
काय नाव म्हणालंत?
          कृष्णाजी
               केशव
                    दामले?
चला, सुटले बिचारे!
आता नाही अपमान गिळावा लागणार
की नाही दारिद्र्याचा उंदीर चावणार
आता...
          हर्ष खेद ते मावळले
               हास्य निमाले
                    अश्रु पळाले...
 ('अक्षरवेल'मधून)

केशवसुतांवर एक संकेतस्थळ सापडलं ते असं- http://keshavsut.com/
इथं त्यांची 'तुतारी' कविताही वाचता येईल.

केशवसुत (फोटो- keshavsut.com )

दरम्यान,
'झपूर्झा' कवितेत केशवसुत काय म्हणतात बघा -

हर्षखेद ते मावळले,
हास्य निवालें
अश्रु पळाले;
कण्टकशल्यें बोंथटलीं,
मखमालीची लव वठली;
कांही न दिसे दृष्टीला,
प्रकाश गेला,
तिमिर हरपला;
काय म्हणावें या स्थितिला ?-
झपूर्झा ! गडे झपूर्झा !             १


शेवटच्या कडव्यात म्हणतात-

सूर्य चन्द्र आणिक तारे
नाचत सारे
हे प्रेमभरें
खुडित खुपुष्पें फिरति जिथें;
आहे जर जाणें तेथें
धऱा जरा, नि:संगपणा,
मारा फिरके,
मारा गिरके,
नाचत गुंगत म्हणा म्हणता –
झपूर्झा ! गडे झपूर्झा !         ६


उरलेली कविता इथं वाचा.
***

झपूर्झा काय, अॅब्सर्ड काय नि ७ नोव्हेंबर काय
केशवसुत काय, कामू काय नि काय काय

Wednesday, 7 November 2012

सिसिफसचं मिथक

- आल्बेर कामू

आल्बेर कामू (फोटो : हेन्री कार्तिअर ब्रेसाँ)
आल्बेर कामूचं जन्मशताब्दी वर्ष आजपासून सुरू होतंय. त्यानिमित्तानं त्याच्या 'द मिथ ऑफ सिसिफस' या गाजलेल्या पुस्तकातल्या अगदीच छोट्या भागाचं हे भाषांतर. 


भला मोठा खडक सतत पर्वतावर ढकलत नेण्याची शिक्षा सिसिफसला देवानं दिली आणि खडक स्वतःच्या वजनानं परत खाली पडणार हेही निश्चित. निष्फळ आणि निराशाजनक कष्टांपेक्षा दुसरी कुठलीही कठोर शिक्षा असू शकणार नाही असं देवाला वाटलेलं.

होमरवर विश्वास ठेवायचा झाला, तर सिसिफस हा मर्त्य प्राण्यांपैकी सर्वांत हुशार आणि विवेकी होता. पण दुसऱ्या एका परंपरेनुसार, त्याला लुटारूचं काम करण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. यामध्ये मला कोणताही विरोधाभास दिसत नाही. अधोविश्वातला तो एक निष्फळ कामकरी का बनला याच्या कारणांसंबंधी मतभेद असू शकतील. सुरुवात करायची तर, देवांसंबंधी काहीतरी थिल्लरपणा केल्याचा त्याच्यावर आरोप होता. त्यांची गुपितं त्यानं चोरली. इसोपसची मुलगी एगिना ज्युपिटरनं पळवली. ती गायब झाल्यानं वडिलांना धक्का बसला आणि त्यांनी सिसिफसकडे तक्रार केली. या अपहरणाबद्दल सिसिफसला माहिती होती; पण, ती देण्यापूर्वी एसोपसने कोरिन्थच्या गढीला पाणी पुरवावं अशी अट त्यानं घातली. आकाशी गाजेपुढं त्यानं पाण्याचा वर मागितला. यामुळे त्याला शिक्षा झाली. होमर आपल्याला असंही सांगतो की, सिसिफसनं मृत्यूला साखळ्यांनी बांधून ठेवलं होतं. प्लुटोला त्याच्या उद्ध्वस्त, सुन्न साम्राज्याकडे पाहावलं नाही. त्यानं युद्धाच्या देवाला पाठवलं आणि मृत्यूला सोडवून आणलं.

असं म्हटलं जातं की, मृत्यूच्या जवळ असल्यामुळे, सिसिफसला त्याच्या बायकोचं प्रेम तपासून पाह्यचं होतं. आपलं दफन न केलेलं शरीर सार्वजनिक चौकाच्या मध्यभागी फेकण्याची सूचना त्यानं तिला केली होती. सिसिफस अधोविश्वात जागा झाला. आणि मानवी प्रेमाच्या एवढा विरोधी जाणारा आज्ञाधारकपणा पाहून, त्यानं प्लुटोकडून पृथ्वीवर परतून आपल्या बायकोला दंड करण्यासाठीची परवानगी मागितली. पण त्यानं पुन्हा जगाचं तोंड पाहिलं, पाणी, सूर्य, दगड आणि समुद्र अशांचा आनंद घेतला तेव्हा त्याला परत नरकाच्या अंधारात जावंसं वाटेना. सूचना करून झाल्या, कठोर भाषेत सांगून झालं, तरी उपयोग नाही. अनेक वर्षं तो आखातात समुद्राजवळ राहिला. यानंतर मात्र देवांचा आदेश आवश्यक बनला. मग मर्क्युरी आला आणि या बेशरम माणसाची बखोटी धरून सगळ्या आनंदांपासून त्याला दूर नेलं नि जबरदस्तीनं पुन्हा अधोविश्वात नेऊन टाकलं. इथं त्याच्यासाठीचा खडक वाटच पाहात होता.

सिसिफस हा आपला असंगत (अब्सर्ड) नायक असल्याचं एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल. त्याचे आनंद आणि त्याच्यावरचा अत्याचार यातून तो पुरेपूर उरला होता. देवांवरचा त्याचा राग, मृत्यूविषयीचा द्वेष आणि जगण्यावरचं त्याचं प्रेम त्याला ही बोलता न येण्याजोगी शिक्षा मिळाली- यात काहीही पूर्ण न करण्याकडेच त्याच्या अस्तित्त्वाला ढकलून देण्यात आलं. या पृथ्वीवरच्या अभिलाषेपोटी ही किंमत मोजणं भाग होतं. अधोविश्वातील सिसिफसविषयी आपल्याला काही कळण्याचा मार्ग नाही. कल्पनेत जीव ओतण्यासाठी मिथकं तयार केली जातात. या मिथकामधे फक्त प्रचंड खडक वर ढकलण्यासाठीचे प्रयत्न आहेत, शेकडो वेळा केलेले; वेडावाकडा झालेला चेहरा आणि खडकाला चिकटून असलेला गाल, खांद्यानं दिलेला जोर, पायांचा आधार, ताणलेले हात याकडेच आपलं लक्ष जातं. कोणतीही खोली नसलेल्या अवकाशात आणि वेळेत शेवटाकडे त्याचं काम फत्ते झालेलं आहे. पण काही क्षणातच सिसिफसच्या समोरच तो खडक पुन्हा खाली गडगडत जातो. तिथून त्याला परत शिखरापर्यंत खडक ढकलत आणायचाय. तो परत पायथ्याकडे जातो.

त्या परतीच्या वेळी, तेव्हा तो थांबलेला असतो, तिथला सिसिफस मला आकर्षित करतो. दगडाच्या एवढा नजिक राहून तो चेहराच दगड बनल्यासारखा असतो. आपल्याला माहित नसलेल्या या कष्टाकडे जड पण ठाम पावलांनी निघालेला तो माणूस मी पाहातो. त्याच्या कष्टाप्रमाणेच परत परत येणारा तो श्वास घेण्यापुरता काळ हा जाणिवेचा काळ आहे. उंची सोडून तो पुन्हा खाली चालायला लागतो त्या प्रत्येक क्षणी तो त्याच्या प्रारब्धाच्या वरचढ ठरतो. तो त्याच्या खडकापेक्षाही सक्षम आहे.

हे मिथक दुःखदायक आहे कारण त्यातला नायक जागरूक आहे. जर प्रत्येक पावलाबरोबर तो पुढच्या प्रयत्नाकडे जातोय तर त्याचं दुःख कुठाय? सध्या कामकरी तेच काम आयुष्यात दर दिवशी करतात, त्यांचं प्रारब्धही असंगतच आहे. पण ज्या दुर्मिळ क्षणी जागरूकता येते तेव्हा ते दुःखद बनतं. देवांचा कामकरी असलेला सिसिफस सत्ता नसलेला आणि बंडखोर आहे; त्याच्या निष्ठूर परिस्थितीचा आवाका त्याला माहिती आहे. परत खाली येताना तो त्याचाच विचार करतो. त्याच्या यातनांमधे येत जाणारी स्पष्टता हाच त्याचा विजय आहे. तुच्छतेने कमी लेखता येणार नाही असं प्रारब्ध असत नाही.

दुःखानं जर खाली येता येत असेल तर आनंदानंही ते करता येईल. ही अतिशयोक्ती नाही. सुरुवातीला दुःख आहे. पण जेव्हा आठवणीत पृथ्वीची चित्रं यायला लागतात, आनंदाची हाक अनावर होते, तेव्हा माणसाच्या हृदयात खिन्नता येते : हा खडकाचा विजय असतो. किंबहुना हाच खडक असतो. अमर्याद दुःख झेपायला अतिशय जड असतं.

आनंदाच्या नोंदी करण्याचा मोह झाल्याशिवाय कोणाला असंगतीचा शोध लागत नाही. 'काय! असल्या खुज्या मार्गांनी?' पण जग एक आहे. आनंद आणि असंगती हे एकाच पृथ्वीचे दोन पुत्र आहेत. ते अविभाज्य आहेत. आनंद हा असंगतीच्या शोधातूनच येतो असं म्हणणं चूकच ठरेल. अर्थात आनंदातूनच असंगतीची भावना येते. 'सगळं आलबेल आहे असं सांगून थांबतो', असं इडिपस म्हणतो आणि हे विधान पवित्र आहे. माणसाच्या मर्यादित विश्वात ते घुमत राहातं. सगळं संपलेलं नव्हतं आणि संपलेलं नाही याची जाणीव त्यातून होते. असमाधानातून आलेला आणि निष्फळ दुःखाला प्राधान्य देणाऱ्या देवाला हे विधान हुसकावून लावतं. प्रारब्धाला ते मानवी कृती बनवून टाकतं.

सिसिफसचे सगळे अबोल आनंद यात आले. त्याचं प्रारब्ध त्याच्याकडेच आहे. त्याच्या यातनांची पूर्वकल्पना तो समजावून घेतो तेव्हा सर्व मूर्ती गप्प होतात. विश्वातील शांतता पूर्ववत झाल्यामुळे पृथ्वीतील लहान लहान आवाज पुन्हा उठतात. सावलीशिवाय सूर्य नसतो आणि रात्रीचीही ओळख ठेवणं गरजेचं असतं. असंगत मनुष्य होकार देतो आणि न थांबणारे प्रयत्न करत राहातो. त्याच्या दिवसांचा तोच राजा आहे हे त्याला उमजलंय. आपल्या आयुष्याकडे परतून पाहण्याच्या त्या सूक्ष्म क्षणी, सिसिफस दगडाकडे परतत असतो तशाच प्रकारे, त्याला त्याचे प्रारब्ध निर्माण करणाऱ्या असंबद्ध कृती दिसतात; त्यानेच तयार केलेल्या या कृती त्याच्या आठवणीत जमा होता आणि त्याच्या मृत्यूनं त्या थांबतात. सगळ्या मानवी गोष्टींचा मानवी उगम समजल्यामुळे, रात्राचा शेवट नसल्याचं समजलेल्या अंध व्यक्तीप्रमाणे, तो चालतच राहातो. खडक अजूनही ढकलला जातोयच.

सिसिफसला मी पर्वताच्या पायथ्याशी सोडून देतो! प्रत्येकाला आपलं ओझं सापडतं. पण देवांना नकार देणारी आणि खडकांना ढकलणारी अत्युच्च बंडखोरी सिसिफस दाखवतो. सगळं काही आलबेल आहे असाच त्याचा निष्कर्ष आहे. कोणत्याही सत्ताधाऱ्याशिवाय असलेलं हे विश्व त्याला वांझही वाटत नाही आणि निष्फळही वाटत नाही. त्या दगडाचा प्रत्येक अणू, काळोखानं भरलेल्या त्या पर्वतावरच्या प्रत्येक धातूचा कण या सगळ्यानंच जग बनतं. उंचीपर्यंत जायची ही लढाईच माणसाचं मन भरून ठेवण्यास पुरेशी आहे. सिसिफस आनंदीच आहे अशी कल्पना करायलाच हवी.

Saturday, 3 November 2012

तथागत कवी

- अशोक शहाणे

१९३१च्या १ नोव्हेंबरला अरुण कोलटकरांचा जन्म झाला. त्याचं निमित्त साधून कोलटकरांचे मित्र
आणि प्रकाशक अशोक शहाणे यांचा हा लेख 'रेघे'वर प्रसिद्ध होतोय. कोलटकरांचं ('विकिपीडिया'सह अनेक ठिकाणी) नोंदवलेलं जन्मवर्ष १९३२ आहे, पण ते वास्तविक १९३१ आहे. हा उल्लेख प्रास प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या 'बोटराईड अँड अदर पोएम्स' ह्या कवितासंग्रहात आलेला आहे.
शहाण्यांचा लेख कोलटकर गेल्यानंतरच्या ३ नोव्हेंबर २००४ रोजी 'सकाळ'च्या 'सप्तरंग' ह्या रविवार पुरवणीत प्रसिद्ध झाला होता. आज ३ नोव्हेंबर २०१२ आहे. शहाण्यांच्या परवानगीनं लेख इथं-




अरुण कोलटकर (photo from here)
नाहीतरी प्लेटोनं आपल्या मनातल्या प्रजासत्ताकात कवींसाठी जागा ठेवलीच नव्हती. कवी मंडळी अत्यंत कुचकामी व बेभरवशाची असतात, असं कारण देऊन.

या आक्षेपाला तडाखेबंद उत्तर भवभूतीनं दिलं होतं, की कविताबिविता तुमच्यासारख्यांसाठी लिहिलेलीच नाही मुळी. ती समजणारा आत्ता कुणी नसला तरी पुढं कधीतरी निपजेल. इथं नाही तर आणखी कुठंतरी. माझा 'समानधर्मा' कुणीतरी कधीतरी निपजेलच निपजेल. कारण काळाला काही मर्यादाच नाहीत अन्‌ जगसुद्धा खूप मोठ्ठं आहे.

कवितेसाठी 'धर्म' शब्द वापरणारा बहुधा भवभूतीच पहिला. जरी का तुकोबांना तेच अभिप्रेत असावं त्यांच्या या ओळीत : 'माझीया जातीचे मज भेटो कोणी.' ही जात कोणती? तर अर्थातच कवीची. कारण तसा तर तमाम कवीमंडळींचा जाहीरनामा त्यांनीच तर लिहून टाकला होता : 'आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने.'

हे सगळं भारुड आत्ता आठवायचं कारण म्हंजे कैक वर्षांपूर्वी अरुणनं दिलीपला (चित्रे) टीव्हीवरल्या मुलाखतीत दिलेलं मासलेवाईक उत्तर. दिलीपनं कोणत्याही मुलाखतीत शोभण्याजोगा मामुली प्रश्‍न विचारला होता : 'तू कविता कसा लिहायला लागलास?' यावर अरुणचं उत्तर होतं : 'देवानं मला सांगितलं, अरुण, पृथ्वीतलावर जा अन्‌ कविता लिही.'

यातला देव अर्थात उगाच. प्रश्न करणाऱ्यानं आणखी खोलात शिरू नये म्हणून त्याच्या वाटेत एक भलीथोरली धोंड म्हणून वापरलेला. पण त्याचबरोबर आपली कवितेबद्दलची समज भवभूती-तुकोबांशी जोडणारा.

या तुकोबांबद्दल पण मागं बोलताबोलता अरुण म्हणाला होता, 'विठोबाची न्‌ आपली डायरेक्ट ओळख नाही, तुकारामाची न्‌ आपली आहे, अन्‌ तुकाराम विठोबाला ओळखत होता.'

तुकोबांबद्दल आणखीसुद्धा त्याचं एक बिनछापील विधान मोठं मार्मिक होतं : साक्षात मरण पुढं उभं ठाकलेलं असताना माणसानं मोठ्ठ्यानं हसावं अशी तुकारामाची कविता आहे.

हे कुणा समीक्षकाला सुचणं दुरापास्त आहे. तिथं जातिवंत कवीच हवा.

आमच्या मित्रमंडळींपैकी अरुणनं अन्‌‌‌ दिलीपनं आपापल्या परीनं मराठी माणसाला तुकारामाची कवी म्हणून ओळख करून दिली. तुकाराम जाऊन साडेतीनशे वर्षं उलटून गेल्यावर. एरवी तुकारामाला थोर करून, संत करून, टिळेबिळे लावून, त्याच्या नावानं चमत्कारांची कुभांडं रचून त्याच्या कवितेचा विसर पाडण्यासाठी काय कमी खटपटी-लटपटी झाल्या होत्या का?

दिलीपनं लोकांना समजावणीच्या सुरात, जवळजवळ त्यांची मनधरणी करत, तुकारामाची कविता लावून धरली. अरुणनं त्याचा रोखठोकपणा लावून धरला. इतका, की अरुणच्या बहुतेक कविता प्रत्यक्ष घटनांवर किंवा प्रत्यक्ष माणसांवर रचलेल्या आढळतात. मग ती अगदी पहिल्या पुस्तकातली 'मुंबैनं भिकेस लावलं' असो, की इस्पितळाच्या कवितांची मालिका असो, की 'चिरमिरीत'ल्या तर सगळ्याच कविता, अन्‌‌‌ 'भिजक्‍या वही'तला यच्चयावत्‌ मजकूर. ही सगळीच माणसं खरीच आहेत, या सगळ्याच घटना पण खऱ्याच आहेत. अन्‌ तरी त्यांची कविता बनू शकते. जशी तुकारामाची बनली, जशी त्याच्याआधी नामदेवाची बनली.

अरुणला वस्तुस्थितीच वेगळी दिसायची. कवीच्या चष्म्यामुळंच हे होत असेल. एका बंगाली कवीनं समजून सांगितल्याप्रमाणं : कवीच्या लेखी देशाला काहीच खरेपणा असत नाही; त्याच्या लेखी एक नदी, एक झाड, एक फूल, एक दगड, एक बाई. या गोष्टी कितीतरी जास्ती खऱ्या आहेत किंवा तुकारामानं म्हटल्याप्रमाणं 'देश वेष नव्हे माझा, सहज फिरत आलो.'

हे अरुणमध्ये जोरदार होतं. 'चिरमिरी'त बळवंतबुवा 'त्यापेक्षा मी नाहीच मरत' म्हणतो ते त्यातनंच.
हे कोण म्हणतं? बळवंतबुवा की अरुणच? मरायच्या अठ्ठेचाळीस तास आधी पण तो म्हणत होता, 'ह्या गोष्टी मी मुंबईला परतल्यावर आपण बोलून ठरवू.' म्हंजे मरण त्याच्या लेखी नव्हतंच. तेव्हा तरी. ते प्रत्यक्ष येईल तेव्हाच खरं होणार होतं. त्याच्याआधी ती आपली निव्वळ एक कल्पना. काल्पनिक गोष्ट.

हे म्हंजे बुद्धाच्या 'तथात्व' सिद्धांतासारखं झालं. गोष्ट जशी मुळात आहे तशी ती जाणून घ्यायची. स्वतःला पार वगळून. तिच्या 'तथा'पणाला धक्का न लावता. बुद्धाला ही हातोटी जमून गेली होती. म्हणूनच तर त्याला 'तथागत' नाव पडलं. दुसरा तथागत मी पाह्यला तो अरुण.

Friday, 2 November 2012

रेघ : दोन वर्षं


 'रेघ' हा ब्लॉग आत्ता ज्या पत्त्यावर सुरू आहे तिथं सुरू झाल्याला आत्ताच्या ऑक्टोबरला दोन वर्षं पूर्ण झाली. ह्या ब्लॉगवरची पहिली नोंद २३ ऑक्टोबर २०१०ची आहे.

यापूर्वी दुसऱ्या पत्त्यावर रेघ सुरू होती, पण तिथं तिची मर्यादा स्पष्ट झाली म्हणून ती थांबवली. रेघेचा तो पहिला टप्पा थांबला ती तारीख होती २ नोव्हेंबर २०१०. म्हणजे एकूण असे टप्पे टाकत आपण इथपर्यंत आलोय त्यात आजचा दोन नोव्हेंबर.

दरम्यान, अनेक गोष्टी झाल्यात.
'रेघे'वरच्याच गोष्टी म्हणून एकूण आठ ब्लॉग तयार करता आले.
ते असे-
भाऊ पाध्ये
नपेक्षा... अशोक शहाणे
श्री. दा. पानवलकर
हमीद दलवाई
कमल देसाई
सदानंद रेगे
तुळसी परब
वसंत दत्तात्रेय गुर्जर

हे ब्लॉग ज्या व्यक्तींसंबंधीचे आहेत त्याच व्यक्ती का निवडल्या याला कोणतंही लॉजिक नाही. आपण कोणाचंतरी वाचतो आणि मग ते आवडलं तर त्याबद्दल काहीतरी शोधायला पाहातो. पण शोधून शोधूनही काही सापडत नाही अशी अवस्था मराठीत अनेकदा होते. अशी अवस्था झाली तेव्हा आपल्या कुवतीनुसार जे जमवता आलं ते कात्रणांसारखं जमवून तयार झालेले हे ब्लॉग आहेत. अशा कित्येक माणसांबद्दल असं काहीतरी करता येईल, पण शेवटी आपली मर्यादा पडतेच. मूळ मुद्दा एवढाच की हे आठही ब्लॉग म्हणजे कात्रणवहीच्या पातळीवरचं दस्तावेजीकरण आहे. त्या पलीकडे त्यात काही आहे असा दावा नाही. संबंधित माणसांची काही प्राथमिक माहिती, काही फोटो, असल्यास पुस्तकांच्या नावांची यादी अशी कात्रणं एकत्र इंटरनेटवर सापडावीत एवढाच हेतू.

हे सगळं आज स्पष्ट करण्याची कारणं आहेत.
ह्या ब्लॉगांसंदर्भात एका ठिकाणी आपसूक छापून आल्यामुळे काही बरं म्हणणारे आणि काही वाईट म्हणणारे फोन आले. त्या निमित्तानं ह्याबद्दल आपण बोलून ठेवू, एवढ्याच हेतूनं ही नोंद.

बाकी, 'रेघे'बद्दल बोलायचं तर त्यात पर्यायी माध्यमं, भाषा, आणि मराठी साहित्य अशा तीन रस्त्यांनी रेघेचा प्रवास होत आलेला आहे, तो कितपत होत राहाणार याचा पत्ता नसला तरी साधारण 'रेघ' आणि इतर आठ ब्लॉग यांच्याबद्दल एकसंध बोलणं व्हावं यासाठीही ही नोंद आहे. 

'रेघे'चं फेसबुकवर खातं उघडून ठेवलं, त्याचा कितपत उपयोग होतो याची शंका आहेच. तरी ते अजून सुरू आहे.

माध्यमं उभ्या पद्धतीनं नाही तर आडव्या पद्धतीनं पसरायला हवीत, म्हणजे आडव्या रेघेसारखी. त्यात अशा एका ब्लॉगनं काही मोठा फरक पडत नाही. पण तरी आपली रेघ मारून ठेवावी ह्या हेतूनं हा ब्लॉग सुरू केला होता.

वरती जे आठ ब्लॉगांच्या लिंका दिल्यात, ते 'रेघे'चेच प्रकल्प म्हणण्याचं कारणही हेच आहे. आपण आपल्या पातळीवर माध्यमांचा वापर कसा करू शकतो? एक जनरल रस्त्यावरचा माणूस म्हणून आपण काय करू शकतो? आपल्याला वाटतं ते माध्यमांच्या माध्यमातून करू शकतो का? या प्रश्नांची खूप मोठी उत्तरं असतील. पण एका फुटकळ माणसाला समजा वाटलं की त्याला काही लेखक मंडळींबद्दल माहिती जमवायचेय आणि ती एकत्र करून ठेवायचेय आणि ती अजून कोणाला वाटल्यास उपलब्ध व्हावी, तर त्याच्या प्रयत्नाला व्यासपीठ आहे, ते सध्यातरी इंटरनेटचं. हे आधी जेवढे पैसे खर्च करून करावं लागलं असतं त्या तुलनेत खूपच स्वस्तात होतंय त्याचं कारणही इंटरनेटच.

म्हणजे या 'रेघे'चा हेतू काय तर पर्यायी माध्यमांचा वापर आपल्या कुवतीनुसार कसा करता येईल याचं एक उदाहरण तयार करणं. त्यात रेघ - हा ब्लॉग आणि वरती दिलेले आठ ब्लॉग यांच्या मदतीनं हे उदाहरण पूर्ण होतंय.

हे सगळं एकदा नोंदवून ठेवणं आवश्यक वाटलं आणि सध्या काही लोकांनी त्याबद्दल विचारलं, कोणी दुसऱ्या कोणीतरी विचारलेलं सांगितलं, अशा सगळ्या गोष्टींमुळे हे आज नोंदवून ठेवलं एवढंच.