Tuesday, 1 January 2013

गोंगाटाच्या गुंगीवरचा उतारा

''अशा या गोंगाटात कान किटलेले असताना आपणास नव्या वर्षाचे स्वागत करावयाचे आहे. अशा वेळी नव्या वर्षी तरी परिस्थिती सुधारावी अशी आशा असणे काही गैर नाही. परंतु एकंदर वातावरण पाहता परिस्थिती सुधारली नाही तरी ती अधिक बिघडू नये इतकीच अपेक्षा ठेवणे शहाणपणाचे.''
'लोकसत्ते'च्या आजच्या संपादकीयामधला शेवटचा परिच्छेद वर दिला आहे. आपण 'रेघे'वरच्या एका नोंदीचं नाव आधीचं ठरवलं होतं, ते असं होतं - 'गोंगाटाच्या गुंगीवरचा उतारा'.

'लोकसत्ते'मधून
आजपासून २०१३ वर्ष सुरू होतंय, त्यानिमित्त लिहिलेल्या 'लोकसत्ते'च्या अग्रलेखाचं शीर्षक 'तीन तेरा की' असं आहे. जागतिक आर्थिक संकटांची पार्श्वभूमी हा लेखाचा मुख्य भाग, त्या पार्श्वभूमीवर आपल्याकडचं राजकीय चित्र कसं भकास आहे हा या लेखाचा शेवटाकडचा भाग आणि 'अडीच शहाणे' नेते लोकांशी संवाद कसे साधत नाहीत असा उल्लेख करून वर दिलेल्या परिच्छेदाने लेख संपतो.

या लेखातल्या गोंगाटाच्या संदर्भामधे आपल्याला भर घालायच्येय.

त्यांनी तसाही कुठल्यातरी गोंगाटाचा उल्लेख केलाय तर त्याचं निमित्त साधून आपण 'रेघे'वर ही लहानशी नोंद करूया. आपण ज्या गोंगाटाबद्दल बोलतोय तो माध्यमांचा गोंगाट आहे. तो आपण रोज अतिरेकी चर्चा नि बातम्यांच्या माध्यमातून अनुभवतो आहोतच. या गोंगाटाची आपसूक गुंगी चढते आणि मग ती कधी तात्कालिक मोर्चाच्या रूपात नायतर फेसबुकवरती बाहेर येत असते. त्यावर आपल्याला काहीच बोलायचं नाही. पण 'रेघे'चा प्रयत्न आहे की या गुंगीवर उतारा असायला पाहिजे. म्हणजे काय? तर इकडेतिकडे गोंगाट चाललाय बाळ ठाकरेंच्या निधनाबद्दल, तर आपण शांतपणे इथे त्या गोंगाटाच्या दुसऱ्या बाजूच्या काही नोंदी टाकूया.
गुडबाय ठाकरेसाहेब, तुम्ही मला प्रेम करायला शिकवलंत! - जावेद इक्बाल
बाळ ठाकरे, भांडवलदार आणि श्रमिक गरीब - विद्याधर दाते
अशा त्या दोन नोंदी त्यावेळी आपण केल्या. नंतर बलात्काराच्या घटनेवेळीसुद्धा आपण र. धों. कर्व्यांसंबंधीच्या नोंदीत आणि दुसऱ्या एका नोंदीत इथे असा प्रयत्न केला.
या शिवाय माध्यमांसंबंधी आपण काही नोंदी केलेल्या आहेत, त्यातली एक, 'बाहेर आलेली पेस्ट आता परत ट्यूबमधे कशी घालणार?' आणि दुसरी, 'कुमार केतकरांना गहिवरून का आलं?'
अगदी काफ्कासंबंधीची नोंद हासुद्धा या उताऱ्याचाच भाग होता.

आता हे लिहिल्यावर हेही सांगायला हवं की, असं करणं 'रेघे'वर प्रत्येक वेळी शक्य होईल असं नाही. मर्यादा खूपच आहेत. किमान काही माणसांनी एकत्र येऊन हे केलं पाहिजे, एकहाती अशा गोष्टी डोकं उठवू शकतात. एका डोक्याला असूनअसून किती गोष्टींवर बोलायचं असणार, किती गोष्टींमधे रस असणार आणि प्रत्येक वेळी तसं असावंसं वाटतंच असं पण नाही, मग मर्यादा येतात. पण असा उतारा असायला हवा आणि मराठीत तो छापील पातळीवर कुठेच सापडत नाही, तर किमान इंटरनेटच्या पातळीवर असा उतारा असायला हवा असं म्हणणं नोंदवावं इतक्यापुरतीच ही नोंद. खरं म्हणजे 'रेघे'चा एकूण हेतूच या म्हणण्याची थोडीशी तरी नोंद व्हावी हा आहे. आणि आपण खूपच थोडासा तो प्रयत्न केला, तसं ते वाढवायला हवं. त्या पलीकडे आपला काही दावा नाही, नायतर या नोंदीनंतरच रेघ बंद पडायची नि आपण तोंडघशी पडायचो.

कधी छापील व टीव्हीवरच्या माध्यमांना विरोध तर कधी पूरक असं काहीतरी करणं ही समांतर प्रक्रिया सध्याच्या गोंगाटात असायला हवी. म्हणजे 'रेघे'वरची एखादी नोंद कुठेतरी छापून आली वेगळी बाजू म्हणून किंवा इथल्या एका नोंदीमुळे छापील माध्यमातल्या (किंवा टीव्हीवरच्या) कोणाला काही सुचलं, काही सापडलं, तर ते बरं! - असं ते व्हायला हवं. असलं काही होईल याची फारशी आशा नसली तरी नोंद करायला काय जातंय?

बाकी गोंगाट वाढतच जाणार आहे, 'रेघे'ची मात्र खात्री नाही.

1 comment:

  1. I think a song from "Ghashiram" has a line like this...उपाय काय? उपाय नाय...but it seems it's there...गोंगाटाच्या गुंगीवरचा उतारा...why say "'रेघे'ची मात्र खात्री नाही"...let the "resh" continue to run along like Arun Kolatkar's map ---खिडकीबाहेर ड़ोंगरांसकट नद्यांसकट खुंटीसकट सरळ आकाशात...like a lightning!

    ReplyDelete