Friday 18 January 2013

दिवाकर, असा का तुम्ही आमचा छळ मांडलाय्?

नाट्यछटाकार दिवाकर (शंकर काशीनाथ गर्गे) यांची आज जयंती.
जन्म - १८ जानेवारी १८८९. मृत्यू - १ ऑक्टोबर १९३१.

'विकिपीडिया'वरची दिवाकरांवरची नोंदही बऱ्यापैकी आहे. त्यातून काही अधिकची माहिती हवी असल्यास मिळू शकेल.
***


नाट्यछटा म्हणजे काय?
नाटकाचा तो अति-लहान किंवा सोपा प्रकार नव्हे किंवा ते कथेचे किंचित् नाट्यीकरणही नव्हे. एकीकडे नाटक, नाटिका आणि दुसरीकडे कादंबरी, कथा पाहून या प्रकाराला त्याचे स्वतंत्र, वेगळे अस्तित्त्व दिसते; आणि ते आंग्ल कवी रॉबर्ट ब्राउनिंग यांच्या 'मोनोलॉग' या काव्यप्रकाराच्या वाचनाने १९१३ साली हेरून दिवाकरांनी पहिली नाट्यछटा लिहिली ती 'महासर्प'.

- विजय तेंडुलकर 
('नाट्यछटा' एका आवृत्तीच्या प्रस्तावनेतून. 'रेघे'वर नोंदीसाठी संदर्भ - समग्र दिवाकर - संपादक : सरोजिनी वैद्य. पॉप्युलर प्रकाशन)

तेंडुलकरांनी १९१३ या वर्षाचा केलेला उल्लेख चुकीचा असावा, कारण 'महासर्प' १८ सप्टेंबर १९११ या तारखेला लिहिली गेल्याची नोंद आहे. : रेघ.
***

ही दिवाकरांची एक नाट्यछटा :

असे केल्याशिवाय जगात भागत नाही!

''...माझे मोठे भाग्य, यात काही शंका नाही! नाहीतर, आपल्यासारख्या थोर लोकांची कोठून गाठ पडायला! - अहो कशाचे, कशाचे! आम्ही कसले कवी! कोठे एका कोपऱ्यात लोळत पडलो आहोत झाले! नाही खरेच! परवाची आपली कविता फारच बहारीची होती बोवा! फारच छान! एक्सलंट! अहो आधी नाव पाहूनच थक्क झालो! 'माझे अंधार अजीर्ण।' वा! किती सुंदर! - नाही, ते आले लक्षात. आहे कविता एकंदर आत्म्यालाच उद्देशून! पण त्यातल्या त्यात या दोन ओळी तर मला फारच आवडल्या! काय पहा! -  हां बरोबर, - 'अजीर्णामुळे। जीव कळवळे।।' काय बहार आहे यात! शब्द सोपे असून किती खोल, गंभीर अर्थ! - काय म्हणता! इतका खोल अर्थ आहे का? शाबास! 'प्रेमभंगामुळे हृदय पिळवटून डोळ्यांतून खळखळा वाहिलेल्या अश्रूंचे अजीर्ण!' क्च! काय विलक्षण मिस्टिक कविता आहे हो! टेरिबल! फारच प्रतिभा अफाट! माझे समजा हो! - कोणती? - कोणती बरी माझी कविता आपल्याला अतिशय आवडली? हां, हां! ती होय? गेल्या मस्तकमंजनातील चहादाणीवरील! अस्से! - हो, तीसुद्धा आहे आत्म्यालाच धरून! - बरे आता रस्त्यात नको - केव्हा? उद्या सकाळी येऊ आपल्या घरी? - ठीक आहे - हं: 'अहो रूपम् अहो ध्वनिः' चालले आहे जगात! म्हणे 'आपली चहादाणीवरील कविता अतिशय आवडली!' हः हः कमाल आहे बोवा या लोकांची! इतकी भिकार कविता की, मला स्वतःलासुद्धा आवडत नाही! 'माझी चहादाणी। साखरपाणी।। अधण येई सळसळा। अश्रू येती घळघळा।।' हः हः यंवरे कविता! पण चालले आहे की नाही! भेंडीरमणाने उठावे बटाटेनंदनाची स्तुती करावी! बटाटेनंदनाने पुढे यावे, भेंडीरमणाची वाहवा करावी! मनात परस्परांना त्यांची कविता मुळीच आवडत नसते! पण जगात याने त्याला शेली म्हणावे, उलट त्याने याला कीट्स म्हणावे! चालला आहे सपाटा! बरे असे केल्याशिवाय जगात भागत नाही! अहो नाही तर, आपली खरी मते सांगून जगात तंटेच करायचे - वैरीच निर्माण करायचे की नाही? रिकामा जीवाला ताप! जाऊ द्या!...''

२२ मे १९१३

('समग्र दिवाकर'मधून. पान क्रमांक ५१-५२)

***

फेसबुक : मराठी साहित्य : मराठी साहित्य संमेलनं : माध्यमं : व इतर अनेक गोष्टी : यांना ही नोंद अर्पण.

सदानंद रेग्यांनी दिवाकरांवर लिहिलेल्या 'गर्गेसाहेब' या कवितेच्या सुरुवातीला कंसात लिहिलं होतं : (काहीही कारण नसताना आज तुमची आठवण झाली. असा का तुम्ही आमचा छळ मांडलाय्?)

'रेघे'वर दिवाकरांची आठवण आली त्याचं कारण आज त्यांची जयंती आहे हे. आणि वरती जे नोंद अर्पण केलेल्या गोष्टी लिहिल्यात तेही एक कारण सांगता येईल.
***


शंकर काशीनाथ गर्गे ऊर्फ दिवाकर

***

2 comments:

 1. नाट्यछटा = कुणाचे तरी एका बाजूचे दूरध्वनीवरील संभाषण ऐकणे.

  खालील लिंकवरचा लेखही अतिशय उत्तम आहे :
  http://mr.upakram.org/node/83

  ReplyDelete
 2. "बरे असे केल्याशिवाय जगात भागत नाही! अहो नाही तर, आपली खरी मते सांगून जगात तंटेच करायचे - वैरीच निर्माण करायचे की नाही? रिकामा जीवाला ताप! जाऊ द्या!..."....भारी.

  http://mr.upakram.org/node/83 या लिंक वरचा लेख ही चांगला आहे.

  ReplyDelete