Friday 4 January 2013

आल्बेर काम्यू : ४ जानेवारी

आल्बेर काम्यूचं अपघाती निधन झालं ती तारीख ४ जानेवारी १९६०. आजही चार जानेवारी.
शिवाय ७ नोव्हेंबर १९१३ला जन्मलेल्या काम्यूचं जन्मशताब्दी वर्ष सध्या सुरू आहे. अशी निमित्तं साधून ही नोंद. खरं पाहाता, काम्यूसंबंधी नोंद करायला वेगळं निमित्त असायलाच हवंय असंही नाही.
***

'द मिथ ऑफ सिसिफस' या पुस्तकाच्या परिशिष्ट वजा विभागात असलेल्या 'समर इन अल्जेअर्स' या लेखातल्या शेवटच्या भागाचं हे बेकार मराठी भाषांतर-

एखाद्या विशिष्ट प्रदेशाबद्दल जवळीक वाटणं, एखाद्या विशिष्ट मानवी समूहाबद्दल आत्मीयता वाटणं, आपल्या मनाला शांती मिळेल अशी कुठलीतरी जागा आहे याची सतत जाणीव असणं - या सर्व एका मानवी आयुष्यातील काही अटळ गोष्टी आहेत. आणि तरी हे पुरेसं नाही. पण काही विशिष्ट क्षणी सगळं या अध्यात्मिक घरासाठी आतूर झालेलं असतं. 'आपण तिथे परत जायला हवं. जायलाच पाहिजे.' प्लोटिनसला ज्या संघटनाची ओढ होती त्याचा शोध पृथ्वीवर घेण्यात काही गैर आहे काय? इथे संघटन सूर्य आणि समुद्राच्या रूपात पाहायला मिळतं. यातला कटुपणा आणि भव्यता सामावून असलेल्या शरीराच्या जाणिवेतून मनही त्याबद्दल संवेदनशील असतं. मला एवढं कळलंय की, कोणताही अलौकिक आनंद इथे नाहीये, दिवसांच्या येण्याजाण्याव्यतिरिक्त कोणतीही अनंतता नाहीये. या क्षुल्लख आणि आवश्य गोष्टी किंवा ही सापेक्ष सत्यंच मला हलवून सोडतात. इतरांच्या दृष्टीने जी 'आदर्श' सत्यं आहेत, ती समजावून घ्यावीत इतकं आत्मबळ माझ्याकडे नाही. म्हणजे एखाद्याने जनावर असावं असं नाही, पण देवदूतांच्या आनंदात मला काही अर्थच वाटत नाही. मला एवढंच माहितेय की हे आकाश माझ्यापेक्षा जास्त काळ टिकणार आहे. माझ्या मरणानंतर जे सुरू राहाणार आहे ते सोडून कशाला मी अनंतता म्हणू? म्हणजे एखादा प्राणी ज्या परिस्थितीत आहे तिथेच तो समाधानी आहे अशा प्रकारचं चित्र मी रंगवत नाहीये. तो वेगळाच मुद्दा आहे. माणूस असणं हे इतकं सोपं नाहीये, निखळ माणूस असणं तर अजिबातच सोपं नाहीये. निखळ असणं म्हणजे त्या अध्यात्मिक घराचा पत्ता सापडणं - जिथे जगाशी असलेला संबंध समजावून घेता येईल न् जिथे दोन वाजताच्या सूर्याच्या हिंसक धडधडीसोबत नाडीचे ठोके जुळून येतील. आपली मूळ भूमी जेव्हा निसटण्याच्या बेतात असते तेव्हाच तिची जाणीव होते. स्वतःच्याच बाबतीत अवघडलेल्या परिस्थितीत असलेल्यांसाठी त्यांना नाकारणारीच भूमी त्यांची मूळ भूमी असते. मला फार क्रूरपणे किंवा अवास्तवपणे बोलायचं नाहीये. पण शेवटी, ह्या आयुष्यात मला नाकारणारी गोष्टच पहिल्यांदा मला मारत असते. आणि त्याच वेळी जगण्याला एकदम उंचीवर नेणारं जे काही घडतं ते जीवनाची विसंगतता (अब्सर्डिटी) वाढवतं. अल्जेरियातल्या उन्हाळ्यात मला कळलं की, व्यथा सहन करण्यापेक्षा दुःखदायक अशी एकच गोष्ट असते आणि ती म्हणजे आनंदी माणसाचं आयुष्य. पण त्यात बनावटपणा नसल्यामुळे त्यातूनच अधिक उदात्त आयुष्याचा मार्ग सापडू शकतो.

खरं तर बहुतेक जण जीवनाबद्दलच्या प्रेमाचं ढोंग करतात, कारण त्यांना प्रेमापासूनच दूर पळायचं असतं. मौज करण्याचं आणि 'अनुभवांमधे मिसळून जायचं' कौशल्य ते कमावू पाहातात. पण ही फसगत आहे. विषयासक्त होण्यासाठी दुर्मीळ व्यावसायिकता असावी लागेल. माणसाचं जीवन मनाच्या मदतीशिवाय पूर्ण होतं. ते त्याच्यात्याच्या पुढे-मागे होण्यातून, एकाच वेळी एकाकीपणा आणि गर्दीच्या असण्यातून ते पूर्ण होतं असतं. बेल्कोर्ट भागातली ही माणसं काम करताना पाहिली, कोणतीही दूषणं न लावून घेता आपल्या बायकांचं आणि मुलांचं रक्षण करताना पाहिली, की आपल्याला मनातल्या मनात लाज वाटू शकते. मला या गोष्टींबद्दल कोणतीही भ्रामक कल्पना करवत नाही. मी बोलतोय त्या जीवनांमधे फारसं प्रेम नाही. फारसं काही उरतही नाही. पण त्यांनी किमान कशापासून पळ तरी काढलेला नाही. काही शब्दांचे अर्थ मला कधीच कळू शकलेले नाहीत, उदाहरणार्थ - 'पाप'. पण तरी (तोच शब्द वापरून मी म्हणेन की) या लोकांनी जीवनाविरोधात पाप केलेलं नाही. जीवनाविरोधात काही पाप असेल तर ते जीवनाबद्दल निराशा वाटण्यात फारसं नाही, तर दुसरं काहीतरी जीवन असेल याची आशा लावून बसण्यात आणि या जगण्यातल्या उदात्ततेकडे पाठ फिरवण्यात आहे. या लोकांनी बनावटपणा केलेला नाही. कोणतीही आशा नसली तरी ते विशीत असल्यासारखे उत्साहात आहेत. त्यातल्या दोघांना मरताना मी पाहिलंय. ते भ्यायलेले पण शांत होते. पँडोराच्या खोक्यातून ग्रीकांनी मानवजातीची सर्व दुःख बाहेर काढली, सगळ्यात शेवटी त्यांनी आशेला बाहेर काढलं, सर्वांत भीतीदायक दुःख. असलं दुसरं प्रतीक मला माहीत नाही, सर्वमान्यतेला मान न देता सांगायचं तर आशा म्हणजे पळवाट आहे. आणि जगणं म्हणजे पळवाट नाही.

अल्जेरियातल्या उन्हाळ्याचा हा धडा आहे. पण मोसम आता बदलतोय, उन्हाळा संपत आलाय. सप्टेंबरमधे पाऊस सुरू होतो; इतक्या कष्टांनंतर पृथ्वीच्या पहिल्या अश्रूंसारखा तो मोकळेपणाने येतो. जणूकाही या प्रदेशाला नाजूकपणाचाही अनुभव द्यायला हवा असा त्याचा हेतू आहे. त्याच मोसमात अल्जेरियाभर कॅरोब वृक्षांचं पांघरूण प्रेमाचा सुंगध घेऊन पडलेलं असतं. उन्हाळ्याचा ताप सोसलेली पृथ्वी संध्याकाळी किंवा पावसानंतर निवांतपणा अनुभवत असते. आणि परत माणूस आणि पृथ्वीच्या संमीलनाचे वारे वाहू लागतात आणि मग जगातलं खरं सशक्त प्रेम आपल्यात जागृत होतं : क्षणभंगूर आणि उदात्त.

***

विलास सारंग  त्यांच्या 'सिसिफस आणि बेलाक्वा' या सुंदर पुस्तकातल्या काम्यूबद्दलच्या सुंदर लेखात सुरुवातीला काय म्हणतात तेवढंच पाहू आणि थांबू-

आल्बेर काम्यू : 'होय' आणि 'नाहीं' यांमध्ये

संपूर्ण जीवनाला आपण 'होय' म्हणतो की 'नाही' म्हणतो हा कुठल्याहि जीवनविषयक तत्त्वज्ञानाचा पहिला आणि अखेरचा प्रश्न.                                                                                                  - कार्ल यास्पर्स

मी जें प्रायोगिक तत्त्वज्ञान जगतों तें सर्वव्यापी शून्यवादाची शक्यता जमेस धरतें. परंतु याचा अर्थ असा नव्हे कीं तें नकारात्मकच राहातें. उलट तें दुसऱ्या टोकाकडे जाऊ पाहातें-- वजाबाकी, अपवाद आणि निवड यांचा आश्रय न घेता संपूर्ण जीवनाला दिलेल्या एका डायोनिशियन होकाराकडे.                                             - नीत्शे

आपल्या वाङ्मयीन जीवनाच्या प्रारंभींच लिहिलेल्या कांहीं ललित निबंधांमध्यें काम्यू आपल्या मातृभूमीचें - अॅल्जीरियाचे - चित्र उभें करतो. निळें आकाश, निळा समुद्र आणि रखरखीत भूमी ही अॅल्जीरियाची संस्कृती. निसर्गाच्या कुशींत वाढलेल्या अॅल्जीरियन लोकांचें जिणें साधें, ओबडधोबड परंतु तीव्र आहे. जीवनाचा उपभोग घेणें हें त्यांचें एकमेव ध्येय. पण शारीरिक सुखोपभोगांवर पैज मारणाऱ्या या माणसांचें जीवन क्षणभंगुर आहे. निसर्ग त्यांच्यावर सुखाचा वर्षाव करतो, परंतु तोच एकाएकीं सारें हिरावून नेतो. बुद्धीला तुच्छ लेखून शरीराचा धर्म बनविणारें अल्जीरियन जीवन अर्थशून्य का? या मानवी जातीला भूतकाळ नाहीं, परंपरा नाहीं आणि तरीही तिचें जीवन व्यर्थ नाहीं. या लोकांच्या जीवनांत नांवाजण्याजोगें कांहीं नाहीं : 'परंतु निदान त्यांनीं कांहीं टाळण्याचा प्रयत्न केला नाही.' स्वर्गीय सुखाच्या, अनंताच्या खोट्या प्रलोभनांना ते बळी पडलेले नाहींत. ते जाणतात फक्त 'हातानें स्पर्श करतां येतील अशीं सत्यें.' म्हणूनच त्यांचें जीवन आहे 'क्षणभंगुर आणि भव्य.'

काम्यूनें उभारलेलें हें चित्र वास्तव सृष्टींतील अॅल्जीरीयाशीं कितपत जुळतें हा प्रश्न गौण आहे. काम्यूच्या दृष्टींत अॅल्जीरियन भूमि ही विश्वाची छोटी आवृत्ती बनते. मानवी स्थितीचे प्रतीक ठरते.
***

'सिसिफस आणि बेलाक्वा' या पुस्तकाचा आणखी तपशील पाहण्यासाठी - प्रास प्रकाशन - या लिंकवर एकदम तळात पाहा.

3 comments:

  1. "There is just one truly important philosophical question: suicide. To decide whether life is worth living is to answer the fundamental question of philosophy. Everything else … is child’s play; we must first of all answer the question.” (The Myth of Sisyphus)

    And after 52 years, I still don't have that answer!

    And I completely understand why a deeply sensitive man like Sane-guruji committed suicide. It takes away nothing for all that he stood for his entire life.

    "Shyamchi-aai" becomes even more moving. Once I cried my heart out when I watched the movie and read the book, now it comes across as a beautiful sunset.

    ReplyDelete
    Replies
    1. Camus in 'The Rebel' : ''... murder and suicide are one and the same; either accept them both or reject them both''. And he of course prefers rejecting both because 'as a man his preference is for happiness'.

      Delete
  2. तुझा काम्यू मला कधीच कळला नाही..हे थोडंसं (थोडंसंच हं!) डोक्यात शिरतंय असं वाटलं.

    ReplyDelete