साने गुरुजी : २४ डिसेंबर १८९९ ते ११ जून १९५०
साने गुरुजींनी 'साधना' साप्ताहिकाचा पहिला अंक १५ ऑगस्ट १९४८ रोजी प्रसिद्ध केला. या अंकातल्या संपादकीयातला शेवटचा भाग 'रेघे'वर आज साने गुरुजींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने नोंदवूया. मूळ पूर्ण संपादकीय
इथे सापडेल.
***
साधना
स्वराज्य आले. गांधीजी मागील वर्षी म्हणाले, ''स्वराज्य आले म्हणतात, मला तर ते दिसत नाही. भाऊ भावाचा गळा कापीत आहे. हे का स्वराज्य? स्वराज्य म्हणजे का माणुसकीचा अस्त, संस्कृतीला तिलांजली?'' स्वराज्याच्या महान साधनाने आपण मानव्य फुलवायचे आहे. संस्कृती समृद्ध करायची आहे. त्यासाठी अखंड साधना हवी. जीवन अनेकांगी आहे. जीवनाच्या क्षेत्रात, सर्व व्यवहारांत आपण साधकाच्या वृत्तीनेच वागण्याची धडपड केली पाहिजे. यालाच पुरुषार्थ म्हणतात. उत्तरोत्तर अधिक चांगले होण्याची खटपट करणे. एका अमेरिकन लेखकाने 'पुन्हा धर्माकडे' म्हणून एक सुंदर अनुभवजन्य पुस्तक लिहिले आहे. त्यांत त्याने 'बेटरिझम' असा शब्द योजिला आहे. 'बेटरिझम' म्हणजे माणसाने मी चांगला होईन, अधिक चांगला होईन, हा ध्यास घेणे. चांगले कसे होता येईल? जीवन अधिक समृद्ध, अंतर्बाह्य संपन्न कसे करता येईल? 'मी आणि माझे' हे तुणतुणे दूर करून दुसऱ्यांच्या सुखदुःखाचा जेव्हा आपण विचार करू, सेवा करू, अधिक लोकांशी मिसळायला लागू; तेव्हा दुसऱ्याचे चांगले ते घेऊ, सर्वांचे स्वागत करू, अधिक चांगले होण्याचा मार्ग लाभेल. भारतीय जनतेला हे शिकायचे आहे. येथे अनेक प्रांत, अनेक भाषा, अनेक जातिजमाती, अनेक धर्म यांचा संगम आहे. विनोबाजी दिल्लीला गांधीजींच्या चौथ्या मासिक श्राद्धदिनी म्हणाले, ''रामराज्याचे वर्णन तुलसीदासांनी पुढीलप्रमाणे केले आहे :
वैर न कर काहू सन कोई राम-प्रताप विषमता खोई
वैराचा अभाव आणि विषमता नसणे, ही रामराज्याची दोन लक्षणे होत. हीच व्याख्या गांधीजींनीही केली होती. पण त्यांनी पाहिले, की तिला क्वचितच तुलना असेल. हे पाहून स्वाभाविकच गांधीजी दुःखी राहात. स्वराज्याची ही दोन्ही लक्षणे पूर्णपणे आपण सिद्ध केली पाहिजेत. हिंदुस्थानात इतके विविध समाज राहात आहेत; ते मित्र-भावाचा पाठ शिकण्यासाठी आहेत, असे आपण समजावे. आपल्या उदार संस्कृतीचा हा बोध जर आपण घेतला तर वैरभावही नाहीसा होईल आणि विषमताही नष्ट होईल.''
वैरभाव नि विषमता नष्ट करण्याची थोर साधना आपणास करावयाची आहे. हे साधना साप्ताहिक या ध्येयाने जन्मत आहे. किती तरी दिवसांपासून हे साप्ताहिक निघेल निघेल म्हणून मित्र वाट पाहात होते. मध्यंतरी सायंदैनिक 'कर्तव्य'च क्षणभर जन्माला आले. ते बंद करून त्याचेच प्रातःदैनिक करण्याची आकांक्षा होती. स्वतःचा छापखाना असल्याशिवाय दैनिक काढणे अशक्य. म्हणून त्या खटपटीला लागलो. कसाबसा छापखाना उभा केला आहे. परंतु दैनिक आज नीट सुरू करण्याइतकी शक्ती नाही. तेव्हा सध्या साप्ताहिक 'साधना' सुरू करून समाधान मानीत आहे. हे जर स्वावलंबी झाले, छापखानाही जरा वाढला, सुरळीत चालू लागला, साधनसामुग्री जर वाढली तर 'कर्तव्य' दैनिक केव्हा तरी सुरू करण्याची मला तळमळ तर आहे. तोवर मित्रांनी या साप्ताहिकालाच आधार द्याव, नि प्रभूने आशीर्वाद द्यावा, अशी प्रार्थना आहे.
साधनेचे स्वरूप
या साप्ताहिकाचे स्वरूप कसे असेल? निरनिराळ्या भाषांतील मोलवान प्रकार येथे तुम्हांला दिसतील. भारतातील प्रांतबंधूंची येथे प्रेमाने ओळख करून देण्यात येईल. देशातील नि जगातील नाना संस्कृतींचे रंग नि गंध तुम्हांला दाखवण्यात येतील, देण्यात येतील. नाना धर्मांतील सुंदरता, उदात्तता यांची येथे भेट होईल. शेतकरी, कामगार, यांच्या जगातही आपण येथे वावरू. त्यांचे प्रश्न चर्चू, त्यांची स्थिती समीक्षू. शिक्षणाच्या क्षेत्रातही आपण जाऊ. मुलांच्या संगतीत रमू. ती आपल्याला गोष्टी-गंमती सांगतील; आपण त्यांना सांगू. समाजात अनेक अज्ञात माणसे सेवा करून समाजवृक्षाला ओलावा देत असतात. त्यांच्या हकीगती येथे येत जातील. कधी येथे प्रश्नोत्तररूप महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा आढळेल. गंभीर विषयांवरचे निबंध येतील. सुंदर गोष्टी वाचायला मिळतील. कधी आपण साहित्याच्या मंदिरात दर्शनाला जाऊ, कधी विज्ञानाला पराक्रमी कथा ऐकू. कधी निर्मळ समाजवादाचे उपनिषद वाचू. मनात कितीतरी आहे. जेवढे जमेल तेवढे करीन. ते गोड करून घ्या. 'कर्तव्य' लवकर बंद पडले. 'साधना' साप्ताहिकाची तरी काय शाश्वती? प्रभूची इच्छा प्रमाण. ज्याला दोन दिवसच सेवा करता आली, त्याची तेवढीच गोड माना. असे नका म्हणू, हे आरंभशूरत्व आहे. म्हणा, की ही धडपड करतो. राहवत नसते म्हणून माणूस धडपड करतो; परंतु कोणी काही म्हणतो. आशेने 'साधना' साप्ताहिक आज स्वातंत्र्याच्या प्रथम वाढदिवसाच्या सुमुहूर्ताने मी सुरू तर करीत आहे. जोवर शक्ती असेल तोवर 'साधना' टिकेल. आसक्ती कशाचीच नको.