आजच्या नोंदीचं निमित्त म्हणजे वर्षानुवर्षं अधूनमधून होणाऱ्या निवडणुका, भाषणं, सामाजिक चळवळी, इत्यादी गोष्टी. आता २०१४ला लोकसभेच्या निवडणुका होतील, भाषणं तर रोजच होत असतात, चळवळीही होत असतील काय माहीत. हे सगळं एका बाजूने सुरू असताना आपण इथे 'रेघे'वर जो गुन्हा करू घातलाय, त्यामध्ये आज सह-गुन्हेगार म्हणून गो. रा. खैरनार यांना बोलावलेलं आहे. आठवण ठेवाव्या अशा काही गोष्टी आणि माध्यमांबद्दलचा एक लहानसा भाग असं नोंदीचं स्वरूप आहे. खरंतर यातल्या पहिल्या भागाच्या संदर्भात - वृत्तपत्रांनी, साप्ताहिकांनी, मासिकांनी 'विसरू नयेत अशा गोष्टी' असं एखादं सदर का सुरू करू नये. आपण आपल्या मर्यादेत तशा प्रकारची ही नोंद 'रेघे'वर 'गोंगाटावरचा उतारा' आणि 'माध्यमं' या विभागांखाली करूया.
एक
गोविंद राघो खैरनार हे नाव ऐंशी-नव्वदच्या दशकांमध्ये मुंबईत राहिलेल्या बहुतेकांना आठवू शकेल. आपण किमान नव्वदीच्या मधल्या वर्षांचं खात्रीने स्वतःच्या बळावर सांगू शकतो आणि ऐंशीमधलं अंदाजाने. गो. रा. खैरनार हे तेव्हा बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त होते आणि काही काळ वृत्तपत्रांमधून गाजणारे शब्दश: 'हिरो' होते. त्यांच्या हिरो होण्यामागच्या गोष्टीही तशाच होत्या. कधी दाऊद इब्राहिमच्या अनधिकृत बिल्डिंगवर हातोडा चालवणं, कधी तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्या विरोधात ट्रकभर पुरावे आणण्याची धमकी देणं, शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे यांची खरीखुरी किंमत करणं, वगैरे अनेक गोष्टी ह्या मागे असतील. तर खैरनार हिरो होते. मध्यंतरी अजिबातच त्यांचा वावर नव्हता. अगदी अलीकडचे माध्यमांमधले त्यांचे उल्लेख म्हणजे अण्णा हजारे यांच्याबद्दल ते अगदीच खरं बोलले होते तेव्हाचा आणि गोळीबार परिसरातील झोपडपट्टीसंबंधीच्या मेधा पाटकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचा. शिवाय 'लोकसत्ते'च्या गेल्या वर्षीच्या दिवाळी अंकात त्यांच्यावर मुलाखतपर लेख आला होता. खैरनारांचा आणि 'रेघे'वर आपण जे विषय बोलतो त्यांचा काय संबंध, असा एक प्रश्न. ह्याचं उत्तर खैरनारांच्या 'एकाकी झुंज' या आत्मचरित्रात आहे. त्यामुळे त्या पुस्तकात जाऊ.
'आमच्या घराण्यात आई-वडील किंवा अन्य कोणी पूर्वी कधी शाळेत गेले नसावेत. माझ्या पिढीत माझ्या घरात मी सोडून कोणीही शिकलेले नाही', असं लिहिणारे खैरनार आपल्या अनुभवातून काही गोष्टी शिकत गेले आणि त्या फारच स्पष्टपणे बोलत गेले नि त्यानुसार वागत गेले. त्याबद्दल त्यांनी 'एकाकी झुंज'मधे लिहिलंय. खैरनार मूळचे नाशिक जिल्ह्यातल्या कळवण तालुक्यातल्या पिंपळगाव (वारवारी) या गावचे. तिथून मग शिकले नि मुंबईत नोकरीला आले. त्यांच्याविषयीच्या कथा / दंतकथा मुंबईतल्या मध्यमवर्गीय व त्या खालील आर्थिक गटांच्या घरांमधे सांगितल्या जाण्याचा एक काळ होता. अजूनही तुरळक ते होत असेल, माहीत नाही. पण नव्वदच्या दशकाच्या मधल्या वर्षांमधे खैरनार फारच लोकप्रिय होते. नव्वदच्या दशकातल्या त्या काळाला आता जेमतेम वीसेक वर्षं होत आल्येत, त्यामुळे अजून काही लोकांच्या आठवणीत खैरनार आहेत / असतील / असायला हवेत / असायला हरकत नाही. तसं 'एकाकी झुंजी'त पुस्तक म्हणून काही त्रुटी सापडू शकतील. पहिलं प्रकरण कौटुंबिक पार्श्वभूमी-बालपण-शाळा-कॉलेज असं एकदम फास्ट जातं आणि दुसऱ्या प्रकरणापासून लगेच
महानगरपालिकेतली नोकरी नि अनधिकृत बांधकामांच्या तोडफोडीचा भाग सुरू होतो.
मधे काही सांधाच जोडला गेला नाहीये. शिवाय बहुतेकसं पुस्तक हे घटनांची साखळी असल्यासारखं आहे, त्याने थोडासा तुटकपणाही आलाय. पण तरी ठीक आहे. आपण त्यातलं आपल्याला काय नोंदवायचंय ते पाहू. आधी उल्लेख येऊन गेलाय, त्यानुसार खैरनार अनधिकृत बांधकामांविरुद्धच्या कारवाईमुळे विशेष गाजले. त्यातही 'शक्यतोवर जे ठिकाण कुटुंब किंवा केवळ निवास करण्यासाठी वापरात असेल अशा ठिकाणची तोडफोड करावयाची नाही. लोकांचे आश्रयस्थान - मग ते अगदी बेकायदेशीर असले तरी - उद्ध्वस्त करू नये असे माझ्या मनाने घेतले. केवळ जनहिताखातर काही अपवाद सोडले तर जीवनभर मी ते तत्त्व पाळले' असं कळायला लागल्यावर खैरनार जास्त काळजीने काम करू लागले.
खैरनारांनी त्यांच्या या आत्मचरित्रामध्ये काही राजकीय व्यक्ती, काही गुंड व्यक्ती, काही सामाजिक कार्यकर्तेपणा करणाऱ्या व्यक्ती यांच्याशी आलेल्या संपर्काबद्दल, त्यातल्या धोक्यांबद्दल प्रामाणिकपणे सांगून टाकलेलं आहे. यात १९८०च्या दशकातला प्रसिद्ध गुंड वरदराजन मुदलियार आणि विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल हनुमान मंदिर बांधण्यासाठी कसे एकत्र येतात, माजी पंतप्रधान राजीव गांधी धारावीमधे सभा घ्यायला येतात तेव्हा स्टेजवर पहिल्या रांगेतच वरदराजन कसा मानाने बसलेला असतो, तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा सावत्र मुलगा असलेल्या व्यक्तीचं हॉटेल वाचवण्यासाठी काय काय हालचाली केल्या जातात, वगैरे अनेक रोचक किस्से सापडतील. यातला एक रोचक किस्सा खैरनारांच्याच शब्दांमधे नोंदवायचा झाला तर हा पाहा : (वरती लिहिलंय त्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचं बांधकाम तोडण्याच्या संदर्भातला, १९८५मधला) :
आता शरद पवार यांच्याकडे येऊ. कारण, खैरनार २९ जून १९९४ला निलंबित झाले, ते पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात. भाषांतराला वाहिलेलं एखादं त्रैमासिक, समाजाभिमुख पत्रकारितेचा दावा करणाऱ्या संस्थेच्या हातून घडणारा दिवाळी अंक, श्री. व्यं. केतकरांच्या ज्ञानकोशाचं संकेतस्थळ, धर्मानंद कोसंबींचं दस्तावेजीकरण करणारं संकेतस्थळ इथपासून ते अनेक शैक्षणिक संस्था नि आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळापर्यंत कुठेही शरद पवार यांची आर्थिक किंवा केवळ हितसंबंधीय मुळं पसरलेली सर्वसामान्य नजरेला दिसतात. अशा पवारांविरोधात ट्रकभर पुरावे आणून दाखवतो असं खैरनार बोलले होते. ते काही शक्य झालं नाही, त्याबद्दलही एक लहानसं प्रकरण या पुस्तकात आहे. आणि त्यात काही कमी-जास्त असेलही, पण खैरनारांनी या सगळ्याच्या आधारावर स्वतःची सामाजिक दुकानी संस्था काढली नाही, की पत्रकारांसारखं याच्या पाठी उभं राहून त्याच्यावर टीका कर असंही केलं नाही. हेही काही कमी नाही. कारण कोणी संपादक एकीकडे मुंबईच्या डिएन्टलेक्चुअलायझेशनवर पुस्तकं लिहून दुसरीकडे पवारांवरची पुस्तकं संपादित करतात, त्या पार्श्वभूमीवर खैरनारांनी दाऊदच्या प्रगतीसंदर्भात पवारांविरोधात स्पष्ट बोलणं म्हणजे फारच विशेष. काय बोलले खैरनार, तर हे :
दोन
खैरनारांच्या प्रसिद्धीमागे अर्थातच पत्रकारांचा मजबूत हात होता. 'खैरनार' या शब्दाला प्रचंड लोकप्रियता आणि वलय मिळालं ते पेपरांमुळेच. याबद्दल खैरनारांनी पुस्तकात कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. ते म्हणतात :
आपण काय करू शकतो? तर, खैरनारांचं पत्रकारांबद्दलचं मत मांडणारा वरचा परिच्छेद पुस्तकात येतो त्याच्या दोनेक पानं आधी आलेला उल्लेख नोंदवू शकतो. हा उल्लेख असा आहे :
एक
गोविंद राघो खैरनार हे नाव ऐंशी-नव्वदच्या दशकांमध्ये मुंबईत राहिलेल्या बहुतेकांना आठवू शकेल. आपण किमान नव्वदीच्या मधल्या वर्षांचं खात्रीने स्वतःच्या बळावर सांगू शकतो आणि ऐंशीमधलं अंदाजाने. गो. रा. खैरनार हे तेव्हा बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त होते आणि काही काळ वृत्तपत्रांमधून गाजणारे शब्दश: 'हिरो' होते. त्यांच्या हिरो होण्यामागच्या गोष्टीही तशाच होत्या. कधी दाऊद इब्राहिमच्या अनधिकृत बिल्डिंगवर हातोडा चालवणं, कधी तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्या विरोधात ट्रकभर पुरावे आणण्याची धमकी देणं, शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे यांची खरीखुरी किंमत करणं, वगैरे अनेक गोष्टी ह्या मागे असतील. तर खैरनार हिरो होते. मध्यंतरी अजिबातच त्यांचा वावर नव्हता. अगदी अलीकडचे माध्यमांमधले त्यांचे उल्लेख म्हणजे अण्णा हजारे यांच्याबद्दल ते अगदीच खरं बोलले होते तेव्हाचा आणि गोळीबार परिसरातील झोपडपट्टीसंबंधीच्या मेधा पाटकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचा. शिवाय 'लोकसत्ते'च्या गेल्या वर्षीच्या दिवाळी अंकात त्यांच्यावर मुलाखतपर लेख आला होता. खैरनारांचा आणि 'रेघे'वर आपण जे विषय बोलतो त्यांचा काय संबंध, असा एक प्रश्न. ह्याचं उत्तर खैरनारांच्या 'एकाकी झुंज' या आत्मचरित्रात आहे. त्यामुळे त्या पुस्तकात जाऊ.
पुष्प प्रकाशन । पहिली आवृत्ती : नोव्हेंबर १९९८ |
खैरनारांनी त्यांच्या या आत्मचरित्रामध्ये काही राजकीय व्यक्ती, काही गुंड व्यक्ती, काही सामाजिक कार्यकर्तेपणा करणाऱ्या व्यक्ती यांच्याशी आलेल्या संपर्काबद्दल, त्यातल्या धोक्यांबद्दल प्रामाणिकपणे सांगून टाकलेलं आहे. यात १९८०च्या दशकातला प्रसिद्ध गुंड वरदराजन मुदलियार आणि विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल हनुमान मंदिर बांधण्यासाठी कसे एकत्र येतात, माजी पंतप्रधान राजीव गांधी धारावीमधे सभा घ्यायला येतात तेव्हा स्टेजवर पहिल्या रांगेतच वरदराजन कसा मानाने बसलेला असतो, तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा सावत्र मुलगा असलेल्या व्यक्तीचं हॉटेल वाचवण्यासाठी काय काय हालचाली केल्या जातात, वगैरे अनेक रोचक किस्से सापडतील. यातला एक रोचक किस्सा खैरनारांच्याच शब्दांमधे नोंदवायचा झाला तर हा पाहा : (वरती लिहिलंय त्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचं बांधकाम तोडण्याच्या संदर्भातला, १९८५मधला) :
त्याच सुमारास शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे यांनी मला मातोश्री बंगल्यावर कार्यालयीन कामासंदर्भात चर्चेसाठी भेटण्यास बोलावले. त्यावेळी ठाकरेंनी बोलावल्यास, आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्त त्यांच्या बंगल्यावर कामकाजानिमित्त भेटत असत किंवा संबंधित अधिकाऱ्यांना चर्चेसाठी पाठवत असत. त्यामुळे बोलावल्यानुसार त्यांच्याकडे जाण्याची प्रथो होती त्याप्रमाणे मी भेटासाठी गेलो. आदर सत्कार झाला. त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना बोलावले. ''अहो, आपल्याकडे खैरनार आले आहेत, इकडे या.'' ठाकरे मोठ्या आवाजात आवर्जून त्यांच्या कुटुंबियांना सांगत होते. सर्वजण आले. मीना ठाकरे पण होत्या. त्यांना ते सांगत होते, ''हेच ते खैरनार. फेरीवाल्यांच्या विरुद्ध जोरदार कारवाई करतात. बरेच गाजतात.''हा प्रसंग कदाचित काहींना माहीत असेलही, पण जरा मधेमधे परत आठवण करायला काय हरकत आहे. काही महिन्यांपूर्वीच खरंतर खैरनारांनी 'आयबीएन-लोकमत'वर ही आठवण दिली होती. पुस्तक तसं खूपच आधी आलंय, पण तेव्हा खैरनारांच्या या आठवणीसंबंधी 'सामना'मध्ये काही शिवीगाळ आली होती किंवा कसं ते आपण 'रेघे'तर्फे तरी तपासू शकलेलो नाही. ठाकऱ्यांच्या पुढच्या पिढीच्या भाषणाला लाखांची झुंड जमत असते अधूनमधून, म्हणून आपण आपलं इथे हे नोंदवून ठेवलं.
''मी त्यांना ओळखते.'' मीना ठाकरे प्रतिसाद देतात. ओळख-पाळख संपते. सर्वांना तेथून जाण्यास सांगण्यात येते. मग आमचे बोलणे सुरू होते.
ठाकरे : खैरनार म्हणजे आपण कोण?
मी : कोण म्हणजे?
ठाकरे : नाही म्हणजे तुम्ही कुठल्या जातीचे आहात?
मी : जातीचा काय संबंध? मी जातपात मानत नाही. त्यामुळे माझी जात सांगणे वा दुसऱ्याची जात विचारणे मला आवडत नाही. आपलं काय काम आहे ते सांगा.
ठाकरे : काल मला मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बंगल्यावर बोलावले होते. ते माझे जुने स्नेही आहेत. ते माझ्या शिवसेनेसाठी पार मदत करतात. त्यांच्या सहकार्याशिवाय पक्ष सांभाळणे कठीण आहे. आपल्याविषयी तेथे चर्चा झाली. तुम्हाला धडा शिकवण्याचे आदेश त्यांनी मला दिले. त्यांचे आदेश मी दुर्लक्षित करू शकत नाही.
मी : मला धडा शिकवण्याचं कारण? मी काय केलंय त्यांचं? तसा त्यांचा माझा काही संबंधही आलेला नाही. मग त्यांच्या रागाचं कारण काय?
ठाकरे : तुम्ही धडाकेबाज काम करताहात. मलाही तुमचं काम पसंत आहे. काही बाबतीत तुमचं काम माझ्या मनाविरुद्धही आहे. त्यामुळे मला आवडत नाही. माझी अडचण होते. परंतु तुमच्या शौर्याला मी दाद देतो. तुमच्यावर मी खुश आहे. तुम्ही चांगले अधिकारी आहात आणि मराठी पण आहात. त्यामुळे तुम्हाला मारायला माझं मन होत नाही. म्हणून मी तुम्हाला मुद्दाम चर्चेसाठी बोलावले आहे. आपण खालच्या जातीचे किंवा बुद्ध नसाल तर मी मुख्यमंत्र्यांना त्याप्रमाणे समजावून सांगू शकेन व अप्रिय घटना टाळू शकेन.
आता शरद पवार यांच्याकडे येऊ. कारण, खैरनार २९ जून १९९४ला निलंबित झाले, ते पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात. भाषांतराला वाहिलेलं एखादं त्रैमासिक, समाजाभिमुख पत्रकारितेचा दावा करणाऱ्या संस्थेच्या हातून घडणारा दिवाळी अंक, श्री. व्यं. केतकरांच्या ज्ञानकोशाचं संकेतस्थळ, धर्मानंद कोसंबींचं दस्तावेजीकरण करणारं संकेतस्थळ इथपासून ते अनेक शैक्षणिक संस्था नि आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळापर्यंत कुठेही शरद पवार यांची आर्थिक किंवा केवळ हितसंबंधीय मुळं पसरलेली सर्वसामान्य नजरेला दिसतात. अशा पवारांविरोधात ट्रकभर पुरावे आणून दाखवतो असं खैरनार बोलले होते. ते काही शक्य झालं नाही, त्याबद्दलही एक लहानसं प्रकरण या पुस्तकात आहे. आणि त्यात काही कमी-जास्त असेलही, पण खैरनारांनी या सगळ्याच्या आधारावर स्वतःची सामाजिक दुकानी संस्था काढली नाही, की पत्रकारांसारखं याच्या पाठी उभं राहून त्याच्यावर टीका कर असंही केलं नाही. हेही काही कमी नाही. कारण कोणी संपादक एकीकडे मुंबईच्या डिएन्टलेक्चुअलायझेशनवर पुस्तकं लिहून दुसरीकडे पवारांवरची पुस्तकं संपादित करतात, त्या पार्श्वभूमीवर खैरनारांनी दाऊदच्या प्रगतीसंदर्भात पवारांविरोधात स्पष्ट बोलणं म्हणजे फारच विशेष. काय बोलले खैरनार, तर हे :
मुंबईत आल्यानंतर खास करून महापालिकेच्या सेवेत मी जे अनेक वर्षे अनुभवत होतो त्याचा स्फोटक अनुभव मला उपायुक्त म्हणून दाऊदचे साम्राज्य उद्ध्वस्त करताना आला. दाऊदने माझी कारवाई थांबविण्यासाठी शरद पवारांना पंचेचाळीस कोटी रुपये देऊ केले होते अशी अफवा होती. अफवा शब्द अशासाठी वापरतो की, ज्याच्या आधारे आपण कायद्याच्या कसोटीवर उतरू शकतो अशी ठोस माहिती व सबळ पुरावे आपल्याकडे नसतात.खरं तर आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही आता. आपण नोंदीचा पहिला भाग इथेच संपवू आणि दुसऱ्या, माध्यमांविषयीच्या भागाकडे जाऊ.
...
मध्यंतरीच्या काळात मेमन व दाऊदचे नाव बॉम्बस्फोटाच्या (१९९३) संदर्भात घेतले गेल्याने त्यांच्याविरुद्ध व त्यांच्या संपत्तीविरुद्ध कारवाई करण्यासंबंधात प्रश्न उपस्थित करण्यात आले. मुख्यमंत्री शरद पवार यांनी दाऊद इब्राहिमची कसलीही मालमत्ता मुंबई अथवा महाराष्ट्रात नसल्याचे व त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही असे जाहीर केले. त्यापूर्वीच मी शासनाला दाऊदचे गुंड व मालमत्तेची यादी सादर केली होती. शरद पवारांच्या विधानाला उत्तर म्हणून मी पत्रकारांना दाऊदची मालमत्ता असल्याचे जाहीर केले व अप्रत्यक्षपणे पवार खोटे बोलतात असे सुचवले. मी दिलेली यादी, दाऊदची मालमत्ता असल्यासंबंधीचे माझ्या दप्तरी असलेले पोलिसांचे पत्र, दाऊदच्या पत्नीच्या नावावर असलेली व उद्ध्वस्त केलेली इमारत, त्याचे भाऊ - आई- बहीण यांच्या नावावर असलेली मिळकतीची माझ्या यादीत दिलेली माहिती, या सर्वांचा विचार करता शरद पवारांनी अशा प्रकारचे विधान का करावे याचे आश्चर्य वाटते.
दोन
खैरनारांच्या प्रसिद्धीमागे अर्थातच पत्रकारांचा मजबूत हात होता. 'खैरनार' या शब्दाला प्रचंड लोकप्रियता आणि वलय मिळालं ते पेपरांमुळेच. याबद्दल खैरनारांनी पुस्तकात कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. ते म्हणतात :
... सुरुवातीच्या काळात पेपरमध्ये, टीव्हीवर नाव वा बातमी आल्याने मन सुखावत असले तरी त्यासाठी धडपड करण्याची वा पत्रकारांना, प्रचारमाध्यमांना 'माझे हे छापा' असे सांगण्याची कधी इच्छा झाली नाही. अर्थात प्रसारमाध्यमात बातम्या आल्याने लोकजागृती होऊन समाजहित साध्य होण्याच्या दृष्टीने प्रसारमाध्यमांशी सलोख्याचे किंवा जवळकीचे संबंध असणे किती फायदेशीर आहे याची जाणीव झाल्यानंतर पत्रकार माझे खरे तर जिवाभावाचे मित्र झाले. पत्रकारांपेक्षा ते सामाजिक कार्यकर्ते वाटू लागले व त्यांच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन पार बदलला. अडीअडचणींच्या काळातही मला पत्रकारांनी मदत केली. मी जो काही आहे, जीवघेण्या हल्ल्यांपासूनही बचावलो आहे, स्पष्टच बोलायचे तर माझे अस्तित्व हेच मुळी पत्रकारांमुळे टिकून राहिले आहे. प्रसारमाध्यमांना मर्यादा असते. मालकांची-संपादकांची बंधने असतात. संपादकांना आपली नोकरी टिकवायची असते व वृत्तपत्रही बंद पडू न देण्याची काळजी घ्यायची असते. मालकाची ध्येय-धोरणे राबवायची असतात आणि या सर्व गुंतागुंतीतून वाचकांचे आकर्षण टिकवून ठेवायचे असते. त्यात संपादकांना तारेवरची कसरत करावी लागते. खास करून सिद्धांतवादी, जनहितवादी, प्रामाणिक संपादकांची तर फारच कुचंबणा होत असते. लोकशाही राज्याचा चौथा स्तंभ मानल्या गेलेल्या प्रसारमाध्यमाच्या अनेक संपादकांना, मुख्य पत्रकारांना स्वातंत्र्याचा उद्घोष करीत असताना स्वतःच्या स्वातंत्र्यावर तुळशीपत्र ठेवावे लागते. त्यामुळे सर्व अडी-अडचणी असतानाही सर्वच वृत्तपत्रांनी वेळोवेळी फार मोठ्या प्रमाणात मला साथ दिली. इंग्रजी, मराठी, गुजराथी, हिंदी व इतर समाचारपत्रांनी भक्कम साथ दिली. राजकीय व खास करून पवारांच्या नंतरच्या दबावामुळे तसेच ठाकरेंच्या ठाकरेशाहीमुळे अनेकांना आपला पवित्रा नंतरच्या काळात बदलावा लागला. त्यातही मराठी वृत्त-व्यवसायाला दबाव जास्त जाणवला असणार.हे अगदीच खरं आहे. अगदी पुस्तकात दिलेलं नाव घेऊन बोलायचं झालं तर 'लोकसत्ते'मधे नव्वदच्या दशकात काम केलेली कोणी वरिष्ठ पत्रकार व्यक्ती असेल तर ती खैरनारांच्या वरच्या परिच्छेदात 'स्वातंत्र्य' शब्दाचे जे काही अर्थ अपेक्षित आहेत त्यावर जास्त चांगलं काही सांगू शकेल. आणि आपण हे अजिबातच टिंगलीच्या सुरात बोलत नसून खरोखरच तेव्हाची काही मंडळी हे खाजगीत सांगू शकतील. पण सांगून काय होईल? उत्तर नसलेल्या प्रश्नांपैकीच आहे हे सगळं. आपण इथे १९९१नंतरच्या काही वर्षांमधल्या 'लोकसत्ते'विषयी बोलतोय आणि हे संपादकांशी संबंधित आहे. कारण त्याआधी संपादक वेगळे होते. शिवाय वैयक्तिक पातळीवर काम पाहिलं तर 'लोकसत्ते'सह बहुतेक पत्रकारांनी आपल्याला मदत केली असं खुद्द खैरनारच म्हणतायंत. ऐंशीच्या दशकात 'लोकसत्ते'ने पहिल्या पानावर खैरनारांचा फोटो छापलेला वगैरे उल्लेखही पुस्तकात आहे. आणि ते सगळं खरंच आहे. याची काही वेगळी बाजू असेल तरी तेव्हा प्रत्यक्ष बातमीदारी किंवा उप-संपादकी कामं केलेलं कोणी त्यावर बोलू शकतं. आपण नाही.
आपण काय करू शकतो? तर, खैरनारांचं पत्रकारांबद्दलचं मत मांडणारा वरचा परिच्छेद पुस्तकात येतो त्याच्या दोनेक पानं आधी आलेला उल्लेख नोंदवू शकतो. हा उल्लेख असा आहे :
वृत्तपत्र माध्यमांद्वारे मुख्यमंत्री शरद पवार हे एक कार्यक्षम, कार्यकुशल, प्रशासनावर पकड असलेले, महाराष्ट्राच्या समस्यांची जाण असलेले व महाराष्ट्राची शान असलेले मुख्यमंत्री आहेत अशी प्रतिमा अनेक वर्षांच्या मेहनतीतून तयार झाली होती. त्यांच्याशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही, त्यांच्या तोडीचा तसा दुसरा नेता नाही. महाराष्ट्राची प्रगती, गती व समृद्धी पवारच करू शकतील असा सर्वत्र समज पसरविण्याचे काम जास्त करून वृत्तपत्रांनी केलेले होते. अर्थात भाई ठाकूर, पप्पू कलानी, अरूण गवळी, दाऊद व तशाच खतरनाक गुन्हेगारांशी असलेले सख्य, राजकारणातील चलाखी किंवा छलकपट यांचाही अप्रत्यक्षपणे ओझरता का होईना वृत्तपत्रातून अधून मधून उल्लेख होई.
काही वृत्तपत्रे, साहित्यिक, व्यापारी, उद्योगपती यांच्या दृष्टीने पवारांची प्रतिमा जरी महान व कुशल नेत्याची असली तरी जनमानसांतील त्यांची छबी मलीन होती.यावर काही बोलण्याची गरज नाहीये बहुधा. प्रतिमा, मग ती खैरनारांची असो की पवारांची, तिच्या घडण्यामध्ये प्रसारमाध्यमांचं महत्त्व किती आहे ही सगळ्यांना माहीत असलेलीच गोष्ट परत नोंदवण्यासाठी आपण हा एवढा खटाटोप केला. खैरनारांची मतं ही मुख्यत्त्वे स्वतःच्या अनुभवातून आलेली आहेत. त्यामुळे त्यांचं सगळं पटावं असं नाही, कारण एकाच वेळी एकदम स्पष्ट आणि दुसऱ्या वेळी एकदम स्वप्नाळू असं काही त्यातून दिसतंय, पण तरी खैरनारांना अनुभवातून माध्यमांबद्दल काय वाटलं आणि त्यांची काय समजूत झाली याची नोंद करायला हवी, म्हणून एवढं तपशिलात त्यांच्या पुस्तकाबद्दल आपण बोलतोय. खैरनारांनी 'प्रसारमाध्यमांचे महत्त्व' असा एक लहानसा भागही पुस्तकाच्या शेवटी टाकलाय, त्यात ते म्हणतात :
प्रसारमाध्यमांना कधी छपाईसाठी मिळणाऱ्या कागदाच्या पुरवठ्यासाठी तर बहुधा सत्ताधाऱ्यांच्या ओळखीने मिळणाऱ्या जाहिरातींसाठी वा इतर अनेक सोयी सुविधा पदरात पाडून घेण्यासाठी पत्रकारांच्या लेखणीची धार प्रस्थापित तत्वांच्याबाबत लिहिताना बोथट होते. उलट समाजाला पद्धतशीरपणे लुटणाऱ्या, फसवणाऱ्या, समाजद्रोही व राष्ट्रद्रोही तत्वांना ही प्रसारमाध्यमे उचलून धरतात व छळ, पाखंड, चोर, व्यभिचारी, अनितीमान माणसांचा खोटा आदर्श समाजमनामध्ये तयार करून समाजाची फसवणूक करत असतात. त्यासाठी सत्य शोधून न काढता नेहमी असत्याचाच जास्त आसरा घेतात. प्रामाणिक, तळमळीने काम करणाऱ्यांवर, सरळ मार्गाने जाणाऱ्यांवर वा लोकांचे योग्य प्रबोधन करणाऱ्यांवर मात्र टिकेची झोड उठवून कुठल्या तरी काल्पनिक मुद्द्यावर अशा व्यक्तींना समाजातून हद्दपार करण्यासाठी कोल्हेकुई करत असतात.अर्थात माझे वरील विचार माझ्या अनुभूतीवर आधारीत असले तरी या सर्व तंत्र बिघडलेल्या समाजातही प्रसारमाध्यमांची एक प्रकारे महत्त्वाची भूमिकाही आहे. लोकशाहीचे इतर सर्व महत्त्वाचे खांब खिळखिळे झाले असले तरी प्रचारमाध्यमांचा खांब किडलेला असूनही लोकशाहीच्या संरक्षणासाठी काही मर्यादित स्वरूपात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. सामान्य जनतेचे काही प्रमाणात का होईना प्रबोधनही होते आहे. खास स्वतंत्र विचाराची प्रसारमाध्यमे फारच उपयुक्त भूमिका बजावू शकतात. समाज जरा अधिक शिक्षित, समजदार व विवेकी झाल्यावर प्रसारमाध्यमांच्या मर्यादा त्यांच्या लक्षात येऊ शकतील व त्यामुळे त्यांच्या योग्य-अयोग्य प्रबोधनाच्या, माहितीच्या वा ज्ञानाच्या सारासार बुद्धीने विचार करून योग्य विचार घेण्याची व अयोग्य विचार नाकारण्याची कला त्याला अवगत होईल. त्यामुळे प्रसारमाध्यमांमधील पाखंडपणा कमी होईल. प्रसारमाध्यमांनी पाखंडपणा सोडून समाजहिताची बुज राखून जर सत्य विचार समाजापुढे शासन-प्रशासन, राजकीय पुढारी व इतर सर्वच महत्त्वाच्या घटकातली पाखंड उघड होऊ शकेल व देशाची खरी प्रगती होऊन न्याय, नीती, समानतेसारखी उच्च तत्त्वे समाजात स्थापित करण्यासाठी त्यांना सामाजिक बुद्धी व मन तयार होईल. शोषणाधारित समस्यांचे विघटन होऊन सद्सद्विवेकबुद्धीचा विकास होईल. एकमेकांचे पाय खेचण्यापेक्षा एकमेकांना सहाय्य करण्याची सहज प्रवृत्ती निर्माण होईल. आत्महत्या, रोगराई, तणाव, मानसिक विकार आपोआपच कमी होऊन सुदृढ समाजाची निर्मिती होईल. लोक निर्भय होतील. अवतारकार्य, व्यक्तिपूजा संपेल. लोक दगडधोंड्यांना पुजणार नाहीत. देवधर्माचे पाखंड करणार नाहीत. शरीराला कुठल्या गोष्टी खाणे-पिण्यायुक्त याचा विचार करू लागतील. व्यसनापासून दूर जातील. योग्य विचार निवडून आपली वाणी व आचरण सुधारू लागतील. मग विडी, सिगारेट, तंबाखूसारख्या हानिकारक पदार्थांचे सेवन थांबवतील. दारूचा उपयोग आपल्या सर्वनाशासाठी होऊ देणार नाहीत. मादक द्रव्यांचा व्यापार थांबेल. समाजातील लुटमारी, भांडणतंटा कमी होत नष्ट होईल व एक प्रकारे नव्या समाजाचा, नव्या जीवनाचा उदय होऊन, व सध्याच्या मानवाच्या रानटी अवस्थेचा अंत होईल. तेथे साधू, संत, ऋषी-मुनी यांचे कार्य थांबेल. देवा-धर्माच्या नावाने पोटभरू लोकांचा धंदा बंद होईल. पाखंड थांबतील. जाती-पाती-संप्रदाय धर्मकांड सर्व नष्ट होईल. मंदिर, मशिद, चर्च, आदी आपापल्या धर्माची देवालये कोणी उभारणार नाहीत. माणसामाणसातील किंवा समाजमनातील दुरावा कमी होईल. एक सुसंघटित, सुविचारी, सुसंस्कृत, विचारप्रधान व समृद्धीप्रधान मानवसमूह विकिसत होईल व एक दिलाने मार्गक्रमणा करील. सर्वांच्या मुख्य गरजा पूर्ण होतील. मानवसमाज निःस्वार्थ होऊन सध्या असलेल्या अनेक बंधनांतून मुक्त होईल.प्रसार माध्यमांना अशा प्रकारे आज ना उद्या ऐतिहासिक भूमिका करावी लागणारच आहे. त्याची सुरुवात जितकी लौकर होईल तेवढी समाजाला जास्त हितकर होईल.
यात 'समाजमन' असा जो शब्द खैरनारांनी माध्यमांबद्दल वापरलाय, त्या संदर्भात 'समूहमन' असा जवळचा शब्द वापरून एक नोंद आपण यापूर्वी 'रेघे'वर केलेली आहे. एडवर्ड बर्नेसच्या 'प्रॉपगॅन्डा' या पुस्तकाविषयीची ती नोंद होती. आणि गंमत म्हणजे वरच्या उताऱ्यात दुसऱ्या परिच्छेदातल्या तिसऱ्या ओळीत 'प्रसारमाध्यमं' याऐवजी 'प्रचारमाध्यमं' असा शब्द वापरला गेलाय, तो खैरनारांच्या पुस्तकातच तसा आलेला आहे. ती 'प्रुफरिडींग'ची चूक असावी असा आपला अंदाज आहे, पण तरी त्यात आपसूक वेगळ्या अर्थी वास्तवच नोंदवलं गेलंय. 'प्रॉपगॅन्डा' या शब्दात 'प्रचार' आलाच. म्हणजे खैरनारांच्या माध्यमांकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अवास्तव आहेत का? अपेक्षा नावाची गोष्ट बहुतेकदा अवास्तवच असते की काय? डेंजर आहे मग. खरं तर वरचा माध्यमांविषयीचा उतारा येण्याआधी या पुस्तकात खालचा उतारा खैरनार नोंदवतात :
प्रामाणिकपणावर आधारित अशी लोकांची चळवळ बाळसे धरू नये, ती मोठी होऊ नये म्हणून येनकेन प्रकारे ती चळवळ चिरडून टाकण्याचा प्रयत्न समाजातील तथाकथित सत्ताधारी माणसे करत असतात. लोकांचा उत्साह मावळतो. सरकारी पक्षाला वाहिलेली किंवा त्यांच्या दबावाखाली असलेली प्रसारमाध्यमे कुशलतेने त्यांच्यात भ्रम पसरवून समाजाचे लक्ष वेगळ्या मार्गाकडे वळवून चळवळींचा घात करतात. प्रसारमाध्यमांचे हितसंबंध कोणत्या ना कोणत्या नेत्याशी, पक्षाशी किंवा सत्ताधाऱ्यांशी ज्या वेळी गुंतलेले असतात. (काही अपवाद वगळता जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहाण्यासाठी बरीच प्रसारमाध्यमे त्या प्रकारची असतात.) त्यावेळी त्यांना समाजहित, देशहित, सिद्धांत, सामाजिक व वैयक्तिक मूल्ये यांचा विसर पडतो व आपापले हितसंबंध जपण्यासाठी समाजाचे खोटे प्रबोधन करण्यात दंग होतात.
सत्तेच्या स्पर्धेचा आणि माध्यम व्यवहाराचा काही संबंध स्पष्ट होणाऱ्या नोंदी आपण मर्यादित प्रमाणात 'रेघे'वर केलेल्या आहेत. वास्तविक खैरनारांनी हे एवढं स्पष्ट आधी बोलून नंतरच्या भागात माध्यमांबद्दल किती अपेक्षा व्यक्त केल्यात! पण तेही साहजिक आहे आणि त्यांना तसं करण्याची मुभा आहे. शिवाय त्यांना त्यांच्या अनुभवातून काही वाटलं असेल तेही ठीक. आपण त्यातले काही बिंदू आपल्या परीने इथे नोंदवले. खैरनारांनी पुस्तकाची सुरुवात ज्या मुद्द्याने केलेय त्या मुद्द्यावर आपण नोंदीचा शेवट करू. पुस्तकाच्या सुरुवातीला 'भूमिका' स्पष्ट करताना खैरनार म्हणतात :
आपल्या समाजाची रचना अशी काही वैशिष्ट्यपूर्ण व विचित्र आहे की, कोणता ना कोणता मुखवटा चढवल्याखेरीज जीवन जगणे कठीण होऊन बसते.
इथे वाक्याच्या सुरुवातीला 'आपल्या' या शब्दाऐवजी 'कोणत्याही' असं टाकणं बरं जाईल काय? (तसं केलं तर, नववा शब्द 'आहे'ऐवजी 'असते' असा करावा लागेल). म्हणजे 'कोणत्याही समाजाची रचना अशी काही वैशिष्ट्यपूर्ण व विचित्र असते की, कोणता ना कोणता मुखवटा चढवल्याखेरीज जीवन जगणे कठीण होऊन बसते'. आणि सध्याच्या माध्यमपिसाट काळात मुखवट्यांची कमतरता नाहीच. त्यामुळे वाक्य आपसूक पूर्ण होतं. आणि आपला गुन्हा पुन्हा एकदा सिद्ध होतो. थांबू.
***
''बरे असे केल्याशिवाय जगात भागत नाही! अहो नाही तर, आपली खरी मते सांगून जगात तंटेच करायचे - वैरीच निर्माण करायचे की नाही? रिकामा जीवाला ताप! जाऊ द्या!...''
- दिवाकर (नोंद)
Vey well done, Ek Regh...Of course it's all so depressing...They all belong to the same chess board...Thanks for info on the website of Ketkar's Dnyankosh...I didn't know that...best
ReplyDelete1) मला वाटते, आपण सारेच वृत्तपत्रांविषयी फारच भ्रामक अपेक्षा बाळगून असतो. प्रबोधन, ज्ञान, माहिती, लोकशिक्षण वगैरे वगैरे गोष्टी स्वातंत्र्याआधी आणि त्यानंतर साक्षरता वाढेपर्यंत काही काळ ठीक होत्या. त्यात पाव शतकापूर्वीच फार मोठा बदल झालेला आहे. तो कळत असूनही आपण वळवून घेत नाही. वृत्तपत्रे, टीव्ही वाहिन्या हा उघड उघड एक धंदा आहे. ज्याला जे प्रॉडक्ट आवडेल, परवडेल त्याने ते घ्यावे. पण आपण चौथा स्तंभ वगैरे म्हणून अवास्तव अपेक्षा आणि विश्वासही ठेवतो.
ReplyDelete2) ज्या संपादकांचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल एक किस्सा. एका प्रकाशकाने लेखी कळविलेला (त्याचेही नाव देणे योग्य नाही). या प्रकाशकाने एका चळवळीच्या नेत्याची अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत. ती वाचण्यासाठी, परीक्षणासाठी (किंवा कृपादृष्टी व्हावी म्हणूनही असेल) वर उल्लेख केलेल्या संपादकांकडे पाठविली होती. पण त्याची पोच मिळाली नाही. एका कुठल्या तरी ग्रंथ प्रकल्पासाठी या संपादकांना त्या नेत्यावर लिहायचे होते म्हणे. मग त्यांनी पुन्हा सारी पुस्तके मागवून घेतली.
आता यातील खरे-खोटे संपादक व प्रकाशक यांनाच माहीत.
थोडक्यात काय, तर आहे हे असे आहे, असे स्वीकारण्यास आपण कमी पडतो आणि अपेक्षाभंगाचे दुःख ओढवून घेतो.
http://sanjaysonawani.blogspot.in/2013/08/blog-post_7.html
ReplyDeleteIs this book available.
ReplyDeletenot sure about the hard-copy, but an e-book is available here:
Deletehttps://www.bookganga.com/eBooks/Books/details/5583567725330868805?BookName=%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%95%e0%a5%80%20%e0%a4%9d%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%9c
- regh