Tuesday, 20 August 2013

नरेंद्र दाभोलकर : एक नोंद

''बॉडी कोणाची ते आधी ओळखू आलं नाही. दोन-तीन जणांनी सांगितल्यावर पोलीस आले. आधी त्यांनाही ओळखू आलं नाही. मग वरिष्ठ अधिकारी आले, ते म्हणाले, अरे, दाभोलकर दाभोलकर.

साडेसहा-सातच्या दरम्यान झालं असेल. सव्वासात-साडेसातच्या दरम्यान झालं असेल. चेहराच ओळखू येत नव्हता. मग ससूनमधे नेलं. इथेच गेलेले.

दोघे जण होते. पंचवीस-सव्वीसीचे असतील. बाइकचा नंबर मिळाला म्हणतात.''

मागून डोक्यात गोळी.
***

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आणि 'साधना' साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची आज सकाळी पुण्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
***

अंधश्रद्धांना विरोध म्हणजे शोषण, अनिष्ट प्रथा, रूढी, कालविसंगत कर्मकांड, त्यातून होणारी दिशाभूल, फसवणूक याला विरोध. लोकांच्या श्रद्धेचा, सात्त्विक भावनेचा वा भयगंडाचा फायदा घेऊन ही सफाईदार धूळफेक वा चलाख लूटमार केली जाते. त्याला ना जात, ना पंथ, ना धर्म. त्याला विरोध हेच फुले, आंबेडकरांनी सांगितलेले सत्यशोधकी कर्म.
- नरेंद्र दाभोलकर.
***

दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या, त्याला लागूनच-

ओंकारेश्वर दशक्रिया विधीघाट, मुक्तिधाम - इधे आधीच दुसऱ्याच कोणावर तरी अंत्यसंस्कारासाठी लोक जमलेले. आता तिथे जवळच पोलीस जमलेले, राजकीय व्यक्ती थोड्या, पत्रकार जास्त, आणि लोक. गाड्यांची ये-जा. ''यायचे ते इथे. पुण्यात आले की.''

तिथून डावीकडे पुढे गेल्यावर 'साधना मीडिया सेंटर' आहे. उजवीकडून शनिवार पेठेत घुसलं की, औंदुंबर आळी असा एक भाग आहे, तिथे 'मॅजेस्टिक प्रकाशना'ची एक इमारत आहे. या इमारतीसमोरच एक लाल विटांची लहानशी इमारत.  तिथे पूर्वी मे. पुं. रेगे, राम बापट वगैरे मंडळी गप्पांसाठी जमत. खूप वादबिद घालत, असं कानावर येतं.

***

कोणाचे काय विचार पटतील - नाही पटतील, पण एकदम माणूस जगातून हटवणं म्हणजे काय? प्रत्येकाला आपापलं म्हणणं मांडायला लोकशाही जागा असावी. नसेल तर तयार करावी. जुनंच म्हणणं. पण परत परत मांडलं जाणारं. कारण वातावरण डेंजर असतं. 

निव्वळ शब्दांच्या मदतीने विवेकवादासारख्या वरवर सर्वमान्य गोष्टीविषयी काहीएक म्हणणं मांडणाऱ्या आणि ते पटणाऱ्या माणसांची जोडणी करणाऱ्या दाभोलकरांना थेट डोक्यात गोळी घालून संपवलं. दुःख वगैरे नकोच. आपण लोकशाहीला अनुसरून दाभोलकरांचं म्हणणं मांडणारे शब्द थोडेसे नोंदवून ठेवू. 

'रेघे'वर नरहर कुरुंदकरांसंबंधी नोंद केलेली मागे, ती 'साधना'त छापून आलेली, त्यावर दाभोलकर म्हणालेले, 'कुरुंदकरांवर अशी अधूनमधून चर्चा होणं ही चांगली गोष्ट आहे.' या 'चांगल्या गोष्टी'चा अर्थ 'लोकशाही म्हणजे काय' ह्या प्रश्नात असू शकतो. आपणही वरच्या परिच्छेदात 'लोकशाही' असा शब्द वापरला, पण ह्या प्रश्नाचं पुरेसं उत्तर आपल्याला माहीत नाही. पण समूहाने राहायचंय असं ठरवल्यावर ह्याचा आपापल्या बाजूने काहीतरी अर्थ लावायला हवा. दाभोलकरांनीही तो अर्थ लावला असेल, त्यामुळेच त्यांनी त्याचं म्हणणं सहिष्णूपणे आणि विवेकीपणे मांडलं. म्हणजे लोकशाहीत सहिष्णूता नि विवेकीपणा नावाच्या गोष्टी असत असतील. ह्या गोष्टींची आठवण ठेवत आपण इथे दाभोलकरांचं 'विचार तर कराल?' या पुस्तकातलं एक म्हणणं खाली नोंदवून ठेवू.
***


क्रोधापेक्षा करुणा, उपहासापेक्षा आपुलकी

राजहंस प्रकाशन
ठिकठिकाणी वेगवेगळ्या भाषेत पण एक मुद्दा मला लोक नेहमी सुनावत असतात. 

'दाभोलकर, ठीक आहे सध्या जोरात बुद्धिवादाच्या गप्पा मारता. पण एक दिवस झटका बसला ना म्हणजे कळेल बरोबर!'

त्यांचे म्हणणे खरे आहे. अनपेक्षित जोरदार आघात झाला तरी मी वाकणार नाही, मोडणार नाही, अंधश्रद्धेचा बळी होणारच नाही असे घडेल का? प्रसंग आला तरच याचा निकाल लागायचा, पण तोपर्यंत तरी असेच घडेल हे मानणेच जास्त वैज्ञानिक ठरेल.

गप्पा मारताना एकदा विजय तेंडुलकर मला म्हणाले होते, 'नरेंद्र, तुमचे काम चांगलेच आहे. पण लोक अंधश्रद्ध बनतात ती त्यांची गरज असते, असे नाही तुम्हाला वाटत?'

मी चळवळीतला एक कार्यकर्ता आहे. या विश्वातील कोणतीही घडामोड कोणत्यातरी दैवी सामर्थ्याच्या प्रभावाने वा आशीर्वादाने घडते यावर माझा विश्वास नाही. स्वतःला पडणाऱ्या सर्व प्रश्नांचा विचार लोकांनी बुद्धीने, विवेकाने करावा. तसाच आचार करून तो प्रश्न सोडवावा असे मला वाटते.

पण हे अजिबात सोपे नाही.

एकतर माणूस हा केवळ तर्काने चालणारा, विवेकानेच वागणारा प्राणी नाही. बुद्धी व भावना, विचार व कल्पनाविलास यांच्या मिश्रणातूनच त्याचे व्यक्तित्व घडते.

दुसरे, परिस्थितीची अगतिकता अनेकदा त्याला मजबूर करते. त्यामुळे तो अनेक समज, गैरसमज, अपसमजुती मनाशी बाळगतो; स्वतःच्या बचावाला ढालीसारखा वापरतो. 

समजा वेळ रात्रीची, अमावास्येची. तातडीचा निरोप देण्यासाठी जाणे आवश्यक. अडचण अशी की रस्ता श्मशानातूनच जातो. श्मशानाजवळ घाबरून दातखीळ बसणे वा तिथेच बेशुद्ध पडणे वा भीतीने निरोप देण्याचे कामच सकाळपर्यंत लांबणीवर टाकणे दोन्ही अशक्य. मग व्यक्ती मार्ग शोधते. रामनाम म्हणत श्मशान पार करते. भूत असते, रामाचे नाव घेतल्याने ते पळून जाते. या निखालस अंधश्रद्धेचा वापर व्यक्ती करते, कशासाठी? कार्यभाग पार पाडण्यासाठी. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचे संतुलन टिकवण्यासाठी. वाहने कितीही मजबूत असली तरी रस्ते खराब असतात, त्यावरील खाचखळग्यांच्यामुळे आणि विशेषतः त्यांच्यावरील व्यक्तींना धक्के कमी बसावेत म्हणून त्यांना शॉक अॅबसॉर्बर बसवलेले असतात. धक्के बसतातच पण तीव्रता कमी होते, बहुसंख्य व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाच्या बचावासाठी स्वतःला जे शॉक अॅबसॉर्बर बसवतात त्या म्हणजे अंधश्रद्धा! जीवनमार्गावरती भीती, निराशा, अडचणी, अपेक्षाभंग या धक्क्यातून स्वतःचे संरक्षण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

मुलाला अनपेक्षित कॅन्सर होतो.

धंद्यात खोट येते.

हातातोंडाशी येऊन यश हुकते.

असे झाले की, माणसाची भावना विचारावर मात करते. असे घडण्याची अदृश्य कारणे शोधली जातात आणि ते उपायही आग्रहाने पार पाडतात.

लग्नानंतर गावाकडच्या कुलदेवताला जाणे राहिले म्हणून कॅन्सर. जागेची वास्तुशांती नाही म्हणून धंद्यात खोट, सत्यनारायणाची पूजा केली नाही म्हणून यशाची हुलकावणी.

मग स्वाभाविकच कुलदैवताला चांदीचा देव्हारा दिला जातो. वाजत गाजत वास्तुशांती होते. महापूजा यथासांग पार पडते.

आजच्या जीवनातले अनेक धक्के हे अनियंत्रित सामाजिक परिस्थितीतून आलेले असतात. नोकरी, जोडीदार, घर, शिक्षण, संधी, औषधोपचार या सर्वच बाबतीत बहुसंख्यांच्या पदरी या-ना-त्या स्वरूपाची तीव्र निराशा असते. त्यातून स्वतःला सावरून जीवन जगणे तर अटळ असते. मग प्रत्येक जण आपापल्या आवडीनुसार सिद्धीविनायक, गुरुचरित्राची पोथी, भविष्य, मंत्रतंत्र, बाबा, गुरू, पुनर्जन्म अशा अनेक बाबींचा शॉकअॅबसॉर्बरसारखा उपयोग करतो.

खरेतर जे घडले ते दैवी अवकृपेने नाही हे समजणे सोपे असते. ते का घडले? याचे कार्यकारण हुडकणे अवघड नसते. असे होऊ नये म्हणून स्वतःची मानसिकता व समाजाची वास्तवता बदलणे अवघड असले तरी तेच इष्ट व आवश्यक असते.

पण व्यक्तीवरचे, कुटुंबातले, समाजातले संस्कारच असे असतात की ही चिकित्सा शिकवण्याऐवजी टाळण्याकडे कल असतो. आणि कृतीच्या खडतर व लांबच्या मार्गाऐवजी अंधश्रद्धेचा शॉर्टकट जवळचा वाटतो. लांबचा मार्ग यशस्वी होण्याऐवजी स्वतः मोडून पडण्याची भीती व्यक्तीला वाटते. मग ती अंधश्रद्धेचा शॉकअॅबसॉर्बर लावून जगते.

अशा अंधश्रद्धा उपद्रवी असतील तर त्यावर व्यक्तीच्या भल्यासाठीच पण कठोर प्रहार करावे लागतात.

त्या भले निरुपद्रवी असतील तरी व्यक्तीची बुद्धी त्यात गहाण पडू नये याची काळजी घ्यावी लागते. श्मशानात रामनाम घेणाऱ्याने प्रत्येक वेळा रस्ता ओलांडताना, बसमध्ये चढताना, साहेबाच्या केबिनमध्ये जाताना रामाचा जप सुरू ठेवला तर? तर अर्थ एवढाच की ती व्यक्ती राम-नाम संकटातून तारून नेते या अंधश्रद्धेची शिकार बनली आहे. बुद्धी आणि भावनेने बनलेल्या तिच्या व्यक्तिमत्त्वाचे संतुलन ढळलेले आहे. या विरुद्धही बोलावे लागतेच.

परंतु या पलीकडे एक मोठा वर्ग असा आहे की, जो अगतिकतेने, हताशपणे, नाईलाजाने जीवनात या-ना-त्या प्रसंगी अंधश्रद्धेचा शॉकअॅबसॉर्बर लावून स्वतःचा बचाव करीत असतो.

घरीदारी आजूबाजूच्या वातावरणातून संस्कार घेतच सर्व व्यक्ती वाढतात. हे संस्कार बुद्धीशी सुसंगत असतात असे नाही. बहुधा नसतातच. माणसाला आधार हरघडी लागतो. हा आधार शोधताना विचारापेक्षा त्याचे संस्कार त्याच्यावर मात करतात. अडचणीच्या वेळी स्वतःच्या जीवनाचा आधारच त्या संस्कारात त्या आधारे केलेल्या कर्मकांडात तो शोधतो, मिळवतो, हे सारे सोडून देणे त्या प्रसंगी त्याच्या बुद्धीला पटले तरी प्रत्यक्ष व्यवहारात वळतेच असे नाही.

चळवळीतील शहाणपणाचा आणि माणुसकीचा भाग येतो तो याच ठिकाणी. आधार घेण्याची वास्तवता आणि आहारी जाण्याची भयग्रस्तता याचा नीरक्षीर विवेक व्यक्तीने सतत करावयास हवा. माणूस आधार घेता-घेता कधी आहारी जातो व मानसिक गुलामगिरी स्वीकारतो हे कळत नाही. म्हणूनच सजगता हवी, चुकीच्या संस्कारावर विचाराने मात करून त्याचे विवेकी आचारात रूपांतर करावयास लावणे हे खरे चळवळीचे काम असते. त्यासाठी लोकांवर संतापून भागणार नाही आणि 'काय हा मूर्खपणा!' म्हणून त्याची टिंगलटवाळी करून चालणार नाही. त्याच्याशी सतत व सहृदयतेने संवाद साधत राहावयास हवे. मार्ग खूप लांबचा आहे पण तोच इष्ट आहे. शेवटी लढा आहे माणूस बदलण्याचा आणि त्यासाठी क्रोधापेक्षा करुणेची व उपहासापेक्षा आपुलकीची खरी गरज आहे.
***

नरेंद्र दाभोलकर

13 comments:

  1. छान आलेख आहे. धन्यवाद।

    ReplyDelete
  2. दाभोलकरांसारखा कुशल संघटक मी पाहिला नाही. उत्साह व उर्जा प्रचंड होती.

    ReplyDelete
  3. May the departed soul rest in peace!

    ReplyDelete
  4. Iam sad , angry, hurt and confused

    ReplyDelete
  5. His was an indomitable spirit.A man possessed by an urge to eradicate irrational beliefs in contemporary society, Dr. Narendra Dabholkar was very plain, unassuming ideologue with clear cut ideas about what vision he had of a rational society.

    ReplyDelete
  6. दीर्घ उसासा....
    निशब्द,
    स्तब्ध,
    आसमंत सारा!!!

    ReplyDelete
  7. श्रद्धा आणि अंधश्रद्धा या मध्ये एक छोटीशी न दिसणारी रेषा आहे. काय जवळ बाळगायचं आणि काय नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. कोणाही व्यक्तीच्या ह्या बाळगलेल्या पुंजीचा गैरवापर करून त्याचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करणे किंवा त्यामधून अर्थार्जन करुन घेणे अत्यंत निंदनीय आहे. दाभोलकर सरांनी ह्याच अपप्रवृत्तीवर कायम टीकेचा मारा केला. श्रद्धेला त्यांचा विरोध होता असं मला तरी वाटत नाही... मात्र त्याची अंधश्रद्धा होऊ देऊ नका ह्याविषयी ते आग्रही होते. १९९५ ते १९९८ मध्ये त्यांनी आमच्या भागातील लहान मुले व त्यांच्या पालकांसाठी अप्रतीम कार्यशाळा घेतल्या होत्या. सायन्सचा वापर करून भोंदूबाबा लोकांना कसे फसवतात हे त्यांनी सहप्रयोग दाखवून दिलं होतं. तुम्ही आज गेलात सर... पण तुमचे विचार आम्ही कायम जिवंत ठेऊ आणि तीच तुम्हाला खरी आदरांजली ठरेल.

    ReplyDelete
  8. MAN AAHE KHINNA
    CHHINNA VIHHINNA
    SHABDA MUKE STABDHA
    MATI MAZI SUNNA.....

    ReplyDelete
  9. There is a thin line in belief and blind belief. He taught people to think about it and that was a great task.Sadanand Chavare

    ReplyDelete
  10. समाज अधिक सजग, डोळस, विवेकी व्हावा असं पोटतीडीकेने वाटणारे फार थोडे लोक राहिलेत. सर्व समाजाचं प्रबोधन करणं फार अवघड असते. दाभोळकरांनी नेमकं हेच केलं. महात्मा फुले, आगरकर, र. धों. कर्वे या सर्वांना समाजाचा रोष पत्करावा लागला. प्रतिगामी व सनातनी लोकांच्या वैफल्यातूनच हा बळी गेला आहे.
    पण आजपासून ५० वर्षांनी दाभोळकरांचे नाव व कार्य राहील, पण सनातनी काळाच्या पडद्याआड लुप्त झालेले असतील.

    ReplyDelete