Thursday 8 August 2013

एक आदिवासी मुलगा, एक 'डॉक्टर' व एक प्रसंग - तुषार कांती

तुषार कांती यांचा हा लेख 'तेहेलका' साप्ताहिकामध्ये गेल्या महिन्यात प्रसिद्ध झाला होता. आपण त्या लेखाच्या मराठी अनुवादाची परवानगी तुषार यांच्याकडून आधीच घेऊन ठेवली होती, त्यानुसार हा लेख 'रेघे'वर नोंदवतो आहोत. तुषार सध्या नागपूरमध्ये राहणारे ५८ वर्षांचे गृहस्थ आहेत.
***

आंध्र प्रदेशातल्या वारंगल तुरुंगात गेल्यानंतर दोन आठवड्यांमध्ये माझी शुद्ध हरपली. आजारी पडलेला इसम हा कथितरित्या एक वरिष्ठ नक्षलवादी असल्यामुळे पोलीस अधीक्षकांनी तातडीने पुढची पावलं उचलली. एमजीएम रुग्णालयाच्या अधीक्षकांशी सल्लामसलत करून तीन डॉक्टरांचं पथक माझी तपासणी करण्यासाठी आलं. दुसऱ्याच दिवशी हृदयतपासणीचं शिबीरही आयोजित करण्यात आलं होतं. पुढच्या उपचारांसाठी मला सशस्त्र पोलिसांच्या गराड्यामधून एमजीएम रुग्णालयात पाठवण्यात आलं होतं.

सगळे नेहमीचे तपासणीचे सोपस्कार पार पडल्यानंतर मला वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याकडे नेण्यात आलं. पाच फूट दोन इंच उंची, काळे कुरळे केस आणि गोरसट रंगाच्या त्या माणसाने मला आत बोलावलं आणि बसण्यासाठी खुर्ची दिली. रुग्णालयातल्या इतर अनेक तेलुगू भाषक डॉक्टरांपेक्षा हा गडी स्पष्टपणे वेगळा दिसत होता. प्रीस्क्रिप्शनच्या कागदावर काही खरडल्यानंतर तो अचानक म्हणाला, ''तुम्ही मला ओळखलंत का?''

त्याच्या टेबलावरच्या पाटीवरून त्याचं नाव 'ए. भिक्षापती' असं आहे हे मी ओळखू शकलो. पण त्यापुढे मला काही ओळख पटत नव्हती. त्यावर मला थोडासा अंदाज द्यावा म्हणून तो म्हणाला, ''मी तुपकुला गुदेम गावचा आहे.'' (या गावाच्या नावाचा शब्दशः अर्थ होतो - बंदुकांचं खेडं!)

त्याने उच्चारलेल्या पाच शब्दांचा संदर्भ लक्षात यायला मला काही सेकंदं लागली आणि मग मी माझ्यावरच चिडलो. मी त्याला न ओळखणं कसं काय शक्य आहे? आता मला सगळ्या गोष्टी स्पष्टपणे दिसायला लागल्या, जणू काही आत्ताच काही दिवसांपूर्वीची घटना असावी..

मी एकोणीस वर्षांचा होतो आणि बस्तरला लागून असलेल्या उत्तर तेलंगणात आदिवासी इलाक्यामध्ये काम करण्यासाठी मी कॉलेज सोडलं होतं. त्यावेळी माझ्याकडे काय होतं, तर डॉक्टरांनी दिलेले औषधांचे नमुने आणि रोगांचं निदान व उपचार यासंबंधीचं एक मोठं पुस्तक, एवढंच. या दोन्ही गोष्टी उस्मानिया वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या आमच्या विद्यार्थी संघटनेतल्या मित्रांनी दिलेल्या. एकदा माझं बाकीचं काम झाल्यानंतर मी गोदावरी काठच्या तुपकुला गुदेम या गावाला गेलो होतो. तिथे एक माणूस आपल्या मुलासोबत माझ्याकडे आला. मुलगा जेमतेम आठ ते नऊ वर्षांचा असावा. त्याला खरुज झाली होती हे अगदी लगेचच लक्षात येत होतं. त्याचे हात आणि जांघेचा भागांमधल्या त्वचेला खरजेची लागण होऊन तो भाग सुजल्यासारखा दिसत होता. त्याची अवस्था अगदीच करूण होती. थोड्या वेळाने मला लक्षात आलं की, या त्वचारोगाची बाधा झालेला त्या गावातला तो एकटाच नव्हता. आणखी जवळपास दहा ते बारा जणांना खरजेची लागण झाली होती. जवळच्याच शहरातल्या आदिवासी आश्रम शाळेतून परतलेल्या सगळ्याच मुलांना ही लागण झाली होती, असं त्या मुलाचे वडील मला सांगू पाहत होते. जवळपास सगळ्याच गावाला ही लागण झालेय आणि मला प्रत्येकावरच उपचार करावे लागणारेत, असा त्यांच्या बोलण्याचा अर्थ मी घेतला.

मी काही अँटिबायोटिक औषधं त्या वडिलांकडे दिली, जेणेकरून काही प्रमाणात खरूजबाधित भागांवर काहीसा उपचार होऊ शकेल. तिथेच मग मला पिर्ला चंद्रय्या हा एक मित्रही भेटला. त्याच्या मदतीने मी गावातल्या प्रत्येकाला भेटून खरजेसारख्या साध्या त्वचारोगाबद्दल किमान माहिती दिली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सगळ्या गावासोबत एक बैठक घेऊन आणखी माहिती देण्याचं ठरलं आणि हा रोग हटवण्याची मोहीम राबवावी असा निर्णय झाला.

गावातल्या सगळ्या स्त्री-पुरुषांची समजूत घालून घरात बसण्यास सांगणं आणि सलग तीन दिवस माझ्या सूचना पाळून त्यांचं खरूज निर्मूलनाला सहकार्य मिळेल अशी आशा धरणं अवघडच होतं. त्यापेक्षा तिथून साठ किलोमीटरवर असलेल्या मुलुगू या तालुक्याच्या ठिकाणावरून अस्काबायोल मलमाचा एक मोठा कॅन आणणं हे तुलनेने सोपं काम होतं. तसं करून सगळ्यांना ते मलम लावलं गेलं, त्यानंतर त्यांनी आपले कपडे एका मोठ्या पातेल्यात टाकून उकळत्या पाण्यातून काढले, गोदावरीच्या पाण्यात ते धुतले आणि अखेरीस त्या गावातून त्या वेळी खरुज बाहेर काढण्यात यश मिळालं.

हा सगळा घटनाक्रम एखाद्या चित्रपटासारखा माझ्या डोळ्यासमोरून गेला. चेहऱ्यावर हसू आलेला तो वैद्यकीय अधिकारी मला म्हणाला, ''मी तोच भिक्षापती आहे. तुपकुला गुदेममध्ये तुम्ही ज्याच्यावर उपचार केले होतेत तो आठ वर्षांचा मुलगा.'' त्याच्या काळ्या कुरळ्या केसांखालती त्याचे डोळे चकाकत होते. तो म्हणाला, ''तेव्हा खरजेविरोधात यशस्वी उपचार मोहीम राबवलेली पाहिल्यानंतर मी डॉक्टर व्हायचं ठरवलं होतं.'' एक अनवाणी 'डॉक्टर' आणि राजकीय कार्यकर्ता म्हणून काम केलेल्या माझ्यासारख्या माणसाला राजकीय कैदी म्हणून तुरुंगवास भोगत असताना आपला जुना रुग्ण डॉक्टरच्या रूपाने भेटणं याच्यासारखी दुसरी दाद कुठली असेल! त्यावेळी माझ्या डोळ्यात पाणी आलं.

1 comment:

  1. मी निःशब्द राहूनच प्रतिक्रिया नोंदवू इच्छितो...

    ReplyDelete