Friday, 2 August 2013

न लिहिलेल्या दुर्गा भागवत - अशोक शहाणे

मुंबईत एशियाटिक सोसायटीच्या दरबार हॉलमधे दुर्गा भागवत यांचं चित्र आजपासून प्रत्येकाला येता-जाता दिसेल. हे चित्र लावण्यात येणार असल्याची बातमी गेल्या रविवारी प्रसिद्ध झाली. (लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्स). त्यानुसार चित्राच्या अनावरणाचा कार्यक्रम आत्ता सहा वाजता सुरू झाला असेल. या बातमीचं आपण 'रेघे'वर काय करणार? तर, दुर्गाबाईंचं चित्र लावल्यामुळे त्यांच्याबद्दलची जी जबाबदारी झटकण्याची मुभा आता आपल्याला मिळालेय ती जबाबदारी नक्की काय असेल याची एक नोंद करू. ही जबाबदारी म्हणजे दुर्गाबाईंच्या विचारांना लक्षात ठेवण्याची. त्या विचारांसंबंधी काय पटतंय नि काय नाही पटतेय त्याबद्दल बोलण्याची. आज चित्राच्या उद्घाटन समारंभाच्या गोंगाटात ही नोंद आवश्यक ठरावी. या नोंदीसाठी आपण अशोक शहाणे यांना सोबतीला घेतलेलं आहे. दुर्गा भागवतांचं निधन ७ मे २००२ ला झालं. त्यानंतर 'माहेर' मासिकाच्या जून २००२च्या अंकात प्रसिद्ध झालेला शहाण्यांचा हा लेख आपण त्यांच्या परवानगीने 'रेघे'वर नोंदवतो आहोत.
***

न लिहिलेल्या दुर्गा भागवत
- अशोक शहाणे



दुर्गा भागवत
'मी अजून माझं बाईपण विकायला काढलेलं नाहीय.' 

दुर्गाताईंना एवढं फणकारायला असं घडलं होतं काय? 

तर पुण्याच्या एका प्रकाशकाचं त्यांना पत्र आलं होतं. त्याच्या डोक्यात एक कल्पना आली होती : नामांकित स्त्री-लेखिकांच्या कथा निवडून दोन-तीन संग्रह काढावेत. म्हणजे प्रत्येकीची एकच गोष्ट. असे दोनतीन संग्रह अन् त्याने लेखिकांना तशी पत्रं पाठवली होती. एक पत्र दुर्गाताईंच्या नावाने पण आलं होतं. त्या पत्रावरच दुर्गाताईंची ही तिखट प्रतिक्रिया होती. लिहिणाऱ्यांत कसला स्त्री न् पुरुष असा फरक करता? असा एकूण मुद्दा.

'जेव्हा वय होतं तेव्हासुद्धा काढलं नाही, तर आता म्हातारपणात कुठं काढू?'

अशी वर आणखी पुस्ती. 'वय होतं तेव्हासुद्धा काढलं नाही' म्हणजे लग्नाबद्दल बोलत होत्या त्या. लग्न नावाच्या संस्थेबद्दल स्वतंत्र लिहायचा प्रसंग आला असता तरी त्यांनी हे असं फटकारून काढलं असतं का नाही कोण जाणे! 

पण पुढे काय झालं ठाऊक नाही. स्त्री-लेखिकांच्या कथांचे मिळून दोन-तीन संग्रह त्या प्रकाशकाने कदाचित काढलेही असतील. फक्त त्यात घालायला दुर्गाताईंची कथा काही त्याला मिळाली नाही.
---

दुर्गाताई राहायच्या ग्रँटरोड न् बॉम्बे सेंट्रल यांच्यामध्ये गिल्डर लेनला. तिथनं कामाठीपुरा तर म्हणतात तसं हाकेच्या अंतरावर. एका चौकाचंच काय ते अंतर मध्ये.

एकदा असंच वेश्यांबद्दल एकदम वीज चमकल्यासारखं म्हणाल्या, 'आमच्यात न् त्या बायकांच्यात काहीच फरक नाही. आम्ही रस्त्याच्या ह्या बाजूला जन्मलो अन् त्या त्या बाजूला जन्मल्या, एवढीच काय ती तफावत!'

ह्या लायनीला बायका कशा येतात अशी पाहणी करायचा एक रिवाजच समाजशास्त्राच्या अभ्यासकांमध्ये आहे. तशा एका पाहणीचे निष्कर्ष वर्तमानपत्रात आले होते, त्यावर त्यांची ही टिप्पणी होती. 'बाई काय ह्या धंद्यात एक तर नाडली जाऊन येते, नाहीतर खुशीने येते. पाहणी व्हायला हवी ती तिच्याकडे येणाऱ्या गिऱ्हाईकांची. ही गिऱ्हाईकं तुमच्या-आमच्या घरातलीच तर असतात. ती वेश्यांकडे का म्हणून जातात? ही चौकशी व्हायला हवी.'

आता असल्या चौकशा आपल्याकडे होत असत्या तर काय हवं होतं!

दुर्गाताईंची एक मैत्रीण होती. ती पण लिहिणारीच. ती पण लग्नाची राहिलेली. नोकरी करणारी. मुंबईच्या बाहेर. दुर्गाताई तिच्याकडे मनात आलं की कधीही जायच्या. एकदा त्यांनी तिला सल्ला दिला, 'ठेवावेत की संबंध कुणाशी तरी, शरीराची गरज आहे म्हणून. तेवढ्यापुरते. बाकी गुंतून नाही पडू. अन् लोक काय म्हणतील म्हणून घाबरण्यात काहीच अर्थ नाही. लोक काय, काहीतरी म्हणतच असतात. त्यांच्या म्हणण्याला काय भीक घालायची!'

एकदम बिनधास्त!
---

अधनंमधनं कुठनंकुठनं लोक भाषणाला बोलवायचे. असंच एकदा नाशिकला जाणं झालं. जवळच आदिवासींची एक आश्रमशाळा होती. मुलींची. तिथे संध्याकाळी भाषण झालं. नंतर गप्पागोष्टींत वेळ गेला अन् मुलींनी रात्री इथेच राहा म्हणून आग्रह केला.

मग रात्री जेवणखाण होऊन गेल्यावर मुलींनी त्यांना घेरलं. पोरीच त्या, भडाभडा बोलल्या. आश्रमशाळेत राहायची काय किंमत त्यांना चुकती करावी लागत होती, ते दुर्गाताईंच्या लक्षात आलं. आपलं हे गाऱ्हाणं कानांवर घालावं म्हणूनच तर त्यांनी आग्रहाने दुर्गाताईंना ठेवून घेतलं होतं. एवढी मोठी लेखिका आहे, लेखणी उचलेलं अन् आपल्या दुःखाला वाचा फोडेल, अशी त्या मुलींची अपेक्षा.

दुर्गाताई मुंबईत परतल्या. सांगत होत्या, 'जे ऐकलं ते लिहिणं आपल्या कुवतीपलीकडचं आहे. आपण लेखक आहोत ह्याची पहिल्यांदा लाज वाटली. आपण नाही लिहू शकत हे.'

जसं बोलताबोलता राजिंदरसिंग बेदी एकदा म्हणाले होते, 'फाळणीच्या दंग्यात कुटुंबातले जवळपास सगळे लोक गमावले. जीव बचावून कसाबसा इकडे पळून आलो. पण फाळणीबद्दल लिहिता कधीच आलं नाही. लेखणीला पेलवण्यापलीकडचं दुःख होतं ते!'
---

'खुश्शाल जाळून टाका! नाहीतरी इथे मांडवाखेरीज बाकी आहेच काय तुमचं!' दुर्गाताई कडाडल्या.

प्रसंग होता कराडच्या साहित्य संमेलनाचा. दुसऱ्या दिवशी दुपारीच अध्यक्षांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मुंबईला 'जसलोक'मध्ये खितपत पडलेल्या जयप्रकाश नारायणांच्या तब्येतीला आराम पडावा म्हणून मौन प्रार्थना करण्यासाठी आख्खा मांडव उठून उभा राहिला होता. यशवंतराव त्यावेळी व्यासपीठावर होते. सगळेच उभे राहिल्याचं बघून ते पण उभे राहिले होते. 

अन् मग संध्याकाळच्या अंगाला त्यांचा निरोप घेऊन कार्याध्यक्ष करंबेळकर दुर्गाताईंकडे आले होते. 'सिंहाच्या गुहेत शिरून तुम्ही त्याच्या आयाळीला हात घातलायत. हे खपवून घेतलं जाणार नाही. तुम्ही समजलात काय, साहित्य संमेलनाचा मांडव आम्ही जाळून टाकू!' ऐतिहासिक नाटकातल्या संवादाच्या धाटणीने करंबेळकर बोलले होते अन् दुर्गाताईंनी त्याला एकदम होकार देऊन टाकला होता.

मग यशवंतरावांनी संमेलन संपायच्या आतच कराडमधनं पळ काढला होता. अन् यजमानाविनाच संमेलन सुखरूप पार पडलं होतं.

दुर्गाताईंना नंतर अटक झाली ती एशियाटिक सोसायटीमध्येच. हीच त्यांची हमखास असायची जागा आहे हे एव्हाना पोलिसांनासुद्धा ठाऊक झालं होतं. एशियाटिक सोसायटी हे दुर्गाताईंचं दुसरं घरच होतं. मुंबई विद्यापीठाशी बेबनाव झाल्यावर त्यांनी एशियाटिक सोसायटी आपलीशी केली होती. ज्ञानाची मक्तेदारी काही विद्यापीठाकडेच नाही, विद्यापीठात पाऊल न टाकता स्वतःच्या बळावर कुणीही अभ्यास करू शकतो, असं सिद्ध करून टाकणारी संस्था म्हणजे एशियाटिक सोसायटी अशी त्यांची धारणा होती नि ती त्यांनी आयुष्यभर जोपासली. एशियाटिक सोसायटीने विद्यापीठाकडे मान्यतेची याचना करणं त्यांना मुळीच मान्य नव्हतं. 

विद्यापीठाशी फटकून विद्यापीठात अद्याप न शिकवल्या जाणाऱ्या लोकसाहित्यासारख्या विषयावर संशोधन करून त्यांनी मराठीमध्ये एक नवं दालनच उघडून दिलं. नंतरचं दलित साहित्य वगैरे गोष्टी म्हणजे एक प्रकारे ह्या बीजालाच फुटलेले अंकुर आहे. दुर्गाताईंना ही एक विलक्षण नजर लाभली होती.
---

दिवसभराच्या लेखन-वाचनानंतर संध्याकाळी एशियाटिक सोसायटीतनं बाहेर पडून फाऊंटनकडे जाताना समोरच्या हॉर्निमन सर्कलच्या बागेत कधीकधी त्या 'जरा बसूया' म्हणायच्या. दहापंधरा मिनिटांनी उठताना एकदा म्हणाल्या, 'आता हे पंधरावीस वर्षांपूर्वी मला असं तुझ्याबरोबर बसता आलं असतं का? आता वय झालं, आता सगळं चालतं. काही बिघडत नाही. आपण आपलं म्हातारपण एन्जॉय करावं!'

दुर्गाताई हे प्रकरण एकंदर मराठी माणसाला झेपणारं नव्हतंच, ही गोष्ट आता त्या गेल्यावर जे काय लिहून आलं, त्यावरनंसुद्धा कळते. पण दुर्गाताईंना डावलून पुढे जाणंसुद्धा मराठी माणसाला शक्य नाही, एवढं खरं!
***

दुर्गाबाई 'रेघे'वर यापूर्वी : १९७५च्या साहित्य संमेलनातलं अध्यक्षीय भाषण
***

अशोक शहाणे 'रेघे'वर यापूर्वी : तथागत कवी (अरुण कोलटकरांविषयीचा लेख)
***

9 comments:

  1. Sateesh

    दुर्गाताई हे प्रकरण एकंदर मराठी माणसाला झेपणारं नव्हतंच...

    अशोक शहाणे यांच्या या वाक्याविषयी एकदम सहमत व्हायला होतं. फार छान लेख लिहिलाय. मलाही दुर्गाबाई भागवत आवडतात. त्या पेलवतात कितपत याची शंकाच आहे. पण त्या छानच लिहीत, वेगळं लिहीत, अभ्यासून लिहीत. शान्ता ज. शेळके यांनीही त्यांच्याविषयी फार मस्त लिहिलंय. जाता जाता... महाराष्ट्राला ने पेलवलेली आणि न झेपलेली खूप माणसं होती. त्यांच्या विषयी लिहिलं पाहिजे, वाचलं पाहिजे. हा छान लेख उपलब्ध करून दिल्याबद्दल रेघेपुढं कौतुकाचं उद्गारचिन्ह.

    ReplyDelete
  2. दुर्गाबाई या नेमक्या कशा होत्या यावर प्रकाश टाकणारे काही फार चांगले मासले नमूद झाले इथे .. धन्यवाद !

    ReplyDelete
  3. लेख आवडला.खऱ्या दुर्गाबाई भोटल्या सारखं वाटलं.दुर्गाताई मुंबईत परतल्या. सांगत होत्या, 'जे ऐकलं ते लिहिणं आपल्या कुवतीपलीकडचं आहे. आपण लेखक आहोत ह्याची पहिल्यांदा लाज वाटली. आपण नाही लिहू शकत हे.' असं जर दुर्गाबाईंसारख्या निडर बाईंचं आणि राजिंदरसिंग बेदींचं होतं तर आम्हा पामरांची काय कथा.लिहायला हव्यात पण लिहिता येत नाहीत अशा गोष्टींची बोच वाटायची ती थोडी कमी झाली.

    ReplyDelete
  4. वास्तव स्वीकारायला कठीण जाते.....मानवी मनाच्या गुंतागुंतीला हात घालणे हे मनोवैज्ञानिकाचे काम आहे.क्लिनिकल मानसशास्त्राच्या अभ्यासकाने ते करणे अपेक्षित आहे. प्रतिभेचे लेणे लाभलेल्या साहित्यिकांनी ते करता येत नाही म्हणून दुखः मानू नये. निर्विकारपणाने त्यांत लक्ष घातले तर समजाचा निश्चितच दूरगामी फायदा होईल यात शंका नाही. प्रदीप आठवले पुणे १६.

    ReplyDelete
  5. दुर्गाबाई यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांचे लिखाण पचवणे अवघडच आहे . 'ऐसपैस गप्पा दुर्गा बाईंशी " हे पुस्तक जरा त्यांना समजावून घेण्यासाठी मदत करते . पण मग कुठलेतरी वेगळेच पैलू समोर येतात . त्यांना त्रिवार वंदन

    SUCHETA KHER

    ReplyDelete
  6. एकाच व्यक्ती मध्ये एवढे काही एकवटलेले पाहून अचंबित व्हयला होते. साहित्य संमेलनातील भूमिका पाहता बाकीच्या साहित्यिकांचा खुजेपणा डाचत राहतो.

    अवांतर :
    मागे एकदा पानवलकरांच्या ब्लॉगवर कमेंट केली होती मी. पण तेव्हा रेघेविषयी कल्पना नव्हती. पण मयुरेश कोण्णुरने रेकमेंड केल्यापासून नियमितपणे हा ब्लॉग वाचतोय.
    रेघेवरच्या सगळ्याच 'नोंदी' मला झेपतात असे म्हणणे धाडसाचे आहे. पण रेघ हे अतिशय गांभीर्याने चालणारे मराठीमधले एक खूप महत्वाचे magazine आहे हे मात्र निःसंशय ! कारण थक्क व्हावे इतक्या सातत्याने रेघेवर नोंदी होत आहेत (आणि त्याही वैविध्यपूर्ण) . keep it up !




    ReplyDelete
  7. -Sateesh, -chaitanya kunte, -sushama, -SUCHETA KHER, -पश्या,
    प्रतिक्रियांबद्दल थँक्स. लेखाचं सगळं श्रेय अर्थातच शहाण्यांना देऊया.

    PRADEEP ATHAVALE, प्रतिक्रियेबद्दल थँक्स. मत पटलेलं नाही.
    ***

    पश्या भाऊ,
    ''रेघ हे अतिशय गांभीर्याने चालणारे मराठीमधले एक खूप महत्वाचे magazine आहे हे मात्र निःसंशय!'' - थँक्स.

    ReplyDelete
  8. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  9. durgabaina Raja Dhaleni niruttar kele te nahi lihile .te sudhha karadchya samelnatach ghadale hote na..ani Yashwantrao chavan 'gentalman ' hote. durgabainche kautuk kartana tyanchyavar tika kashyala?

    ReplyDelete