जाहिराती
आज (६ जानेवारी २०२५) 'लोकमत' या वृत्तपत्राच्या नागपूर, अकोला, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि अहिल्यानगर आवृत्त्यांच्या पहिल्या पूर्ण पानावर 'लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी' या कंपनीची जाहिरात आहे. हीच पूर्ण पानाची जाहिरात 'लोकसत्ता'च्या नागपूर, पुणे, मुंबई आवृत्त्यांमध्ये पाचव्या पानावर, आणि नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर आवृत्त्यांमध्ये बाराव्या (शेवटच्या) पानावर आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी १ जानेवारी रोजी केलेल्या गडचिरोलीदौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही पूर्ण रंगीत जाहिरात आल्याचं मजकुरावरून कळतं. इंग्रजी मजकुराचं यांत्रिक-कृत्रिम प्रभावाखालचं मराठी भाषांतर या जाहिरातीत आहे, त्यामुळे कुठल्याही प्रदेशातल्या मराठी माणसांना ते सगळं वाचणं जिकिरीचं जाईल. सुरुवातीचाच ठळक मजकूर पाहा: 'गडचिरोली सर्व योग्य कारणास्तव मथळे बनवत आहे आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत त्याच्या मजबूत औद्योगिक व्यवस्थेद्वारे महत्त्वपूर्ण योगदान देण्यास तयार आहे. Lloyds Metals and Energy Limited केवळ स्वच्छ ऊर्जा उपायच देत नाही तर औद्योगिक नवोपक्रमाद्वारे या प्रदेशाला यशोगाथा लिहिण्यास मदत करत आहे, तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा अखंडपणे समुदाय कल्याणाशी मिलाफ करत आहे.' शिवाय, काही पूर्णच निराधार, निरर्थक आणि हास्यास्पद विधानंही त्यात आली आहेत. उदाहरणार्थ, मुख्यमंत्र्यांच्या अवतरणातलं पहिलं वाक्य असं आहे: 'गडचिरोलीला भारताची राजधानी म्हणून स्थापित करण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न करत आहोत.' बाकी, छायाचित्रांची भरघोस मांडणी, अलंकारिक शब्दांचा भडीमार करणाऱ्या या जाहिरातपर मजकुरात 'इको-फ्रेंडली खाणकाम', 'शाश्वत खाणपद्धती', 'एक शाश्वत दृष्टी' असे उप-विभागांचे मथळे आहेत. एखाद्या विशेष लेखासारखी मांडणी असणारा, मुख्यमंत्र्यांची आणि पंतप्रधानांची अवतरणं खास चौकटीत देणारा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटन-समारंभांची छायाचित्रं वापरणारा हा सर्व मजकूर एका खाजगी पोलाद-निर्मिती कंपनीच्या जाहिरातीचा असल्याचं आताच्या काळात सर्वांनाच कळेल, असं मानायचं असेल त्यांनी मानावं. 'लोकसत्ता'ने पानाच्या वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात ADVERTORIAL असा इंग्रजी शब्द बारीक ठशात छापलेला आहे, 'लोकमत'ने खालच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात RCI असं छापलं आहे. बातमी आणि जाहिरात यातली फारकत फक्त एका कोपऱ्यातल्या धूसर शब्दावर आणि वाचकांच्या समजुतीच्या भरवशावर सोडून दिलेली आहे.
लोकसत्ता, नागपूर आवृत्ती, २६ जानेवारी २०२५ |
लोकमत, नागपूर आवृत्ती, २६ जानेवारी २०२५ |
आत्ताचे मुख्यमंत्री मधल्या काळात उपमुख्यमंत्री होते तेव्हा, १५ ऑगस्ट २०२३ रोजीही त्यांनी गडचिरोलीदौरा केला होता. तेव्हा त्यांच्या व्यक्तिगत अधिकृत यू-ट्यूब चॅनलवरही लॉइड कंपनीची सुमारे सव्वासात मिनिटांची व्हिडिओ-जाहिरात शेअर करण्यात आली होती. 'लॉयड मेटल्स गडचिरोली, महाराष्ट्र आणि देशाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे! । गडचिरोली' असा त्या जाहिरातीचा मथळा होता. या जाहिरातीत सुरुवातीलाच पुढील वाक्य कानावर पडतं: 'माननीय उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आपण गडचिरोली पोलील दलाच्या पुरुष अंमलदार बरॅक उद्घाटन समारंभाला आलात. आम्ही लॉइड्स मेट्लस अँड एनर्जी परिसरात आपले स्वागत करतो'. एका खाजगी कंपनीचा असा जाहिरातपर व्हिडिओ उप-मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या अधिकृत चॅनलवरून शेअर करणं (त्यातही पोलिसांशी संबंधित उद्घाटनाच्या एका कार्यक्रमानिमित्त संबंधित कंपनीने केलेली ही जाहिरात असणं), संबंधित कंपनीने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबद्दलची अवतरणं-छायाचित्रं आपल्या वृत्तपत्रीय जाहिरातीत वापरणं, ही बाब आता कदाचित आपल्याला धक्कादायकही वाटणार नाही इतकी रुळून गेलेली आहे.
आता मुख्यमंत्री असणाऱ्या फडणवीस यांच्या गडचिरोलीतील ताज्या दौऱ्याबद्दल विरोधकांनीही त्यांचं कौतुक केलं. सत्ताधारी भाजपच्या सध्याच्या कट्टर विरोधकांपैकी एक असणाऱ्या 'शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे' पक्षाच्या 'सामना' या मुखपत्रात फडणवीसांनी गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात 'विकासाचं नवं पर्व' सुरू केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात आलं ('देवाभाऊ, अभिनंदन!', सामना, ३ जानेवारी). गडचिरोली जिल्ह्यातील विकासाची प्रक्रियेसंदर्भात आर. आर. पाटील यांनी केलेलं काम देवेंद्र फडणवीस पुढे नेत आहेत, ही चांगली गोष्ट असून ते एकटेच प्रामाणिकपणे काम करत असल्याचं दिसतं, अशी प्रशंसा 'राष्ट्रवादी काँग्रेस- शरद्चंद्र पवार' या पक्षाच्या प्रमुख नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या (इंडियन एक्सप्रेस, ५ जानेवारी; झी-२४ तास, ५ जानेवारी). एका अर्थी, काही विशिष्ट मुद्द्यांवर सर्व राजकीय वर्गाची वृत्ती कोणती आहे, याचासुद्धा हा प्रातिनिधिक दाखला आहे.
पण पोलीस चौक्यांचं उद्घाटन आणि पोलाद-प्रकल्पांचं उद्घाटन, या दोन्ही गोष्टी एकाच फटक्यात करत जाण्याला विकासाचा मार्ग मानणं धोकादायक आहे. याबद्दल आपण पूर्वीही नोंदी केल्या आहेत. स्थानिक लोकांशी संवाद न साधता केवळ पोलिसी बळाच्या आधाराने औद्योगिकतेचा विस्तार झाला तरी त्या विकासाचा स्थानिक पातळीवर काय अर्थ उरेल? स्थानिकांची पूर्वापार उपजीविकेची साधनं आणि त्या साधनांभोवतीचा परिसर पूर्णपणे हिरावून घेऊन त्यांना एखाद्या पोलाद-प्रकल्पात कोणत्या स्तरावरचा रोजगार मिळेल, तो रोजगार किती 'शाश्वत' असेल? लोहखनिजाचं उत्खनन किती वर्षांच्या कालावधीकरता आहे; या संदर्भात वापरलेल्या 'शाश्वत' शब्दाची कालमर्यादा कोणती आहे? असे विविध प्रश्न या संदर्भात उपस्थित केले जातात. त्या प्रश्नांनाच धरून या प्रकल्पांना विरोधही होत असतो.
अशा प्रकल्पांना इतर घटकांसोबतच माओवाद्यांकडूनही विरोध होतो. पण त्यांचा विरोध फक्त या प्रकल्पांपुरता मर्यादित नाही, हे खरं आहे. माओवादी पक्षाच्या सैद्धान्तिक मांडणीनुसार, फक्त आत्ताचंच सरकार नव्हे तर एकंदरच भारतीय राज्यसंस्था 'निमसरंजामी आणि निमवासाहतिक' आणि भांडवलदारवर्गाची बटीक आहे. म्हणजे, ब्रिटिश गेले असले तरी सत्तेवर येणारे भारतीय नेतेही वासाहतिक वृत्तीनेच वागतात आणि रूढार्थाने लोकशाही स्वीकारली गेली असली तरी या वृत्तीमध्ये सरंजामी अंशही आहे, आणि हे सगळं मिळून भांडवलशाही व्यवस्थेला पोषक तऱ्हेने सुरू असतं, असा माओवाद्यांचा आरोप आहे. त्यामुळे अशा व्यवस्थेत काही निवडणुका वगैरे घेऊन बदल होणार नाही, तर प्रदीर्घ सशस्त्र युद्ध हाच यावरचा एकमेव उपाय आहे, अशी माओवाद्यांची मांडणी थोडक्यात सांगता येईल. पण अशा युद्धात सरकारी दलांकडच्या शस्त्रांशी आपली शस्त्रं किती काळ तोंड देऊ शकतील? अशा संघर्षात दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात मरण पावणाऱ्या आदिवासींच्या जगण्याचं मूल्य फक्त आपल्या सैद्धान्तिक आकलनावर जोखता येईल का? आपण एका विशिष्ट समाजव्यवस्थेचं स्वप्न सैद्धान्तिक पातळीवर स्वीकारलं असलं आणि आपण स्वतः त्यासाठी मृत्यू पत्करायलाही तयार असलो तरी, इतरांच्याही मृत्यूची आहुती त्यात किती काळ देत राहणार? असे प्रश्न यातून माओवाद्यांना विचारता येऊ शकतात. पण सरकार हिंसा करतंच, त्यामुळे आम्ही करतो ती प्रतिहिंसा आहे; किंवा बाहेर शांततेच्या नि सनदशीर मार्गांनी केल्या जाणाऱ्या मागण्यांना भीक घातली जात नाही, तर त्यामुळे सशस्त्र युद्ध अपरिहार्य होतं, असंही त्यांचं म्हणणं असतं. या मुद्द्यांवर समाधानकारक उत्तरं देता येतील अशी स्थिती प्रचलित लोकशाहीचं सरकार निर्माण करत नाही तोवर हे सर्व प्रश्न तेवढे 'शाश्वत' राहतील.
या प्रश्नांशी निगडीत काही नोंदी 'रेघे'वर आधीही केल्या आहेतच. सध्या गडचिरोलीतील लोहखनिजाचा प्रकल्प, विकास आणि स्थानिक लोकांची उपजीविका, एवढ्यापुरतंच बोलायचं तर पुढील दोन नोंदी वाचणं कदाचित उपयोगी पडेल. गडचिरोलीत जाऊन स्थानिक लोकांशी बोलून यात काही तपशील मांडायचा प्रयत्न केला होता. लॉइड कंपनीच्या प्रकल्पाखाली येणारा भागही त्यात आहे.
- भारतीय प्रजासत्ताकाची बस आणि 'पेसा' (२६ जानेवारी २०१६)
- तोडगट्ट्यातल्या आदिवासींचं म्हणणं काय होतं? (२३ नोव्हेंबर २०२३)
'जोरम'
जोरम हे तीन महिन्यांच्या एका मुलीचं नाव आहे. तिच्या आईचा मुंबईत एका बांधकामाखालील इमारतीत खून झालाय आणि आता तिचा बाप तिला घेऊन स्वतःचा जीव वाचवत धावतोय. बापाचं नाव दसरू केरकट्टा.
मूळ झारखंडमधलं एक गाव. लोहखनिजाच्या खाणीसाठी भूसंपादनात दसरूचं गाव, त्याची जमीन गमावण्याचं संकट समोर उभं ठाकतं. एका आदिवासी आमदाराचा मुलगा या व्यवहारात दलाल म्हणून कार्यरत असतो. या तणावाच्या परिस्थितीत दसरू नक्षलवादी दलममध्ये जाऊन सहभागी होतो. त्यानंतरच्या घडामोडींमध्ये आमदाराच्या मुलाला नक्षलवाद्यांच्या 'जनअदालती'त देहदंडाची शिक्षा ठोठावली जाते. या शिक्षेच्या अंमलबजावणीत दसरूचाही सहभाग असतो (लटकावलेल्या माणसाला मारलं जात असताना दोरी धरण्यापुरता). पण या अनुभवाने हादरून दसरू नक्षलवादी दलममधून बाहेर पडतो आणि बायकोसोबत मुंबईला निघून जातो. तिथे तो बांधकाम मजूर म्हणून काम करायला लागतो. पाच वर्षं जातात. दरम्यान, संबंधित आदिवासी आमदाराची पत्नी- फुलो कर्मा- त्याच्या पक्षाची नेती होते, आणि ती मुंबईत काही कार्यक्रमानिमित्त आलेली असते. एका ठिकाणी तिच्या वतीने सोलार बॅटऱ्यांचं वाटप केलं जात असतं, तिथे तिला दसरू दिसतो. आपल्या मुलाच्या हत्येशी संबंधित व्यक्तींपैकी दसरू हाच असल्याची खात्री ती करून घेते. दसरू इतर मजुरांप्रमाणे बांधकामाच्याच ठिकाणी एका तात्पुरत्या कोपऱ्याला घर मानून जगत असतो. फुलो दिसल्यावर तोही सावध होतो. पण एकदा तो संध्याकाळी बाहेरून घरी येतो तेव्हा बायकोला मारून टाकण्यात आल्याचं त्याला दिसतं. पत्नीच्या खून त्यानेच केल्याचं भासवण्यासाठीची तजवीज फुलोने केलेली असते. त्यामुळे पोलीस दसरूच्या मागे लागतात. दसरू मुलीसह तिथून कसाबसा पळ काढतो. ट्रेन पकडून मग झारखंडला आपल्या गावी पोचतो. मुलीसोबत स्वतःचा जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करणारा दसरू (मनोज वाजपेयी), त्या प्रवासात दसरूच्या मागे लागलेला (दलित समुदायातील) पोलीस अधिकारी रत्नाकर (झिशान अय्युब), फुलो (स्मिता तांबे) आणि इतर काही माणसं- यांची वेगवेगळी दुःखं आपल्या समोर येतात. प्रत्येक जण त्या दुःखावरचा उतारा शोधू पाहतो, पण त्या उताऱ्यामध्ये दुसऱ्याचं दुःख दिसत राहतं, असा हा एक दुःखांचाही गुंतागुंतीचा प्रवास आहे.
देवाशिष मखिजा यांनी दिग्दर्शित केलेल्या 'जोरम' या चित्रपटाच्या कथानकाचा थोडाच सारांश वरती नोंदवला. हा चित्रपट २०२३ सालच्या सुरुवातीला प्रदर्शित होऊन गेला. आता तो यू-ट्यूबवर अधिकृतरीत्या बघायला मिळतो- ही लिंक. चित्रपट म्हणून त्यात काही कमी-अधिक नोंदवता येऊ शकेल. विशेषतः शेवटाकडे घडवलेला नाट्यमय प्रसंग काही बाबतीत दुबळा ठरतो- उदाहरणार्थ, दसरू पोलिसांपासून पळताना एका जीपच्या मागे धरून जाताना दिसतो. सिक्युरिटीवाल्यांना तो दिसूनही ते त्याला का पुढे सोडतात याचा तर्क साधारपणे दाखवला आहे. पण मुळात नक्षलवादी दलममध्ये काम केलेला माणूस अशा गाफील पद्धतीने गाडीला उघडपणे मागे धरून जाईल, यावर विश्वास बसणं अवघड आहे. पण आपला आत्ताचा मुद्दा चित्रपटाचं विश्लेषण करणारा नाही. चित्रपटाचा एकंदर अवकाश आपल्या नोंदीशी संबंधित आहे. अगदीच दाखला हवा असेल तर, पुढे चिकटवलेल्या या चित्रपटातील काही दृश्यचौकटी पाहा. त्यांची वरच्या जाहिरातींशी आपोआप सांगड बसेल. विकासाच्या जाहिरातींमध्ये न येणारा मानवी जगण्यावरचा आणि आजूबाजूच्या परिसरावरचा या प्रक्रियेचा परिणाम त्यातून काही अंशाने दिसू शकेल.
चित्रपटातील या चौकटींचं सर्व श्रेय दिग्दर्शक-निर्माते-छायाचित्रणकार आदींना. आधी संबंधित चौकटीविषयीची ओळ लिहून मग चौकट चिकटवली आहे-
प्रगतीच्या मार्गावर स्वागत करणारा 'प्रगती स्टील'चा फलक-
मुकेश चंद्राकर- पोलिसी गोळीबारात मरण पावलेल्या सहा महिन्यांच्या मंगली या मुलीच्या संदर्भात वार्तांकन करताना, ४ जानेवारी २०२४ |
बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दर्पण' या मराठी पाक्षिकाचा पहिला अंक ६ जानेवारी १८३२ रोजी छापून प्रकाशित केला. त्यामुळे ६ जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.
जांभेकर 'दर्पण'च्या पहिल्या अंकात म्हणाले होते: 'कोणा एकाचा पक्षपात किंवा नीचपणा या दोघांचा मळ या दर्पणास लागणार नाही. कारण की दर्पण छापणारांचे लक्ष्य निष्कृत्रिम आहे.' नंतर एका अंकात पत्रकारितेविषयी बोलताना त्यांनी लिहिलं, 'पत्रव्यवसायात मानवी स्वभावाच्या निरिक्षणाला खूप अवसर असतो. जितका पत्रकाराचा अनुभव व्यापक व निरिक्षण सूक्ष्म तितके त्याचे लेखन सकस व प्रत्ययकारी. (संदर्भ: 'महाराष्ट्राचे शिल्पकार : बाळशास्त्री जांभेकर', शिवकुमार सोनाळकर, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, फेब्रुवारी २०२२: पानं अनुक्रमे ३१ आणि १०६).
जांभेकरांच्या या विधानांमधले शब्दप्रयोग वापरून बोलायचं तर, 'पक्षपात आणि नीचपणाचा मळ' हे आता माध्यमांचं वैशिष्ट्य झाल्याचं दिसतं, आणि 'व्यापक अनुभव नि सूक्ष्म निरीक्षण' ही पत्रकारितेची वैशिष्ट्यं मात्र प्राधान्यक्रमावर उरलेली नाहीत. किंबहुना, अशी वैशिष्ट्यं टिकवू पाहणाऱ्या पत्रकारांचा मार्ग बिकट झालेला आहे.
०
'जोरम' चित्रपटातील खाणीच्या परिसराची दृश्यचौकट |