Thursday 16 August 2012

माझी ओडिया

- आळश्यांचा राजा


ओरिसात प्रशासनातील वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या एका मराठी अधिकाऱ्याचा हा लेख आहे. हे अधिकारी गृहस्थ स्वतः 'आळश्यांचा राजा' या टोपणनावाने 'शाणपट्टी' हा ब्लॉग लिहितात. त्यांच्या ब्लॉगबद्दल 'लोकसत्ते'तल्या 'वाचावे नेट-के' या सदरात मजकूर प्रसिद्ध झाला होता. त्या मजकुरावरून ब्लॉग पाहिला, त्यात 'माझी ओडिया' ही त्यांची पोस्ट वाचायला मिळाली. त्यानंतर ई-मेल पाठवून त्यांची परवानगी घेऊन ही पोस्ट 'रेघे'वर प्रसिद्ध होत आहे. ही पोस्ट 'आळश्यांचा राजा' या नावाने प्रसिद्ध व्हावी अशी त्यांची इच्छा असल्यामुळे इथे लेखकाचं टोपणनावच दिलं आहे. याशिवाय त्यांच्या ब्लॉगवरची 'नक्षलवादाच्या निमित्ताने' ही पोस्टही वाचनीय. आता वाचा 'माझी ओडिया' -



भाषावार प्रांतरचनेमुळे मला वाटत होते की ओडिया ही बऱ्यापैकी एकसंध भाषा असून संपूर्ण ओरिसा राज्यात थोड्याफार फरकाने एक प्रमाण भाषा म्हणून प्रचलित असेल. पण हे तितकेसे खरे नाही. अर्थात विविधता ही सर्वच भाषांमध्ये असते. माझा एक मित्र यवतमाळहून पुण्याला शिकायला आला होता तेव्हा त्याचे मित्र त्याला म्हणाले होते, सांभाळ बे, तिकडचे लोक छापल्यासारखे बोलतात! भाषा दहा कोसांवर बदलते म्हणतात. पण ओडियामध्ये असे बदल लक्षणीय आहेत. संबलपूर भागातील ओडिया ही कटक – पुरी भागातील ओडियापेक्षा इतकी निराळी आहे की आपल्याला आपल्या कोंकणी, अहिराणीची आठवण व्हावी. इथे एका भाषातज्ज्ञांनी तर संबलपुरी – ओडिया शब्दकोषच काढला आहे. भुवनेश्वरमध्ये सुरुवातीला आलो तेव्हा सुलभाने एका अटेण्डण्टला विचारले, वो सुरेश को हिंदी आती नही क्या? तर तो म्हणाला, मॅडम, उसे तो ओडिया भी नही आती, वो संबलपुरीया है! संबलपूर भागातील जुनी माणसे अजून कटक – पुरी ला जायचे असेल तर म्हणतात, ओडिसाला जायचे आहे! (इथे प्रादेशिकता फार. कटकिया, अंगुलिया, ढेंकेनालिया, संबलपुरिया, इ. ओडिया कुणीच नाही. बाहेरच्या माणसांनी या सर्वांना म्हणायचे.)

आपल्या प्रमाण मराठीमध्ये (असला काही प्रकार आहे हे गृहीतक!) जसे लिहिले असेल तसे उच्चारण असते (तुलना सोपी व्हावी म्हणून इंग्लिश शब्दांची उदाहरणे देतो) उदा. हॉटेल, बँक. हिंदीमध्ये उलट, जसा उच्चार तसे लिखाण उदा. होटल, बैंक. पण ओडियामध्ये उच्चार वेगळा, लिखाण वेगळे: म्हणतील 'होटेल' आणि लिहितील 'हटेल'. 'फोटो' म्हणणार पण लिहिणार 'फट'. 'लॉज' म्हणणार पण लिहिणार 'लज'. 'कॉट'ला 'कट'. (एकदा माझ्या असिस्टंटने 'सी ओ टी'ऐवजी 'सी यू टी' असेच स्पेलिंग लिहिले होते.) खरंतर इथे 'ओ' पण स्पष्ट नसतो. अ, ओ आणि ऑ च्या मधला एक स्वर असतो. तोच ‘अ’ ला पण चालतो. बारकाईने ऐकला तर लक्षात येतो. कसे साधतात आश्चर्यच आहे. या भाषेत ‘व’ नाही. ‘व’ ला ‘ब’ म्हणतात. ‘व्ह’ ला ‘भ’ म्हणतात. 'ड्राइव्हिंग'ला लिहितात 'ड्राइभिं'. 'प्रभात'ला 'प्रवात'. स, श, आणि ष तिन्ही लिहितात वेगवेगळे, पण उच्चार एकच – स. म्हणूनच 'ओडिशा'ला 'ओडिसा' म्हणतात. (ओड्र विशय – ओडि विशा – ओडिशा). बऱ्याच जणांना हलका ‘ड’ चा उच्चार नीट जमत नाही. घोडा सडकपे दौडा असे म्हणणार – घोरा सरकपे दौरा. म्हणून ओरिसा. आपण मराठी बिचारे जसे ते बोलतात अगदी तसे बोलून दाखवतो – आपले संस्कार करत बसत नाही!

आम्हाला भाषा शिकवायला एक तज्ज्ञ येत असत. त्रिपाठी नावाचे. ते म्हणायचे ओडिया इज अॅन ‘अ’फुल लॅंग्वेज! ('अ'चा उच्चार 'ऑ'सारखा). म्हणजे प्रत्येक शब्दाच्या शेवटी ‘अ’ हे जोडायचेच. हलन्त ठेवायचा नाही. म्हणजे अमिताभ नाही, अमिताभं. जोडाक्षरांची पण गंमत. इतर लिप्यांमध्ये एका ओळीत जोडाक्षरे असतात. इथे एकाखाली एक. त्यामुळे मुद्रणात अडचणी येतात. मग जोडाक्षर आले की फाँट साइझ एकाच शब्दामध्ये दोन अक्षरांसाठी वेगवेगळा!  

त्रिपाठी सर वयस्क असले तरी काळाच्या बरोबर चालणारे होते. त्यांनी ओडियातले बरेच बारकावे आम्हाला समजावून दिले. त्यांच्या मते भाषा जिवंत ठेवायची असेल तर नवीन तंत्रज्ञानाच्या सोबत तिने चालायला हवे. मोबाइल फोन, इंटरनेटवर सहजरीत्या व्यक्त होऊ शकली पाहिजे. त्यासाठी लिपीतले बोजड कालबाह्य प्रघात काढून टाकायला हवेत असे ते म्हणत. हिंदी, मराठी, बांग्ला, तेलुगू इ. भाषा ज्या गतीने इंटरनेटवर आणि मोबाइलवर पसरत आहेत त्या तुलनेत ओडिया बरीच मागे आहे याची त्यांना खंत वाटे. पण ते गप्प बसणारातले नव्हेत. भाषातज्ज्ञ, प्रमुख वृत्तपत्रांचे संपादक आणि सॉफ्ट्वेअर डेव्हलपरांच्या एका सेमिनारमध्ये त्यांनी आपले मुद्दे ठासून मांडले आणि मान्य करवून घेतले. या प्रयत्नांनी इंटरनेटवर ओडिया किती पसरते ते पहावे लागेल.

भाषेवर संस्कृतीची छाप असतेच असते. जसा लोकस्वभाव तशी भाषा. मराठी आणि उर्दू पहा. उर्दूतले आर्जव, ‘दरबारी’ औपचारिकता साध्या सरळ रांगड्या मराठीत नाही. ‘आइये, आइये, तशरीफ रखीये’ला मराठीत म्हणतील, ‘या, बसा.’ त्याच न्यायाने ओडिया स्वभावही या भाषेत दिसतो. हे लोक बंगाली लोकांप्रमाणे बोलण्यात पटाईत. यांना संस्कृतचे फार प्रेम. आपल्याला एखादा शब्द आठवला नाही तर खुशाल संस्कृत शब्द ठोकून द्यायचा! उदाहरण म्हणून सांगतो, कमी दाबाचा पट्टा तयार होण्याला इथे ‘लघुचापसृष्टी’ म्हणतात! म्हणजे पारिभाषिक शब्द नव्हे, बोलण्यात वापरतात. एकदा मला माझ्या अॅकॅडमीतल्या मॅडमना विचारायचे होते, आपली तब्येत बरी आहे ना? मी माझ्या अंदाजाने म्हणालो, आपणंकं प्रकृति भलं अछि तो? त्यांनी मला दुरुस्त केले – आपणंकं देहं भलं अछि तो? विचार करा, मराठीत मी बाईंना विचारतो – आपला देह बरा आहे ना! बाई काय अर्थ घेतील सांगता येणार नाही. माणूस मरण्याला चक्क ‘नष्ट’ होणे म्हणतात. पण शब्द थोडे विचित्र असले तरी व्याकरण मराठीच्या तुलनेत फारच सोपे. क्रियापदाला ब, छ, ल जोडले की झाले भविष्य, वर्तमान आणि भूतकाळ. म्हणजे मु खाइबि – मी खाईन, मु खाइछि – मी (नुकतेच) खाल्लेले आहे, मु खाइलि – मी खाल्ले. असो. बोलण्याची ढब अशी की आळसावून बोलल्यासारखी. (ओडिया लोक उद्योगी म्हणून मुळीच प्रसिद्ध नाहीत.) म्हणूनच ते व, व्ह असले आवाज काढण्याचे कष्ट घेत नाहीत.

माझ्या हिंदी मित्रांना आश्चर्य वाटते की मी इथल्यासारखेच उच्चार कसे काय करू शकतो. पण त्यांना काय माहीत की मी आळश्यांचा राजा आहे, आणि ही माझीच भाषा आहे !

1 comment:

  1. 'भाषा जिवंत ठेवायची असेल तर नवीन तंत्रज्ञानाच्या सोबत तिने चालायला हवे'...एक नंबर ...अगदी सहमत..दुसरं एक विचारायचंय तू 'अॅकॅडमी' हा शब्द 'ऍकॅडेमी' असा का लिहितोस?काही विशेष कारण आहे का?

    ReplyDelete