०३ जानेवारी २०१३

तयास मानव म्हणावे का?

सावित्रीबाई फुले (चित्र : इथून)
सावित्रीबाई फुले. जन्म - ३ जानेवारी १८३१. (मृत्यू १० मार्च १८९७)
सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त त्यांची एक कविता-

ज्ञान नाही विद्या नाही
ते घेणेची गोडी नाही
बुध्दी असुनि चालत नाही
तयास मानव म्हणावे का?

दे रे हरी पलंगी काही
पशुही ऐसे बोलत नाही
विचार ना आचार काही
तयास मानव म्हणावे का?

पोरे घरात कमी नाही
तयांच्या खाण्यासाठीही
ना करी तो उद्योग काही
तयास मानव म्हणावे का?

सहानुभूती मिळत नाही
मदत न मिळे कोणाचीही
पर्वा न करी कशाचीही
तयास मानव म्हणावे का?

दुसर्‍यास मदत नाही
सेवा त्याग दया माया ही
जयापाशी सद्गुण नाही
तयास मानव म्हणावे का?

ज्योतिष रमल सामुद्रीकही
स्वर्ग नरकाच्या कल्पनाही
पशुत नाही त्या जो पाही
तयास मानव म्हणावे का?

बाईल काम करीत राही
ऐतोबा हा खात राही
पशू पक्षात ऐसे नाही
तयास मानव म्हणावे का?

पशुपक्षी माकड माणुसही
जन्ममृत्यु सर्वांनाही
याचे ज्ञान जराही नाही
तयास मानव म्हणावे का?
***

'महार मांगांच्या दुःखाविषयी' हा निबंध सावित्रीबाई व जोतिबा फुले यांच्या शाळेत शिकणाऱ्या मुक्ताबाई या चौदा वर्षांच्या मुलीने लिहिला. १८५५मधे. त्याची प्रत आत्ता माझ्या हाताशी नाहीये, खरं म्हणजे तो निबंध आजच्या निमित्ताने इथे नोंदवायचा होता.

२ टिप्पण्या:

  1. a very small part of Muktabai's essay is quoted in the following post on my blog...http://searchingforlaugh.blogspot.in/2011/06/black-eliza-dalit-muktabai-and-brahmin.html

    उत्तर द्याहटवा
  2. सावित्रीबाई चांगल्या लेखिका होत्या आणि स्वतंत्र व्यक्तीपण...यापूर्वीही त्यांचं थोडं वाचलेलं आहे. पण ही कविता वाचून खूप जास्त बरं वाटलं. आणि सध्या जे सुरु आहे त्या पार्श्वभूमीवर अगदी ठळक उठून दिसतं.

    अनिरुद्ध, तुमच्या ब्लॉग वरचा मुक्ताबाई चा लेख वाचलाच पण त्याच पोस्टमधे दिलेल्या लिंकवरून नजमा हेपतुल्ला यांच्या भाषणावरची पोस्ट ही वाचली. दोन्ही पोस्ट आवडल्या. मुक्ताबाई चा मूळ लेख वाचायला अजून आवडलं असतं. तरी धन्यवाद.

    अश्विनी

    उत्तर द्याहटवा