Monday 27 May 2013

नेमाडे : व्यक्ती आणि प्रकृती - भाऊ पाध्ये

भालचंद्र नेमाडे यांचा जन्म २७ मे १९३८ रोजी झाला. म्हणजे आज त्यांच्या वयाची पंच्याहत्तर वर्षं पूर्ण होतायंत. त्यानिमित्ताने 'रेघे'वर १९८८ सालचा एक लेख प्रसिद्ध होतोय. त्या वर्षी जुलैमध्ये 'ललित'च्या अंकात आलेला हा भाऊ पाध्ये यांचा लेख पंचवीस वर्षांनी पुन्हा प्रसिद्ध करून काय होईल? एकतर नेमाड्यांची पंच्याहत्तरी साजरी करता येईल आणि 'वाङ्मयीन इतिहास' असं ज्याला म्हणतात त्यालाही हातभार. आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे हा लेख वाचताना वाचकांना मजा येईल यात्री खात्री. भाऊ आता नाहीत. माणूस गेल्यानंतर अनेक संदर्भ बदलतात. माणसाचं वय बदलतं तसेही संदर्भ बदलतात. पण तरीही या लेखाची मजा वाचकांना घेता येईल? प्रयत्न करायला काय जातंय.
***

भालचंद्र नेमाडे
''हॅलो, इन्स्पेक्टर धुरंधर भाटवडेकर हिअर...'' असे शब्द 'रंगबिरंगी' या हृषिकेश मुखर्जीच्या चित्रपटात धडधडत कानांवर येतात... तशीच मी जेव्हा डॉ. भालचंद्र नेमाडे हे शब्द ऐकतो तेव्हा कानाच्या पडद्याची स्थिती होते. आणि 'रंगबिरंगी'मध्ये इन्स्पेक्टर धुरंधर भाटवडेकर हे नाव ऐकताच आपल्याला त्याचे दर्शन होण्यासाठी टेरिफिक उत्सुकता वाटते, तशी भालचंद्र नेमाडे हे नाव माझे मित्र अशोक शहाणे यांनी १९६०-६१ सालामध्ये 'रहस्यरंजन' मासिकाच्या कचेरीमध्ये उच्चारल्याबरोबर मलाही उत्सुकता वाटली होती. त्या वेळेस ते नुसते नेमाडे होते. त्यांच्या नावाचा गौरव हेमाडपंतांच्या स्टाइलवर नेमाडपंत असाही केला जात असे. कधी कधी नेमाड्या असाही. भालचंद्र अशी त्यांच्या नावाच्या भाळावर चंद्रकोर होती; तिचा फारसा कोणीही विचार करत नसत.

नेमाडे आम्हाला भेटले १९६० साली. हे एक मराठी साहित्यातील व्यवच्छेदक साल आहे. १९६० साली मराठी साहित्यातील लघुकथा-संस्कृतीची, सौंदर्यवादी समीक्षेची आणि सात छेद नसलेल्या काव्याची वाटचाल संपली आणि कोसला-संस्कृती, बांधिलकीवादी समीक्षा व नवकविता - मग ती दिलीप चित्रे, अरुण कोलटकरची किंवा नारायण सुर्वे आणि दया पवारांची - कुणाचीही म्हणा- यांची वाटचाल सुरू झाली होती. असे हे १९६० साल, ज्या वर्षी आम्हा बऱ्याचशा बोरूबहाद्दरांचा वाङ्मयीन जन्म झाला. आम्ही मराठी साहित्यात धडपडणारी मुले (साने गुरुजींचाही आम्हाला वारसा लाभल्याने) मराठी साहित्यामध्ये 'अमुक करावे - तमुक करावे' या इर्षेने पेटलेली उत्साही मंडळी - रमेश समर्थ, दिलीप चित्रे, अरुण कोलटकर, सुधीर कोलटकर, मनोहर ओक, अशोक शहाणे. डिकन्सच्या शब्दांत 'ते दिवस चांगले होते' - कारण अशी भरभक्कम मंडळी मराठी साहित्याचे बरेवाईट करण्यासाठी जिद्दीने उभी राहिली... 'ते दिवस वाईट होते' - कारण खिशात दमडा कुणाच्याच नसे, चहा प्यायचा, सिगारेटी फुंकायच्या, आंटीकडे जायचं, म्हणजे पैशाशिवाय कसं भागेल? या वाङ्मयप्रसूतीइतक्या मोलाच्या गोष्टी नव्हत्या; पण खिशात पैसा नसला की बोलावंच लागतं - ते दिवस वाईट होते...

असो. या १९६० साली मराठीमध्ये 'रहस्यरंजन' नामक एक मराठी मासिक धूमकेतूसारखे उगवले होते. जणू आम्हाला उधळण्यासाठी एक अंगण पाहिजे होते ते मिळाले. 'रहस्यरंजन'ची आयुर्मर्यादा सर्वगुणी मासिकांइतकीच. म्हणजे वर्ष-सहा महिने होती. हल्ली एखादा बिल्डर मोकळ्या मैदानावर कब्जा करतो त्याप्रमाणे नंतर ते मासिक आमच्या हातून गेले. या 'रहस्यरंजना'ची सूत्रे अशोक शहाणे हा आमचा मित्र सांभाळत असे. जुने जाऊ द्या मरणालागुनी, हा संपादकाचा खाक्या. मान्यवर, प्रतिष्ठासंपन्न वगैरे बनलेला लेखक - म्हणजे नकोच. एखादा माणूस ताजे ताजे लिहू लागला की त्याला चक्क गाठून तो साहित्यसेवेच्या वेठीला लावत होता. नटवर्य माधव वाटवे, संगीतकार जीतेंद्र अभिषेकी किंवा राजकारणातला मधू दंडवते वगैरे. त्यांच्याप्रमाणे नेमाडे या प्राण्यालाही अशोकने असाच धरला होता. चक्क कॉलेजमध्ये शिक्षण घेणारा, सांगवीसारख्या अनोख्या गावातला कारा विद्यार्थी. ''अरेss, नेमाडे काय ग्रेट आहे...! - अशोककरवी नेमाडेची साक्षात परिचय होण्यापूर्वी अटळ अशी ओळख. त्याला पाहण्यासाठी 'ग्रेट साहित्यिक दिसे कसा आननी' अशा प्रचंड अपेक्षेने तुडुंब न्हालो असता एक दिवस 'रहस्यरंजन'च्या कचेरीवर नेमाडे साक्षात हजर झाला. लांब लांब ढेंगा, डोळ्यांवर कठीण भिंगे, त्यातून तुमच्यावर फिक्स होणारी रिती नजर, तोंडात विडीचे इवलेसे थोटूक व एवढी लाख. भिवया ताणलेल्या. वर्तुळाकार, अर्धवर्तुळाकार अशा रीतीने हातवारे करीत, खर्ज लावून, अडखळत पण ठाम बोलणे-हसणे. कुठेही राखून वागणे नाही. पण एकूण त्याच्यामध्ये साने गुरुजींच्या गावाची शर्मिली छटा दिसायची. लिहिणारा बिनधास्त पहिलाच लेख वगैरे श्रीकेक्षींवर (श्री. के. क्षीरसागर). त्यांची त्यामुळे नक्कीच झोप उडाली असावी, आणि मराठी जो जो वाचतो त्याला त्याचे पाळण्यातले पाय दिसले. पहिल्याच लेखात 'कोसला'शैलीही आहे. उदाहरणार्थ, वगैरे वगैरे, ह्या लकबीबाबत म्हणत नाही. एकूणच शैली, वाक्यांमधली लय, शब्दयोजना वगैरे.

तर एकदा चिंतू खानोलकर माझ्याबरोबर लोकलमधून प्रवास करत होते. नेमाडेचा विषय निघाला, चिंतू हॉरर पिक्चरमधले कॅरेक्टर पाहिल्याप्रमाणे त्याचे भयभीत वर्णन करू लागला. ''काय दिसतो रे हा नेमाडे! कसा लांब लांब टांगा टाकत चालतो - आणि चष्म्यामधून रोखून पाहतो...''

आय एन्जॉइड चिंतू दॅट डे!

मराठी नामांकित दर्जेदार नियतकालिकांच्या भाग्याने 'रहस्यरंजन' बंद झाले. उरलं आमचं नशीब. अशोक पुण्याला गेला. माझी बॉम्बे डाइंगमधली नोकरी सुटली. रघू एकच नोकरीला होता. कुणीच काही करत नव्हते. 'अमुक करू या- तमुक करू या-' ही भाषाच बंद झाली होती.

तसे आम्ही 'रहस्यरंजन'च्या रिकाम्या मशिदीत फिरकत असूही. इथेच नेमाडेला मानणारी दोन मुले- राजा ढाले व वसंत गुर्जर- आम्हाला भेटली. ते काहीतरी लिहीत असावेत. नेमाडेला त्यांनी आपलं काहीतरी लिखाण दाखवलं असावं... नेमाडेने त्यांच्या पाठीवर थाप मारली होती. नेमाडेच्या वागण्यात कसलाच आखूडपणा दिसत नव्हता. नेमाडे त्यांच्याशी चांगला होता. पर्यायाने आम्हीही त्यांच्याशी चांगले झालो.

नेमाडे चर्चगेट स्टेशनजवळच्या युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमध्ये राहात होता. मी अनेकवेळा त्याला भेटायला जात असे. विशेषतः सकाळी, जेव्हा तो अर्धी रात्र वाचन वगैरे करून सकाळी उठायचा- आणि त्याला चहा हवा असायचा. म्हणजे त्याच्याबरोबर माझीही सोय होत असेच. 'सन्मान' का 'सत्कार'मध्ये आम्ही उतरत असू.

''भाऊ, चहा?...'' नेमाडेची पृच्छा.

''हूं... आणि मसाला डोसा.''

''मसाला डोसा?'' नेमाडे खिसा चाचपत...

मग स्वतःसाठी जाम-टोस्ट वगैरे. मला मसाला डोसा ऑर्डर करून म्हणत असे, ''तुला रघ्या सिंधी म्हणतो तो उगीच नाही!''

तो इतका माझा दोस्त. पण मी कधी साहित्यचर्चा वगैरे केल्याच नाहीत- कारण मला साहित्यात काही समजतच नव्हतं. तो काय शिकतो, कुठच्या वर्गात आहे हे मला ठाऊक नव्हतं. वर्गमित्र सांगत, तो तुकाराम वाचतो- आणि त्यातील अधोरेखित धुंडाळत वगैरे असतो. एक दिवस मी हॉस्टेलच्या दारावर गेलो. दार बंद. चौकशी करता समजलं की तो आपल्या घरी म्हणजे गावी गेला. त्याने परीक्षा वगैरे दिली का? मला एकदम आयुष्यात खड्डा पडल्यासारखं वाटलं. आता हा प्राणी केव्हा भेटणार?

'वैतागवाडी' पुण्याला 'साधना'वाले छापत होते. एक दिवस पुण्याला जाऊन काम पाहून यावं म्हणून मी निघालो. टिळक रोडवरून अश्लीलमार्तंड मराठ्यांचे घर शोधत शोधत अशोकला गाठले. त्याचा मुक्काम रा. ज. देशमुखांच्या वाड्यावर होता. तो आला नि माझे कपडे उचलले नि आम्ही देशमुखांच्या वाड्यावर पोहोचलो. तोपर्यंत नेमाडे मला भेटणार आहे याची कल्पनाही नव्हती. वाड्याच्या वळचणीला एका खोलीत नेमाडे कादंबरी लिहीत बसला होता. त्याला कोणी त्रास देऊ नये म्हणून त्याला बंदिवासातच ठेवले होते. आम्ही बोलायचो ते जेवणावरच.

नेमाडे आणि कादंबरी लिहितोय? अद्भुतच! एकूण त्याची प्रकृती समीक्षकाची म्हणून...! सध्या समीक्षकांनी काही बऱ्यापैकी क्रिएटिव्ह लिहिलेलं नाही. असो. नेमाडे त्याच्या सुप्रसिद्ध टोच्या थिअरीप्रमाणे लिहीत असताना दिसला. नीट कापलेल्या कागदांची एक थप्पी... लिहिलेल्या कागदांची दुसरी थप्पी. आणि नेमाडे कागदांसमोर अक्षरशः जेठा मारून बसलेला. एखादे प्रकरण लिहून काढायचा आणि अशोकच्या हातात ते देत म्हणाला, ''उदाहरणार्थ - मी वेताळच्या टेकडीचं प्रकरण कादंबरीत घालतो!'' अशोक, ''बरं!'' आणि वाचून काढून मग उत्साहात येऊन, ''अरे हे तर पाहिजेच!'' दरम्यान माझी नि अशोकची बोलणी. तिकडे छापखान्यामध्ये देशमुख एक एक प्रकरण नेऊन टाकताहेत आणि प्रुफे घेऊन येताहेत. मी दोन-तीन दिवसच मुक्कामाला होतो. काम इतके झपाट्याने चालले होते की मी निघता निघता कादंबरी छापून, बांधून तयार. देशमुख माझ्या हातात 'कोसला'ची प्रत देत म्हणाले, ''असं काहीतरी लिहा.'' म्हणजे ते छापणार होते! सुदैवाने, देशमुखांनी छापावे असे काही लिखाण माझ्या हातून झाले नाही. आणि नेमाडेला 'कोसला'चा जो अनुभव आला त्यावरून झाले नाही ते बरेच असे म्हणावे लागते.

'कोसला'बद्दल सांगायला हवे काय?

'कोसला'वर घवघवीत समीक्षणे आली! 'सत्यकथे'मध्ये दिलीप चित्रेचे समीक्षण तितकेसे न्याय देणारे नव्हते. राजा ढाले दिलीपवर फारच गरम झाला होता. एका रंगीबेरंगी कागदावर त्यांनी दिलीपला तापून पत्र लिहिले व ते दिलीपच्या हातात ठेवले.

''तू काय लिहिलेस दिलीपला?'' मी विचारले.

तर राजा म्हणाला, ''चांगले झाडले आहे मी दिप्याला. 'कोसला'विरुद्ध लिहितो म्हणजे काय?''

राजाइतके 'कोसला'वर आजही प्रेम करणारी मंडळी आहेतच. परवा वसईच्या एका काव्यसंमेलनाच्या निमित्ताने जमलेल्या कवींमध्ये 'कोसला' किंवा नेमाडेला न मानणारा एक ब्लॅकशिप निपजलाच. मग काय? दुसऱ्या मंडळींनी त्याची अशी हालत करून टाकली... मध्यरात्री दोन तास, झोपी गेलेल्यांना जागे करीत त्यांनी त्या कवीला फैलावर घेतले होते.

नेमाडेने इतके श्रेष्ठ पुस्तक लिहूनही त्याचे काही झाले नाही. त्यामागील कारणे काही असोत. पण नंतर लेखनाच्या आघाडीवर नेमाडेकृत शांतता एकूण सर्वांनाच जाचक झाली होती. नेमाडेची कादंबरी हे नाव घेण्याजोगे पुस्तक ठरले. त्याचा एक वेगळा आनंदही मला वाटत होता. आपल्या 'रहस्यरंजन' काळातल्या किंवा त्याहीपूर्वीच्या मित्रांपैकी एकाने काहीतरी काढून दाखवले. अशोकने 'क्ष' किरणात जी एक कबुली दिली होती की आम्ही मित्रांनी विशेष काही केले नाही. एक दिलीपच्या कविता आणि भाऊच्या दोनतीन कादंबऱ्या, वगैरे; तो नाकर्तेपणाचा काळ जणुकाही संपुष्टात आणला होता. मला माझे हे मित्र नेहमीच मराठी वाङ्मयातले 'अॅक्मे ऑफ धी लिटररी (मराठी) वर्ल्ड' वाटत होते. नेमाडे, दिलीप, अशोक यांच्याविषयी काय सांगावे? 'पामऑलिव्ह का जवाब नही!' याच स्टाइलवर इन लोगों का जवाब नही असेच मी म्हटले असते. पण, अद्याप असे म्हणण्याइतकी समर्थनीय व भरीव कामगिरी कोणाकडून झाली होती? हां, आता नेमाडेने 'कोसला' लिहिली म्हणजे 'कोसला' का जवाब नहीं असे म्हटले असते तर कोणी माझे तोंड धरले असते?

नेमाडे त्यानंतर एक दिवस काळाचौकी इथे त्याच्या काकाकडे आला तेव्हा भेटला... तो इंग्लंडला जाण्यापूर्वी. कालक्रमानुसार नेमाडेचे लग्न, इंग्लंडला जाणे, त्याच्या परीक्षा हे नीटसे माझ्या ध्यानात नाही. लेखकांच्या जेवणा-खाण्याचे जरी महत्त्व आपल्याला वाटले नाही तरी शोशन्नाने (माझी पत्नी) केलेले मासे आणि नेमाडे यांच्यामध्ये जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. म्हणून की काय, इंग्लंडला गेल्यावर त्याने शोशन्नाला खास हिब्रू लेखकांची पुस्तके भेट पाठविली होती. त्याबरोबरच नेमाडेचे एक सुंदर पत्रही आले होते. ते मला 'कोसला'इतकेच ग्रेट वाटले. मी ते सर्वांना वाचायला देत असे. इंग्लंडला खूप विद्वान जातात- प्रवासवर्णने वगैरेंचा टेंभा मिरवतात. पण वर्णन म्हटले म्हणजे असे हवे. त्यात म्हटले होते, ''इथली माणसे महिन्या-महिन्यात अंघोळ न केल्यासारखी दिसतात.'' हे मला आवडतं. गोऱ्यांचं फालतू कौतुक नाही.

नेमाडे इंग्लंड सोडून लवकरच परत आला. अहमदनगर कॉलेजमध्ये लागला किंवा कोठे तरी. त्यामुळे काही फरक पडत नव्हता. पण बरेच दिवस गाठभेट नव्हती. काय करत होता याची कल्पना नव्हती. पण 'कोसला'नंतर काही नाही असे बरेच दिवस गेले होते. असो. तो वर्ग चांगला घेतो का? त्याला पोरं ऐकतात का? टाय घालतो का?... असे माझ्यापुढे प्रश्न. कॉलेजचे वर्ग चालवणं म्हणजे चेष्टा नव्हे. अशा सिंपल माणसाचं हे काम नाही वगैरे.

पुढे नगरहून औरंगाबाद. (यामध्ये इंग्लंड कुठे आहे हे मला नक्की आठवत नाही!) औरंगाबादला त्याला बरे लोक भेटले. चंद्रकांत पाटील, रवींद्र किंबहुने, जहागिरदार, प्रकाश देशपांडे, बाबा भांड, उत्तम क्षीरसागर वगैरे वगैरे. इथे 'वाचा' म्हणून अनियतकालिक सुरू झाले. त्यातून नेमाडेचा पहिला बाँबगोळा बाहेर पडला- 'लेखकराव'. श्रीकेक्षींपासून लिहिण्यातला तोच तो परखडपणा, तीच धार. मराठी मासिकांनी महाराष्ट्रात लघुकथा-संस्कृती पसरवली आहे हे त्याचे म्हणणे त्याने इवल्याशा 'वाचा'मध्ये लिहिलं होतं, पण ते सर्व लहानथोरांना झोंबलं. त्याच्या शब्दांत, ''महाराष्ट्रभर जी मासिकांनी आणि दैनिकांच्या रविवार पुरवण्यांनी लघुकथा-संस्कृती जिकडे तिकडे पसरवली होती; त्याची जागा 'कोसला'संस्कृतीने भरून काढणं आवश्यक होतं.'' 'कोसला'संस्कृती तशी बांधिलकी असलेलीच संस्कृती होती. साहित्याची देशी जात ती जोपासत होती. महात्मा गांधी किंवा डॉ. लोहिया यांच्या विचारसरणीलातच जी सहृदयता होती ती त्यात होती. आणि मराठी साहित्यात गेली काही वर्षे लेखक म्हणजे एक ब्राह्मणासारखी उच्च जात म्हणून तत्कालीन लेखकांनी आपली पायरी वर उचलण्याचा खटाटोप केला होता. थोडक्यात, लेखकाच्या अमरत्वाची भूमिकाच नेमाडेच्या लेखी नामंजूर होती. एका कागदाच्या तावाला दहा हजार रुपये! मग कोण लिहील साहित्य? हा त्याचा सवालच लेखकाची भूमिका स्पष्ट करतो. इतर कुठल्याही माणसात व लेखकात फरक नाही. म्हणूनच त्याच्या कादंबरीत हिंदी सिनेमावाले प्रतिष्ठेने बसतात.

'वाचा' प्रकाशनाचे पुढे काही झाले नसले तरी औरंगाबादच्या मंडळींचे साहित्यप्रेम पुढे चालूच राहिले. नेमाडे प्रत्येकाला नीटपणे साहित्यसेवेला जुंपत होता. त्यामुळे औरंगाबादला कोणीही जावे. त्याच्या दिमतीस भलत्याच संख्येने दोस्त मंडळी गोळा होत होती. आणि व्यवसायामुळे ही मंडळी पुणे, कोल्हापूर, नागपूर वगैरे दूरदूर ठिकाणी जाऊन पोहोचली तरी साहित्यप्रेमाची ओढ त्यांना खेचतच राह्यली.

'कोसला'नंतर अनेक वर्षांनी 'बिढार', मग 'जरीला', 'झूल'. मराठीतील भाषेच्या छटांच्या अंगाने कादंबरी लिहिणारा नेमाडे एकच. त्यामुळे तो गोव्याला स्थलांतरीत होताच गोव्यातील मराठी भाषेवरून आता नक्की कादंबरी आपल्या हातात पडणार असे जो तो म्हणून लागला होता. अखेर नेमाडे प्रत्येक कादंबरी लिहीत होता आणि ही कादंबरी काही 'कोसला'सारखी नाही असे म्हणत म्हणत वाचक त्याचा स्वीकारही करत होते. मराठी कादंबरीच्या ढाच्यामध्ये नाही तरी व्यासपीठावर प्रादेशिक भाषा बोलणारी आणि भाषावैशिष्ट्य हेच कॅरेक्टर असलेली माणसे आता जागा अडवू लागली होती. त्याचप्रमाणे एकूण शिक्षणक्षेत्रातला बकालपणा निर्मम वृत्तीने समोर कॅमेरा धरल्याप्रमाणे टिपून त्यात अत्यंत मॅटर ऑफ फॅक्ट पद्धतीने नेमाडेने ठेवला होता. आता ह्या बकालपणाचे काय करावे याचा विचार या देशातले विचारवंत करतीलच असे नाही. कारण आपल्या देशामध्ये साहित्याची मर्यादा करमणुकीपुरतीच असे मानणारे विचारवंत व राज्यकर्ते आहे.

माणसामधील आणि साहित्यामधील अंतर वर्ज्य करीत करीत मराठी समीक्षेने जुनाट खाजगीपणा टाकण्याची वेळ आली होती. नेमाडेने समीक्षेमधला खाजगीपणा संपवला हे त्याचे कर्तृत्वच. अमुक कलाकृती श्रेष्ठ का तर ती समीक्षकाला पसंत पडली म्हणून; हे काही कलाकृतीचा दर्जा दाखवीत नाही.

नेमाडे मुंबईला आला की सर्वसाधारणतः त्याची वर्दी माझ्यापर्यंत पोहोचायची. आता तो तुकाराम वगैरे वाचून सज्ज आणि समृद्ध झाला होता. कधी तरी तो अशा अत्यंत संशोधनात्मक लिखाणासाठी तरी येत असे किंवा भाषण वगैरे प्रसंगांसाठी. एका भाषणामध्ये तर त्याने माझे उपरणे आणि साने गुरुजींचा पदर यांची गाठ मारून टाकली. वर असंही म्हटलं की, भाऊ कदाचित हे मंजूर करणार नाही वगैरे. एकदा कुमठा शेठनी त्याला पुस्तकांवर सह्या देण्यासाठी बसवलं. बिड्या ओढत ओढत, यत्किंचितही तोंडाला विश्रांती न देता तो पुस्तकांवर सह्या देत सुटला. शोशन्नाची त्यामुळे खूपच करमणूक झाली.

एकीकडे 'बिढार', 'जरीला', 'झूल' अशा कादंबऱ्या तो आता गिअरमध्ये टाकलेल्या गाडीच्या वेगाने लिहीत असतानाच स्वतःची अशी समीक्षा निर्माण करीत होता. त्या वेळच्या मराठी समीक्षेमधला भोंगळपणा म्हणून किती दाखवावा? 'वासूनाक्या'वर टीका करताना ही काही कामूच्या 'प्लेग'च्या तोडीची कादंबरी नाही असेही एखादा समीक्षक बेछूटपणे म्हणत असे. समीक्षेची ही रीत बदलायला हवीच होती. नेमाडे हा कुठल्याही विषयासंबंधी स्वच्छ विचार करणारा माणूस. म्हणजे आणीबाणी इंदिरा गांधीने लागू केली तरी तीबद्दलही त्याची भूमिका स्पष्ट होती. समीक्षेचा विचार करता जे काही समीक्षणासाठी सादर केलेले असेल ते, म्हणजे कलाकृतीचा आशय, आणि तो हाताळण्याची लेखकाची शैली, म्हणजे लेखकाच्या अनुभवाने उभे राहिलेले व्यक्तिमत्त्व यांचा मेळ कुठे बसतो की नाही याचा समीक्षकाने विचार करायला हवा असे माझे मत होते. अलीकडील दूरदर्शनवरील मुलाखतीवरून नेमाडेला ही समीक्षेची मर्यादा किंवा कलाकृतीची व्याख्या मंजूर आहे असे वाटते.

एकूणच समीक्षणाचा प्रांत हा तारामंडळाचाच प्रदेश असावा. समीक्षा ही सोपी असावी. अर्थात ती वर्तमानपत्री आपण करीत आलो तर आतापर्यंत आपल्या पदरी निराशाच येते. नेमाडेही पूर्वसूरीप्रमाणे समीक्षेत क्लिष्ट बनला आहे, ही माझी तक्रार आहे. 'आशय' वगैरे रासायनिक शब्द 'कॉइन' केल्यामुळे ती अस्वस्थही करते. हा समीक्षेचा तारामंडळात परिभ्रमण करताना येणारा प्रॉब्लेम आहे की काय हे मला ठाऊक नाही. नेमाडे एरवीही सुबोध बोलणारा व लिहिणारा प्राणी आहे.

आपली प्रोफेसरकी तो इतकी व्यवस्थित सांभाळतो की एकदा स्व. नरहर कुरुंदकरच त्याचे माझ्याकडे कौतुक करीत होते. वर्गावर जाताना त्याची पूर्ण तयारी असते, इतकी की कुणालाही तक्रार करायला जागा उरत नाही, वगैरे. या कर्तव्यदक्षतेमध्येच दुसऱ्याविषयी वाटणारे प्रेम आणि त्याचबरोबर त्याला न सांभाळण्याचा भाग एकदमच येतो. माझे त्याने खूप कौतुक केले. पण 'वासूनाका सांगोपांग'च्या निमित्ताने मी संपादकांच्या वतीने त्याला प्रस्तावना लिहिण्यास सांगितले. त्यावेळी त्याने मला फटकारलेच, ''तुझे कौतुक तरी किती करायचे?''. नेमाडे असा माणसाला न सांभाळणारा, म्हणजेच फटकळ वगैरे आहे. पण तरीसुद्धा तो आपल्या पायावर भक्कम उभा आहे, ही गोष्टही उद्बोधकच आहे. एरव्ही लेखनाच्या क्षेत्रामध्ये लोक ज्याला त्याला सांभाळून काय मिळवतात हे मला कधी समजले नाही. नेमाडेने आपल्याला वेळप्रसंगी हासडले तरी तो मला आपलाच वाटतो.

परवा औरंगाबादला त्याचा निरोप आणि माझी षष्ठी करण्यासाठी गेलो होतो, तेव्हा किंबहुनेंकडे थांबलो होतो. किंबहुनेचा मुलगा म्हणे म्हणत होता - ''मला नेमाडेवहिनींचा स्वभाव आवडतो. त्यांच्या जे मनात असेल तेच त्या बोलतील!''

एकूण नेमाडे जसा आहे तशीच त्याची बायको- हेही विलक्षणच!

4 comments:

 1. भाऊ पाध्ये यांचं पटो न पटो पण त्यांचा सच्चेपणा नाकारता येत नाही. मी काही त्याचं खूप वाचलेलं नाहीये पण हा लेख वाचताना भाऊ पाध्ये यांचा खरेपणा जाणवतो. भाषेच्या बाबतीत आणि भावनेच्या बाबतीतही. कशाचाही आव न आणता खूप सहज लिहिलंय. आणि ती सहजता छान वाटते.

  ReplyDelete
 2. 'चांगदेव चतुष्टयासंबंधी' या पुस्तकाला जोडलेल्या परिशिष्टामधे हा लेख सापडला. तिथून तो इथे नोंदवलेला आहे. तिथे या लेखाच्या मूळ प्रसिद्धीचा महिना 'जुलै १९७८' असा दिलेला आहे. पण 'फेसबुक'वर Nitin Dadrawala यांनी अशी प्रतिक्रिया दिलेली दिसली : ''हा लेख १९७८ सालचा नाही. १९८८चा असावा कारण त्यातील वसईचा प्रसंग नंतरचा आहे.''
  दादरावाला यांचं म्हणणं बरोबर असावं, कारण लेखात भाऊंनी त्यांच्या षष्ठीचा उल्लेख केलाय. आणि त्यांचा जन्म १९२६चा. म्हणजे किमान १९८६नंतरचा हा लेख आहे एवढं तरी नक्की. आणि ८८चं ७८ झालं असण्याची शक्यता आहे. आपण मुळाबरहुकूम करण्याचा प्रयत्न करत असलो, तरी ही चूक झाली. त्याबद्दल माफी. आता ती चूक दादरावाला यांच्या अंदाजावरून अंदाज घेत दुरुस्त केली आहे.


  ReplyDelete
 3. "समीक्षेतला खाजगीपणा नेमाडेंनी घालवला" हे भाऊ पाध्येंचे म्हणणे अतिशय मार्मिक आणि नेमके आहे. पण ह्या लेखाने भरभक्कम खाजगीपणा त्यांनी आणला आहे त्याने "रेघ" चा गोंधळ ( Chaos ) चांगलाच जोपासल्या गेलाय !
  ---अरुण अनंत भालेराव

  ReplyDelete
 4. First of all I like Bhau's this essay more than any thing Shri. Nemade has written....who else can write: नेमाडे, दिलीप, अशोक यांच्याविषयी काय सांगावे? 'पामऑलिव्ह का जवाब नही!' याच स्टाइलवर इन लोगों का जवाब नही असेच मी म्हटले असते.?

  Secondly please read 'New voices in an age-old debate' on Hindu website here http://www.thehindu.com/opinion/op-ed/new-voices-in-an-ageold-debate/article6948758.ece

  ""...First, it must be conceded that today’s regional literature has mostly been derived from European forms. The claim that it has descended more from the medieval or classical history of the language has to be intellectually made, not just on the ground of literary nationalism. It would be hard to make a case that Mr. Nemade, for instance, descends, uncorrupted by Western genres, from a purely Marathi or Sanskritic tradition. And why is this kind of genealogy meaningful at all, beyond an arid, insular nationalism?.."

  Almost every line of Mr. Nemade's 'Kosla' (कोसला) has descended from the Western genres...

  ...I have always wondered if one can read Camus, Kafka, Beckett, Conrad, Chekhov, Eliot, Auden, why you should read Nemade...other than of course insular nationalism or one can't read English / French/ German / Russian...(and you can always read श्री कृ कोल्हटकर, चिं वि जोशी, मर्ढेकर, विलास सारंग, जी ए, सदानंद रेगे, अरुण कोलटकर, नामदेव ढसाळ, बालकवी, केशवसुत, दिलीप चित्रे, लक्ष्मीबाई टिळक, नाट्यछटाकार दिवाकर, भाऊ पाध्यें, not to mention saint-poets, if you read only Marathi)

  ReplyDelete