Sunday, 5 May 2013

'मिस्टर ग्लाड'चं काय करायचं?

कार्ल मार्क्स (५ मे १८१८ - १४ मार्च १८८३) याची आज जयंती आहे. त्यासकट आणखी काही निमित्तांनी ही नोंद.

नक्षलवादी असल्याच्या आरोपावरून कबीर कला मंचाच्या शीतल साठे आणि सचिन माळी या दोघांना पोलिसांनी अटक केल्याचं गेल्या महिन्यात होऊन गेलं. यासंदर्भात आपल्यासमोर दोन साचे ठेवण्यात आलेत : एक, ते दोघं नक्षलवादीच आहेत आणि ते काही काळ गडचिरोलीच्या जंगलात होते वगैरे. दुसरा साचा, ते विद्रोही कविता करणारे आणि पुरोगामी चळवळीचा भाग असलेले आहेत. या दुसऱ्या साच्याला पुरावा 'फेसबुक'वरच्या गप्पा; किंवा क्वचित वर्तमानपत्रातला लेख. दुसऱ्या साच्यातल्या मंडळींना जर असं कळलं की, या दोघांचा नक्षलवाद्यांशी संबंध होता, तर ते म्हणतील की, मग कारवाई करायला पाहिजे. आणि पहिल्या साच्यातल्या मंडळींना ही दोघंही नक्षलवादी असल्याबद्दल खात्रीच आहे. (साच्यांचा वापर करून किंवा नवीन साचे निर्माण करून प्रॉपगॅन्डिस्ट एखाद्या समूह भावनेला वळण देऊ शकतो. जुन्या साच्यापासून समुहाला दूर करू पाहणं जवळपास अशक्य असतं, पण नवीन साचा मात्र त्याठिकाणी बसू शकतो : एडवर्ड बर्नेस). या दोघांबरोबर कधी ना कधी पुण्यात 'अमृततुल्य'मध्ये चहा प्यालेले, त्यांच्या ओळखीतले मित्र या दोन साच्यांपेक्षा जरा बरं चित्र देतात. पण ते खाजगीत. आणि मूळच्या वादांशी तर कोणालाच काही देणं घेणं नसल्यामुळे मजा आहे. दोन साच्यांच्या मधल्यामध्येच खरं तर काहीतरी सापडू शकतं. तेही फारच गुंतागुंतीचं असणार. आपण त्यातला एक लहानसा बिंदू नोंदवू.

उदाहरणार्थ, जॉर्ज ऑर्वेलने चार्ल्स डिकन्सवर लिहिलेल्या निबंधात म्हटलंय :
पेंग्वीन आवृत्ती. २००९
प्रगती हा आभास नाहीये. ती होते. पण तिचा वेग कमी असतो आणि तो निरपवादपणे निराशाजनक असतो. जुन्या जुलुमशहाकडून सूत्रं स्वीकारण्यासाठी नवीन जुलुमशहा तयारीतच असतो - सर्वसाधारणपणे तो आधीच्याएवढा वाईट नसतो, पण तरी जुलमीच. परिणामी (वेगवेगळ्या पद्धतीने) समर्थन होत राहाणारे दोन दृष्टिकोन कायम असतातच : एक, व्यवस्था बदलत नाही तोपर्यंत मानवी वृत्ती कशी बदलता येईल? दुसरा, सुधारलेली मानवी वृत्ती नसेल तोपर्यंत व्यवस्था बदलून काय होणार आहे? प्रत्येक दृष्टिकोन वेगवेगळ्या व्यक्तींना जवळचा वाटतो आणि क्षणाक्षणाला ते बदलत राहातात असंही दिसतं. नीतिवादी आणि क्रांतिवादी सतत एकमेकांना तुच्छ लेखत राहतात. नीतिवादी भूमिकेखाली शंभर टनांचा डायनामाइट लावून मार्क्सने उडवून लावलं आणि त्या स्फोटाचा आवाज अजून आपल्या कानांमध्ये घुमतो आहे. पण त्याचवेळी, इकडे नाहीतर तिकडे, खंदक खणण्याचं काम सुरू असेल आणि मार्क्सला चंद्रावर उडवून लावणारा डायनामाइट तिथे पेरला जात असेल. मग मार्क्स, किंवा त्याच्यासारखं कोणीतरी आणखी डायनामाइट घेऊन येईल. आणि ही प्रक्रिया अशीच सुरू राहील, आपल्याला दिसू शकत नाही अशा शेवटापर्यंत. (पण) मुख्य प्रश्न - सत्तेला गैरवापर होण्यापासून कसं रोखायचं - मात्र अनुत्तरितच राहतो. (पान ६८-६९)
ऑर्वेलचं वैशिष्ट्य म्हणजे तो गुंतागुंतीत बाजू घेणं प्रत्येक वेळी आवश्यक आहे असं समजत नाही, तर गुंतागुंत स्पष्टपणे मांडणं हे महत्त्वाचं समजतो आणि त्यामुळेच त्याच्यासोबतीने खरंतर काही गोष्टी समजू शकतात. अनिरुद्ध गोपाळ कुलकर्णी यांच्या ब्लॉगवरच्या नोंदीमुळे आपलं ऑर्वेलच्या या परिच्छेदाकडे लक्ष गेलं. त्यांची नोंदही या संदर्भात वाचण्यासारखी आहे. आपण हा परिच्छेद मूळच्या निबंधातून इथे नोंदवला आहे.

बाजू घेण्याचं बोलणं आलायंच तर अनिल बर्व्यांची आठवण यायला हरकत नाही. नक्षलवादी चळवळीसंबंधी त्यांनी 'माणूस' साप्ताहिकासाठी आंध्रप्रदेशातल्या नक्षलवादी भागात जाऊन 'रोखलेल्या बंदुका, उठलेली जनता' असा मोठा लेख लिहिला, त्याचं नंतर पुस्तकसुद्धा आलं नि नंतर बर्वे स्वतः नक्षलवादीच झाले, असंही म्हणतात. खरंतर हे पुस्तक आलं तेव्हा ते पुणे नक्षलवादी खटल्यात दीड वर्ष 'अंडर ट्रायल प्रिझनर' होते. त्यांच्या लेखाचा सूरही सरळ नक्षलवादी बाजूचा आहे, हे वाचकाला सहज कळतंच. अर्थात, त्यांनी लेख लिहिला तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती वेगळी आहे, पण तरी ऑर्वेलने म्हटलंय ते लक्षात घेतलं तर गोष्टी घडतात तशा का घडतात याचा अंदाज येऊ शकेल. बर्व्यांच्या बाबतीतही गंमत अशी की, ते 'नॉन-फिक्शन' असलेल्या लेखात जितके एक बाजू लावून धरतात तसं 'फिक्शन'मध्ये म्हणजे त्यांनी लिहिलेल्या 'थँक यू मिस्टर ग्लाड' या कादंबरीत करू शकत नाहीत. तिथे त्यांना जाणतेपणी किंवा अजाणतेपणी गुंतागुंतीला सामोरं जावंच लागलं, असं दिसतंय. वीरभूषण पटनाईक हा फाशीची शिक्षा झालेला नक्षलवादी डॉक्टर, तो ज्या तुरुंगात येतो तिथला जेलर मिस्टर ग्लाड, ग्लाडची मुलगी जेनी - आदी पात्रं असलेली ही रोचक कादंबरी. एकशेचार पानांची.  यात सरळसरळ वीरभूषण पटनाईक हा 'हिरो' आहे. पण तरी बर्वे काय लिहितात पाहा :
पॉप्युलर प्रकाशन. चौथी आवृत्ती - १९९०
मुखपृष्ठ : बाळ ठाकूर
 - काही झाले तरी ग्लाडसाहेबाची राजनिष्ठा मोठी कडवी होती हे खरे. प्राण गेला तरी साहेब खाल्ल्या मिठाला जागल्याशिवाय राहिला नसता. बेचाळीसच्या चळवळीत हाती सापडलेल्या सत्याग्रह्यांना कारणे शोधून शोधून ग्लाडसाहेबाने गुरासारखे बडवून काढले होते. पण युनियन जॅक उतरून तिरंगा वर चढला तेव्हा ग्लाडसाहेबाने दुःख आवरून एक कडकडीत सॅल्यूट ठोकला नि आपली सेवा तिरंग्याला रुजू केली. ग्लाडसाहेबाची जेवढी निष्ठा फिरंग्याला होती तेवढीच आता तिरंग्याला होती. (पान २)
पुढे बर्वे एका ठिकाणी म्हणतात :
... नक्षलवादी चळवळीचा वाढता जोर पाहून साहेबाच्या उरात धडकी भरे. भारतात खरेच 'कम्युनिस्ट रेव्होल्यूशन' होणार असे त्याला वाटू लागे. अर्थात जरी भारतात कम्युनिस्ट रेव्होल्यूशन झाले असते तरी फारसे काही बिघडले नसते. तिरंगा उतरून लाल बावटा वर चढल्यावर ग्लाडसाहेबाने दुःख आवरून एक कडकडीत सॅल्यूट ठोकला असता नि आपली सेवा लाल बावट्यालाही रुजू केली असती. (पान १२)

तर हे असं आहे. 'मिस्टर ग्लाड'चं काय करायचं, हा खरा प्रश्न आहे. झेंडे-बिंडे, वाद-बिद, चळवळी-बिळवळी, देश-बिश या सगळ्या गदारोळातला हा प्रश्न. आणि त्यावरचं उत्तर मात्र कोणाला सापडलं नाहीये. दरम्यान, काही माणसं इकडे, काही माणसं तिकडे 'डायनामाइट'च्या स्फोटांनी मरतात. किमान त्यावर तरी उपाय शोधायला हवा ना!
***

तुळसी परब यांची एक कविता :

दगडासारखा, खूप गुंतलेल्या मुळ्यांसारखा
(कार्ल मार्क्स यांच्यासाठी)

दगडासारखा, खूप गुंतलेल्या मुळ्यांसारखा,
हासऱ्या पसार डोळ्यांसारखा,
घनाघाती आक्रोशाच्या जबड्यांसारखा,
खुणेच्या स्पष्ट बोटासारखा, परत परत
घडणाऱ्या गोष्टींच्या विकसित रूपासारखा,
संडासाच्या मागे रूजलेल्या झाडासारखा,
आस्ते आस्ते स्वप्न दुभंगून टाकणाऱ्या झोपेसारखा,
क्लांत शपथशीर उच्चारासारखा, उघड्या तळव्यासारखा,
शांततेची भौतिकता शोधून तिला हात
लावता येण्यासारखा, दुखऱ्या सुप्त स्फोटासारखा,
अनुभवी नजरेतल्या आव्हानासारखा,
मृत्यूपेक्षा ढळढळीत हिंसेसारखा,
आस्तेकदम स्लो डेथवरच्या विजयासारखा,
धोरणांच्या प्रतिष्ठ तोरणासारखा,
ध्वजासारखा, काखेत मळलेल्या शर्टासारखा,
वाकवलेल्या यंत्रासारखा, सतत गतिमान रॉकेटसारखा,
वरकड श्रमाच्या तलासासारखा,
वादळी नाटकातून जीवनात पदार्पण करणाऱ्यासारखा,
प्रदीर्घ सृजनासारखा, कामगारासारखा,
क्रांतिसारखा,
क्रांतीनंतरच्या प्रदीप्त शांत जीवनासारखा,
नी ज्याचा ओघ वाहतो
त्या अप्रतिमासारखा, सारखासारखा
***

2 comments:

  1. Brilliant, Ek Regh....बर्व्यांच्या बाबतीतही गंमत अशी की, ते 'नॉन-फिक्शन' असलेल्या लेखात जितके एक बाजू लावून धरतात तसं 'फिक्शन'मध्ये म्हणजे त्यांनी लिहिलेल्या 'थँक यू मिस्टर ग्लाड' या कादंबरीत करू शकत नाहीत. तिथे त्यांना जाणतेपणी किंवा अजाणतेपणी गुंतागुंतीला सामोरं जावंच लागलं, असं दिसतंय. ...oh, oh, oh...this is where fun starts...a good writer embraces it and refuses to simplify and goes on a limb with it....there must be a better view up there...and you have captured it well with your expression...and following is Joseph Conradian : "झेंडे-बिंडे, वाद-बिद, चळवळी-बिळवळी, देश-बिश या सगळ्या गदारोळातला हा प्रश्न. आणि त्यावरचं उत्तर मात्र कोणाला सापडलं नाहीये. दरम्यान, काही माणसं इकडे, काही माणसं तिकडे 'डायनामाइट'च्या स्फोटांनी मरतात. किमान त्यावर तरी उपाय शोधायला हवा ना!" Read Conrad's 'The Secret Agent' (1907) if not already...and finally today I have become fan of Tulsi Parab!...." धोरणांच्या प्रतिष्ठ तोरणासारखा,
    ध्वजासारखा, काखेत मळलेल्या शर्टासारखा,"

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Aniruddha, for informing about Conrad's book. I am yet to read any of his works..

      Delete