Saturday 11 May 2013

मी का लिहितो? : सआदत हसन मंटो

सआदत हसन मंटो (११ मे १९१२ - १८ जानेवारी १९५५) याचं जन्मशताब्दी वर्ष आज संपतंय. या गेल्या वर्षाच्या निमित्ताने मंटोची आठवण आपण यापूर्वीही 'रेघे'वर जागवलेली आहे. आज हे वर्ष संपत असल्याचं निमित्त साधत मंटोचं स्वतःच्या लिहिण्याविषयीचं, आयुष्याच्या शेवटाकडे लिहिलेलं एक टिपण मराठीत रूपांतरित करून ठेवूया.

सआदत हसन मंटो
मी का लिहितो? हा एक असा प्रश्न आहे, जसे मी का खातो.. मी का पितो.. (हे प्रश्न). पण यात एक भेद असा की खाण्या-पिण्यावर मला पैसा खर्च करावा लागतो, तर मी लिहितो तेव्हा मला नकद रकमेच्या स्वरूपात काही खर्च करावा लागत नाही.

पण आणखी खोलात गेलं तर असं लक्षात येतं की हे चुकीचं आहे. कारण मी रुपयांच्या जोरावरच लिहितो.

मला जर खायला-प्यायला मिळालं नाही तर माझं शरीर लेखणी हातात धरायच्या अवस्थेत राहणार नाही हे स्पष्ट आहे. कदाचित विपन्नास्थेत डोकं सुरू राहीलही, पण हात सुरू राहणंही आवश्यक आहे. हात नाही तर तोंड तरी सुरू राहावं लागेलच. माणूस खाल्ल्या-प्यायल्याशिवाय काहीही करू शकत नाही ही केवढी मोठी ट्रॅजडी आहे.

लोक कलेला एवढ्या उंचीवर चढवून ठेवतात की तिचे झेंडे पार आभाळात फडकावून टाकतात. पण कुठलीही श्रेष्ठ आणि महान गोष्ट साध्या रोटीची गुलाम आहे हे खरं नाहीये का?

मी लिहितो कारण मला सांगायचं असतं. मी लिहितो कारण मी काही कमावू शकेन, जेणेकरून मी काही सांगण्याच्या अवस्थेत राहीन..

रोटी आणि कला यांच्यातील संबंध वरकरणी विचित्र दिसतो. पण खुदाला असंच हवं असेल तर आपण काय करणार. तो स्वतःला कोणत्या गोष्टीबद्दल अपेक्षा नसल्याचं म्हणवून घेतो, पण तो निरपेक्ष अजिबातच नाहीये. त्याला श्रद्धा लागते. आणि श्रद्धा ही तर खूप नरम आणि नाजूक रोटी आहे, म्हणजे असंही म्हणता येईल की या खमंग रोटीने तो आपलं पोट भरतो.

माझ्या शेजारी राहणारी कोणी बाई रोज नवऱ्याकडून मार खात असेल नि परत त्याचे बूट साफ करत असेल तर माझ्या मनात तिच्याबद्दल अजिबात सहानुभूती निर्माण होत नाही. पण माझ्या शेजारी राहणारी कोणी बाई आपल्या नवऱ्याशी भांडून किंवा आत्महत्येची धमकी देऊन सिनेमा पाहायला जाते नि तिचा नवरा दोन तास चिंतेत असलेला मला दिसतो, तेव्हा मला दोघांबद्दलही एक गूढ नि करूण सहानुभूती वाटायला लागते.

एखाद्या मुलाचं मुलीवर प्रेम बसलं तर मी त्याला सर्दीपडशाएवढीसुद्धा किंमत देणार नाही. पण एखादा मुलगा जर असं घोषित करत असेल की, त्याच्यावर शेकडो मुली मरतायंत पण तरीही खरं पाहता तो बंगालमधल्या भुकेने ग्रस्त असलेल्या रहिवाश्याप्रमाणे प्रेमाचा भुकेला आहे, तर माझं लक्ष त्याच्याकडे जाईलच जाईल. या वरकरणी यशस्वी प्रेमवीराच्या रंगेल गप्पांमध्ये जी ट्रॅजडी भरलेली असेल ती मी माझ्या हृदयाच्या कानांनी ऐकेन नि दुसऱ्यांना सांगेन.

धान्य दळणारी जी बाई रोज दिवसभर काम करते नि रात्री निवांत झोपी जाते ती माझ्या कथांमधली हिरॉइन होऊ शकणार नाही. वेश्यावस्तीतल्या खाटेवरची बाई माझी हिरॉइन असू शकते. ती रात्री जागते आणि सकाळी झोपेत अचानक म्हातारपण दरवाजे ठोठावत असल्याचं भयानक स्वप्न पडल्यामुळे दचकून जागी होते. वर्षानुवर्षांची झोप साकळून राहिलेल्या तिच्या भुवया माझ्या कथांचे विषय बनू शकतात. तिचे आजार, चिडचिड, शिव्यांच्या लाखोल्या, हे सगळं मला भावतं नि मी त्यानुसार लिहितो. आणि घरगुती स्त्रियांच्या तब्येती, आवडीनिवडी यांच्याकडे दुर्लक्ष करतो.

सआदत हसन मंटो लिहितो कारण तो खुदा इतका मोठा कथाकार किंवा शायर नाहीये, त्याची विनवणी करण्यासाठी तो लिहितो.

मला माहितेय की मी एक बडी असामी आहे आणि ऊर्दू साहित्यात माझं मोठं नाव आहे. एवढी तरी आनंदाची गोष्ट नसती तर आयुष्य अजूनच अवघड बनलं असतं. तरी आपण ज्याला आपला मुल्क म्हणतो त्या पाकिस्तानात मी माझं योग्य ते स्थान शोधू शकलेलो नाही, हेही माझ्यासाठी एक दुःखद वास्तव आहे. त्यामुळेच मी मनातून अस्वस्थ असतो. कधी पागलखान्यात तर कधी इस्पितळात राहायची वेळ येते.

मी दारूपासून सुटका का करून घेत नाही, असं मला विचारलं जातं. माझं तीन-चतुर्थांश आयुष्य तर अनिर्बंध वागण्यात गेलं, त्यामुळे आता कधी पागलखाना तर कधी इस्पितळात राहायची वेळ येते.

मला असं वाटतं की, पथ्य पाळून जगलेलं आयुष्य ही एक प्रकारची कैद आहे. आणि कुपथ्य पाळून जगलेलं आयुष्यही कैदच आहे. कुठल्या ना कुठल्या मार्गाने ह्या पायमोज्याच्या एका धाग्याचं टोक पकडून ओरखडत जायचंय बस्स.

2 comments:

  1. ''घरगुती स्त्रियांच्या तब्येती, आवडीनिवडी यांच्याकडे दुर्लक्ष करतो'' मंटो सायबांचं हे म्हणणं तितकंसं पटत नाही.

    ReplyDelete
  2. "मला असं वाटतं की, पथ्य पाळून जगलेलं आयुष्य ही एक प्रकारची कैद आहे. आणि कुपथ्य पाळून जगलेलं आयुष्यही कैदच आहे. कुठल्या ना कुठल्या मार्गाने ह्या पायमोज्याच्या एका धाग्याचं टोक पकडून ओरखडत जायचंय बस्स"...indeed

    ReplyDelete