Friday 17 May 2013

'लॅफम्स क्वार्टरली', आधी होऊन गेलेले लोक आणि सदानंद रेगे


''आपल्या जन्मापूर्वी काय काय घडलं, याची माहिती करून न घेणं म्हणजे कायम बाल्यावस्थेत राहाणं होय'', हे सिसेरो या रोमन विचारवंताचं वाक्य सांगून 'लॅफम्स क्वार्टर्ली'ची ओळख त्यांच्या वेबसाइटवरती वाचकांना करून दिली जाते. अमेरिकेतल्या 'हार्पर्स मॅगझिन'चे संपादक म्हणून पंचवीसेक वर्षं काम केल्यानंतर लुईस लॅफम यांनी २००६मध्ये 'लॅफम्स क्वार्टर्ली' हे त्रैमासिक सुरू केलं. या त्रैमासिकाचा एक अंक म्हणजे एक खंड असतो, असं म्हणता येईल. काय एवढं विशेष आहे त्यात?

laphamsquarterly.org

'लॅफम्स क्वार्टर्ली'चं वैशिष्ट्य हे की, एखादा विषय घेऊन (उदाहरणार्थ : पैसा, संवादाची माध्यमं, राजकारण, धर्म, भविष्य, जादूचे प्रयोग - अशा अनेकांपैकी कुठलाही) त्यावर आजतागायतच्या इतिहासात जे जे नोंदवलं गेलंय त्यातलं काही सारांश रूपाने त्या विषयासंबंधीच्या अंकात छापलेलं असतं. आणि हे नोंदवणं म्हणजे पत्रं, रोजनिश्या, कादंबऱ्या, नाटकं, कविता, ऐतिहासिक विश्लेषणपर ग्रंथ, तत्त्वज्ञानाचे ग्रंथ, भाषणं यांच्यात सापडणाऱ्या शब्दांसोबतच चित्रांमधलं आणि फोटोंमधलंही असतं. खरं तर हे अंक हातात घेऊन वाचण्या-पाहण्याचे आहेत, हे आपल्याला लक्षात आलं, तरी त्याची वर्गणी भरून ते 'रेघे'वरच्या नोंदीसाठी इथे मागवणं आपल्याला जमलं नाही. पण अमेरिकेत राहणारे काही वाचक असतील तर त्यांना हे अंक तिथे पाहायला मिळतील. अर्थात, वेबसाइटवर या अंकांमधला बऱ्यापैकी मजकूर आणि लहान स्वरूपात का होईना पण चित्रंही आपल्याला वाचता-पाहता येतातच.

संबंधित मजकुराचं (त्रैमासिकाच्या त्या अंकापुरतं दिलेलं) शीर्षक, त्यापुढे प्रसिद्धीचं वर्ष, आणि त्यापुढे कुठल्या ठिकाणाशी जोडलेला तो मजकूर आहे त्या ठिकाणाचं नाव - अशा स्वरूपात अंकाची अनुक्रमणिका दिसते. म्हणजे काळ आणि भौगोलिक माहिती असं त्या मजकुराचं गणित बसवलेलं आहे. अंकामध्ये दिसणारा हा भूगोल जास्तकरून पश्चिमेकडचा आहे, ही म्हटली तर मर्यादा आहे. ही मर्यादा विचारांची आहे, पण एकूण 'अंक' म्हणून सोईसाठी लॅफम व मंडळींनी मजकुराची लांबी जास्तीत जास्त सात पानांपर्यंतच ठेवायची अशीही एक मर्यादा निश्चित केलेली आहे. म्हणजे क्वचित एखाद्या परिच्छेदाचाच मजकूर असतो, तर कधी साधारण सात पानांचा. हे त्यांनी वेबसाइटवरती लिहिलेलं आहे, पण छापील अंक आपण पाहूच शकलेलो नसल्यामुळे त्याबाबतीत आणखी तपशील सांगणं अवघड आहे. पण काही तपशील आपण इथे उदाहरण म्हणून नोंदवू शकतो.

'लॅफम्स क्वार्टर्ली'चं एक मुखपृष्ठ
उदाहरणार्थ, 'मीन्स ऑफ कम्युनिकेशन' या विषयावर 'लॅफम्स क्वार्टर्ली'चा २०१२मधला एक खंड निघाला. त्यात अगदी ख्रिस्तपूर्व २१३ मधला वेचाही आहे. किंवा १८४६ साली पॅरिसमध्ये येऊन गेलेल्या मोरक्कन प्रतिनिधीने लिहिलेलं छापखान्याचं वर्णन आहे. किंवा अट्टल गुन्हेगार म्हणून तुरुंगात शिक्षा भोगत असणाऱ्याने लिहिलेल्या पुस्तकातून निवडलेला १९६५मधला 'नो सेक्स इन द प्रिझन लायब्ररी' हा लेख आहे. किंवा अमेरिकी सैन्यात आणि सरकारमध्ये काम केलेल्या अधिकाऱ्याच्या १९६१ सालच्या भाषणामधला भाग असलेला 'ब्रेकिंग द बॅड न्यूज' या शीर्षकाखालचा मजकूर आहे. आणि असं बरंच काही.

आताच्या चोवीस तासांच्या 'ब्रेकिंग न्यूज', 'एक्स्क्लुझीव्ह' अशा शब्दांच्या जगण्यात 'लॅफम्स क्वार्टर्ली' का आवश्यक आहे? तर, सगळंच आज - आत्ता, पहिल्यांदाच घडतंय असं वाटू नये म्हणून. इतिहासाकडे पाहिलं की जरा वर्तमानाचंही भान येतं म्हणून. खरं तर हे त्रैमासिक पत्रकारितेच्या, सॉरी, माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे विद्यार्थी नसलेल्यांसाठी, पाठ्यपुस्तकासारखं अभ्यासक्रमातच घालून ठेवायला हवं. म्हणजे कदाचित शब्दांची थोडीतरी किंमत राखली जाईल. आणि आपली किंमत काय आहे तेही अक्षरशः कळून येईल.

'आपली किंमत', असं म्हटलं ते जरा खालच्या पातळीवरचं वाटतंय ना! पण ते खरंच आहे. एकूण एवढ्या लाखो वर्षांमधल्या लाखो निर्जीव-सजीवांमधला एक असलेल्या माणसाच्या व्यवहारांना साधारण काय किंमत असेल ते समजून घ्यायचं असेल तर ज्ञानाच्या प्रवाहाचा अंदाज घ्यायला लागेल. आणि हा प्रवाह आपल्या आयुष्याच्या कित्येक पूर्वीपासून येतो नि पुढे कित्येक वर्षं चालू राहणार असेल, त्यात आपण मधेच कधीतरी येऊन जातो, पण या प्रवाहात आपल्या आधी होऊन गेलेले लोक कोण होते त्याचा पत्ता असेल तर आपली 'किंमत' नकारात्मक अर्थाने नव्हे तर कदाचित खरोखरचीच कळून येईल.

***

granthalaya.org
ज्ञानाच्या प्रवाहात आपल्या आधी होऊन गेलेल्या लोकांचा विषय आलायंच, तर नोंदीच्या सुरुवातीला ज्याचं वाक्य होतं त्या सिसेरो ह्या माणसाचा आपण शोध घेऊया. 'विकिपीडिया' आपल्याला त्याच्याबद्दल काही प्राथमिक माहिती पुरवेल. ती उपयोगी आहेच. किमान पूर्ण नाव कळलं. मग केंब्रिज विद्यापीठाने त्याच्या लिखाणासंबंधी काढलेले काही ग्रंथ आहेत, ही माहिती आपल्याला मिळेल. आता त्या पुढे जाऊन आपण स्वतःच्या जवळ येऊया. म्हणजे आपण आत्ता ज्या भाषेत बोलतोय त्या मराठीत या सिसेरोचं काही असेल का? तर, होय. मार्कस टलियस सिसेरोबद्दल मराठीत एक पुस्तक लिहिलं गेलंय. त्याच्या एका निबंधाचा अनुवाद आणि त्याची चरित्रात्मक ओळख, अशा स्वरूपातलं हे पुस्तक सुमारे एकशेवीस वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेलं. आणि मग आपल्याला त्या पुस्तकाची पीडीएफ प्रत सापडू शकते. 'देवांचे स्वभाव व सामर्थ्य याविषयीं सिसेरो याचा निबंध आणि त्याचें चरित्र' या नावाचं 'हें पुस्तक श्रीमंत सरकार सयाजीराव महाराज गायकवाड सेनाखासखेल समशेर बहादुर यांच्या उदार आश्रयानें बळवंतराव अनंत देव यांनी इंग्रजीं ग्रंथांच्या आधारानें रचिलें'. १८९४ साली 'तें पुणें येथें 'आर्यविजय' छापखान्यांत छापिलें'. आणि पुस्तकाची किंमत होती दोन रूपये.

बघा आता, हे वाचल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटलं की नाही थोडं? सयाजीरावांचं नाव वाचून किंवा बळवंतरावांचं नाव वाचून किंवा हे अशा विषयावर मराठीत पुस्तक आहे हे कळून. वाटलं असेल तरी ठीक आणि तुम्हाला आधीच ह्या पुस्तकाची माहिती असेल तरीही ठीक. तर ह्या बळवंतरावांनी आपल्या आधी इथे येऊन हे पुस्तक इंग्रजी ग्रंथांच्या मदतीने रचून ठेवलेलं आहे. किमान त्यांनी तसा प्रयत्न तरी केला. वर असंही म्हणाले की, ''ह्या माझ्या प्रयत्नापासून मराठी वाचकांला कांहीं उपयोग होईल किंवा नाहीं याविषयीं मला कांहींच सांगतां येत नाहीं. विशेषेंकरून माझ्या रिकाम्या काळाचा मीं एका प्रकारे विनियोग केला आहे, तेव्हां माझ्या प्रयत्नाला लोकांनीं चांगलें म्हणावे अशी मुळींच मी अपेक्षा करीत नाहीं. आपल्या देशांतील बहुतकरून इंग्लिश भाषाभिज्ञ विद्वान लोकांनी मुद्दाम आपल्या देशभाषेची हेलना मांडली आहे. तेव्हां अशा काळांत त्या भाषेंत ग्रंथ लिहून यश संपादन करणें हें निदान मला तरी शक्य नाहीं''. हे भारी आहे. मला हवंय ते मी करून टाकलंय, लोकांकडून काहीही अपेक्षा नाही. आणि त्यात पुन्हा भाषेविषयीचं विधान करून टाकलेलं आहेच.

भाषेविषयीचं बळवंतरावांचं हे विधान ख्रिस्तपूर्वी ४३मध्ये मरण पावलेल्या सिसेरोशी जुळणारंच आहे. सिसेरोचं  म्हणणं (बळवंतरावांच्या शब्दांत) असं की, ''आपल्यांतील पुष्कळ रोमन लोक ग्रीक भाषेंतील ग्रंथांत मोठे तरबेज आहेत. परंतु त्यांस आपण संपादित केलेलें ज्ञान आपल्या भाषेंत आपल्या देशांतील लोकांस सांगतां येत नाही; कारण कीं ग्रीक भाषेपासून जें ज्ञान संपादित करून घेतलें तें ल्याटिन भाषेंत सांगतां येणें अशक्य आहे असें त्यांस वाटत आहे. ह्यासंबंधानें मला असें वाटतें कीं, मीं ल्याटिन भाषेंत जे ग्रंथ लिहिले आहेत, त्यांची ग्रीक भाषेंतील ग्रंथांशीं तुलना करून पाहिली तर शब्दचातुर्याच्या दृष्टीने देखील माझ्या ग्रंथाच्या भाषेंत मला कांहीं उणीव दिसत नाहीं.''

भाषेविषयीची ही दोन्ही विधानं फारच स्पष्ट आहेत. वेगवेगळ्या संदर्भांमधली आहेत, पण तरी जुळणारी आहेत. आपल्याकडेही अजून ती जुळतील. पण कोणी कुठल्या हेतूने कुठली भाषा वापरावी याचं स्वातंत्र्य ज्याला त्याला आहे, त्यामुळे भाषेविषयीच्या अशा विधानांचे संदर्भ आपण जसेच्या तसे न घेता तपासायला हवेतच. तपासणी करण्याची शक्यता हीच या प्रवाहातली गंमत असते. आणि ती गंमत 'लॅफम्स क्वार्टर्ली'मधला मजकूर वाचतानाही येते. पण त्यासाठी वाचकांनी त्यात डुंबायला हवं. कारण संदर्भ बदललेत हे समजून घेण्यासाठी प्रश्न विचारावे लागतील. असे प्रश्न विचारत, उत्तरं शोधत ते वाचलं तर त्या प्रवाहाला अर्थ आहे. मग आपल्याला बळवंतरावांच्या पुस्तकातले दोष दिसतीलच, काय कमी-जास्त आहे तेही आपण शोधू, पण तरी त्यात काय मजा आहे, त्या काळची, ती जोखता येईल. आणि होऊन गेलेल्या लोकांबद्दल आत्ता बोलताना 'नेम ड्रॉपिंग' आणि 'अॅक्नॉलेजमेन्ट' यांच्यातला फरकही कळत जाईल. त्यातूनच आधीच्या लोकांच्या चुकाही काढता येतील. आणि 'आधीचे लोक' असं म्हणताना फक्त आपल्या ओळखीतले, पाहण्यातले एक-दोन पिढ्यांमागचे नाहीत, तर अगदी सुरुवातीपासूनचे लोक लक्षात घ्यायला हवेत. तसं नाही केलं तर वैयक्तिक पातळीवरची फुटकळ शेरेबाजी उरेल. ही मराठीत प्रचंड प्रमाणात आहे.

ज्ञानाच्या प्रवाहाबद्दल सिसेरो जे म्हणाला, ते बळवंतरावांनी त्यांच्या शब्दांत असं लिहिलंय : ''मानवी प्राण्यांच्या अंगीं असा दोष आहे कीं कोणत्याही वस्तूचें यथार्थ ज्ञान करून घेण्यास ते हयगय करितात. जर एका मतांतील सर्व सिद्धांतांचे समग्र ज्ञान होणें परम कठीण आहे, तर सर्व मतांच्या सिद्धांतांचें समग्र ज्ञान होणें किती बरे कठीण आहे? तथापि ज्याला सत्य शोधून काढण्याकरितां निष्पक्षपातानें सर्व मतांच्या तत्वज्ञान्यांबरोबर वाद करावयाचा आहे, त्यानें सर्व मतांविषयी चांगलें ज्ञान करून घेतलें पाहिजे.''

हे म्हटलं तर शाळेत शिकवण्यासारखं आहे, पण शिकवून समजण्यासारखं नाही असंही आहे. आपलं आपल्यालाच समजलं तर समजलं. ह्यात एक अजून आपल्याला भर टाकायचेय : हा प्रवाह आहे, म्हणजे त्यात उतरंड नाहीये. उतरंडीशिवायचा हा प्रवाह आहे हे लक्षात घेतलं तर वरती जो आपण 'किंमती'चा उल्लेख केलाय तोही स्पष्ट होईल. प्रत्येकाची जी असेल ती किंमत कमी किंवा जास्त आहे असं मोजता येणार नाही. ती फक्त आहे एवढंच खरं. कारण सुरुवातीपासून इथे होऊन गेलेल्या सगळ्या लोकांचं सगळं कोणीच एका आयुष्यात शेवटपर्यंत समजून घेऊ शकत नाही, ही डेंजर गोष्ट मान्य करून पुढे  जाऊ.

***

ज्ञानाचा प्रवाह नि नंतर त्यात भाषेच्या मुद्द्याची भर पडून आता आपण नोंदीच्या तिसऱया टप्प्यात आलोय. आता आपल्याला आधी इथे होऊन गेलेल्या आणि चहात शेव बुडवून खाणाऱ्या सदानंद रेगे यांना सोबतीला घ्यायचंय. रेग्यांच्या एका कवितासंग्रहाचं नावच 'वेड्या कविता'! त्यामुळे वेडेपणा तर त्यांनी केलाच. पण तो बहुधा आपल्या लोकांना झेपणारा नसणार. विलास सारंगांनी असं लिहिलंय त्याबद्दल : ''मराठी कवितेच्या कोंदट, कोत्या, 'इनब्रीडिग'ने कोळपलेल्या वातावरणात सदानंद रेग्यांची कविता हा एक मोकळा वारा होता. हा वारा आता वाहायचा थांबला आहे''. मराठी कवितेच्या वातावरणाबद्दल सारंगांनी जे म्हटलंय ते पर्यायाने सगळ्याच मराठी वातावरणाला लावता येईल. पण त्यानेही तसा काहीच फरक पडत नाही. कारण रेगे आपल्या आधी इथे होऊन गेले हे तर खरंच आणि त्यांनी लिहिलेल्या कवितेतून मोकळा वारा वाहतो हेही खरंच. हा मोकळा वारा म्हणजे वरती लिहिलेल्या ज्ञानाच्या नि भाषेच्या प्रवाहाचाच भाईबंध आहे काय? असावा.

कारण सदानंद रेग्यांनी बनारसवरती पंधरा कविता केल्या होत्या, त्यातल्या नवव्या कवितेतल्या काही ओळी अशा आहेत :
कुणाचं ते आठवत नाही
पण मी इथं आलोय
तर्पण करायला. (कदाचित माझंच)

इथं आलो
नि जगाच्या आरंभापास्नं
किती रेगे
इथे येऊन गेले
हे इत्थंभूत कळलं.

मुळंबिळं काही
शोधायची असतील
तर इथं येण्यावाचून
गत्यंतरच नाही.
आपण ज्या प्रवाहाविषयी बोलतोय, त्याच्याशी जुळणारं हे म्हणणं आहे असं वाटलं म्हणून रेग्यांच्या कवितेचा संदर्भही इथे नोंदवला. रेग्यांनी हा संदर्भ घेऊन ही कविता लिहिली नसेलही कदाचित, तरी आपण त्या संदर्भाची भर तिच्यात घालू शकतो, हीच तर ह्या प्रवाहातली गंमत आहे. तसंही आपल्या आधी होऊन गेलेल्या लोकांवर रेग्यांनी केलेल्या कवितांचा वेगळा संग्रह होईल एवढी तशा कवितांची संख्या आहे. त्यामुळे रेग्यांच्या कवितेची आठवण येणं साहजिकच आहे. रेग्यांच्या कवितेतला मोकळा वारा या नोंदीत आलाय की नाही माहीत नाही, पण आपण प्रयत्न तरी केला आणि रिकाम्या काळाचा विनियोग केला!

2 comments:

  1. कुणाचं ते आठवत नाही
    पण मी इथं आलोय
    तर्पण करायला. (कदाचित माझंच)

    इथं आलो
    नि जगाच्या आरंभापास्नं
    किती रेगे
    इथे येऊन गेले
    हे इत्थंभूत कळलं.

    मुळंबिळं काही
    शोधायची असतील
    तर इथं येण्यावाचून
    गत्यंतरच नाही.

    Not the best of Rege...but still good

    ReplyDelete
  2. Thank you for the post

    ReplyDelete