दुर्गा भागवत यांचं निधन ७ मे २००२ला झालं. (जन्म : १० फेब्रुवारी १९१०). त्याला आज अकरा वर्षं होतायंत. दुर्गाबाईंच्या पुण्यतिथीनिमित्त ही नोंद:
दुर्गाबाईंबद्दल खूप लोकांनी खूप काही लिहिलेलं आहे. त्यात भर घालण्यासारखं आपल्याकडे बहुधा काही नाही. भाकरी बनवण्याच्या कलेपासून, पानं-फुलं, लोककला ते अगदी अस्वलापर्यंत कित्येक गोष्टींबद्दल दुर्गाबाईंनी बरंच काही लिहून ठेवलं. दुर्गाबाईंचं 'दुपानी' (मौज प्रकाशन) हेही एक पुस्तक आहे, त्याबद्दल आपण 'रेघे'वर नोंद करूया. का? तर ह्या पुस्तकाच्या 'हृद्गता'मध्ये दुर्गाबाई असं म्हणतात म्हणून : लेख लहानखुरे असल्याने वाचकांनाही वाचताना कष्ट पडणार नाहीत; शिवाय आज वृत्तपत्रसृष्टीत वाढत्या जाहिरातींच्या गरजेपायी, लेख लहान ठेवण्याबद्दल लेखकांना ज्या सूचना अटळ परिस्थितीपायी देण्यात येतात त्यांची अपरिहार्यता पाहिली. विपुल जागा असण्याच्या काळी केलेले हे लिखाण भावी काळाची चाहूल घेणारेच अनायासे निघाले. ह्या पुस्तकाची पहिली आवृत्ती १ डिसेंबर १९९५ला आली आणि तिसरी २१ फेब्रुवारी २००६ला. वृत्तपत्रांसोबतच कदाचित ब्लॉगसारख्या संदर्भातही दुर्गाबाईंचं म्हणणं काहींना लागू करता येईल.
यात दुर्गाबाईंनी असंही म्हटलंय की, आजच्या परिस्थितीला मिनी-लेखनाची पाऊलवाट म्हणून कुणाला 'दुपानी' उपयोगी पडली तर मला माझा प्रयोग सफल झाल्याचे समाधान मिळेल.
दुर्गाबाईंना हे समाधान मिळेल की नाही याबद्दल काही सांगणं आपल्याला शक्य नसलं, तरी असं पुस्तक आहे आणि त्यामागचं दुर्गाबाईंचं म्हणणं असं असं आहे हे तरी आपण सांगू शकतोच. तेवढंच या नोंदीतून होऊ शकतं. या पुस्तकातले काही लेख वाचकाला तोकडेही वाटू शकतात. किंवा एखाद्या लेखात अजून भर हवी होती, त्याला पूर्णपणा आलेला नाहीये असंही वाटू शकतं. पण काही लेखांमध्ये वाचकाला समाधान मिळेल, खास दुर्गाबाईच सांगू शकतात असे अनेक संदर्भ येऊन हा लेख पुरा झालाय, असंही या पुस्तकात आहे. तर अशा या पुस्तकातल्या एका ५७९ शब्दांच्या लेखाची नोंद करूया. पुस्तकातल्या पान ३४-३५वरून :
***
पारिजात
भारतात जे सांस्कृतिक महत्त्व असलेले वृक्ष आहेत, त्यांत पारिजाताचे स्थान अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असे आहे. वेदांत उंबर, वड, पिंपळ, खैर, पळस व शमी या झाडांना पवित्र वृक्ष मानले आहे. सोमलतेभोवती तर सारे वैदिक वाङ्मय फिरते आहे. यापैकी सोमरस प्राचीनांच्या रसनेचा चोज पुरविण्यात अग्रगण्य होता. उंबर, वड आणि पिंपळ व खैर ही झाडे अग्नी देणारी म्हणून त्यांची महती विशेष. तेव्हा सर्वसाधारण मानवी व्यावहारिक गरज व आध्यात्मिक प्रेरणांच्या विकासाची साधने म्हणून ही झाडे वेदमूलक भारतीय संस्कृतीत मान्यता पावली.
या झाडांपैकी पळस सोडल्यास इतरांना पुष्पमय आविष्कार नव्हता. पळसाची फुले पात्यासारखी दिसतात. ही पाती म्हणजे सोम आणायला गेलेल्या गायत्रीची रक्तबंबाळ पिसे अशी कल्पना वेदवाङ्मयात आढळते. पळसाचे फूल गंधहीन. वेदकाली आकारसौष्ठव, रंगलाघव आणि सौरभ यांसाठी एकच फूल वाखाणले गेले ते म्हणजे कमळाचे.
पण पुढे पौराणिक वाङ्मय वाढले. पुष्पाभिरुचीची अधिक निदर्शने वाङ्मयात आढळू लागली. जाई, जुई, मालती, चाफा, बकुल, वगैरे पुष्पे काव्यांत अमरत्व पावली. परंतु काव्य व वरचे सांस्कृतिक वाङ्मय यांत प्रतिष्ठा पावलेली पुष्पधारी झाडे दोनच : कदंब व पारिजात. या दोन्ही झाडांचा संबंध कृष्णाशी येतो. कदंबाचा गोपालकृष्णाशी, यमुनेच्या परिसराशी, तर पारिजाताचा द्वारकाधीश कृष्णाशी. कदंबाच्या फुलांवर रम्य कवने आढळतात. त्याच्या पिवळ्या पुष्पगुच्छांना रमणीच्या गालाची उपमा देण्यात येते. त्याच्या सुगंधाचेही कौतुक केले जाते. पण पारिजाताच्या घमघमाटाची सर त्याला नाही. सौरभ कितीतरी फुलांना आहे. पण भारतीय चारण परंपरेत असे स्वच्छ सांगितले आहे की सुगंधाचा राजा पारिजातच.
उंबर, खैर, कदंब वगैरे वृक्ष भारतात अनेक जातीचे 'कुलपालक' किंवा कुलवृक्ष गणले जातात. महाराष्ट्रातले कदंबकुल प्रसिद्धच आहे. अतिप्राचीन सांस्कृतिक महत्त्व मिळाल्याने हे वृक्ष जातीजमातींचे देवक झाले, हिंदूंचे धर्मवृक्ष बनले. पारिजात त्यांच्याहून मागाहूनचा किंवा बाहेरचा. त्यामुळे तो कुलवृक्ष नाही. धर्मवृक्षांत त्याची कुठेच गणना नाही. वैदिक परंपरेप्रमाणे हरिवंशात व नंतर ब्रह्म वगैरे पुराणांत पारिजाताचे आख्यान सापडते. अमृतमंथनाच्या आख्यानात चौदा रत्नांपैकी हे रत्न असून समुद्रातून निघालेला हा वृक्ष देवांनी स्वर्गात नेला असा उल्लेख आढळतो. हरिवंशात सत्यभामेच्या रुसण्याचे सुप्रसिद्ध वर्णन आहे. नारदाने पारिजाताचे स्वर्गपुष्प कृष्णाला दिले. कृष्णाने रुक्मिणीला. द्वारका सुगंधित करणारे ते फूल पतीने आपल्याला दिले नाही म्हणून सत्यभामा रुसली. अखेर कृष्णाने स्वर्गातून तो वृक्ष पृथ्वीवर द्वारकेत आणून लावण्याचा बेत केला. पण इंद्र तो वृक्ष देईना. अखेर इंद्राला युद्धात आव्हान देऊन जिंकून कृष्णाने हा वृक्ष मोठ्या समारंभाने द्वारकेत आणून लावला. तेव्हापासून या देवपुष्पांचा उपयोग मानवही करून घेऊ लागले.
ही आख्यायिका तर सर्वश्रुतच आहे. पण महाराष्ट्राच्या लौकिक परंपरेत दुसरीही एक कथा या झाडाबद्दल आढळते. ती अशी : एक व्यापारी होता. त्याला एक सुंदर मुलगी होती. एकदा ती रूपवती तरुणी आपल्या पित्याच्या बागेत हिंडत असता सूर्यदेवाची नजर तिच्यावर पडली. तिच्यावर तो मोहित झाला. कवचकुंडले धारण करून, मानवरूप घेऊन तो त्या मुलीपुढे उभा राहिला. त्याचे तेजस्वी, सुंदर रूप पाहून त्या मुलीचेही मन त्याच्यावर जडले. त्याने अनुनय करताच ती त्याला वश झाली. याप्रमाणे प्रणयाच्या आनंदात ती मुलगी अगदी धुंद होऊन गेली. पण एक दिवस चंचल सूर्यदेवाला तिच्यापेक्षाही अधिक सुंदर अशी दुसरी एक मुलगी दिसली. या प्रेयसीचा विसर त्याला पडला. नव्या प्रेमाराधनात तो गढून गेला. त्या पराजित प्रणयिनीला ही गोष्ट कळली. तिला फार मोठा धक्का बसला. विनवणी करूनही प्रियकर तिच्याकडे पाहीना. अब्रूही गेली होती. प्रेमनिधान कायमचे हरपले गेले. निराशेत बुडून गेलेल्या त्या मुलीने अखेर मृत्यूचा आश्रय केला. मोठी थोरली चिता रचून सूर्यदेवाचे स्मरण करीत तिने चितेत प्रवेश केला. दुसऱ्या दिवशी चिंतेच्या राखेतून एक रोपटे निघाले. ते भराभर वाढले व पावसाळ्याच्या तोंडी फुलले. पण ती वृक्षरूपिणी प्रणयिनी आपले दुःख मृत्यूनंतरही विसरली नाही. रात्री ती फुलते, सुगंधाची बरसात करते. आणि सूर्योदय होण्याच्या वेळी हे मोत्यापोवळ्याचे सुगंधी पुष्परूप धरणीवर अश्रू सोडीत राहते. सूर्य वर येईपर्यंत झाडावरचे फूल न् फूल पडून त्या गोल, शुभ्र व रक्तवर्ण फुलांचा सडा जमिनीवर पडलेला असतो. प्रेमाची सुकुमारता, शुभ्रवर्ण, शुचिता आणि प्रणयाचा रक्तवर्ण, व्यथेची आरक्तता त्या गोल नाजूक अश्रुबिंदूंत अजून दिसून येते. सबंध दिवस हे झाड अगदी रुक्ष आणि कळाहीन होऊन उदासवाणे उभे राहते. आणि रात्री गतप्रेमाचे वैभव आठवीत राहते.
***
पारिजात. (फोटो : रेघ) |
***
I have dupani....but I think Parijat is a bit overrated....I used to gather its flowers for our pooja and sure I used to get taken in by its fragrance...but for me they are mushy....they promise more than what they deliver....they look much better than what they smell...in that respect they belong to 21st century!...on the other hand just one flower of jai / jui / mogra / nishigandh makes my day or night...
ReplyDelete''they look much better than what they smell...in that respect they belong to 21st century!'' -- though I do not dislike Parijat as you partially seem to do, your comment on 21st century is something I share principally. :) best.
Deleteदुर्गा भागवतांचा लेख वाचून छान वाटलं पण त्याही पेक्षा रेघेचा फोटो बघून आणि अनिरुध्द कुलकर्णी यांचं मत वाचून छान वाटलं. त्यांचं म्हणणं पटलं ही. बिच्चारी बुचाची फुलं ही खूपच दुर्लक्षित आहेत.
ReplyDeleteYes, खरंय अश्विनी बुचाची फुलं...केवढी उंच-निंच, देखणी आणि सुवासिक असतात ती....
DeleteThanks for info This book must be read.
ReplyDeleteNice story, better than Shri Krishn..What is the difference between 'akhyayika' and 'dantkatha'? Please help
ReplyDelete'akhyayika' and 'dantkatha' have more or less same meaning, but to dig deeper, 'akhyayika' would be translated as 'myth' and 'dantkatha' would mean 'legend'.
Delete