Thursday, 29 August 2013

तिसरी नोंद : र. धों. कर्वे व प्रसारमाध्यमं

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर आपण एक नोंद 'रेघे'वर केली. त्याला जोडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकहितवादी यांच्या संदर्भात दुसरी नोंद केली. हे करण्यामागचं कारण संबंधित व्यक्तींची एकमेकांशी तुलना हे नसून आपल्या परिसरातली काही म्हणणी त्या निमित्ताने नोंदवावीत एवढंच. वास्तविक यात पाच नोंदी ठरवल्या होत्या, पण काही अडचणींमुळे तीनच नोंदी करता येणारेत. ही तिसरी. मुळात केवळ काही काळासाठीच्या बातम्यांपुरतंच एकूण म्हणणं मर्यादित ठरू नये आणि आधीच्या काळातले काही संदर्भही स्पष्ट व्हावेत म्हणून हे करायचं. यातली आजची नोंद रघुनाथ धोंडो कर्वे (१४ जानेवारी १८८२ - १४ ऑक्टोबर १९५३) यांच्याबद्दलची.

संततीनियमन, लैंगिक साक्षरता वगैरे गोष्टींसाठी आयुष्य घालवलेल्या र. धों. कर्वे यांच्याविषयीचे आठ खंड डॉ. अनंत देशमुख यांनी मेहनतीने तयार केले. 'पद्मगंधा प्रकाशना'ने हे खंड प्रकाशित केलेत. या खंडांमध्ये कर्व्यांचं देशमुखांनी लिहिलेलं चरित्र, कर्व्यांचे 'शारदेचे पत्र' सदरातले लेख, 'समाजस्वास्थ्य' या कर्व्यांच्या मासिकात इतरांनी लिहिलेले लेख, कर्व्यांचं स्वतःचं असंग्रहित लेखन - असे आणखी काही भाग पाडून र. धों. कर्वे यांचं एकूण काम संग्रहित करायचा प्रयत्न आहे. या खंडांची मदत आपल्याला झालेय.

दाभोलकरांच्या हत्येनंतर प्रसारमाध्यमांमध्ये 'पुरोगामी महाराष्ट्र' हे शब्द अनेकदा वापरले गेल्याचं तुमच्याही ऐकण्यात आलं असेल. पण शब्दांच्या निष्काळजीपणाचाच हा भाग असावा का? कारण, काही व्यक्तींनी विचार मांडले आणि ते समाजाने मांडू दिले इतपत पुरोगामीपणा सोडला तर एक समूह म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला पुरोगामी म्हणता येईल का? आपल्याला तरी शंका वाटते. मुळात माध्यमांच्या बाजूने पाहिलं तरच ही शंका जास्त वाटते. कारण दाभोलकरांच्या अशा जाण्यानेच एकदम पुरोगामित्त्व आठवावं, अशी ही प्रसारमाध्यमांची परिस्थिती आहे. उदाहरणार्थ, एक अनुभव र. धों. कर्व्यांनाही आला होता आणि तो अजूनही आपल्याला माध्यमांकडे पाहिल्यावर वेगळ्या स्वरूपात येऊ शकतो. असा आहे पाहा कर्व्यांचा अनुभव (त्यांनी या अनुभवाचं शीर्षक दिलंय, 'सनातनी पत्रांचे सोवळे'):
(गुप्तरोगप्रतिबंधावरची एक व संततिनियमनावरची दुसरी अशा) माझ्या दोन इंग्रजी पुस्तिका फारशा खपल्या नाहीत. तेव्हा याच दोन विषयांवर स्वतंत्र मराठी पुस्तिका लिहिल्या. त्यांचा खप झाला. यामुळे टीकाही भरपूर झाली. केसरी, मासिक मनोरंजन वगैरे सोवळ्या पत्रांनी जाहिरातही घेतली नाही. संततिनियमनावरील पुस्तिकेकरिता ठोकळे 'मासिक मनोरंजन'ने करून दिले, परंतु पुस्तक छापण्याचे नाकारले. ते मुंबईवैभव छापखान्याने छापले. परंतु पुढे मासिक काढण्याची वेळ आली तेव्हा पहिल्या महिन्याच्या मजकुराने छापखान्याचे तेव्हाचे चालक कै. देवळे घाबरले. त्यांनी मला बोलावून सांगितले की, मला त्याता काही वाईट दिसते असे नाही; पण सर्व्हंट ऑफ इंडिया सोसायटी सार्वजनिक पैशांवर अवलंबून असल्यामुळे आम्हाला लोकमताचाही विचार करावा लागतो; तेव्हा आम्हाला हे छापता येणार नाही. पहिला अंक 'वैद्य ब्रदर्स'नी छापून दिला आणि नंतरचे अंक पॉप्युलर प्रिंटिंग प्रेसमध्ये छापले. 
(असंग्रहित र. धों. कर्वे, पान : पान ६३)
महाराष्ट्रातली प्रसारमाध्यमं ही अपवाद वगळता कशी होती किंवा अजून आहेत, असं म्हणता येईल? उत्तर अर्थातच आपापलं ठरवा. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी ३१ जानेवारी १९२० रोजी 'मूकनायक' पाक्षिक सुरू केलं तेव्हा त्याची पैसे घेऊन जाहिरात छापायलाही 'केसरी'कडून नकार मिळाला होता. आंबेडकरांचं आणि र.धों.चं काम वेगवेगळं पण तरी कर्व्यांनाही 'केसरी'कडून हा अनुभव आलेला आहे. 'न. चिं. केळकरांचा अभिप्राय' अशा शीर्षकाखाली त्यांनी हा अनुभव सांगितलाय, तो असा :
प्रचारकार्यांत विरोधकांनी शक्य तितकी विघ्ने आणली. पण कित्येकांनी कळतनकळत मदतही केली. संततिनियमनावरील इंग्रजी पुस्तकाची जाहिरात श्री. रामानंद चातर्जी यांच्या 'मॉडर्न रिव्ह्यू'कडे पाठवता त्यांनी ती नाकारातून 'पुनः आमच्याकडे असे काही पाठवीत जाऊ नका', असे पत्र लिहिले. नंतर त्याच विषयावर मराठी पुस्तक लिहिल्यावर ते त्यांचेकडे अभिप्रायार्थ पाठवले आणि ते त्यांचे मराठी समीक्षक कै. आपटे यांचेकडे आले आणि त्यांनी अभिप्राय लिहिताना खूप विरुद्ध टीका केली. यामुळे पुस्तकाची फुकट जाहिरात झाली. पुण्याच्या केसरीनेही काहीसा असाच प्रकार केला. त्यांचेकडे जाहिरात पाठवली असता ती त्यांनी परत केली. तेव्हा मतभेद असला तरी जाहिरात घेण्यास का हरकत असावी असे पत्र श्री. न. चिं. केळकर यांस लिहून पुस्तकाची एक प्रतही पाठवली. यावर त्यांनी पुढील उत्तर लिहिले. एका नामांकित लेखकाचे त्या वेळचे विचार या दृष्टीने ते वाचनीय आहे.
स.न.वि.वि.
आपले पुस्तक वाचले. मर्यादित संतती असणे हे सर्वांना इष्ट असेच आहे. तथापि ग्राम्य शरीरधर्माप्रमाणे ग्राम्य विषयांची चर्चाहि खाजगी किंबहुना गुप्त रीतीनेच होणे योग्य होय. ग्राम्य याचा अर्थ त्याज्य किंवा निंद्य असा या ठिकाणी नाही, परंतु सार्वजनिक चर्चा करण्याचा हा विषय नव्हे. विशेषतः उपयांचे बाबतीत आपणही तसेच म्हणाल असे मला वाटते. अशा कामी खाजगी चर्चा, खाजगी उपदेश व खाजगी हस्तपत्रके काढणे हाच मार्ग श्रेयस्कर होय. याकरता आपले पुस्तकाची नुसती पोच देण्यापेक्षा मला अधिक काही करता येत नाही. याबद्दल वाईट वाटते. कळावे.
न. चिं. केळकर
तथापि आणखी थोडा पत्रव्यवहार होऊन शेवटी त्यांनी जाहिरात एकदा छापायला सांगितली आणि ऑफिसातून तीबद्दल बिल आले. यावर मी कळवले की जाहिरात महिन्यातून एकदा तरी यावी अशी इच्छा आहे आणि मी पाहिजे तर एका वर्षाचे देखील बिल आगाऊ देईन. त्यांचेकडून इतकेच उत्तर आले की 'पत्र पोचले, मजकूर समजला.' आणि जाहिरात पुन्हा छापली नाही. यानंतर बऱ्याच वर्षांनी याच 'ग्राम्य' विषयावर एका सार्वजनिक व्याख्यानाचे वेळी याच केळकरांनी अध्यक्षस्थान स्वीकारले होते हे पुष्कळांस माहीत असेल. यावरून तो विषय आता ग्राम्य राहिला नाही असे दिसते.
(असंग्रहित र. धों. कर्वे, पान : ५४-५५)
कर्व्यांचा जो अनुभव वरती दिला तो तेव्हाच्या प्रचंड खपाच्या 'केसरी' या वृत्तपत्राबद्दलचा. त्यावेळी संपादकीय सूत्रं सांभाळणारे न. चिं. केळकर यांच्या नावाने एक अख्खा रस्ता पुण्यातल्या दोन चौकांना जोडतो. काळ खूपच पुढे आलाय. प्रसारमाध्यमंही आहेत. बदल किती झालाय ते कसं तपासायचं? कारण शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांचं निधन आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष दाभोलकर यांचा खून यांच्याबाबतीतलं प्रसारमाध्यमांचं वागणं कमी-अधिक प्रमाणात सारख्याच ऊर्जेने आणि सारख्याच ढोंगीपणाने होतं. आणि र. धों. कर्वे यांचं काय करायचं?

आपण या संदर्भात ज्या तीन नोंदी केल्या त्यात पहिली नोंद तात्कालिक घटनेबद्दल थोडं आपल्यापरीने काही अधिकची भर टाकणारी करायचा प्रयत्न केला. दुसरी नोंद तात्कालिक घटनेच्या वेळी मुबलक वापरात येणाऱ्या काही शब्दांचे अर्थ अधिक तपासण्याच्या दृष्टीने केली. तिसरी नोंद प्रसारमाध्यमांच्या वागण्यासंबंधी आणि 'पुरोगामी', 'विवेकवाद' अशा शब्दांचे अनेक वर्षांच्या घडामोडींनी तयार होणारे अर्थ आणखी स्पष्ट व्हावेत स्वतःपुरते म्हणून केली. थांबू.

जाता जाता- र. धों. कर्वे यांनी 'समाजस्वास्थ्य' नावाचं मासिक २७ वर्षं चालवलं. आपलं म्हणणं मांडणं, त्याचा प्रसार, हाच उद्देश. कर्वे गेले आणि या मासिकाचा शेवटचा अंक प्रसिद्ध झाला. त्या अंकाचा मजकूर त्यांनी एकत्र करून ठेवला होता, बाकीची तयारी झाली होती, म्हणून तो अंक येऊ शकला. पण कर्व्यांचं निधन आणि 'समाजस्वास्थ्य'चं निधन हे एकत्रच झालं.

पहिली आवृत्ती : १४ ऑक्टोबर २०१०

Sunday, 25 August 2013

नरेंद्र दाभोलकर : दुसरी नोंद । डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकहितवादी

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर आपण एक नोंद 'रेघे'वर केली. दाभोलकरांचं जाणं ज्या धक्कादायक प्रकारे झालं, त्या धक्क्याचा भाग म्हणून म्हणा किंवा आपलीच गरज म्हणून म्हणा, त्यासंबंधी आणखी काही नोंदी करण्याचा प्रयत्न 'रेघे'वर होणार आहे. या प्रयत्नाला एका व्यक्तीच्या डोक्याची मर्यादा असल्यामुळे जरा समजून घ्या. पण हे प्रयत्न आवश्यक वाटतायंत, कारण तात्कालिक तथ्यांच्या बातम्या नि चर्चा करण्यापोटी आपल्या अगदी प्राथमिक शांत विवेकीपणाचाही बोऱ्या वाजल्यासारखं दिसतंय नि कंटाळा येतोय. म्हणून-

तर, दाभोलकरांच्या हत्येसंबंधीच्या बातम्यांमधून, चर्चांमधून 'पुरोगामी महाराष्ट्र' हे शब्द किती वेळा वापरले गेले, हे शोधायला हवं. विवेकवाद, पुरोगामी चळवळ, असेही काही शब्द वापरले गेले. सध्याच्या गदारोळातल्या बातम्यांपुरते आणि चर्चांपुरते हे शब्द कसेही वापरले जाणार आणि आपणही त्या शब्दांचे अर्थ कळवून घेतलेत असंही कदाचित वाटू लागेल. पण शब्दांचे अर्थ खूप वर्षांच्या घडामोडींनी तयार होत असावेत बहुधा. त्यामुळे आपण त्या दृष्टीने काही खटपट करता येते का पाहू. दाभोलकरांवरच्या नोंदीत त्यांचं अंधश्रद्धा निर्मूलनासंबंधीचं एक म्हणणं नोंदवलेलं, त्यात त्यांनी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या 'सत्यशोधकी कर्मा'चा उल्लेख केलाय आणि स्वतःला त्या कर्माच्या परंपरेशी जोडून घेतलंय.

या कर्मासंबंधी जरा तपासणी करण्यासाठी आपण आंबेडकरांच्या पत्रकारितेमध्ये जाऊ. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता : १९२० ते १९२८' असा खंड महाराष्ट्र सरकारने २००५ साली प्रकाशित केलेला आहे. त्यावरून आणि थोडीशी स्वतंत्रपणे आपल्याला काही माहिती मिळते. बाबासाहेबांनी १९२०मध्ये 'मूकनायक' असं एक पाक्षिक सुरू केलं होतं. 'मूकनायका'ची सुरुवात करताना आंबेडकरांनी लिहिलेलं : बहिष्कृतांच्या 'अतिबिकट स्थितीशी संलग्न असलेल्या प्रश्नांची वाटाघाट करण्यास एक स्वतंत्र पत्र पाहिजे हे कोणीही कबूल करील. ही उणीव भरून काढण्यासाठी या पत्राचा जन्म आहे'. 'मूकनायक' लगेचंच बंद पडलं, मग आंबेडकरांनी 'बहिष्कृत भारत' हे पाक्षिक ३ एप्रिल १९२६ रोजी सुरू केलं. ही दोन्ही फारच कमी काळ सुरू राहू शकलेली पत्रं होती. यातल्या मुख्यत्त्वे 'बहिष्कृत भारत'मधलं लिखाण आपण उल्लेख केलेल्या खंडात आहे.

आता आपण आपल्या वरती नोंदवलेल्या 'सत्यशोधकी कर्म' या शब्दांकडे आणि त्यासंबंधीच्या अर्थाकडे आणि त्याच्या परंपरेकडे येऊ. आंबेडकरांनी 'बहिष्कृत भारत' पाक्षिकाच्या ७ डिसेंबर १९२८च्या अंकापासून लोकहितवादींच्या शतपत्रांचं पुनर्मुद्रण केलं होतं. या पुनर्मुद्रणामागची भूमिका त्यांनी त्याच अंकात स्पष्ट केलेली. ही भूमिका आपल्याला महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेल्या सोबतच्या खंडात मिळते. ही भूमिका आपण खाली नोंदवू, कारण नोंदीच्या सुरुवातीला आपण जे खूप वर्षांच्या घडामोडींनी तयार होणारे अर्थ असं म्हटलं त्याचा काही अंदाज आंबेडकरांनी लिहिलेल्या या मजकुरावरून येऊ शकेल. एकूण रेषा फारच मोठी निघेल, आपण फक्त त्यातला एक बिंदूच नोंदवतोय. मजकूर प्रसिद्ध झाला त्यावेळी इंग्रजांचं राज्य होतं व काळ सुमारे नव्वद वर्षं मागचा आहे हे लक्षात घेऊन हा मजकूर वाचू. तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिहितात :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र-साधने प्रकाशन समिती
या अंकापासून आम्ही सुप्रसिद्ध लेखक गोपाळराव हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांच्या पत्रांचे पुनर्मुद्रण सुरू केलें आहे. सरळ व असंदिग्ध भाषा, सडेतोड विचारसरणी व भरीव व्यवहारज्ञान हे लोकहितवादींच्या लिखाणाचे विशिष्ट गुण आहेत. तत्त्वज्ञानाच्या निष्फळ गप्पांनी व तर्कशास्त्रांच्या शब्दावडंबरी लपंडावांनी लोकांना भुलविण्या-झुलविण्याच्या भरीस लोकहितवादी कधीच पडले नाहीत. आपल्या सामाजिक व्यवहारांतील रोजच्या प्रसंगावर व त्यांच्या मागे असलेल्या भावभावनांवर त्यांनी लिहिले आहे, आणि त्यांचे लिखाण अत्यंत स्पष्टोक्तीपूर्ण, निर्भीड व हृदयस्पर्शी आहे. भूतकालीन 'रामराज्या'पेक्षा आजच्या सामाजिक आचारविचारांतील दोष हेच त्यांच्या लिखाणाचे मुख्य विषय असल्याचे दिसून येईल. लोकमान्यता मिळवायची असेल तर आपल्या दोषांचाही गुण म्हणून उदोउदो करणे व परकियांच्या गुणांनाही दोष म्हणून त्याज्य ठरविणे, हा मार्ग आहे. पण लोकहितवादींनी हा मार्ग कधीच अनुसरला नाही. आपल्या दोषांचे त्यांनी कठोरपणे आविष्करण केले व तसे करताना अमके नाराज होतील अगर तमक्यांची मने दुखावतील याविषयी त्यांनी पर्वा केली नाही.

जुन्या घातक रूढी, जरीपुराण्या टाकाऊ कल्पना व समजुती, धार्मिक दुराग्रह, व ढोंगीपणा इत्यादी विषयांवरही लोकहितवादींनी सडेतोड लेख लिहिले आहेत; व ते सर्वांना मार्गदर्शक होतील असेच आहेत. सर्व ठिकाणी सत्यान्वेषी बुद्धी व सारासार विचारशक्ती जागृत पाहिजे, ही लोकहितवादींची मुख्य शिकवण आहे. लोकहितवादींची परंपरा जर महाराष्ट्रात चालली असती तर आपले सामाजिक प्रश्न आजच्या इतके सोडविण्याला कठीण होऊन बसले नसते. पण दुर्दैवाने टिळक-चिपळूणकर परंपरा टाळ्यांच्या कडकडाटांत पुढे आली, व लोकहितवादींची धिम्मी व कार्यक्षम परंपरा मागे पडली. याचे परिणाम आजवर महाराष्ट्राने भोगले आहेत, व अजूनही त्यांतून त्याची सुटका झाली नाही. असो, लोकहितवादींनी ७५ वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले विचार आजच्या परिस्थितीतही उपयुक्त असेच आहेत. आमच्या वाचकांना ते मार्गदर्शक होतील असे वाटल्यावरूनच आम्ही तत्प्रकाशनाचे कार्य सुरू केले आहे.
***
लोकहितवादी (१८ फेब्रुवारी १८२३-९ ऑक्टोबर १८९२) : मराठी विश्वकोशातली नोंद.

Tuesday, 20 August 2013

नरेंद्र दाभोलकर : एक नोंद

''बॉडी कोणाची ते आधी ओळखू आलं नाही. दोन-तीन जणांनी सांगितल्यावर पोलीस आले. आधी त्यांनाही ओळखू आलं नाही. मग वरिष्ठ अधिकारी आले, ते म्हणाले, अरे, दाभोलकर दाभोलकर.

साडेसहा-सातच्या दरम्यान झालं असेल. सव्वासात-साडेसातच्या दरम्यान झालं असेल. चेहराच ओळखू येत नव्हता. मग ससूनमधे नेलं. इथेच गेलेले.

दोघे जण होते. पंचवीस-सव्वीसीचे असतील. बाइकचा नंबर मिळाला म्हणतात.''

मागून डोक्यात गोळी.
***

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आणि 'साधना' साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची आज सकाळी पुण्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
***

अंधश्रद्धांना विरोध म्हणजे शोषण, अनिष्ट प्रथा, रूढी, कालविसंगत कर्मकांड, त्यातून होणारी दिशाभूल, फसवणूक याला विरोध. लोकांच्या श्रद्धेचा, सात्त्विक भावनेचा वा भयगंडाचा फायदा घेऊन ही सफाईदार धूळफेक वा चलाख लूटमार केली जाते. त्याला ना जात, ना पंथ, ना धर्म. त्याला विरोध हेच फुले, आंबेडकरांनी सांगितलेले सत्यशोधकी कर्म.
- नरेंद्र दाभोलकर.
***

दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या, त्याला लागूनच-

ओंकारेश्वर दशक्रिया विधीघाट, मुक्तिधाम - इधे आधीच दुसऱ्याच कोणावर तरी अंत्यसंस्कारासाठी लोक जमलेले. आता तिथे जवळच पोलीस जमलेले, राजकीय व्यक्ती थोड्या, पत्रकार जास्त, आणि लोक. गाड्यांची ये-जा. ''यायचे ते इथे. पुण्यात आले की.''

तिथून डावीकडे पुढे गेल्यावर 'साधना मीडिया सेंटर' आहे. उजवीकडून शनिवार पेठेत घुसलं की, औंदुंबर आळी असा एक भाग आहे, तिथे 'मॅजेस्टिक प्रकाशना'ची एक इमारत आहे. या इमारतीसमोरच एक लाल विटांची लहानशी इमारत.  तिथे पूर्वी मे. पुं. रेगे, राम बापट वगैरे मंडळी गप्पांसाठी जमत. खूप वादबिद घालत, असं कानावर येतं.

***

कोणाचे काय विचार पटतील - नाही पटतील, पण एकदम माणूस जगातून हटवणं म्हणजे काय? प्रत्येकाला आपापलं म्हणणं मांडायला लोकशाही जागा असावी. नसेल तर तयार करावी. जुनंच म्हणणं. पण परत परत मांडलं जाणारं. कारण वातावरण डेंजर असतं. 

निव्वळ शब्दांच्या मदतीने विवेकवादासारख्या वरवर सर्वमान्य गोष्टीविषयी काहीएक म्हणणं मांडणाऱ्या आणि ते पटणाऱ्या माणसांची जोडणी करणाऱ्या दाभोलकरांना थेट डोक्यात गोळी घालून संपवलं. दुःख वगैरे नकोच. आपण लोकशाहीला अनुसरून दाभोलकरांचं म्हणणं मांडणारे शब्द थोडेसे नोंदवून ठेवू. 

'रेघे'वर नरहर कुरुंदकरांसंबंधी नोंद केलेली मागे, ती 'साधना'त छापून आलेली, त्यावर दाभोलकर म्हणालेले, 'कुरुंदकरांवर अशी अधूनमधून चर्चा होणं ही चांगली गोष्ट आहे.' या 'चांगल्या गोष्टी'चा अर्थ 'लोकशाही म्हणजे काय' ह्या प्रश्नात असू शकतो. आपणही वरच्या परिच्छेदात 'लोकशाही' असा शब्द वापरला, पण ह्या प्रश्नाचं पुरेसं उत्तर आपल्याला माहीत नाही. पण समूहाने राहायचंय असं ठरवल्यावर ह्याचा आपापल्या बाजूने काहीतरी अर्थ लावायला हवा. दाभोलकरांनीही तो अर्थ लावला असेल, त्यामुळेच त्यांनी त्याचं म्हणणं सहिष्णूपणे आणि विवेकीपणे मांडलं. म्हणजे लोकशाहीत सहिष्णूता नि विवेकीपणा नावाच्या गोष्टी असत असतील. ह्या गोष्टींची आठवण ठेवत आपण इथे दाभोलकरांचं 'विचार तर कराल?' या पुस्तकातलं एक म्हणणं खाली नोंदवून ठेवू.
***


क्रोधापेक्षा करुणा, उपहासापेक्षा आपुलकी

राजहंस प्रकाशन
ठिकठिकाणी वेगवेगळ्या भाषेत पण एक मुद्दा मला लोक नेहमी सुनावत असतात. 

'दाभोलकर, ठीक आहे सध्या जोरात बुद्धिवादाच्या गप्पा मारता. पण एक दिवस झटका बसला ना म्हणजे कळेल बरोबर!'

त्यांचे म्हणणे खरे आहे. अनपेक्षित जोरदार आघात झाला तरी मी वाकणार नाही, मोडणार नाही, अंधश्रद्धेचा बळी होणारच नाही असे घडेल का? प्रसंग आला तरच याचा निकाल लागायचा, पण तोपर्यंत तरी असेच घडेल हे मानणेच जास्त वैज्ञानिक ठरेल.

गप्पा मारताना एकदा विजय तेंडुलकर मला म्हणाले होते, 'नरेंद्र, तुमचे काम चांगलेच आहे. पण लोक अंधश्रद्ध बनतात ती त्यांची गरज असते, असे नाही तुम्हाला वाटत?'

मी चळवळीतला एक कार्यकर्ता आहे. या विश्वातील कोणतीही घडामोड कोणत्यातरी दैवी सामर्थ्याच्या प्रभावाने वा आशीर्वादाने घडते यावर माझा विश्वास नाही. स्वतःला पडणाऱ्या सर्व प्रश्नांचा विचार लोकांनी बुद्धीने, विवेकाने करावा. तसाच आचार करून तो प्रश्न सोडवावा असे मला वाटते.

पण हे अजिबात सोपे नाही.

एकतर माणूस हा केवळ तर्काने चालणारा, विवेकानेच वागणारा प्राणी नाही. बुद्धी व भावना, विचार व कल्पनाविलास यांच्या मिश्रणातूनच त्याचे व्यक्तित्व घडते.

दुसरे, परिस्थितीची अगतिकता अनेकदा त्याला मजबूर करते. त्यामुळे तो अनेक समज, गैरसमज, अपसमजुती मनाशी बाळगतो; स्वतःच्या बचावाला ढालीसारखा वापरतो. 

समजा वेळ रात्रीची, अमावास्येची. तातडीचा निरोप देण्यासाठी जाणे आवश्यक. अडचण अशी की रस्ता श्मशानातूनच जातो. श्मशानाजवळ घाबरून दातखीळ बसणे वा तिथेच बेशुद्ध पडणे वा भीतीने निरोप देण्याचे कामच सकाळपर्यंत लांबणीवर टाकणे दोन्ही अशक्य. मग व्यक्ती मार्ग शोधते. रामनाम म्हणत श्मशान पार करते. भूत असते, रामाचे नाव घेतल्याने ते पळून जाते. या निखालस अंधश्रद्धेचा वापर व्यक्ती करते, कशासाठी? कार्यभाग पार पाडण्यासाठी. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचे संतुलन टिकवण्यासाठी. वाहने कितीही मजबूत असली तरी रस्ते खराब असतात, त्यावरील खाचखळग्यांच्यामुळे आणि विशेषतः त्यांच्यावरील व्यक्तींना धक्के कमी बसावेत म्हणून त्यांना शॉक अॅबसॉर्बर बसवलेले असतात. धक्के बसतातच पण तीव्रता कमी होते, बहुसंख्य व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाच्या बचावासाठी स्वतःला जे शॉक अॅबसॉर्बर बसवतात त्या म्हणजे अंधश्रद्धा! जीवनमार्गावरती भीती, निराशा, अडचणी, अपेक्षाभंग या धक्क्यातून स्वतःचे संरक्षण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

मुलाला अनपेक्षित कॅन्सर होतो.

धंद्यात खोट येते.

हातातोंडाशी येऊन यश हुकते.

असे झाले की, माणसाची भावना विचारावर मात करते. असे घडण्याची अदृश्य कारणे शोधली जातात आणि ते उपायही आग्रहाने पार पाडतात.

लग्नानंतर गावाकडच्या कुलदेवताला जाणे राहिले म्हणून कॅन्सर. जागेची वास्तुशांती नाही म्हणून धंद्यात खोट, सत्यनारायणाची पूजा केली नाही म्हणून यशाची हुलकावणी.

मग स्वाभाविकच कुलदैवताला चांदीचा देव्हारा दिला जातो. वाजत गाजत वास्तुशांती होते. महापूजा यथासांग पार पडते.

आजच्या जीवनातले अनेक धक्के हे अनियंत्रित सामाजिक परिस्थितीतून आलेले असतात. नोकरी, जोडीदार, घर, शिक्षण, संधी, औषधोपचार या सर्वच बाबतीत बहुसंख्यांच्या पदरी या-ना-त्या स्वरूपाची तीव्र निराशा असते. त्यातून स्वतःला सावरून जीवन जगणे तर अटळ असते. मग प्रत्येक जण आपापल्या आवडीनुसार सिद्धीविनायक, गुरुचरित्राची पोथी, भविष्य, मंत्रतंत्र, बाबा, गुरू, पुनर्जन्म अशा अनेक बाबींचा शॉकअॅबसॉर्बरसारखा उपयोग करतो.

खरेतर जे घडले ते दैवी अवकृपेने नाही हे समजणे सोपे असते. ते का घडले? याचे कार्यकारण हुडकणे अवघड नसते. असे होऊ नये म्हणून स्वतःची मानसिकता व समाजाची वास्तवता बदलणे अवघड असले तरी तेच इष्ट व आवश्यक असते.

पण व्यक्तीवरचे, कुटुंबातले, समाजातले संस्कारच असे असतात की ही चिकित्सा शिकवण्याऐवजी टाळण्याकडे कल असतो. आणि कृतीच्या खडतर व लांबच्या मार्गाऐवजी अंधश्रद्धेचा शॉर्टकट जवळचा वाटतो. लांबचा मार्ग यशस्वी होण्याऐवजी स्वतः मोडून पडण्याची भीती व्यक्तीला वाटते. मग ती अंधश्रद्धेचा शॉकअॅबसॉर्बर लावून जगते.

अशा अंधश्रद्धा उपद्रवी असतील तर त्यावर व्यक्तीच्या भल्यासाठीच पण कठोर प्रहार करावे लागतात.

त्या भले निरुपद्रवी असतील तरी व्यक्तीची बुद्धी त्यात गहाण पडू नये याची काळजी घ्यावी लागते. श्मशानात रामनाम घेणाऱ्याने प्रत्येक वेळा रस्ता ओलांडताना, बसमध्ये चढताना, साहेबाच्या केबिनमध्ये जाताना रामाचा जप सुरू ठेवला तर? तर अर्थ एवढाच की ती व्यक्ती राम-नाम संकटातून तारून नेते या अंधश्रद्धेची शिकार बनली आहे. बुद्धी आणि भावनेने बनलेल्या तिच्या व्यक्तिमत्त्वाचे संतुलन ढळलेले आहे. या विरुद्धही बोलावे लागतेच.

परंतु या पलीकडे एक मोठा वर्ग असा आहे की, जो अगतिकतेने, हताशपणे, नाईलाजाने जीवनात या-ना-त्या प्रसंगी अंधश्रद्धेचा शॉकअॅबसॉर्बर लावून स्वतःचा बचाव करीत असतो.

घरीदारी आजूबाजूच्या वातावरणातून संस्कार घेतच सर्व व्यक्ती वाढतात. हे संस्कार बुद्धीशी सुसंगत असतात असे नाही. बहुधा नसतातच. माणसाला आधार हरघडी लागतो. हा आधार शोधताना विचारापेक्षा त्याचे संस्कार त्याच्यावर मात करतात. अडचणीच्या वेळी स्वतःच्या जीवनाचा आधारच त्या संस्कारात त्या आधारे केलेल्या कर्मकांडात तो शोधतो, मिळवतो, हे सारे सोडून देणे त्या प्रसंगी त्याच्या बुद्धीला पटले तरी प्रत्यक्ष व्यवहारात वळतेच असे नाही.

चळवळीतील शहाणपणाचा आणि माणुसकीचा भाग येतो तो याच ठिकाणी. आधार घेण्याची वास्तवता आणि आहारी जाण्याची भयग्रस्तता याचा नीरक्षीर विवेक व्यक्तीने सतत करावयास हवा. माणूस आधार घेता-घेता कधी आहारी जातो व मानसिक गुलामगिरी स्वीकारतो हे कळत नाही. म्हणूनच सजगता हवी, चुकीच्या संस्कारावर विचाराने मात करून त्याचे विवेकी आचारात रूपांतर करावयास लावणे हे खरे चळवळीचे काम असते. त्यासाठी लोकांवर संतापून भागणार नाही आणि 'काय हा मूर्खपणा!' म्हणून त्याची टिंगलटवाळी करून चालणार नाही. त्याच्याशी सतत व सहृदयतेने संवाद साधत राहावयास हवे. मार्ग खूप लांबचा आहे पण तोच इष्ट आहे. शेवटी लढा आहे माणूस बदलण्याचा आणि त्यासाठी क्रोधापेक्षा करुणेची व उपहासापेक्षा आपुलकीची खरी गरज आहे.
***

नरेंद्र दाभोलकर

Sunday, 18 August 2013

भाषा : जीवन आणि जेवण

एक

पुण्यात शाहू कॉलेजात एफ.वाय.बी.ए.ला शिकणारा एक मुलगा. काळ्या रंगाचा आणि साधारण पाच फूट दोनतीन इंच उंचीचा. दुपारी दोन ते सहा या वेळेत तो एका ठिकाणी कम्प्युटर दुरुस्तीशी (हार्डवेअर, सॉफ्टवेअर) संबंधित काम करतो थोडं थोडं. मदतनीसासारखी ही नोकरी तो अर्धवेळ स्वरूपात करतो. ह्या मुलाची सध्याची समस्या : इंग्रजी येत नाही.

तीन हजार तीनशे रुपये देऊन तीन महिन्यांचा इंग्रजी बोलण्यासंबंधीचा कोर्स या मुलाने केला. पैसे-वेळ वाया. हे तोच आपल्याला सांगतोय.

हार्डवेअर दुरुस्तीचा तीन वर्षांचा डिप्लोमाही या मुलाने केलेला आहे. सध्या प्रॅक्टिकल शिकणं सुरू आहे. यासाठी वापरावी लागणारी पुस्तकं इंग्रजीत आहेत, ती समजण्यासाठी / समजण्यापुरतीच इंग्रजी भाषा शिकायच्येय, असं तो सांगतोय. ट्रबल-शूटिंगसारख्या गोष्टींसाठी आवश्यक गोष्टी् समजून घेण्यासाठी त्याला इंग्रजी शिकावीशी वाटतेय. हे शिकण्यासाठी तो कधी कधी 'गुगल-ट्रान्स्लेट'ची मदत घेतो आणि वाक्यंच्या वाक्यं भाषांतरित करण्याचा प्रयत्न करतो. पण त्यातूनही काही साध्य होत नाही.

हा मुलगा मराठी जितक्या सहजतेने बोलतो तितक्या सहजतेने तो इंग्रजी शिकण्याची इच्छाही बोलून दाखवू शकत नाही. त्याला इंग्रजी शिकायच्येय ती फक्त समोरचा काय बोलतोय ते समजावं इतपतच. परदेशी उच्चार कळत नाहीत, असंही त्याला वाटतं. तेही कळून घ्यायला हवेत, असं तो म्हणतो. आणि शेवटी म्हणतो की, रोजच्या जीवनात बोलतो ते नको, इंटरव्ह्यूमधे बोलता यायला पायजे. व्हॉट आय डू, यू डू - असलं नको. कठीण शब्द यायला पायजेत, असं तो सांगतो.

मुद्दे अनेकच आहेत. सगळे आपल्या कक्षेतलेही नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या नोंदीचा हेतू चांगल्या अर्थी फक्त पत्रकारी आहे. म्हणजेच नोंद करणं. तर हा मुलगा आपल्याला भेटला याची नोंद केल्यावर त्याच्याच बोलण्यात काय आलं तेही नोंदवलं. याच मुलाने त्याच्या परिसरात मोठ्या संख्येने राहणाऱ्या समाजाची भाषा म्हणून मारवाडी शिकायचाही प्रयत्न केला होता, पण तो यशस्वी झाला नाही. इंग्रजीचा प्रयत्न सुरू आहे. ('गुगल-ट्रान्स्लेटचा तसा वाक्य शिकायला उपयोग नाहीये रे'. होय काय, मग ठिकाय. पुस्तकच पाहतो कायतरी अप्पा बळवंत चौकात. कळलं तर सांगा.)

काही मुद्दे साधे आहेत. त्याला इंग्रजी जमली की हार्डवेअरसोबत सॉफ्टवेअरच्या काही गोष्टी कळणं सोपं जाईल, त्यातून तो स्वतःहून काही कामं करू शकेल. त्या कामातून त्याला स्वतःचे पैसे मिळवता येतील आणि त्यातून जेवण नीट होईल. जेवणासोबत इतर अनेक कामं, गरजा, मौज याही गोष्टी करता येतील. त्यामुळे जेवणासाठी आवश्यक भाषा हा एक भाग. दुसरा मुद्दा त्याने एकदम सपशेल मांडलाय नोकरीसाठीच्या मुलाखतींसंबंधीचा. रोजच्या जीवनाला सोडूनच या मुलाखती होतात हे या जेमतेम अठरा वर्षांचा होत आलेल्या मुलानेही ओळखलंय. ओळखलंय ते बरंच म्हणायचं. त्या मुलाखतीसाठी आवश्यक भाषा त्याला सापडणं गरजेचं आहे.

आपण ज्या मुलाची भाषेविषयीची आकांक्षा इथे मांडली त्याची आर्थिक परिस्थिती तुम्ही आधीच जोखली असेल. आणखी खोलात जायचं तर त्याची जातही जोखा. त्याला जी मराठी येते त्यातही तो सुरक्षित नाहीये, पण ते तो त्याच्या उपजत ताकदीने सांभाळून नेईल. इंग्रजीचं काय करायचं हा मात्र प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर त्याला सापडेल तेव्हाच आपण 'रेघे'वर नोंदवू शकू. सध्या एवढंच.
***

दोन

पद्मगंधा प्रकाशन
वरच्या भागातला मुलगा हे आपल्या नोंदीला पुरेसं कारण आहे. पण नोंदीला आणखी एक निमित्त म्हणजे कालच झालेलं एका पुस्तकाचं प्रकाशन. हे पुस्तक म्हणजे तीन वर्षांच्या प्रयत्नातून उभा राहिलेला गणेश देवी यांच्या नेतृत्वाखालचा भाषांच्या दस्तावेजीकरणासंबंधीचा प्रकल्प. तुम्ही यासंबंधीच्या बातम्या वाचल्या असालच बहुधा. या प्रकल्पामध्ये भारतातील भाषांचं प्रचंड आवाक्याचं सर्वेक्षण केलं गेलंय. त्या त्या भाषेचा इतिहास, व्याकरण, भौगोलिक स्थान वगैरे गोष्टींचा आढावा, दस्तावेजीकरण हे या प्रकल्पातून झालेलं काम. हे काम पन्नास खंडांमध्ये टप्प्याटप्प्याने प्रकाशित होणार आहे. यातला महाराष्ट्रातल्या भाषांविषयीचा खंड 'पद्मगंधा प्रकाशना'तर्फे काल प्रकाशित झाला. हा खंड पाहायला मिळालेला नसल्यामुळे त्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही. पण या खंडाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी काही ना काही लिहून आलंय. 'लोकप्रभा' साप्ताहिकाचा ताजा (२३ ऑगस्टचा) अंक या प्रकल्पावर केंद्रित केलाय. त्यात बऱ्यापैकी माहिती आहे. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात लिपी असलेल्या आणि नसलेल्या अशा मिळून ५६ भाषा बोलल्या जातात. त्यातल्या मराठी आणि गोंडीला स्वतःची लिपी आहे. या अंकात देवी यांची मुलाखतही आहे. आपण नोंदीत जो बिंदू पकडू पाहतोय त्याला जोडून 'लोकप्रभे'तल्या या विशेष विभागातली एक चौकट पाहू. या चौकटीतला मजकूर असा आहे पाहा :
भाषा हाच संस्कृतीचा अस्सल आधार

खरं तर सगळ्याच प्रमुख भारतीय भाषा बोलणारे समाज आज चक्रव्यूहात सापडले आहेत. मुलांना मातृभाषेतून शिक्षण दिलं, तर ती इंग्रजीला सरावत नाहीत. साहजिकच ती चांगल्या नोकऱ्या, चांगल्या संधींपासून लांब जातात. त्याचा आर्थिक फटका बसतो. इंग्रजीतूनच शिक्षण दिलं, तर ती हळूहळू मातृभाषेपासून दुरावत जातात; पण जगण्याच्या लढाईत ती वरचढ ठरण्याची शक्यता असते. सामान्य माणसाचं देणं-घेणं रोजच्या जगण्याच्या संघर्षांशी असतं. त्यामुळे मातृभाषेपेक्षा तो रोजीरोटी मिळवून देणाऱ्या भाषेला प्राधान्य देणार हे उघडच आहे. विसेक वर्षांपूर्वी वरच्या स्तरात असलेला हा ट्रेंड मध्यमवर्गात झिरपला आणि हळूहळू तो निम्न मध्यमवर्गातही झिरपतो आहे. कुणाला पटो न पटो; पण भाषिक बहुविविधता असलेल्या आपल्या देशात वरच्या पातळीवर इंग्रजी आणि तळाच्या पातळीवर हिंदी याच व्यवहारभाषा झाल्या आहेत. मुख्य प्रवाहात येऊ इच्छिणाऱ्यांना, मुख्य प्रवाहात राहू इच्छिणाऱ्यांना या भाषा येण्याशिवाय पर्याय नाही.

अशा परिस्थितीत स्थानिक भाषा म्हणजेच मातृभाषा कामचलाऊ ठरत जाण्याचा धोका असतो. मराठी भाषेच्या बाबतीत त्याची चुणूक दिसायला आज सुरुवात झाली आहे.

कॉल सेंटरच्या नोकरीतली गरज म्हणून अमेरिकन धाटणीचं इंग्रजी अस्खलित बोलू शकणाऱ्या मुलांना मराठीशी दोन हात करावे लागतात. इथे प्रश्न फक्त मराठी बोलण्याचा नसतो. मराठी ही निव्वळ भाषा नाही, ती या समाजाची संस्कृती आहे. भाषा म्हणून मराठी आज चांगल्या पगाराच्या नोकऱ्या देत नसेल; पण ती एका समाजाची ओळख आहे, अस्मिता आहे. मराठी म्हणवून घेणाऱ्या माणसाची मुळं थेट ज्ञानेश्वर, मुकुंदराजापर्यंत असतात. संतांनी त्याच्या वैयक्तिक आणि सामाजिक मनाची मशागत केलेली असते. वारी न करताही त्या परंपरेशी तो मनानं जोडला गेलेला असतो. तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची अंबाबाई, जेजुरीचा खंडोबा यांच्याबरोबरच शिवाजी महाराज हे त्याचं आराध्यदैवत असतं. गड-किल्ल्यांवरचा मोकळा वारा त्यानं कधी ना कधी तरी अभिमानानं छातीत भरून घेतलेला असतो. ओव्या-अभंगांनी, कीर्तनानं त्याच्या थकल्याभागल्या जिवाची हुरहुर कमी केलेली असते. लावणीबरोबरच शाहिरीत त्याचा जीव रमलेला असतो. पिठलं-भाकरी आणि मिरचीच्या ठेच्याचं नाव काढलं तरी त्याच्या तोंडाला पाणी सुटतं. त्याला गनिमी कावा माहीत असतो आणि अमृताते पैजेवर जिंकण्याचा दावा करणाऱ्या त्याच्या भाषेला तितक्याच करकरीत शिव्यांचंही वावडं नसतं. ही यादी आणखी कितीतरी वाढत जाऊ शकते.

इंग्रजीतून शिकणारी, पोटापाण्यासाठी जगभर कुठेही जाण्याची शक्यता असलेली उद्याची पिढी मराठी भाषेशीच जोडली गेली नसेल, तर ती या परंपरांशी तरी कशी जोडली जाणार? वेगानं बदलणाऱ्या तंत्रज्ञानाबरोबर तितक्याच वेगानं बदलणाऱ्या जगात व्यक्ती म्हणून, समाज म्हणून आपली ओळख ठसवायची असेल, तर भाषा, संस्कृती हाच अस्सल आधार ठरतो.

लोकप्रभा : २३ ऑगस्ट २०१३
या चौकटीतला मुद्दा काय आहे? आर्थिकदृष्ट्या ही भाषा माणसं तगवायला उपयोगी पडत नसेलही, पण सांस्कृतिकदृष्ट्या ती किती मोलाची आहे! आणि 'लोकप्रभे'च्या कव्हर-स्टोरीचं शीर्षक हे आहे : बोलीभाषाच करतील भारताला सुपरपॉवर! 'सुपरपॉवर' ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत नसल्यामुळे त्याबद्दल काही बोलणं शक्य नाही. दहा रुपयांमध्ये 'लोकप्रभे'चा हा ७६ पानी अंक मिळतो, त्यामुळे तुम्ही तो सहज जाताजाता विकत घेऊन वाचू शकता किंवा वेबसाइटवर पाहता येईलच. त्यावर आपापलं काय वाटतं तेही ठरवता येईल. मूळ मुद्दा आहे तो या सगळ्यात आर्थिक आणि सांस्कृतिक असे वेगवेगळे भाग काढून भाषेबद्दल काही म्हणणं मांडल्यासारखं दिसतं. तसं ते इतकं सहज असेल का? नसावं. आणि त्यात एकाच ठिकाणी कितीतरी विरोधाभास दिसतोय. याच अंकातल्या मुलाखतीत देवी म्हणतात  : ''मोबाइल घ्या, कॉम्प्युटर घ्या, त्यांच्या तंत्रज्ञानात भाषा हा मुख्य आधार आहे. त्यामुळे माझ्या मते भाषा या वस्तूला यापुढच्या काळात महत्त्व येत जाणार आहे.'' देवी यांच्या या म्हणण्यामागे जे कारण आहे तेही त्यांनी पुढे एका प्रश्नाच्या उत्तरात थोडं स्पष्ट केलंय, ते असं : ''आता इंटरनेट, कॉम्प्युटरवर जास्त व्यवहार इंग्रजीत आहेत हे खरं आहे, पण कॉम्प्युटरच्या तंत्रज्ञानाच्या मुळाशी ग्रीक भाषा आहे. म्हणजे कॉम्प्युटर तंत्रज्ञान हे ग्रीक भाषेवर अवलंबून आहे. ० आणि १ ही दोन चिन्हं हा त्या भाषेचा मुख्य आधार आहे. ० चा अर्थ आहे, संपूर्ण अनुपस्थिती आणि १ या चिन्हाचा अर्थ आहे, उपस्थिती. या दोन चिन्हांच्या संबंधांवर कॉम्प्युटरचं काम चालतं. किंवा त्यांच्या मापात कॉम्प्युटरचं डोकं चालतं असं म्हणता येईल. म्हणजे पाचशे वेळा शून्य हे चिन्ह आणि दोनशे वेळा एक हे चिन्ह म्हणजे त्याचा अर्थ अमुकतमुक अशी नोंद कॉम्प्युटर घेतो.'' इथपर्यंत सांगून झाल्यावर शेवटाकडे देवी ज्या मुद्द्यावर येतात तोही आपल्याला नोंदवायला हवा, तो असा आहे : ''वास्तविक एवढ्या भाषा असणं ही आपली सांस्कृतिक संपत्ती आहे. उद्याच्या काळातल्या तंत्रज्ञानासाठी आपण जमेच्या बाजूला आहोत. बराच काळ आपण आपल्याकडे असलेले भटके विमुक्त, मागास हे सगळे समाज, त्यांच्या भाषा बोजा मानत आलो आहोत. कधी यांचा विकास होमार, हे कधी समाजाच्या मुख्य प्रवाहात येणार, यांच्या या सगळ्या मुख्य प्रवाहात फारशा उपयोगी नसलेल्या भाषांचं काय करायचं, त्यातून यांची सुधारणा कशी होणार हा आपला दृष्टिकोन बराच काळ राहिला आहे. पण तो आपल्यावरचा बोजा नाही, तर ती आपली सांस्कृतिक श्रीमंती, ते आपलं सांस्कृतिक ऐश्वर्य आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भाषेवर आधारित तंत्रज्ञान विकसित होण्याच्या काळात तर ते आपलं भांडवल आहे. हे आपलं सांस्कृतिक भांडवल आहे आणि त्याच्यामध्ये आर्थिक भांडवल बनण्याच्या क्षमता आहेत. ही बाब नीट लक्षात घेतली तरच आपल्या भाषा जिवंत राहतील आणि त्यांच्यामुळेच आपल्याला आर्थिक सुबत्ता येईल.''

या आर्थिक सुबत्तेलाच 'कव्हरस्टोरी'च्या शीर्षकामध्ये 'सुपरपॉवर' म्हटलंय का? माहीत नाही. देवी यांच्या मुलाखतीचं शीर्षक आहे - 'भाषाच होणार आपले आर्थिक भांडवल.' हीच मुलाखत आजच्या 'लोकसत्ते'च्या 'लोकरंग' पुरवणीतही वाचता येईल. शिवाय 'लोकरंग'मध्ये अरुण जाखडे आणि संदेश भंडारे यांचे लेखही आहेत याच विषयासंबंधी.

या प्रकल्पाच्या निमित्ताने कालच 'मिंट' या आर्थिक घडामोडींशी संबंधित वृत्तपत्राच्या 'लाउन्ज' या पुरवणीतही देवी यांची मुलाखत आलेय. 'प्रत्येक भाषा हा जगाकडे बघण्याचा स्वतंत्र दृष्टिकोन असतो' अशा शीर्षकाच्या या मुलाखतीतही वरच्या मुलाखतीप्रमाणेच मतं सापडतील. जगाकडे बघण्याचे ५६ दृष्टिकोन एकट्या महाराष्ट्रातच आहे ही नक्कीच खूप सुंदर गोष्ट आहे आणि त्याबद्दल नोंद होणं हेही चांगलंच. त्याबद्दल आपण या प्रकल्पाचं अभिनंदन करूया. पण त्याबरोबर भाषेच्या आर्थिक आणि सांस्कृतिक अशा बाजू पाहताना काही गफलती होतायंत का, तेही पाहायला हवं असं वाटतं. कारण इतिहासातली अनेक उदाहरणं देता येतील ज्यात तत्कालीन समाजामध्ये कमी स्तरावर बोलली जाणारी भाषा नंतर सत्ताधाऱ्यांची भाषा बनली वगैरे. ती देवी यांच्या 'लाउन्ज'मधल्या मुलाखतीत आहेतही. पण आपल्याला नोंदीच्या पहिल्या भागात जो मुलगा भेटला त्या समकालीन माणसाला काय आणि कसं समजवायचं? माहीत नाही.
***

तीन

या सगळ्या गोष्टींमध्ये विरोधाभास आहे असं आपण वरती म्हटलं, त्यासंबंधी 'रेघे'कडेच बोट दाखवायचं, तर विद्याधर दाते यांच्या 'भाजप, भाषा आणि भाकडकथा' या मागच्या एका लेखाकडे वळता येईल. यात दाते एका ठिकाणी म्हणतात :
सत्ताधाऱ्यांना मराठी किंवा इतर स्थानिक भाषांना पाठिंबा देण्यामध्ये फारसा रस नाही. उलट ते नव-उदारमतवादी आणि साम्राज्यवादी शक्तींसाठी कार्यरत असल्याप्रमाणे वागत आहेत. त्यामुळेच पहिल्या इयत्तेपासून इंग्रजी शिकवण्याचं धोरण राबवलं गेलं. वास्तविक, विविध आंतरराष्ट्रीय संघटना आणि 'युनेस्को'नेही हे स्पष्ट केलेलं आहे की, आपल्या मातृभाषेतूनच मूल चांगल्या प्रकारे शिकू शकतं.

अशा करूण परिस्थितीतून ही विचित्र अवस्था निर्माण झालेली आहे. भारत असो, किंवा पाकिस्तान वा नामिबाया असो, इथल्या गरीबातल्या गरीब लोकांनाही वाटतं की, आपल्या मुलांना इंग्रजी भाषा शिकवायला हवी, इंग्रजी माध्यमातून त्यांचं शिक्षण व्हायला हवं. याचा परिणाम म्हणजे गरीब विद्यार्थी ना धड इंग्रजी शिकू शकतो ना त्याला स्थानिक भाषा धड शिकता येते.
यातली पहिल्या परिच्छेदातली पहिली दोन सरसकट वाक्यं नक्की काय सिद्ध करतात? की मुद्द्यामधली गुंतागुंत संपवून टाकतात? आपण नोंदीच्या सुरुवातीला ज्या मुलाबद्दल सांगितलं त्याला भाषेबद्दलचे हे युक्तिवाद पटतील? का पटावेत? मुळात दाते यांचा लेखही इंग्रजीत लिहिलेला आणि आपण 'रेघे'वर तो मराठीत नोंदवला यातच किती विरोधाभास आहे. आपल्याला काही मुद्द्यांसाठी ते तसं करणं योग्य वाटलं आणि 'रेघ'वर सगळ्या मुद्द्यांना लोकशाही जागा आहे, असं एक आपलं म्हणणं असल्यामुळेही तो प्रयत्न केला जातो. तरीही त्यातल्या सरसकटीकरणाकडे वाचकांनी दुर्लक्ष करायला नको. आणि दाते यांच्या लेखाबद्दल बोलायचं तर, 'उच्चभ्रू' असं म्हणून आपण ज्या धोरणाला हिणवतो आणि विरोधी म्हणणं मांडतो तेव्हा पुन्हा काही 'उच्चभ्रू'च म्हणणं मांडलं जातं का ते पाहिलं पाहिजे.

अजून एक इथे नोंदवायला पाहिजे. भालचंद्र नेमाडे यांनी 'देशीवाद' नावाचं काहीएक म्हणणं मांडलं, त्यासंबंधी त्याच नावाचं नेमाड्यांचं एक इंग्रजी पुस्तक शिमल्याच्या 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडीज्' या संस्थेने २००९मध्ये प्रकाशित केलंय. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत नेमाडे म्हणतात :
-
मराठीमध्ये मी मांडलेली देशीवादाची भूमिका ज्यांनी गांभीर्यपूर्वक केलेल्या अनुवादांमुळे देशातील अधिक मोठ्या स्तरावरच्या अकादमिक वर्तुळांपर्यंत पोचली त्या सांस्कृतिक अभ्यासविषयांमधील ज्येष्ठ स्कॉलरांचे मी आभार मानू इच्छितो. यातील पहिले, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक मकरंद परांजपे यांनी त्यांच्या 'नेटिव्हिझम् : एसेज् इन क्रिटिसिझम्' (साहित्य अकादमी, नवी दिल्ली, १९९७) या पुस्तकामध्ये देशीवादाची संकल्पना सक्षमपणे उलगडली आहे. पहिल्यांदा १९८३मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'साहित्यातील देशीयता' या माझ्या निबंधाचा अनुवाद या पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे.
काही मुद्द्यांमधलं तथ्य लक्षात घेतलं तरी भाषिक व्यवस्थेबद्दलचा हा समकालीन विरोधाभास कसा उलगडायचा. आपल्या भूसांस्कृतिक वैशिष्ट्यांकडे, त्यातून आलेल्या भाषेकडे सजगपणे पाहावं - हा देशीवादाचा एक भाग आहे हे पाहता ही भूमिका भारतातल्या बुद्धिमंतांच्या वर्तुळात पसरण्यामागेसुद्धा इंग्रजीचा हात असावा, हे नक्की कसं समजावून घ्यायचं? किंवा का समजून घ्यावं?

या भागात आपण दाते आणि नेमाडे यांच्याबद्दल बोललो कारण दोघांच्याही कामांना महत्त्व आहे आणि दोघांचाही आयुष्यातला आर्थिक उत्पन्नाचा मुख्य मार्ग इंग्रजी भाषेशी संबंधित होता. दाते इंग्रजी पत्रकारितेत होते तर नेमाडे इंग्रजीचे शिक्षक होते. देवी यांचंही मुख्य आर्थिक उत्पन्न बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड विद्यापीठात इंग्रजी शिकवण्यातून होत होतं. यात खरोखरच गैर काहीच नाही, पण आपल्याला सांस्कृतिक आधार देणारी मराठी आर्थिक आधार देताना उपयोगी पडत नाही असा याचा अर्थ घ्यायचा का? किंवा आपला सगळ्यांत महत्त्वाचा प्रश्न एवढाच आहे की, सुरुवातीला भेटलेल्या मुलाला कसं समजवायचं?

आपल्या परंपरेत व्यक्तीचं मोठेपण मान्य करूनही प्रश्न विचारणं हा एक भाग असावा, किंवा नसल्यास तो आणावा. तसं न करता आपली कायतरी पिढी आहे असा समज करून घेऊन आक्रस्ताळी शेरेबाजी करावी असा एक भाग करता येईल, पण मग मुद्द्यापेक्षा व्यक्तिकेंद्रीत प्रसिद्धीबाजी मजबूत होईल. हा स्वतंत्र मुद्दा आहे, पण जाताजाता.. मराठी भाषेतल्या सांस्कृतिक अंगासंबंधीचं निरीक्षण म्हणून बोललो, बाकी वेगळं बोलण्यासारखं काय आहे काय. एका सामान्य पुस्तकाची आवृत्ती जिथे साधारणपणे निव्वळ एक हजार प्रतींची निघते तिथे प्रश्न विचारण्यापेक्षा व्यक्तिगत आरोप करण्याचा कोतेपणा जास्त साहजिक असेल कदाचित.
***

चार

आता आपण नोंदीच्या शेवटच्या भागाकडे आलोय. पहिल्या तीन भागांमधून जे काही म्हटलं ते फारच नकारात्मक वाटतंय ना? पण पहिल्या भागातला मुलगा आपल्याला कालच भेटावा आणि त्याने 'रेघे'वर नोंद करायला लावावी यामुळे ते तसं झालंय. आणि त्या पहिल्या भागात, मुलाच्या बाजूने जे म्हणणं आहे ते जसंच्या तसं आहे, आपण एका कणाचीही भर घातलेली नाही, हेही मुद्दाम नोंदवायला हवं. त्याचं जे म्हणणं आहे त्यात त्याच्या बाजूने अजिबातच भाबडेपणा नाहीये. स्पष्ट आणि प्रामाणिक गरज आहे आणि तेवढीच तो बोलतो. बाकी या सगळ्यात काही सकारात्मक मुद्देही कदाचित बोलता येतील पण ते आपण बोलू शकत नाही, त्यापेक्षा देवींचं ऐकूया :



मुंबईतल्या 'टेड' कार्यक्रमातला हा व्हिडियो आहे. प्रत्येक भाषा हा जगाकडे बघण्याचा एक स्वतंत्र दृष्टिकोन असतो, हाच मुद्दा देवी यांनी सहज आणि सुंदरपणे मांडलाय. पण इथे आणखी एक सांगण्यासारखं आहे, ते देवी यांच्या 'वानप्रस्थ' या पुस्तकातलं. या पुस्तकामध्ये पान २१ वर देवी म्हणतात :
पद्मगंधा प्रकाशन
... वनामध्ये एक वनस्पती दुसऱ्या वनस्पतीला वाढू देत नाही, असे कधीही होत नाही, निलगिरीच्या झाडाजवळ इतर झाडे येत नाहीत, असे म्हणतात; पण बऱ्याच वेळेला निलगिरीवर फार चांगले पक्षी मी बघितलेले आहेत. स्वतःची मुळे जपून इतरांचा तिरस्कार करू नये हे झाडापासून शिकण्यासारखे.
यातला वनस्पतीशास्त्राचा मुद्दा आपल्या माहितीतला नाही, पण त्याशिवायही वाक्यातल्या वाक्यात जरा घोळ झालाय. निलगिरीच्या झाडाजवळ इतर झाडे येत नाहीत, या आक्षेपाला उत्तर म्हणून त्या झाडाजवळ पक्षी येतात हे कसं काय सांगता येईल? ही जर 'प्रुफरिडींग'ची चूक असेल तर मात्र आधीच माफी मागूया.

बाकी, झाडाकडून आणखीही एक शिकण्यासारखं आहे. झाड दुसऱ्यासाठी काहीच करत नाही. पानं, मुळं, फांद्या, फळं सगळं फक्त स्वतःच्या जगातल्या टिकण्यासाठी सुरू असतं. हा स्वार्थीपणा म्हणजे झाडाचा फार महत्त्वाचा गुण. अर्थात त्याच वेळी ते सहिष्णूही असेल, त्यामुळे कोणी यातलं काहीही तोडलं, मोडलं नि स्वतःसाठी वापरलं तर ते काही आक्षेप घेत नाही. त्यामुळे माणसाने आता यातलं काय नि कसं शिकायचं ते जरा अवघडच आहे.

पत्रकारी हेतूची आपली नोंद इथेच संपतेय. मुद्दा भाषेविषयीचा तर त्यात भाषाशास्त्रज्ञांनी, भाषा शिक्षकांनी बोलणंच जास्त बरं असेल. आपण तर त्यातलं काहीच नाही. तरी आपण बोललो आणि लिपीच्या मदतीने लिहिलं. कारण पुन्हा भाषेनेच आपल्याला त्यासाठी पुढे ढकललं. म्हटलं तर भारी आणि म्हटलं तर बिचारी अशा अवस्थेतल्या या भाषेबद्दल बिचारे ना. गो. कालेलकर त्यांच्या 'भाषा आणि संस्कृती' या पुस्तकात काय म्हणतात ते नोंदवून शेवट करून टाकू. पुस्तकाची पहिली आवृत्ती १९६२मधली आहे, त्यासंदर्भात हे पाहावं लागेल. तर कालेलकर म्हणतात :
शास्त्रीय संशोधनात अग्रेसर अशा ज्या समाजांतून विश्व पादाक्रांत करण्याचे हे प्रयत्न होत आहेत त्या समाजांची भाषा त्या दिशेने समृद्ध होत चालली आहे. ज्या समाजांजवळ ही झेप नाही त्यांना या आघाडीवर असलेल्या समाजांच्या भाषा आत्मसात केल्यावाचून गत्यंतरच नाही. कारण केवळ आपल्या संस्कृतीच्या साधनांवर अवलंबून राहून आजच्या क्रांतियुगात आपला निभाव लागणार नाही. एक नवी विश्वसंस्कृती आपणा सर्वांना एकत्र आणू पाहत आहे. तिचे योग्य ज्ञान होण्यासाठी तिला प्रभावी रितीने व्यक्त करणारी एखादी तरी भाषा आपल्याला शिकावीच लागेल, कारण जीवनाचे नवे अनुभव स्वतःमध्ये साठवून ते व्यक्त करण्याच्या दृष्टीने आणि ज्ञानमार्गावर मानवाची ज्या वेगाने प्रगती होत आहे तिच्या तुलनेने आज कोणतीही भारतीय भाषा समर्थ आहे असे वाटत नाही.

Thursday, 15 August 2013

१५ ऑगस्ट, ए. के. हंगल व हसणं

आज १५ ऑगस्ट. आजच्या दिवशी आपण एका पुस्तकाच्या मदतीने नोंद करणार आहोत. 'माझ्या आठवणी' हे अभिनेते ए. के. हंगल यांचं आत्मचरित्रपर असं लहानसं पुस्तक आहे. एकशेएकवीस पानांचं. या पुस्तकातला काही मजकूर निवडून खाली नोंदवलाय. यातून आपसूक हंगलच का नि त्यांचं हे पुस्तकच का हे स्पष्ट होईल असं वाटतं. म्हटलं तर सुट्या सुट्या, म्हटलं तर एकसंध अशा आठवणी नोंदवल्यात फक्त हंगलांनी. आपण त्यातही आणखी थोडका मजकूर निवडून इथे काही बिंदू नोंदवू पाहतोय. कसले बिंदू? पाहा खालच्याच मजकुरात काही उत्तर आहे काय ते-
***

लोकवाङ्मय गृह. । दुसरी आवृत्ती : ऑगस्ट १९९९
अनुवाद : वैशाली रोडे । मुखपृष्ठ : कमल शेडगे
हंगलांच्या पुस्तकाबद्दल नोंद का, याचा एक बारका बिंदू पुस्तकाच्या 'मनोगता'मध्ये मिळेल. तिथे हंगल म्हणतात :
तारखा वगैरेंच्या बाबतीतही मी तसा कच्चाच आहे. एक अभिनेता म्हणून मला लोकांमध्ये, त्यांच्या स्वभावात, त्यातल्या बारकाव्यांत जास्त रस आहे. मला माझी स्वतःची जन्मतारीखही माहीत नाही. १५ ऑगस्ट ही माझी जन्मतारीख म्हणून लावली गेली आहे, पण एका विशिष्ट प्रसंगामुळे ती तारीख मला चिकटली. आणि थोडाफार स्वातंत्र्यसैनिक असल्यामुळे मीही ती तशीच राहू दिली. वाचकांना यात काही चुका आढळल्या तर त्यांनी मला त्या निःसंकोचपणे कळवाव्यात. मी त्यांचा आभारीच राहीन.
हा परिच्छेद जसा आहे, तसंच पुस्तकाचं स्वरूप आहे. कधी संकोचत, कधी देशसेवा नावाच्या गोष्टीबद्दल ढोबळ वाटेल असं काही बोलत, प्रामाणिकपणे हंगलांनी त्यांच्या आठवणी नोंदवल्यात. कधी तुटकपणे, कधी आधी सांगितलेलं जरा परत सांगितलं जातंय, असं हे पुस्तक उभं आहे. यातल्या हंगलांच्या लहानपणीच्या परिसरासंबंधीच्या आणि शाळेच्या काळातल्या आठवणींमधले काही बिंदू एकदम थोडक्यात इथे आपल्या चित्रासाठी नोंदवूया :
पेशावर :
माझे आजोबा प्रथम पेशावरला आले. आमचे पूर्वज काश्मिरी पंडित. काश्मिरी भाषेत 'हंगल' म्हणजे हरीण, काळवीट. आमचे पूर्वज कित्येक शतकं काश्मीर सोडून लखनौला राहतायत. पं. दया किशन हंगल जवळ जवळ दीडशे वर्षांपूर्वी लखनौहून पेशावरला आले.

'पारसी थिएट्रिकल कंपनी' पेशावरला आली आहे हे ऐकलं की आम्हाला कोण आनंद व्हायचा! ही गावोगावी फिरून संगीत नाटकं करणारी नाटक मंडळी होती. त्या वेळचे सुप्रसिद्ध नाटककार आगा हशर काश्मिरी आणि नारायण प्रसाद 'बेताल' यांनी लिहिलेली ही नाटकं असायची. रात्रीची जेवणं आटोपून रात्री नऊच्या सुमाराला आम्ही नाटकाला जायचो, ते थेट पहाटेपर्यंत. कमीत कमी पाचेक तास नाटक चालायचं. तेही कशा स्थितीत? वीज नाही. त्यामुळे दिवेही नाहीत आणि मायक्रोफोनही नाहीत. नट मेकअपचे जाड थर चेहऱ्याला लावायचे. कोण बरा दिसतोय, कोण नाही, हेही ओळखू येणं कठीण. नाटकातल्या स्त्री-भूमिकाही पुरुष नटच करायचे. स्त्रिया अजून रंगभूमीवर काम करायला लागल्या नव्हत्या. प्रेक्षकांना एखादं गाणं किंवा एखादा प्रसंग आवडला की, 'वन्स मोअर' मिळायचा. ते गाणं किंवा प्रसंग मग कलाकारांना पुन्हा करावा लागायचा. एकही नवीन नाटक आम्ही चुकवलं नाही. मी नेहमी पुढच्याच रांगेत बसायचो आणि उत्सुकतेने शुद्ध उर्दूतले यमकयुक्त संवाद आणि मधुर गाणी ऐकायचो.

शाळा :
माझं प्राथमिक शिक्षण पेशावरला झालं. तेव्हा आणि अजूनही पेशावर ही वायव्य सरहद्द प्रांताची राजनाधी आहे.

हा प्रदेश मुख्यतः शेतीप्रधान. वायव्येकडे अफगाणिस्तानचे डोंगर आणि पूर्वेकडे पंजाबची सुपीक जमीन यांच्यामध्ये वसलेला. पण तिथे सतत युद्धं व्हायची. काही विशिष्ट भागांमध्ये तिथल्या मूळ लढाऊ रहिवाशांची वस्ती होती. कोणत्याही सत्तेविरुद्ध शस्त्रानिशी ते उभे ठाकायचे. मोगल, शीख, इंग्रज यांना त्यांनी प्रतिकार केला होता. अलीकडे काही वर्षं, हाच भाग अंमली पदार्थ, शस्त्रास्त्रं यांच्या बेकायदेशीर व्यापारासाठी कुप्रसिद्ध आहे. पेशावरपासून काही मैलांवर असलेल्या दरी या गावी स्वयंचलित रिव्हॉल्वर, ३.३ बोअर रायफली आणि अत्याधुनिक बनावटीच्या 'कनाश्निकोव्ह' मिळतात. या अत्याधुनिक स्वयंचलित शस्त्रांसारखीच शस्त्रं बनवण्याचं कौशल्यही इथल्या लोकांनी मिळवलंय. अफगाणिस्तानातल्या यादवी युद्धापासून इथली परिस्थिती फारच बिघडली आहे.

पेशावर हे तटबंदी असलेलं शहर. रात्री ब्रिटिश छावण्या आणि शहर यांच्यामध्ये असणारे दरवाजे बंद व्हायचे. शहरात बहुसंख्य लोक मुसलमान होते, पण हिंदूही बरेच होते. हिंदू-मुस्लिम सलोख्याने रहायचे.

०००

आता मी 'खालसा हायस्कूल'मध्ये जायला लागलो होतो. दोन शीख भाऊ ही शाळा चालवत. इथे ब्रिटिशांचं अस्तित्व अधिकच जवळून जाणवायचं. आमच्या शाळेच्या समोरच महाराजा रणजितसिंगांनी बांधलेला 'किल्ला बाला हिरसार' हा किल्ला होता. या किल्ल्यात आता ब्रिटिश सैन्याचा तळ होता.

या शाळेत मी शीख धर्मातल्या काही गोष्टी शिकलो. रोज सकाळी वर्ग सुरू होण्याआधी सामुदायिक प्रार्थना व्हायची. त्याला 'हरदास' म्हणत. ही प्रार्थना शीख गुरूंच्या काळात धर्मासाठी प्राणार्पण केलेल्यांच्या गौरवार्थ असायची.

०००

मी कधीच फार हुशार नव्हतो. गणितात तर माझा भोपळा ठरलेलाच. खरं तर वडिलांनी खास गणितासाठी मला खासगी शिकवणी ठेवली होती. पण ते सरच बिचारे माझा गृहपाठ करून द्यायचे!

माझा एक विषय चांगला होता, तो म्हणजे उर्दू. घरी आम्ही उर्दूच बोलायचो. उत्तर भारतात हिंदू आणि मुस्लिम दोघंही उर्दूच बोलतात. शहरातल्या उच्च आणि मध्यमवर्गीयांची ही भाषा. खेड्यापाड्यातले लोक मात्र त्यांच्या त्यांच्या बोलीभाषांचा वापर करतात. घरातल्या बायकाही जास्त करून हिंदीच बोलतात. कारण धर्मशास्त्र आणि धार्मिक गीतं याच भाषेत आहेत. आजोबांना पर्शियन भाषाही यायची. कारण एकेकाळच्या राज्यकर्त्यांची, मोगलांची ती सरकारी कामकाजाची भाषा होती.

आजही मी उर्दूच बोलतो. माझ्या व्यवसायातही उर्दूच वापरतो. माझ्या चित्रपटातले संवाद मी उर्दू लिपीत लिहून घेतो. कारण हिंदी वाचणं, लिहिणं मला कठीण वाटतं. मला शाळेत कधीच हिंदी शिकवली गेली नाही.
***

आता आपण हंगलाच्या पुस्तकातल्या परिसरातून आपल्यात येऊ. वरती त्या पुस्तकातला जो मजकूर नोंदवला त्यात हंगलांच्या शाळकरी जीवनातलं काही आलंय. त्यांचं घराणं मूळचं कुठलं, त्यांचा धर्म, भाषा, आणि त्यांचा लहानपणचा परिसर, याचा थोडासा अंदाज त्यातून यावा. हंगल यांच्या जन्माचं साल १९१४ आहे. तेव्हाच्या हिंदुस्थानी परिसरातल्या एका भागाबद्दल ते बोलतायंत. त्यांच्या नजरेतून काही बोलू पाहातायंत. तेव्हा मॅट्रिक झाल्यानंतर घरच्या परिस्थितीमुळे हंगल टेलरिंगच्या कामात उतरले आणि संबंधित नोकरी करू लागले. दरम्यान, त्यांच्या वडिलांच्या निर्णयामुळे कुटुंबाने पेशावरहून कराचीला बाडबिस्तारा हलवला. तिथेही हंगल पोटापाण्याचं काम म्हणून टेलरिंग दुकान आणि स्वतःची आवड म्हणून हौशी रंगभूमी अशा कामांमध्ये गुंतले. दरम्यान, दुसरं महायुद्धही झालं, त्या काळात त्यांना राजकीय जाणीवही तीव्रतेने झाली. देवाधर्मावरचा विश्वास उडाला, साम्यवादी विचारसरणीचं आकर्षण वाटून त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचं सदस्यत्वही घेतलं. टेलरिंग कामगारांच्या संघटनाचा प्रयत्न केला. असं त्यांचं त्यांचं बरं चाललं होतं. दरम्यान, भारत देशाचा कारभार भारतीय व्यक्तींच्या हाती सोपवून ब्रिटीश लोक निघून गेले, जाता-जाता भारतातून पाकिस्तान बाहेर आला, फाळणी झाली, इत्यादी सगळ्या गोष्टी. या काळात हंगल आपल्या कामगार संघटनाच्या कामामुळे तुरुंगात गेलेले, कराचीत. इकडे फाळणीमुळे निर्वासित झालेल्या मंडळींची प्रचंड ये-जा सुरू. फाळणीनंतर हिंदू नि मुस्लिम कैद्यांचीही देवाण-घेवाण करण्याचं ठरलेलं. त्यानुसार हंगल व त्यांच्या मित्रांना हिंदूपणा दाखवून तुरुंगातून सुटून भारतात जाण्याची संधी होती, पण त्यांना तेव्हा ते योग्य वाटलं नाही. पुढे नंतर १९४९मध्ये त्यांनी भारतात जायची तयारी दाखवली. मग त्यांना बारा तासांचा अवधी देऊन कराची सोडण्यास सांगण्यात आलं, त्यानुसार हंगल आपल्या बायको व मुलासह कराची बंदरावरून मुंबईला पोचले, अशा घडामोडी व संबंधित तपशील पुस्तकात येतो. कराचीच्या तुरुंगातला हंगलांनी नोंदवलेला एक प्रसंग आपण इथेही नोंदवू. न्यायालयीन सुनावणीच्या काळातला एक अनुभव आहे हा :
या सुनावणीच्या वेळी न्यायालयात नव्हे, तर न्यायालयाबाहेरच्या व्हरांड्यात मी एक धडा शिकलो.

माझी बायको माझ्यासाठी दुपारचं जेवण घेऊन आली होती. ती साडी नेसली होती. ते पाहून माझ्याबरोबर असणाऱ्या पोलिसाने विचारलं, 'तुम्ही मराठी आहात?'

'नाही. का बरं?'

'मी मराठी आहे. फाळणीच्या वेळी कुटुंबासकट स्थलांतर करून इथे आलो. मूळचा मी सातारचा.' तो म्हणाला. तिथल्या लोकांमध्ये इतकी वर्षं तो राहिला होता. त्यांच्याशी नातं जुळलं होतं. ते सर्व सोडून आता इथे आला होता. इथे त्याचं कोणीच नव्हतं. 'अक्षरशः रडतो हो आम्ही इथे!' तो सांगत होता.

आपण जिथे वाढतो, तिथेच आपली नाळ जुळलेली असते याचा मला प्रत्यय आला. धर्माच्या आधारावर नव्हे, तर असा मातीशी, या मातीतल्या लोकांशी जुळलेल्या नात्यावरच राष्ट्रं उभी राहत असतात. भाषा, संस्कृती, प्रदेश, इतिहास याला इथे महत्त्व असतं. हे समजण्यासाठी मार्क्सवादच वाचायला हवा असं नाही, सामान्य ज्ञानानेही हे कळू शकतं.
असा प्रसंग नोंदवलेले हंगल मुंबईत आल्यानंतर 'इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन'मध्ये (इप्टा), थोड्या राजकीय कामामध्ये, टेलरिंगच्या कामामध्ये असं स्वतःला गुंतवत गेले. रमत गेले. 'इप्टा' म्हणजे स्वतंत्र इतिहास आहे म्हणतात, त्याबद्दलही हंगलांनी लिहिलंय थोडक्यात. शंभू मित्रा, सलील चौधरी, उत्पल दत्त, मृणाल सेन, पंडित रविशंकर, भूपेन हजारिका, राजा राव, बलराज सहानी, हबीब तन्वीर, इत्यादी अनेक नावं या इतिहासात येतात. अमर शेख, शाहीर अण्णा भाऊ साठे अशा मराठी मंडळींचीही नावं हंगल घेतात. हा इतिहास आपल्या नोंदीत तसा समग्रपणे आणता येणं आपल्या मर्यादेत शक्य नसल्यामुळे तो ओझरता नोंदवून पुढे वळू.

हंगल मुख्यत्त्वे नाटकातलेच, पण पुढे ते आपसून चित्रपटांमध्ये लहान-मोठ्या भूमिकांमध्ये जात गेले. त्यांना चित्रपट क्षेत्राबद्दल मनापासून जवळीक कधी वाटली नाही, असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे 'आज या क्षेत्रात इतकी वर्षं काढल्यावरही या जगाच्या आपण बाहेरच आहोत, असं मला कधी कधी वाटतं' असं ते लिहून गेलेत. तरी त्यांनी चित्रपटांमधून जी काही कामं केली, त्यात जी काही माणसं भेटली त्यांचे लहान-मोठे प्रसंग त्यांनी पुस्तकाच्या शेवटच्या भागात सुटे सुटे नोंदवलेत. त्यानंतर 'माझ्या चित्रपटांवर बंदी' असा एक लहानसा भाग आहे शेवटाकडेच, त्यात हंगलांनी जे लिहिलंय ते नोंदवून थांबू. हंगलांनी हे लिहिलंय :
१९९३मध्ये शिवसेनेचे नेते बाळ ठाकरे यांनी माझ्या चित्रपटांवर बंदी घातली. त्यांना माझ्याबद्दल काही चुकीची माहिती कळली होती. खरं घडलं ते असं-

मध्यंतरी मी माझ्या आत्मचरित्राचा कच्चा खर्डा तयार करत होतो. फाळणीच्या पूर्वी मी सीमेच्या त्या बाजूला माझ्या कुटुंबासह राहात होतो. तेव्हाच्या असंख्य घटनांचा पट झरझर माझ्या डोळ्यासमोरून सरकून गेला. १९४९च्या अखेरीला मी मुंबईत स्थायिक झालो. त्यानंतर मी तिथे गेलो नव्हतो. साहजिकच तिथे जाण्याची माझी तीव्र इच्छा होती. मला माझं जन्मगाव (सियालकोट) पाहायचं होतं, मी जिथे मोठा झालो, ते शहर (पेशावर) पाहायचं होतं. याच शहरातून मी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. जिथून मी कम्युनिस्ट चळवळीत सामील झालो आणि त्यामुळे दोन वर्षांचा कारावासही भोगला, त्या कराची शहरालाही मला भेट द्यायची होती. पन्नास वर्षांनी तिथे जाणं आणि ती-ती ठिकाणं पाहाणं यामुळेही मला आत्मचरित्र लिहायला मदत झाली असती.

या विचाराने मी पाकिस्तानच्या मुंबईतल्या उप-उच्चायुक्तांना फोन केला. त्यांच्या देशाला एकदा भेट देण्याची माझी इच्छा मी त्यांच्या कानावर घातली आणि व्हिसा देण्याची विनंती केली. ते मदत करणारे गृहस्थ होते. 'हिंदी चित्रपटांतल्या दयाळू माणसाच्या प्रतिमेमुळे तुम्ही तिथे प्रसिद्ध आहात. व्हिसा मिळायला तुम्हाला काहीच अडचण येणार नाही', ते मला म्हणाले. मी तेव्हा भारत-पाकिस्तान कौन्सिलचा उपाध्यक्ष होतो (अजूनही आहे). त्यांना त्यांच्या कार्यालयात भेटण्यासाठी मी एक दिवस ठरवला, आणि त्याप्रमाणे गेलो. त्यांनी मला आवश्यक ती सर्व कागदपत्रं दिली आणि दुसऱ्याच दिवशी, २३ मार्च १९९३ रोजी असणाऱ्या 'पाकिस्तान दिन' समारंभाचं आमंत्रणही दिलं. मुंबईच्या प्रेसिडेंट हॉटेलमध्ये हा समारंभ होता. मी त्याला गेलो. त्यात विशेष असं काही नव्हतं. कराचीतले आपले उच्चायुक्तही भारताच्या प्रजासत्ताक दिनाला २६ जानेवारीला तिथल्या प्रसिद्ध व्यक्तींना बोलावतात.

पण या वर्षी परिस्थिती वेगळी होती. ६ डिसेंबर १९९२नंतरचा तो काळ होता. अयोध्येची दुःखद घटना नुकतीच घडून गेली होती. जातीयवादी, हुकूमशाही शक्तींनी जाणूनबुजून वातावरण चिघळवलं होतं. बुद्धिवादी आणि धर्मनिरपेक्षतेवर विश्वास असणाऱ्या लोकांचा आवाजच त्यांनी दाबून टाकला होता. त्यामुळे २५ मार्च १९९३च्या 'इंडियन एक्सप्रेस'मध्ये शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांनी माझ्या (आताच्या आणि नंतर येणाऱ्याही) चित्रपटांवर बंदी घातल्याची घोषणा केल्याचं मी वाचलं. तेव्हा मला आश्चर्य वाटलं नाही. इतर अनेक प्रसिद्ध व्यक्तींबरोबर मी पाकिस्तान परराष्ट्र खात्याच्या या समारंभाला उपस्थित राहिल्याबद्दल ही बंदी घातली गेली होती! या समारंभाला गेलेला चित्रपट कलाकार मी एकटाच होतो. दिलीप कुमार, शबाना आझमी या कार्यक्रमाला आले नव्हते. पण निवडून मलाच दिलेली ही शिक्षा होती. कारण तेव्हाचे उपराष्ट्रपती के. आर. नारायणन, भाजपचे तत्कालीन अध्यक्ष मुरली मनोहर जोशी हेही दिल्लीतल्या तशाच समारंभाला हजर होते. मी धर्मनिरपेक्ष विचारांचा कलाकार असल्यामुळए हे करण्यात आलं होतं हे उघडच होतं.

त्यानंतर जवळजवळ दोन वर्षं मी बेकार होतो. भीतीमुळे चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटात मला भूमिका देणं बंद केलं होतं. माझ्या सर्व पिक्चरमधील भूमिका कापण्यात आल्या. 'रूप की रानी चोरों का राजा' आणि 'अपराधी' या पिक्चरमधील भूमिका कापण्यात आल्या. तसेच मी ज्या नवीन पिक्चरशी कॉन्ट्रॅक्ट केली होती तीसुद्धा रद्द करण्यात आली. जवळपास रोज रात्री मला धमक्या देणारे फोन येत असत. या सगळ्याचा माझ्यावर आर्थिक, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूपच परिणाम झाला. एवढी वर्षं निरपेक्षपणे देशाची सेवा केल्याची ही चांगली परतफेड होती!
गेल्या वर्षी २६ ऑगस्टला हंगल यांचं वयाच्या ९८व्या वर्षी मुंबईत निधन झालं.
***

'विकिपीडिया'वर हंगल यांची जन्मतारीख म्हणून १ फेब्रुवारी १९१४ असा उल्लेख आहे. एका चित्रपटविषयक नियतकालिकाला मुलाखत देत असताना त्यांची १५ ऑगस्ट अशी जन्मतारीख लागल्याचा उल्लेख पुस्तकात आहे. 'विकीपीडिया'वरच्या माहितीचा स्त्रोत माहीत नाही.
*** 

Saturday, 10 August 2013

नावात काय आहे? बरंच काही! - मोहम्मद नदीमुल्लाह खान

नदीम खान हे महाराष्ट्रातील एका शहरात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून ३७ वर्षं काम केलेले गृहस्थ आहेत. आपल्या मुलीला गुजरातची राजधानी अहमदाबादमधे घर शोधण्यासाठी ते गेले काही दिवस खटपट करत होते. या खटपटीदरम्यानच्या त्यांना जे अनुभव आले, त्या संदर्भात त्यांनी 'रेघे'ला काही लिहून द्यावं असं आपण त्यांना सुचवलं होतं. त्यावरून त्यांनी 'रेघे'साठी हा लेख लिहून पाठवला. नदीम यांना इंग्रजीतून लिहिणं जास्त सोईचं असल्यामुळे त्यांनी त्या भाषेतून लिहिलेला लेख आपण मराठीत अनुवादित केलाय. २०१४ला लोकसभेच्या निवडणुका होतील आणि त्यापूर्वी आता १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन म्हणून काही साजरीकरण व सादरीकरण होईल, या पार्श्वभूमीवर हा मजकूर 'रेघे'वर प्रसिद्ध होतोय.
***

नावात काय आहे? बरंच काही!
- मोहम्मद नदीमुल्लाह खान

मी १९५० साली एका उदारमतवादी मुस्लीम कुटुंबात जन्माला आलो. पण माझ्या नावाच्याबाबतीत मात्र काहीच उदारमतवादी नव्हतं. माझं नाव : मोहम्मद नदीमुल्लाह खान. नावातले तीनही घटक स्पष्टपणे इस्लामी भाव दाखवणारे. मी ज्या मिश्र वसाहतीत लहानाचा मोठा झालो, तिथे या नावाची फार दखल घेतली गेली नाही. पण माझ्या शाळेतल्या काही मुलांना मात्र हे नाव दखलपात्र वाटत होतं. एका धार्मिक समुदायाशी हे नाव जोडलेलं असणं ही गोष्ट त्यांच्यासाठी मनोरंजनाचा विषय होती. दाढी, लुंगी, गोल टोपी, गोमांस खाणं- आणि सार्वकालिक टिंगलीचा विषय म्हणजे सुंता. पण या सगळ्यातून कधीच मारामारी किंवा अगदी साधंसं भांडणही झालं नाही. कदाचित मी थोडा बुजरा होतो म्हणून असेल, किंवा कदाचित मला त्यांची मैत्री हवी होती म्हणूनही असेल. त्यामुळे फार काही भयानक प्रकार घडले नाही. शाळेतून घरी येताना माझ्या मनात जे काही नकारात्मक भाव असत ते आमच्या गल्लीतल्या मित्रांसोबतच्या संध्याकाळच्या खेळामध्ये निघून जात. इथे मला हेही नोंदवायला हवं की, शाळेतल्या ज्या 'निरागस' रॅगिंगच्या प्रकारांबद्दल मी बोलतोय ते वरच्या वर्गांमध्ये कमी कमी होत गेले आणि कॉलेजमध्ये तर अशा प्रकारचे अनुभव मला आलेच नाहीत.

दरम्यान, माझे स्वतःचे विचार आणि श्रद्धा त्यांची त्यांची वाट शोधत होते. सर्व धर्मांमध्ये समान अशी एक सर्वांत ताकदवान आणि दयाळू शक्ती अस्तित्त्वात आहे, याचा अगदी लहानपणी मी अजाणता स्वीकार केला होता.  त्यानंतर शाळकरी वयात, मी ज्या धर्मात जन्माला आलो त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल मी जागरूक बनलो. या काळात मी अधूनमधून उपास, प्रार्थना आणि पवित्र पुस्तकाचे पाठ अशा गोष्टी करायचो. त्यावेळी माझ्या चेहऱ्यावर सुख-समाधान नक्कीच खुलून दिसत असणार! शाळेची वर्षं संपतानाच्या काळात, माझ्या मनातल्या संशयखोर वृत्तीमध्ये वाढ झाल्याचं आठवतंय. मी गोंधळलेलो, घाबरलेलोही, पण कोणताही बुंधा नसलेल्या सत्यांपेक्षा गोंधळ बरा, असं मला वाटायचं. हे अर्थातच माझ्या मित्रमंडळींमुळे आणि मी वाचनात आलेल्या पुस्तकांमुळे घडलेले बदल होते. सत्ताविसाव्या वर्षी माझं लग्न झालं तोपर्यंत मी कट्टर नास्तिक बनलो होतो; अर्थातच माझ्या श्रद्धाहीन वृत्तीबद्दल सहानुभूती बाळगेल अशीच व्यक्ती मला जोडीदार म्हणून हवी होती.

त्यामुळे असमर्थनीय श्रद्धेबद्दल केवळ तिरस्कार बाळगणारे आई-वडील आमच्या मुलीला आणि मुलाला मिळाले. मुक्त विचारांच्या व्यक्ती म्हणूनच आमची मुलं लहानाची मोठी होणार असतील तर मग त्यांनी त्यांचा काहीच संबंध नसलेल्या धर्माच्या ओळखीचं ओझं तरी का वाहावं? जाणुनबुजून सेक्युलर व्यक्तिमत्त्व बाळगत मी त्यावर मात केली खरी, पण तरी मी आयुष्यभर कमी प्रमाणात का होईना पण हे ओझं वाहिलं. मुस्लीम समुदायामध्ये काही प्रमाणात असलेली किंवा नसलेली असहिष्णुतेची झालर आणि आक्रमकपणा यामुळे भविष्यात सर्व मुस्लिमांना एकाच काळ्या रंगात रंगवण्यात येईल याची जाणीव आम्हाला होती; आणि आमच्या मुलांना ज्या श्रद्धेशी काहीच देणं-घेणं नव्हतं त्यापायी त्यांना काही किंमत मोजावी लागू नये असं आम्हाला वाटत होतं. त्यामुळे आम्ही त्यांची नावं ठेवताना त्यातून धर्म दिसणार नाही असं पाहिलं. शिवाय कौटुंबिक इतिहासातून एक निरुपद्रवी आडनावही शोधून काढलं. (त्यामुळे माझी मुलं खान आडनाव लावत नाहीत). यामुळे नाव-आडनावाबद्दलच्या कुतूहलाने पछाडलेल्या समाजात आमची मुलं सहजी मिसळू शकतील असं आम्हाला वाटलं. पुढे जाऊन आखलेला मास्टर-प्लॅन असा होता की, मुलं धर्माचा विचार न करता लग्न करतील आणि स्वतःला नि स्वतःच्या संततीला चांगुलपणाच्या जाणिवेव्यतिरिक्त इतर कोणत्याही श्रद्धेच्या जंजाळात अडकावून ठेवणार नाहीत.

चमच्याने भरवलेल्या ज्ञानाबद्दल सौम्य स्वरूपातला का होईना पण अनादर बाळगत आमची मुलं मोठी झाली. आता ३५ वर्षांची असलेली नि व्यावसायिक आकांक्षा बाळगणारी माझी मुलगी केवळ समाजाची अपेक्षा असते म्हणून लग्न करावं असं मानत नाही. मुलगा ३१ वर्षांचा आहे आणि दुसऱ्या एका श्रद्धाहीन व्यक्तीशी त्याचं लग्न झालेलं आहे. त्याला त्याची जोडीदारीण भेटण्याआधी एकदा मी त्याला विचारलं होतं, ''तू मुस्लीम मुलीशी लग्न करशील का?'' तो म्हणाला, ''का नाही? ती अनुरूप असावी एवढीच माझी अपेक्षा असेल.'' त्याच्या उत्तराने मी थोडा दचकलो होतो. लहानपणी सहन केलेल्या 'निरागस' रॅगिंगच्या प्रकारांनी मला कुठल्या असुरक्षित मानसिकतेचा बळी बनवलंय ते मला त्यावेळी प्रकर्षाने जाणवलं. आमच्या घराण्याच्या संदर्भात, नास्तिकपणाच्या पहिल्या पिढीचा प्रतिनिधी होतो मी आणि त्यामुळेच कदाचित नव्याने धर्मांतर केलेल्या व्यक्तीप्रमाणे माझ्या भावना तीव्र होत्या. माझी मुलं म्हणूनच मला कधीकधी नास्तिकतेचा 'ओसामा बिन लादेन' असं म्हणतात. त्यांचं म्हणणं तसं विवेकबुद्धीला धरूनच आहे, पण श्रद्धेबद्दल आपल्या वडिलांएवढा तिरस्कार त्यांच्या मनात नाही हेही खरंच. देव, दानव आणि प्रेषितांच्या गुदमरवणाऱ्या, गुंगी आणणाऱ्या आणि मन उद्ध्वस्त करणाऱ्या कोंडीतून आपली वाट काढत माणसांच्या जगात येण्यासाठीची खटपट आमच्या मुलांना करावी लागलेली नाही. एक प्रश्न : शाळेच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये मला ज्या विकृतीला सामोरं जावं लागलं त्यापासून मुलांचा बचाव झाला; हे त्यांच्या तटस्थ नावांमुळे झालं का?

आमच्या दूरदृष्टीमुळे मुलांना बालपणीच्या काळातल्या मानसिक असुरक्षिततेपासून पटकन पुढे निघून जाता आलं, असं वाटतं. अर्थात, तरीही नाव-आडनावाच्या कुतूहलाने ग्रस्त समाजापासून त्यांना पूर्णपणे दूर ठेवता आलं नाहीच.

सगळा घटनाक्रम इथे सांगण्याची गरज नाही, त्यामुळे थेट नरेंद्र मोदींच्या गुजरातमधला प्रसंग नोंदवतो, कारण आपण ज्या विषयावर बोलतोय त्यासंबंधी चर्चेचं सध्याचं सर्वांत फॅशनेबल केंद्र तिथे आहे! माझ्या मुलीला नुकतीच अहमदाबादमध्ये एक नोकरी मिळालेय. १९८५च्या दंगलींनंतर हिंदू व मुसलमानांमध्ये झालेल्या ध्रुवीकरणाबद्दल आणि २००२च्या गोध्रा दंगलींनंतर आणखीच तीव्र झालेल्या या न बुजणाऱ्या दरीबद्दल तिला अनेकांनी सावध केलं होतं. पण तिला या सूचनेची तीव्रता जाणवायला वेळ गेला. एकामागोमाग एक ब्रोकर तिला कॉस्मोपॉलिटन भागामध्ये जागा मिळवून देण्यास एकतर अनुत्सुक दिसत होते किंवा ते हतबल असल्याचं तरी दिसत होतं. ''तमे जुहापुरा नु घर देखो ना बेन, एक दम ए-वन छे!'' किंवा जंगपुरामध्ये पाहा, किंवा शाहीबाग, किंवा दुसरा एखादा 'घेट्टो' सापडतो का पाहा. ''जोधपूर?'' छे, छे! वस्त्रपूर, अंबावाडी, बोदाकदेव, सॅटेलाइट? ''मुश्कील छे, बेन, मुश्कील छे.'' पण या बंदीला आपण तोडू शकू असं मुलीला वाटत होतं. केवळ एका बॅगसह ती एका कुबट गेस्ट-हाउसमध्ये काही दिवस राहिली आणि मग तिला प्रल्हादनगर भागात मूळ दिल्लीच्या एका शीख इसमाकडून फ्लॅट विकत घेता आला. ''प्रल्हादनगर?'' रेल्वेस्टेशनहून मला मुलीच्या फ्लॅटकडे नेणाऱ्या मुस्लीम रिक्षावाल्याने विचारलं, ''एका चांगल्या मुस्लीम कुटुंबातली मुलगी तिकडे काय करतेय?''

प्रश्न : हे असं का झालं? माझी मुलगी तिच्या प्रसिद्ध धर्मातीत नावामागे का लपू शकली नाही? उत्तर : ते शक्यच नव्हतं. कारण काही काळापूर्वीच पृथ्वीराज चव्हाणांच्या मुंबईमध्ये तिचं नाव तिचा गुन्हा झाकण्यासाठी अपुरं पडत असल्याचा अनुभव अनेकदा आला होता. मुंबईत सांताक्रुझला भाडे-करार करण्यापूर्वी तिला पोलीस तपासणीसाठी जावं लागलं. त्यासाठी ओळखीचा पुरावा लागत होता. तिने तिचं पासपोर्ट दाखवलं, त्यात तिच्या शुद्ध नावासोबत तिच्या वडिलांचं तिहेरी फैरी झाडणारं नावही होती. यावर घरमालक प्रचंड चिडला, ''काय तुम्ही? इतकी महत्त्वाची गोष्ट सांगत नाही? आम्ही आमचं घर मुसलमानांना भाड्याने देत नाही. आमच्या सोसायटीच्या नियमांमध्ये ते बसत नाही.'' या घटनेतून माझ्या मुलाने मात्र धडा घेतला. त्याला जेव्हा मुंबईत राहण्यासाठी जागा हवी होती तेव्हा संबंधित चौकशीवेळी त्याने त्याच्या कंपनीच्या ओळखपत्रावरचंच नाव दाखवलं. त्यावर त्याच्या वडिलांचं नाव नव्हतं. आणि जेव्हा कराराची वेळ आली तेव्हा त्याच्या पत्नीनेच सर्व सोपस्कार पार पाडले. तिच्या वडिलांचं नाव अर्थातच नेहमीचं नि बेचव वाटेल असं होतं, त्यामुळे कुणाच्या कपाळावर आठ्या येण्याचं किंवा ब्लड-प्रेशर वाढण्याचं कारण नव्हतं.

आता अजून दक्षिणेकडे जाऊ. काही वर्षांपूर्वी बंगळुरूमध्येही हाच अनुभव आला होता. देशाची 'आय.टी.' राजधानी असलेल्या नि अनेक उत्कृष्ट शैक्षणिक संस्थांचं घर असलेल्या या शहरात माझी मुलं जेव्हा राहण्यासाठी घर शोधत होती, तेव्हा दोघांनाही सतत सामोरं जावं लागलेलं वाक्य हे होतं : ''सारी, अम्मा, सारी, सार, वी कॅन-नॉट गिव्ह अवर हाउस टू मुस्लीम्स.''

अर्थात इथे मला हेही नोंदवायलाच हवं की अहमादाबाद असो वा मुंबई किंवा बंगळुरू (किंवा त्यापूर्वी पुण्यामध्ये) माझ्या मुलीला आणि मुलालाही प्रत्येक वेळी उदार स्वभावाचे घरमालक/मालकीण मिळाले, आणि ते सर्व हिंदूच होते. त्यांच्यासाठी नाव म्हणजे केवळ त्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठीची गोष्ट एवढाच अर्थ होता.

इथे मला 'ताजा कलम' म्हणूनही काही नोंदवायचंय. कदाचित बॅलन्स साधायचाय असं म्हणा. माझ्या एका चुलतभावाने त्याची वंशपरंपरागत जागा एका हिंदू बिल्डरला विकली. त्याला त्या बिल्डरकडून चांगली किंमत मिळत होती एवढं साधं कारण यामागे होतं. पण आमचे नातेवाईक चिडले. हिंदू बिल्डर! काही रुपड्यांसाठी तो आपल्या वंशपरंपरागत जागेचं पावित्र्य कसं काय उद्ध्वस्त करू शकतो? त्यांना त्यांच्या त्या पवित्र जागेतून एका मूर्तिपूजकापायी बाहेर पडावं लागलं!

दुसरीकडे, आपल्या शेजारच्या ईश्वरसत्ताक राष्ट्रातले रहिवासी एका काफिराला आपल्या हृदयांमध्ये आणि घरांमध्ये जागा देऊ शकत नाहीतच, उलट त्याला त्याच्या स्वतःच्या साध्यासुध्या घरातूनही हुसकावून लावतात - हे सगळं पाहणंही तितकंच दुःखद आहे.

स्पष्टीकरण : हा लेख काही स्वतःबद्दल दया निर्माण करण्याचा प्रयत्न नाही. एकूण विश्वात एका निस्तेज निळ्या बिंदूप्रमाणे असलेल्या या पृथ्वीवर राहणारे सर्व लोक सामाजिक वैचित्र्याचे जितके बळी असतात त्यापेक्षा मी काही खूप जास्त सहन केलंय असं मला अजिबातच वाटत नाही. पण जे लोक पिडीत आहे, खरोखरच पिडीत आहेत आणि ज्यांच्यावर मानवी विकृतीमुळे अन्याय होतो आहे, त्यांच्याबद्दल काही जागरूकपणा असावा म्हणून मी हे लिहिलं. १९५९ साली प्रदर्शित झालेल्या बी. आर. चोप्रा यांच्या 'धूल का फूल'मधलं साहिर लुधियानवीचं गाणं या संदर्भात आठवतं. जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्त्वाखाली सगळ्या विचारी लोकांनी भारत घडवण्याचं जे स्वप्न पाहिलं होतं, त्या स्वप्नाला आवाज देणारे साहिरचे ते शब्द असे होते :
तू हिन्दू बनेगा न मुसलमान बनेगा
इंसान की औलाद है इंसान बनेगा
अच्छा है अभी तक तेरा कुछ नाम नहीं है
तुझको किसी मज़हब से कोई काम नहीं है
जिस इल्म ने इंसानों को तक़सीम किया है
उस इल्म का तुझ पर कोई इलज़ाम नहीं है
***
? (फोटो : रेघ)


Update: 12th August: Some readers requested to publish the English version also so that they can share it with non-Marathi readers. So, with the permission of the author we are putting the English text below. Click on 'Read More' for the English version :

Thursday, 8 August 2013

एक आदिवासी मुलगा, एक 'डॉक्टर' व एक प्रसंग - तुषार कांती

तुषार कांती यांचा हा लेख 'तेहेलका' साप्ताहिकामध्ये गेल्या महिन्यात प्रसिद्ध झाला होता. आपण त्या लेखाच्या मराठी अनुवादाची परवानगी तुषार यांच्याकडून आधीच घेऊन ठेवली होती, त्यानुसार हा लेख 'रेघे'वर नोंदवतो आहोत. तुषार सध्या नागपूरमध्ये राहणारे ५८ वर्षांचे गृहस्थ आहेत.
***

आंध्र प्रदेशातल्या वारंगल तुरुंगात गेल्यानंतर दोन आठवड्यांमध्ये माझी शुद्ध हरपली. आजारी पडलेला इसम हा कथितरित्या एक वरिष्ठ नक्षलवादी असल्यामुळे पोलीस अधीक्षकांनी तातडीने पुढची पावलं उचलली. एमजीएम रुग्णालयाच्या अधीक्षकांशी सल्लामसलत करून तीन डॉक्टरांचं पथक माझी तपासणी करण्यासाठी आलं. दुसऱ्याच दिवशी हृदयतपासणीचं शिबीरही आयोजित करण्यात आलं होतं. पुढच्या उपचारांसाठी मला सशस्त्र पोलिसांच्या गराड्यामधून एमजीएम रुग्णालयात पाठवण्यात आलं होतं.

सगळे नेहमीचे तपासणीचे सोपस्कार पार पडल्यानंतर मला वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याकडे नेण्यात आलं. पाच फूट दोन इंच उंची, काळे कुरळे केस आणि गोरसट रंगाच्या त्या माणसाने मला आत बोलावलं आणि बसण्यासाठी खुर्ची दिली. रुग्णालयातल्या इतर अनेक तेलुगू भाषक डॉक्टरांपेक्षा हा गडी स्पष्टपणे वेगळा दिसत होता. प्रीस्क्रिप्शनच्या कागदावर काही खरडल्यानंतर तो अचानक म्हणाला, ''तुम्ही मला ओळखलंत का?''

त्याच्या टेबलावरच्या पाटीवरून त्याचं नाव 'ए. भिक्षापती' असं आहे हे मी ओळखू शकलो. पण त्यापुढे मला काही ओळख पटत नव्हती. त्यावर मला थोडासा अंदाज द्यावा म्हणून तो म्हणाला, ''मी तुपकुला गुदेम गावचा आहे.'' (या गावाच्या नावाचा शब्दशः अर्थ होतो - बंदुकांचं खेडं!)

त्याने उच्चारलेल्या पाच शब्दांचा संदर्भ लक्षात यायला मला काही सेकंदं लागली आणि मग मी माझ्यावरच चिडलो. मी त्याला न ओळखणं कसं काय शक्य आहे? आता मला सगळ्या गोष्टी स्पष्टपणे दिसायला लागल्या, जणू काही आत्ताच काही दिवसांपूर्वीची घटना असावी..

मी एकोणीस वर्षांचा होतो आणि बस्तरला लागून असलेल्या उत्तर तेलंगणात आदिवासी इलाक्यामध्ये काम करण्यासाठी मी कॉलेज सोडलं होतं. त्यावेळी माझ्याकडे काय होतं, तर डॉक्टरांनी दिलेले औषधांचे नमुने आणि रोगांचं निदान व उपचार यासंबंधीचं एक मोठं पुस्तक, एवढंच. या दोन्ही गोष्टी उस्मानिया वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या आमच्या विद्यार्थी संघटनेतल्या मित्रांनी दिलेल्या. एकदा माझं बाकीचं काम झाल्यानंतर मी गोदावरी काठच्या तुपकुला गुदेम या गावाला गेलो होतो. तिथे एक माणूस आपल्या मुलासोबत माझ्याकडे आला. मुलगा जेमतेम आठ ते नऊ वर्षांचा असावा. त्याला खरुज झाली होती हे अगदी लगेचच लक्षात येत होतं. त्याचे हात आणि जांघेचा भागांमधल्या त्वचेला खरजेची लागण होऊन तो भाग सुजल्यासारखा दिसत होता. त्याची अवस्था अगदीच करूण होती. थोड्या वेळाने मला लक्षात आलं की, या त्वचारोगाची बाधा झालेला त्या गावातला तो एकटाच नव्हता. आणखी जवळपास दहा ते बारा जणांना खरजेची लागण झाली होती. जवळच्याच शहरातल्या आदिवासी आश्रम शाळेतून परतलेल्या सगळ्याच मुलांना ही लागण झाली होती, असं त्या मुलाचे वडील मला सांगू पाहत होते. जवळपास सगळ्याच गावाला ही लागण झालेय आणि मला प्रत्येकावरच उपचार करावे लागणारेत, असा त्यांच्या बोलण्याचा अर्थ मी घेतला.

मी काही अँटिबायोटिक औषधं त्या वडिलांकडे दिली, जेणेकरून काही प्रमाणात खरूजबाधित भागांवर काहीसा उपचार होऊ शकेल. तिथेच मग मला पिर्ला चंद्रय्या हा एक मित्रही भेटला. त्याच्या मदतीने मी गावातल्या प्रत्येकाला भेटून खरजेसारख्या साध्या त्वचारोगाबद्दल किमान माहिती दिली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सगळ्या गावासोबत एक बैठक घेऊन आणखी माहिती देण्याचं ठरलं आणि हा रोग हटवण्याची मोहीम राबवावी असा निर्णय झाला.

गावातल्या सगळ्या स्त्री-पुरुषांची समजूत घालून घरात बसण्यास सांगणं आणि सलग तीन दिवस माझ्या सूचना पाळून त्यांचं खरूज निर्मूलनाला सहकार्य मिळेल अशी आशा धरणं अवघडच होतं. त्यापेक्षा तिथून साठ किलोमीटरवर असलेल्या मुलुगू या तालुक्याच्या ठिकाणावरून अस्काबायोल मलमाचा एक मोठा कॅन आणणं हे तुलनेने सोपं काम होतं. तसं करून सगळ्यांना ते मलम लावलं गेलं, त्यानंतर त्यांनी आपले कपडे एका मोठ्या पातेल्यात टाकून उकळत्या पाण्यातून काढले, गोदावरीच्या पाण्यात ते धुतले आणि अखेरीस त्या गावातून त्या वेळी खरुज बाहेर काढण्यात यश मिळालं.

हा सगळा घटनाक्रम एखाद्या चित्रपटासारखा माझ्या डोळ्यासमोरून गेला. चेहऱ्यावर हसू आलेला तो वैद्यकीय अधिकारी मला म्हणाला, ''मी तोच भिक्षापती आहे. तुपकुला गुदेममध्ये तुम्ही ज्याच्यावर उपचार केले होतेत तो आठ वर्षांचा मुलगा.'' त्याच्या काळ्या कुरळ्या केसांखालती त्याचे डोळे चकाकत होते. तो म्हणाला, ''तेव्हा खरजेविरोधात यशस्वी उपचार मोहीम राबवलेली पाहिल्यानंतर मी डॉक्टर व्हायचं ठरवलं होतं.'' एक अनवाणी 'डॉक्टर' आणि राजकीय कार्यकर्ता म्हणून काम केलेल्या माझ्यासारख्या माणसाला राजकीय कैदी म्हणून तुरुंगवास भोगत असताना आपला जुना रुग्ण डॉक्टरच्या रूपाने भेटणं याच्यासारखी दुसरी दाद कुठली असेल! त्यावेळी माझ्या डोळ्यात पाणी आलं.

Wednesday, 7 August 2013

गो. रा. खैरनार, झुंज व झुंड

आजच्या नोंदीचं निमित्त म्हणजे वर्षानुवर्षं अधूनमधून होणाऱ्या निवडणुका, भाषणं, सामाजिक चळवळी, इत्यादी गोष्टी. आता २०१४ला लोकसभेच्या निवडणुका होतील, भाषणं तर रोजच होत असतात, चळवळीही होत असतील काय माहीत. हे सगळं एका बाजूने सुरू असताना आपण इथे 'रेघे'वर जो गुन्हा करू घातलाय, त्यामध्ये आज सह-गुन्हेगार म्हणून गो. रा. खैरनार यांना बोलावलेलं आहे. आठवण ठेवाव्या अशा काही गोष्टी आणि माध्यमांबद्दलचा एक लहानसा भाग असं नोंदीचं स्वरूप आहे. खरंतर यातल्या पहिल्या भागाच्या संदर्भात - वृत्तपत्रांनी, साप्ताहिकांनी, मासिकांनी 'विसरू नयेत अशा गोष्टी' असं एखादं सदर का सुरू करू नये. आपण आपल्या मर्यादेत तशा प्रकारची ही नोंद 'रेघे'वर 'गोंगाटावरचा उतारा' आणि 'माध्यमं' या विभागांखाली करूया.

एक

गोविंद राघो खैरनार हे नाव ऐंशी-नव्वदच्या दशकांमध्ये मुंबईत राहिलेल्या बहुतेकांना आठवू शकेल. आपण किमान नव्वदीच्या मधल्या वर्षांचं खात्रीने स्वतःच्या बळावर सांगू शकतो आणि ऐंशीमधलं अंदाजाने. गो. रा. खैरनार हे तेव्हा बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त होते आणि काही काळ वृत्तपत्रांमधून गाजणारे शब्दश: 'हिरो' होते. त्यांच्या हिरो होण्यामागच्या गोष्टीही तशाच होत्या. कधी दाऊद इब्राहिमच्या अनधिकृत बिल्डिंगवर हातोडा चालवणं, कधी तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्या विरोधात ट्रकभर पुरावे आणण्याची धमकी देणं, शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे यांची खरीखुरी किंमत करणं, वगैरे अनेक गोष्टी ह्या मागे असतील. तर खैरनार हिरो होते. मध्यंतरी अजिबातच त्यांचा वावर नव्हता. अगदी अलीकडचे माध्यमांमधले त्यांचे उल्लेख म्हणजे अण्णा हजारे यांच्याबद्दल ते अगदीच खरं बोलले होते तेव्हाचा आणि गोळीबार परिसरातील झोपडपट्टीसंबंधीच्या मेधा पाटकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचा. शिवाय 'लोकसत्ते'च्या गेल्या वर्षीच्या दिवाळी अंकात त्यांच्यावर मुलाखतपर लेख आला होता. खैरनारांचा आणि 'रेघे'वर आपण जे विषय बोलतो त्यांचा काय संबंध, असा एक प्रश्न. ह्याचं उत्तर खैरनारांच्या 'एकाकी झुंज' या आत्मचरित्रात आहे. त्यामुळे त्या पुस्तकात जाऊ.

पुष्प प्रकाशन । पहिली आवृत्ती : नोव्हेंबर १९९८
'आमच्या घराण्यात आई-वडील किंवा अन्य कोणी पूर्वी कधी शाळेत गेले नसावेत. माझ्या पिढीत माझ्या घरात मी सोडून कोणीही शिकलेले नाही', असं लिहिणारे खैरनार आपल्या अनुभवातून काही गोष्टी शिकत गेले आणि त्या फारच स्पष्टपणे बोलत गेले नि त्यानुसार वागत गेले. त्याबद्दल त्यांनी 'एकाकी झुंज'मधे लिहिलंय. खैरनार मूळचे नाशिक जिल्ह्यातल्या कळवण तालुक्यातल्या पिंपळगाव (वारवारी) या गावचे. तिथून मग शिकले नि मुंबईत नोकरीला आले. त्यांच्याविषयीच्या कथा / दंतकथा मुंबईतल्या मध्यमवर्गीय व त्या खालील आर्थिक गटांच्या घरांमधे सांगितल्या जाण्याचा एक काळ होता. अजूनही तुरळक ते होत असेल, माहीत नाही. पण नव्वदच्या दशकाच्या मधल्या वर्षांमधे खैरनार फारच लोकप्रिय होते. नव्वदच्या दशकातल्या त्या काळाला आता जेमतेम वीसेक वर्षं होत आल्येत, त्यामुळे अजून काही लोकांच्या आठवणीत खैरनार आहेत / असतील / असायला हवेत / असायला हरकत नाही. तसं 'एकाकी झुंजी'त पुस्तक म्हणून काही त्रुटी सापडू शकतील. पहिलं प्रकरण कौटुंबिक पार्श्वभूमी-बालपण-शाळा-कॉलेज असं एकदम फास्ट जातं आणि दुसऱ्या प्रकरणापासून लगेच महानगरपालिकेतली नोकरी नि अनधिकृत बांधकामांच्या तोडफोडीचा भाग सुरू होतो. मधे काही सांधाच जोडला गेला नाहीये. शिवाय बहुतेकसं पुस्तक हे घटनांची साखळी असल्यासारखं आहे, त्याने थोडासा तुटकपणाही आलाय. पण तरी ठीक आहे. आपण त्यातलं आपल्याला काय नोंदवायचंय ते पाहू. आधी उल्लेख येऊन गेलाय, त्यानुसार खैरनार अनधिकृत बांधकामांविरुद्धच्या कारवाईमुळे विशेष गाजले. त्यातही 'शक्यतोवर जे ठिकाण कुटुंब किंवा केवळ निवास करण्यासाठी वापरात असेल अशा ठिकाणची तोडफोड करावयाची नाही. लोकांचे आश्रयस्थान - मग ते अगदी बेकायदेशीर असले तरी - उद्ध्वस्त करू नये असे माझ्या मनाने घेतले. केवळ जनहिताखातर काही अपवाद सोडले तर जीवनभर मी ते तत्त्व पाळले' असं कळायला लागल्यावर खैरनार जास्त काळजीने काम करू लागले.

खैरनारांनी त्यांच्या या आत्मचरित्रामध्ये काही राजकीय व्यक्ती, काही गुंड व्यक्ती, काही सामाजिक कार्यकर्तेपणा करणाऱ्या व्यक्ती यांच्याशी आलेल्या संपर्काबद्दल, त्यातल्या धोक्यांबद्दल प्रामाणिकपणे सांगून टाकलेलं आहे. यात १९८०च्या दशकातला प्रसिद्ध गुंड वरदराजन मुदलियार आणि विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल हनुमान मंदिर बांधण्यासाठी कसे एकत्र येतात, माजी पंतप्रधान राजीव गांधी धारावीमधे सभा घ्यायला येतात तेव्हा स्टेजवर पहिल्या रांगेतच वरदराजन कसा मानाने बसलेला असतो, तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा सावत्र मुलगा असलेल्या व्यक्तीचं हॉटेल वाचवण्यासाठी काय काय हालचाली केल्या जातात, वगैरे अनेक रोचक किस्से सापडतील. यातला एक रोचक किस्सा खैरनारांच्याच शब्दांमधे नोंदवायचा झाला तर हा पाहा : (वरती लिहिलंय त्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचं बांधकाम तोडण्याच्या संदर्भातला, १९८५मधला) :
त्याच सुमारास शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे यांनी मला मातोश्री बंगल्यावर कार्यालयीन कामासंदर्भात चर्चेसाठी भेटण्यास बोलावले. त्यावेळी ठाकरेंनी बोलावल्यास, आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्त त्यांच्या बंगल्यावर कामकाजानिमित्त भेटत असत किंवा संबंधित अधिकाऱ्यांना चर्चेसाठी पाठवत असत. त्यामुळे बोलावल्यानुसार त्यांच्याकडे जाण्याची प्रथो होती त्याप्रमाणे मी भेटासाठी गेलो. आदर सत्कार झाला. त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना बोलावले. ''अहो, आपल्याकडे खैरनार आले आहेत, इकडे या.'' ठाकरे मोठ्या आवाजात आवर्जून त्यांच्या कुटुंबियांना सांगत होते. सर्वजण आले. मीना ठाकरे पण होत्या. त्यांना ते सांगत होते, ''हेच ते खैरनार. फेरीवाल्यांच्या विरुद्ध जोरदार कारवाई करतात. बरेच गाजतात.''

''मी त्यांना ओळखते.'' मीना ठाकरे प्रतिसाद देतात. ओळख-पाळख संपते. सर्वांना तेथून जाण्यास सांगण्यात येते. मग आमचे बोलणे सुरू होते.

ठाकरे : खैरनार म्हणजे आपण कोण?

मी : कोण म्हणजे?

ठाकरे : नाही म्हणजे तुम्ही कुठल्या जातीचे आहात?

मी : जातीचा काय संबंध? मी जातपात मानत नाही. त्यामुळे माझी जात सांगणे वा दुसऱ्याची जात विचारणे मला आवडत नाही. आपलं काय काम आहे ते सांगा.

ठाकरे : काल मला मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बंगल्यावर बोलावले होते. ते माझे जुने स्नेही आहेत. ते माझ्या शिवसेनेसाठी पार मदत करतात. त्यांच्या सहकार्याशिवाय पक्ष सांभाळणे कठीण आहे. आपल्याविषयी तेथे चर्चा झाली. तुम्हाला धडा शिकवण्याचे आदेश त्यांनी मला दिले. त्यांचे आदेश मी दुर्लक्षित करू शकत नाही.

मी : मला धडा शिकवण्याचं कारण? मी काय केलंय त्यांचं? तसा त्यांचा माझा काही संबंधही आलेला नाही. मग त्यांच्या रागाचं कारण काय?

ठाकरे : तुम्ही धडाकेबाज काम करताहात. मलाही तुमचं काम पसंत आहे. काही बाबतीत तुमचं काम माझ्या मनाविरुद्धही आहे. त्यामुळे मला आवडत नाही. माझी अडचण होते. परंतु तुमच्या शौर्याला मी दाद देतो. तुमच्यावर मी खुश आहे. तुम्ही चांगले अधिकारी आहात आणि मराठी पण आहात. त्यामुळे तुम्हाला मारायला माझं मन होत नाही. म्हणून मी तुम्हाला मुद्दाम चर्चेसाठी बोलावले आहे. आपण खालच्या जातीचे किंवा बुद्ध नसाल तर मी मुख्यमंत्र्यांना त्याप्रमाणे समजावून सांगू शकेन व अप्रिय घटना टाळू शकेन.
हा प्रसंग कदाचित काहींना माहीत असेलही, पण जरा मधेमधे परत आठवण करायला काय हरकत आहे. काही महिन्यांपूर्वीच खरंतर खैरनारांनी 'आयबीएन-लोकमत'वर ही आठवण दिली होती. पुस्तक तसं खूपच आधी आलंय, पण तेव्हा खैरनारांच्या या आठवणीसंबंधी 'सामना'मध्ये काही शिवीगाळ आली होती किंवा कसं ते आपण 'रेघे'तर्फे तरी तपासू शकलेलो नाही. ठाकऱ्यांच्या पुढच्या पिढीच्या भाषणाला लाखांची झुंड जमत असते अधूनमधून, म्हणून आपण आपलं इथे हे नोंदवून ठेवलं.

आता शरद पवार यांच्याकडे येऊ. कारण, खैरनार २९ जून १९९४ला निलंबित झाले, ते पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात. भाषांतराला वाहिलेलं एखादं त्रैमासिक, समाजाभिमुख पत्रकारितेचा दावा करणाऱ्या संस्थेच्या हातून घडणारा दिवाळी अंक, श्री. व्यं. केतकरांच्या ज्ञानकोशाचं संकेतस्थळ, धर्मानंद कोसंबींचं दस्तावेजीकरण करणारं संकेतस्थळ इथपासून ते अनेक शैक्षणिक संस्था नि आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळापर्यंत कुठेही शरद पवार यांची आर्थिक किंवा केवळ हितसंबंधीय मुळं पसरलेली सर्वसामान्य नजरेला दिसतात. अशा पवारांविरोधात ट्रकभर पुरावे आणून दाखवतो असं खैरनार बोलले होते. ते काही शक्य झालं नाही, त्याबद्दलही एक लहानसं प्रकरण या पुस्तकात आहे. आणि त्यात काही कमी-जास्त असेलही, पण खैरनारांनी या सगळ्याच्या आधारावर स्वतःची सामाजिक दुकानी संस्था काढली नाही, की पत्रकारांसारखं याच्या पाठी उभं राहून त्याच्यावर टीका कर असंही केलं नाही. हेही काही कमी नाही. कारण कोणी संपादक एकीकडे मुंबईच्या डिएन्टलेक्चुअलायझेशनवर पुस्तकं लिहून दुसरीकडे पवारांवरची पुस्तकं संपादित करतात, त्या पार्श्वभूमीवर खैरनारांनी दाऊदच्या प्रगतीसंदर्भात पवारांविरोधात स्पष्ट बोलणं म्हणजे फारच विशेष. काय बोलले खैरनार, तर हे :
मुंबईत आल्यानंतर खास करून महापालिकेच्या सेवेत मी जे अनेक वर्षे अनुभवत होतो त्याचा स्फोटक अनुभव मला उपायुक्त म्हणून दाऊदचे साम्राज्य उद्ध्वस्त करताना आला. दाऊदने माझी कारवाई थांबविण्यासाठी शरद पवारांना पंचेचाळीस कोटी रुपये देऊ केले होते अशी अफवा होती. अफवा शब्द अशासाठी वापरतो की, ज्याच्या आधारे आपण कायद्याच्या कसोटीवर उतरू शकतो अशी ठोस माहिती व सबळ पुरावे आपल्याकडे नसतात.
...
मध्यंतरीच्या काळात मेमन व दाऊदचे नाव बॉम्बस्फोटाच्या (१९९३) संदर्भात घेतले गेल्याने त्यांच्याविरुद्ध व त्यांच्या संपत्तीविरुद्ध कारवाई करण्यासंबंधात प्रश्न उपस्थित करण्यात आले. मुख्यमंत्री शरद पवार यांनी दाऊद इब्राहिमची कसलीही मालमत्ता मुंबई अथवा महाराष्ट्रात नसल्याचे व त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही असे जाहीर केले. त्यापूर्वीच मी शासनाला दाऊदचे गुंड व मालमत्तेची यादी सादर केली होती. शरद पवारांच्या विधानाला उत्तर म्हणून मी पत्रकारांना दाऊदची मालमत्ता असल्याचे जाहीर केले व अप्रत्यक्षपणे पवार खोटे बोलतात असे सुचवले. मी दिलेली यादी, दाऊदची मालमत्ता असल्यासंबंधीचे माझ्या दप्तरी असलेले पोलिसांचे पत्र, दाऊदच्या पत्नीच्या नावावर असलेली व उद्ध्वस्त केलेली इमारत, त्याचे भाऊ - आई- बहीण यांच्या नावावर असलेली मिळकतीची माझ्या यादीत दिलेली माहिती, या सर्वांचा विचार करता शरद पवारांनी अशा प्रकारचे विधान का करावे याचे आश्चर्य वाटते.
खरं तर आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही आता. आपण नोंदीचा पहिला भाग इथेच संपवू आणि दुसऱ्या, माध्यमांविषयीच्या भागाकडे जाऊ.

दोन

खैरनारांच्या प्रसिद्धीमागे अर्थातच पत्रकारांचा मजबूत हात होता. 'खैरनार' या शब्दाला प्रचंड लोकप्रियता आणि वलय मिळालं ते पेपरांमुळेच. याबद्दल खैरनारांनी पुस्तकात कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. ते म्हणतात :
... सुरुवातीच्या काळात पेपरमध्ये, टीव्हीवर नाव वा बातमी आल्याने मन सुखावत असले तरी त्यासाठी धडपड करण्याची वा पत्रकारांना, प्रचारमाध्यमांना 'माझे हे छापा' असे सांगण्याची कधी इच्छा झाली नाही. अर्थात प्रसारमाध्यमात बातम्या आल्याने लोकजागृती होऊन समाजहित साध्य होण्याच्या दृष्टीने प्रसारमाध्यमांशी सलोख्याचे किंवा जवळकीचे संबंध असणे किती फायदेशीर आहे याची जाणीव झाल्यानंतर पत्रकार माझे खरे तर जिवाभावाचे मित्र झाले. पत्रकारांपेक्षा ते सामाजिक कार्यकर्ते वाटू लागले व त्यांच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन पार बदलला. अडीअडचणींच्या काळातही मला पत्रकारांनी मदत केली. मी जो काही आहे, जीवघेण्या हल्ल्यांपासूनही बचावलो आहे, स्पष्टच बोलायचे तर माझे अस्तित्व हेच मुळी पत्रकारांमुळे टिकून राहिले आहे. प्रसारमाध्यमांना मर्यादा असते. मालकांची-संपादकांची बंधने असतात. संपादकांना आपली नोकरी टिकवायची असते व वृत्तपत्रही बंद पडू न देण्याची काळजी घ्यायची असते. मालकाची ध्येय-धोरणे राबवायची असतात आणि या सर्व गुंतागुंतीतून वाचकांचे आकर्षण टिकवून ठेवायचे असते. त्यात संपादकांना तारेवरची कसरत करावी लागते. खास करून सिद्धांतवादी, जनहितवादी, प्रामाणिक संपादकांची तर फारच कुचंबणा होत असते. लोकशाही राज्याचा चौथा स्तंभ मानल्या गेलेल्या प्रसारमाध्यमाच्या अनेक संपादकांना, मुख्य पत्रकारांना स्वातंत्र्याचा उद्घोष करीत असताना स्वतःच्या स्वातंत्र्यावर तुळशीपत्र ठेवावे लागते. त्यामुळे सर्व अडी-अडचणी असतानाही सर्वच वृत्तपत्रांनी वेळोवेळी फार मोठ्या प्रमाणात मला साथ दिली. इंग्रजी, मराठी, गुजराथी, हिंदी व इतर समाचारपत्रांनी भक्कम साथ दिली. राजकीय व खास करून पवारांच्या नंतरच्या दबावामुळे तसेच ठाकरेंच्या ठाकरेशाहीमुळे अनेकांना आपला पवित्रा नंतरच्या काळात बदलावा लागला. त्यातही मराठी वृत्त-व्यवसायाला दबाव जास्त जाणवला असणार.
हे अगदीच खरं आहे. अगदी पुस्तकात दिलेलं नाव घेऊन बोलायचं झालं तर 'लोकसत्ते'मधे नव्वदच्या दशकात काम केलेली कोणी वरिष्ठ पत्रकार व्यक्ती असेल तर ती खैरनारांच्या वरच्या परिच्छेदात 'स्वातंत्र्य' शब्दाचे जे काही अर्थ अपेक्षित आहेत त्यावर जास्त चांगलं काही सांगू शकेल. आणि आपण हे अजिबातच टिंगलीच्या सुरात बोलत नसून खरोखरच तेव्हाची काही मंडळी हे खाजगीत सांगू शकतील. पण सांगून काय होईल? उत्तर नसलेल्या प्रश्नांपैकीच आहे हे सगळं. आपण इथे १९९१नंतरच्या काही वर्षांमधल्या 'लोकसत्ते'विषयी बोलतोय आणि  हे संपादकांशी संबंधित आहे. कारण त्याआधी संपादक वेगळे होते. शिवाय वैयक्तिक पातळीवर काम पाहिलं तर 'लोकसत्ते'सह बहुतेक पत्रकारांनी आपल्याला मदत केली असं खुद्द खैरनारच म्हणतायंत. ऐंशीच्या दशकात 'लोकसत्ते'ने पहिल्या पानावर खैरनारांचा फोटो छापलेला वगैरे उल्लेखही पुस्तकात आहे. आणि ते सगळं खरंच आहे. याची काही वेगळी बाजू असेल तरी तेव्हा प्रत्यक्ष बातमीदारी किंवा उप-संपादकी कामं केलेलं कोणी त्यावर बोलू शकतं. आपण नाही.

आपण काय करू शकतो? तर, खैरनारांचं पत्रकारांबद्दलचं मत मांडणारा वरचा परिच्छेद पुस्तकात येतो त्याच्या दोनेक पानं आधी आलेला उल्लेख नोंदवू शकतो. हा उल्लेख असा आहे :
वृत्तपत्र माध्यमांद्वारे मुख्यमंत्री शरद पवार हे एक कार्यक्षम, कार्यकुशल, प्रशासनावर पकड असलेले, महाराष्ट्राच्या समस्यांची जाण असलेले व महाराष्ट्राची शान असलेले मुख्यमंत्री आहेत अशी प्रतिमा अनेक वर्षांच्या मेहनतीतून तयार झाली होती. त्यांच्याशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही, त्यांच्या तोडीचा तसा दुसरा नेता नाही. महाराष्ट्राची प्रगती, गती व समृद्धी पवारच करू शकतील असा सर्वत्र समज पसरविण्याचे काम जास्त करून वृत्तपत्रांनी केलेले होते. अर्थात भाई ठाकूर, पप्पू कलानी, अरूण गवळी, दाऊद व तशाच खतरनाक गुन्हेगारांशी असलेले सख्य, राजकारणातील चलाखी किंवा छलकपट यांचाही अप्रत्यक्षपणे ओझरता का होईना वृत्तपत्रातून अधून मधून उल्लेख होई. 
काही वृत्तपत्रे, साहित्यिक, व्यापारी, उद्योगपती यांच्या दृष्टीने पवारांची प्रतिमा जरी महान व कुशल नेत्याची असली तरी जनमानसांतील त्यांची छबी मलीन होती.
यावर काही बोलण्याची गरज नाहीये बहुधा. प्रतिमा, मग ती खैरनारांची असो की पवारांची, तिच्या घडण्यामध्ये प्रसारमाध्यमांचं महत्त्व किती आहे ही सगळ्यांना माहीत असलेलीच गोष्ट परत नोंदवण्यासाठी आपण हा एवढा खटाटोप केला. खैरनारांची मतं ही मुख्यत्त्वे स्वतःच्या अनुभवातून आलेली आहेत. त्यामुळे त्यांचं सगळं पटावं असं नाही, कारण एकाच वेळी एकदम स्पष्ट आणि दुसऱ्या वेळी एकदम स्वप्नाळू असं काही त्यातून दिसतंय, पण तरी खैरनारांना अनुभवातून माध्यमांबद्दल काय वाटलं आणि त्यांची काय समजूत झाली याची नोंद करायला हवी, म्हणून एवढं तपशिलात त्यांच्या पुस्तकाबद्दल आपण बोलतोय. खैरनारांनी 'प्रसारमाध्यमांचे महत्त्व' असा एक लहानसा भागही पुस्तकाच्या शेवटी टाकलाय, त्यात ते म्हणतात :
प्रसारमाध्यमांना कधी छपाईसाठी मिळणाऱ्या कागदाच्या पुरवठ्यासाठी तर बहुधा सत्ताधाऱ्यांच्या ओळखीने मिळणाऱ्या जाहिरातींसाठी वा इतर अनेक सोयी सुविधा पदरात पाडून घेण्यासाठी पत्रकारांच्या लेखणीची धार प्रस्थापित तत्वांच्याबाबत लिहिताना बोथट होते. उलट समाजाला पद्धतशीरपणे लुटणाऱ्या, फसवणाऱ्या, समाजद्रोही व राष्ट्रद्रोही तत्वांना ही प्रसारमाध्यमे उचलून धरतात व छळ, पाखंड, चोर, व्यभिचारी, अनितीमान माणसांचा खोटा आदर्श समाजमनामध्ये तयार करून समाजाची फसवणूक करत असतात. त्यासाठी सत्य शोधून न काढता नेहमी असत्याचाच जास्त आसरा घेतात. प्रामाणिक, तळमळीने काम करणाऱ्यांवर, सरळ मार्गाने जाणाऱ्यांवर वा लोकांचे योग्य प्रबोधन करणाऱ्यांवर मात्र टिकेची झोड उठवून कुठल्या तरी काल्पनिक मुद्द्यावर अशा व्यक्तींना समाजातून हद्दपार करण्यासाठी कोल्हेकुई करत असतात.

अर्थात माझे वरील विचार माझ्या अनुभूतीवर आधारीत असले तरी या सर्व तंत्र बिघडलेल्या समाजातही प्रसारमाध्यमांची एक प्रकारे महत्त्वाची भूमिकाही आहे. लोकशाहीचे इतर सर्व महत्त्वाचे खांब खिळखिळे झाले असले तरी प्रचारमाध्यमांचा खांब किडलेला असूनही लोकशाहीच्या संरक्षणासाठी काही मर्यादित स्वरूपात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. सामान्य जनतेचे काही प्रमाणात का होईना प्रबोधनही होते आहे. खास स्वतंत्र विचाराची प्रसारमाध्यमे फारच उपयुक्त भूमिका बजावू शकतात. समाज जरा अधिक शिक्षित, समजदार व विवेकी झाल्यावर प्रसारमाध्यमांच्या मर्यादा त्यांच्या लक्षात येऊ शकतील व त्यामुळे त्यांच्या योग्य-अयोग्य प्रबोधनाच्या, माहितीच्या वा ज्ञानाच्या सारासार बुद्धीने विचार करून योग्य विचार घेण्याची व अयोग्य विचार नाकारण्याची कला त्याला अवगत होईल. त्यामुळे प्रसारमाध्यमांमधील पाखंडपणा कमी होईल. प्रसारमाध्यमांनी पाखंडपणा सोडून समाजहिताची बुज राखून जर सत्य विचार समाजापुढे शासन-प्रशासन, राजकीय पुढारी व इतर सर्वच महत्त्वाच्या घटकातली पाखंड उघड होऊ शकेल व देशाची खरी प्रगती होऊन न्याय, नीती, समानतेसारखी उच्च तत्त्वे समाजात स्थापित करण्यासाठी त्यांना सामाजिक बुद्धी व मन तयार होईल. शोषणाधारित समस्यांचे विघटन होऊन सद्सद्विवेकबुद्धीचा विकास होईल. एकमेकांचे पाय खेचण्यापेक्षा एकमेकांना सहाय्य करण्याची सहज प्रवृत्ती निर्माण होईल. आत्महत्या, रोगराई, तणाव, मानसिक विकार आपोआपच कमी होऊन सुदृढ समाजाची निर्मिती होईल. लोक निर्भय होतील. अवतारकार्य, व्यक्तिपूजा संपेल. लोक दगडधोंड्यांना पुजणार नाहीत. देवधर्माचे पाखंड करणार नाहीत. शरीराला कुठल्या गोष्टी खाणे-पिण्यायुक्त याचा विचार करू लागतील. व्यसनापासून दूर जातील. योग्य विचार निवडून आपली वाणी व आचरण सुधारू लागतील. मग विडी, सिगारेट, तंबाखूसारख्या हानिकारक पदार्थांचे सेवन थांबवतील. दारूचा उपयोग आपल्या सर्वनाशासाठी होऊ देणार नाहीत. मादक द्रव्यांचा व्यापार थांबेल. समाजातील लुटमारी, भांडणतंटा कमी होत नष्ट होईल व एक प्रकारे नव्या समाजाचा, नव्या जीवनाचा उदय होऊन, व सध्याच्या मानवाच्या रानटी अवस्थेचा अंत होईल. तेथे साधू, संत, ऋषी-मुनी यांचे कार्य थांबेल. देवा-धर्माच्या नावाने पोटभरू लोकांचा धंदा बंद होईल. पाखंड थांबतील. जाती-पाती-संप्रदाय धर्मकांड सर्व नष्ट होईल. मंदिर, मशिद, चर्च, आदी आपापल्या धर्माची देवालये कोणी उभारणार नाहीत. माणसामाणसातील किंवा समाजमनातील दुरावा कमी होईल. एक सुसंघटित, सुविचारी, सुसंस्कृत, विचारप्रधान व समृद्धीप्रधान मानवसमूह विकिसत होईल व एक दिलाने मार्गक्रमणा करील. सर्वांच्या मुख्य गरजा पूर्ण होतील. मानवसमाज निःस्वार्थ होऊन सध्या असलेल्या अनेक बंधनांतून मुक्त होईल.

प्रसार माध्यमांना अशा प्रकारे आज ना उद्या ऐतिहासिक भूमिका करावी लागणारच आहे. त्याची सुरुवात जितकी लौकर होईल तेवढी समाजाला जास्त हितकर होईल.
यात 'समाजमन' असा जो शब्द खैरनारांनी माध्यमांबद्दल वापरलाय, त्या संदर्भात 'समूहमन' असा जवळचा शब्द वापरून एक नोंद आपण यापूर्वी 'रेघे'वर केलेली आहे. एडवर्ड बर्नेसच्या 'प्रॉपगॅन्डा' या पुस्तकाविषयीची ती नोंद होती. आणि गंमत म्हणजे वरच्या उताऱ्यात दुसऱ्या परिच्छेदातल्या तिसऱ्या ओळीत 'प्रसारमाध्यमं' याऐवजी 'प्रचारमाध्यमं' असा शब्द वापरला गेलाय, तो खैरनारांच्या पुस्तकातच तसा आलेला आहे. ती 'प्रुफरिडींग'ची चूक असावी असा आपला अंदाज आहे, पण तरी त्यात आपसूक वेगळ्या अर्थी वास्तवच नोंदवलं गेलंय. 'प्रॉपगॅन्डा' या शब्दात 'प्रचार' आलाच. म्हणजे खैरनारांच्या माध्यमांकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अवास्तव आहेत का? अपेक्षा नावाची गोष्ट बहुतेकदा अवास्तवच असते की काय? डेंजर आहे मग. खरं तर वरचा माध्यमांविषयीचा उतारा येण्याआधी या पुस्तकात खालचा उतारा खैरनार नोंदवतात :
प्रामाणिकपणावर आधारित अशी लोकांची चळवळ बाळसे धरू नये, ती मोठी होऊ नये म्हणून येनकेन प्रकारे ती चळवळ चिरडून टाकण्याचा प्रयत्न समाजातील तथाकथित सत्ताधारी माणसे करत असतात. लोकांचा उत्साह मावळतो. सरकारी पक्षाला वाहिलेली किंवा त्यांच्या दबावाखाली असलेली प्रसारमाध्यमे कुशलतेने त्यांच्यात भ्रम पसरवून समाजाचे लक्ष वेगळ्या मार्गाकडे वळवून चळवळींचा घात करतात. प्रसारमाध्यमांचे हितसंबंध कोणत्या ना कोणत्या नेत्याशी, पक्षाशी किंवा सत्ताधाऱ्यांशी ज्या वेळी गुंतलेले असतात. (काही अपवाद वगळता जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहाण्यासाठी बरीच प्रसारमाध्यमे त्या प्रकारची असतात.) त्यावेळी त्यांना समाजहित, देशहित, सिद्धांत, सामाजिक व वैयक्तिक मूल्ये यांचा विसर पडतो व आपापले हितसंबंध जपण्यासाठी समाजाचे खोटे प्रबोधन करण्यात दंग होतात.
सत्तेच्या स्पर्धेचा आणि माध्यम व्यवहाराचा काही संबंध स्पष्ट होणाऱ्या नोंदी आपण मर्यादित प्रमाणात 'रेघे'वर केलेल्या आहेत. वास्तविक खैरनारांनी हे एवढं स्पष्ट आधी बोलून नंतरच्या भागात माध्यमांबद्दल किती अपेक्षा व्यक्त केल्यात! पण तेही साहजिक आहे आणि त्यांना तसं करण्याची मुभा आहे. शिवाय त्यांना त्यांच्या अनुभवातून काही वाटलं असेल तेही ठीक. आपण त्यातले काही बिंदू आपल्या परीने इथे नोंदवले. खैरनारांनी पुस्तकाची सुरुवात ज्या मुद्द्याने केलेय त्या मुद्द्यावर आपण नोंदीचा शेवट करू. पुस्तकाच्या सुरुवातीला 'भूमिका' स्पष्ट करताना खैरनार म्हणतात : 
आपल्या समाजाची रचना अशी काही वैशिष्ट्यपूर्ण व विचित्र आहे की, कोणता ना कोणता मुखवटा चढवल्याखेरीज जीवन जगणे कठीण होऊन बसते.
इथे वाक्याच्या सुरुवातीला 'आपल्या' या शब्दाऐवजी 'कोणत्याही' असं टाकणं बरं जाईल काय? (तसं केलं तर, नववा शब्द 'आहे'ऐवजी 'असते' असा करावा लागेल). म्हणजे 'कोणत्याही समाजाची रचना अशी काही वैशिष्ट्यपूर्ण व विचित्र असते की, कोणता ना कोणता मुखवटा चढवल्याखेरीज जीवन जगणे कठीण होऊन बसते'. आणि सध्याच्या माध्यमपिसाट काळात मुखवट्यांची कमतरता नाहीच. त्यामुळे वाक्य आपसूक पूर्ण होतं. आणि आपला गुन्हा पुन्हा एकदा सिद्ध होतो. थांबू.
***
''बरे असे केल्याशिवाय जगात भागत नाही! अहो नाही तर, आपली खरी मते सांगून जगात तंटेच करायचे - वैरीच निर्माण करायचे की नाही? रिकामा जीवाला ताप! जाऊ द्या!...''
- दिवाकर (नोंद)

Friday, 2 August 2013

न लिहिलेल्या दुर्गा भागवत - अशोक शहाणे

मुंबईत एशियाटिक सोसायटीच्या दरबार हॉलमधे दुर्गा भागवत यांचं चित्र आजपासून प्रत्येकाला येता-जाता दिसेल. हे चित्र लावण्यात येणार असल्याची बातमी गेल्या रविवारी प्रसिद्ध झाली. (लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्स). त्यानुसार चित्राच्या अनावरणाचा कार्यक्रम आत्ता सहा वाजता सुरू झाला असेल. या बातमीचं आपण 'रेघे'वर काय करणार? तर, दुर्गाबाईंचं चित्र लावल्यामुळे त्यांच्याबद्दलची जी जबाबदारी झटकण्याची मुभा आता आपल्याला मिळालेय ती जबाबदारी नक्की काय असेल याची एक नोंद करू. ही जबाबदारी म्हणजे दुर्गाबाईंच्या विचारांना लक्षात ठेवण्याची. त्या विचारांसंबंधी काय पटतंय नि काय नाही पटतेय त्याबद्दल बोलण्याची. आज चित्राच्या उद्घाटन समारंभाच्या गोंगाटात ही नोंद आवश्यक ठरावी. या नोंदीसाठी आपण अशोक शहाणे यांना सोबतीला घेतलेलं आहे. दुर्गा भागवतांचं निधन ७ मे २००२ ला झालं. त्यानंतर 'माहेर' मासिकाच्या जून २००२च्या अंकात प्रसिद्ध झालेला शहाण्यांचा हा लेख आपण त्यांच्या परवानगीने 'रेघे'वर नोंदवतो आहोत.
***

न लिहिलेल्या दुर्गा भागवत
- अशोक शहाणे



दुर्गा भागवत
'मी अजून माझं बाईपण विकायला काढलेलं नाहीय.' 

दुर्गाताईंना एवढं फणकारायला असं घडलं होतं काय? 

तर पुण्याच्या एका प्रकाशकाचं त्यांना पत्र आलं होतं. त्याच्या डोक्यात एक कल्पना आली होती : नामांकित स्त्री-लेखिकांच्या कथा निवडून दोन-तीन संग्रह काढावेत. म्हणजे प्रत्येकीची एकच गोष्ट. असे दोनतीन संग्रह अन् त्याने लेखिकांना तशी पत्रं पाठवली होती. एक पत्र दुर्गाताईंच्या नावाने पण आलं होतं. त्या पत्रावरच दुर्गाताईंची ही तिखट प्रतिक्रिया होती. लिहिणाऱ्यांत कसला स्त्री न् पुरुष असा फरक करता? असा एकूण मुद्दा.

'जेव्हा वय होतं तेव्हासुद्धा काढलं नाही, तर आता म्हातारपणात कुठं काढू?'

अशी वर आणखी पुस्ती. 'वय होतं तेव्हासुद्धा काढलं नाही' म्हणजे लग्नाबद्दल बोलत होत्या त्या. लग्न नावाच्या संस्थेबद्दल स्वतंत्र लिहायचा प्रसंग आला असता तरी त्यांनी हे असं फटकारून काढलं असतं का नाही कोण जाणे! 

पण पुढे काय झालं ठाऊक नाही. स्त्री-लेखिकांच्या कथांचे मिळून दोन-तीन संग्रह त्या प्रकाशकाने कदाचित काढलेही असतील. फक्त त्यात घालायला दुर्गाताईंची कथा काही त्याला मिळाली नाही.
---

दुर्गाताई राहायच्या ग्रँटरोड न् बॉम्बे सेंट्रल यांच्यामध्ये गिल्डर लेनला. तिथनं कामाठीपुरा तर म्हणतात तसं हाकेच्या अंतरावर. एका चौकाचंच काय ते अंतर मध्ये.

एकदा असंच वेश्यांबद्दल एकदम वीज चमकल्यासारखं म्हणाल्या, 'आमच्यात न् त्या बायकांच्यात काहीच फरक नाही. आम्ही रस्त्याच्या ह्या बाजूला जन्मलो अन् त्या त्या बाजूला जन्मल्या, एवढीच काय ती तफावत!'

ह्या लायनीला बायका कशा येतात अशी पाहणी करायचा एक रिवाजच समाजशास्त्राच्या अभ्यासकांमध्ये आहे. तशा एका पाहणीचे निष्कर्ष वर्तमानपत्रात आले होते, त्यावर त्यांची ही टिप्पणी होती. 'बाई काय ह्या धंद्यात एक तर नाडली जाऊन येते, नाहीतर खुशीने येते. पाहणी व्हायला हवी ती तिच्याकडे येणाऱ्या गिऱ्हाईकांची. ही गिऱ्हाईकं तुमच्या-आमच्या घरातलीच तर असतात. ती वेश्यांकडे का म्हणून जातात? ही चौकशी व्हायला हवी.'

आता असल्या चौकशा आपल्याकडे होत असत्या तर काय हवं होतं!

दुर्गाताईंची एक मैत्रीण होती. ती पण लिहिणारीच. ती पण लग्नाची राहिलेली. नोकरी करणारी. मुंबईच्या बाहेर. दुर्गाताई तिच्याकडे मनात आलं की कधीही जायच्या. एकदा त्यांनी तिला सल्ला दिला, 'ठेवावेत की संबंध कुणाशी तरी, शरीराची गरज आहे म्हणून. तेवढ्यापुरते. बाकी गुंतून नाही पडू. अन् लोक काय म्हणतील म्हणून घाबरण्यात काहीच अर्थ नाही. लोक काय, काहीतरी म्हणतच असतात. त्यांच्या म्हणण्याला काय भीक घालायची!'

एकदम बिनधास्त!
---

अधनंमधनं कुठनंकुठनं लोक भाषणाला बोलवायचे. असंच एकदा नाशिकला जाणं झालं. जवळच आदिवासींची एक आश्रमशाळा होती. मुलींची. तिथे संध्याकाळी भाषण झालं. नंतर गप्पागोष्टींत वेळ गेला अन् मुलींनी रात्री इथेच राहा म्हणून आग्रह केला.

मग रात्री जेवणखाण होऊन गेल्यावर मुलींनी त्यांना घेरलं. पोरीच त्या, भडाभडा बोलल्या. आश्रमशाळेत राहायची काय किंमत त्यांना चुकती करावी लागत होती, ते दुर्गाताईंच्या लक्षात आलं. आपलं हे गाऱ्हाणं कानांवर घालावं म्हणूनच तर त्यांनी आग्रहाने दुर्गाताईंना ठेवून घेतलं होतं. एवढी मोठी लेखिका आहे, लेखणी उचलेलं अन् आपल्या दुःखाला वाचा फोडेल, अशी त्या मुलींची अपेक्षा.

दुर्गाताई मुंबईत परतल्या. सांगत होत्या, 'जे ऐकलं ते लिहिणं आपल्या कुवतीपलीकडचं आहे. आपण लेखक आहोत ह्याची पहिल्यांदा लाज वाटली. आपण नाही लिहू शकत हे.'

जसं बोलताबोलता राजिंदरसिंग बेदी एकदा म्हणाले होते, 'फाळणीच्या दंग्यात कुटुंबातले जवळपास सगळे लोक गमावले. जीव बचावून कसाबसा इकडे पळून आलो. पण फाळणीबद्दल लिहिता कधीच आलं नाही. लेखणीला पेलवण्यापलीकडचं दुःख होतं ते!'
---

'खुश्शाल जाळून टाका! नाहीतरी इथे मांडवाखेरीज बाकी आहेच काय तुमचं!' दुर्गाताई कडाडल्या.

प्रसंग होता कराडच्या साहित्य संमेलनाचा. दुसऱ्या दिवशी दुपारीच अध्यक्षांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मुंबईला 'जसलोक'मध्ये खितपत पडलेल्या जयप्रकाश नारायणांच्या तब्येतीला आराम पडावा म्हणून मौन प्रार्थना करण्यासाठी आख्खा मांडव उठून उभा राहिला होता. यशवंतराव त्यावेळी व्यासपीठावर होते. सगळेच उभे राहिल्याचं बघून ते पण उभे राहिले होते. 

अन् मग संध्याकाळच्या अंगाला त्यांचा निरोप घेऊन कार्याध्यक्ष करंबेळकर दुर्गाताईंकडे आले होते. 'सिंहाच्या गुहेत शिरून तुम्ही त्याच्या आयाळीला हात घातलायत. हे खपवून घेतलं जाणार नाही. तुम्ही समजलात काय, साहित्य संमेलनाचा मांडव आम्ही जाळून टाकू!' ऐतिहासिक नाटकातल्या संवादाच्या धाटणीने करंबेळकर बोलले होते अन् दुर्गाताईंनी त्याला एकदम होकार देऊन टाकला होता.

मग यशवंतरावांनी संमेलन संपायच्या आतच कराडमधनं पळ काढला होता. अन् यजमानाविनाच संमेलन सुखरूप पार पडलं होतं.

दुर्गाताईंना नंतर अटक झाली ती एशियाटिक सोसायटीमध्येच. हीच त्यांची हमखास असायची जागा आहे हे एव्हाना पोलिसांनासुद्धा ठाऊक झालं होतं. एशियाटिक सोसायटी हे दुर्गाताईंचं दुसरं घरच होतं. मुंबई विद्यापीठाशी बेबनाव झाल्यावर त्यांनी एशियाटिक सोसायटी आपलीशी केली होती. ज्ञानाची मक्तेदारी काही विद्यापीठाकडेच नाही, विद्यापीठात पाऊल न टाकता स्वतःच्या बळावर कुणीही अभ्यास करू शकतो, असं सिद्ध करून टाकणारी संस्था म्हणजे एशियाटिक सोसायटी अशी त्यांची धारणा होती नि ती त्यांनी आयुष्यभर जोपासली. एशियाटिक सोसायटीने विद्यापीठाकडे मान्यतेची याचना करणं त्यांना मुळीच मान्य नव्हतं. 

विद्यापीठाशी फटकून विद्यापीठात अद्याप न शिकवल्या जाणाऱ्या लोकसाहित्यासारख्या विषयावर संशोधन करून त्यांनी मराठीमध्ये एक नवं दालनच उघडून दिलं. नंतरचं दलित साहित्य वगैरे गोष्टी म्हणजे एक प्रकारे ह्या बीजालाच फुटलेले अंकुर आहे. दुर्गाताईंना ही एक विलक्षण नजर लाभली होती.
---

दिवसभराच्या लेखन-वाचनानंतर संध्याकाळी एशियाटिक सोसायटीतनं बाहेर पडून फाऊंटनकडे जाताना समोरच्या हॉर्निमन सर्कलच्या बागेत कधीकधी त्या 'जरा बसूया' म्हणायच्या. दहापंधरा मिनिटांनी उठताना एकदा म्हणाल्या, 'आता हे पंधरावीस वर्षांपूर्वी मला असं तुझ्याबरोबर बसता आलं असतं का? आता वय झालं, आता सगळं चालतं. काही बिघडत नाही. आपण आपलं म्हातारपण एन्जॉय करावं!'

दुर्गाताई हे प्रकरण एकंदर मराठी माणसाला झेपणारं नव्हतंच, ही गोष्ट आता त्या गेल्यावर जे काय लिहून आलं, त्यावरनंसुद्धा कळते. पण दुर्गाताईंना डावलून पुढे जाणंसुद्धा मराठी माणसाला शक्य नाही, एवढं खरं!
***

दुर्गाबाई 'रेघे'वर यापूर्वी : १९७५च्या साहित्य संमेलनातलं अध्यक्षीय भाषण
***

अशोक शहाणे 'रेघे'वर यापूर्वी : तथागत कवी (अरुण कोलटकरांविषयीचा लेख)
***