०१ ऑगस्ट २०२६

'काफ्काचा शेवटचा खटला' : लेखक, अस्मिता, बाजार यांचा गुंता

Picador, 2018. Cover Design : Ami Smithson

फ्रान्झ काफ्का (३ जुलै १८८३ - ३ जून १९२४) हा ज्यू धर्मात जन्मलेला आणि जर्मन भाषेत लिहून गेलेला लेखक जन्मापासून बहुतांश काळ प्राग या चेक भाषकांची बहुसंख्या असणाऱ्या शहरात राहिला. इथल्याइथे तीन निरनिराळ्या ओळखी त्याच्याशी जोडल्या गेल्या. 

काफ्काचं लेखन वाचलेल्यांना त्याच्या चरित्राबद्दलच्या काही प्राथमिक गोष्टी माहीत असतात, पण इतर वाचकांसाठी थोडक्यात असं : काफ्का हयात असताना त्याचं तुलनेने थोडंच साहित्य प्रकाशित झालं. दोन-चार कथासंग्रह, इतकंच. तो अशा प्रकाशनासाठी फारसा उत्सुक नसायचा, याबद्दलच्या आख्यायिका किंवा थोडंफार वस्तुस्थितीतून आलेलं म्हणणं ठिकठिकाणी येत राहातंच. मरण्याआधी त्याने त्याचं मागे उरलेलं सर्व अप्रकाशित लेखन (कथा, कादंबऱ्या, त्याने इतरांना पाठवलेली पत्रं, रोजनिश्या) जाळून टाकावं, अशी सूचना त्याचा घनिष्ठ मित्र मॅक्स ब्रॉड याच्यासाठी लिहून ठेवलेल्या टिपणात केली. पण ब्रॉडने आपल्या मित्राची ही शेवटची इच्छा अंमलात आणली नाही. उलट, त्याने काफ्काची हस्तलिखितं जपून ठेवली, मग त्याचं संपादन करून काफ्काच्या तीन अपूर्ण कादंबऱ्या, कथासंग्रह, रोजनिश्यांचा खंड, पत्रांचे खंड, असं साहित्य प्रकाशित होत राहिलं, इतर भाषांमध्ये जात राहिलं. विविध कारणांमुळे ते पसरलं आणि आधुनिक काळातला एक महत्त्वाचा लेखक म्हणून काफ्काचं स्थान पक्कं झालं. आता वेगवेगळ्या परिस्थितीत त्याची आठवण काढली जाते. कधी वाजवी, तर कधी अवाजवी वर्णनंही केली जातात.

जर्मनीतल्या नाझी फौजांची पावलं तत्कालीन चेकोस्लोव्हाकियापर्यंत पोचली, तेव्हाच (१९३९) ब्रॉडने प्रागचा निरोप घेतला आणि तो तत्कालीन पॅलेस्टाइनमधल्या तेल अवीव्हला जाऊन स्थायिक झाला. त्याच्यासोबत अर्थातच त्याची सर्व साहित्यसंपदा आणि काफ्काची अनेक हस्तलिखितंही तिकडे गेली. कालांतराने इस्राएलची निर्मिती झाली. पुढे ब्रॉडने स्वतःची साहित्यसंपदा त्याची सचिव इस्थर हॉफकडे सोपवली, मग इस्थरच्या निधनानंतर तिची मुलगी इव्हा हॉफकडे या कागदपत्रांचा ताबा आला. इस्थर नि इव्हा दोघीही लहरीपणे वागत असत. त्यांनी व्यक्तिगत आर्थिक लाभाकरता ही कागदपत्रं अधूनमधून विकत आल्याचा आरोप झाला. १९७०च्या दशकात इस्राएली सरकारने पहिल्यांदा या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली. पण तेव्हा न्यायालयाने इस्थर हॉफच्या बाजूने निकाल दिला. दरम्यान, तिने १९८८ साली 'द ट्रायल' या काफ्काच्या कादंबरीचं हस्तलिखित लिलावात काढून जर्मनीतल्या एका अभिलेखागाराला २० लाख डॉलरांना विकलं.

या हस्तलिखितांची मालकी हॉफसारख्या खाजगी व्यक्तीकडे ठेवावी की कागदपत्रांचं महत्त्व लक्षात घेता ती इस्राएली राष्ट्रीय ग्रंथालयाकडे जायला हवीत, असा वाद २००८च्या दरम्यान इस्राएलमधील सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचला. दरम्यान, जर्मनीतील मरबाख इथल्या साहित्य अभिलेखागाराने या खटल्यात उडी घेतली. मग यात आणखी अस्मितांचे धागे गुंतले. काफ्का धर्माने ज्यू असल्यामुळे ज्यू राज्य म्हणून निर्माण झालेल्या इस्राएलचा त्याच्यावरचा दावा मोठा, असं एका बाजूचं म्हणणं. तर, काफ्का जर्मनमध्ये लिहीत होता आणि जर्मन साहित्यपरंपरेशी त्याची जवळीक होती म्हणून जर्मनीचा त्याच्यावरचा दावा मोठा, असं दुसऱ्या बाजूचं म्हणणं. मग नाझी जर्मनीत ज्यूंचा झालेला छळ लक्षात घेता आता जर्मनीने यावर दावा करणं फिजूूल आहे, असाही सूर न्यायालयाबाहेरच्या वादांमध्ये उमटला. तर, इस्राएलला स्वतःची ज्यूराष्ट्रवादी अस्मिता अधोरेखित करण्यापुरताच काफ्का हवा आहे, प्रत्यक्षात इतकी वर्षं त्यांना काफ्काच्या साहित्यात कधी रस वाटला का नाही, असाही प्रश्न वजा आरोप नोंदवला गेला. 

या खटल्याच्या निमित्ताने एखाद्या लेखकासंदर्भात अस्मितांचे मुद्दे कसे वापरले गेले, अभिलेखागारांचं राजकारण कसं सुरू असतं, त्यातून त्या-त्या समूहाच्या धारणा घडवण्याचे प्रयत्न कसे होत असतात, आणि व्यापक बाजारपेठेचाही संदर्भ यात कसा गुंतलेला असतो, या प्रश्नांचा पसारा बेंजामिन बॅलिंट या इस्राएली पत्रकार-अभ्यासकाने लिहिलेल्या 'काफ्काज् लास्ट ट्रायल : द स्ट्रेंज केस ऑफ अ लिटररी लिगसी' (पिकेडॉर, २०१८) या पुस्तकातून उलगडतो.

काफ्काने स्वतःचं अप्रकाशित लेखन जाळायची सूचना केली असली तरी ती निरपवादपणे स्वीकारायची गरज नाही, असं ब्रॉडचं म्हणणं होतं. काफ्का  स्वतःच्या लेखनाविषयी साशंक असायचा, त्यामागे परिपूर्णतेविषयीचं त्याचं पछाडलेपण कारणीभूत होतं. पण त्याच्याकडून मिळालेल्या गोष्टी छापून आल्यावर त्याला समाधानही वाटायचं, असं ब्रॉडने यावर नमूद केलं आहे. शिवाय, खरोखरच ही कागदपत्रं जाळली जावीत, असं काफ्काला वाटलं असेल तर त्या सूचनेची खरोखर अंमलबजावणी होईल, अशा व्यक्तीसाठी त्याने यासंबंधीचं टिपण लिहून ठेवायला हवं होतं. ब्रॉड आधीपासूनच काफ्काचं साहित्य प्रकाशित व्हावं, यासाठी सतत प्रयत्नशील राहिला होता, त्यामुळे तो हस्तलिखितं नष्ट करण्याची सूचना अंमलात आणणार नाही, याची कल्पना काफ्काला नसेलच का, असाही प्रश्न या निमित्ताने नोंदवला गेला. 
 
स्वतःची अप्रकाशित हस्तलिखितं जाळण्याविषयी काफ्काने ब्रॉडला उद्देशून लिहिलेल्या पत्राचं दुसरं पान (सौजन्य- इस्राएली राष्ट्रीय ग्रंथालय)

“माझ्यात आणि ज्यूंमध्ये काय साम्य आहे? माझं तर माझ्याशीही फारसं साम्य नाहीये. मी एका कोपऱ्यात गप्प उभं राहायला हवं नि श्वास घ्यायला मिळतंय यातच समाधान मानायला हवं”- असं विधान काफ्काने १९१४ साली त्याच्या रोजनिशीत केलं होतं. पण तो ज्यू धर्मविचाराचा अभ्यास करत होता. ज्यू समूहात बोलल्या जाणाऱ्या यिडिश भाषेतील लोककथा आणि नाटकं यामध्ये त्याने खूपच रस घेतला, त्याचा त्याच्यावर प्रभावही पडला. तरीही, त्या काळच्या ज्यूराष्ट्रवादी (झायनिस्ट) चळवळीशी त्याची जवळीक नव्हती. तसंच, जर्मन भाषेविषयी दुरावा दाखवणारं विधानही त्याने रोजनिशीत १९११ साली केलं. “मी आईवर (जर्मन शब्द: Mutter- मूटा) करायला हवं तसं आणि मी करू शकलो असतो तसं प्रेम केलं नाही, याचं एकमेव कारण म्हणजे जर्मन भाषेने मला तसं करण्यापासून रोखलं. ज्यू आई म्हणजे काही ‘मूटा’ (Mutter -जर्मन शब्द) नव्हे.” ब्रॉडला पाठवलेल्या एका पत्रातही काफ्काने “आपल्या बिगरजर्मन मातांकडून आजही आपल्या कानावर जर्मन भाषाच पडत असते” असं म्हटलं होतं. पण त्याने आयुष्यभर जर्मन भाषेत लिहिलं आणि त्याच्यावर प्रामुख्याने जर्मन लेखकांचा खोलवरचा प्रभाव होता.
 
इतर माणसांप्रमाणे लेखकाच्याही मनात स्वतःच्या ओळखीविषयी किंवा अस्मितेविषयी काही संभ्रम असणं आणि तो त्याच्या लेखनात तो उमटणं, हे स्वाभाविक मानायला बहुधा हरकत नाही. किंवा मुळातच अस्मिता निरपवादपणे एका साच्यात बसवता येते का, हाही प्रश्न आहेच. मग, स्वतःची व्याख्या व्हायला नको, अशी भूमिका घेतलेल्या काफ्कासारख्या लेखकाचं या अस्मितांच्या खेळात काय होऊ शकतं, याचा लेखाजोखा या पुस्तकात वाचायला मिळतो.
 
राज्यसंस्थांच्या विचारसरणीचा मुद्दाही या प्रकरणात गुंतला होता. उदाहरणार्थ, आधी नाझी जर्मनीच्या नियंत्रणाखाली गेलेला चेकोस्लोव्हाकियात दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखालील कम्युनिस्ट सरकार आलं. त्यांनी काफ्काचं साहित्य प्रतिक्रांतिवादी ठरवून त्यावर बंदी घातली. त्यामुळे काफ्का आयुष्यभर बहुतांश काळ ज्या प्राग शहरात राहिला तिथेच त्याचं साहित्य बराच काळ उपलब्ध नव्हतं. कालांतराने १९९०च्या उंबरठ्यावर चेकोस्लोव्हाकियातलं कम्युनिस्ट सरकार बदललं, मग चेक रिपब्लिक आणि स्लोव्हाकिया हे दोन देश झाले. पण इस्राएलमधल्या कागदपत्रांवरून सुरू झालेल्या खटल्यात चेक रिपब्लिकच्या बाजूने काही हस्तक्षेप झाला नाही. याचा उल्लेख नि साधारण त्यामागचा इतिहास या पुस्तकात तुलनेने अगदीच थोडक्यात आला आहे. या खटल्याचा निकाल २०१६ साली लागला आणि हॉफच्या ताब्यातली कागदपत्रं इस्राएली राष्ट्रीय ग्रंथालयाच्या अभिलेखागारामध्ये जमा करण्यात आली. ती आता ऑनलाइन पाहायला नि वापरायला उपलब्ध आहेत.

काफ्काचं लेखन ही एक क्रयवस्तूही असल्यामुळे मग तिला पुस्तकांच्या बाजारात, विद्यापीठांच्या बाजारात कसं अधिकाधिक मूल्य प्राप्त होत गेलं, तेही या पुस्तकातून सूचित होतं. पण दुर्दैवाने या पुस्तकावरही अशा बाजाराचा प्रभाव पडल्याचं जाणवतं. आटोपशीर, सखोल पत्रकारी वृत्तान्तासारखं हे पुस्तक होऊ शकलं असतं. पण त्याला मधेच अकादमिक डूब द्यायचा प्रयत्न करणाऱ्या टिपा अर्धवटपणे जोडलेल्या आहेत. टिपा जोडण्यात अर्थातच काही गैर नाही, पण एकाच परिच्छेदात तीन जणांची अवतरणं आली असतील तर त्यातल्या एकाच अवतरणाचा स्त्रोत टिपेमध्ये द्यायचा, बाकीची अवतरणं तशीच लटकती ठेवायची- असा प्रकार या पुस्तकात जवळपास सर्वच प्रकरणांमध्ये आहे. उदाहरणार्थ, दुसऱ्या प्रकरणात मॅक्स ब्रॉड, स्टिफन झ्वाइग, रेइनर स्टॅश आणि खुद्द काफ्का यांची अवतरणं येऊन जातात, पण पहिली टीप मात्र काफ्काच्या नंतर आलेल्या एका पत्रातल्या उद्धृताची आहे. इतर अवतरणंही मुळात चुकीची नाहीत, पण संदर्भ न देता आलेली आहेत. त्यापेक्षा टिपा वगळून मग नुसत्या दीर्घ लेखासारखं लिहून एकत्र संदर्भसूची देऊनही चाललं असतं. काहीतरी एक संगती स्वीकारायला हवी होती.

तसंच या पुस्तकात काही ठिकाणी दिशाभूल करणारं विषयांतर किंवा अनावश्यक तपशीलही आहेत. एक प्रातिनिधिक उदाहरण : तेराव्या प्रकरणात ऑस्ट्रियन (जर्मनमध्ये लिहिणारा, ज्यू) लेखक स्टिफन झ्वाईग याने ब्राझीलमध्ये हद्दपारीचं जिणं जगताना आत्महत्या केल्याचा उल्लेख आहे. "पॅलेस्टाइनला पोचू न शकलेल्या दुर्दैवी ज्यू हद्दपार माणसांवर गुदरलेल्या सांस्कृतिक आपत्तीची व्याप्ती" झ्वाईगच्या आत्महत्येमुळे मॅक्स ब्रॉडला जाणवली, असं बॅलिन्ट म्हणतात. ब्रॉड आणि झ्वाईग चांगले मित्र होते. हा तपशील दिल्यावर मग पॅलेस्टाइनला जाऊ न शकलेल्या इतर काही कलावंतांविषयी बॅलिन्ट सविस्तर बोलायला लागतात. पण मुळात झ्वाईग हा पॅलेस्टाइनमध्ये इस्राएलची निर्मिती करू पाहणाऱ्या ज्यूराष्ट्रवादाविरोधात होता, त्याने नाझी राजवटीपासून सुरक्षित राहण्यासाठी स्वतःहून ब्राझीलला जायची निवड केली आणि युरोपाविषयीची त्याची ओढ शेवटपर्यंत कायम होती. ब्राझीलमधल्या वास्तव्याला धरून त्याने 'ब्राझील : अ लँड ऑफ द फ्यूचर' असं पुस्तक लिहिलं. हे सगळं लक्षात घेतलं तर, "पॅलेस्टाइनला पोचू न शकलेल्या दुर्दैवी हद्दपार ज्यू" मामसांच्या संदर्भात त्याचा दाखला देणं रास्त आहे का? यात 'दुर्दैवा'चा उल्लेख लेखकाच्या किंवा ब्रॉडच्या दृष्टिकोनातून असेल तर मग तसं स्पष्ट म्हणायला हवं. नाहीतर, झ्वाईगचा इथे असा उल्लेख विसंगत आणि दिशाभूल करणारा ठरतो. असे दाखले आणखीही आहेत. पुस्तकाची लांबी वाढवण्यासाठी हे झालं असेल का, अशी शंका येते. हा प्रकार इंग्लंडमधल्या आवृत्तीसोबतच अमेरिकी आवृत्तीतही आहेत. 

काही टायपिंगच्या चुका, किंवा वाक्यरचना कमी-अधिक बिघडणं, किंवा कधी छपाई कमी-अधिक होणं, या गोष्टी पुस्तकांच्या व्यवहारात स्वाभाविकपणे होतात.  दुरुस्त करायचा प्रयत्न केला तरी, कधी राहून जातात. या पुस्तकात तसंही बरंच आहे. उदाहरणार्थ, दहाव्या प्रकरणात पहिल्या महायुद्धावेळी ब्रॉड पंचवीस वर्षांचा असल्याचा उल्लेख येतो. लगेच पुढच्या वाक्यात त्या वेळी तो तीस वर्षांचा उसल्याचा उल्लेख येतो. त्याचा जन्म १८८४चा, आणि पहिलं महायुद्ध १९१४ साली सुरू झालं, त्यामुळे दुसरा उल्लेख बरोबर. अशा चुका अनावधानाने होऊ शकतात (या नोंदीतही अशा चुका असू शकतील). मराठीत एका पुस्तकामागे एक-दोनच माणसं कसंबसं हे सगळं करत असतात, पण इंग्रजीत प्रकाशनाआधी दोन-चार प्रकाशनसंस्थांमधल्या किमान चार-पाच किंवा अधिक मंडळींच्या नजरेखालून या पुस्तकाचा मजकूर  गेलं असेल, तरी हे पुस्तक जाऊनही आहे हे असं आहे.

Bombay Poets Archive, Cornell University Library
तरीसुद्धा या पुस्तकाचा विषय समजून घेण्यासारखा आहे. तो चार बाजूंनी मांडण्याचा लेखकाचा प्रयत्नही साहित्यिक पत्रकारितेचा नमुना म्हणून दखलपात्र आहे. त्यामुळे समजा याचं मराठी भाषांतर करायचं झालं, तर वरच्या गोष्टी जमतील तितक्या संपादित करून ते करता येऊ शकेल. कशाला करायचं मराठी भाषांतर? या प्रश्नाचं छोटं समर्थन असं : कॉर्नेल विद्यापीठाच्या ग्रंथालयात 'बॉम्बे पोएट्स अर्काइव्ह' असा विभाग करून त्यात १९६०च्या पुढे-मागे जोमाने लिहित्या झालेल्या, मुख्यत्वे अनियतकालिकांच्या चळवळीशी नातं सांगणाऱ्या काही मराठी आणि भारतीय इंग्रजी कवींची कागदपत्रं जतन करून ठेवलेली आहेत. भारतात ती कुठे गेली असती माहीत नाही, त्यामुळे अभ्यासकांच्या प्रयत्नातून ती तिथे गेली हे एका अर्थी बरंच म्हणता येईल. यात दिलीप चित्रे, अरुण कोलटकर, चंद्रकांत पाटील या मराठी मंडळींचीही कागदपत्रं आहेत. या अर्काइव्हच्या मुखपृष्ठावरची एक ओळ अशी : "बॉम्बे हे समुद्रकिनाऱ्यावरचं विख्यात शहर. चित्रपट, व्यावसायिक हिंदी चित्रपट ही या शहराची सर्वांत प्रसिद्ध निर्मिती राहिली आहे, आणि या चित्रपट उद्योगाचं बॉलिवूड हे नावही बॉम्बे शब्दाचा संकेत देणारं आहे. 'मुंबई' हे ठिकाण तुलनेने अलीकडचं आणि बहुधा कमी उदारमतवादी ठिकाण आहे. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर या शहराचा पोत बदलू लागला."
 
वर उल्लेख आलेल्या तीन कवींव्यतिरिक्त नामदेव ढसाळ, भाऊ पाध्ये, वसंत गुर्जर, मनोहर ओक, तुळसी परब अशा तत्कालीन कित्येक कवी-लेखकांच्या लेखनात 'मुंबई'च आली. आज जयंती असणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांची 'मुंबईची लावणी' किंवा त्यांनी लिहिलेला 'मुंबईचा गिरणी कामगार' हा पोवाडा, त्याआधी पठ्ठे बापूरावांनी लिहिलेली 'मुंबईची लावणी', किंवा त्याही आधी गोविंद नारायण माडगांवकरांनी १८६३ साली लिहिलेलं 'मुंबईचें वर्णन', या सगळ्याचं ठिकाण कोणतं होतं? बॉम्बे की मुंबई? हा दीडेक शतकाहून अधिकचा शब्दवापराचा इतिहास (आणि सर्वसामान्य लोकव्यवहारातला मुंबई या शब्दाचा वापर) बाजूला ठेवून उपरोल्लेखित मजकुरात मुंबई हे तुलनेने अलीकडचं आणि कमी उदारमतवादी ठिकाण ठरवलेलं आहे. 'बॉम्बे पोएट्स'च्या यादीत येणाऱ्या अरविंद कृष्ण मेहरोत्रा, आदिल जस्सावाला, इत्यादींसारख्या कवींचं 'बॉम्बे'सुद्धा या मराठी लोकांशी मोकळेपणाने देवाणघेवाण करत उभं राहिलं. त्यामुळे त्यात बॉम्बे येणं वाजवीच. पण त्यासाठी मुंबई अनुदार ठरवण्याची गरज नाही.
 
शिवसेनेच्या सरकारने १९९५ साली बॉम्बे हे अधिकृत नाव बदलून मुंबई केलं. पण शहराच्या नावाचा मुद्दा शिवसेनेच्या तथाकथित 'भूमिपुत्रां'च्या आक्रमक राजकारणाशीच जोडून पाहणं, अपुरंच. कॉर्नेल विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील वरचा उल्लेख अशी जोड सुचवणारा दिसतो (किंवा विसाव्या शतकाच्या मध्यात शहराचा पोत बदलल्याचं त्यांना वाटलं, म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाशीही ती जोड घातलेली असू शकेल). हा भाषाभिमानाचा मुद्दा नाही, ऐतिहासिक वापराच्या दृष्टीनेही तो उल्लेख चुकीचा आहे.  मुंबईतल्या विविध समूहांचं वर्णन माडगांवकरांच्या पुस्तकातही होतं आणि नंतरच्या मराठी साहित्यातही ते कमी-अधिक प्रमाणात उमटलं. त्यामुळे मुंबईसह बॉम्बे, बम्बई हेही अवकाश त्यात राहिलेच आहेत. अशा कोणा कवींच्या कागदपत्रांचा संग्रह अमेरिकी विद्यापीठात 'बॉम्बे पोएट्स'च्या एका नावानिशी राहिला, तरी काही गैर नाही. पण त्यातल्या अंतर्गत अस्मितांच्या सरमिसळीशी सुसंगत ओळख समोर मांडण्याऐवजी चमत्कारिक उतरंड कल्पून मुंबईला खालच्या स्थानावर ढकलणं अनैतिहासिक आहे. हा उल्लेख अनावधानाने झालेला असेल तरी दुरुस्त करता येऊ शकतो. संस्कृतीचं जतन आणि सादरीकरण कसं होत असतं, आणि त्यात लेखक, अस्मिता, बाजार यांचा गुंता कसा असतो, याचा हा एक आपल्या जवळचा दाखला.

दुसरीकडे, महाराष्ट्र सरकारने अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज लेखन प्रेरणा दिवस जाहीर केला, आता तो दर वर्षी साजरा होईल. मुंबई महानगरपालिका कधीपासूनच जगातल्या सर्वांत श्रीमंत नगरपालिकांमध्ये गणली जाते. मराठीच्या नावाने राजकारण तर काही दशकं सुरू आहे. अलीकडे मराठी भाषा अभिजात असल्याचा सरकारी शिक्काही मारण्यात आला. मराठी राज्यगीतही आता वेळोवेळी वाजवलं जातं. पण उत्सवी भपकेबाजपणापलीकडे स्वतःच्या सांस्कृतिक वारशाबद्दलची आपली जाणीव साधारण कुठे आहे, याचा अंदाज 'काफ्काचा शेवटचा खटला' या पुस्तकानिमित्ताने आणि आजच्या प्रेरणादायी दिवसानिमित्ताने बांधता येऊ शकतो.

काफ्काची पत्रं : इस्राएली राष्ट्रीय ग्रंथालय । इतर चिन्हं नि चित्रं इंटरनेटवरून । मांडणी : रेघ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा