![]() |
| हेन्री डेव्हिड थोरो |
थोरोने आधुनिक जीवनव्यवहारापासून अंतर राखून जगण्याचा प्रयोग म्हणून कॉन्कॉर्ड, मॅसेच्युसेट्स इथल्या वॉल्डन तळ्याकाठी स्वतः बांधलेल्या घरात दोन वर्षं राहून पाहिलं. स्वतःच पिकवलेलं खायचं, इत्यादी. या प्रयोगाबद्दल त्याने १८५४ साली प्रकाशित केलेलं 'वॉल्डन' हे पुस्तक गाजलं. त्याबद्दल वेगळं काही इथे बोलायला नको. व्यक्तीशः त्याच्या आयुष्यातले अंतर्विरोधही नोंदवले गेले आहेत- म्हणजे तो सांगतो तितका निरपवाद एकांतवासात जगला नाही, कपडे आई धुवून द्यायची, इत्यादी. तो हयात असतानाही ते आक्षेप नोंदवले जात होते, त्यानेही त्याची अप्रत्यक्ष दखल 'वॉल्डन'मध्ये घेतली. एका ठिकाणी तो म्हणतो, "माझ्या त्रुटी आणि विसंगती काहीही असल्या तरी त्यामुळे माझ्या विधानामधला सत्यांश उणावत नाही. माझ्या बोलण्यातही बरीच दांभिकता आणि ढोंगीपणा आहे. धान्य पाखडून भुसकट वेगळं करावं लागतं, तसंच बोलताना विचारांमधली दांभिकता बाजूला करता यायला हवी. पण मला ते करणं अवघड जातं, आणि इतर लोकांप्रमाणे मलाही त्याबद्दल खेद वाटतो. तरीसुद्धा, मी मोकळा श्वास घेऊन या संदर्भातले माझे विचार मुक्तपणे मांडणार आहे." हे विचार का मांडायचे नि कसे मांडायचे, याबद्दलचा त्याचा पवित्रा त्याने असा स्पष्ट केलेला आहे : "मी काही रडगाणं लिहायला बसलेलो नाही. खुराड्यावर उभं राहून आरवणाऱ्या पहाटेच्या कोंबड्यासारखं बिनदिक्कतपणे शक्य तितक्या जोरात ओरडून माझ्या शेजाऱ्यांना जागं करणं, हाच माझा उद्देश आहे." या प्रतिमेतून एकंदर त्याची भूमिका लक्षात यावी.
थोरो म्हणतोय म्हणून त्याच्या प्रत्येक बोलण्यात 'सत्यांश' आहे असं आपण मानायची गरज नाही, तसंच कधीकधी कोंबडा जवळपास मध्यरात्री, म्हणजे आपल्याला नको वाटेल अशा वेळीही आरवतो, हेसुद्धा लक्षात घेता येतं. पण म्हणून कोंबड्याचं आरवणं निरर्थक ठरत नाही आणि 'वॉल्डन'मधे काहीच सत्यांश नाही, किंवा त्याने खरोखर प्रयोग केले नाहीत, असंही नाही. या पुस्तकात एकीकडे टोकाची अराज्यवादी (अनार्किस्ट) भूमिका ठामपणे मांडलेली आहे, तसंच निसर्ग-माणूस यांच्यातल्या नात्याच्या विविध बाजू धुंडाळण्याचाही प्रयत्न आहे. आता आपलं जगणं राज्यसंस्थेभोवती (शासन-प्रशासन, पॅन, आधार, जनगणना, 'अधिकृत ओळख', इत्यादी) आणखी गुरफटत चाललेलं आहे, निसर्ग-मानव यांच्यातलं नातंही अधिक गुंतागुंतीचं झालेलं आहे. अशा वेळी थोरोचं म्हणणं आजही कमी-अधिक चर्चेचा विषय ठरतं, हे स्वाभाविक. त्यातले प्रश्न आजच्या आणखी 'पुढे' निघून गेलेल्या जगण्यालाही लागू पडणारे आहेत. आपण त्या प्रश्नोत्तरांमध्ये जाणार नाही. पण पुस्तकाचा पोत लक्षात येण्यापुरतं हे नोंदवलं. आता दुर्गा भागवतांनी केलेल्या या पुस्तकाच्या भाषांतराकडे वळू.
![]() |
| आरवणारा कोंबडा. रेखाटन : थोरो ('वॉल्डन'च्या एका हस्तलिखितातून. स्त्रोत : द हंटिंग्टन लायब्ररी) |
भाषांतराची प्रक्रिया विविध कारणांमुळे इतकी जटिल असते की त्यात केवळ व्यक्तिसापेक्ष मतानुसार 'या शब्दाऐवजी तो शब्द योग्य' अशा वरवरच्या 'चुका' शोधून खूप गंभीर दोष दाखवल्यासारखं करणं फसवं असतं. तसंच, 'हे भाषांतर नाही अनुवाद / भावानुवाद / हृदयांतर आहे', असली स्तुतीही त्या जटिलतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे होते. इथे हे टाळलं आहे. शिवाय, साडेतीनशे पानांचा मजकूर लिहायचा म्हटल्यावर अनावधानाने, नजरचुकीने काही चुका राहून जातात, काही छपाईदोष राहातात, हेही स्वाभाविक. त्यामुळे अशा गोष्टींबद्दल न बोलता त्यापलीकडे काही तपासणी करता येते का ते पाहू. इंग्रजी वाक्यं संदर्भापुरती चौकोनी कंसात दिली आहेत. त्याशिवायही मुद्दे कळतील.
शीर्षक
थोरोने पहिल्या आवृत्तीत 'वॉल्डन' या मुख्य शीर्षकासोबत 'Or, Life in the Woods' (अर्थात, रानातलं जगणं) असं उपशीर्षक ठेवलं होतं. ते १८६२ साली आलेल्या दुसऱ्या आवृत्तीत काढण्यात आलं (त्या वर्षी नंतर तो वारला). साधारणपणे पुढील बहुतेक आवृत्त्यांमध्ये उपशीर्षक नाही. भाषांतर करताना शीर्षकाबाबत निवड करणं, किंवा काही कारणाने शीर्षक बदलणं, हे सगळं रास्तच आहे. पण बदल किंवा निवड कशा तऱ्हेची आहे, यावर चर्चा होऊ शकते. आपण थोरोची भूमिका वर थोडक्यात पाहिली. आरवणाऱ्या कोंबड्याचं वाक्य त्याने पुस्तकात शीर्षक-पानावर टाकलं होतं. इतकं त्याला त्या भूमिकेचं महत्त्व वाटलं. दुर्गा भागवतांनी मात्र शीर्षकात 'विचारविहार' अशी जोड दिली. यातून काय होतं? मूळ पुस्तकातला उग्रपणा शीर्षकापासूनच पातळ व्हायला लागतो. स्वतःला जगवण्यासाठी आवश्यक असणारे प्राथमिक श्रम न करताच नुसते उनाड विचार कशाला करायचे, या पुस्तकात वारंवार मांडलेल्या भूमिकेचा बोऱ्या वाजतो. किंबहुना, त्यातली भौतिक बाजू लंगडी करून 'विचार' नि 'विहार' असा आधिभौतिक पिसारा तयार होतो. थोरोला आरवणारा कोंबडा व्हायचा होतं, दुर्गा भागवतांनी शीर्षकापासून त्याला रंगीबेरंगी पिसांचा अनोळखी पक्षी करायला सुरुवात केली.
'निसर्गोपासक', 'निसर्गपूजक' अशी थोरोची प्रतिमा मराठीत अधिक प्रचलित होण्यामागेही भागवतांच्या समजुतीचा हातभार किती आहे, हा एक वेगळा तपासण्यासारखा मुद्दा आहे. राजकारणाविषयीच्या भूमिका एकीकडे आणि निसर्गासोबत जगण्याचं सूक्ष्म-सुंदर वर्णन दुसरीकडे, अशी फारकत थोरो करत नाही. तो दोन्ही एकत्र गुंफतो. ती गुंफण उसवायची सुरुवात 'वॉल्डनकाठी विचारविहार' अशा शीर्षकातून होते.
'सन्माननीय' पोशाखातलं बुजगावणं आणि नागडी माणसं
![]() |
| मुखपृष्ठ : दिनानाथ दलाल / मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस |
जगाच्या लेखी कोण मान्यवर ठरतं याचा विचार करण्यापेक्षा खरं सन्मानजनक काय आहे, याचा विचार करावा, असं थोरो पहिल्या प्रकरणात म्हणतो. मान्यवर असल्याचं प्रदर्शन अंगावरच्या कपड्यांमधून केलं जातं, तेव्हा आपली ओळख आतल्या माणसाशी होत नाही, तर वरच्या पोशाखाशी होते, असं त्याचं म्हणणं. हा मुद्दा पटवून देण्यासाठी तो बुजगावण्याचं उदाहरण देतो. "समजा, तुम्ही तुमचे सगळ्यांत नवीन कपडे एखाद्या बुजगावण्याला घातलेत आणि स्वतः कपडे न घालता शेजारी उभे राहिलात, तर लोक आधी बुजगावण्यालाच नमस्कार करतील ना? परवा मी एका मक्याच्या शेताजवळून जात होतो. तिथे एका काठीवर हॅट ठेवलेली होती आणि खाली कोट लटकावलेला होता. तेवढ्यावरून तोच त्या शेताचा मालक असल्याचं मी ओळखलं! बदललेल्या वातावरणाचा त्याच्यावर काय परिणाम झाला असेल तेवढाच." [Dress a scarecrow in your last shift, you standing shiftless by, who would not soonest salute the scarecrow? Passing a cornfield the other day, close by a hat and coat on a stake, I recognized the owner of the farm. He was only a little more weather-beaten than when I saw him last.]
यातल्या शेवटच्या वाक्यांचं भाषांतर दुर्गा भागवत असं करतात : "परवाच एका शेतावरून मी चाललो होतो, तेव्हा एका काठीवरच्या कोट व टोपीच्या जवळच असलेल्या त्यांच्या मालकाला मी ओळखले. गेल्या वेळी पाहिले होते त्यापेक्षा या वेळी त्याच्यावर हवेचा परिणाम जास्त झाला होता एवढेच काय ते" (पान १८).
इथे मालक काठीजवळ उभा नसून कोट-टोपी घातलेली ती प्रत्यक्ष काठी, म्हणजे बुजगावणंच 'मालक' असल्याचा उपहासात्मक शेरा थोरोने मारलाय. भागवतांनी मात्र बुजगावण्याच्या शेजारी माणूस मालक उभा करून त्याच्यावर हवेचा परिणाम जास्त झाल्याचं निरर्थक विधान लिहिलं! मूळ आशयातला उपहास घालवणं, तपशील पूर्ण निरर्थक किंवा विपर्यस्त करून टाकणं, हे या भाषांतरात पानोपानी दिसतं.
कपड्यांबद्दल बोलून झाल्यावर थोरो निवाऱ्याबद्दल बोलतो. त्यासंबंधीच्या परिच्छेदात तो ख्रिस्ती धर्मपरंपरेत आरंभिक जोडपं मानलं गेलेल्या ॲडम आणि इव्हचा दाखला देतो : "दंतकथेनुसार, ॲडम आणि ईव्ह यांनी आधी निवारा म्हणून पाना-फांद्यांची कुटी तयार केली, त्यानंतर अंग झाकण्यासाठीचे कपडे वापरायला लागले. माणसाला आधी भौतिक ऊब मिळावी म्हणून आणि नंतर नातेसंबंधांमधील ऊब मिळावी म्हणून घराचा सुखकर अवकाश हवासा वाटला." [Adam and Eve, according to the fable, wore the bower before other clothes. Man wanted a home, a place of warmth, or comfort, first of physical warmth, then the warmth of the affections.]
भागवतांचं भाषांतर असं : "पुराणकथेप्रमाणे आदम आणि ईव्ह दुसरी वस्त्रे मिळवण्यापूर्वी लताकुंज नेसूनच राहिली होती. माणसाला घराची, उबदार आणि सुखकारक जागेची जी आवश्यकता भासली ती त्याला ऊब हवी होती म्हणून. पण मागाहून भाषेची ऊब देखील त्याला हवीशी झाली" (पान २२).
थोरोची इंग्रजी भाषा १८५०च्या दशकातली, अमेरिकेतल्या मॅसेच्युसेट्स भागातली. त्या भाषेतला मजकूर भागवतांनी जवळपास नव्वद वर्षांनी १९६०च्या दशकारंभी मराठीत करायला घेतला आणि आता आपण आणखी साठ-सत्तर वर्षांनी त्याबद्दल बोलू पाहतोय. काळाचं नि प्रदेशांचं अंतर मोठं असल्यामुळे भाषावापरात बराच फरक पडतो. अनेकदा भाषा कळणंच मुश्कील होऊन जातं. त्यामुळे भाषांतरात 'चुका' होण्याच्या शक्यता वाढतात, हे समजून घेऊ. पण कुठपर्यंत समजून घ्यायचं! भाषा कळणं अवघड जातं, अशा वेळी आपण शब्दकोश बघतो, पूरक पुस्तकं बघतो, आता इंटरनेटवर शोधाशोध करून अर्थ लावायचा प्रयत्न करतो. दुर्गा भागवतांनी भाषांतर केलं तेव्हा इंटरनेट नव्हतं, पण त्या मुंबईतल्या विख्यात एशियाटिक लायब्ररीत दिवसभर वाचन-लेखन करत बसायच्या त्या काळात त्यांनी हे भाषांतर केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या हाताशी पुस्तकांचा, नियतकालिकांचा, संदर्भग्रंथांचा प्रचंड साठा होता. आजूबाजूला वाचणारी माणसं होती, तसंच वेगवेगळ्या विषयातले अभ्यासक ओळखीच्या वर्तुळात होते. स्वतः भागवतांनी वयाच्या पंधराव्या वर्षापासून थोरोचं नि त्याच्याबद्दलचं वाचायला सुरुवात केलेली होती आणि भाषांतर करताना त्या साधारण ५५ वर्षांच्या होत्या. तरीही वरच्या परिच्छेदाची अवस्था पाहावी.
त्यात wore the bower या शब्दांचा भावार्थ 'लताकुंज नेसली' असा नाही, तर 'लताकुंजामध्ये राहिली' असा आहे. समजा, भागवतांनी मूळ इंग्रजीलाच धरून नव्वद वर्षांनी मराठी लिहायचं ठरवलं असेल, त्यामुळे 'लताकुंज नेसली' असा शब्दप्रयोग केला असेल, तर समजून घेऊ. शेवटी घर हा शरीराला लागून असलेल्या कपड्यांबाहेरचा पोशाखच आहे, तो माणसाला आधी हवासा वाटला, मग शरीर झाकण्यासाठीचे कपडे गरजेचे वाटले, असं थोरो त्या 'wear' क्रियापदाच्या वापरातून सुचवतो आहे. ती सूचकता नव्वद किंवा दीडशे वर्षांनी जशीच्यातशी पोचणं अवघड असलं तरी तो भाषांतरकाराच्या निवडीचा अधिकार म्हणून मान्य करू. पण भागवतांच्या वाक्यरचनेतून थोरोची ही मांडणी समोर येतेय का? घरातून मिळणारी भौतिक ऊब आणि नात्यांची ऊब, हा भाग तर भागवतांनी पूर्ण संपवून टाकला, तसंच त्यात मूळ आशयात नसलेली 'भाषेची ऊब' घुसवली. भाषेच्या मुद्द्याचा काहीही संबंध या परिच्छेदाशी किंवा पुढे-मागे आलेल्या परिच्छेदांशी नाही.
इंग्रजी-मराठी शब्दांची गचाळ गुंतवळ
![]() |
| 'वॉल्डन'च्या पहिल्या आवृत्तीचं शीर्षकपान |
उदाहरणार्थ, काही ठिकाणी भागवतांनी मराठी शब्दांसोबत इंग्रजी शब्द मुख्य मजकुरातच 'किंवा' आणि 'ऊर्फ' अशी जोड टाकून, किंवा कधी नुसता स्वल्पविराम टाकून दिलेले आहेत. परिभाषेबाबत काही वेळा असं करावं लागतं. उदाहरणार्थ, निम्नस्तरीय (subaltern), किंवा विरोधविकासवाद (dialectics). एखादी संकल्पना मराठीत रुळली नाहीये, किंवा नुसत्या मराठी शब्दातून संदर्भ बहुधा स्पष्ट होणार नाही, तर इंग्रजी शब्दही कंसात राहू दे, असा सावधपणा त्यामागे असतो. भागवत मात्र अगदी साध्या शब्दांसाठी सर्रास हे करत सुटतात. काही उदाहरणं- 'लोगॅरिदमची किंवा लघुगणिताची कोष्टके' (पान १७), 'यांकी किंवा अमेरिकन' (पान २३, पान ७६), 'नॉर्थ अमेरिकन ऊर्फ उत्तर अमेरिकन' (पान २८), 'सदर्न स्टेट्स ऊर्फ दक्षिण संस्थानं' (पान २८), 'सायन्स किंवा शास्त्रीय विषय किंवा आर्ट्स ऊर्फ साहित्य विषय' (पान ४१), 'पोलिटिकल एकॉनॉमी, राजकीय अर्थशास्त्र' (पान ४२), 'लोहचुंबकीय टेलिग्राफ किंवा तारायंत्र' (पान ४२), 'एव्हरग्रीन किंवा सदाहिरवी', इतकंच नव्हे तर, 'हॉल' शब्दालाही त्या असं करतात- 'भव्य गृहे, किंवा हॉल' (पान ४६). ही इंग्रजी-मराठी शब्दांची गचाळ गुंतवळ पुरत नाही म्हणूून की काय, काही वेळा त्या एकसारख्या मराठी-मराठी शब्दांचीही गुंतवळ तयार करतात. उदाहरणार्थ, "भाजायचे अर्थात् भाजण्याच्या पात्रांत ठेवूनच भाजून काढायचे," असं एका ठिकाणी लिहितात (पान ५१). इथे मूळ इंग्रजी वाक्य, 'भाजण्यासाठी मातीचं भांडं असावं' अशा आशयाचं आहे, त्याला भागवतांनी भाजून-भाजून करपवून टाकलेलं आहे.
भाषांतरात खचून गेलेले शब्द
पूर्वी मध्य आशिया, पूर्व युरोप, सायबेरिया वगैरेंना जोडून पसरलेल्या विशाल गवताळ प्रदेशासाठी तार्तरी हे नाव प्रचलित होतं. त्याचा उल्लेख वॉल्डनमध्ये 'Tartary steppe' असा येतो. steppeचं भाषांतर गवताळी प्रदेश असं सहज मराठीत शक्य असतानाही भागवतांनी 'तार्तरीच्या स्टेपेचं अफाट ओसाड मैदान' असं विचित्र केलंय. म्हणजे मूळ 'स्टेप' हे विशेषनाम भासावं अशा रीतीने कायम ठेवून पुन्हा अर्धामुर्धा मराठी अर्थ त्याला जोडून ठेवलेला आहे (पान ७२). पुढे एकदा तर, "रेल्वेमार्ग बांधले गेले नाहीत तर आपण वेळेत स्वर्गापर्यंत पोचणार कसं?" असा उपहासात्मक प्रश्न थोरो लिहितो, तेव्हा भागवत "रेल्वेमार्ग नसते तर आपण हेवनला योग्य काळी कसं पोचणार?" असं करतात (पान ७६). इथे 'हेवन' आणि 'स्वर्ग' या संकल्पनांमधल्या फरकावर किंवा ख्रिस्ती नि हिंदू धर्मविचारातल्या तफावतीवर खल करण्यात अर्थ नाही. इतर कित्येक ठिकाणी भागवतांनी नको तिथेही हास्यास्पद मराठीकरण केलेलं आहे. आंघोळीच्या टबाचं त्यांना 'स्नानाचं पिंप' करावं वाटतं! (पान ७२) तिथे 'टब' चालत नाही, पण 'हेवन' मात्र तसाच मराठीत येतो!
अशी शब्दांची किंवा वाक्यांशांची कित्येक उदाहरणं आहेत. रेल्वेरुळांखाली आताआतापर्यंत लाकडी पट्ट्या टाकायचे, आता काँक्रिटच्या पट्ट्या टाकतात. त्यांना 'sleeper' असं म्हटलं जातं. थोरो लिहीत होता तेव्हा त्या भागामध्ये नुकतीच रेल्वे सुरू झालेली. त्याबद्दल त्याने बरीच टीकाटिप्पणी केली आहे. त्याचं म्हणणं असं की, काही माणसांना रेल्वेगाडीतून निवांत प्रवास करायला मिळतो तर अनेक लोकांना मात्र रुळांखालचे 'स्लीपर' व्हावं लागतं, चिरडून घ्यावं लागतं. तिथे भागवतांनी 'स्लीपर' या शब्दाचं 'पट्टीचे झोपाळू गडी', 'निद्रावस्थेत चालणारा माणूस' असं दिशाभूल करणारं भाषांतर केलेलं आहे (पान ७६). त्यासंबंधीच्या वाक्यांना तर त्यामुळे काही अर्थच उरत नाही. शरीराच्या अवयवांवरचं नियंत्रण सुटतं नि मान हलत राहाते, कंप सुटल्यासारखे हात हलतात, त्या कंपवाताच्या आजाराला 'Saint Vitus' dance' असा इंग्रजीतला शब्दप्रयोग आहे. आपण एका ठिकाणी डोकं / विचार स्थिर ठेवू शकत नाही, याबद्दल बोलताना थोरो या आजाराचा उल्लेख करतो. त्या वेळी भागवत लिहितात : "आम्ही रोग बरा व्हावा म्हणून सेंट व्हिटसपुढे नवसाचा नाच नाचतो आणि आमची डोकी त्यामुळे क्वचितच स्थिर असतात." (पान ७६). कुठलाही संदर्भ शोधला किंवा कुठलाही अर्थ लावला, तरी या वाक्याला आधार सापडणार नाही (सेंट व्हिटस / व्हायटस याच्या मूर्तीसमोर नाचलं तर हा कंपवात बरा होईल, अशी श्रद्धा होती). भागवतांनी या भाषांतरावेळी प्राथमिक पातळीवरही डिक्शनरी वापरली नसेल का, अशी शंका येते.
पूर्ण निरर्थक शब्द नि वाक्यं
आधी म्हटल्याप्रमाणे दूरचा प्रदेश, दूरचा काळ, यामुळे भाषावापरात फरक पडतो. पण या काळाच्या किंवा प्रदेशाच्या अंतराचा परिणाम न झालेल्या शब्दांनाही भागवतांनी निरर्थक करून टाकलंय.
थोरोने पहिल्या प्रकरणाच्या शेवटाकडे दानधर्म, परोपकार, इत्यादी गोष्टींवर टीका केली आहे. जगाला सुधारायला जाण्याआधी स्वतःला सुधारावं, असं साधारण तो सुचवतो. त्यात एक साधंसं वाक्य आहे- "If I were to preach at all in this strain, I should say rather, Set about being good." याचं साध्या मराठीत इतपत होऊ शकेल : "अशाच सुरात काही उपदेश करायचा झालाच तर मी इतकंच म्हणेन की, भला माणूस होण्यासाठी प्रयत्न सुरू करावा." किंवा आणखी काही वेगळं करता येईल. पण भागवत असं करतात: "मलासुद्धा जर अशाच सुरांत उपदेश करायचा असता, तर मी म्हटले असते, 'तू चांगला होण्यासाठीच बाहेर पड; मावळण्यासाठीच बाहेर पड कसा." (पान ५९). यात 'set about'चा शब्दशः अर्थही 'मावळणं' असा होत नाही. याच्या लगेच पुढच्या वाक्यांमध्ये थोरोने सूर्याचं रूपक माणसाचं आंतरिक तेज वाढवण्यासंदर्भात वापरलेलं आहे. पण भागवत आधीच ते तेज मावळवून टाकतात!
याच प्रकरणात पुढे एकदा 'set about' येतं, तेव्हा 'सज्ज व्हा' असं भाषांतर त्या करतात. ते शब्दशः चुकीचं नाही, पण तिथेही एकंदर वाक्य निरर्थकच होऊन जातं. इंग्रजी वाक्य असं आहे : "Rescue the drowning and tie your shoe-strings. Take your time, and set about some free labor." इथे काळ-प्रदेश यांमुळे बदललेल्या भाषावापराचा ठळक दाखला मिळतो. पण एकंदर परिच्छेदाची धाटणी लक्षात घेऊन, अधिक शोधाशोध करून आपण ही वाक्यं आजच्या मराठीत अशी करू शकतो : "कोणी बुडत असेल तर त्या माणसाला जरूर वाचवा, पण त्याचसोबत आपण स्वतःच्या बुटांची नाडी धड बांधतोय ना याचीही खात्री करा. विचार करायला पुरेसा वेळ घ्या, आणि मग स्वतःच्या स्वतंत्र वाटेवरून जाणारं काही काम सुरू करा." भागवत काय करतात पाहा : "बुडत्याला वाचवा आणि आपले बुटाचे बंद बांधा. आपल्या वेतनाबद्दल जागरूक राहा आणि मोफत श्रमांसाठी सज्ज व्हा."
यात वेतन कुठून आलं? मोफत श्रमांसाठी सज्ज राहण्याचा इथे काय संबंध आहे? स्वतःचं स्वतः वाचून तरी त्यांना हे कळलं असेल का? इंग्रजी वाक्यात 'free labour' शब्दप्रयोग आल्यामुळे आपण गोंधळू शकतो. पण भागवत गोंधळेलेल्या नाहीत, त्यांनी शब्दाला शब्द लावून भाषांतर करून टाकलं. गोंधळलेला माणूस अख्खा परिच्छेद परत वाचेल, त्याचा संदर्भ समजून घेईल, त्या काळच्या भाषेचा नि थोरोच्या भाषावापराचा अंदाज बांधू पाहील. हे कष्टाचे उपाय भाषांतरकाराला करावे लागतात. दुर्गा भागवतांनी हे केलं असेल का?
![]() |
| होडी : बिंब आणि प्रतिबिंब (रेखाटन : थोरो, १८५४) स्त्रोत : नॉर्थइस्टर्न युनिव्हर्सिटी / हेन्री डेव्हिड थोरो'ज् जर्नल ड्रॉइंग्ज |
अमेरिकेतील मूळच्या इंडियन आदिवासी लोकांना त्यांचे शत्रू जाळायचे. पण त्या छळाने या लोकांना वेदना कशा होत नाहीत, हे पाहून तिथे 'येशूचा संदेश' पोचवायला गेलेल्या जेसुआइट ख्रिस्ती धर्मप्रसारकांना आश्चर्य वाटलं. हा एक दाखला देऊन थोरो दानधर्मासंदर्भातला स्वतःचा मुद्दा पटवू पाहतो. मुळातच वेदना नि दुःख याबद्दल वेगळ्या धारणा राखणाऱ्या या आदिवासी लोकांना ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या सांत्वनाची गरजच नसायची. "दुसरे लोक त्यांच्याशी कसे वागतायंत याने आदिवासींना काहीच फरक पडत नव्हता, ते शत्रूवरही निराळ्याच तऱ्हेने प्रेम करत असत आणि शत्रूच्या सर्व क्रूर कृत्यांनंतरही त्यांना हे लोक मनापासून माफ करून टाकत. त्यामुळे ‘दुसऱ्यांनी आपल्याशी जसं वागावंसं आपल्याला वाटतं, तसंच आपण त्यांच्याशी वागावं’, असले [बायबलमधील] सल्ले त्यांच्या लेखी निरुपयोगी होते," असं थोरो म्हणतो. इंग्रजी वाक्यं अशी : "the law to do as you would be done by fell with less persuasiveness on the ears of those, who, for their part, did not care how they were done by, who loved their enemies after a new fashion, and came very near freely forgiving them all they did." हे वाचून प्रत्येक माणसाला बायबलच आठवेल असं नाही. तरी, शब्दरचनेवरून काही अंदाज बांधता येऊ शकतात. विशेषतः दुर्गा भागवत तर स्वतः धर्म-संस्कृती इत्यादींच्या अभ्यासक मानल्या जात होत्या. पण त्या इथे कसं भाषांतर करतात पाहा : "... हम करे सो कायदा, त्या इंडियनांच्या कानी मिनतवारी करूनसुद्धा पुरता पोचू शकला नाही; कारण आपले काय होईल याची फिकीरच मुळी त्यांनी कधी केली नाही. त्यांनी आपल्या शत्रूंवरही आपल्या पद्धतीने प्रेम केले; आणि त्यांनी जे काही केले, त्याबद्दल शत्रूंना क्षमा करण्यापर्यंत मजल गाठली" (पान ६१).
The law to do as you would be done- याचं 'हम करे सो कायदा', असं पूर्णपणे संदर्भहीन भाषांतर भागवतांनी केलं, इतकंच नव्हे तर हा संदेश 'मिनतवाऱ्या करूनसुद्धा' इंडियनांपर्यंत पोचू शकला नाही, असंही ठोकून दिलं. त्याहून भयंकर म्हणजे या परिच्छेदाच्या सुरुवातीला इंडियनांना जळताना 'पाहणारे' जेसुआइट मिशनरी आहेत, पण भागवतांनी "जेसुइटांनी ज्या इंडियनांना खांबाला बांधून जिवंत जाळले" अशी सुरुवात केलेय. म्हणजे आधी इंडियनांना जाळून मग त्यांचं (म्हणजे त्यांच्या जळलेल्या देहांचं?) सांत्वन करायला जाळणारेच लोक गेले आणि त्यांनी 'हम करे सो कायदा' हा संदेश मिनतवाऱ्या करून दिला, असल्या मजकुराचा स्वतंत्रपणे तरी काही अर्थ लागतो का!
आत्तापर्यंतच्या उदाहरणांमध्ये फक्त भाषा निरर्थक ठरली. पण काही ठिकाणी तर प्रत्यक्ष भौतिक पातळीवरच्या व्यवहारांनाही निरर्थक ठरवणारी वाक्यं भागवतांनी लिहिली आहेत. राहत्या घरापेक्षा वरवरच्या संपन्नतेला आपण जास्त भाव देतो, याबद्दल नाराजी व्यक्त करताना थोरोने शेतकऱ्याचं घर नि गोठा याबद्दलचं उदाहरण दिलंय. तो लिहितो : "Though we have many substantial houses of brick or stone, the prosperity of the farmer is still measured by the degree to which the barn overshadows the house." इथे काही भाषेचा गोंधळ होण्यासारखं नाही. मराठीत हे साधारणपणे असं सहज करता येतं : "आपल्याकडे दगडा-विटांची अनेक दणकट घरं असली तरी, शेतकऱ्याची सुबत्ता अजूनही त्याच्या घरापेक्षा त्याचा गोठा वा तबेला किती मोठा आहे यावरून मोजली जाते."
पण भागवतांचं भाषांतर असं आहे : "जरी आपल्याजवळ दगडविटांची पुष्कळ घरे असली तरीही शेतकऱ्याच्या सुबत्तेची मोजदाद त्याच्या कोठाराची किंवा मागरघराची सावली त्याच्या घरावर कितपत पडते यावर अवलंबून असते" (पान ४६). इथे overshadowsचा इतका शब्दशः अर्थ घेतलाय की गोठ्याची घरावर 'सावली पडतेय'. भाषांतराचा मुद्दा सोडून दिला तरीसुद्धा हे हास्यास्पद ठरतं. घरापेक्षा गोठा मोठा असला तरी त्याचा मोठेपणा आडव्या विस्ताराचा असणंच व्यावहारिक आहे. कोणी गुरं ठेवायला बहुमजली गोठा बांधेल का? तसं नसेल तर घरावर त्याची प्रत्यक्ष सावली पडण्याची शक्यता किती? मुद्दाम ठरवून बांधला तरच घरावर सावली पाडणारा गोठा किंवा तबेला बांधला जाईल.
सगळ्या गोष्टींकडे फक्त आर्थिक मिळकतीची साधनं म्हणून पाहायला नको, असं थोरोला वाटतं. त्या संदर्भात तो शेताच्या आवारात राहून गेलेला कवी आणि शेतमालक यांचं उदाहरण देतो. कवी शेतातून फक्त काही सफरचंद घेऊन गेला असेल असं शेतमालकाला वाटतं, पण प्रत्यक्षात कवीने ते शेतच स्वतःच्या कवितांच्या रूपात सोबत नेलेलं असतं, वगैरे तो लिहितो. त्यात तो दुधाचं रूपक वापरून म्हणतो की, "कवी शेतातलं दूध काढतो, त्या दुधातून साय काढतो. ही सगळी साय कवीला मिळते. शेतमालकाला मात्र साय नसलेलं सत्त्वहीन दूध तेवढं मिळतं." इथे आता इंग्रजी वाक्य देत नाही. ते न देताही भागवतांच्या भाषांतरातला निरर्थकपणा, उथळपणा कळेल. भागवत लिहितात : "त्याने त्याला [शेताला] दोहले आहे. मंथले आहे. त्याची सारी मलई काढून घेतलेली आहे आणि शेतकऱ्याला फक्त घुसळून उरलेले निःसत्त्व दूध बाकी ठेवले आहे."
![]() |
| दुर्गा भागवत ('खमंग' पुस्तकाचं मलपृष्ठ, पॉप्युलर प्रकाशन) |
'दोहणं' म्हणजे गायीचं दूध काढणं. ठीक आहे. पण साय किंवा मलई काढायला दूध मंथावं किंवा घुसळावं लागत नाही, तर तापवावं लागतं. किंवा अगदी थंड हवेच्या प्रदेशात न तापवता साय मिळवली, तरीही त्यात घुसळण्याचा काही संबंध नसतो. मग भागवतांनी ते इथे का घुसळलं? 'मंथलं' वगैरे तर विनाकारण उड्या! आणि त्यांना पाककलेतही रुची होती, त्यावर त्यांचं 'खमंग' हे पुस्तक आत्ताही बाजारात मिळतं! तरीही, इथे त्या फक्त भाषाच नव्हे तर दूध नि साय हा साधा समोर दिसणारा भौतिक व्यवहारही निरर्थक करून टाकतात.
भाषांतरकाराला समोरच्या संहितेत उल्लेख येणाऱ्या प्रत्येक विषयाची माहिती असणं अर्थातच शक्य नाही. पण शंका तर पडायला हवी, शंका पडल्यावर त्याबद्दलचा शोध तर घ्यायला हवा. भागवतांनी ते तर केलेलं नाहीच, पण त्यांच्या अभ्यासाचे विषय मानले जातात अशा बाबतही बरीच ठोकंपंची केली.
थोरोने अनेक ठिकाणी इतर संस्कृतींमधल्या संहितांचे संदर्भ वापरलेले आहेत. उदाहरणार्थ, “पक्ष्यांशिवायचं घर म्हणजे मीठमसाला नसलेलं अन्न,” असं ‘हरिवंश’ या [प्राचीन हिंदू] संहितेत म्हटल्याचा दाखला तो स्वतःच्या वॉल्डनकाठच्या घराबद्दल बोलताना देतो. भागवतांनी हे वाक्य असं केलंय : "हरिवंश म्हणतो की पक्ष्याशिवाय असलेला आवास म्हणजे मसाल्याशिवायचे अन्न आहे."
'महाभारत' म्हणतो, 'रामायण' म्हणतो, किंवा 'बायबल', 'कुराण' कोणतीही संहिता वा ग्रंथ स्वतः 'म्हणतो', ही शब्दयोजना मराठीत तितकीशी स्वाभाविक नाही (लिंगानुसार काही वेळा 'गीता म्हणते', 'रामायण म्हणतं' वगैरे करतात, ते वेगळं). भागवतांनी 'Harivansa says' याचं साचेबद्ध मराठीकरण केलं. पण असे आक्षेप या लेखात टाळलेत, कारण हे तितकंसं मूलभूत नाही, आणि थोडा व्यक्तिसापेक्ष निवडीचाही प्रश्न असतो. पण इथे आणखी गंभीर शंका येते, त्याचं कारण दोन पानांनंतर सापडतं. 'हरिवंश' ही हरी म्हणजे कृष्णाच्या वंशाशी संबंधित संहिता असल्याचं नावातूनच स्पष्ट आहे, बाकी तपशील इथे बोलायला नको. ही संहिता 'वॉल्डन'च्या मराठी भाषांतरकाराने वाचलेली असेलच, असं नाही. पण आता थोरोने उघडच संहितेचं नाव लिहिल्यावर तरी आपल्याला ते कळतं. मग दोनच पानं पुढे पुन्हा या संहितेतलं अवतरण थोरोने दिलेलं आहे, पण त्यात 'हरिवंश' असा उल्लेख नाही. तिथलं इंग्रजी वाक्य असं : "'There are none happy in the world but beings who enjoy freely a vast horizon,' said Damodara, when his herds required new and larger pastures."
संस्कृत येत नसलं तरी, किमान खुणा तर ओळखता येऊ शकतात. इथे दामोदराच्या कळपांचा उल्लेख आलाय, त्यावरून हा 'दामोदर' म्हणजे गुराखी असल्याचं कळतं, आणि तो कृष्ण असेल का, अशी शंका मनात आल्यावर आपण शोधाशोध करू- इंटरनेटवर ही शोधाशोध केल्यावर हा संदर्भ 'हरिवंशा'तला असल्याचं आपल्याला कळेल. भागवतांनी मात्र या दुसऱ्या उल्लेखावेळी पूर्णपणे वेगळ्याच वंशावळीतला दामोदर उभा केला. त्यांचं भयंकर भाषांतर असं : "जेव्हा त्यांच्या [भटक्या मानवसमूहांच्या] कळपांना नवनवी आणि अधिकाधिक विस्तृत गायराने चरण्यासाठी लागत तेव्हा दामोदराने (अकराव्या शतकातील संस्कृत कवीने) वर्णन केलेल्या स्थितीचा प्रत्यय येणे स्वाभाविकच होते. तो म्हणतो की, "ज्या जीवांना अफाट विस्तारलेल्या क्षितिजांत रमता येते, त्यांच्यासारखे सुखी या जगात अन्य कुणीही नाही" (पान ७२; इंग्रजी मजकुरात या वाक्याआधी भटक्या समूहांचा उल्लेख आहे, त्याला जोडून पुढे हरिवंशातलं अवतरण येतं, हे कळण्यापुरतं वरती चौकोनी कंस टाकलाय).
इथे तर वाचकांची पूर्ण फसवणूक आहे. दामोदर मिश्र हा अकराव्या शतकातला कवी माळव्यातील भोज राजाच्या दरबारात होता, त्याची 'हनुमान नाटक' ही संहिता प्रसिद्ध आहे (संदर्भ : एक आणि दोन). तो गुराखी नव्हता, किंवा त्याने हे कुरणं-गुरं याबद्दल काही म्हटलेलंही नाही. हे कळण्यासाठी संस्कृत येण्याची गरज नाही. ही ओळ नक्की कशातली आहे हे इंटरनेटमुळे तुलनेने अधिक वेगात कळू शकतं, हेही खरं. संस्कृत येत असलेल्यांनासुद्धा अशी एखादीच ओळ इंग्रजी भाषांतरात समोर आल्यावर ती अचूकपणे कोणत्या संहितेतली आहे हे लक्षात येईलच असं नाही (इथे तर थोरो संस्कृत संहितेच्या फ्रेंच भाषांतराचं इंग्रजीकरण करून देतोय). शोध कुठे घ्यावा हे संस्कृत येणाऱ्याला कदाचित लवकर कळू शकेल. इंटरनेटमुळे या शोधाचा फक्त वेग थोडासा वाढतो (वेगामुळे गफलतीची शक्यताही वाढते). हा शोध अभ्यासकांना विचारून, कोश चाळूनही घेता येतो. इथे तर दामोदर गुराखी असल्याचं खुद्द इंग्रजी संहितेतच धडधडीतपणे म्हटलेलं आहे. कृष्णाशी संबंधित स्पष्ट खूण आहे. पण संस्कृतच्या विदुषी मानल्या जाणाऱ्या भागवत काय करतात, तर ती खूण तोडूनमोडून टाकतात. इतकंच नव्हे तर कृष्णाऐवजी अकराव्या शतकातल्या दामोदर मिश्र कवी तिथे बसवतात आणि त्याच्या तोंडी बेढब वाक्य कोंबतात. यावर खरं म्हणजे टीका तरी काय करणार!
भागवतांनी केलंय ते भाषांतर अत्यंत कमअस्सल स्तरावरच्या 'एआय टूल'सारखं आहे. विविध भाषांमध्ये पसरलेला प्रचंड 'डेटा' आर्टिफिशिअल इंटेलिजन्सला उपलब्ध असतो. पण संगती लावताना, ती मराठीसारख्या (स्थानिक!) भाषेत मांडताना त्याला तांत्रिक भाषेत 'भ्रम' (hallucination) होण्याची शक्यता सतत असते. मग तो इकडचा दामोदर तिकडे टाकू शकतो, शब्दाला शब्द जोडूनच विचार करू शकतो, साचा ओळखून धावू पाहतो, असं थोडं त्याचं होतं. सध्यातरी. पुढे तोही आणखी 'विकास' पावत जाईल तिथे जाईल. भागवतांच्या काळात 'एआय' नव्हतं, पण त्यांनी अत्यंत वाईट अर्थाने काळाच्या पुढे जाणारं, 'एआय'चा खराब वापर केल्यावर होतं तसं, भाषांतर केलं! 'एआय'ला नीट प्रश्न विचारला तर तो दोन दामोदरांमधला भेद सांगू शकतो आणि आणखीही उपयुक्त संदर्भ देऊ शकतो. पण प्रश्न विचारायला हवा हे माणसाला वाटायला लागतं, तो कसा विचारायचा हे समजावं लागतं, माणसाने स्वतंत्रपणेही वाचन करावं लागतं, आणि मग त्याचं उत्तर आणखी चार ठिकाणांवरून तपासावं लागतं. शिवाय, 'एआय'च सगळं करेल असा आपला भ्रम होणार नाही याची काळजीही घ्यायला लागते. थोडक्यात, एक साधन म्हणून त्याचे काही उपयोग होऊ शकतात. पण भ्रमात राहून सगळंच त्याच्या माथी मारलं तर मग ते वरच्या भागवतांच्या परिच्छेदासारखं होऊ शकतं. हा गलथान भ्रम व्हायला 'एआय'चीच गरज आहे असं नाही, तर अनेक संदर्भसाधनांनी संपन्न ग्रंथालयात बसणारा, अनेक भाषा येणारा माणूससुद्धा हे करू शकतो, याची खेदजनक खात्री 'वॉल्डनकाठी विचारविहार' वाचल्यावर पटते.
मजकूर गाळून लावलेली विल्हेवाट
भाषांतर करताना काही गोष्टी वगळाव्या वाटल्या, तर तसं पुस्तकात सुरुवातीला कुठेतरी नोंदवून करायलाही हरकत नाही. भागवतांनी असं गाळल्याबद्दलची काही सूचना पुस्तकात नोंदवलेली नाही, पण अधूनमधून काही वाक्यं नि परिच्छेद त्या गाळत गेलेल्या आहेत. यातही एखादं वाक्य, किंवा कधी एखादा परिच्छेद अनावधानाने निसटू शकतो. किंवा एखाद्-दोन ठिकाणीच असं करावं वाटल्यामुळे त्याची वेगळी नोंद केली न जाण्याचीही शक्यता असते. पण भागवतांनी या पुस्तकात अनेक ठिकाणी हे केलेलं आहे, आणि त्यातून पूर्ण पुस्तकाची विल्हेवाट लावली आहे.
'वॉल्डन'चं पहिलं प्रकरण सर्वांत मोठं (सुमारे ८० पानं) आहे आणि ते पुस्तकातल्या कथनाची पायाभरणी करतं. या प्रकरणाच्या शेवटी थोरोने फार्सी कवी सादी शिराझी याच्या 'गुलिस्ताँ' या काव्यग्रंथातल्या काही ओळी गद्यरूपात दिलेल्या आहेत (त्या त्याने अर्थातच इंग्रजी किंवा फ्रेंच भाषांतरातून वाचल्या). हे प्रकरण सादीच्या ओळींनी संपतं. सुमारे दीडशे शब्दांचा हा पूर्ण उतारा भागवतांनी गाळला, त्यामुळे त्यांच्या भाषांतरात मात्र हे प्रकरण आधीच्या परिच्छेदासोबत संपतं. त्या आधीच्या परिच्छेदातली शेवटची वाक्यं इंग्रजीत अशी आहेत : "Do not stay to be an overseer of the poor, but endeavor to become one of the worthies of the world." भागवत याचं भाषांतर असं करतात : "गोरगरिबांचे केवळ निरीक्षक किंवा पर्यवेक्षक होऊन राहू नका. जगातल्या मान्यवरांपैकी एक आपण बनावे म्हणून झटा." इथे 'worthies of the world'चा अर्थ 'जगातील मान्यवर' असा लावणं म्हणजे थोरोच्या आरवणाऱ्या कोंबड्याला मारून टाकून त्याच्यात भुसा भरून मग आणखी रंगीबेरंगी पिसं जोडून वेगळाच बेढब पक्षी एशियाटिक लायब्ररीतल्या वरून काचा असणाऱ्या छान लाकडी कपटात ठेवण्यासारखं आहे.
"गरीबांवर देखरेख करणारा मुकादम व्हायला जाऊ नका, त्यापेक्षा या जगासमोर मोलाच्या जगण्याचा दाखला उभा राहील यासाठी प्रयत्न केलेला बरा"- असं किंवा आणखी कसंही या वाक्याचं भाषांतर करता येईल. भागवतांनी गाळलेल्या सादीच्या उताऱ्यातली, म्हणजेच थोरोने प्रकरण संपवण्यासाठी वापरलेली ओळ काय आहे, ते पाहिलं की कोंबड्याचा खून झाल्याबद्दल खात्रीच पटेल. ती ओळ मराठीत अशी आहे : "तुमच्याकडे मुबलक संपत्ती असेल तर खजुराच्या झाडासारखे उदार व्हा. पण तुमच्याकडे असं देण्यासारखं काही नसेल तर सुरूच्या झाडासारखे आझाद व्हा, स्वतंत्र माणूस व्हा."
जगणं मोलाचं व्हायला हवं, स्वतंत्र व्हा, बाकी जगाची मान्यता गेली खड्ड्यात- हे कुठे आणि 'जगातील मान्यवरांपैकी एक बनण्यासाठी झटा' हे कुठे!
'वॉल्डनकाठी विचारविहार' या पुस्तकाची दुसरी आवृत्ती २०२१ साली आली. ती मीना वैशंपायन यांनी संपादित केली. वैशंपायन यांनी भागवतांच्या साहित्यावर पीएच.डी. केलेय, त्या स्वतः एशियाटिक लायब्ररीच्या मानद उपाध्यक्ष होत्या. दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत वैशंपायन म्हणतात : "अनेक ठिकाणी बाईंनी त्या, त्या मूळ शब्दाची अर्थच्छटा जाणून घेत योग्य शब्दांचा वापर केला आहे. शिवाय कितीतरी शब्द बोलीभाषेतील किंवा ग्रामीण लोकांच्या वापरात असणारे वापरलेले आहेत." यावर काय बोलणार! 'मूळ शब्दाची अर्थच्छटा जाणून' दुर्गाबाईंनी भाषांतर केलंय, असं वाटल्यावर संपादन काय केलं असेल! या पुस्तकात कुठल्या ग्रामीण लोकांची भाषा वापरलेय, ते संपादिकेलाच माहीत! 'पहाटे अगदी लवकर' असा उल्लेख असेल तिथे भागवतांनी 'पंच पंच उषःकाली' असं लिहिलंय, बाकी 'दोहले, मंथले' हे वर दिलंच; गोठ्याची घरावर सावली पडू शकते, ही यांची ग्रामीण प्रतिमा! अशी किती उदाहरणं नोंदवायची. शिवाय, इथे फक्त पहिल्या शंभर पानांमधलीच प्रातिनिधिक उदाहरणं दिली आहेत. हे पुढे आणखी दोनशे-सव्वादोनशे पानं सुरू राहातं.
तरी 'वॉल्डनकाठी विचारविहार'ची आधीची आवृत्तीही खपली, आताची नवीन आवृत्तीही खपतच आलेय. त्यातून शेवटी सगळे मान्यवर होऊन राहिले- लेखक, भाषांतरकार, संपादक, प्रकाशक आणि अर्थातच 'सुजाण' मराठी वाचकही!
फक्त इतरांना जाग आणण्यासाठी आरवायचं का?
![]() |
| दुर्गा भागवत |
आता जरा भाषांतरित संहितेबाहेर येऊन भाषांतराच्या काळाकडे पाहून थांबू. दुर्गाबाईंचं भाषांतर १९६५ साली प्रकाशित झालं. मराठी अनियतकालिकांची चळवळ तेव्हा जोमात होती. त्याच्या दोन वर्षं आधी, १९६३मध्ये अशोक शहाणे यांनी 'आजकालच्या मराठी साहित्यावर 'क्ष' किरण' हा लेख लिहून दाणादाण उडवली. १९६८ साली भालचंद्र नेमाडे यांचा 'हल्ली लेखकाचा लेखकराव होतो तो का?' हा तसाच जहाल लेख प्रसिद्ध होऊन गाजला. शहाणे, नेमाडे, असे लोक, किंवा दुसरीकडे 'नवी क्षितिजे'सारखं वैचारिक नियतकालिक काढलेले विश्वास पाटील, नाना जोशी किंवा थोडं नंतरच्या पिढीतले (कालांतराने दलित पँथरचे सहसंस्थापक झालेले) राजा ढाले, इत्यादी मंडळी एशियाटिक लायब्ररीत येऊन-जाऊन-बसून असायची. दुर्गाबाईंसकट यातल्या अनेकांनी मराठी साहित्यातल्या अनेकांवर वेळोवेळी जहाल टीका केली. ढाल्यांनी 'चिमणे, चिमणे! दार उघड!' या १९६८ सालच्या नर्मविनोदी ढंगातल्या लेखात साठीच्या जवळ आलेल्या दुर्गाबाईंचं वर्णन 'अँग्री यंग वूमन' असं केलं होतं (पुढे चार-पाच वर्षांतच ढाल्यांच्या जहाल विधानांनी मात्र दुर्गाबाई दुखावल्या!) एका अर्थी ही मंडळी म्हणजे तेव्हाचे आरवणारे कोंबडेच होती. पण एकमेकांना जाग आणण्यासाठी ते फारसे आरवले नाहीत, हेही खरं आहे.
'वॉल्डनकाठी विचारविहार'सारखं पुस्तक या वर्तुळाबाहेरच्या कुणी लिहिलं असतं आणि चुकून ते या मंडळींच्या वाचनात आलं असतं, तर त्या काळात त्यांनी पुस्तकासोबत संबंधित लेखक-व्यक्तीलाही रद्दीत जमा केलं असतं. पण दुर्गा भागवतांबाबत असं झालं नाही. कालांतराने राजा ढाले आणि दुर्गा भागवत यांचे काही विधानांवरून वाद झाले, पण ते दुर्गाबाईंच्या मुख्य कामाशी संबंधित नव्हतं, त्यामुळे त्यांच्या विदुषीपणाच्या नावलौकिकावर त्यातून ओरखडा उमटला नाही. दुर्गाबाईंनी मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून इरावती कर्व्यांपर्यंत काही लोकांच्या विद्वत्तेवर शंका घेणारी शेरेबाजी केली. त्यात तथ्यांना धरून टीका नव्हती. 'वॉल्डनकाठी विचारविहार'बद्दलचे मुद्दे खुद्द भागवतांच्या विद्वत्तेविषयी गंभीर शंका निर्माण होतील, असे आहेत. दुर्गाबाईंच्या इतर काही बाबतीतल्या कामाचं महत्त्व मान्य करूनही या शंका मांडायला नि मान्य करायला हरकत नाही. नाहीतर, 'मान्यवर' बुजगावण्यांपुढेच झुकत बसल्यासारखं होईल.
०
काही जुन्या नोंदी :








दुर्गा भागवतांनी बाणभट्टाच्या 'कादंबरी'चं भाषांतर केलं आणि त्याच्या रसास्वादाचं 'रसमयी' हे पुस्तक लिहिलं. या दोन्हींचा लेखाजोखा लीला अर्जुनवाडकर यांनी 'साधना' साप्ताहिकाच्या ९ मार्च १९८९ रोजीच्या अंकात घेतला होता- 'अरे रे, बाणभट्ट खर्ची पडला!'
उत्तर द्याहटवाhttps://weeklysadhana.in/view_article/lila-arjunnvadkar-on-banabhatta-and-durga-bhagwat
इथल्या प्रतिक्रियेच्या शब्दमर्यादेमुळे पाच भागांंमध्ये हा लेख देतो आहे.
- भाग १ -
महाकवी बाणभट्ट हा अभिजात संस्कृत साहित्यातला मानाचा विडा मिळवणारा मोठा तोलामोलाचा मानकरी. त्याची 'कादंबरी' ही संस्कृतातली एक अतिशय भव्य आणि अद्भुतसुंदर कृती. अक्षरशः एकमेवाद्वितीय. कादंबरी म्हणजे बाणाची प्रतिभा, वाक्यप्रभुत्व, कल्पनासौंदर्य, पारंपरिक पांडित्य या सार्यांचे एक विलक्षण लोभसवाणे रसायन! म्हणून तर अधिक प्रगल्भता, प्रौढता मिळवण्यासाठी स्वतः वाग्देवतेने बाणभट्टाचे रूप घेतले अशी परंपरा निर्माण झाली. ‘प्रागल्भ्यमधिकमाप्तुं वाणी बाणो बभूवेति।’
पारंपरिक संस्कृत अभ्यासाच्या पठडीत एकंदरीने संस्कृत गद्याला व विशेषतः कादंबरीला काय स्थान मिळालेले असेल ते असो, विद्यापीठीय अभ्यासक्रमाच्या चाकोरीत मात्र तिचे स्थान नेहमीच काहीसे गौण व दुर्लक्षित जरी नाही तरी अल्पलक्षित असेच राहिले. त्यामुळे कादंबरीतले, त्यातही मुख्यतः तिच्या पूर्व भागातले, प्रायः तेच तेच वेचे अभ्यासासाठी नेमले गेले. धौलीच्या गुहेतून बाहेर पडणार्या ‘गजतमा’च्या शिल्पाप्रमाणे कादंबरी त्याच त्याच कोनांमधून दिसत राहिली. अवशिष्ट कादंबरीकडे व कादंबरीच्या संपूर्ण स्वरूपाकडे कोणी फारसे लक्षच दिले नाही. साहजिकच संपूर्ण कालिदासीय वाङ्मयाची जशी अनेकदा भाषांतरे झाली, तशी कादंबरीची झाली नाहीत.
संपूर्ण कादंबरीचे मराठी भाषांतर तर अजूनपर्यंत झालेच नाही. मराठी वाचकांना तिची वानगी पारखी शास्त्री परशुराम तात्या, गुर्जर/गोडबोले, नवरे यांची आंशिक किंवा संक्षिप्त भाषांतरे/कथा तसेच विष्णुशास्त्री चिपळूणकरसारख्यांचे लेख यांतूनच मिळत राहिली. शापसंभ्रम नाटकामुळेही तिचा परिचय अंशतः दृढ झाला पण हे फुटकळ प्रयत्न होते. दुर्गाबाई भागवतांनी संपूर्ण कादंबरीचे, म्हणजे बाणभट्टकृत पूर्वभाग आणि बाणभट्टाचा मुलगा पुलिंद याने रचलेला उत्तरभाग या दोहोंचे मराठीत भाषांतर करून ही फार वर्षांची उणीव दूर केली आहे. प्रस्तावना, शुद्धिपत्र, भाषांतर, अकरा परिशिष्टे, (विषय)सूची, ग्रंथसूची यांनी युक्त असा पहिला खंड जवळपास साडेसातशे पृष्ठांचा आहे. तर ‘रसमयी’ या नावाच्या दुसऱ्या खंडात निवेदन, अनुक्रमणिका, शुद्धिपत्र, रसग्रहणात्मक पूरक अभ्यास, मुळातील काही संस्कृत उद्धरणांचे एक परिशिष्ट व सूची असे विषय आले आहेत. यांत आलेले बहुतेक मुद्दे सूत्ररूपाने प्रस्तावनेमध्ये नोंदवलेले आहेत. एका अर्थाने संपूर्ण लेखकाभ्यास (author study) म्हणावा अशा या द्विखंडात्मक प्रपंचाने जवळजवळ एक हजार पृष्ठे व्यापली आहेत. त्याचे स्वरूप (आणि अर्थात किंमतही 400/- रु.) चांगले घसघशीतच आहे. आतापर्यंतच्या कोणत्याही भाषांतरात/अभ्यासात न आलेले अनेक मुद्दे उद्भवित करून, त्यांची चर्चा करून दुर्गाबाईंनी कादंबरीच्या अभ्यासाच्या विविध दिशा व क्षितिजे अभ्यासकाला खुली करून दिली आहेत. या बाबतीत त्या पुष्कळ प्रमाणात वासुदेवशरणं आग्रवाल ‘शरण’ जरूर आहेत; पण त्यांचे स्वतःचेही मौलिक मुद्दे आहेत आणि मुख्य म्हणजे वासुदेवशरण आग्रवालांची संस्कृत काव्यग्रंथांच्या अध्ययनातली ‘अध्यात्मेकपरता’ दुर्गाबाईंनी पार धुडकावून लावली आहे. (रस. 72)
- भाग २ -
हटवादुर्गाबाईंना मुक्तकंठाने याचे श्रेय द्यायला हवे की, बाणभट्टातील सौंदर्यस्थळांचे त्यांनी मार्मिक व हृद्य विश्लेषण केले आहे. यासाठी रसास्वादक टीका, मंडन तसेच आक्षेप खंडन या दोन्ही उपायांचा त्यांनी वापर केला आहे. बाणभट्टाला वास्तविक जी हक्काने मिळायला हवी, पण जी त्याला फारशी मिळाली नाही, अशी प्रतिष्ठा त्याला मिळवून देण्यासाठी दुर्गाबाईंनी पोटतिडकीने विवेचन केले आहे. त्यातलाही एक खास विशेष असा की, त्यांच्या ‘व्यासपर्वा’त जसा त्यांनी संपूर्ण महाभारताचा केला आहे तसाच येथे संपूर्ण कादंबरीचा परामर्श केला आहे. कधीकधी तर त्यांनी बाणभट्टापेक्षाही पुलिंदाला झुकते माप दिले आहे. यात क्वचित मतभेद संभवला तरी त्याने दुर्गाबाईंच्या कामाचे महत्त्व उणावत नाही. संपूर्ण कादंबरीच्या संदर्भात कथानक, व्यक्तिरेखा, वर्णने यांचे साकल्याने विवेचन आतापर्यंत कोणी केले होते? मात्र एक अगदी निश्चितपणे जाणवते की, बाण कालिदासाला खूप मानीत असला, आपल्या अनेक कल्पना त्याने स्पष्टपणे कालिदासावरून घेतलेल्या असल्या तरी दुर्गाबाई कालिदासाला त्याचे रास्त श्रेय द्यायला नेहमी विसरतात. त्याचे कारण असावे बहुधा त्यांचे लाडके मत हे की, कालिदास म्हणजे संस्कृतातले ना. सी. फडके!
प्रचंडसमासघटित शैली, ओजोगुण या गोष्टींसाठी आधुनिक टीकाकारांनी बाणभट्टाला वारंवार झोडपले आहे. दुर्गाबाईंनी लयबद्धता, श्रुतिमाधुर्य, गंभीरता, या वैशिष्ट्यांच्या व ‘ओजः समासभूयस्त्यमेतद् गद्यस्य जीवितम्’ आणि ‘गद्यं कवीनां निकषं वदन्ति’ या तत्कालीन मान्य निकषांच्या पार्श्वभूमीवर बाणभट्टाच्या शैलीचे सौंदर्य उलगडून दाखवले आहे. ‘आग्लाईनंतर संस्कृत अध्ययनाची झालेली दुर्दशा’ (कादं. प्रस्ता. दहा) आणि ‘आधुनिक भारतीय शिक्षितांचे संस्कृत भाषेचे सुमार ज्ञान’ (कादं. प्रस्ता. सात) ही बाणभट्टाची शैली बोजड वाटण्याची मुख्य कारणे आहेत, असे दुर्गाबाईंचे स्पष्ट मत आहे. शिवाय पिटर्सन, वेबर इत्यादी पाश्चात्य अभ्यासकांच्या मतांचा (नको तितका) पडलेला प्रभाव, परमतपुष्टता, सूक्ष्म दृष्टीचा व चिकित्सेच्या कसबाचा अभाव, दृष्टिग्राह्य वाचन व मुद्रण यांनी मौखिक पाठ व श्रवण यांची घेतलेली जागा याही गोष्टी त्यांच्या मते बाणाचे सौंदर्य न जाणवण्याची मुख्य कारणे आहेत. (हे त्यांचे मत सर्वसाधारणपणे मान्य होण्यासारखे असले, तरी रवींद्रनाथ व दासगुप्त या मार्मिक सहद्वयांना त्यांनी जे धारेवर धरले आहे ते माझ्या माफक आकलन वाचनानुसार अन्याय्य आहे कारण या दोघांची पुष्कळ विधाने फक्त वर्णनात्मक आहेत, आक्षेपगर्भ नाहीत. ‘दुर्बोधता’ हा आक्षेपच होऊ शकत नाही; कारण ‘जगातल्या अनेक उत्कृष्ट कृतीही एका वाचनात समजत नाहीत.’ (कादं. प्रस्ता. दहा; रस. 43) हेही त्यांचे विवेचन पटण्यासारखेच आहे. शिवाय बाणाचे समास प्रदीर्घ व वाक्ये प्रदीर्घतम, पल्लेदार अशी असली तरी त्यांत एक सोपेपणाही असतो. हा सोपेपणा सापडण्याची ढगळ मात्र साध्य करून घेतली पाहिजे. शिवाय निवेदनशैली पालटताना बाण सोपी, छोटी वाक्येही रचतो.
प्रचंड आतषबाजीची, कल्पनाविलासाने नटलेली, ओजस् या अर्थगुणाने युक्त अशी लांबच लांब वर्णने हे बाणाचे वैशिष्ट्य ही आक्षेपकांची दुसरी डोकेदुखी. पण याही वैशिष्ट्याचे सौंदर्य व औचित्य दुर्गाबाईंनी संपूर्ण कादंबरीच्या पृष्ठभूमीवर विवरून सांगितले आहे. ही वर्णने महाकाव्यातल्या सर्गांतीच्या वृत्तभेदाप्रमाणे असतात. बाणाच्या कथाशिल्पाच्या उभारणीत आविष्कार तंत्र म्हणून त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. ती उत्कंठावर्धन करतात. क्षुद्रकाचे व्यक्तिचित्र रेखाटणे हे क्षुद्रकाच्या वर्णनाचे प्रयोजन आहे. अच्छोद सरोवर हे चंद्रापीडाच्या प्रेमविलासाचे, तर शून्याटवी हे त्याच्या मृत्यूचेच प्रतीक आहे. विंध्याटवी वर्णनात तर बाणाची चित्रगाहिणी प्रतिभा, रंगविलोलता यांचे विलक्षण लोभस दर्शन घडते. या वर्णनातील अनेकविध तपशिलामुळे, मानवी भावनांच्या गुंफणीमुळे ते केवळ वन राहत नाही तर महाश्वेता, कादंबरी यांच्याप्रमाणे एक पात्रच बनून जाते, शाकुंतलात तपोवन किंवा उत्तर रामचरितात पंचवटी आहे, तसे आज विसाव्या शतकात राहणार्या आपल्याला हे वर्णन फोल वाटते. कारण अरण्यानुभवच आपल्या लेखी विरळ झाला आहे. या विंध्याटवीत प्रत्यक्ष संचार न करणार्यालाच ते काल्पनिक भारूड वाटते. हा दोष बाणाचा नाही, वाचकाचा आहे. हे विवेचन दुर्गाबाईंनी फार चांगले केले आहे. (कादं. प्रस्ता. अकरा-तेरा) या संदर्भात साहित्याच्या मूल्यांकनाच्या नव्या दिशा साहित्याचे समाजशास्त्र, वाङ्मयीन रुचीचे समाजशास्त्र, पर्यावरणशास्त्र व त्याच्या अनुरोधाने येणारे सुखात्मिका व शोकात्मिका यांचे दुर्गाबाईंनी केलेले विवेचन निदान मराठीत तरी अभिनव आहे. मनापासून वाचणार्याला त्यात अभ्यासाच्या नव्या दिशा निश्चित आढळतील.
- भाग ३ -
हटवाबाणाची संश्लिष्ट व बदलती शैली, रंगच्छटांविषयीचे त्याचे आकर्षण, त्याच्या पात्रनिर्मितीतील सौंदर्य, त्याचे होयसळ-शिल्पाच्या धाटणीचे अलंकृत कथाशिल्प, कथेतील तीन स्तर व तिची नागमोडी घडण (जीत जीवन, मरण, अद्भुताचे भान, मैत्री, प्रेम, विरह, पुनर्जन्म, कर्मविपाक, पुराणकथा, पांडित्य, सौंदर्य, कुरुपता, भव्यता, भीषणता, मनुष्य, प्राणी इत्यादी असंख्य तपशील कौशल्याने गुंतवले आहेत.) पूर्व भाग व उत्तर भाग यांची सांधेजोड कथेची नायिका कादंबरी की महाश्वेता, बाण व अश्लीलता, बाणाचा समन्वयवाद, बाणाचे मौन, बाणाची प्रतिबिंबप्रियता, कादंबरी व हर्षचरित यांची तुलना, बाणाने केलेला मृत्यूचा कलात्मक वापर असे व आणखी किती तरी मुद्दे दुर्गाबाईंनी चर्चिले आहेत. ते पटोत अगर न पटोत, त्यांची दखल घेतली जायला हवी असे त्यांचे महत्त्व आहे यात वाद नाही.
नऊ वर्षांचा प्रदीर्घ कालखंड, प्रचंड व्यासंग व अपार कष्ट यांच्या जीवावर दुर्गाबाईंनी या वयात केलेली ही कामगिरी गौरवास्पद आहे यात शंकाच नाही. पण हे दोन्ही खंड वापरताना वाचकाने आपला नीरक्षीरविवेक सतत जागा ठेवला पाहिजे हे आधीच सांगितलेले बरे; कारण कित्येक चांगल्या गोष्टी त्यांत इतक्या अक्षम्य आणि अनन्वित चुकांच्या गोमकाल्यातून दुर्गाबाईंनी आपल्यापुढे ठेवल्या आहेत की, एवढ्या कष्टाने सिद्ध केलेले हे ग्रंथ ना धड विद्येच्या क्षेत्राला महत्त्वाचे, ना धड सामान्य वाचकाला उपयोगाचे अशी परिस्थिती झाली आहे. ते पाहिल्यावर विद्वान अभ्यासकाला तीव्र असमाधान वाटेल तर सामान्य वाचकाच्या मनात, चक्रावून टाकणारे अस्ताव्यस्त तपशील व भ्रांत आणि चुकीची माहिती यांमुळे गोंधळ किंवा अपसमज निर्माण होतील. दुसर्यांच्या अशा किंवा अन्य दोषांविषयी बोलताना दुर्गाबाई बिनदिक्कतपणे 'भिकार' हे विशेषण वापरतात. (कादं. 666) त्यांच्या दोषांविषयी बोलताना आम्ही कोणती विशेषणे वापरावीत? आधुनिक भारतीय शिक्षितांच्या ‘सुमार’ ज्ञानाबद्दल त्यांना नावे ठेवता ठेवता स्वतः दुर्गाबाईंनी ज्या ‘बेसुमार’ चुका केल्या आहेत त्या अक्षरशः पाचुंद्यांनी मोजाव्या लागतील. या हजार पृष्ठांत आलेली संस्कृत-मराठीतली अपमुद्रिते नुसती मोजायची झाली तर आपण हजारांपर्यंत सहज पोचू. दोन छोट्या शुद्धिपत्रकांत संपण्याइतकी मर्यादित अपमुद्रिते त्यांत नाहीत. खरे तर शुद्धिपत्रकांतही चुका आहेत.
शुद्ध, नेटक्या, निस्संदिग्ध, अर्थप्रतिती करून देईल अशा वाक्यरचनेविषयीचा आग्रह, नेमकी माहिती देऊन, विधाने करून पाल्हाळ व पुनरुक्ती टाळणे, मुद्देसूदपणा निबंधाकडे काळजीपूर्वक लक्ष देणे आणि तपशिलांच्या, संदर्भाच्या बिनचूकपणाविषयी खाराखिरी या गोष्टींची अपेक्षा दुर्गाबाईंकडून करायची नाही तर कोणाकडून? पण या सर्व बाबतीत वाचकाच्या वाट्याला दारूण अपेक्षाभंग येतो. याची अक्षरशः ढीगभर उदाहरणे देता येतील. पण येथे फक्त शाखाचंद्रन्यायानेच निर्देश करणे शक्य आहे.
- भाग ४ -
हटवादुर्गाबाईंची वाक्यरचना किती ढिसाळ आहे याची ही उदाहरणे पहा, ‘प्रत्यक्ष रंग न उच्चारता वातावरणनिर्मितीने त्याचा अभावात्मक वाटेल इतका आविष्कारदेखील पुलिंदाने चंद्रापीडाचे मरण सूचित करणारा ‘दुर्दिना’चा अथवा पावसाळ्याच्या गढूळ, काळोखी, उदास, वातावरण वर्णन करून दाखवला आहे.’ (रस. 90) ‘साहित्यमीमांसकांनी केलेल्या रसप्रक्रियेच्या विवेचनाला विकासक्रम डॉ. ग. त्र्यं. देशपांडे पुण्डरीक आणि महाश्वेता यांचा प्रणयप्रसंग आणि त्यावर पुण्डरीकाची प्रतिक्रिया याबद्दल सांगतात की...’ (रस. 123) सर्वनामांचा सदोष वापर किंवा विशेषनामांचा वापर न करणे याही गोष्टी अशा घोटाळ्यांत भर टाकतात. (रस. 102) आता सदोष वाक्यरचनेने विस्कटलेल्या विधानाचे उदाहरण, ‘साहित्यातला सर्वांत मोठा कलाविष्कार हा संघर्षच आहे.’ (रस. 220) संदर्भावरून पाहता ‘संघर्ष हाच साहित्यातला सर्वांत मोठा कलाविष्कार आहे.’ असे दुर्गाबाईंना म्हणायचे असावे. ‘निळा रंग प्रेमाचे द्योतक असलेला विश्वनाथ देतो.’ (रस. 245) हे वाक्य तर विनोदीच झाले आहे.
चुकीची माहिती व तपशील यांनी तर या ग्रंथात उच्चांक गाठला आहे. ‘नाट्य व काव्य यात मृत्यूचा प्रसंग दाखवायचा नाही असा नाट्यशास्त्राचा व पर्यायाने साहित्यशास्त्राचा दंडक आहे.’ (रस. 92) नाट्यशास्त्र म्हणजे पर्यायाने साहित्यशास्त्र हे दुर्गाबाईंना कोणी सांगितले? शिवाय लगेचच पुढच्या परिच्छेदात मरणाचा उल्लेख साहित्यात अटळ असतो.’ असे त्या म्हणतात, तेव्हा त्यांना या दोन विधानांत काहीच विसंगती जाणवत नाही काय? नाटकात मरण प्रत्यक्ष दाखवलेले नसले तरी रामायणापासून अनेक ठिकाणी मरणाचे उल्लेख आलेले आहेत. त्यांचे स्पष्टीकरण दुर्गाबाई कोणत्या विधानाने करणार?
रसमयीमधील एक संपूर्ण प्रकरण (मिथ ऊर्फ मिथ्यक आणि कादंबरी - रस. 54-65) कशासाठी घातले आहे तेच उकलत नाही. पाश्चात्त्य अभ्यासकांवर भिस्त टाकून पुष्ट झालेल्या भारतीय आभ्यासकांवर दुर्गाबाईंनी पुष्कळ आगपाखड केली आहे; पण या प्रकरणात ओटो रॅकचे, वीरकथांचा आदिबंध होईल असे मिथ्यक उद्धृत करून आणि तेही भारतीय नायकांना लागू पडत नसताना कोणती ‘परा’ (‘परेण’ नव्हे!) पुष्टी त्यांनी मिळवली आहे?
असेच पुष्कळसे पाल्हाळाचे विवेचन भानुचंद्रगणी आणि सिद्धिचंद्रगणी यांच्या कादंबरी व्याख्येच्या संदर्भात आले आहे. मुळातच भ्रष्ट (Corrupt) असलेल्या हस्तलिखितावर अव्वाच्यासव्वा कशाला लिहायचे? शिवाय त्यातील मूळच्या चुकांत दुर्गाबाईंचे ‘योगदान’ किती हा प्रश्न वाचकाला सारखा सतावतोच. कारण याच विवेचनात ‘इन्द्रस्य टीका बिडौजाः’ म्हणजे ‘इन्द्राला नांगराचा पर्याय’ असे स्वतः दुर्गाबाईंनीच म्हटले आहे. (कादं. 612) ‘बिडौजाः’ याचा अर्थ नांगर असा घ्यायचा का? ‘पुस्युदमा’ असा त्यांनी दिलेला शब्द मुळात काय आहे देव जाणे!
आता हे तपशील पाहा, बिनबाप्या सत्यकामाला त्याचे गुरुजी ‘तू महाब्राह्मण आहेस.’ असे म्हणाले व त्यांनी त्याला विद्या शिकवली (रस. 58) हे मूळ छांदोग्यातले शब्द नाहीत हे तर सोडाच. पण ‘महाब्राह्मण’ या शब्दाचा अर्थ ‘अधम ब्राह्मण’ असा आहे हे आम्ही पामरांनी दुर्गाबाईंना सांगावे का?
‘प्राज्य’ याचा अर्थ त्यांच्या मते ‘तूप’ असा आहे. (रस. 19) ‘गतप्राया रात्रिः कृशतनु शशी शीर्यत इव’ हा श्लोक रूढ छंदःशास्त्रानुसार शिखरिणी वृत्तातला आहे, तर दुर्गाबाईंच्या स्वच्छंदशास्त्राप्रमाणे तो स्रग्धरेतला आहे. मूळ कादंबरीतल्या त्यांनी स्वतः भाषांतरित केलेल्या आर्या छंदोदृष्ट्या सदोषच आहेत. (कादं. 21, 241) ‘कमल’ या शब्दाचा अर्थ दुर्गाबाईंच्याकडच्या आपट्यांच्या कोशात ‘याचक’ असा आहे. (कादं. 554) माझ्याकडील आपट्यांच्या कोशात तो अर्थ मला सापडला नाही. रसमयी 191, 231 या पृष्ठांवर उद्धत केलेल्या, भयानक अपमुद्रिते असलेल्या श्लोकांच्या अर्थाचा तर दुर्गाबाईंनी पार धुव्वा उडवला आहे. त्यांच्या मते ‘हा चंद्र नाही तर चंडांशु सूर्य आहे’ असे भवभूतीचा विरही राम लक्ष्मणाला म्हणतो. (रस.117) हा श्लोक उत्तर रामचरितात आहे की नाही हे पाहण्याचीही काळजी दुर्गाबाईंनी घेतलेली दिसत नाही. तोच प्रकार कुमारसंभवातला म्हणून सांगितलेल्या ‘मंगलकौशिक’ रागाच्या उल्लेखाचा. (कादं. 535) कुमारसंभवाच्या पहिल्या आठ सर्गांत आणि पुढीलही सर्गांत हा उल्लेख कुठेही नाही. कालिदासाने ‘नगेद्रकन्या न ययां न तस्थो’ असे म्हटले आहे असे जेव्हा दुर्गाबाई म्हणतात (रस. 207), तेव्हा त्यांना ‘शैलाधिराजतनया न ययौ न तस्थो’ (कुमारसंभव 585) हे म्हणायचे असते असे आपण समजून घ्यायचे. ‘दक्षिण’ नावाच्या अग्नीला त्या ‘दाक्षिणात्य’ हे नाव देतात. (कादं. 69).
- भाग ५ -
हटवामदनाच्या पाच पुष्पबाणांची माहिती देताना एके ठिकाणी (कादं. 560) अरविंद, अशोक, सहकार, नवमल्लिका व नीलोत्पल ही ती फुले होत अशी बरोबर माहिती दिली आहे, तर दुसरीकडे (रस. 244) त्यांचीच नावे आम्रमंजरी, चाफा, मोगरा, बकूळ व केवडा अशी दिली आहेत. या ढिसाळपणाला काय म्हणावे? पण या सर्व चुकांत पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक द्यावे अशी चूक म्हणजे दुर्गाबाईंनी पाच सहा ठिकाणी केलेला ‘भुक्त्वास्थानमंडप’ (कादं. 537, 540, 602, सूची इत्यादी) हा उल्लेख. त्यांच्या मते ही एक स्थापत्यशास्त्रीय संज्ञा असून आस्थानमंडप (सभागृह) यालाच ‘भुक्त्वास्थानमंडप’ म्हटले जाते. (शूद्रक राजा भोजनोत्तर सभागृहात गेला अशा अर्थाच्या वाक्यात हा उल्लेख आला असून हे वाक्य पूर्व भागात सुरुवातीसच आले आहे.) वास्तविक संस्कृताशी व बाणभट्टाच्या शैलीशी ज्याचा थोडासाही परिचय आहे असा अभ्यासक या वाक्यातील ‘भुक्त्वा’ व ‘उपस्पृश्य’ ही पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यये आधी घेऊन ‘आस्थानमण्डपमयासीत्’ अशा रितीने वाक्याचा अन्वय लावील. पण 'आधुनिक भारतीय शिक्षितांच्या संस्कृत भाषेच्या सुमार ज्ञानाचा अधिक्षेप करणार्या' दुर्गाबाईंनी इंजिन गार्डाच्या डब्याला जोडून बाणभट्टाची डेक्कन क्वीन उलथवून टाकली आहे. याला काय म्हणावे? ‘बाणभट्टाचे भाषांतर करणे ही सोपी गोष्ट नाही, हे तर खरेच. तो ‘रडतोंडीचा घाट’ आहे’, असे दुर्गाबाईंनीच म्हणून ठेवले आहे. हा घाट चढताना मूळचे अलंकार पालटावेत की नाही, समास किती व कसे फोडावेत, व्यंजना कशी आणावी, मराठीची धाटणी आणि कथानकाचा ओघ, सौंदर्य कसे संभाळावे असे अनेक प्रश्न उत्पन्न होतील, मतभेद होतील आणि व्हावेतही. एखाददुसरे विशेषण गळणे, वाक्य सुटणे, चुकीचा अर्थ लावला जाणे हेही संभवनीय आहे. कदाचित अल्प प्रमाणात हे सारे क्षम्यही ठरेल. (वानगीदाखल तपासून पाहिलेल्या काही वेच्यांत तसे झालेलेही आहे. तरीही फक्त भाषांतर पुष्कळ बरे आहे.) पण भाषांतरकर्तीला संस्कृतच येते की नाही आणि तिने भाषांतर मूळ संस्कृतवरून करण्याऐवजी हिंदी किंवा अन्य कुठल्या भाषांतरावरून तर केलेले नाही ना असे प्रश्न मनात येणे म्हणजे तिने आपली सर्व विश्वासार्हताच गमावणे आहे. दुर्गाबाईंच्या बाबतीत असे घडले आहे. हे त्यांचे मोठेच अपयश आहे, असे मोठ्या खेदाने म्हणावे लागते.
दुर्गाबाईंना बाणभट्टाविषयी प्रेम आहे. कादंबरीतील सौंदर्य जाणून घेण्याची सहृदयता त्यांच्याकडे आहे. त्यांच्यासारखा व्यासंग, कुवत, शब्दप्रभुत्व असलेल्या विदुषीला कादंबरीचे मराठी भाषांतर व रसमयी या दोहोंना मिळून विंध्याटवीची भव्यता व अच्छोदाचे नितळ रमणीयत्व प्राप्त करून देणे अवघड असले तरी अशक्य नव्हते. पण तसे न करता या दोन खंडांच्या रूपाने दुर्गाबाईंनी एक जुना बाजार मात्र आपल्यापुढे मांडून ठेवला आहे.
- समाप्त -
निसर्ग प्रेमी वगैरे सारखी सोयीची थोटकी विशेषणे थोरोंना लावली जातात पण थोरो हे एक १९व्या शतकातील महान तत्वज्ञ होते, तत्वज्ञ हा कधी कधी वरून पटकन सोपा वाटतो पण त्याचा अभ्यास करून त्यातून काही करायचे ठरवले तर ते किती क्लिष्ट आहे हे लगेचच लक्षात येते ....1 of
उत्तर द्याहटवाशिवाय अवधूत म्हणतात तसे थोरो उत्तर अमेरिकेतील होते , टेकनॉलॉजि चे मोठ्या प्रमाणात मानवी जीवनात होत असलेले आगमन पहात होते , भरपूर चौफेर (अनेक भारतीय पुस्तकांसकट) वाचन होते, त्यांचे इंग्लिश सध्याच्या अमेरिकन इंग्लिश पेक्षा सुद्धा खूप वेगळे होते आणि उत्तम होते (तत्वज्ञ व्हायला भाषेवर स्वार पहिल्यांदा व्हायला लागते , नंतर विचार) ....मार्क्स, गांधी, टॉल्स्टॉय यांच्या पुढे येणाऱ्या काही विचारांची चाहूल त्यांच्या लेखनात दिसते .....त्यांच्या कडे एक तीव्र विनोदबुद्धी होती (जशी आज आपल्याला अमेरिकेत सगळीकडे भेटते), त्यांचे सर्व विषयांवर विचार होते (जसे दुर्गाबाई सगळ्यावर कंमेंट करायच्या), ते १९व्या शतकातील भारतीय विचारवंता सारखे नाहीत, इंग्रजी वाघिणीचे दूध ना ते जास्त प्याले , ना त्यांना ते जास्त प्यायची इच्छा होती.... हे सगळे लक्षात घेतले तर अनुवाद करणे सोपे नाही ....2 of
उत्तर द्याहटवातरी सुद्धा दुर्गाबाईंनी केलेला ढिसाळ, अनेक ठिकाणी चक्क चुकीचा आणि दिशाभूल करणारा अनुवाद पाहून मी अतिशय थक्क आणि दुःखी झालो , त्यांनी तसाच ढिसाळ पण बाणाची कादंबरी मराठीत आणताना केला होता (त्यावर साधना मध्ये पूर्वीच लिहून आले आहे.)....ह्यामुळे थोरो यांचे एक महत्वाचे पुस्तक मराठीत आजवर येऊ शकलेले नाही असे मी समजतो
उत्तर द्याहटवामाझ्या ब्लॉग च्या निमित्ताने मी मराठीतील मला आवडणाऱ्या लेखकांच्या गंभीर चुका दाखवत आलो आहे , अगदी परवाच विलास सारंग सुद्धा त्यात शामिल झाले , त्यात सुद्धा दुर्गाबाई घाशीराम च्या निमित्ताने आल्याचं आहेत ...3 of
पूर्वी अमृत नावाच्या नियतकालिकात उपसंपादकाच्या डुलक्या नावाचे सदर असायचे ज्यात वर्तमानपत्रातील ढोबळ चुका दाखवल्या जायच्या , मला वाटते इथे उपसंपादकाची गाढ झोप असे शीर्षक असायला पाहिजे ....
उत्तर द्याहटवास्वतः अवधूत पोटतिडकीने, प्रचंड कष्ट करून अनुवाद करत असतात , त्यासाठी तळटीपा वापरतात , स्वतःच्या निराकरण न झालेल्या शंका बोलून दाखवतात ....एखादे वाक्य अनुवादीत होत नसेल तर ते तसेच वापरा इथे पर्यंत त्यांची तयारी आहे....त्यांचा उद्देश एकच आहे , पुस्तकाचा worldclass अनुवाद व्हावा (त्यांचे अनुवादित अलीकडले एक पुस्तक जरूर पहा: साधना ने प्रकाशित केलेलं 'रानडे, गांधी आणि जीना' लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर , अनुवादात मैलाचा दगड व्हावा असे ते पुस्तक आहे.) 4 of
न्यू यॉर्कर किंवा अनेक इंग्रजी प्रकाशनात उपसंदकाची भूमिका मोठी आणि निर्णायक असते , तिने प्रत्येक गोष्ट/संदर्भ/र्हस्वदीर्घ काटेकोर पणे तपासून घेणे आवश्यक असते , न्यू यॉर्कर च्या एका उपसंपादकाने तिच्या कामाबद्दल निवृत्तीनंतर मोठे पुस्तक लिहले, हे मराठीत सर्व प्रकाशनात , सर्व छोट्यामोठ्या लेखकांसोबत होते का ? 5 of 5 last
उत्तर द्याहटवा