२८ ऑक्टोबर २०२६

परळ ६८ : शिवसेनेच्या आरंभकाळातला तुकडा टिपून थांबणारी कादंबरी

मुखपृष्ठ : मनोज आचार्य

दिवाकर कांबळी यांची 'परळ ६८' ही कादंबरी पहिल्यांदा १९८७ साली प्रकाशित झाली (डिंपल पब्लिकेशन). सिंधुदुर्गातल्या तेरेखोल इथला एक तरुण बी.एससी. झाल्यावर १९६७-६८ला नोकरीच्या शोधात मुंबईत येतो, परळ भागात राहू लागतो, त्याला भेटणारी माणसं, तो राहतो ती ठिकाणं, आणि शेवटी त्याला नोकरी मिळणं- असं साधारण या कादंबरीचं सूत्र. प्रत्यक्षात त्याच्यापुढचा प्रश्न तसा मर्यादित आहे, पण त्याच्या अवतीभवतीच्या घडामोडींचं जंजाळ मात्र अधिक दाहक. ही दाहकता या कादंबरीत तुकड्या-तुकड्याने टिपली गेलेय. लेखकाने उभ्या केलेल्या निवेदकाच्या बोलण्याविरोधात जाऊन कादंबरी वाचली तर ते दाहक जंजाळ थोडं जाणवतं. 

कादंबरीतल्या या तरुण प्रथमपुरुषी निवेदकाचा बाप मास्तर. बापाचा मासिक पगार एकशेपंधरा रुपये. म्हणजे त्या काळच्या हिशेबाने गावाकडे किमान मध्यमवर्गीय जगलेला हा तरुण. आता त्याला बऱ्या नोकरीची अपेक्षा आहे. त्यासाठी मुंबईत येऊन तो सुरुवातीला मामाकडे राहतो, मग ओळखीतून एका फ्लॅटवर दोन-तीन तरुणांसोबत राहू लागतो. त्याला मुंबईत आल्यावर भास्क्या पेपरवाल्याकडे 'मार्मिक'चे अंक वाचायला मिळतात. बाळ ठाकरे या तरुण व्यंगचित्रकाराने १९६० साली सुरू केलेलं हे व्यंगचित्र-साप्ताहिक. त्यात मग विविध कंपन्यांमध्ये भरणा असलेल्या दाक्षिणात्य मंडळींची नावं छापलेली असतात, 'वाचा आणि थंड बसा' असंही त्यासोबत म्हटलेलं असतं. तळकोकणातल्या एका मध्यमवर्गीय मध्यमजातीय तरुणाची मुंबईतल्या राजकीय-सामाजिक जंजाळाशी घसट होण्याची ही सुरुवात. त्यानंतर एखादा कॅमेरा त्या निवेदकासोबत जावा तशी कादंबरी पुढे जाते, मधे-मधे निवेदक टिप्पण्या करतो. लालबाग, परळ, शिवडी, नायगाव, दादर, असा परिसर आणि त्यातली मुख्यत्वे शिवसेनेच्या राजकारणाला रस्त्यावर जोर दिलेली मंडळी कादंबरीत टिपली जातात.

उदाहरणार्थ, शरद मयेकर नावाचा एक तरुण. तसा सुस्थितीतला, पण दादागिरी करणारा, जुगाराच्या अड्ड्यावर बॉडीगार्ड म्हणून काम करणारा. त्याच्या संदर्भातला एक प्रसंग असा : वीणा नावाची "सावळ्या, तरतरीत, आकर्षक" आणि "इन्व्हायटिंग फीचर्स" असलेली तरुणी बस-स्टॉपवर उभी असते. तिच्या शेजारी तिचा मित्र- निवेदकाच्या मते, "खानदानी टरकू रक्त असणारा"- संपत उभा असतो. एक गुंड येतो, वीणाची छाती दाबू लागतो, तर संपत रडकुंडीला येतो. इतक्यात तिथून स्कूटरवरून जाणारा "गोरापान, तरणाबांड" शरद मयेकर थांबतो. तो गुंडाला बदड बदड बदडतो. लगेच वीणाला "फाटक्या श्रीमंत संपतची" घृणा येते आणि ती स्कूटर सुरू करून निघालेल्या शरदकडे जाते. त्याच्याशी काही बोलून स्कूटरवरून निघून जाते, पुढे त्यांचं जमतं. अशा चित्रपटात शोभेलशा प्रसंगात इतर सर्व वर्णन आहे, पण छाती दाबल्यावर वीणाला काय वाटलं, तिच्या चेहऱ्यावर काय उमटलं, तिच्या शरीराची हालचाल कशी झाली, याबद्दल एक शब्दही नाही. फक्त आजूबाजूचंच वर्णन आहे. 
 
या व्यतिरिक्त, गजा फूलवाला, करूबाळा नावाचा अनाथ पोरगा, शरदचा मित्र नि गुंडगिरीच करणारा सुलेमान, गर्भश्रीमंत असणारा पण पैसे उडवून रसातळाला चाललेला बाळा, अशी इतरही पात्रं येऊन-जाऊन आहेत. शिवसेनेच्या रस्त्यावरच्या राजकारणाला कमी-अधिक हातभार लावणारी, शारीरिक बळ अधिक बेधडकपणे वापरणारी ही माणसं. पण या माणसांना रस्त्यावरच्या राजकारणासाठी प्रेरणा देणारा नेता कसा दिसतो, त्याचं या सगळ्यांची असणारं नातं कशाच्या बळावर निर्माण झालं, इत्यादी प्रश्नांची थोडी उकल कादंबरीत होते.

शिवसेनेच्या एका सभेचं, त्या दरम्यानच्या आणि त्यानंतरच्या वातावरणाचं चित्रमय वर्णन कादंबरीत आहे. निवेदक या सभेत शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे यांना पहिल्यांदा बघतो. "'मार्मिक'मधून दाक्षिणात्यांंना हुसकावून लावायच्या गर्जना करणारा माणूस एवढा किरकोळ?" अशी त्याची पहिली प्रतिक्रिया. पण मग ठाकरे बोलायला लागल्यावर "लिखाणापेक्षाही जहाल, पेटवून टाकणारं भाषण" ऐकून त्याची प्रतिक्रिया मावळते. सभेनंतर सगळं वातावरण ठाकऱ्यांच्या भाषणाने भारलेलं असतं. मग एका उडुपी रेस्टॉरन्टवर दगडफेक होते, मोडतोड, फर्निचरचा चक्काचूर, गल्ला साफ, उडपी मालक नि नोकर पसार. पुढे गर्दी आणखी पुढे सरकते, दुकानं धाडधाड बंद होतात, 'मार्मिक' विकणाऱ्या भास्क्याचा स्टॉलचीही आवराआवर होते. इथे निवेदक म्हणतो :
परळ नाका थोडा वेळ भयभीत झाला.
आतापर्यंत त्याला सवय होती ती वैयक्तिक दादागिरी पाहायची. छोट्या मोठ्या दादांची. किंवा कधीतर छोट्या मोठ्या गँग्जच्या दादागिरीची. पण हा उद्रेक संघटित होता. आतापर्यंतच्या कोणत्याही दादागिरीहून मोठा जास्त टरकवणारा. जास्त नुकसान करू शकणारा. 
लोकांनी लोकांसाठी लोकांवर केलेली दादागिरी. (पान ५०)
काही वेळा हे वर्णन आणखी चित्रमय होतं. उदाहरणार्थ, एकदा सभेनंतरच्या जाळपोळीसाठी एका बसमधल्या प्रवाशांना खाली उतरवलं जातं. "ड्रायव्हरला आदेश देण्यात आला- शिंदेवाडीच्या गल्लीत बस वळव. तिरप्या काचेच्या पलीकडे बसलेल्या ड्रायव्हरने- सरळ की कुरबुरत कोण जाणे- बस वळवली. त्या काचेवर शिंदेवाडीचं प्रतिबिंब माँटाज इफेक्टसारखं तरळून गेलं." (पानं ७५-७६) बस स्लो-मोशनमध्ये वळत असताना त्यावर प्रतिबिंब उमटल्याचं हे वर्णन चित्रपटाच्या कॅमेऱ्याची आठवण करून देतं.

शिवसेना संस्थापक बाळ ठाकरे. १९६८ साली. गेट वे ऑफ इंडिया.

निवेदक तरुणाला नोकरी हवेय, मुंबईतल्या नोकऱ्यांमध्ये मराठी माणसांचा टक्का दुबळा असल्याचं तो 'मार्मिक'मधून वाचतोय, त्याच्या मनात चीड आहे, व्यक्तीशः तो ही चीड रस्त्यावर काढत नसला तरी त्याच्या वतीने इतर मंडळी ही चीड व्यक्त करतायंत, नेत्याच्याही वतीने ही मंडळी चीड व्यक्त करतायंत. 

एकदा हा निवेदक कम्युनिस्टांच्या साप्ताहिकात नोकरी करणाऱ्या दुसऱ्या तरुणासोबत इराणी रेस्टॉरन्टमधे चहा पीत असतो. त्यांच्या बोलण्यात 'बाळ ठाकरे' असा उल्लेख येतो. इतक्यात, "कोण रे च्यायला, बाळ ठाकरे... बाळ ठाकरे म्हणतो आहे? बाळासाहेब म्हणायचं. तिच्या मायला", असं म्हणत दोघे जण त्यांच्या टेबलाकडे येतात. बॉक्सिंग शिकणारा वेक्या चव्हाण आणि कबड्डीचं मैदान गाजवणारा मन्या पाटील असे हे दोघे निवेदकाच्या ओळखीचेच. "दे आयझवाड्याच्या कानाखाली... समजतो काय स्वतःला भेन्चोद?" असं म्हणून यातला एक जण निवेदक तरुणाच्या कानाखाली खेचतो, मग सोबतच्या तरुणालाही मार बसतो. 

हळूहळू राजकारण आणि नेत्याची प्रतिमा बदलत जाते. निवेदकाच्या वर्णनांमधला नि निरीक्षणांमधला सूरही बदलतो. शिवसेना आणि कम्युनिस्ट यांच्यातल्या संघर्षाच्या खुणा दिसायला लागतात. निवेदक म्हणतो:

आता साम्राज्यशाहीचे वेध लागले होते. एवढा मोठा शिवाजी पार्क आधीच जिंकलेला. मग कामगार मैदानावर लाल झेंडा काय म्हणून? त्याला खाली खेचलाच पाहिजे.

आदेश आले. (पान १२१)

आता मराठीच लोक एकमेकांशी भांडू लागले. आता "उपरे" मनातल्या मनात हसत असतील, असं निवेदकाला वाटतं. "की, वरवर चालल्यावर शेवटच्या, तळा-गाळातल्या, श्रमिक माणसांच्या मनांचा विचार संपला होता? 'मार्मिक'मधल्या लिखाणावरून तसं मुळीच वाटत नव्हतं. उलट तो आणखीनच पेटवत होता. मग हे काय? की, विचार आणि आदेश एकमेकांच्या उलट्या दिशेने जात होते?" असा प्रश्न निवेदकाच्या मनात येतो.  (पान १२२).

असं सगळं सुरू असताना या निवेदक तरुणाला बँकेत नोकरी लागते. मग अंधेरीला हाऊसिंग बोर्डात राहायला जागा मिळते. तेव्हा तो असा सरधोपट शेरा मारतो : "मग एका संध्याकाळी म्हणजे रात्री या एकांगी, बिनधास्त, गट्सवाल्या, बेधडक प्रवृत्तीच्या, नशाबाज पण प्रामाणिक माणसांच्या जगातून आप्पलपोट्या, दुसऱ्याची फारशी कणव नसलेल्या, करिअर माईंडेड, स्वतःपुरतंच पाहणाऱ्या टरकू लोकांच्या जगात पाऊल टाकलं." 

प्रत्यक्षात त्याने वर्णन केलेल्या जगातही अप्रामाणिक लोक असल्याचं दिसतं. व्यक्तीशः तो ग्रामीण मध्यमवर्गातून शहरी मध्यमवर्गात प्रवेश करतो, इतकाच फरक आहे. त्या दरम्यानच्या काळात त्याचा शहरातल्या 'मवाली' मानल्या जाणाऱ्या वर्गाशी संपर्क येतो. या तात्पुरत्या संबंधावरून तो त्या अवकाशाबद्दल काहीसं स्वप्नरंजनपर विधान करतो. ते त्याला परवडतं. इतर काही लोकांची दैना होते. उदाहरणार्थ, रॉबर्ट फायटर नावाचं पात्र काही वर्षांनी फूटपाथजवळ काहीतरी पुटपुटत बसलेलं दिसतं. त्याची आधीची दणदणीत तब्येत नशाबाजीमुळे पूर्ण खंगून जाते, हात वेडावाकडा होतो, इत्यादी.

निवेदकाने काही परिपूर्ण माणसासारखं बोलावं, असं नाही. लेखकाला मात्र काही वाटा शोधून  यातून अधिक व्यापक चित्र उभं करणं शक्य असतं. या कादंबरीत ते पुरेसं झालेलं नाही. त्यामुळे शेरे आणि उर्वरित आशय यांच्यात बहुतेकदा तफावत राहते. क्वचित काही वेळा ते सरमिसळून येतात.

एका अर्थी या कादंबरीच्या निवेदकासारखे मध्यमवर्गात प्रवेश करते झालेले लोकही शिवसेनेचे समर्थक होते. नेत्यांची आर्थिक परिस्थिती बदलली तशी त्यांचीही बदलली. पण उर्वरित कित्येकांचं काय झालं, हा प्रश्न ही कादंबरी वाचल्यावर उरतो. यामागच्या राजकारणातले सार्वजनिक स्वरूपाचे, बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवरचे अंतर्विरोध कादंबरीत येतात. पण हिंसा, अस्मिता, सत्ता यांची आणखी गुंतागुंत उकलली जात नाही. कादंबरीचा निवेदक फक्त नोकरी शोधण्याच्या काळातच या राजकारणाबाबत बाहेरून आस्था राखून असतो. मग आस्था थोडी उणावल्यावर तो टीकाही करायला लागतो. नंतर नोकरी लागल्यावर त्याचं जगणं स्थिरस्थावर होतं. याबद्दल तो वरवरच्या अपराधभावातला शेरा मारतो- "नोकरीत जसा सेट होत गेलो म्हणजे काही वर्षं घालवल्यावर परळकडे पाठ फिरली. [...] चर्चा चर्चा चर्चा करणाऱ्या लोकांची कंपनी जास्त जवळची वाटायला लागली. [...] एकूण सारं टिपिकल मुंबईकरासारखं झालं. आपली नोकरी की आपण. ह्या स्टेजला मुंबईत शेवटी यायलाच लागतं. हीच या युगातली व मुंबईनगरातली ब्रह्मचर्यावस्था संपून गृहस्थाश्रमी व्हायची वयोवेळ." (पान १६०)

स्वप्नरंजन आणि वरवरचा अपराधभाव, अशा टोकांवरचे शेरे न मारता लेखकाला-निवेदकाला आणखी काही शोधता आलं असतं का? या राजकारणामागच्या कारणांचा आणखी शोध घेता आला असता का? असे प्रश्न वाचकाला पडू शकतात. पण किमान या राजकारणाला हातभार लावलेल्या काही जाणिवांची थोडी चाचपणी कादंबरीत आहे, असं म्हणता येईल. तारुण्य, बेरोजगारी, हिंसा, यासंबंधी काही मर्यादित तपास जाणवतो.

शिवसेनेला १९६८ साली मुंबई महानगरपालिकेत एक तृतीयांश जागांवर लक्षणीय यश मिळालं, ही कादंबरी १९८७ साली प्रकाशित झाली. याच वर्षी शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा ठळकपणे हातात घेतला. या मुद्द्याला धरून विलेपार्ले विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा विजय झाला (हिंदुत्वाची पहिली निवडणूक जिंकली, मार्मिक, २७ एप्रिल २०२३). हिंदुत्ववादी विचारसरणीच्या भारतीय जनता पक्षाशी शिवसेनेची युती याच दरम्यान दृढ झाली. या दरम्यान, 'परळ ६८'चा निवेदक कोणाला पाठिंबा देणारा उच्च-मध्यमवर्गीय मतदार झाला असेल?

या वर्षी जून महिन्यात शिवसेनेच्या स्थापनेला साठ वर्षं पूर्ण झाली. दरम्यानच्या २०२२ या पक्षात मोठी फूट पडली. यातला एक गट सध्यातरी मूळ संस्थापकांच्या कौटुंबिक वारसदारांच्या छत्राखाली छोटा-छोटा होताना दिसतो, तर दुसरा गट सध्याच्या सत्ताधारी सूत्रधारांच्या छत्राखाली थोडा मोठा होताना दिसतो. 'परळ ६८'मध्ये वर्णन आलेल्या पात्रांसारखेच काही जण शिवसेनेच्या राजकीय प्रवासातून मिळालेले लाभ घेत घेत पुढे गेले. यात कोणी गगनचुंबी इमारतींमधल्या ७२व्या मजल्यावरच्या फ्लॅटवरून मराठी वृत्तवाहिन्यांना 'धडाकेबाज मुलाखत' देणारे आहेत किंवा आपली किती मोठमोठी फार्म-हाउस आहेत याबद्दल 'कुरळ्या केसांच्या मुलाखतकर्ती'शी स्मितहास्य ठेवत गप्पा मारणारे आहेत, किंवा रिक्षाचालक म्हणून काम करत असतानाच्या आठवणी लोकांना सांगताना प्रत्यक्षात राजकीय नि आर्थिक सत्तेच्या पायऱ्या चढत राहणारे, असे निरनिराळे लोक आहेत. (शिवाय, मूळ संस्थापकांच्या वक्तृत्वाचा वारसा पुढे नेणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुखही आहेतच आणि आपापलं बळ घेऊन याआधीच मूळ पक्षातून दुसऱ्या पक्षांमध्ये गेलेलेही आहेतच). 

मराठी अस्मितेसाठीचं राजकारण हे असं इथपर्यंत येऊन पोचलं. करोडो रुपये खर्चून होणाऱ्या साहित्य संमेलनांचा हंगामही आता येऊ घातला आहे. त्यात एखादी कादंबरी वाचून राजकारणामागच्या जाणिवांविषयी बोलण्याची प्रस्तुतता किती, हा प्रश्न आहेच. 

कादंबरीचं मनोज आचार्य यांनी केलेलं मुखपृष्ठ बोलकं नि लक्षणीय आहे. सर्वसामान्य (पुरुषाचा) त्रस्त चेहरा चित्ररूपात, केसांमध्ये रिकामा रस्ता- मोर्चेकऱ्यांची गर्दी- पोलीस यांच्या छायाचित्रांचा कोलाज, भगव्या रंगछटांचा वापर, मागे कदाचित झेंडा, शीर्षकासाठी जुन्या पोस्टरांसारखा टाइप, आणि एकंदर वर्तमानपत्रासारखं चुरगळलेपण!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा