३० जुलै २०१५

फाशी- जॉर्ज ऑर्वेल

मुंबईमधल्या १९९३ सालच्या बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेनन याला आज सकाळी साडेसहा वाजता नागपूरमधील तुरुंगात फाशी देण्यात आलं. त्या निमित्तानं ही नोंद आहे. संदर्भ वेगळे वाटतील, गुन्ह्यांचा तपशील वेगळा वाटेल, मुद्दा एकच. आत्ताच हे कशाला, असा प्रश्न ज्यांच्या मनात येईल, त्याचं उत्तर म्हणूनच हा लेख मराठीत नोंदवला आहे. कारण हे कधीही असंच असणारं.

जॉर्ज ऑर्वेल (१९०३-१९५०) हा ‘ब्रिटिश इम्पीरियल पोलिस सेवे’चा भाग म्हणून ब्रह्मदेशात काम करत असताना एका भारतीय कैद्याला दिलेली फाशी त्यानं प्रत्यक्ष पाहिली होती. त्या अनुभवावर त्यानं लिहिलेला लेख १९३१ मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्याचा हा अनुवाद. (मूळ इंग्रजी लेख इथे वाचता येईल.)
 ***

किंकाळी: एडवर्ड मंक यांचं प्रसिद्ध चित्र [इथून]
ही ब्रह्मदेशातली घटना आहे. पावसाळी सकाळ होती. टिन फॉइलच्या पिवळ्या दिव्याचा फिकट प्रकाश कारागृहाच्या उंच भिंतींवर लटकत होता. प्राण्यांच्या पिंजऱ्यांप्रमाणे मोठे गज लावलेल्या कोठड्यांबाहेर उभे राहून आम्ही वाट पाहत होतो. प्रत्येक कोठडी दहा बाय दहा फुटांची होती. एक साधी कॉट आणि पिण्याच्या पाण्याचं भांडं सोडल्यास ती जवळजवळ रिकामीच होती. काही कोठड्यांमधे काळपटलेली माणसं गुडघे मुडपून बसलेली होती. फाशीची शिक्षा ठोठावलेले हे लोक. येत्या आठवड्यात किंवा दोन आठवड्यांत त्यांची शिक्षा अमलात येणार होती.

एका कैद्याला बराकीतून बाहेर काढण्यात आलं. बारीकसा हिंदू मनुष्य होता. पूर्ण भादरलेले केस, अस्पष्ट पाणीदार डोळे, त्याच्या शरीराच्या आकाराशी न जुळणाऱ्या जाडजूड मिशा असा तो कैदी. त्याच्या मिशा चित्रपटातल्या विनोदी पात्राप्रमाणे वाटत होत्या. पहाऱ्यासाठी असलेले सहा उंच भारतीय वॉर्डर फाशीसाठीच्या खांबापर्यंत घेऊन जायला त्याला तयार करत होते. दोघंजण संगीनधारी बंदुका घेऊन उभे होते, तर बाकीचे त्याला हातकड्या घालून, त्या एका साखळीत अडकवून, साखळी आपल्या कमरेच्या पट्‌ट्यांना बांधण्यात गुंतले होते. त्याचे हात त्याच्या शरीराला घट्ट बांधण्यात आले. वॉर्डर त्याच्या खूप जवळ उभे होते आणि त्यांचे हात त्याच्याभोवती एवढ्या काळजीपूर्वक फिरत होते की तो तिथं खरंच आहे ना याची ते खात्री करतायंत असं वाटावं. कधीही पाण्यात उडी मारून परत जाईल असा जिवंत मासा हातात घेतल्यावर माणूस कसा वागतो तसंच ते चित्र होतं. पण तो जवळपास विरोध न करताच उभा होता, दोऱ्यांभोवती तो हळुवारपणे हात गुंडाळत होता. जणू काय चाललंय याचा त्याला पत्ताच नव्हता.

आठ वाजले. दूरवरच्या बराकींमधे बिगुल वाजलेला दमट हवेतून ऐकू आला. आमच्यापासून दूरवर उभं राहून हातातल्या काठीने जमिनीवरच्या दगडांना उदासपणे उडवत असलेल्या तुरुंग अधीक्षकांनी आवाजाच्या दिशेने तोंड फिरवून पाहिलं. पांढऱ्याया पडत चाललेल्या मिशा असलेले ते एक सैनिकी डॉक्टर होते. ‘‘फ्रान्सिस, जरा पटकन आटप रे बाबा!’’ ते किरकिरत्या आवाजात ओरडले. ‘‘एव्हाना तो मेलेला असायला हवा होता. आणि अजूनही तूच तयारीत नाहीस?’’

फ्रान्सिस हा तुरुंगप्रमुख. पांढरा गणवेश नि सोन्याच्या कडांचा चष्मा घातलेला दक्षिण भारतीय. तो हात हलवत म्हणाला, ‘‘होय, होय सर.. सगळं ठीक झालंय आता. जल्लादही तयार आहे. आपण निघायला हवं.’’

‘‘बरंय, मग उरक आता. हे काम आटपेपर्यंत बाकीच्या कैद्यांना जेवण मिळणार नाही.’’

आम्ही वधस्तंभाच्या दिशेने वळलो. कैद्याच्या दोन्ही बाजूंना दोन वॉर्डर बंदुका घेऊन होतेच. शिवाय त्याच्या आणखी जवळून चालणाऱ्या दोन वॉर्डरांनी त्याला हाताला नि खांद्याला धरलं होतं. एकाच वेळी ते त्याला ढकलतायंत नि आधारसुद्धा देतायंत असं वाटत होतं. आमच्याबरोबर असलेले न्यायदंडाधिकारी आणि इतर अधिकारी त्यामागून चालत होते. दहाएक मीटरचं अंतर चालून झालं असेल तेवढ्यात एकदम कोणत्याही आदेशाशिवाय किंवा सूचनेशिवाय हा जथ्था थांबला. एक विचित्र घटना झाली होती. कधी कोणास ठाऊक, पण एक कुत्रा आवारात आला होता. मोठमोठ्यानं भुंकत तो आमच्यापर्यंत आला. एवढी सगळी माणसं एकत्र बघून भेदरलेला तो शेपटी हलवत भोवताली फिरू लागला. त्याला कोणी थांबवण्यापूर्वीच त्यानं अचानक कैद्याकडे झेप घेतली आणि उडी मारून त्याचा चेहरा चाटण्याचा प्रयत्न केला. उरलेले सगळेचजण स्तब्ध होऊन पाहत राहिले. कुत्र्याला पकडायलाही पटकन कोणी पुढं होईना.

‘‘ह्या साल्या कुत्र्याला कोणी आत येऊ दिलं?’’ अधीक्षक चिडून म्हणाले. ‘‘कोणी तरी पकडा रे त्याला!’’

जथ्थ्यातून बाहेर पडून एक वॉर्डर कुत्र्याच्या मागे लागला, पण तो त्याच्या हाती येईना. एका तरुण युरोपीय अधिकाऱ्यानं दगड मारून कुत्र्याला हटवायचा प्रयत्न केला; पण त्यानं दगडांचा मारा चुकवला आणि तो परत आम्ही उभे होतो तिथं आला. तुरुंगाच्या भिंतींमध्ये त्याच्या भुंकण्याचा आवाज घुमत होता. हा जणू फाशीपूर्वीच्या प्रक्रियेचाच काही तरी भाग असावा अशा पद्धतीने कैदी कोणत्याही कुतूहलाविना हे सगळं पाहत होता. काही मिनिटांनी कुत्र्याला कोणी तरी पकडलं. त्याच्या तोंडाभोवती माझा रुमाल अडकवून आम्ही पुढं निघालो.

वधस्तंभापासून चाळीस मीटरच्या आसपास मी कैद्याची काळपट पाठ पाहिली. तो माझ्या समोरच चालत होता. तो हात बांधलेल्या अवस्थेत, जरा अवघडून बऱ्यापैकी हळू पावलं टाकत होता. प्रत्येक पावलाबरोबर त्याचं मांस आणि हाडांची हालचाल स्पष्ट दिसत होती नि ओल्या मातीवर त्याची पावलं स्पष्ट उठत होती. त्याला दोघादोघांनी धरून ठेवलेलं असतानाही एकदा वाटेत आलेला खड्डा चुकवण्यासाठी तो जरा बाजूला होऊन पुढं गेला.

सुदृढ आणि शुद्धावस्थेत असलेल्या माणसाला संपवणं म्हणजे काय ते त्या क्षणापर्यंत मला कधीही अजिबातच जाणवलेलं नव्हतं. तो कैदी खड्डा चुकवण्यासाठी जरा बाजूला सरला तेव्हा मला ते गूढ उकललं. पूर्ण जोमानिशी सुरू असलेलं जीवन मधेच तोडून टाकण्यातली गफलत माझ्यासमोर स्पष्ट उभी ठाकली. हा माणूस मरत नव्हता. आम्ही जसे जिवंत होतो तसाच तो जिवंत होता. त्याच्या शरीराचे सगळे भाग व्यवस्थित काम करत होते. जठर अन्न पचवत होतं, त्वचा स्वतःची निगा राखत होती, नखं वाढत होती... आपसूकपणे हे सगळं सुरू होतं. तो वधस्तंभावर चढण्यासाठी उभा राहील. एक दशांश सेकंदात तो हवेत उडी घेऊन खाली पडेल त्या क्षणीही त्याची नखं वाढत असतील. खालची खडी नि बाजूच्या राखाडी भिंती हे सगळं तो पाहत होता आणि तरी त्याचा मेंदू तर्काधिष्ठित विचार करू शकत होता. खालच्या खड्‌ड्याची जाणीव त्याला होती. तो आणि आम्ही सगळे एकत्र चालणारी माणसं होतो. पाहत होतो, ऐकत होतो, जाणून घेत होतो. एकच जग समजून घेत होतो. आणि दोन मिनिटांत, एका क्षणात आमच्यातला एकजण गेलेला असणार होता. एक मन कमी होणार होतं, एक जग कमी होणार होतं.

वधस्तंभ तुरुंगाच्या मुख्य इमारतीपासून जरा बाजूच्या लहानशा जागेत अनेक शोक पचवत उभा होता. तीन बाजूंनी विटांच्या भिंती असलेली ती एक शेडवजा जागा होती. वर एक लाकडी फळी होती. त्यावर दोन बाजूंना मोठे बीम होते आणि त्यामधून एक बार गेलेला नि त्याला दोरी लटकत होती. तुरुंगाच्या पांढऱ्या गणवेशात उभा असलेला जल्लाद, केस पांढरे होत आलेला एक कैदीच, खटक्याचा दांडा असलेल्या यंत्राजवळ उभा होता. आम्ही तिथं गेलो तसा तो आमच्यासमोर खाली झुकला. फ्रान्सिसच्या सूचनेनुसार कैद्याला आधीपेक्षाही जवळून पकडून असलेल्या दोघा वॉर्डरांनी त्याला जवळपास ढकलून वधस्तंभापर्यंत नेलं. पायऱ्यांवरून ते त्याला वर घेऊन गेले. त्यानंतर जल्लाद वर चढला आणि त्यानं दोरी कैद्याच्या मानेभोवती घट्ट केली.

आम्ही पाचेक मीटरच्या अंतरावर उभे राहून बघत होतो. वधस्तंभाभोवती वॉर्डरांचं एक वर्तुळच बनलं होतं. आणि फास पक्का केल्यावर लगेच कैदी रडून देवाचं नाव घेऊ लागला. मोठ्या आवाजात सलग तो ‘राम, राम, राम, राम’ उच्चारू लागला. गडबडीत आणि भीतीनं केलेल्या प्रार्थनेसारखं ते उच्चारण नव्हतं. स्थिर, ताल असलेलं, घंटा वाजते तशा पद्धतीनं तो देवाचं नाव एकसंधपणे घेत होता. तिकडे कुत्र्यानं दबलेल्या आवाजात रडणं सुरू केलेलं ऐकू येत होतं. जल्लाद अजून वधस्तंभावरच उभा होता. पिठाच्या पोत्याप्रमाणे वाटणारी एक लहानशी कॉटनची पिशवी त्यानं आणली आणि ती कैद्याच्या चेहऱ्यावर घातली. त्या कापडामुळे अडलेला पण तरीही सतत येणारा ‘राम, राम, राम, राम’ उच्चारणाचा आवाज सुरूच होता.

जल्लाद पायऱ्यांवरून खाली उतरला आणि खटक्याच्या दांड्याजवळ येऊन दांडा हातात धरून उभा राहिला. मिनिटं जाताना कळत होती. कैद्याचं रडणं आणि ‘राम, राम, राम, राम’ उच्चारणं सलग सुरूच होतं. मान खाली वळवून उभे असलेले अधीक्षक हातातल्या काठीनं जमिनीवर रेघा ओढत होते. बहुतेक ते हुंदक्यांची मोजदाद करत असावेत नि कैद्याला काही ठराविक आकड्यांपर्यंत रडण्याची मुभा त्यांनी दिली असावी. पन्नास किंवा शंभर हुंदके असं काही तरी. प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्याचा रंग बदलला होता. काही बंदुकांवरच्या संगिनी हलत होत्या. टोप चढवून फळीवर उभ्या असलेल्या त्या माणसाचे हुंदके आम्ही ऐकत होतो. प्रत्येक हुंदका म्हणजे आयुष्याचा आणखी एक क्षण. आमच्या सर्वांच्या मनांमधे हाच विचार होता : मारा आता त्याला लवकर, संपवा हे! तो घाणेरडा आवाज संपवा!

अचानक अधीक्षकांनी निर्णय पक्का केला आणि मान वर करून हातातल्या काठीनं सूचना करत ते जोरानं ओरडले, ’’चलो!’’

त्यानंतर एकदा जोरदार आवाज झाला आणि नंतर मृतप्राय शांतता पसरली. कैदी संपला होता, दोरी तिची तिची फिरत होती. कुत्र्याला आम्ही सोडून दिलं आणि तो एकदम धावत वधस्तंभाच्या पाठीमागे गेला. तिथं पोचल्यावर मात्र तो मागेच थांबला, भुंकला आणि मग बाजूच्या कोपऱ्यात जाऊन बसला. तिथून तो आमच्याकडे भीत भीत पाहत होता. वधस्तंभाभोवती फेरी मारून आम्ही कैद्याच्या देहाकडे पाहिलं. पायांची टोकं सरळ खाली वळलेल्या अवस्थेत तो हळूहळू फिरत लटकत होता, दगडाप्रमाणे स्तब्ध.

अधीक्षकही आपल्या काठीसह तिथं आले. त्यांनी शरीराला काठीनं टोचलं. शरीर थोडं फिरलं. ‘‘तो ठीक आहे.’’ अधीक्षक म्हणाले. वधस्तंभापासून दूर जाऊन त्यांनी मोकळा निःश्वास सोडला. त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण अचानक निघून गेला होता. मनगटातल्या घड्याळाकडे बघून ते म्हणाले, ‘‘आठ वाजून आठ मिनिटं. आजच्या सकाळपुरतं इतकं बास. चला, देवाचे आभार मानू.’’

बंदुकांवरच्या संगिनी काढून वॉर्डर निघून गेले. कुत्रा शांत होता. आपण चुकीचं वागल्याची समज असल्यासारखा तो त्यांच्या मागून निघाला. आम्हीही निघालो. फाशी यार्डातून, दोषी कैद्यांना पकडून असलेल्या कोठड्यांना ओलांडून तुरुंगाच्या केंद्रभागात आलो. लाठ्या घेऊन असलेल्या वॉर्डरांच्या देखरेखीखाली इतर कैदी नाश्ता करत होते. लांबच लांब रांगांमधे ते खाली बसले होते. प्रत्येकाच्या हातात अॅल्युमिनियमची थाळी होती. दोन वॉर्डर भात भरलेल्या बादल्या सरकवत कैद्यांना वाढत होते. फाशीनंतर आता हे घरगुती हलकफुलकं वातावरण दिसत होतं. काम संपल्यामुळं आम्हालाही सुटल्यासारखं वाटत होतं. गाणं म्हणावं किंवा सरळ पळत सुटावं किंवा दाबजोर हसावं अशा चित्रविचित्र भावना मनात यायला लागल्या. एकदम सगळेचजण आपापसात कुजबुजू लागले.

माझ्या शेजारून चालत असलेला युरेशियन मुलगा आम्ही आलो तिकडे पाहत सूचक हास्य करून म्हणाला, ‘‘तुम्हाला माहितेय सर, माझ्या मित्रानं (म्हणजे मघाशी मृत झालेला माणूस) जेव्हा त्याची याचिका फेटाळण्यात आल्याचं ऐकलं तेव्हा तो कोठडीतल्या जमिनीवर मुतला होता- भीतीनं.’’ हे बोलून लगेच तो मुलगा म्हणाला, ‘‘सर, ही घ्या एक सिगरेट माझ्याकडून. ही चांदीची पेटी तुम्हाला आवडली नाही का सर? बॉक्सवाल्याकडून घेतली, दोन रुपये आठ आण्याला. क्लासी युरोपियन स्टायलीची आहे.’’

अनेक लोक हसले... कशाला? कोणालाच ते माहीत नव्हतं बहुतेक.

अधीक्षकांबरोबर चालणारा फ्रान्सिस कलकल करत बोलत होता. ‘‘तर मग सर, सगळं समाधानकारकपणे पार पडलं. एका झटक्यात आटोपलं. प्रत्येक वेळी असं नाही होत ना! मी ऐकलंय, काही वेळा डॉक्टरला वधस्तंभाखाली जावं लागतं नि कैदी मेलाय की नाही याची खात्री करायला त्याचे पाय ओढून बघावे लागतात. फारच चुकीचं होतं ते मग.’’

‘‘हां, ते हलवत बसणं ना? फारच वाईट असतं ते’’, अधीक्षक म्हणाले.

‘‘अहो सर, कैद्यानं रोखून धरलं तर याहून वाईट गत होते. एक माणूस एकदा मधल्या खांबाला पकडून राहिला. तुम्हाला पटणार नाही, पण त्याला बाजूला करायला सहा वॉर्डर लागले. त्याचा प्रत्येक पाय धरून तीन-तीन वॉर्डर ओढत होते. आम्ही त्याची समजूतही घातली, ‘मित्रा, तू आम्हाला जो काही त्रास देतोयंस त्याचा विचार कर की!’ पण तो काही ऐकायलाच तयार नव्हता! फारच त्रासदायक ठरला तो!’’

अचानक मला लक्षात आलं की मी खूपच मोठ्यानं हसत होतो. प्रत्येकजणच हसत होता. अधीक्षकही दबून हसत होते. ‘‘तुम्ही सगळे बाहेर येऊन एकेक ड्रिंक घेतलंत तर चांगलं होईल. गाडीमध्ये मी व्हिस्कीची एक बाटली राखून ठेवलीय. त्यावर आपलं भागेल.’’ अधीक्षक म्हणाले.

तुरुंगाच्या गेटच्या मोठ्या कमानीखालून आम्ही रस्त्यावर आलो. ‘‘त्याचे पाय ओढावे लागले.’’ अचानक एक ब्रह्मदेशी अधिकारी ओरडला नि जोरजोरात हसायला लागला. मग आम्ही सगळेच पुन्हा हसायला लागलो. त्या वेळी फ्रान्सिसने सांगितलेला प्रसंग खूपच मजेशीर वाटला. आम्ही एकत्र दारू प्यालो. स्थानिक आणि युरोपीय सगळेच खेळीमेळीनं प्यालो. मेलेला माणूस शंभर मीटर दूर पडला होता.

२४ जून २०१५

शेवटचा पावसाळा (बहुतेक)

कोणी किती पावसाळे बघितलेत यावर माणसांमध्ये काही तरी ठरवतात. जास्त पावसाळे म्हणजे जास्त अनुभव, असं मोजमाप असावं. त्या मोजमापानं रेघेचा हा पाचवा पावसाळा आहे. रेघेच्या या पत्त्यावर दिसणाऱ्या नोंदी २०१० ऑक्टोबरपासून आहेत, त्यामुळं २०११पासूनचा पावसाळा धरला, तर हा २०१५चा पाचवा पावसाळा. (खरी तर रेघेच्या प्रवासाची सुरुवात २००८च्या शेवटाकडं नि २००९च्या सुरुवातीला अशी झालेली आहे, त्यामुळं तिच्यापुरता २००९चा पावसाळाही गृहीत धरायला हवा. मग दोन पावसाळे आणखी वाढतील. पण सध्या इथले पाचच मोजू.)

पाच-सात पावसाळे म्हणजे फारसे नाहीत, पण तरी आता बहुतेक हा रेघेचा शेवटचा पावसाळा आहे असं दिसतंय, त्यामुळं त्या निमित्तानं ही नोंद होतेय. शेवटचा पावसाळा असं का म्हटलं? तर, आता रेघेवर नोंद करावी असं वाटत नाहीये. मुद्दे नाहीत असं नाही, पण अनेक गोष्टी आधी जुळवून आणणं शक्य होत होतं ते आता होत नाहीये. मग अर्धवट कायतरी करण्यापेक्षा थांबलेलं बरं, असं वाटलं. सध्यातरी, हा शेवटचा पावसाळा असं वाचकांना कळवतो आहे. आलीच काही पुन्हा झड, तर सुरू करू. पण सध्या थांबा.

शिवाय, आपण मुळात प्रसारमाध्यमांबद्दल काही नोंदी करण्याचा हेतू समोर ठेवलेला. त्याला धरून गेल्या पाच वर्षांत बऱ्यापैकी नोंदी झाल्या. सुरुवातीला थोडी अडखळ जाणवतेय, पण मग बरं चाललं होतं. यातून माध्यमांच्या व्यवहारातला काही थोडासा तरी पॅटर्न स्पष्ट झाला असेल, तर बरं. दरम्यानच्या काळात, क्रमानं तेहेलका, झेड मॅगझिन, द हूट अशा नियतकालिकं-संकेतस्थळांशी थोडीशी हातमिळवणी करून काही भाषांतरित मजकूर इथं आणला गेला. त्यामध्ये जेवढं करायचं होतं, ते सगळं जमलं नाही. हे पर्याय आणखी चांगल्या पद्धतीनं वापरता आले असते, तर रेघेच्या या प्रयत्नाला आर्थिक पाठबळाचा प्रश्नही सुटला असता, पण ते जमवता आलं नाही. पण पर्याय चाचपले हे एक चांगलं झालं, असं वाटत. 

साहित्याविषयी काही दस्तावेज स्वरूपातलं काम रेघेला समांतर असं सुरू होतं. आणि रेघेवरही सुरू होतं. त्याबद्दल आपण इथं वेगळ्या नोंदी केल्या नाहीत कधी. पण त्या दस्तावेजाचा उपयोग झाल्याचं अधूनमधूून दिसत होतं. चिपळूणला मराठी साहित्य संमेलन झालं त्यावेळी हमीद दलवाईंच्या घरावरून दिंडी नेण्यासंदर्भात काही  वाद झाला. त्यावेळी आलेल्या बातम्यांमध्ये अनेकदा या दस्तावेजातल्या फोटोंचा फायदा झालेला दिसला. अलीकडं 'गांधी मला भेटला'च्या निमित्तानं वसंत गुर्जरांचा जो फोटो माध्यमांमधून मुख्यत्त्वे आला, तोही इथलाच. मध्यंतरी भाऊ पाध्यांचा रेघेवर नोंदवलेला लेख एका मासिकानं स्वतःहून मागितला. त्यांची त्यांना याबद्दल माहिती होऊन रेघेचा उपयोग झाला, हे बरं झालं. याशिवायही इथले काही फोटो आपसूक पसरलेले दिसले. मुळात हे दस्तावेज तयार करताना कुठून ना कुठून कात्रणांसारखं जमा करून ठेवण्याचा प्रयत्न होता. त्या त्या वेळी आपल्याला ज्या व्यक्तींबद्दल कात्रणं जमा करावी वाटली, ती जमा करून ब्लॉगवर चिकटवली, एवढाच प्रयत्न. यात मराठी साहित्यातल्या राजकारणापेक्षा व्यक्तिगत आवडनिवडीचा भाग होता. त्यामुळं भाऊ पाध्ये, अशोक शहाणे, कमल देसाई, श्री. दा. पानवलकर, हमीद दलवाई, सदानंद रेगे, तुळसी परब, वसंत दत्तात्रेय गुर्जर असे ब्लॉग केले. आपण कात्रणं जमवल्यासारखं म्हटलं असलं, तरी प्रत्यक्षात इथं टायपिंग करण्यापासून, ज्यांचा मजकूर आहे त्यांची परवानगी घेण्यापर्यंत इतर अनेक खटपटींमध्ये वेळ गेला. यात फोटो जमवण्यात, मजकूर मिळवण्यात, ज्यांची मदत झाली त्याची नोंदही तिथं तिथं केली आहे. एकूण हा वेळ चांगला गेला आणि त्याचा बऱ्यापैकी उपयोग झाला असं वर्तमानपत्रांमधले किंवा इतर ब्लॉगवर दिसणारे फोटो बघून वाटतं. हे चांगलंच झालं.  पण काही वेळा इथला मजकूर योग्य ते शब्द गाळून, म्हणजे पूर्वप्रसिद्धी कळणार नाही, अशा रितीनं पसरवलाही गेला. काही वेळा त्याचा प्रसार होत आपल्याच रेघेच्याच ई-मेल पत्त्यापर्यंतही आला. काही वेळा या ब्लॉगांच्या घडवणीचं श्रेय वेगळ्याच स्वरूपात वेगळ्याच व्यक्तीच्या नावावर दिलेलंही दिसलं- एक । दोन. हे आश्चर्यकारक नसेल फारसं, पण उबग आणणारं आहे.

प्रतिक्रियांबद्दल बोलायचं, तर नोंदींखाली तशा फारशा नोंदवल्या गेल्या नाहीत, पण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे वेगवेगळ्या वाचकांकडून रेघ वाचली जात असल्याचं कळावं इतपत प्रतिक्रिया आल्या. पत्रकारांपुरतं बोलायचं तर, सोलापुरात एखाद्या वर्तमानपत्रात उप-संपादक/बातमीदार असलेल्या व्यक्तीपासून मुंबईत वृत्तवाहिनीत काम करणाऱ्या पॉप्युलर व्यक्तीपर्यंत वाचक असावेत, किमान अधूनमधून ते रेघ चाळत असावेत, असं वाटण्यासारख्या प्रतिक्रिया आल्या. पत्रकारितेबाहेरच्या वाचकांबद्दल- इतिहास, वगैरे गोष्टींमध्ये संशोधन करणाऱ्या कोणाकोणापासून ते नागपुरात प्राध्यापक असलेल्या कोणाकोणापर्यंत तरी अशा बऱ्यापैकी प्रतिक्रिया अधूनमधून आल्या. व्यक्तींची नावं लिहिण्यापेक्षा ठिकाणं सांगायची तर रेघेच्या वाचकांमधलं कोणी कुठल्यातरी परदेशात, किंवा कोलकाता, मुंबई, सोलापूर, नागपूर, नाशिक, नगर, रत्नागिरी अशा कुठं ना कुठं असल्याचं कळावं एवढं काम या प्रतिक्रियांनी केलं. यातल्या काही प्रतिक्रिया टिंगल स्वरूपातल्याही होत्या, आणि बऱ्यापैकी सकारात्मकसुद्धा होत्या. एकूण मिळून हेही बरं वाटलं. 

रेघेवर ठरवलेलं असूनही न करता आलेल्याही काही नोंदी होत्या. नोम चोम्स्की यांचा 'मुख्यप्रवाही माध्यमं असतात तशी का असतात?' हा लेख आपण मराठीत इथं नोंदवला, पण त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट या पुस्तकाबद्दलची नोंद राहिलीच. काही जुन्या नियतकालिकांमधल्या निवडक लिखाणाच्या खंडांसंबंधी- द बेस्ट ऑफ क्वेस्ट, निवडक माणूस- नोंदी करायची बऱ्यापैकी तयारी करूनही त्या नोंदी झाल्या नाहीत. आणखीही काही मराठी पुस्तकं होती, पण ते जमवता आलं नाही. परत पावसाची झड आली तरच हे शक्य होईल. 

आणखी एक पूर्वीपासून असेलही कदाचित, पण सध्या प्रसारमाध्यमं एवढी वाढूनही, काही ठराविक गोष्टींचा, काही ठराविक व्यक्तींचा व्हॉल्यूम मोठमोठा होत जातो आणि अनेकांचा म्यूट होत जातो, असं वाटलं. अशा म्यूट व्यक्तींच्या आधारानं आपण रेघ चालवायचा प्रयत्न करत होतो. पत्रकारितेत म्यूट होऊन काम करत राहिलेले असतील किंवा बाहेरही आपापलं काम करताना दुसरं काहीतरी निसटल्यामुळं म्यूट झालेले असतील- या लोकांमुळंच रेघ सुरू झाली आणि सुरू राहिली. वरती आपण काही प्रतिक्रिया आल्याचं म्हटलंय, त्यात काही ज्येष्ठ आणि समाजात जास्त ओळखले जाणारे असे लोक आहेतच, त्यांच्या प्रतिक्रियांनाही महत्त्व आहे, पण या म्यूट राहिलेल्या कितीतरी प्रतिक्रिया रेघेला आधार देत होत्या. क्वचितच कधीतरी बोलून या प्रतिक्रिया आल्या असतील, बाकी म्यूट. या प्रतिक्रियांमध्ये अजिबात ढोंग नव्हतं, हे सगळ्यांत सुंदर. अशा बोलक्या आणि म्यूट प्रतिक्रिया देणाऱ्या सगळ्यांचे आभार. त्यांच्याच उल्लेखानं ही नोंद संपवू. 
***

काही ठराविक नोंदी सारख्या जास्त वाचल्या जात असलेल्या म्हणून दिसत राहिल्यानं, त्याच त्याच परत वर दिसतात. त्यावर थोडासा तोडगा म्हणून इथं काही निवडक नोंदींची यादी जोडून ठेवूया. म्हणजे कदाचित काही म्यूट झालेल्या नोंदीही अधूनमधून बोलत्या राहतील.-
***

म्यूट मान्सून (फोटो : स्टीव्ह मॅकरी)

१५ मे २०१५

गांधी मला भेटणार होता, पण दुर्दैवानं आपल्याकडं वेळ फार थोडा आहे!

गांधी मला
वसंत दत्तात्रेय गुर्जरच्या १० x १२च्या खोलीत
६ x २ १/२च्या बाजल्यावर
भारतीय जनतेच्या प्रतीकांत भेटला
तेव्हा तो म्हणाला-
सत्यापासून सौंदर्य वेगळे असू शकत नाही
सत्य हेच सौंदर्य आहे. त्या सत्याच्या द्वारा मी सौंदर्य पहातो
सत्याचा आग्रह ठेवल्यामुळेच तडजोड करण्यात
असलेल्या सौंदर्याचे मोल जाणता येते
सत्य हे वज्राहुनही कठोर आणि कुसुमाहूनही कोमल आहे
- या ओळींपासून सुरू होणाऱ्या 'गांधी मला भेटला' या वसंत दत्तात्रेय गुर्जरांच्या कवितेवरची बंदी आता सर्वोच्च न्यायालयानंही कायम ठेवली आहे. (न्यायालयाच्या निकालाची प्रत) कवितेच्या ज्या प्रकाशनावरून (बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज युनियन, औरंगाबादचं 'बुलेटिन') न्यायालयात खटला सुरू होता, त्या प्रकाशनाचे प्रकाशक म्हणून लातूरचे देविदास तुळजापूरकर यांना न्यायालयात माफी मागावी लागली आणि मग खटला मिटला, असं यासंबंधी प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवरून कळतं. (शिवाय, मुळात कवितेपेक्षाही या सगळ्या घडामोडींना समांतर असा आणखी एक संदर्भ असल्याचंही बोललं जातं. बँक ऑफ महाराष्ट्रनं विजय मल्ल्या यांच्या 'किंगफिशर' या कंपनीला दिलेल्या कर्जाच्या व्यवहारामध्ये काळंबेरं असल्याचा आरोप २०१२ साली झाला होता. हा आरोप तुळजापूरकर यांच्या 'जागलेपणा'मुळं झाला असल्याच्या संशयावरून बँकेनं वेगळी कुरापत काढून या कवितेवरून त्यांच्यावर कारवाईची तयारी केल्याची बातमीही दोन वर्षांपूर्वी 'द हिंदू' या वर्तमानपत्रात आली होती. (सुधारीत माहिती- संघटनेने संपाची हाक दिल्यावर या कारवाईचा धोका टळल्याची माहिती तुळजापूरकर यांनी फोनवरच्या बोलण्यात रेघेला दिली.) अर्थात, कवितेवर खटला सुरू झाल्यानंतर बराच काळ गेल्यावरची ही घडामोड आहे आणि आपण आपल्या बळावर त्याचा आणखी काही तपास करू शकलेलो नाहीयोत, त्यामुळं त्यावर काही बोलता येणार नाही. बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज युनियनच्या नियतकालिकात कविता छापून आली तेव्हा तुळजापूरकर त्याचे संपादन करत होते व संघटनेची प्रशासकीय जबाबदारीही त्यांच्याकडं होती. ही संघटना ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनला संलग्न आहे, त्यामुळं खटला शिखर संस्थेतर्फे चालवला जात होता).

सध्या, प्रकाशकांची या खटल्यातून मुक्तता झाली असली, तरीही या कवितेतून गांधीजींची बदनामी झालेली नाही, हे सिद्ध करण्याची जबाबदारी कवी वसंत गुर्जर यांच्यावरच असल्याचंही न्यायालयानं म्हटलंय. आणि त्यासंदर्भातील पुढील कामकाजासाठी खटला लातूरमधल्या सत्र न्यायालयाकडं वर्ग केला आहे. यासंबंधी काही तपशील पुढील बातम्यांमधून मिळू शकतो: महाराष्ट्र टाइम्स । लोकमत । लोकसत्ता । डीएनए.

वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या (आणि वर ज्यांच्या लिंक दिल्या आहेत त्या सर्व) बातम्यांमध्ये कवीला अजूनही यासंबंधी पूर्ण दिलासा मिळाला नसल्याचं म्हटलं असूनही वृत्तवाहिन्यांमध्ये मात्र खटला संपून चर्चा सुरू झालेल्या दिसल्या. १४ मे रोजी दोन वाहिन्यांवर यासंबंधी रात्रीच्या चर्चा झालेल्या दिसतात. आणखी कुठं असल्यास या नोंदीत दुरुस्ती करावी लागेल. यातल्या 'जय महाराष्ट्र' या वाहिनीनं विषय काय ठेवला, तर: का होते महापुरूषांची बदनामी?

'जय महाराष्ट्र'च्या फेसबुक पानावरून

या चर्चेच्या शेवटी, साहित्यिकांनीही महापुरुषांची बदनामी होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, या आशयाचं वाक्य संबंधित अँकरांनी म्हटलं, पण या चर्चेचा व्हिडिओ इंटरनेटवर आपल्याला न सापडल्यामुळं त्याबद्दल आपण अधिक काही इथं नोंदवत नाहीयोत. तरीही मुळात चर्चेच्या विषयावरूनही एवढं स्पष्ट होतंच की, 'गांधी मला भेटला' या कवितेनं बदनामी झाल्याचं न्यायालयाचं मत मान्य करून, मग अशी एकुणातच महापुरुषांची बदनामी का होते, असा काही जाब विचारण्याची जबाबदारी वाहिनीनं अंगावर घेतलेली आहे.

'एबीपी माझा' वाहिनीवर यासंबंधी झालेल्या चर्चेतही काही गोष्टी कळतात. एक तर, कवितेचं नाव 'गांधी मला भेटला होता' असंही असू शकेल, असं मधे मधे पडद्यावर दिसणाऱ्या शब्दांवरून कळत होतं. शिवाय, या चर्चेचं शीर्षक होतं- 'कवितेच्या वादात 'गांधी' हरले की जिंकले?' हे तसं फारच महत्त्वाकांक्षी शीर्षक आहे, त्यामुळं आपल्यासारख्या सर्वसामान्य प्रेक्षकांना त्याचं उत्तर मिळू शकत नाही, हेही या चर्चेतून कळलं. 

कविता अश्लील-बीभत्स असण्यासंदर्भात, या चर्चेतील सहभागी व्यक्तींपैकी महेश केळुसकर, या कवितेच्या बाजूनं काही म्हणणं मांडतात. दुसरे, समर खडस शेवटी उपरोधानं म्हणतात की, आपण तुकारामाचे अभंगही कोर्टात नेऊ, ते अभंगही बॅन करू, भैरप्पांच्या पर्व कादंबरीत श्रीकृष्णापासून अनेक लोक गोमांस खाताना दाखवले आहेत, अशी एक आपण यादी करू व ते सगळं बॅन करू आणि मग टिनटिन, फॅन्टम अशाच पुस्तकांचा प्रसार करूया.

यू-ट्युबवरील व्हिडिओतील चित्र : एबीपी माझा वाहिनी

आणि त्यानंतर चर्चेचा शेवट करताना अँकर व्यक्ती म्हणाली की, ''आपल्याकडे वेळ फार कमी आहे दुर्दैवाने, परंतु अत्यंत हा मोठा विषय आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य की स्वैराचार, त्यामधला बॅलन्स आपल्याला साधायचा आहे, अनेक मुद्दे आपल्या मान्यवरांनी मांडले होते, अनेक कवितांचा आणि लेखांचा दाखला आपल्याला देण्यात आला, खरं तर दुसरा मुद्दा असाही असू शकतो की यातले काही अभंग किंवा कविता शालेय पाठ्यपुस्तकातसुद्धा नाहीयेत, हेसुद्धा आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाहीये, त्यामुळे जे आपल्या मान्यवरांनी मुद्दे मांडलेले आहेत ते त्यांच्या त्यांच्या परीने अत्यंत महत्त्वाचे आहेत, योग्य की अयोग्य याविषयी वेगळी चर्चा होऊ शकते, आजच्या या चर्चेसाठी आपल्याला या सर्व मान्यवरांनी वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे आभार, माझा विशेषमधे आज इथेच थांबतोय, बघत राहा एबीपी माझा.''

तर, आधीच्या एका मान्यवरांनी ज्याबद्दल उपरोधानं काही बोलू पाहिलं, त्यावर पाणी फिरवून पुन्हा आपल्याला असंच सांगण्यात येतं की, 'काही साहित्य शालेय पाठ्यपुस्तकातसुद्धा नसतं, याकडं आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही!' यावरून काय सिद्ध होतं ते आपल्याला कळू शकत नाही. शालेय पाठ्यपुस्तकात येईल, असंच साहित्य असायला हवं, असा काही सूर आहे काय, तेही कळत नाही. आणि मुळात सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी मांडलेले मुद्दे त्या त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत आणि योग्य की अयोग्य यावर वेगळी चर्चा करता येईल, त्यामुळं मुद्दा लटकता ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे, यावरच आजची चर्चा थांबू शकते. तुम्ही पाहात राहा--

आता आज जशा वृत्तवाहिन्या आहेत, तशा काही ही कविता कवीनं लिहिली तेव्हा नव्हत्या, तरीही कवीनं कवितेचं दुसरं कडवं काय लिहिलं पाहा:
गांधी मला
आकाशवाणी मुंबई ब केंद्राच्या
५३७.६ किलोसायकल्सवर
गांधीवंदना या कार्यक्रमात भेटला
तेव्हा तो बोलला-
महात्म्याचे वचनदेखील बुद्धीच्या कसोटीवर घासून घ्या
आणि ते कसास न उतरल्यास त्याचा त्याग करा
आकाशवाणीच्या निवेदिकेनं सांगितलं-
गांधीवंदना हा कार्यक्रम आपण
६ वाजून ५५ मिनिटं ते ७ वाजून २ मिनिटंपर्यंत
तांत्रिक बिघाडामुळे ऐकू शकला नाहीत
त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत
म्हणजे या सगळ्या माध्यमांच्या व्यवहारातलं तांत्रिक महत्त्व तेव्हा कवीच्या डोक्यात गच्चकन घुसलं असेल असंही असेल. शेवटी कवी पडला १० बाय १२च्या खोलीत राहणारा सर्वसाधारण इसम. यात निवेदिकेचा दोष नाही. काही असेल प्रॉब्लेम तर मूळच्या रचनेत असेल. हेच वृत्तवाहिन्यांना पण लागू होईल का? रचनेचं काही शोधावं वाटलं, तर बरं. नायतर व्यक्तिगत अँकरांची टिंगल केल्यासारखं होईल, आपला तो हेतू नाही, पण तसं ओझरतं होत असेल तर ती रेघेची चूक. तर, हे सगळ्या विषयांवर तांत्रिक पातळी कायम ठेवण्याचं काम आता एवढं वाढलंय,  नि इकडं कवितेवर बंदी येतेय म्हणजे पाहात राहा आता-

आपण ज्याला कडवं असं म्हटलं, तसे ओळींचे चाळीस पुंजके या कवितेत आहेत. त्यातले दोन उदाहरणादाखल आपण दिले. वास्तविक आजूबाजूच्या वास्तवातून काही घटना पाहिल्या की त्यातला एकेक पुंजका वाचकांना आठवत जाऊ शकतो. काही नावं बदलतील, काही तपशील बदलतील, उदाहरण म्हणून हा अठ्ठाविसावा पुंजका पाहा:
गांधी मला
आम जनताकी संपत्ती असलेल्या पृथ्वीवर
बेवारस मुलांच्यात नवरा-बायकोचा खेळ करताना भेटला
तेव्हा तो म्हणाला
निधर्मी देशकी क्या पहचान!
छोडो चड्डी मारो गांड!
हा पुंजका तसा अजूनही कायम आहे. आत्ता परवाच नाही का देशाचे पंतप्रधान छत्तीसगढमधल्या बस्तरमधे जाऊन आले. आणि मग देशाची प्रगती, कोळशाच्या खाणी, असे काही मुद्दे निधर्मी बातम्यांमध्ये आले. चर्चा तर ऐकल्याच असतील तुम्हीही. तर हा पुंजका जसाच्या तसाच लागू होईल.

आणि त्या नंतरचा हा एकोणतिसावा पुंजका:
गांधी मला
हाजी मस्तानच्या साम्राज्यांत दिसला
तेव्हा त्यानं चक्क पंचा सोडला
त्याच्या पंच्यावर मी कधीच गेलो नाही
पंचा काय धोतर काय नि पटलून काय
सत्याचे प्रयोग कशातूनही होतात
हो
अगदी कवितेतूनसुद्धा
परवा 'दीवार' नावाचा चित्रपट लागला होता एका वाहिनीवर, तर त्यात मधे मधे काही पूरक माहिती सांगत-दाखवत होते, त्यात या चित्रपटातील हिरो अमिताभ बच्चन यांची अलीकडची काही मुलाखत थोडी थोडी दाखवत होते, त्यात मुलाखत घेणारी व्यक्ती अमिताभ यांना म्हणते, 'तुमच्या या व्यक्तिरेखेवर हाजी मस्तान साहेब यांचा प्रभाव असल्याचं म्हणतात, तर त्याबद्दल...' मग त्याबद्दल बोलणं होतं. असं आहे. मस्तान साहेबांचे प्रयोग किती महत्त्वाचे ठरलेत पाहा. आणि हे काय कवितेतून करतात काय माहीत!

आणि मग रोजच्यासारखे अग्रलेख वाचले कीसुद्धा ही कविता कोणाला आठवू शकते. कवितेतला एकोणचाळिसावा पुंजका पाहा ना:
गांधी मला
अत्र्यांच्या शिवशक्तीत
गांधीवर अग्रलेख लिहिताना दिसला
गांधीत अग्रलेख लिहिताना दिसला
गांधीत आम्ही ईश्वराचे दर्शन घेतले
धन्य झालो
अब्जावधी वर्षात आता ईश्वर पृथ्वीवर येणार नाही
स्वदेशी राहा-स्वदेश बना
असं म्हणून त्यांनी देशीला जवळ केलं
तर, अत्र्यांचे पत्रकारितेतले प्रयोगही अजून टिकून आहेत. म्हणजे हजार वर्षांना पुरून उरेल असा आत्मविश्वास, जमेल तेवढी समोरच्याला व्यक्तिगत पातळीवर हलक्यात काढणारी भाषा, हे सगळं कायम आहे. फक्त वृत्तपत्रंच नाही, तर वृत्तवाहिन्यांनीही ते प्रयोग कायम ठेवलेत असं आपलं १० बाय १२ मत आहे. आणि रेघेचा विषय आहे म्हणून सारखं ते आठवत असेल. पण ते तितकंसं महत्त्वाचं नाही. मुद्दा आहे तो, आता कवीवरचा आरोप अजूनही कायम आहे, त्यावर काही मत आहे काय आपलं? तर, रेघेपुरतं मत एवढंच की, या कवितेत गांधीजींची बदनामी झालेली नाही आणि ही कविता बीभत्स किंवा अश्लील नाही. न्यायालयानं निकाल दिलाय म्हणून आणि कवीला अडचणीत आणणं बरोबर नाही म्हणून, आपण ही कविता इथं पूर्ण देत नाहीयोत. तरीही आपल्या सगळ्यांना वाचक म्हणून यावर काही बोलता यावं एवढ्यापुरतं दाखला म्हणून काही पुंजके जोडलेत, त्यातून काही कायदेभंग झाला असेलच, तर तो सविनय आहे.

तर, या सगळ्या चर्चेच्या शेवटी मग गांधीजींचं काय झालं? ते कवीला भेटले असा दावा केलाय कवीनं, तर मग आपल्याला भेटणार होते, असं नोंदीच्या शीर्षकात लिहिलंय त्याचं काय झालं?
गांधीबाबा राजघाटावर
वसंत दत्तात्रेय गुर्जरच्या
खांद्यावर हात ठेवून म्हणाला-
देव मेला आहे देवमाणूसही मेला आहे
आता सैतानांच्या विश्वात मेलेल्या देवाला मुक्ती नाही
आणि देवमाणसाला तर नाहीच नाही
असं सगळं असताना, आत्तापर्यंत या खटल्यात मानसिक काही त्रास झाला असला तरी कवीला आर्थिक आणि शारीरिक तोशीस पडलेली नाही, असा उल्लेख आपण मागं एका नोंदीत केला होता. आता कधी लातूरच्या कोर्टात सुनावणी होईल तेव्हा कवीला आपल्या कवितेचं समर्थन करायला जावं लागेल, तोपर्यंत तुम्ही गुर्जरांना याबद्दल काही विचारलंत, तर ते म्हणतील- हो हो सगळं ती संघटनाच बघतेय (बँक कर्मचारी संघटना), तर आता ते सांगतील, वकील सांगतील तेव्हा कोर्टात जायला लागेल, तोपर्यंत काय नाय काय नाय त्रास. आणि हसतील!

२३ एप्रिल २०१५

अशोक केळकरांनी नोंदवलेली पुस्तक प्रकाशनाची हकिगत

आज आंतरराष्ट्रीय पुस्तक दिवस आहे. इंग्रजी नाटककार शेक्सपिअर, स्पॅनिश लेखक सर्व्हांटिस अशा कोणाकोणाच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं आणि आणखी काही लेखकांच्या जयंतीच्या निमित्तानं हा दिवस पुस्तकांचा म्हणून साजरा केला जातो, असं संयुक्त राष्ट्र संघटनेचं संकेतस्थळ सांगतं. या निमित्तानं ही नोंद होतेय.

अशोक केळकर (२२ एप्रिल १९२९-२० सप्टेंबर २०१४)
छायाचित्र: 'रुजुवात'च्या मलपृष्ठावरून/कुमार गोखले
शिवाय, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात भाषावैज्ञानिक आणि समीक्षक अशोक केळकर यांचं निधन झालं होतं, त्याबद्दल आपण रेघेवर काही करू शकलो नव्हतो. काही करायलाच हवं अशी सक्ती नव्हती. तरी संबंधित विषयातल्या कोणा व्यक्तीकडून केळकरांबद्दल काही मजकूर रेघेवर आणायचा प्रयत्न होता, पण ते जमलं नाही. अजूनही जमलेलं नाही. पण आज, पुस्तक दिवसाच्या या नोंदीला मात्र केळकरांच्या आठवणीचंही निमित्त आहे. असं का बरं?

तर, केळकरांच्या निवडक लेखनाचं 'रुजुवात' (पहिली आवृत्ती- २००८) हे लोकवाङ्मयगृहातर्फे प्रकाशित झालेलं एक पुस्तक आहे. या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता २०१० साली. (शिवाय, त्यापूर्वी, २००२मध्ये केळकरांना पद्मश्री सन्मानही मिळालेला). या पुस्तकातल्या लेखकाच्या मनोगतात केळकर काय म्हणतात हे जागतिक पुस्तक दिवशी आपण नोंदवायला हवं. मगच मराठीत हा दिवस साजरा केल्यासारखं होईल. या मनोगतामध्ये केळकरांनी या पुस्तकाच्या प्रकाशनासंबंधीची हकिगत सांगितलेय तेवढाच भाग इथं नोंदवला आहे. केळकर राहत होते ते पुणे शहर, त्यांचा प्राध्यापकीचा पेशा, साहित्यातल्या काही मंडळींशी असलेली आपसूक ओळख, शिवाय मूलभूत कामामुळं नावाला असलेलं वजन, या सगळ्या पार्श्वभूमीवरही त्यांना हा अनुभव आलेला आहे. शिवाय याच पार्श्वभूमीवर त्यांनी वापरलेले मराठी वाङ्मयजगत्, वाचकांची पिढी असे शब्द पाहायला हवेत असं वाटतं. या शब्दांचा अर्थ नक्की काय आहे, हे रेघेला समजू शकलेलं नाही, आणि त्यामुळं केळकरांनी या गोष्टींबद्दल जी अपेक्षा व्यक्ती केलेय, तीही आपल्याला अजून तरी नीट समजून आलेली नाही, एवढं नोंदवू. म्हणजे हे शब्द वापरल्यावर जेवढा आकार अपेक्षित आहेसं वाटतं, त्या तुलनेत खरा आकार काय आहे, हे कळेनासं होतं. रेघेची मर्यादा असेल ही. तरी पण एकूण पुस्तक प्रकाशनाबद्दल केळकरांनी जे नोंदवलंय, ते आपण इथं वाचू. बाकी, वाचकांनाही याबद्दल काही वेगळं म्हणायचं असेल, तर प्रतिक्रियेला जागा आहेच.

तर, केळकर (२००८मध्ये) म्हणतात:
ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या पत्नी शीलवती यांना एका प्रसंगी असे वाटून गेले की, 'मीच हे सांगितले पाहिजे' आणि तेच त्यांनी आपल्या आत्मनिवेदनपर पुस्तकाला (१९६९) नाव दिलं. मलाही सध्या असेच वाटतेय की मलाच ते सांगितले पाहिजे.

तुमच्यापैकी काही जणांना आठवेल की १९८३ साली मी आपल्या साहित्य, कला, साहित्याची भाषा या विषयांवरच्या लेखसंग्रहाची पूर्वसूचना 'रुजवात' या नावाने दिली होती. तसे म्हटले तर पुस्तक केव्हाच तयार होते, पण नंतर बराच उशीर झाला हे खरे. त्याबद्दल विचारणाही होत राहिली. या उशिराची जशी कारणे आहेत तसे परिणामही आहेत. ही कारणे आणि परिणाम केवळ व्यक्तिगत नाहीत तर सार्वजनिकही आहेत.

सतीश काळसेकरांच्या एका टिपणामुळे हे माझ्या ध्यानात आले. ते लिहितात (लोकवाङ्मयगृहाच्या वाङ्मयवृत्त पत्रिकेतील त्यांचा 'वाचणाऱ्याची रोजनिशी' हा स्तंभ, ऑगस्ट २००५) : ''अनेकदा त्या त्या काळासाठी महत्त्वाचे लेखन नियतकालिकांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत येते, पण ते योग्य त्या तत्परतेने ग्रंथबद्ध होत नाही. त्यामुळे बाहेरचे वाचक त्या लेखनाला मुकतात.'' (मला तर दिसते की नियतकालिकांच्या वाचकांनाही असे लेखन दखलपात्र वाटत नाही!) समीक्षात्मक आणि सर्जनात्मक अशी दोन्ही प्रकारची उदाहरणे काळसेकर देतात. ''यात दोष कुणाचा- प्रकाशकांनी तत्परता न दाखवल्याचा, लिहिणाऱ्यांना ग्रंथरूप आणण्यात उदासीनता असल्याचा की वाचकांची मागणी नसल्याचा, यावर आता चर्चा कामाची होणार नाही.'' असेही ते पुढे म्हणतात. का बरे अशी चर्चा कामाची होणार नाही? पुढच्यास काय ठेच लागली हे कळून मागचा शाहणा होणार नाही का? म्हणूनच तर प्रस्तुत पुस्तकाच्या संबंधीची हकिगत जरा मोकळेपणाने पण थोडक्यात सांगायचे योजले आहे.

माझे भाषा, साहित्य, कला याविषयीचे चिंतन मराठी भाषेत वाचकांपर्यंत जरा उशिराच पोचायला लागले- म्हणजे माझ्या चाळिशीच्या जवळपास. (इंग्रजीतले साहित्य, कला विषयीचे लेखनही त्याच सुमारास वाचकांपर्यंत पोचले. मात्र इंग्रजीतला भाषाविषयक पहिला लेख १९५७ साली बाहेर पडला- म्हणजे डॉक्टरेट मिळून माझी लांबलेली विद्यार्थीदशा उरकण्याच्या वर्षभर अगोदरच). माझे काही मराठी लेख बाहेर पडल्यावर मौज प्रकाशनातर्फे श्री. पु. भागवतांनी त्यांचे पुस्तक काढण्यात रस दाखवला. मी त्यावर म्हटले : वैज्ञानिक आणि समीक्षात्मक अशा भिन्न वळणाचे आणि भाषा आणि साहित्य-कला अशा भिन्न विषयांवरचे हे लेखन आहे, थोडा समान वाचकवर्ग सोडला तर बाकीचा बराचसा वेगवेगळा आहे, तेव्हा सगळ्या लेखांचा एकत्र संग्रह काढणे व्यवहार्य होणार नाही, बरे, दोन संग्रह काढायचे तर तेवढा ऐवज जमेपर्यंत थांबावे लागेल. भागवतांना ते पटले. नंतर ऐवज जमला. तेवढ्यात मॅजेस्टिक प्रकाशनाचे केशव कोठावळे मला म्हणतात : ललित आणि धार्मिक या सुरक्षित पुस्तकांखेरीज वैचारिक पुस्तकेही काढण्याच्या विचारात आम्ही आहोत, तुमच्या भाषाविषयक लेखांचा संग्रह काढण्यात आम्हाला रस आहे. १९८३मधे वैखरी : भाषा आणि भाषाव्यवहार पुस्तक निघालेही. (त्याला चार पारितोषिके मिळूनही माफक किमतीतली ५००ची आवृत्ती संपवायला मराठी वाचक आणि ग्रंथालयांनी तब्बल सतरा वर्षे घेतली!) साहित्य, कला, साहित्याची भाषा विषयक लेखसंग्रहाची मुद्रणप्रत पाहिल्यावर भागवतांच्या मनात आले : केळकर, तुमच्या मनात तशी योजना नसावी, पण तुमची एक सुसंगत भूमिका असल्यामुळे हे लेख जणू काही एका ग्रंथाची प्रकरणे वाटतात, थोडे संपादन करून एक सलग प्रकरणशः ग्रंथ नाही का होणार? मला ही कल्पना पटली, पण ती तडीला जायची नव्हती.

निवांतपणे अध्ययन, चिंतन करायला मी तेव्हा मोकळा नव्हतो. अध्यापन, संशोधन, मार्गदर्शन, चर्चा, व्याख्याने, लोकशिक्षण, संस्थागत जीवन असे माझे उद्योग भरात आले होते. लेखन चालूच होते. तेही भाषा, साहित्य, कला, चिन्हव्यवहार, संलग्न तत्त्वविचार अशा विविध विषयांवर आणि इंग्रजी, मराठी, हिंदी या त्रिभाषासूत्रानुसार. त्यामुळे संकल्पित ग्रंथसंपादनाला काही हात लागेना. दुसरी एक अडचण होती. भूमिकेच्या सातत्यामुळे अशा लेखांना जसा प्रकरण-संदर्भ असतो तसा त्या त्या वेळच्या वाचकसंवादामुळे अशा लेखांना एक प्रसंग-संदर्भही लाभलेला असतो. त्यामुळे लेखांना संपादनासाठी हात लाववेना. लेखांचा ताजेपणा जाऊन एक सुरक्षित पाठ्यपुस्तक तयार करायचे माझ्या मनातही नव्हते. प्रकरणशः ग्रंथाचा बेत मी मनात सोडून दिला, तरी भागवतांना तसे सांगायला माझी जीभ रेटेना आणि भागवतांना स्वतःहून माझी अडचण असल्याचे काही ओळखेना. थोडक्यात सांगायचे म्हणजे मी आणि भागवत दोघेही चकलो आणि चुकलोही. एवढ्यात काही अंतर्गत अडचणींमुळे मौज प्रकाशनाने मला वचनमुक्त केले.

मग मी हरिभाऊ मोट्यांकडे लेखांची फाइल घेऊन गेलो. (कृष्णाबाई-बाळूताई या खरेमास्तरांच्या मुली माझ्या वडिलांच्या लोभातल्या विद्यार्थिनी असल्यामुळे ओळख होती.) त्यांनी आठवडाभर फाइल ठेवून घेतली, नंतर ते म्हणाले : मला समीक्षाक्षेत्रातले फार कळते असे नाही, पण मी नेहमी वेगळ्या लेखनाच्या शोधात असतो तसे हे नक्कीच आहे. सध्या माझ्या हातात एक पुस्तक आहे, दीडदोन महिन्यांत मी त्यातून मोकळा होईन, मग ताबडतोब तुमचे पुस्तक हाती घेऊ. दुर्दैवाने तेवढ्यात मोट्यांचे निधन झाले (१९८२). मोट्यांनी पुस्तक स्वीकारले यात मी भरून पावलो. इकडे मौजेची अंतर्गत अडचण दूर झाली आणि त्यांनी पुन्हा रस दाखवला. पण प्रकरणशः ग्रंथाचा बेत तर मी सोडून दिलेला. इकडे नवीन लेखांची भर पडत गेल्याने पुस्तकाचे आकरमान आटोपसर न राहता क्रमाने वाढतच राहिले. नंतर माझ्या एका लोभातल्या विद्यार्थ्यामार्फत देशमुख आणि कंपनीने रस दाखवला, पण त्यांना लेखांची संख्या कमी करून पाहिजे होती- जे मला लेखनाची तार्किक वीण ध्यानात घेता पटण्यासारखे नव्हते. पॉप्युलर प्रकाशनानेही रस दाखवला, पण नंतर माझ्या स्मरणपत्राला त्यांनी उत्तरही पाठवले नाही, त्यांचा विचार बदलला असावा. मराठी प्रकाशनव्यवहार पुढे पूर्वीइतका पारदर्शक राहिला नाही त्याची ही सुरुवात तर नव्हती? नंतर माझ्या त्या विद्यार्थ्याने पद्मगंधा प्रकाशनाच्या अरुण जाखड्यांना विचारले. ते म्हणाले : समीक्षेची दोन-तीन पुस्तके मी नुकतीच काढली आहे, तेव्हा वर्षभर तरी आणखी एक जोखमीचे पुस्तक मी घेणार नाही. त्यांचा हा प्रांजळपणा मला खरोखरी आवडला.

पुस्तकाची घोषणा झाल्यापासून वाचकांची अधूनमधून त्याबद्दल चौकशी चालूच होती. दिवस चालले होते. वाचकांच्या पिढ्या उलटत गेल्या. काहींनी तर मला भाषातज्ज्ञ या कप्प्यात बंदिस्त केले. काहींनी मी मराठीत पुरेसे समीक्षात्मक लेखन करीत नाही अशी तक्रार केली. काहींनी तर स्पष्टच म्हटले : या इंग्लिश साहित्याच्या अभ्यासकांची मराठी समीक्षेत लुडबूड हवी कशाला? मी पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल उदासीन झालो नाही, पण उदास मात्र झालो. या काळ्या ढगाला एक चंदेरी अस्तर होते. (इंग्रजी म्हणीतले silver lining म्हणजे piping किनार नव्हे तर अस्तर. उंच डोंगरावरून किंवा उंच उडणाऱ्या विमानातून हे विलोभनीय दृश्य तुम्ही पाहिले आहे का?) एक तर, नंतरच्या पिढ्यांची माझ्या अनलंकृत आणि 'घट्ट' भाषेबद्दल तक्रार नव्हती- जशी ती आधीच्या पिढ्यांची नक्कीच होती. ('घट्ट' हा धनंजयराव गाडगिळांनी आमच्या पिढीला दिलेला शब्द.) त्याहून म्हणजे नव्या पिढीतल्या एकाने जरा वैतागूनच म्हटले : दिलीप चित्रे, अशोक केळकर, राम बापट, भा. ल. भोळे यांचे समीक्षात्मक व वैचारिक लेखन पुरेशा प्रमाणात आणि वेळच्या वेळी पुस्तकरूपाने प्रकाशित न झाल्यामुळे आमच्या पिढीचे फार नुकसान झाले आहे.
काही दिवसांपूर्वी दुसऱ्या काही निमित्ताने काळसेकरांचे एक पत्र आले, त्याच्या शेवटी एक लहानसा ताजा कलम होता : आपल्या पुढच्या लेखनाच्या संग्रहाचे काम कुठे अडत आहे? कुठे अडत आहे हे मी त्यांना सांगितल्यावर लोकवाङ्मयगृहाने त्याचे प्रकाशन मनावर घेतले, आणि ही प्रकाशनपूर्वी कहाणी संपते. ती प्रातिनिधिक आहे का?

यात दोष कुणाचा? इथे 'दोष ना कुणाचा' असे म्हणण्याची सोय नाही. दोष म्हणायचा तर प्रकाशकांची उदासीनता, लेखकांची अ-तत्परता, आणि आपल्या वाचन-संस्कृतीचा एकारलेपणा असा संमिश्र आहे. मराठी वाङ्मयजगत् भारतात त्यातल्या त्यात पुढारलेल्यांपैकी एक आहे असे म्हणायचे तर आपल्यासमोरचे हे उदाहरण फारसे उत्साहजनक नाही. जेव्हा पुस्तक प्रकाशित होते तेव्हा या त्रयीत आणखी दोन घटक हिशोबात घ्यावे लागतात. त्यांतला एक वितरक- उत्तर भारतात लुटारू पद्धतीने या त्रयीचे शोषण करणारा पापग्रह असे त्याचे वर्णन माझ्या कानांवर आले आहे, मराठी वाङ्मयजगतामधली वितरणासंबंधीची स्थिती काय आहे याची मला कल्पना नाही. राहता राहिला पाचवा घटक म्हणजे ग्रंथपरीक्षण लिहिणारा, पारितोषिकाच्या निवडसमितीचा सदस्य इत्यादी. या घटकाला कितपत महत्त्व आहे याबद्दल मला शंका आहे. हा घटक जेव्हा प्रकाशकाचा सल्लागार म्हणून काम करतो तेव्हा त्याला थोडेबहुत महत्त्व असावे.

पुस्तक प्रकाशित होऊनदेखील दुर्लक्षित कसे राहते याचा माझा एक अनुभव या संदर्भात सांगितल्याशिवाय मला राहवत नाही. प्राचीन भारतीय साहित्यमीमांसेविषयी एक-दोन मराठी पुस्तके वाचली. (शाळेत संस्कृतऐवजी फ्रेंच भाषा घेतली होती त्यामुळे थेट संस्कृतपर्यंत पोचण्याचा प्रश्न नव्हता.) पण विशेष प्रभाव पडला नाही. नंतर दि. के. बेडेकर आणि ग. त्र्यं. देशपांडे यांच्या लेखनामुळे तिकडे गंभीरपणे पाहू लागलो- विशेषतः तिच्यामधल्या रससिद्धांताकडे. मल लक्षात आले की बेडेकर आणि देशपांडे यांचे विवेचन परस्परपूरक आहे, त्यांचा एकत्र विचार करणे जरुरीचे आहे. त्याप्रमाणे मी एक दीर्घ लेख लिहिला. सुरेंद्र बारलिंगे त्यांच्या नेहमीच्या उत्साहात पुणे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागातर्फे परामर्श हे नवीन नियतकालिक काढत होते. त्याच्या पहिल्या अंकात लेख छापून आला. त्याच कंपोजवरून लेखाची प्राचीन मराठी साहित्यमीमांसा : एक आकलन नावाची पुस्तिकाही पाठोपाठ निघाली. बेडेकरांचे इतक्यात निधन झाले, पण देशपांड्यांना मी ती दाखवू शकलो. ते म्हणाले : बेडेकरांचे लेखन वाचल्यावर माझ्या पुस्तकाची फेरमांडणी करावी लागेल हे माझ्या लक्षात आले, पण मध्यंतरी मी वैदिक संशोधनात गुरफटून गेलो, माझ्या पुस्तकात किरकोळ सुधारणा करण्याखेरीज मी काही करू शकलो नाही याची रूखरूख होती. तुझ्या पुस्तिकेने ती दूर झाली, त्याबद्दल शाबास! नंतर देशपांडेही निधन पावले. या पुस्तकेची कुणकूण लागल्यावर हिंदीभाषक आणि गुजरातीभाषक यांनी तिचे अनुवाद करवले. हिंदी अनुवादाला मध्यप्रदेश साहित्य अकादेमीने पुरस्कार दिल्याची बातमी आली. यावर मराठीच्या काही प्राध्यापकांनी मला विचारले : तुम्ही हे पुस्तक अगोदर मराठीत का लिहिले नाही? आता बोला! मूळ मराठी पुस्तक अर्थात् अजूनही दुर्लक्षित आहे. (म. वा. धोंडांचे त्याच्याकडे लक्ष गेले, त्यांना ते आवडले आणि त्यांनी एका पारितोषिकाच्या निवड समितीत असताना त्याची शिफारसही केली, पण उपयोग झाला नाही. धोंड मला सांगतात : इतर सदस्यांनी त्यांनी बरोबर नेलेले पुस्तक उघडलेही नाही, केवळ नव्वद पानांच्या चोपड्याला काय बक्षीस द्यायचे हा त्यांचा अभिप्राय). मला आता राग येत नाही की वाईट वाटत नाही.
मराठी वाङ्मयजगत् पुढारलेले असेल, पण ते परवापरवापर्यंत स्वतःतच मश्गूल असे. इंग्रजी आणि संस्कृतखेरीज इतर लेखनाशी कुणाला फारसा संपर्क ठेवावासा वाटत नाही. ज्या मराठी मंडळींचा असा संपर्क असतो त्यांनी मराठी वाङ्मयजगताशी संपर्क ठेवावा असे वाटेलच असे नाही, किंबहुना त्यांना मराठी वाङ्मय फारशा गांभीर्याने घ्यावेसे वाटत नाही. इंग्रजी शिकवणाऱ्या वासुदेव बळवंत पटवर्धनांची (१८७०-१९२१) परंपरा पुढे क्षीण झाली. गेल्या एक-दोन वाङ्मयीन पिढ्यांमध्ये या दशेत थोडा बदल होत आहे अशी चिन्हे आहेत.
पुढच्यास काय ठेच लागली हे कळून मागचा शाहणा व्हावा या हेतूनं केळकरांनी ही चर्चा केल्याचं म्हटलंय. असं काही झालेलं दिसतंय काय? मुद्दा जुनाच आहे, म्हणतील काही लोक, पण त्यावर काही चर्चा पुढं गेलेली आहे काय? तसं काही होत नाही तोपर्यंत मराठी वाङ्मयजगत्, वाचकांची पिढी या शब्दांचे अर्थ ढोबळ पातळीवर तरी निश्चित कसे करायचे?

१८ एप्रिल २०१५

कोणत्या प्रकारचा मुकेपणा?

एक प्रकारचा मुकेपणा
- विलास सारंग

It is all very fine to keep silent, but one must also consider the kind of silence one keeps.

(मुकाट राहणं वगैरे ठीक, परंतु कोणत्या प्रकारचा मुकेपणा आपण राखतो याचाही विचार करायला हवा.)

- सॅम्युअल बेकेट ('दि अन्-नेमेबल')

उद्या सकाळी सगळे वेळेवर जमतील. ह्या खुर्चीचा कधीतरी भुगा-भुगा होऊन जाईल. तऱ्हेतऱ्हेचे प्राणी सरपटत किनाऱ्यावर येतील. ही वही भरून जाईल. रस्ता ओलांडू पाहणारी बहुतेक माणसं पलिकडल्या बाजूला पोहचतील. सगळ्या वस्तू त्रिकोणी बनतील. तीनचार अधिकारी हरेक जिनसेवर I. S. I.चा शिक्का मारीत सुटतील. या ना त्या हाताकरवी पानं उलटली जातील. माणसं मरतील. जनावरं जगतील. दिवे भडकतील. कॅलेंडरं सदेह स्वर्गाला जातील.

                                                                 असे प्रश्न मला का पडतात? चारांपैकी कोणत्या भिंतीत गुप्तधन पुरलेलं आहे? उरलेले संदर्भ केव्हा सापडतील? तो कधी गेला? हे कधी आले? खिडक्या आपोआप कशा बंद झाल्या? कोणाकोणाच्या पायाला सूज आली आहे? मागे उल्लेखिलेले पर्वतप्राय प्राणी केव्हा दृग्गोचर होती? हे कसले आवाज कानांवर पडताहेत? ही पुस्तकं कोरी का? या टाचण्यांची दोन्ही टोकं तीक्ष्ण कशासाठी? 

आम्ही आमच्या परीने प्रयत्न केले. जे आले ते फूटपट्टीच्या भावाने विकले गेले. त्याने वेगवेगळे आविर्भाव करून पाहिले. ट्यूबमधून टूथपेस्ट बाहेर येताच ते दशदिशांना पळाले. तिचे डोळे गेले.
                                                                                                                      पक्षी उडाला, तर फांदी 
मोडेल. आम्हाला हमी दिली गेली, तर आम्ही फोन करण्याचा प्रयत्न करू. तोंड उघडलं, तर अळ्यांची घृणास्पद हालचाल दृष्टोत्पत्तीस येईल. अनवधानाने मान वळवली, तर हृदयक्रिया बंद पडेल.

पेपरवेटशी चाळा
करणं धोक्याचं आहे.

...

मौज प्रकाशन । पहिली आवृत्ती: जून१९८६
मुखपृष्ठ: बाळ ठाकूर
एक प्रकारचा मुकेपणा, ही कविता आणखी आहे पुढं. छापील पुस्तकातली मांडणी इथं या पडद्यावर तशी करता आलेली नाही, जमेल तेवढी तशी ठेवायचा प्रयत्न केला आहे, पण बहुधा ती प्रत्येकाला आपापल्या पडद्यानुसार वेगवेगळी दिसत असणार, त्यामुळं मांडणीतल्या दोषाबद्दल माफी.

ही कविता, मौज प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या 'कविता : १९६९-१९८४' या सारंगांच्या पुस्तकात आहे. सारंगाचं १४ एप्रिलला निधन झालं. त्यानंतर मराठी वृत्तवाहिन्यांना काही करावंसं न वाटणं साहजिक आहे. मराठी-इंग्रजीत इतकी वर्षं लिहिता असलेला लेखक मुंबईत गोरेगावातून आपल्याला सोडून जातो, याच्याशी इंग्रजी वर्तमानपत्रांना काही देणंघेणं नाही, हेही साहजिक आहे. मराठी वर्तमानपत्रांमधे काही ना काही आलं. लोकसत्तेनं १५ एप्रिलला पहिल्या पानावरची मुख्य बातमी सारंगांच्या जाण्याची केली होती, शिवाय विशेष संपादकीयही लिहिलं, हे नोंदवण्यासारखं. शिवाय, इतर मराठी वर्तमानपत्रांमधे पण काही ना काही आलं. कदाचित उद्याच्या किंवा त्याच्या पुढच्या रविवार पुरवण्यांमधे अजून काही करतील. पण सारंगांच्या बाबतीत जे बोललं जाईल- एवढ्या वेळेपुरतं तरी, ते नक्की काय आहे, त्यात असलेला कमी-जास्त मुकेपणा नक्की कशा प्रकारचा आहे? या प्रश्नाचं उत्तर शोधायला हवं. माध्यमं कशाबद्दल बोलतात नि कशाबद्दल मुकी राहतात, या दुसऱ्या एका प्रश्नाचं उत्तर आपल्या कुवतीनुसार शोधण्यासाठी आपण पाच वर्षं रेघ मारत बसलोय. त्याच्याशी सारंगांचा काही ना काही संबंध आहे, हे वरच्या कवितेतल्या काही ओळींवरून वाचकांनाही वाटेल, अशी आशा आहे. किंवा मग रेघेवर आत्तार्यंत किमान सहा नोंदींमधे आलेले सारंगांचे संदर्भ पाहता येतील-

विलास सारंग, फ्रान्झ काफ्का व पत्रकारिता
रस्त्याकडची खिडकी
आल्बेर काम्यू : ४ जानेवारी
प्रकाश नारायण संत : दहा वर्षं। आठवण व पळवाट
'अन्वीक्षण' त्रैमासिकाच्या निमित्ताने नोंद
'लॅफम्स क्वार्टरली', आधी होऊन गेलेले लोक आणि सदानंद रेगे

अजूनही असतील कदाचित नोंदी, पण एवढं काही काटेकोर मोजलेलं नाही. सारंग म्हणजे अशा अनेक संदर्भांचं जाळं होते. साहित्यातून बोलण्याऐवजी साहित्याबाहेरच कायतरी मोठमोठ्यानं बोलणं, आणि सोईस्कर गप्प बसणं, आणि त्यातून बंडखोरी-बंडखोरी असंच सारखं खेळत बसणं, हे खूप आपल्याकडं जरा जास्तच वाढलंय. यावर काही तपासणी करून शोधणं शक्य आहे का ते माहीत नाही, पण जाणवलेलं नोंदवलं. सारंगांच्या शब्दांमधे, सगळं इन्ब्रीडिंगनं कोळपलेलं वाटतं. पण तरीही सारंग या साहित्य- वाङ्मयाच्या जाळ्यात आपली वीण इतकी वर्षं मन लावून घालत बसले होते. ती वीण आता थांबली.


दुसरी गोष्ट- वसंत गुर्जर यांच्या 'गांधी मला भेटला' या कवितेवरून सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात झाल्याची बातमी मात्र मराठीसोबतच इंग्रजी वर्तमानपत्रांमधेही आलेय! (इकॉनॉमिक टाइम्स। डीएनए । टाइम्स ऑफ इंडिया । लोकसत्ता । महाराष्ट्र टाइम्स). ही कविता बीभत्स आणि अश्लील असल्याच्या आरोपावरून गेली कित्येक वर्षं हा खटला चालू आहे. नुसती कविता असली तर कोण कशाला वाचेल, पण ती बीभत्स-अश्लील असल्याचा आरोप असेल, त्यातही तो सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचला असेल, तर एवढ्या बातम्या! पतित पावन संघटनेनं यासंबंधी मुळात तक्रार दाखल केली होती. या संदर्भात वकील, प्रकाशक वगैरे मंडळी मदतशीर निघाल्यामुळं गुर्जरांना न्यायालयाच्या वाऱ्या करण्याचा आणि आर्थिक खर्चाचा भार उचलावा लागलेला नाही, हेच त्यातल्या त्यात समाधान मानू. गुर्जरांचं वय पाहून त्यांच्या बाबतीत काही लोकांना आस्थेपोटी या शंका असल्याचं कळलं, म्हणून हे स्पष्टीकरण इथं नोंदवूया. ही माहिती गुर्जरांकडूनच मिळाली. पण भविष्यात त्यांना त्रास होईल किंवा नाही, हे आत्ता आपल्याला सांगता येणार नाही.  (गुर्जरांबद्दल अधिक माहितीसाठी हे पाहता येईल: vasantdattatreyagurjar.blogspot.in). या खटल्यासंबंधी गुर्जरांनी 'महाराष्ट्र टाइम्स'ला दिलेली प्रतिक्रिया अशी आहे:
''मी कवितेत जे काही म्हटलेय ते गांधींसंदर्भात नाही, तर गांधींच्या पश्चात सगळ्याच पातळ्यांवर भारताचं जे अवमूल्यन झालेय, त्यावर टीका करणारी ही कविता आहे. गांधींच्या पश्चात माजलेली ही अराजकता असल्यामुळेच, ही कविता ज्या पोस्टरवर छापून आली होती, त्या पोस्टरवर गांधीजींचे पाठमोरे रेखाचित्र छापण्यात आले होते. पण कवीला अपेक्षित असलेला व्यंग्यार्थ, कवितेवर खटला दाखल करणा‍ऱ्यांना कळलाच नाही, ही अभिव्यक्तीची शोकांतिका आहेच, पण त्यांना गांधी कळला नाही, याचेही हे उत्तम उदाहरण आहे.''
खटल्यामध्ये कवितेचं जे प्रकाशन गृहीत धरलंय ते ऑल इंडिया बँक असोसिएशनच्या नियतकालिकामधलं-१९९४ सालचं आहे. त्यापूर्वी १९८४ साली- ती कविता मुळात पोस्टर रूपात प्रकाशित झाली होती, ते पोस्टर चार घड्या केल्यावर हाताच्या आकारात बसतं आणि मग ते असं दिसतं:

चित्रात दिसणाऱ्या अंधुक रेषा गांधींच्या पेहेरावातल्या

खरं म्हणजे पतित पावन संघटनेला गांधींबद्दल एकदम आस्था दाटून येणं हे या संघटनेच्या एका प्रकारच्या मुकेपणाचंच लक्षण आहे. किंवा चलनी नोटेवर गांधींचा चेहरा छापून, त्यांच्या पाठीमागं काय चाललंय याविषयी बोलतानाही काही मुकेपणा अपेक्षित आहेसं दिसतोय. किंवा एकूणच साहित्याचंही आपण काय करतोय, हाही नक्की कोणत्या प्रकारचा मुकेपणा आहे, हेही माहीत नाही. सारंगांची मराठी पुस्तकं प्रख्यात असलेल्या मौज प्रकाशनानं काढली, काही इंग्रजी पुस्तकं 'पेंग्वीन'नं काढली, त्यामुळं त्यांच्याबद्दलचा मुकेपणा कसाही असला, तरी किमान पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत. गुर्जरांची पुस्तकं (प्रास प्रकाशन, वाचा प्रकाशन, राजा ढाले प्रकाशन) आता बाजारात उपलब्ध नाहीत. पत्रकार मंडळी प्रश्न विचारण्याऐवजी हल्ली उत्तरंच घेऊन बसलेली असतात स्टुडिओत नि रकान्यांमधे, तर हा मुकेपणा कसला आहे याचं उत्तर त्यांना माहीतच असेल, आपण मात्र इथं सारंगांच्या जाण्याचं आणि गुर्जरांची पुस्तकं उपलब्ध नसण्याचं दुःख म्हणून ही लहानशी नोंद करून ठेवूया. गुर्जरांच्या प्रतिक्रियेत उल्लेख झालेली अभिव्यक्तीची शोकांतिका, आपला मुकेपणा कोणत्या प्रकारचा आहे त्याचं अंधुक उत्तर देतेय काय?

२७ मार्च २०१५

मी हासतो लोकाला, शेंबूड माझ्या नाकाला!

पाऊस मी म्हणत होता.
टीव्हीवरचा अँकर सारखं मी मी करत होता.
- असे वाक्प्रचारांचे वाक्यात उपयोग केले जातात.

शिवाय, 'मी हासतो लोकाला, शेंबूड माझ्या नाकाला' अशी एक म्हणही आहे.

आणि नुकतंच 'मी मराठी लाइव्ह' या नावाचं एक मराठी दैनिकही सुरू झालेलं आहे. 'मी मराठी' ही वृत्तवाहिनी ज्यांनी काही काळापूर्वी विकत घेतली, ते ‘समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेड’चे अध्यक्ष महेश मोतेवार यांनी हे वर्तमानपत्रही सुरू केलेलं आहे. तेच त्याचे सल्लागार संपादकही आहेत. २७ फेब्रुवारी २०१५ रोजी, मराठी भाषा दिवसालाच हे वर्तमानपत्र सुरू झालं. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला अनेक मान्यवर इत्यादी उपस्थित होते, त्या कार्यक्रमात मोतेवार म्हणाले, 'सत्याची कास धरीत, अडचणींवर मात आणि दुसऱ्याचा विचार केला की, परमेश्वरही आपल्या पाठीशी उभा राहून यश देतो याचा अनुभव मी घेतला आहे. आपल्या शेतकऱ्यांना जोडधंदा मि‌ळाला पाहिजे, महिला बचत गट सशक्त झाल्या पाहिजेत यासाठी मी प्रयत्नशील राहिलो. त्यामुळेच मी इथपर्यंत येऊन पोहोचलो. आता ‘मी मराठी लाइव्ह’च्या माध्यमातून पुन्हा लोकांशी जोडला गेलो आहे. समृद्धीपासून सुरू झालेला हा प्रवास ‘मी मराठी’च्या माध्यमातून काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पोहोचला पाहिजे.'

दुसऱ्याचा विचार मी केला, हे बोलणं महत्त्वाचं असतं. 

याच 'समृद्ध' कंपनीविरोधात चिटफंड घोटाळ्याचे अनेक आरोप यापूर्वी झालेले अनेकांना आठवत असतील. आठवणीला तजेला देण्यासाठी- १) चाळीसगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या फसवणुकीसंदर्भातली 'सकाळ'मधे आलेली एक बातमी. २) भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी यासंबंधी केलेल्या आरोपाची 'एबीपी माझा'वरची बातमी ३) 'समृद्ध जीवन फूड्स'च्या व्यवहारात गफलत आढळल्यामुळं कंपनीनं गुंतवणूकदारांकडून ठेवी घेऊ नयेत, असे आदेश 'सेबी'ने (सिक्युरिटीज् अँड एक्सेन्ज बोर्ड ऑफ इंडिया) दिले होते. ४) या कंपनीविरोधात आलेल्या तक्रारींची पोलिसांनी जी काय दखल घेऊ पाहिली त्यासंबंधी लोकसत्तेत आलेली बातमी. ५) शिवाय, आता क्रिकेट विश्वचषक सुरू आहे, तर त्या संदर्भात- चार वर्षांपूर्वी भारतानं ही स्पर्धा जिंकली तेव्हा भारतीय संघातील सर्व खेळाडूंना समृद्ध जीवन कंपनीनं प्रत्येकी एक 'टाटा मान्झा' गाडी भेट दिली होती.

चाळीसगावच्या 'सकाळ'च्या बातमीत म्हटलंय, ''---लांडगे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, समृद्ध जीवन फूड्‌स इंडिया लि. या पुण्याच्या कंपनीने पशुधनाची स्कीम सुरू केली. हिरापूर व ब्राह्मणशेवगे (ता. चाळीसगाव) शिवारात कंपनीतर्फे सुमारे २८३ एकर जागा खरेदी करण्यात आली होती. शाखा उद्‌घाटनाच्यावेळी मोठा कार्यक्रम घेतल्याने या कंपनीने अल्पावधीतच परिसरातील शेतकऱ्यांना आपलेसे केले. त्यामुळे कंपनीकडे बहुतांश ठेवीदार हे शेतकरी होते. ठेवीदाराने पैसे दिल्यानंतर त्याच्या पैशातून कंपनीतर्फे म्हैस अथवा बकरी विकत घेतली जाईल. ती म्हैस अथवा बकरी प्रजनन योग्य झाल्यावर संबंधित ठेवीदाराला ती परत करण्यात येईल किंवा तिच्या किमती एवढी रक्कम देण्यात येईल, असे सांगून कंपनीने परिसरातील हजारो शेतकऱ्यांकडून पैसा गोळा केला. यावेळी कंपनीने शेतकऱ्यांशी तसा करार केल्यामुळे अल्पावधीतच विश्‍वास संपादन होत गेला. प्रत्यक्षात मात्र म्हैस किंवा बकरीचे संगोपन कंपनीने न करता दुसऱ्या शेतकऱ्यांकडून केले. त्याचे दूध मात्र कंपनी घेत होती. यातून मिळणाऱ्या नफ्याची कुठलीच नोंद केली जात नव्हती. जनावराचे दूध देणे बंद झाल्यानंतर भाकड जनावर गुंतवणूक करणाऱ्या शेतकऱ्याला दिले जायचे. करारानुसार गुंतवणूक करणाऱ्या शेतकऱ्याला दुसरा पर्यायच नसायचा.--''

तर, असं आहे. तरीही मी मराठी. आणि प्रत्येक बातमीतला मी.

मी मराठी लाइव्ह : ११ मार्च २०१५ रोजीच्या मुंबई आवृत्तीचं पहिलं पान

स्वतःच्या नाकाला काय लागलंय त्याबद्दल चाचपत केलेली ही नोंद आहे. 'मी मराठी लाइव्ह' हे वर्तमानपत्र मी मी म्हणत सुरू झालंय. हरकत नाही. (मालकांच्या इतिहासामुळं ह्या वर्तमानपत्रात संपादकीय नोकरी करणाऱ्यांबद्दलही लोक संदर्भाशिवाय टिंगल वजा बोलतील कदाचित. पण सगळ्यांनाच नाक आहे, हे आपण कसं विसरणार. मालकाबद्दल बोलणं आपल्याला महत्त्वाचं वाटतंच. त्याचसोबत निव्वळ कोणाची नोकरी कुठं आहे, एवढ्यावरून लगेच काही निष्कर्ष काढणं बरोबर वाटत नाही. पत्रकारी कामावरून, विरोधाभासावरून काही बोलायचं असेल, तर गोष्ट वेगळी. हा मुद्दा गुंतागुंतीचा आहे. आपल्याला न सुटलेला. शिवाय शेंबूड न येणारं एकही नाक आपल्या पाहण्यात आलेलं नाही. आरशातही नाही. फक्त शेंबूड येतो हे उघड मान्य तरी करायला हरकत नाही. आणि अगदी नाक कापलंच जाऊ नये, म्हणून रेघोट्या मारायच्या). तर, हे वर्तमानपत्र सुरू करण्याच्या कार्यक्रमात पत्रकारितेतले दिग्गज, नेते इत्यादी होते, पण 'मी मराठी'वर प्रसिद्ध झालेल्या बातमीत ज्यांचं मनोगत प्रामुख्यानं छापलंय, ते आहेत मालक आणि म्हणून सल्लागार संपादक असलेले मोतेवार. शेवटी त्यांचं प्रोफाइल घडवण्याचाही मुद्दा असणार. आणि इकडं आपणही आपापल्या प्रोफाइलांवर/पडद्यांवर मी मी म्हणतोय. हरकत नाही. थोडं शेरा वजा बोलायचं तर, आपण प्रोफाइलवर जसं थोडं सामाजिक, कलात्मक, राजकीय, इत्यादी शेअर करतो नि मुख्यत्त्वे नैतिक प्रोफाइल घडवतो, तसंच जास्त पैसेवाल्या मंडळींना हे असं प्रोफाइल घडवण्यासाठी सरळ एखाद्या चॅनलमधे किंवा पेपरात गुंतवणूक करायची शक्यता प्रत्यक्षात आणता येते. मग रिलायन्सची आयबीएनमधली गुंतवणूक नि मोतेवारांचं 'मी मराठी' म्हणणं, हे साधारण त्याच प्रकारचं वाटतं. पण मग जनमाध्यमं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्तमानपत्रांच्या ठिकाणी तरी 'मी'च्या बाहेरचं काय तरी कळणं अपेक्षित असायला हवं का? पण तिथंही परत मीच मीच केलं, तर मग कसं काय होईल! किंवा कदाचित प्रत्येक बातमीत 'मी'ची गुंतवणूक कशी आहे, असा काही 'मी मराठी लाइव्ह'च्या टॅगलाइनचा अर्थ असेल. किंवा कदाचित आपल्याला त्याचा अर्थ कळलाच नसेल.

दोन वर्षांपूर्वी, ९ एप्रिल २०१३ रोजी आपण रेघेवर एक नोंद केली होती- दस्तयेवस्कीचं टिपण आणि माध्यम नियंत्रित माणूस. रशियन कादंबरीकार दस्तयेवस्कीच्या 'नोट्स फ्रॉम अंडरग्राउन्ड' या छोट्याशा कादंबरीतल्या छोट्याशा भागाचा अनुवाद नोंदवायचा प्रयत्न त्यात होता. त्या नोंदीचा शेवट असा होता:
तरीही पुढे बोलायचं तर - एखाद्या सभ्य माणसाला कशाबद्दल बोलताना सर्वाधिक आनंद होईल?

उत्तर : स्वतःबद्दल.

बरंय, तर मग मीही स्वतःबद्दलच बोलत जाईन.
म्हणून 'मी मराठी लाइव्ह'ची सभ्य टॅगलाइन आहे तशी आहे का? असेल. चला, काढा रूमाल आता! हसलात तरी चालेल, पण आपापला रूमाल आपापल्या सोबत ठेवायला हवा.

***

आतली हवा दिसत नाही, तोपर्यंत बरंय!
मुंबई :२१ मार्च २०१५ (फोटो: रेघ)

२७ फेब्रुवारी २०१५

मराठी भाषेचं अपराध गीत

भाषा ही पायदळ आणि नौदलाचं पाठबळ असलेली बोलीच असते, असं एक अवतरण भाषाविज्ञानातल्या मंडळींमध्ये प्रसिद्ध असल्याचं आपल्याला कळलं. कुठून कळलं? दोन ठिकाणांहून. एक, जळगाव इथं साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टनं अलीकडंच आयोजित केलेल्या चर्चासत्रात चिन्मय धारूरकर यानं सादर केलेल्या 'बोलीभाषेचे राजकारण' या निबंधावरून आणि दुसरं, मिलिंद मालशे यांनी लिहिलेल्या 'आधुनिक भाषाविज्ञान: सिद्धान्त आणि उपयोजन' या पुस्तकावरून. (हे अवतरण मॅक्स वाइनराइख यांचं आहे- हेही पुस्तकातून).

यातला पहिला दस्तावेज निबंध स्वरूपातला व आपल्यासारख्या वाचकांसाठीही असलेला आहे. आणि दुसरा दस्तावेज पाठ्यपुस्तक स्वरूपाचा, जास्तकरून भाषाविज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठीचा आहे, पण तरी त्यातूनही काही ना काही आपल्यासारख्या वाचकांना सापडेल असं आहेच. पुढील नोंद वाचण्यासाठी सोईचं व्हावं एवढ्याचसाठी हे नोंदवलं. दोन्हींचे हेतू वेगवेगळे आहेत, त्यामुळं अजून काही तुलना करणं बरोबर होणार नाही.

आपल्यापुरती पत्रकारितेची मर्यादा स्पष्ट व्हावी असा रेघेचा अधूनमधून बारकासा प्रयत्न असतो. तर मग ह्या मर्यादेत आजच्या मराठी भाषा दिनाला आपण अशी काय नोंद करू शकतो? कारण आपण रेघेचे सगळे बिंदू ज्या मराठी भाषेत नोंदवत आलोय तिच्याबद्दल आणि एकूणच भाषा ह्या गोष्टीबद्दल आपल्याला तशी फारशी माहिती नाहीच. आपल्याला तीच भाषा तेवढी येते आणि आपण तिला वापरतो एवढंच. आपण तिचा अभ्यास असा वेगळा करत नाही. म्हणजे जेवण बनवणं, सेक्स करणं या गोष्टींमध्ये चव, आनंद हे जसं आपोआप आपण शोधत जातो, तसाच आपला भाषेचा आपोआप वापर आहे. त्यात काही चव नि आनंद असेलच, तर तो आपोआप आहे. बेसिक इन्स्टिंक्टच (एक । दोन) म्हणतात काही लोक. त्यामागचा अभ्यास काही आपण करतो असं नाही. तो वेगळा प्रवाह आहे. त्या प्रवाहातल्या मंडळींना स्वतंत्रपणं रेघेवर कधी आणता येईल माहीत नाही, पण रेघेवर त्यांचं काही म्हणणं आणून सोडावं, एवढ्यापुरती ही आजची नोंद.

तर, सुरुवात पायदल-नौदलापासून झालेली. ख्रिस्तोफर कोलंबस या इटालियन नाविकानं अमेरिका खंडाचा 'शोध' लावला असं शाळेत कितवीत तरी शिकवतात. आणि मग कितवीत तरी कुसुमाग्रजांची 'कोलंबसाचे गर्वगीत' ही कविताही शाळेत शिकवायचे. आताही शिकवत असतील. कोलंबसानंतर युरोपातून अमेरिकेत दळणवळणाची सुरुवात झाली, हाही तपशील त्यात येत असेल. विकिपीडिया म्हणतो की, युरोपीय साम्राज्यांमधल्या वाढत्या साम्राज्यवादी वृत्तीमुळं आणि आर्थिक स्पर्धेमुळं कोलंबसाला आपल्या समुद्री सफरी करता येतील असं सुपीक वातावरण मिळालं नि अखेरीस स्पेनच्या राजेशाहीनं त्याला मदत केली. यातून पुढं स्पेनच्या साम्राज्यानं दक्षिण अमेरिकेचं काय काय केलं याची ओझरती नोंद या पूर्वी रेघेवर झालेली आहे. कोलंबसाचं स्वतःचं मत काय होतं नि त्याच्या मनात काय चाललं होतं, हे आपल्या वाचनात आलेलं नाही. पण त्याला महत्त्वाकांक्षी आणि समुद्राला आव्हान देणारा वगैरे म्हणून रंगवलं जाणं सहज शक्य आहे. आणि कुसुमाग्रजांच्या कोलंबसाच्या गर्वगीतात तेच आहे. या कवितेची शेवटची तीन कडवी अशी आहेत :
कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन् मरती जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली निर्मितो नव क्षितिजे पुढती

मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा घराची वा वीतभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!"
गर्वानं उभारलेली ही शिडं कोणाला कुठं घेऊन जात असतात, याबद्दल फारशी शंका कवितेत नाही. तिचा हेतूच वेगळा आहे. आणि कुसुमाग्रजांची जयंती हा मराठी भाषा दिवस म्हणून दर वर्षी साजरा केला जातो. त्या निमित्तानं मराठी भाषेची अभिमान गीतंही गायली जातात.

या सगळ्यात आपल्याला नोंदीच्या सुरुवातीचं वाक्य आठवून ठेवायचंय फक्त. आणि त्या वाक्याच्या निमित्तानं धारूरकर व मालशे यांचं थोडं थोडं म्हणणंही नोंदवून ठेवू.

कासरगोड इथं केरळ केंद्रीय विद्यापीठात भाषाविज्ञान विभागात सहायक प्राध्यापक असलेल्या धारूरकरांच्या निबंधात म्हटलंय :
मुळात एखाद्या भाषेच्या एका प्रकाराला 'भाषा' म्हणायचं आणि दुसऱ्या प्रकाराला 'बोली' म्हणायचं यातच मोठं राजकारण दडलेलं असतं. ज्या एका विशिष्ट बोलीमागे सत्ता मोठ्या प्रमाणात एकवटलेली असते तिला 'भाषा', 'प्रमाण भाषा' किंवा ढोबळ भाषेत 'शुद्ध भाषा' असं म्हटलं जातं. केवळ ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक अंगांनी ही विशिष्ट बोली पुढारलेली ठरली म्हणून तिला प्राधान्य मिळालं असं असतं. कोणतेही भाषावैज्ञानिक, रूपनिष्ठ अथवा आकारिक असे निकष त्या विशिष्ट बोलीत अंगभूतपणे उपस्थित असल्याने आपण तिला प्रमाण अगर शुद्ध मानत नसतो. उदा. पुणे मराठी (त्यातही सदाशिव पेठी त्यातही एका विशिष्ट जाती आणि वर्गाची बोली) आपण शुद्ध मानतो ती कोणत्याही अंगभूत निकषांमुळे नाही तर पुणं हे ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मराठी समाजासाठी महत्त्वाचं केंद्र राहिलेलं आहे. पुण्यातल्या भाषेतले अंगभूत गुणच असे आहेत की ती शुद्ध ठरावी असा युक्तिवाद तार्किक ठरत नाही. जर तसं पुढारलेपण हे पूर्वापारपणे नंदूरबार किंवा बुलढाण्यासारख्या ठिकाणी असतं तर तिथली बोली आपल्याला शुद्ध वाटली असती. तशीच परिस्थिती ही मैसूर येथील कन्नड शुद्ध मानली जाण्यामगे आहे, त्याच कारणामुळे कृष्णा जिल्ह्याची तेलुगू शुद्ध मानली जाते किंवा तशाच पार्श्वभूमीमुळे कोट्टयम मल्याळम ही शुद्ध ठरते. इथे कुठेही अंगभूतता हा निकष नसून ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या पुढारलेलं असणं एवढंच यामागे असतं.
असं सगळं केल्यानंतर आपण मग जी 'प्रमाण' मराठी वापरतो तिच्याबद्दलही तक्रारी केल्या जातातच. त्यामागंही काही मूल्यं काम करत असतील काय, याचा विचार करायला हवा. तर, मग त्याबद्दल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पवई इथं इंग्रजीचे प्राध्यापक असलेल्या मालशे यांच्या पुस्तकात म्हटलंय :
भाषा व सामाजिक-सांस्कृतिक परिस्थिती यांचा संबंध फक्त भाषेच्या शब्दसंग्रहामध्येच आढळून येतो, असे नव्हे. भाषेच्या ध्वनिव्यवस्थेवरही सामाजिक परिस्थितीचा ठसा उमटतो, असा पुरावा न्यू इंग्लंडच्या किनारपट्टीजवळ असणाऱ्या मार्थझ् व्हिनयार्ड (Martha's Vineyard) या बेटाचे भाषिक संशोधन करणाऱ्या लबव् या अभ्यासकाला मिळाला आहे. उन्हाळ्यामध्ये सुट्टी घालविण्यासाठी येथे बाहेरून वाढत्या प्रमाणावर लोक येत असतात. त्यामुळे अनेक सामाजिक स्थित्यंतरे या बेटावर घडून आलेली आहेत. त्यांचा तेथील स्थानिक लोकांच्या भाषेवर (इंग्रजीवर) खोलवर परिणाम झालेला दिसून येतो: ''house'', ''mouth'', ''loud'' यांसारख्या शब्दांमध्ये मध्यस्थानी जो संयुक्त स्वर आहे त्याचे दोन प्रकारचे उच्चार या बेटावर आढळतात; त्यांपैकी ''अऊ'' (उदा. हऊस) हा कमी ''प्रतिष्ठित'' व ''जुनाट''; तर ''आऊ'' (उदा. हाऊस) हा अधिक ''प्रतिष्ठित'' उच्चार मानला जात असे. परंतु लबवला असे दिसले की बेटाबाहेरच्या लोकांचे आर्थिक व सांस्कृतिक आक्रमण थांबविण्यासाठी जुन्या स्थानिक मूल्यांशी एकनिष्ठ राहण्याची गरज लोकांना अत्यंत तीव्रतेने वाटू लागली आहे. असे एकनिष्ठ राहण्याचा एक मार्ग म्हणजे ''जुनाट'' वाटणारे उच्चार पुन्हा रुजविणे, सामाजिक आक्रमण करणाऱ्या ''उपऱ्या'' लोकांपेक्षा आपली सामाजिक-सांस्कृतिक परंपरा भिन्न आहे; त्यांच्या भाषेपेक्षा आपली भाषा भिन्न आहे; अशा भावनेमुळे हे भाषिक वर्णपरिवर्तन झालेले आहे.

सामाजिक-सांस्कृतिक परिस्थितीने भाषेवर घडवून आणलेल्या परिणामाची अशी अनेक उदाहरणे देता येतील. याच्या उलट प्रक्रियाही घडत असते. विशिष्ट प्रकारच्या वापरामुळे काही सामाजिक दृष्टिकोन व मूल्ये निर्माणही होऊ शकतात.
(आधुनिक भाषाविज्ञान:सिद्धांत आणि उपयोजन, पान १३८-१३९, मौज प्रकाशन.)

असं जर असेल, तर मग भाषेचं अभिमान गीत रचण्या-गाण्याऐवजी अपराध गीत का रचू व गाऊ नये?

अपराध गीत नाही रचलं, तर मग 'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'मुंबई टाइम्स' ह्या पुरवणीत आज आलेल्या खालच्या फिचरसारखं व्हायचं.-


शुद्ध नि प्रमाण भाषेबद्दल बोलताना नोंदीच्या सुरुवातीला आलेल्या दोन अभ्यासक मंडळींच्या मतांमध्ये आणि फिचरमधल्या मतांमध्ये एवढी तफावत कशी काय? भाषा वापरतोय म्हणून भाषेबद्दल सगळंच आपण बोलायला हवं असं नाही. पण, टीव्हीबोली, प्रमाण भाषा, नाईलाज, व्याकरणाचे नियम, दूषित, अर्थकारण- असे अनेक शब्द या फिचरमधील कलावंत मंडळींनी सहज वापरलेत. त्यातही त्यांची व्यक्तिगत मतं असतील तशीच धडपणे फिचरमधे आली असतील असंही नाही. पण एकूण फिचरच ज्या पद्धतीनं मांडणी करतंय, तो मुख्य मुद्दा (मराठीचा!) आहे. असं का झालं? आणि मुंबई-पुण्यात मुख्य बाजारपेठ असलेल्या महाराष्ट्र टाइम्स या वर्तमानपत्रात मराठी भाषा दिवसाचं जितकं कौतुक होतं, त्याच्या तुलनेत विदर्भात मुख्य बाजारपेठ असलेला (आणि मुंबई-पुण्याची आवृत्ती नसलेल्या, त्यामुळं स्थानिक ठरणाऱ्या) देशोन्नती या वर्तमानपत्रात मात्र असं कौतुक का दिसत नाही? या प्रश्नांची उत्तरं कोणी मराठी भाषेचं अपराधगीत रचलं तर त्यात द्यायला लागतील. कवीचं काम तेवढं तरी असतंच ना. अगदी जोरदार आवेश आणायचाच झाला, तर-

अन्त में कहूँगा-
स़िर्फ, इतना कहूँगा-
'हाँ, हाँ, मैं कवि हूँ';
कवि- याने भाषा में
भदेस हूँ
- धूमिल