Monday, 15 July 2013

प्रकाश नारायण संत : दहा वर्षं । आठवण व पळवाट

मौज प्रकाशन. आठवी आवृत्ती : २५ फेब्रुवारी २००७
मुखपृष्ठ : पद्मा सहस्रबुद्धे
प्रकाश नारायण संत यांचं अपघाती निधन झालं त्याला आज दहा वर्षं होतायंत, त्या निमित्ताने 'रेघे'वर ही नोंद होतेय. संतांनी 'वनवास', 'शारदा संगीत', 'पंखा', 'झुंबर' ही चार पुस्तकं लिहिली आणि या चार पुस्तकांमध्ये लंपन ह्या शाळकरी मुलाच्या भावविश्वाचा शोध घेतला - हे बहुतेकांना माहीत असेल. किंवा माहीत नसलं तरी स्वतंत्रपणे ही पुस्तकं वाचून ते पाहता येईल. हा शोध मोठ्यांसाठीचा आहे. लंपनच्या तोंडून त्याच्या जगण्याबद्दल संत जे काही सांगतात ते मोठ्या लोकांसाठीचं असतं. म्हणजे वयाने मोठ्या झालेल्या लोकांना त्यांच्या लहानपणाच्या आठवणी देणारं किंवा त्यांनी लहानपणी अनुभवलेल्या, पण कदाचित समजून घेऊन न अनुभवलेल्या गोष्टी परत वाचकांना सामोऱ्या येत असाव्यात. वयामुळे आणि टोकाच्या संवेदनशीलतेमुळे लंपन हा अतिशय निरागस आहे. एवढे निरागस मोठ्या वयाचे लोक तर नसतातच, पण लहानपणीही बहुतेक लोक एवढे निरागस असतात असं आजूबाजूला पाहिल्यावर वाटत नाही. पण म्हणूनच कदाचित निरागस गोष्टी बघितल्यावर लोकांना बरं वाटत असावं. आणि लंपन तर खरोखरच प्रचंड निरागस नि संवेदनशील आहेच. बेळगाव साइडला आपल्या आजी-आजोबांसोबत राहणाऱ्या लंपनचं विश्व संतांनी खरोखरीचं उभं केलंय हेही खरंच. त्याला जाणवणारे स्पर्श, वास, निसर्ग, माणसं असं त्यांनी रितसर नोंदवून ठेवलंय. ते हळवं आहे आणि त्यांच्या बाजूनं खरं आहे. लंपनचं विश्व आता पावसात तुम्हालाही आजूबाजूला पाहिल्यावर जाणवू शकेल. 'वनवास'च्या मुखपृष्ठावर पद्मा सहस्रबुद्धे यांनी लंपनचं विश्व रंगांमध्ये एकदम थेट मांडून ठेवलंय. त्या चित्राकडे पाहिल्यावर तुम्हाला जे वाटतंय तेच संतांनी निर्माण केलेल्या शाब्दिक विश्वामधून वाटू शकेल. त्यातले तपशील कदाचित अधिक जाणवतील. 

आता आपण जरा मोठे होऊया आणि ह्या विश्वाबद्दल काही शोधता येतं काय ते पाहूया. लंपन ह्या लहान मुलाचं विश्व मोठ्यांसाठी उलगडून दाखवण्याचं काम संतांच्या साहित्यातून होतं, असं म्हटल्यावर त्यात 'आठवणी' आल्याच. कारण मोठी मंडळी भूतकाळात जाण्यासाठी / रमण्यासाठी ह्या पुस्तकांकडे वळतील. हे वळण समजून घेण्यासाठी आपण विलास सारंगांकडे वळूया. सारंगांच्या 'सर्जनशोध आणि लिहिता लेखक' (मौज प्रकाशन!) या पुस्तकात 'स्मरणरंजन' असा एक लहानसा लेख आहे. त्यात ते म्हणतात :
स्मरणरंजन (मराठीत) एवढे लोकप्रिय असण्याचे कारण काय? एक साधे उत्तर : आठवणींसाठी काही करावे लागत नाही! आठवणी आपोआप, विनासायास गोळा होतात. दुसरे म्हणजे, स्मरणप्रक्रियेत विचारक्रियेचा अंतर्भाव नसतो. विचार करण्यापासून, विचार करण्याच्या डोकेदुखीपासून मुक्ती मिळते! स्मरणरंजनात आराम असतो.
सारंगांचा स्मरणरंजनावर / नॉस्टाल्जियावर टीका करण्याचा रोख पुरेसा स्पष्ट आहे. आणि प्रकाश नारायण संतांची पुस्तकं वाचताना वाचकांच्या बाजूने डोक्यात ज्या घडामोडी घडत असतील, त्याबद्दल तक्रार करण्यासाठी सारंगांचा युक्तिवाद उपयोगी पडू शकतो. पण तरी ते एवढं सोपं नाही. सारंगांचं म्हणणं आपण नोंदवलं, कारण आपल्याला त्याबद्दल थोडासा मतभेद नोंदवायचाय. माणसाने भाषेचा शोध लावला, त्या भाषेचं एक अतिशय महत्त्वाचं कामच हे आहे की, तिच्या मदतीने भूतकाळ आणि भविष्यकाळ अशा काळांच्या विभाजनात आपल्याला बोलता येतं. हे इतर प्राण्यांना शक्य होत नाही. म्हणजे माणसाला काही वेगळी गुणवैशिष्ट्यं मिळाली त्यात भाषेचा हा गुणही कारणीभूत आहे. एखाद्या सुंदर चिमणीला हे शक्य होत नाही. म्हणजे माणसाने स्वतःला फार शहाणं समजावं असं नाही, पण भाषेमुळे त्याला वर्तमानकाळात असतानाही भूतकाळ नि भविष्यकाळातल्या घडामोडींबद्दल बोलता येतं. त्यामुळे आठवणी आपोआप, विनासायास गोळा होतात, इतकं ते सोपं नाहीये. माणसाच्या बाबतीत ह्या आठवणी भाषिक रूप घेतात. किंवा भाषेमुळे आठवणींना रूप येतं. आठवणींना माणूस भाषेच्या व्यवस्थेत बसवतो, ह्या गोष्टी आपसूक होतच जातात. कदाचित भाषेच्या इतक्या वर्षांच्या वापरामुळे त्यांना मुद्दाम कष्ट पडत नसतील, पण ती एक विचारप्रक्रियाच आहे, असं आपण माणूस असल्यामुळे स्वतःच्या किमान अनुभवातून नोंदवू शकतो. बाकी ह्या प्रक्रिया मानसशास्त्राच्या मर्यादेतल्या असल्यामुळे आपण त्यात पडूया नको. पण स्मरणप्रक्रियेबद्दल सारंगांची तक्रार तितकीशी पटणारी वाटत नाही. अर्थात, या प्रक्रियेतच अडकून त्यातून 'रंजन' करत राहण्याबद्दल सारंगांची मूळ तक्रार आहे आणि त्यांचा मुख्य रोख पु. ल. देशपांडे यांच्या लिखाणावर आहे. किंवा 'आठवणीतल्या कविता' या पुस्तकमालिकेवर आहे. कारण अशा पुस्तकमालिकेत कवितेच्या बरे-वाईटपणाचे निकष दुय्यम ठरून केवळ त्या आठवणीतल्या आहेत म्हणून पुस्तकात आहेत, असं होतं. त्याबद्दल सारंग तक्रार करतायंत. पण त्याबद्दल बोलताना कधी 'स्मरणरंजन' आणि कधी 'स्मरणप्रक्रिया' असे शब्द वापरताना त्यातला वेगळेपणा काटेकोरपणे जपायला हवा. सारंगांच्या तुलनेत आपण काहीच नसलो, तरी त्यांनी वरच्या परिच्छेदात ही जपणूक केली नसल्याचं आपण नोंदवायला हरकत नसावी. लेखाच्या शेवटाकडे मात्र त्यांनी थोडं सावरून घेतलंय. म्हणून त्यांनी म्हटलंय की :
अर्थात, स्मरणप्रक्रिया अनिष्ट असे म्हणणे हास्यास्पद होईल. स्मरणावरच बराचसा मनोव्यापार अवलंबून असतो. स्मरणरंजनही काही प्रमाणात क्षम्य आहे. ते मनुष्यत्वामध्ये अंतर्भूत आहे. पण स्मरणरंजनाची चटक लागते. अशा रंजनाची अफूची गोळी बनते, तेव्हा ते निखालस अनिष्ट ठरते. स्मरण या मनोव्यापारापेक्षा अधिक महत्त्वाचे मानवी व्यापार आहेत. मुख्यत्वे विचार, कल्पनाशक्ती व कृती. स्मरणरंजनाच्या आनंदयात्रेमध्ये याचे विस्मरण होऊ देऊ नये.
पण तरी परत स्मरणावरच बराचसा मनोव्यापार अवलंबून आहे, असं सारंग म्हणतात, नि पुढे विचार, कल्पनाशक्ती व कृती असा काही फरक स्पष्ट करतात. स्मरणरंजनाची चटक लागू नये, हे ठीकच, पण हे सगळंच एकूण इतकं सरळ-सोपं नसावं आणि एका लेखात पूर्णपणे येण्याएवढा तर हा मुद्दा साधा नाहीच. पण यावर मराठीत कोणी स्वतंत्र पुस्तक लिहिलं नसेल, म्हणून सारंगांनी कदाचित मुद्दा म्हणून ते नोंदवून ठेवलं असेल. तर, आता कोणीतरी मानसशास्त्रवाल्या नि साहित्याबद्दल काही वाटणाऱ्या व्यक्तीने त्यावर पुस्तक लिहायला हवं. आधीच कोणी यावर मराठीत लिहिलेलं आहे काय? आपल्या पाहण्यात आलेलं नाहीये.

पहिली आवृत्ती : ७ एप्रिल २०१३ (मौज)
मुखपृष्ठ : प्रकाश नारायण संत
आता पुन्हा प्रकाश नारायण संतांकडे येऊया. संतांची पुस्तकं वाचताना वाचकांचं काही प्रमाणात, सारंग म्हणतायंत त्याअर्थी 'स्मरणरंजना'त रमल्यासारखं होत असेल. त्यामुळे आपण वास्तव जीवनात मोठ्या वयाचे नि बुरखे पांघरलेले नि सर्वमान्य खोटेपणात सामील झालेले असलो, तरी आपल्याला लंपनशी जवळीक वाटते. किमान पुस्तक वाचतानाचा काळ तरी तसं होत असावं. पण आता याचा अर्थ असा होतो का, की संतांनी लिहितानाच ही ट्रिक केलेय? तर तसं आपल्याला तरी वाटत नाही. संतांना लंपनचं विश्वच साठवून ठेवायचं असेल, म्हणून त्यांनी त्यांच्या चार पुस्तकांमध्ये ते करून ठेवलं. किंबहुना एक अंदाज असा लावता येईल की, संतांना वास्तव जीवनातल्या सर्वमान्य खोटेपणात सामील व्हायचं नव्हतं नि त्यापासून पळायचं होतं म्हणून त्यांनी लंपनचं विश्वच जवळ केलं. त्यातल्या निरागसपणाला वास्तवातल्या भंपकबाजीचा कुठलाच छेद द्यायला त्यांना नको असेल. हा अंदाज आपण कशावरून बांधतोय, असा प्रश्न वाचकांना पडू शकतो. ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला संतांच्या लंपनशिवायच्या काही ललित लेखांच्या एका संग्रहात मिळू शकतं. हे ललितलेख संग्रहाचं पुस्तक म्हणजे 'चांदण्याचा रस्ता'. हे पुस्तक दोन महिन्यांपूर्वीच प्रकाशित झालंय. त्यात संतांचे जे लेख एकत्र केलेत त्यावरून त्यांना लंपनच्याच भावविश्वाशी एवढी जवळीक का वाटली असावी, याची थोडीशी उत्तरं सापडू शकतात. आणि त्यांनी त्यांचं काम प्रामाणिकपणेच केलं असावं असंही वाचकांना वाटेल. मोठ्या लोकांचं जग जसं आहे, ते तसं न पटणं हा तर अगदीच प्राथमिक भाग. आणि त्यावर काहीच उपाय नाही हा एकदमच डेंजर भाग. त्यातूनच संत 'चांदण्याचा रस्ता'मधल्या 'पाऊस' ह्या लेखात काय लिहितात पाहा :
माणसाला ज्याप्रमाणं डोळे मिटून समोरचं नको असलेलं दृश्य न पाहण्याची सोय करून दिलेली आहे त्याप्रमाणं नको असलेल्या आठवणी मनात येऊ नयेत अशी काही तरी सोय हवी होती. मग माझ्यासारखा एखादा किती सुखी झाला असता. कारण जेव्हा पूर्वीच्या आठवणी येतात तेव्हा तुलना सुरू होते आणि तुलनेचा शेवट पलायनवादात होतो. असं वाटायला लागतं, हे सर्व सोडून कुठं तरी पळून जावं. यात 'कुठे' याला फारसं महत्त्व नाही. पळून जाणं याला जास्त महत्त्व आहे.
पहिली आवृत्ती : ७ एप्रिल २०१३ (मौज)
मुखपृष्ठ : पद्मा सहस्रबुद्धे
एकदा पळून जायचंय हे मान्य केलं की ते कसं करायचं हा प्रश्न येतो. संतांनी लंपनच्या भावविश्वाला शब्दांमध्ये उतरवून ह्या प्रश्नावरचं उत्तर शोधलं असावं. कुठलाही लेखक नाहीतरी ह्या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात असतो, असंही आहेच खरं तर. त्यामुळे संतांच्या बाबतीत त्यांच्या म्हणजे लेखकाच्या बाजूने जी एक आदिम पळवाटीची भूमिका आहे, ती आहेच. फक्त ती खूप जास्त संवेदनशीलतेतून आलेली असल्यामुळे त्यात एकदम करूणपणा आहे. हा करूणपणा संतांच्या आयुष्यातूनच आलाय, याचे काही दाखले आपल्याला आणखी एका पुस्तकात मिळतात. हे पुस्तकही नुकतंच प्रकाशित झालंय 'अमलताश' नावाचं, संतांच्या पत्नी सुप्रिया दीक्षित यांनी लिहिलेलं. हे तसं बाळबोध आणि बरेचदा अनावश्यक खाजगी हळवा तपशील देणारंही पुस्तक आहे. पण संतांबद्दल जेव्हा लेखिका लिहिते तेव्हा वाचक त्यात लंपनबद्दल काही शोधणार असेल, तर ते क्वचित सापडू शकतं. म्हणजे आपण वर म्हटलेलंच सांगायचं तर, आपल्या पत्नीला लिहिलेल्या एका पत्रात संतांनी लिहिलंय, अॅन आर्टिस्ट इज ऑलवेज् अॅन एस्केपिस्ट. म्हणजे आपण म्हणतोय त्याच रस्त्यावरनं संत गेले असावेत नि त्यांना लंपनचंच विश्व उभं करण्याला प्राधान्य द्यावंसं वाटलं असावं. जग ज्या पद्धतीने चाललंय, त्या पद्धतीत अ‍ॅडजस्ट व्हायला प्रकाश नारायण संतांना साहजिकपणेच अवघड जात होतं. त्यामुळे मग त्यांनी लंपनच्या विश्वात रमणं पसंत केलं असेल. एकदम प्रामाणिक पळवाट असेल तर ती लंपनसारखी सुंदर असत असेल.

संतांचा एक 'माझी लेखननिर्मिती' असा लेख आहे. या लेखाचा उल्लेख 'चांदण्याचा रस्ता'च्या प्रस्तावनेत आलाय, पण तो लेख त्या पुस्तकात नाही. हा लेख आपल्याला दुसऱ्या एका कामासाठी सुप्रिया दीक्षित यांच्याकडून मिळाला. त्यांचे आभार मानून त्याबद्दल थोडं बोलू. हा लेख म्हणजे संतांनी ७ ऑक्टोबर १९९८ रोजी सातारा रेडियो केंद्रावरून वाचलेलं टिपण आहे. त्यात संतांनी म्हटलंय :
१९६० ते १९६४ या काळात मी लंपनच्या काही कथा लिहिल्या. त्या माझ्या मनासारख्या झाल्या. पण नंतर एकाएकी काहीतरी बिघडलं आणि लेखन मनासारखं होईना. मुख्य म्हणजे त्यातला पारदर्शक निरागसपणा प्रौढ लंपनच्या विचारांची छाया पडल्यानं गढूळ होतो आहे असं वाटायला लागलं.
त्यामुळे ६४सालापासून संतांचं लिखाण थांबलं. नंतर १९९२साली पुन्हा ते लिहायला लागले. तीस वर्षांपूर्वीचं आणि नंतरचंही बहुतेकसं लिखाण हे लंपनविषयीचंच आहे. या त्यांच्या लंपनविषयीच्या वेगवेगळ्या कथांमधून 'एक अत्यंत संवेदनाशील, शोधक व कल्पक वृत्तीचा अबोल असा अकरा ते तेरा वयोगटातला मुलगा वाचकांसमोर आला' असंही त्यांनीच ह्या लेखात म्हटलंय. पण तो मोठा होऊन त्याचा पारदर्शक निरागसपणा गढूळ होणं संतांना नको होतं, त्यामुळे त्यांनी ते केलं नाही. संत स्वतः सहासष्टाव्या वर्षी गेले, तरी त्यांचं शेवटाशेवटाकडे केलेलं लेखनही लंपनच्या भावविश्वाशीच संबंधित होतं, यातून हे सगळंच पुरेसं स्पष्ट व्हावं. त्यात चूक-बरोबरपेक्षा संतांनी लिहिलं ते का लिहिलं असावं, याबद्दल आपण बोललो. आता वाचकांसमोर आपणही आपलं म्हणणं ठेवलं. हे चुकीचं असू शकतं. शिवाय प्रत्येकाला संतांचं लेखन आवडेल असंही नाही. आपल्याला मुख्य मुद्दा नोंदवायचा होता तो आठवणींचा, पळवाटीचा नि त्यासंदर्भात लिहिण्याचा. तो नोंदवून झालाय. मग थांबू.

प्रकाश नारायण संत
(१६ जून १९३७ - १५ जुलै २००३)
फोटो : शेखर गोडबोले ('झुंबर'मधून)

9 comments:

 1. एक नोंदवण्यासारखा मुद्दा होता, पण तो नोंदीत कुठे जाण्यासारखा वाटला नाही, म्हणून इथे नोंदवून ठेवूया. 'चांदण्याचा रस्ता'ला चौदा पानांची विद्यापीठीय-स्टाइलची प्रस्तावना आहे. या प्रस्तावनेत उल्लेख केलेले काही लेख पुस्तकात नाहीत. शिवाय अशा पुस्तकाला प्राथमिक माहिती देणाऱ्या प्रकाशकीय टिपणापलीकडे प्रस्तावनेची गरज खरंच आहे का? अठ्ठ्याऐंशी पानांचं पुस्तक आहे, ते कदाचित उरलेले लेखही त्यात घालून नीट करता आलं असतं, प्रस्तावनेत पानं खर्च करण्याऐवजी.

  ReplyDelete
 2. संतांची एक आठवण आहे.
  मी त्यांना विचारलं होतं की,"वयात आलेला, टीनएजर लंपन कसा असेल? ज्याला वास्तवातली सत्यं उलगडत जाताहेत? त्याविषयी तुम्ही लिहिणार आहात का?"
  तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की, "त्याविषयी नाही, पण काळाची उडी घेऊन मी तरुण लंपनविषयी लिहिणार आहे. जेव्हा महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून मी नोकरीला लागलो, तो सुरुवातीचा एका जंगलातला काळ होता, तो मी मांडणार आहे."
  यानंतर काही दिवसांनी संतांचे अपघाती निधन झाले.
  स्मरणरंजन असले तरी स्मरणातले चांगले तुकडे माणूस नेहमी वर आणून ठेवत असतो आणि वाईट आठवणी विसरत असतो, असे मानसशास्त्रीय संशोधन सांगते. उदा. कुणी घटस्फोट घेतला तरी नंतर त्याला / तिला जोडीदाराच्या चांगल्या गोष्टीच अधिक स्मरतात. ( पण म्हणून त्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न केला तरी तो यशस्वी होत नाही.) खेरीज ज्यांचा दृष्टिकोन सकारात्मक असतो, तेही चांगले तेच आठवून सांगतात किंवा वाईट काही सांगितले तरी त्याला गुंफणारा धागा सकारात्मक ठेवतात.

  ReplyDelete
 3. 'एकदम प्रामाणिक पळवाट असेल तर ती लंपनसारखी सुंदर असत असेल.' :) पळवाट ती पळवाटच की, पण कुणी ती स्वीकारु नये वगैरे असं आपण ठरवू शकत नाही...कारण आपण त्यांचं आयुष्य जगू शकत नाही....आणि शिवाय ती पळवाट आपलं आयुष्य किती सुंदर करुन गेलीय....शेवटी आयुष्य असं काही एकसंध नसतं फक्त वैचारिक, बुद्धिजीवी वगैरे...बाकीचेही कंगोरे असतातच की आयुष्याला....आणि मुळातली सहृदयता हे वैचारिकपण अधिक समृद्ध आणि प्रामाणिक बनवायला मदतच करते असं मला वाटतं....

  ReplyDelete
 4. मला लंपन वाचताना असं जाणवलं होतं की त्याच्या वयाची मुलं एवढी निरागस, एवढ्या टोकदार अभिव्यक्ती क्षमतेची असतात का? त्याची एक्स्प्रेशन्स ही खरंतर खूप मॅच्युअर आहेत आणि त्यामुळे ती आपल्या भावणारी निरागस भासतात. म्हणजे हे जे स्मरणरंजन आहे हे सुद्धा जे होतं, जे असतं त्याचं नसून स्मरणाची केलेली कल्पनाच आहे. ते वाचताना, म्हणजे वाचून आयुष्य सुंदर वगैरे होत असताना (आपलं काही झालेलं नाही म्हणा तसं) आपण एक कल्पित भूतकाळ पाहतो. असा असता भूतकाळ तर काय मजा असं. खरंतर आपल्या आठवणी ह्या तशा आपल्या कल्पनाच असतात, आपण वास्तवाचे कमी-जास्त तुकडे वापरून बनवलेल्या. आणि स्मरणरंजन, लक्षात राहणाऱ्या चांगल्या आठवणी ही आपल्या जगण्याची अपरिहार्यता म्हटली पाहिजे. आपण स्वभावतः निर्ढावलेले असतो, आपण जवळच्या लोकांचं मरणं पचवतो, नैसर्गिक आपत्ती पचवतो, दंगे पचवतो आणि शो मस्ट गो ऑन सारखं सगळं होत राहतं. कारण सल घेऊन किती जण जगत राहतील, थोडेच. बाकीचे बरेच आपसूक ते ज्याला जगणं म्हणतात त्या एका रिकाम्या बॉक्स कडे वळून त्यात घुसून जगायलाच लागतात. कलाकार एस्केपिस्ट बनतो तो त्याचमुळे. मराठी लेखक स्मरणरंजन, हवेहवेसे हरपले ह्या पळवाटा वापरत असतील तर बाहेरचे लेखक संघर्षाच्या. पोट भरणं, रात्री झोपायला उबदार निवारा असणं आणि प्रजनन-संगोपन ह्याच्या बाहेर काही ना काही मजा तर प्रत्येकाला शोधायला लागते.

  ReplyDelete
 5. आपल्यात प्रकट न झालेला एक लंपन असतो - त्याची खूण आपण शोधत असतो :-)

  ReplyDelete
 6. या मालिकेतल्या चौथ्या पुस्तकातील लेखात लंपनचे वडील वारलेले आहेत, हे सत्य समोर येते. त्यानंतर तो प्रौढ होतो, असा त्याचा शेवट अपेक्षित होता. तसाच तो आहे. दुर्दैवाने संत यांचे निधन झाल्याने, त्याचे तरुणपण आपल्यासमोर येऊ शकले नाही. इंदिरा संत या कवयित्रींशी त्यांचे असलेले नाते, यातून तुकड्या-तुकड्याने उलगडत जाते. बेळगावातील सर्व पाऊलखुणा मूळ बेळगावकराला पटकन सापडतात. तोही आपले बालपण त्यात शोधू लागतो. असो. ही चारही पुस्तके संग्रही हवीत, अशीच.

  ReplyDelete
 7. Amit Paste 986085551820 January, 2019 15:01

  Hello, thanks a lot for sharing this experience with us !
  You inspired me to visit Lampan's school and home. As of Jan 2019, both are still there. School seems to be not doing very well, and the house was locked (although it was newly painted). Will be happy to share the photos i took.
  Regards

  ReplyDelete
  Replies
  1. This comment has been removed by the author.

   Delete
  2. pls share....eagerly waiting :)

   Delete