Monday, 1 July 2013

जात आणि माध्यमं : एक नोंद

ही नोंद केवळ माहिती देण्यापुरती मर्यादित आहे. आणि ती आजच 'रेघे'वर का केली जातेय, याचंही काही वेगळं निमित्त नाही. कदाचित, रोजचा दिवस हे निमित्त या नोंदीला पुरेसं असावं.

आपण, म्हणजे 'रेघे'ची ही नोंद वाचणारे सगळे जण जातीय व्यवस्थेमध्ये कुठेतरी बसलेले आहेत. आपण मान्य करू, न करू. आपल्या स्वतःच्या धारणा, विचार काहीही असतील, तरी सगळ्यांना ह्या व्यवस्थेमध्ये कुठेतरी बसवून ठेवलेलं आहे. जन्मापासून मरेपर्यंत.

आपण 'रेघे'वर माध्यम व्यवहाराबद्दल बोलतो, त्यात माध्यम व्यवहाराच्या जातीय बाजूबद्दल फारशा नोंदी नाहीत, याचं एक कारण या नोंदी करणाऱ्याची या विषयासंबंधीच्या ज्ञानाची मर्यादा हे आहे. वरकरणी आपल्याला सगळ्यांना माहीत असतं त्या पलीकडची माहिती शोधता आली तरच यासंबंधी काही बोलावं, अन्यथा तोंड बंद ठेवणं जास्त बरं, असं वाटल्यामुळे काही अपवाद वगळता यावर खोलातलं काही आपण यापूर्वी 'रेघे'वर नोंदवलेलं नाही.

आज आपण ही लहानशी नोंद करतोय ती 'अॅट्रॉसिटी न्यूज-डॉट-कॉम' या वेबसाइटसंबंधी माहिती देण्यापुरतीच आहे. जातीय संदर्भांमध्ये घडलेल्या गुन्ह्यांसंबंधीची नोंद घेणारी ही वेबसाइट आहे. आधी तिचा पत्ता 'अॅट्रॉसिटी न्यूज-डॉट-वर्डप्रेस-डॉट-कॉम' असा होता. आता तो atrocitynews.com असा झालेला आहे.

२९ सप्टेंबर २००६मध्ये भंडारा जिल्ह्यातल्या खैरलांजी गावात भोतमांगे कुटुंबातील सुरेखा (वय ३८), प्रियांका (वय १९), सुधीर (वय २२) व रोशन (वय १८) या चौघांचा खून करण्यात आला. मुख्यत्त्वे कुणबी जातीचे गावकरी आणि तीन महार कुटुंबं अशी या गावाची रचना. खून झालेल्या स्त्रियांवर जिवंत असताना आणि मेल्यावरही सामुहिक बलात्कार करणं, चेहरे ठेचून काढणं, सायकलच्या चेनचा वापर करून अतोनात मारणं, शरीर वारंवार वर उडवून मरेपर्यंत खाली फेकणं, सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन या गुन्ह्याचा साक्षीदार असणं, गावातल्या 'वरच्या' जातींमधल्या स्त्रियांनीही पुरुषांना प्रोत्साहन देणं- असं विविध प्रकारचं अतोनात क्रौर्य दिसलेलं हे हत्याकांड, एवढंच आपण आत्ता नोंदवू. ज्या वाचकांना याबद्दल फारशी माहिती नसेल त्यांना 'विकिपीडिया'वरील पानावर इतर काही लिंक पाहून माहिती शोधता येईल. 

महाराष्ट्राची हिवाळी राजधानी असलेल्या नागपूरपासून सव्वाशे किलोमीटरवर असलेल्या खैरलांजी गावात अख्ख्या गावाच्या साक्षीने घडलेलं हे हत्याकांड. पण त्याची राष्ट्रीय पातळीवर चर्चा झाली महिन्याभराने. दरम्यान, हत्याकांडानंतर तीनच दिवसांनी नागपूरला २ ऑक्टोबरला दिक्षाभूमीवर दर वर्षीप्रमाणे धम्मचक्र परिवर्तन दिनही साजरा झाला. पण या हत्याकांडाबद्दल कुठे काही चर्चा नाही.

खैरलांजी हत्याकांडाची 'बातमी' व्हायची तेव्हा झाली नाही आणि जेव्हा झाली तेव्हा सुरुवातीला अनेक चुकीच्या अंगांनी ती गेली. या सर्व गोष्टींमागे आपल्या प्रस्थापित माध्यम व्यवहाराची रचना कारणीभूत आहे. या मुद्द्यावरती तज्ज्ञ व्यक्तीच्या एका इंग्रजी लेखाचा मराठी अनुवाद आपण सप्टेंबरमध्ये 'रेघे'वर प्रसिद्ध करू, असं सध्या ठरलेलं आहे.

तर प्रस्थापित माध्यम व्यवहाराच्या काही मर्यादांमुळे जातीय गुन्ह्यांचं वार्तांकन व्हावं त्या गतीने, तपशिलाने, संयमितपणे पण ठामपणे होऊ शकत नाही. किंवा अनेकदा तर होतच नाही. मुख्य प्रवाहातल्या माध्यमांच्या या मर्यादांवर आक्रस्ताळेपणाने नव्हे, तर काही सततच्या प्रक्रियेने उपाय करायला हवा. असा उपाय करण्याचा एक मार्ग 'अॅट्रॉसिटीन्यूज-डॉट-कॉम'ने दाखवलेला आहे. खैरलांजीच्या वेळी या वेबसाइटने महत्त्वाची कामगिरी केली होती. आणि आता गेल्या सहा-सात वर्षांमध्ये जातीय गुन्ह्यांच्या बातम्यांना प्रसिद्धी देणं, त्यासंबंधीचा तपशील प्रसिद्ध करणं, त्याचा माग ठेवणं अशी कामं ही वेबसाइट करतेय. जातीय संदर्भांवर अभ्यासक मंडळी जी पुस्तकं लिहितात, त्यामध्ये या वेबसाइटचा एक स्त्रोत म्हणून उल्लेख व्हावा, इतपत नियमितपणे हे काम सुरू आहे.

'उपाय शोधण्यासाठीचं पहिलं पाऊल म्हणजे माहिती करून घेणं', असं वाक्य या वेबसाइटची ओळख करून देताना लिहिलेलं दिसतं. जातीय गुन्ह्यांसंबंधी ही माहिती सर्वसामान्य वाचकांना / प्रेक्षकांना करून देणं आवश्यक आहेच, शिवाय मुख्य प्रवाहातल्या माध्यमांना / पत्रकारांनाही अशा माहितीच्या मार्गावर आणणं आवश्यक आहे, अशी भूमिका घेऊन ही वेबसाइट सुरू आहे.

'खैरलांजी'च्या वेळी हत्याकांडानंतर आठेक दिवसांनी, ७ ऑक्टोबरला 'डीएनए'मध्ये जयदीप हर्डीकर यांनी विदर्भ जनआंदोलन समितीच्या अहवालाचा दाखला देऊन एक बातमी दिली. (नोंदीखाली दुरुस्ती पाहा). या हत्याकांडासंबंधी विदर्भाबाहेर प्रसिद्ध झालेली ही पहिली बातमी. त्यानंतर सब्रिना बकवॉल्टर यांनी २९ ऑक्टोबरला 'टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये लेख लिहिला. (संदर्भ : आनंद तेलतुंबडे). आणि त्यानंतर या हत्याकांडाबद्दल राष्ट्रीय स्तरावर गदारोळ सुरू झाला. त्यामुळे अशा बातम्यांना लोकांपर्यंत पोचवण्यात मुख्य प्रवाहातल्या माध्यमांचं महत्त्व टाळणं शक्य नाही. पण अशा माध्यमांना जागं ठेवण्यासाठी काही एक भूमिका पर्यायी माध्यमांनी वठवायला हवी. अशा जागं ठेवण्यासंबंधीचा एक प्रयोग म्हणजे atrocitynews.com.
***
म्यानमार : बुद्ध मूर्ती । फोटो : स्टीव्ह मॅकरी

***
जोड / दुरुस्ती : आपल्या एका वाचकाने जयदीप हर्डीकर यांना या नोंदीची लिंक पाठवली, त्यावर त्यांनी दिलेल्या प्रतिसादातील माहितीनुसार ही दुरुस्ती करतो आहे. आपण नोंदीमध्ये हर्डीकर यांनी विदर्भ जनआंदोलन समितीच्या दाखल्याने बातमी दिल्याचं म्हटलंय. यासाठी आपण 'संदर्भ : आनंद तेलतुंबडे' असा उल्लेख आधीपासून या नोंदीत केलेला होताच. त्यात भर अशी की, तेलतुंबडे यांच्या 'पर्सिस्टन्स ऑफ कास्ट : द खैरलांजी अँड इंडियाज् हिडन अपार्टाइड' (नवयान प्रकाशन) या पुस्तकाचा संदर्भ नोंदीत घेतलेला आहे. पुस्तकात १११ क्रमांकाच्या पानावर असा उल्लेख आहे : A Mumbai-based newspaper DNA carried a report on Khairlanji on 7 October - the first such outside the Vidarbha region. It generally endorsed the VJAS report and alerted the national print media to take note of Khairlanji. पण हर्डीकर यांनी कळवल्यानुसार, त्यांनी समितीच्या अहवालाचा दाखला देऊन बातमी दिली नसून समितीने त्यांच्या बातमीवरून काही धागा पकडला. यासंबंधी हर्डीकर यांनी 'डीएनए'मध्ये दिलेली बातमी व या बातमीचं त्यांच्या ब्लॉगवरचं पूर्ण रूपही वाचकांना पाहता येईल. हर्डीकर व वाचक अश्विनी यांचे आभार. आणि ही चूक झाल्याबद्दल सर्व वाचकांची माफी. (७ जुलै २०१३)

2 comments:

  1. Thank you so much,BTW बुद्धांच्या चेहऱ्यावर एवढे शांत, आश्वासक भाव कसे असतात, याचं मला नेहमीच आश्चर्य वाटतं...फोटो सुंदर आहे...

    ReplyDelete
  2. जाती व्यवस्थेवर आणि त्या संबंधित विषयावर खूप चांगले लेखन अनेक इंग्रजी साईट वर दिसून येते.... अश्या अनेक साईट बद्दल लिहायला हवे होते...

    ReplyDelete