Sunday 7 July 2013

रेघ : दुसरा टप्पा : छापील जोड

'रेघे'ला आपण पत्र / जर्नल अशा स्वरूपात चालवतो. म्हणजे किमान त्यामागचे प्रयत्न अशा रूपासाठीचे आहेत. हे मराठीत सुरू असलेलं पत्र आहे. इंटरनेटवरच्या रूपात कोणत्याही वितरणव्यवस्थेशिवाय 'रेघे'ची पोच काही वेळा परदेशापर्यंत होऊ शकते, दुसऱ्या राज्यांमध्ये पण 'रेघे'चे वाचक असू शकतात, शिवाय महाराष्ट्रातही विविध जिल्ह्यांपर्यंत पोचणं शक्य होतं. हे प्रमाण साहजिकपणे खूपच कमी असलं, तरी अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या किमान एक-दोन एक-दोन वाचकांनी ekregh@gmail.com या पत्त्यावरती 'रेघे'पर्यंत आपल्या प्रतिक्रिया पोचवल्यामुळे आपण हे निरीक्षण नोंदवतोय. क्वचित कोणी भेटूनही 'रेघे'च्या वाचकपणाबद्दल कळवलेलं आहे. आणि हे वाचक 'रेघे'मागे असलेल्या व्यक्तीच्या थेट ओळखीतले नसून त्यांना 'रेघे'चीच ओळख होती, हे सगळ्यात चांगलं.

पण तरी, आपल्याला असं वाटत होतं की, 'रेघे'च्या प्रयत्नांना छापील जोड असावी. ह्या पडद्यावर खालच्या बाजूला एक 'छापून न आलेलं मुखपृष्ठ'ही तुम्हाला दिसू शकेल. त्यामुळे छापील विचार केलेला होता. पण ते प्रत्यक्षात आणणं अनेक अर्थांनी शक्य नाही. तेवढी आर्थिक ताकद, माणसांची ताकद किमान काही वेळापुरती तरी उभी करता यायला हवी. आपल्याला ते जमलेलं नाही. मधे एकदा 'रेघे'वरच्या निवडक नोंदींची पुस्तिका किंवा लहानसा अंक काढण्यासंबंधी आर्थिक सहभागाची तयारी असलेल्या वाचकांनी नोंदणी करावी, असंही आवाहन आपण केलं होतं. पण त्याला तीन वाचकांचा प्रतिसाद आला. त्यामुळे महान विचारवंत बेकार टुकारोव्स्की यांच्या 'तीन तिगाडा काम बिगाडा' ह्या सूत्राला अनुसरून आणि त्या तीन वाचकांच्या नि स्वतःच्या खिशाची चिंता वाटून आपण तो प्लॅन रद्द केला. थोडक्यात, एवढ्या कमी खिशांना मर्यादेपलीकडे आर्थिक भार देणं योग्य वाटलं नाही.

१ ते १५ जुलै २०१३
पण तरी, आपण वेगळे प्रयत्न सुरू ठेवले होते. आणि 'रेघे'वर नोंदवलेला नोम चोम्स्की यांचा 'मुख्य प्रवाहातील माध्यमं असतात तशी का असतात?' हा लेख कुठे छापून येईल का, यासाठी दोन-तीन प्रयत्न केले. आणि कोणत्याही ओळखीशिवाय 'परिवर्तनाचा वाटसरू' या पाक्षिकाच्या १ ते १५ जुलै २०१३च्या अंकात हा लेख छापून आलेला आहे. ही माहिती वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी आजची नोंद आहे.

'रेघे'ने मार्च महिन्यात 'झेड मॅगझिन'सोबत दोस्तीची बोलणी केली, तेव्हा वाचकांना त्याची माहिती देताना नोंदीचं शीर्षक दिलेलं : 'थँक्स मायकल । रेघ : एक टप्पा'. 'रेघे'साठी 'झेड-नेट', 'झेड-मॅगझिन'वरचा मजकूर अधूनमधून मराठीत अनुवादित करण्याची परवानगी 'झेड कम्युनिकेशन्स'चे सह-संस्थापक व सह-संपादक मायकल अल्बर्ट यांच्याकडून मिळवली, त्यासंबंधीची ती नोंद होती. त्यानुसार चोम्स्की यांचा लेख मराठीत आणला होता. 'रेघे'ला छापील जोड देण्याचा विचारही आपण मायकल यांच्या कानावर घालून ठेवलेला होता, त्यामुळे त्या मूळ परवानगीच्या मर्यादेतच आपण चोम्स्की यांचा लेख 'परिवर्तनाचा वाटसरू'मध्ये छापण्यासाठी पाठवला. आणि तो छापून आला. या अंकाचं मुखपृष्ठ वेगळ्या लेखासंबंधीचं आहे. चोम्स्की यांच्या लेखाशी ते संबंधित नाहीये.

चोम्स्की यांच्या लेखाचा आणि आपल्या परिसराचा काही संबंध स्पष्ट व्हावा, यासाठी एक चौकटीतला मजकूर आपण लेखासोबत पाठवला होता, तोही संपादकांनी चौकटीत दिलेला आहे. तो असा :
माध्यमं ही आता व्यक्तीच्या शरीराचा कपड्यांप्रमाणे आणि कपड्यांइतकाच अपरिहार्य भाग होऊ घातली आहेत. भारतातल्या ७० टक्क्यांहून अधिक लोकांकडे मोबाइल आहे. (देशात एवढ्या लोकांकडे शौचाला जाण्यासाठी आवश्यक योग्य प्रकारच्या संडासचीही सोय नाही!) मोबाइल, त्यावरून येणारे-जाणारे संदेश, त्यावर येणारं इंटरनेट अशा मार्गाने माध्यमं आता व्यक्तीभोवती फिरत राहणार. याशिवाय रोज येणारं वृत्तपत्र, चोवीस तास चालणाऱ्या दूरचित्रवाणी वाहिन्या (बातम्यांच्या आणि मनोरंजनाच्याही), कम्प्युटर, फेसबुक-ट्विटर आदी सोशल नेटवर्किंग वेबसाइटी या सगळ्यांतून माहितीचा प्रवाह इकडून तिकडे वाहत राहणार. एका पातळीवर माध्यमं व्यक्ती-व्यक्तीच्या अभिव्यक्तीला व्यासपीठ देतायंत आणि हे माध्यमांचं लोकशाहीकरण आहे, असं चित्र यातून तयार होतं. एका मर्यादेपर्यंत या चित्रात तथ्य आहेच, पण या चित्रातले रंग इतके साधे नाहीत.

माध्यमं (यात ‘फेसबुक’सारख्या लोकांच्या खाजगी माहितीचं वस्तूकरण करून आर्थिक फायदा कमावणाऱ्या खाजगी कंपन्याही आल्या आणि वृत्तपत्र, दूरचित्रवाणी आदी माध्यमंही आली) ही कोणाकडून नियंत्रित होतात? एकूण लोकशाहीच्या असण्यात माध्यमांची भूमिका काय? आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आपण माध्यमांना वापरतो की माध्यमं आणि तिच्यामागच्या शक्ती आपल्याला (म्हणजे व्यक्तीतल्या वाचकाला/प्रेक्षकाला आणि पर्यायाने नागरिकाला) वापरतात? या प्रश्नांची उत्तरं गुंतागुंतीची आहेत. आत्ताच्या काळासारखी ‘होय’ किंवा ‘नाही’ अशी पर्यायी प्रश्नोत्तरांसारखी पळवाट याबाबतीत नाही. हे गुंतागुंतीचं चित्र स्पष्ट होण्यासाठी आपल्याला अनेक बिंदू शोधून ते एकमेकांशी जोडावे लागतील. या बिंदूंमधला एक बिंदू म्हणजे ज्येष्ठ विचारवंत नोम चोम्स्की यांचा हा लेख आहे. या लेखात काही संदर्भ अमेरिकी माध्यमांसंबंधीचे असले तरी एकूणच मुख्य प्रवाहातल्या माध्यमांची रचना स्पष्ट करण्याचा प्रयत्न चोम्स्कींनी या लेखातून केला आहे. आणि तो जगातल्या विविध ठिकाणच्या व विविध पातळ्यांवरच्या माध्यमव्यवहाराला लागू होतो. आपण रोज आजूबाजूला जे पाहतोय, अनुभवतोय त्या चित्राबद्दल आवश्यक तेवढा किमान साशंकपणा बाळगण्यासाठी वाचकांना हा लेख उपयोगी पडावा अशी आशा.

छापील जोड, असं आपण म्हणतो त्यामागे काही कारणं होती. 'रेघ' ज्या रूपात आहे त्यावर चार हजार-पाच हजार शब्दांचा लेख वाचणं काहींना अडचणीचं वाटतं, काहींना अशा रूपात काही बऱ्यापैकी गंभीर काम होऊ शकतं हे पटत नाही, काहींना इंटरनेटवर असं वाचण्याची सवय नाही, काहींना ब्लॉग-बिग म्हणजे फुटकळ असंही वाटतं, काहींना छापील गोष्टीच गंभीर वाटतात, वगैरे विविध गोष्टी ऐकायला मिळाल्या. ह्या कारणांमुळे आणि एकूण इंटरनेट वापरणाऱ्यांचं तुरळक प्रमाण पाहता आपण छापील जोड मिळण्यासाठी प्रयत्न करत होतो. स्वतंत्रपणे स्वतःहून अंक छापणं खर्चिक काम आहे, त्यामुळे तो विचार सोडला. मुळात अशा छापील प्रयत्नातून 'रेघे'च्या वाटचालीसाठी काही आर्थिक मदत उभी राहील, असंही वाटत होतं. पण ते शक्य झालं नाही. तरीही, चोम्स्कींचा लेख 'परिवर्तनाचा वाटसरू'च्या अंकात जसा आला, तसे लहानसहान प्रयत्न कदाचित करत राहता येतील. अशा प्रयत्नांमध्ये अंक प्रसिद्ध झाल्याचंही कदाचित आपल्याला कोणी कळवणार नाही, पण छापील जोड मिळेल. तशी यात आर्थिक उभारणीही काही होत नाही, पण असा अंक स्वतःहून विकत घेण्याचा खर्च सोडला तर वेगळा खर्च होत नाही, हेही काही कमी नाही. आपण हे आर्थिकबिर्थिक फार बोलतोय, असं वाटतंय ना? पण ते मुद्दामच बोलतोय. हे बोलणं व्यक्तीसंबंधीचं नाहीये, तर मराठी भाषेचं आर्थिक अंग खंगलेलं आहे, ही बहुतेकांना पूर्वीपासूनच माहीत असलेली गोष्ट त्यातून नोंदवायचेय.

अर्थात, तरीही चोम्स्की यांचा 'रेघे'वरचा लेख 'परिवर्तनाचा वाटसरू'मध्ये छापून आला ही चांगलीच गोष्ट झालेय. एका अर्थी, 'रेघे'च्या प्रवासातला नेहमीच्या नोंदींपेक्षा जरा वेगळा असा हा आणखी एक टप्पा आहे. पहिला टप्पा 'झेड'वाल्यांशी दोस्तीची बोलणी झाली तो, आणि दुसरा टप्पा आजचा छापील जोड काही प्रमाणात मिळाली तो.

वाचक हा 'रेघे'सारख्या पत्रांचा एक महत्त्वाचा भाग असतोच. काही वाचकांनी 'रेघे'च्या लिंक 'फेसबुक'वर पोचवायल्या हव्यात कारण तिथूनच आम्हाला नव्या नोंदीसंबंधी कळतं, असं सांगितलं म्हणून आपण 'रेघे'चं फेसबुकवरचं पान तेवढ्यापुरतंच सुरू ठेवलंय, अन्यथा ते तसं सुरू राहिलं नसतं. शिवाय 'रेघे'च्या आधीच्या रूपात काळ्या पार्श्वभूमीवर पांढरा मजकूर अशी रचना होती; पण असं वाचताना खूपच त्रास होतो, असं काही वाचकांनी कळवल्यामुळे आपण त्यावर आत्ताचा तोडगा शोधला. त्यामुळे वाचकांचं म्हणणं हे अशा जर्नलांचा एक भाग असतं, असं आपल्याला वाटतं. त्यामुळेच जे वाचक अंक पाहणार नसतील, त्यांना अंदाज यावा म्हणून लेखाची सुरुवात कशी दिसतेय ते इथे देऊया :

लेखाची सुरुवात

इथे 'अनुवाद' ह्या शब्दापुढे दिसतेय ती रेघ आपण दिलेय, अंकाच्या संपादकांनी तिथे अनुवाद केलेल्या माणसाचं नाव दिलेलं आहे. हा लेख मूळ 'रेघे'साठी अनुवादित केला होता, हे लेखाच्या छापील रूपासोबत नोंदवणंही महत्त्वाचं होतं. कारण पर्यायी माध्यमाच्या प्रवाहासाठीचं जे विधान आपण नोंदवू इच्छितोय आणि 'रेघ' हा ज्या पद्धतीचा प्रयत्न आहे, त्याला छापील जोड म्हणून हा लेख छापून येतो आहे, हे स्पष्ट होणं आवश्यक होतं. ती आपली सूचना संपादकांनी स्वीकारून लेखाखाली तो तपशील दिलेला आहे. तो असा दिसतोय :

शेवटचा मजकूर
***

'परिवर्तनाच्या वाटसरू'च्या अंकाची किंमत पंधरा रुपये असते आणि महाराष्ट्राच्या बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये त्यांचे प्रतिनिधी आहेत. कोणाला या प्रतिनिधींची माहिती हवी असेल, तर ती अंकात अशी दिलेली आहे :

4 comments:

  1. माझ्याकडे वाटसरुचा अंक नियमित येतो.. त्यात लेख वाचला.. आधी रेघेवर वाचला होताच.. अभिनंदन.

    ReplyDelete
  2. Abhijeet Ranadivé,
    Ruminations and Musings,

    थँक्स..

    ReplyDelete
  3. congratulations!!

    ReplyDelete