नेल्सन मंडेला |
***
दक्षिण आफ्रिकेतल्या वर्णद्वेषाविरोधात यशस्वी लढ्याचं नेतृत्त्व केलेले आणि नंतर पाच वर्षं देशाचे अध्यक्ष म्हणून काम केलेले नेल्सन मंडेला यांच्या वयाची ९५ वर्षं आज पूर्ण होतायंत. बरेच आजारीही आहेत ते, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये आहेत. वर्णद्वेषाविरोधातला लढा यशस्वी होण्यापूर्वी आणि दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष बनण्यापूर्वी मंडेला यांना १९६२ ते १९९० या काळात सत्तावीस वर्षं तुरुंगवास भोगावा लागला होता. दक्षिण आफ्रिकेतून वर्णद्वेषाचं धोरण हद्दपार केल्याबद्दल १९९३ साली मंडेला यांना तत्कालीन राष्ट्राध्यक्ष एफ. डब्ल्यू दे क्लर्क यांच्यासोबत संयुक्तपणे 'नोबेल शांतता पुरस्कार' देण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर मंडेला यांनी केलेलं भाषण आपण 'रेघे'वर मराठीत अनुवादित करून नोंदवतो आहोत, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत!
हे भाषण किंवा मंडेला हा विषय वरकरणी 'रेघे'च्या मर्यादेतला / क्षमतेतला नाहीये तसा. मंडेलांच्या कामासंबंधी, विशेषतः राष्ट्राध्यक्ष पदावर असतानाच्या पाच वर्षांच्या कामासंबंधी सकारात्मक-नकारात्मक अशी मतं कुठे ना कुठे वाचायला मिळतात. आपण हे भाषण अऩुवादित करून नोंदवतोय त्याचा हेतू हा - 'मंडेला अतिशय आजारी आहेत' असं काही सांगणारी बातमी वाचल्यावर तुमच्या मनात काय भावना येतेय? जी भावना येत असेल तीच भावना का येत असेल? मंडेला किंवा अशा व्यक्ती नक्की कशाचं प्रतीक म्हणून आपल्या डोक्यात घट्ट बसलेल्या असाव्यात? आपल्याला यासंबंधीची फारशी खोलातली माहिती नसली आणि ती प्रत्येक वेळी करून घेणं शक्यही नसलं, तरी नक्की कोणत्या गोष्टींसाठी मंडेला यांच्याबद्दल प्रसारमाध्यमांमधून आणि पर्यायाने मानवी समूहाकडून काळजी व्यक्त होते. ही काळजी काही उच्च / उदात्त / कट्टर नैतिक अशा मूल्यांबद्दलची असते का? पण असं फारसं काहीच आपल्यामध्ये- म्हणजे साधारणतः माणसामध्ये आणि आपल्या आजूबाजूला दिसत नाही, तरीही ही काळजी का बोलून दाखवली जाते? मुळात ही अशी मूल्यं प्रत्यक्षात आणण्याबद्दलचं बोलणं कशासाठी असतं? इतका उदात्त वाटणारा आशय बोलण्याच्या पातळीवर का टिकवलेला असतो? त्याबद्दल सार्वजनिक ओढ व्यक्त का केली जाते? आपल्या 'रेघे'च्या परंपरेप्रमाणे उत्तर नसलेला किंवा असलेला प्रश्न. तरीही आणि म्हणूनच हे भाषण 'रेघे'वर. बातम्या वाचल्यानंतर शांतपणे वाचण्यासाठी.
खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे - साने गुरुजी (म्हणजे काय)?
***
आम्हाला नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्याच्या निर्णयाबद्दल मी नॉर्वेजियन नोबेल समितीचे मनापासून आभार मानतो. हेच निमित्त साधून मी माझे सहकारी राष्ट्राध्यक्ष एफ. डब्ल्यू. दे क्लर्क यांचंही अभिनंदन करतो.
आम्ही एकत्रितपणे दोन थोर दक्षिणी आफ्रिकी व्यक्तिमत्त्वांचं प्रतिनिधित्त्व करतो असं म्हणता येईल; ही व्यक्तिमत्त्वं म्हणजे माजी अध्यक्ष अल्बर्ट लुटुली आणि आर्चबिशप डेस्मन्ड टुटू. वर्णभेदाच्या क्रूर व्यवस्थेविरुद्धच्या शांततापूर्ण लढ्यामध्ये या दोघांनी दिलेल्या योगदानाची योग्य दखल घेऊन आपण त्यांना यापूर्वीच 'नोबेल शांतता पुरस्कार' प्रदान केलेला आहे.
याशिवाय 'नोबेल शांतता पुरस्कार' मिळालेलं दुसरं महान व्यक्तिमत्त्व दिवंगत रेव्हरंड मार्टिन ल्युथर किंग, ज्युनियर यांचाही समावेश मी आमच्या पूर्वसुरींमध्ये केला तर ती अतिशयोक्ती म्हणता येणार नाही. आम्हाला दक्षिण आफ्रिकी नागरीक म्हणून ज्या समस्यांना सामोरं जावं लागतंय त्यावर उपाय शोधण्याच्या प्रयत्नांमध्ये असतानाच त्यांनी आपला देह ठेवला.
युद्ध व शांतता, हिंसा व अहिंसा, वर्णद्वेष व मानवी सभ्यता, शोषण-पिळवणूक व मुक्तता-मानवाधिकार, अशा एकमेकांच्या विरोधात असलेल्या गोष्टींसंबंधीच्या आव्हानांबद्दल आपण बोलतो आहोत.
युद्ध, हिंसा, वर्णद्वेष, शोषण, पिळवणूक आणि जनतेचं दारिद्र्य हेच ज्या व्यवस्थेचं तत्त्व होतं त्या व्यवस्थेविरोधात उभं ठाकण्याचं धाडस दाखवणाऱ्या लाखो लोकांचे फक्त प्रतिनिधी म्हणून आम्ही इथे उभे आहोत. शिवाय, आमच्यासोबत असलेले जगभरातील लाखो लोक, वर्णद्वेषविरोधी चळवळ, सरकारं आणि संस्था, यांचा प्रतिनिधी म्हणूनही मी इथे उभा आहे. आमचा लढा दक्षिण आफ्रिकेविरोधात किंवा एखाद्या नागरिकाविरोधात नव्हता, तर अमानवी व्यवस्थेविरोधात आणि मानवतेविरोधातील गुन्हा असलेल्या वर्णद्वेषी धोरणाचा शेवट करण्यासाठीचा आमचा लढा होता.
क्रौर्याचा आणि अन्यायाचा मार्ग रोखून ठेवण्यासाठी आवश्यक चांगुलपणा राखून असलेली ही आमच्या देशातली किंवा बाहेरची माणसं निस्वार्थीपणे आमच्या सोबत होती. एकाला झालेली इजा ही सर्वांना झालेली इजा असते हे त्यांना समजलेलं होतं आणि म्हणूनच ते न्यायाच्या आणि समान मानवी सभ्यतेच्या रक्षणासाठी एकत्रितपणे कृती करू शकले. अनेक वर्षांच्या कालावधीमधे दिसलेलं त्यांचं शौर्य आणि टिकण्याची वृत्ती यामुळेच आपण आज चालू शतकातील महान मानवी विजयांपैकी एक असलेल्या या प्रसंगाला साजरं करू शकतोय. (इथे मंडेला दक्षिण आफ्रिकेतल्या तेव्हा येऊ घातलेल्या सत्तांतराचा संदर्भ देतायंत.)
तो क्षण येईत तेव्हा आपण सर्व एकत्र येऊन वर्णद्वेषाविरोधातील आणि अल्पसंख्य श्वेतवर्णीय सत्तेविरोधातील आपला विजय साजरा करू. पोर्तुगीज साम्राज्याच्या स्थापनेच्या बिंदूपासून सुरू झालेला पाचशे वर्षांचा गुलामीचा आफ्रिकी इतिहास त्या विजयी क्षणाला संपलेला असेल. जगात कुठेही आणि कोणत्याही प्रकारे वर्णद्वेष दिसून आला तर त्याविरोधात लढण्याची एक समान प्रतिज्ञा ठरणारा तो क्षण इतिहासात एक पाऊल पुढे टाकणाराही असेल.
स्वातंत्र्य, शांतता, मानवी सभ्यता आणि मानवी समाधान या तत्त्वांसाठी आपल्या सर्वस्वाच्या त्याग केलेल्या लोकांना एक अमूल्य भेटवस्तू घडवण्याचं काम आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकावरती सुरू आहे. ही भेट पैशामध्ये मोजता येणारी नाही. किंवा आमचे पूर्वज ज्या मातीवरून चालले त्या आफ्रिकी मातीत आढळणाऱ्या दुर्मीळ धातूंच्या नि किमती दगडांच्या एकत्रित किंमतीमध्येही ही भेट मोजणी होऊ शकणार नाही. या भेटवस्तूची मोजणी फक्त एकाच गोष्टीने होईल, ती गोष्ट म्हणजे मुलांचा आनंद आणि कल्याण. मुलं म्हणजे एकाच वेळी त्या समाजातील सर्वांत नाजूक नागरिकही असतात आणि त्याचवेळी महान खजिन्यासारखीही असतात.
मुलांना किमान मोकळ्या मैदानात खेळायला मिळावं, भुकेने व्याकूळ होण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये किंवा दुर्लक्षित राहिल्यामुळे एखाद्या आजाराच्या विळख्यात ती सापडू नयेत, अत्याचारांना बळी पडू नयेत आणि त्यांच्या कोवळ्या वयाला करूणगंभीर ठरतील अशा गोष्टी करण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये.
उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांसमोर आम्ही हे सांगू इच्छितो की, दक्षिण आफ्रिकेचं नवं रूप 'जागतिक जाहिरनाम्या'त नोंदवलेल्या मुलांसाठीच्या जीवन, सुरक्षा व विकासाच्या निकषांनुसार चालेल. आपण बोलतोय त्या गोष्टीचं मूल्य या मुलांच्या माता व पित्यांच्या आनंदाने आणि कल्याणानेही मोजायला हवं. चोरीच्या, किंवा राजकीय वा अन्य कारणांमुळे खून होण्याच्या किंवा भिकारी असल्यामुळे आपल्यावर कोणीतरी थुंकेल अशा कोणत्याही भीतीविना त्यांना या भूमीवरून फिरता यावं. भुकेमुळे, बेघरपणामुळे आणि बेरोजगारीमुळे त्यांच्या हृदयांमध्ये दबून असलेल्या दुःखाचं ओझं उतरवणंही आवश्यक आहे.
(माणसामाणसातील) विभाजनाच्या सर्व अमानवी भिंती तोडून टाकणाऱ्या या सर्व शोषितांना मिळणाऱ्या भेटवस्तूचं मूल्य आपल्या देशातील सर्व लोकांच्या आनंदानं आणि कल्याणानं मोजावं.
काही जणांना मालक व काहींना नोकर ठरवणाऱ्या आणि दुसऱ्याला उद्ध्वस्त करूनच आपलं अस्तित्त्व टिकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमानवी परिस्थितीकडे या सर्व लोकांनी पाठ फिरवलेली असेल.
आपल्या या भेटवस्तूचं मूल्य आनंदी शांततेत मोजावं. ही शांतताच विजयी होणार आहे, कारण कृष्णवर्णीय व श्वेतवर्णीय दोन्हींना एकाच मानव वंशात बांधणारी मानवता आपल्यातल्या प्रत्येकाला याची जाणीव करून देईल की, आपण सगळी देवाची लेकरं आहोत.
असं आपण जगू शकतो, कारण सर्व माणसं जन्मतः समान आहेत आणि प्रत्येकाला जगण्याचा, स्वातंत्र्याचा, प्रगतीचा, मानवाधिकाराचा आणि चांगल्या प्रशासनाचा समान अधिकार आहे याची जाणीव असलेला समाज आपण निर्माण केलेला असेल.
अशा समाजात कोणी सद्सद्विवेकबुद्धीचं बंदी होऊ नये आणि कोणा माणसाचे मानवाधिकार हिरावले जाऊ नयेत. केवळ आपल्या हितासाठी आणि नीच हेतूंसाठी लोकांकडून सत्ता हिरावून घेऊ पाहणाऱ्यांविरोधात लढण्यासाठीचे शांततापूर्ण मार्ग अशा समाजात कधीच बंद असू नयेत.
याच संदर्भात, आम्ही बर्माच्या सत्ताधाऱ्यांना आवाहन करतो की, नोबेल पारितोषिक सन्मानित आंग सान स्यू की यांना सोडण्यात यावं आणि त्यांच्याशी व त्या ज्यांचं प्रतिनिधित्त्व करतात त्यांच्याशी प्रामाणिकपणे चर्चा करावी. हे बर्मातील सर्व जनतेच्याच भल्याचं असेल. यासंबंधीचा निर्णय ज्यांच्या हातात आहे त्यांनी तो तातडीने घ्यावा अशी विनंती आम्ही करतो. स्यू की यांना त्यांची बुद्धी आणि ऊर्जा त्यांच्या देशातील नागरिकांच्या व एकूण मानवतेच्या भल्यासाठी वापरण्याची परवानगी संबंधितांनी द्यावी.
आमच्या देशातील खडबडीत आणि अडखळणाऱ्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर मी आणखी एक संधी साधू इच्छितो. माझ्यासोबत ज्यांना सन्मानित केलं जातंय ते श्री. एफ. डब्ल्यू. दे क्लर्क यांना अभिवादन करण्याची संधी मी नोबल समितीच्या सोबतीनंच घेतोय. आमच्या देशामध्ये भयानक मोठी चूक झालेली आहे आणि लोकांवर वर्णभेदाची व्यवस्था थोपवली गेलेय, हे मान्य करण्याचं धाडस त्यांच्यात होतं.
दक्षिण आफ्रिकेतल्या लोकांनी चर्चेने आणि समन्यायी प्रक्रियेद्वारे आपल्याला भविष्यात काय घडवायचंय याचा निर्णय करायला हवा, हे समजून घेण्याची आणि स्वीकारण्याची दूरदृष्टी त्यांच्याकडे होती. पण आमच्या देशात अजून असेही काही लोक आहेत ज्यांना वाटतं की विध्वंसाला कारणीभूत ठरलेल्या टाकाऊ तत्त्वांना चिकटून राहिल्यानेच ते न्यायाच्या प्रक्रियेत योगदान देऊ शकतील. पण तिरस्करणीय भूतकाळ कितीही सुधारून किंवा वेगवेगळ्या मांडणीने पुढे आला तरी त्यातून नवीन समाज निर्माण करता येत नाही आणि इतिहास विसरता येत नाही, ही समज या मंडळींनाही येईल अशी आशा आम्हाला आहे.
शिवाय, आजच्या प्रसंगाचं निमित्त साधून आमच्या देशातील विविध लोकशाही संघटनांनाही अभिवादन करायला हवं. आज आमचा देश लोकशाही मार्गाने सत्तांतर होण्याच्या क्षणापर्यंत आला त्यासाठीच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या 'देशाभिमानी आघाडी'लाही अभिवादन करायला हवं.
दक्षिण आफ्रिका ही जन्माला येऊ घातलेल्या नवीन जगाची एक प्रतिकृती ठरेल अशी आशा आम्हाला वाटते. हे जग लोकशाहीचा आणि मानवाधिकारांचा आदर ठेवणारं असेल. गरीबी, भूक, विवंचना आणि दुर्लक्ष यांच्या क्रौर्यापासून मुक्त असं हे जग असेल. यादवी युद्धांचा धोका आणि परकीय आक्रमणाची टांगती तलवार नसलेल्या या जगात लाखो लोकांनी निर्वासित होण्यासारखी अवस्था निर्माण होणार नाही.
या प्रक्रियेमध्ये दक्षिण आफ्रिका आणि आफ्रिकेच्या दक्षिण भागातील सर्व देश एकत्रितपणे हे आवाहन करतायंत. सद्सद्विवेकबुद्धी जागी असलेल्या सगळ्या लोकांना जग जसं हवं असेल त्याचं जितंजागतं उदाहरण म्हणून हा प्रदेश उभा राहावा.
हा नोबेल शांतता पुरस्कार घडून गेलेल्या, गतकालीन गोष्टींसाठी दिला जातो यावर आमचा विश्वास नाही.
वर्णद्वेषाच्या व्यवस्थेचा अंत व्हावा असं वाटणाऱ्या जगभरातील सगळ्या लोकांचा आवाज आम्ही ऐकतोय आणि त्यांच्या वतीने हे आवाहन करतोय.
या आवाहनातली भावना आम्ही समजू शकतो. आणि मानवी अस्तित्त्वाचं सहज रूप म्हणून लोकशाही, न्याय, शांतता, सर्वसमावेशक संपन्नता, सुदृढ वातावरण, समानता ही तत्त्वं असू शकतात हे प्रत्यक्षात दाखवून द्यावं आणि आमच्या देशाचा हा अनुभव यशस्वी व्हावा यासाठी आम्ही जीव ओतून काम करू.
हे जगभरातल्या लोकांचं आवाहन आणि आपण आमच्यावर दाखवलेला विश्वास यांमधून प्रेरणा घेत, आम्ही अशी प्रतिज्ञा करतो की, भविष्यात इथे कोणीच भूमातेचं दुर्भागी अपत्य ठरू नये यासाठी नवयुगाची निर्मिती करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.
मतभेद, निराशावाद आणि स्वार्थीपणामुळे आपण मानवतेची व नोबेल शांतता पुरस्कारासाठी मूलभूत मानली जाणारी तत्त्वं पाळण्यात अयशस्वी ठरलो, असा आरोप भविष्यातील पिढ्यांनी आपल्यावर करू नये हे लक्षात ठेवायला हवं.
वर्णद्वेष आणि युद्ध यांनी घेरलेल्या काळोख्या मध्यरात्रीमध्ये जग आता बंदिस्त राहू शकणार नाही, हे मार्टिन ल्युथर किंग- ज्युनियर यांचं म्हणणं खरं ठरेल असं आपलं जगणं असू दे. हिरे नि चांदी नि सोन यांपेक्षा निर्मळ बंधुभाव आणि शांतता सुंदर असतात, असं म्हणणारे मार्टिन ल्युथर केवळ एक स्वप्नाळू व्यक्ती नव्हते हे आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून सिद्ध होऊ द्या.
एक नवीन पहाट उगवू द्या!
धन्यवाद.
***
मंडेला यांनी सत्तावीस वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेतली अठरा
वर्षं तुरुंगाच्या ज्या खोलीत काढली, त्या खोलीत ते १९९४ साली फेरफटका मारायला परतलेले, तेव्हाचा त्यांचा हा फोटो जर्गेन शाडबर्ग यांनी काढलेला. |
१)सध्या अमेरिकेत जे काही सुरु आहे त्या पार्श्वभूमीवर हि नोंद वाचनीय आहे.
ReplyDelete२)मंडेला, मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर, साने गुरुजी असे सगळे तसे पाहता लांबचे असणारे बिंदू जोडणं हे ही तसं विशेष
आणि
३) खालचा दुसरा फोटो अधिक लक्ष वेधून घेतो. म्हणजे फोटो निवडीचं ही कौतुक.