१४ एप्रिल २०२०

दोन टोकांदरम्यानचं अंतर

व्हिन्टेज इंटरनॅशनल, १९६०
आल्बेर काम्यूच्या निवडक पत्रकारी लेखनाचं पुस्तक 'रेझिस्टन्स, रिबेलियन अँड डेथ' या नावाने इंग्रजीत (फ्रेंचमधून भाषांतर: जस्टीन ओ'ब्रायन) प्रकाशित झालंय. त्यात सुरुवातीलाच 'लेटर्स टू अ जर्मन फ्रेंड' या शीर्षकाचा एक विभाग आहे. १९४३-४४ या वर्षांत- म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या काळात- लिहिली गेलेली ही चार पत्रं आहेत. 'जर्मन' मित्र, असं म्हटलं असलं, तरी त्यात 'नाझी' मित्र, असं अभिप्रेत असल्याचं काम्यूने प्रस्तावनापर टिपणात स्पष्ट केलंय. तर, एकंदर फ्रान्सवर नाझी जर्मनीने ताबा मिळवणं आणि नंतर त्यातून फ्रान्स पुन्हा मुक्त होणं, या घडामोडी सुरू असतानाचा संदर्भ त्या लेखनाला आहे.

यातल्या पहिल्या पत्रात काम्यूचा काल्पनिक जर्मन मित्र म्हणतो, 'माझ्या देशाची थोरवी अमूल्य आहे. या थोरवीमध्ये भर घालणारी कोणतीही गोष्ट चांगलीच. सध्याच्या जगात सर्व गोष्टी स्वतःचा अर्थ गमावून बसल्या आहेत, अशा वेळी आमच्यासारख्या जर्मन तरुणांना नशिबाने स्वतःच्या राष्ट्राच्या नियतीची अर्थपूर्णता जाणवली, त्यामुळे आम्ही इतर सगळ्या गोष्टींचा त्याग करायलाच हवा.' त्यावर काम्यू फ्रेंचांच्या वतीने सांगतो की, 'एकाच साध्यासाठी सर्व गोष्टींना दुय्यम स्थान देण्यावर माझा विश्वास नाही. काही गोष्टींना फाटा देता कामा नये. माझं माझ्या देशावर आणि न्यायावर एकाच वेळी प्रेम असायला हवं. उगाच कोणतीही थोरवी मला नकोय. विशेषतः रक्त आणि खोटेपणा यातून मिळालेली थोरवी नकोच. न्याय टिकून असेल, तर मला ही थोरवी टिकवता येईल.' त्यावर जर्मन मित्र तत्काळ उत्तरला: 'बरं, मग तुझं तुझ्या देशावर प्रेम नाहीये.'

ऐन युद्धकाळात विशिष्ट वाचकवर्गाला डोळ्यासमोर ठेवून वर्तमानपत्रात केलेलं हे लिखाण आहे. काहीसा ढोबळपणा त्यात आल्याचं दिसतं. तरीही, सध्याच्या आपल्या देशातल्या वातावरणाशी हे अगदीच जुळणारं वाटलं. वास्तविक एकीकडे कोरोना विषाणूच्या साथीने सगळं बंद आहे, कोणाला काही धड थांग लागत नाही, अशी परिस्थिती असताना, हे का बोलावं, हा प्रश्न रास्त आहे. तरीही, काही कारणांमुळे ही नोंद करणं गरजेचं वाटलं. कारण या नोंदीच्या शेवटी स्पष्ट होईल, अशी आशा.

आनंद तेलतुंबडे यांचा (प्रातिनिधिक) संदर्भ

३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यात शनिवारवाड्यावर एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि राज्यातलं तत्कालीन सरकार यांच्या 'नवपेशवाई'विरोधात एल्गार पुकारण्यासाठी ही परिषद असल्याचं बोललं गेलं. त्यानंतर १ जानेवारी २०१८ रोजी दर वर्षीप्रमाणे पुण्याजवळच्या भीमा-कोरेगाव इथे कोरेगाव लढाईच्या विजयस्तंभापाशी लोकांची मोठी गर्दी झाली. ब्राह्मणी पेशव्यांविरोधात ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने महार लढले, त्यातून पेशवाई कोलमडली, अशा सर्वसाधारण धारणेतून हा विजयोत्सव साजरा होतो. ही लढाई १८१८ साली झाली होती, त्यामुळे दोनशे वर्षं पूर्ण होत असल्याबद्दल १ जानेवारी २०१८चा कार्यक्रम विशेष महत्त्वाचा होता. त्या दिवशी भीमा-कोरेगावला दंगल झाली. त्यात अनेकांची धरपकड झाल्याच्या बातम्या आपण बहुधा वाचल्या असतील. आधी हिंदुत्ववादी गटांकडे आरोपी म्हणून पाहिलं गेलं, त्यात काही मोजक्या लोकांना अटक झाली, मग त्यांना जामीनही मिळाला. नंतर, या हिंसाचाराचा उगम आदल्या दिवशी झालेल्या एल्गार परिषदेशी असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. या परिषदेत चिथावणीखोर भाषणं झाली, परिषदेच्या आयोजनासाठी माओवाद्यांनी पैसा पुरवला होता, इत्यादी आरोप या संदर्भात झाले. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून पाच जणांना अटकही झाली. त्यानंतर पंतप्रधानांच्या हत्येचा कट माओवाद्यांनी रचल्याचाही आरोप पोलिसांच्या वतीने झाला. मग न्यायालयीन प्रक्रिया, 'बेकायदेशीर कृत्यं (प्रतिबंध) अधिनियमा'खाली आरोपपत्र दाखल होणं, परिणामी आरोपींना जामीन मिळणं मुश्कील, इत्यादी घडामोडी केल्या दोन वर्षांत आपण वाचल्या किंवा पाहिल्या असतील.

याच प्रकरणात आज आनंद तेलतुंबडे यांना राष्ट्रीय तपास संस्थेसमोर शरण जावं लागणार आहे. त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता, तो सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात फेटाळला, फक्त शरणागतीसाठी कालावधी वाढवून देण्यात आला आणि आता आज त्यांना शरण जावं लागेल. तेलतुंबड्यांंनी विविध वेळी या प्रकरणातील स्वतःवरचे आरोप निराधार असल्याचं सांगितलेलं आहे. किंबहुना, मुळात कोरेगावच्या लढाईचा 'मिथक' म्हणून होणारा वापरही त्यांना पटत नाही, १८१८ सालची लढाई जात्यंतासाठी होती अशा धारणेने आता दोन शतकांनंतर हाती काही लागणार नाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे मिथक पुढे आणलं तेव्हा चळवळीला जोर देणं हा स्वाभाविक उद्देश होता, पण आता त्यालाही अनेक वर्षं उलटलेली असल्यामुळे अशी मिथकं उपयोगी नाहीत, त्यातून विशिष्ट अस्मिता ओलांडण्याऐवजी ती बळकट होत जाईल, अशी मांडणी तेलतुंबडे यांनी २ जानेवारी २०१८ रोजी (म्हणजे एल्गार परिषदेनंतर दोनच दिवसांनी) प्रकाशित केला होता (पाहा: The Myth of Bhima Koregaon Reinforces the Identities It Seeks to Transcend). तर, आता याच तेलतुंबड्यांना भीमा-कोरेगावशी निगडित हिंसाचारप्रकरणी तुरुंगात जावं लागणार आहे.

पोलिसांनी या प्रकरणी न्यायालयात पुरावा म्हणून सादर केलेल्या तेरा पत्रांपैकी पाच पत्रांच्या आधारे तेलतुंबड्यांवरचे आरोप निश्चित केले आहेत, आणि यातल्या कोणत्याही दस्तावेजात आपल्या नावाचा थेट उल्लेख नाही, काही ठिकाणी 'आनंद' या नावाचा उल्लेख आहे, पण भारतात हे नाव सर्रास वापरलं जातं, त्यामुळे या पत्रांचा आपल्याशी काहीच संबंध नाही, असं तेलतुंबड्यांनी काल (१३ एप्रिल रोजी) लिहिलेल्या जाहीर पत्रातही म्हटलंय. (Open Letter to the People of India).

संवादांच्या मर्यादा

भीमा-कोरेगावमधल्या हिंसाचाराला कोणी चिथावणी दिली किंवा रसद पुरवली, याबद्दल इथे काही म्हणणं मांडणं शक्य नाही. पण या प्रकरणी अटक झालेल्या, माओवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप असलेल्या काही व्यक्तींबद्दल बोलणं शक्य आहे. त्यातल्या तेलतुंबडे यांचा उल्लेख वर आलाय. त्यांचं स्वतःचं लेखनही आपण रेघेवर पूर्वी भाषांतरित केलं होतं- खैरलांजीच्या निमित्ताने प्रसारमाध्यमं. एखाद्या वेळा मजकूर रेघेवर आणण्यासाठी त्यांची मदतही झाली होती. याच खटल्यात अटक झालेले गडचिरोलीचे महेश राऊत यांचीही मदत काही मजकूर रेघेवर येण्यासाठी झाली होती. या व्यतिरिक्तही काही व्यक्तींशी रेघेची पत्रकारी कामासाठी गाठभेट झाली होती, त्यावरून आपल्याला या लोकांच्या कथित माओवादी संबंधांबद्दल काही बोलता येईल का? कदाचित येईल. पण त्यातून काही साधणार नाही, असं वाटतं. वैयक्तिक अनुभवाव्यतिरिक्त अशा गोष्टींना काही आधार नाही. दुर्दैवाने तेलतुंबडे यांच्या आणि इतर काही आरोपींच्या संदर्भात वेळोवेळी प्रकाशित झालेले समर्थकांचे लेख वैयक्तिक अनुभव व्यक्त करणारे, किंवा कोणी कोणतं सामाजिक कार्य केलंय अथवा कोण किती शिकलंय, त्यांचं इतर क्षेत्रांमधलं योगदान काय आहे, याचा जास्त उहापोह करणारे आहेत. [उदाहरणादाखल पाहा: १. Why my friend Mahesh Raut - accused in Bhima Koregaon violence - is not an ‘urban Maoist' (DailyO, २ जुलै २०१८), २. Chronicle of an arrest foretold: As Anand Teltumbde is about to go to jail, an editor pays tribute, (Scroll, १३ एप्रिल २०२०), ३. My Friend Anand (NewsClick, २२ जानेवारी २०१९)]. वेगळ्या संदर्भात या गोष्टी नोंदवणं ठीक राहत असलं, तरी इथे या विशिष्ट प्रकरणी कोणाला आरोपी ठरवल्यावर अशा गोष्टींमधून सुट्या वाचकांना नक्की काय बोध होईल. एखाद्या व्यक्तीची इतर कामगिरी कितीही मोठी असली, तरी ती माओवादी पक्षाशी संबंधित असू शकतेच, मग त्यांच्यावर त्या आरोपाखाली खटला चालू दे, असं सुट्या व्यक्तींना वाटणार नाही का? पण तरीही अशा पद्धतीचे मजकूर येत राहतात, त्यातून सुट्या (म्हणजे विशिष्ट डाव्या-उजव्या विचारसरणीशी संबंध असेलच असं नाही, पण आपल्या आसपासच्या घडामोडी जाणून घेण्याची इच्छा राखणाऱ्या) वाचकांना त्यातून त्या विशिष्ट प्रकरणाची माहितीही पूर्ण मिळत नाही किंवा या प्रकरणाकडे पाहण्यासंबंधी काही झरोकेही सापडत नाहीत. विशेषतः तेलतुंबडे यांच्या समर्थनार्थ असे अनेक लेख आले. त्यापलीकडे तथ्यांवर आधारित अनेक आंतरराष्ट्रीय निवेदनं निघाली, काही प्रतिष्ठित शिक्षणसंस्थांमधल्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनीही निवेदनं काढली, तरीही त्याचा तितकासा परिणाम झाल्याचं दिसत नाही. त्यामुळे आता तेलतुंबडे यांना आज तुरुंगात जावं लागणार आहे. आपल्याविरोधातला प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर: फर्स्ट इन्फर्मेशन रिपोर्ट) रद्द करावा, अशी याचिका तेलतुंबडे यांनी केली होती, ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, परंतु अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करायला त्यांना १४ जानेवारी २०१९पासून पुढे चार आठवड्यांची मुदत दिली होती. परंतु, ही मुदत शिल्लक असतानाच ३ फेब्रुवारी २०१९ रोजी पुणे पोलिसांनी त्यांना अटक केल्याची घटना घडली होती. पण अशी अटक बेकायदेशीर असल्याचं सांगून न्यायालयाने तेव्हा त्यांना सोडण्याचे आदेश दिले होते. तर, आता इथे तेलतुंबडे यांचं उदाहरण काही प्रमाणात प्रातिनिधिक मानून बोलूया.

पोलिसांनी केलेल्या आरोपांमध्ये पुरेसं तथ्य असल्याचं बातम्यांवरून स्पष्ट होत नाही, पोलिसांनी या संदर्भात घेतलेल्या पत्रकार-परिषदेत काही पुरावे दाखवल्याचं केलं, पण त्यावरूनही 'बेकायदेशीर कृत्यं (प्रतिबंध) अधिनियमा'सारख्या निष्ठूर कायद्याच्या वापराचं समर्थन कसं होईल, याबद्दल स्पष्टता येत नाही. विनाजामीन बराच काळ तुरुंगात पडावं लागणं, हा यातला भीषण भाग आहे. आंतरराष्ट्रीय समर्थन आणि स्थानिक पातळीवरही बऱ्यापैकी समर्थन मिळूनसुद्धा तेलतुंबड्यांसारख्या सार्वजनिक व्यक्तिमत्वावर ही वेळ आलेली आहे, त्यांनी स्वतः अनेक निमसरकारी आणि खाजगी कॉर्पोरेट संस्थांमध्ये उच्चपदस्थ अधिकारी म्हणून काम केलेलं आहे, देशातले आघाडीचे वकील त्यांच्या बचावासाठी होते, तरीही हे होतंय. तर, मध्य भारतातल्या आदिवासी पट्ट्यांमधल्या सर्वसामान्य माणसांचं काय होत असेल, याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. त्यांचा कोणता ना कोणता संबंध माओवाद्यांशी आणि सरकारशी अपरिहार्यपणे येत राहतो, आणि त्याचे परिणामही त्यांना सहन करावे लागतात, आणि त्यांना पुरेसं संरक्षण कधीच मिळणं शक्य नसतं. तर, अशा वेळी एखाद्या विचारक माणसाविषयी व्यक्तिचित्रणात्मक स्वरूपाचा मजकूर किंवा निव्वळ विद्यमान सरकारच्या चारित्र्याविषयीची मतं मांडून कितपत फायदा होईल? किंबहुना, अशा पद्धतीचा संवाद फक्त आपल्या परिचितांशी, किंवा आपले विचार पटलेलेच आहेत अशा लोकांशीच शक्य असतो, असं वाटतं. अशा प्रकरणांची पुरेशी माहिती नसलेल्या पण माहिती घेऊ पाहणाऱ्या लोकांच्या हाती यातून काय लागेल? काही लोक कुठल्याच ठोस विचारांचे नसतील, आपलंच जगत असतील, तरीही त्यांना यातून कितपत स्पष्टता येईल? आणि, विरोधी मताच्या लोकांपर्यंत तर हे पोचणंही शक्य नाही, असं वाटतं.

कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या 'अंधारा'चा प्रतिकार करण्यासाठी आपण सर्वांनी- म्हणजे भारतीयांनी- ५ एप्रिलला रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी घरातले दिवे बंद करू आणि मग पणत्या, मोबाइल टॉर्च अशा पद्धतीचा प्रकाश निर्माण करू, असं आवाहन पंतप्रधानांनी काहीच दिवसांपूर्वी केलं. त्याला प्रतिसादही मिळाला. विशेषतः शहरी भागात प्रकाश पिसाटल्यासारखा असतो, त्यामुळे तिथे अशा पद्धतीच्या कृतीतून प्रतीकात्मक अंधार आणि प्रतीकात्मक प्रकाश निर्माण करून, नेत्रदीपक दृश्यं तयार झाली. माध्यमांमधून त्याची छायाचित्रं प्रकाशित झाली, वृत्तवाहिन्यांवर 'दीपोत्सव' साजरा झाल्याचं वार्तांकन केलं गेलं. [पाहा: १) कोरोनाविरोधात एकवटले पुणेकर; लक्ष्य-लक्ष्य दिव्यांनी उजळली पुण्यनगरी!, सकाळ, ५ एप्रिल; २) पंतप्रधानांच्या आवाहनानंतर कोरोना दिवाळीसाठी विविध शहरांमध्ये लोकांची तालीम, एबीपी न्यूज, ४ एप्रिल; ३) पंतप्रधानांच्या आवाहनानुसार देशात दिवाळी साजरी, एबीपी न्यूज, ५ एप्रिल. ४) नऊ मिनिटांची दिवाळी लक्ष्मणरेषेवाली, गायक-गायिकांसोबत स्वरदिव्यांची माळ, प्रकाशपर्व, इत्यादी, वीस व्हिडिओंची प्लेलिस्ट, एबीपी माझा, ५ एप्रिल]. या सगळ्याला प्रतीकात्मकच अर्थ असला, तरी पंतप्रधान 'मला तुमची नऊ मिनिटं हव्येत' असं सांगतात, आणि माध्यमांसह अनेक लोक यात सहज सहभागी होतात, यावरून आपल्या जनमानसाचा काही अंदाज यावा. अशा परिस्थितीत 'बेकायदेशीर कृत्यं (प्रतिबंध) अधिनियमा'तल्या एखाद्या प्रकरणाबद्दल, एल्गार परिषदेच्या विषयावर कसं बोलावं? निव्वळ आपल्या परिचयातल्या, आपल्याच मताच्या लोकांना हे सांगून पुरेसं आहे का? त्या पलीकडे, ५ एप्रिलला दिवे लावलेल्या लोकांशी बोलायचंच नाही का? बोलायचं असेल तर ते कसं बोलता येईल?

माओवादी पक्षाचं टोक

काम्यूने जर्मन मित्राला लिहिलेल्या पत्रांच्या सुरुवातीला (ब्लेझ) पास्कालचं एक वाक्य दिलंय, ते मराठीत असं करता येईल: 'एका टोकाला राहून माणसाची थोरवी दिसत नाही, तर दोन्ही टोकांना एकाच वेळी स्पर्श करून दिसते.' यातही थोरवी आली, ती आपण बाजूला ठेवू. पण एकाच टोकाने गोष्टी न पाहता दोन्ही टोकांना स्पर्श करून काही पाहता येतं का, ते जास्त महत्त्वाचं असावं- हा मुद्दा तेवढा लक्षात घेऊ.

माओवादी पक्षाचं एक निश्चित ध्येय आणि धोरण आहे. प्रदीर्घ लढा देऊन भारतीय राज्यसंस्था उलथवायची. त्यासाठी गरजेनुसार शस्त्रांचा वापरही करायचा. गरजेनुसार शत्रू-मित्र ठरवत जायचं. राज्यसंस्थेविषयीचं त्यांचं काहीएक आकलन आहे. या संदर्भात आपण रेघेवर आपल्या कुवतीनुसार नोंदी करायचा प्रयत्न केलेला आहे. तर, असं ध्येय असलेला आणि विशिष्ट विचारसरणीच काटेकोरपणे मानणारा पक्ष काही वेळा संसदीय लोकशाही चौकटीतले मार्गही सोयीसाठी स्वीकारतो. कधी संसदीय लोकशाही अवकाशातल्या लोकांचा सोयीस्कर वापरही करू पाहतो, कधी बाहेरच्या लोकशाही अवकाशातले मंचही वापरू पाहतो, काही समूहांना आकर्षित करू पाहतो. पण माओवादी पक्षावर बंदी असल्यामुळे त्याबद्दल उघडपणे बोलणं त्यांना या अवकाशात शक्य नसतं. हा विरोधाभास त्यांना चालतो. हा त्यांच्या डावपेचांचा, राजकीय धोरणाचा भाग आहे. यात काही नवीनही नाही. १९७०च्या दशकारंभी दलित पँथरची स्थापना झाली, तेव्हाही अशा प्रकारे नक्षलवाद्यांचा त्यात कमी-अधिक शिरकाव झाल्याचे आरोप-प्रत्यारोप झाले होते. हे त्यानंतरही होत राहिलेलं आहे. पण त्यांची धोरणं काहीही असली, तरी त्यांचा कमी-अधिक स्पर्श झालेला प्रत्येक मंच, प्रत्येक व्यक्ती 'बेकायदेशीर कृत्यं (प्रतिबंधक) अधिनियमा'सारख्या कठोर कायद्याखाली आणणं न्याय्य आहे का?

या संदर्भात दोन उदाहरणं नोंदवावी वाटतात.

भारत जन आंदोलन आणि अखिल भारतीय आदिवासी महासभा या दोन संघटनांनी गडचिरोली शहरात २२-२३ मार्च २०१५ रोजी 'जनसंघर्षांच्या राष्ट्रीय परिषदे'चं आयोजन केलं होतं. या परिषदेच्या बातम्या मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये साहजिकपणेच आल्या नाहीत. काही वर्तमानपत्रांच्या स्थानिक पुरवण्यांमध्ये उद्घाटनाच्या सत्राची बातमी-फोटो आला होता. या परिषदेच्या समारोपाच्या दिवशी सुमारे पाच हजार ते आठ हजार आदिवासींचा मोर्चा निघाला. 'लोकसभा ना विधानसभा, सबसी उंचा ग्रामसभा', 'मावा माटे, माटे सरकार, मावा नाटे, मावा राज' अशा घोषणा देत निघालेल्या या मोर्चा आदिवासी मंडळी ढोल, नगारे वाजवत सामील झाली होती, कोणी सायकलवर होते, कोणी स्पीकरवर घोषणा देत होते, इत्यादी. एका 'राष्ट्रीय' परिषदेनंतरचा हजारो आदिवासी मंडळींचा एक मोर्चा त्यात कॅमेऱ्याला आवश्यक दृश्यबाजी असूनही मराठी वृत्तवाहिन्यांसाठी बातमीचा विषय झाला नाही. वर्तमानपत्रांना तो राज्यस्तरीय बातमीचाही विषय वाटला नाही. [पाहा: आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस । एक प्रसिद्धी-पत्रक]. या परिषदेच्या आयोजकांमध्ये भारत जन आंदोलनचा प्रतिनिधी म्हणून महेश राऊत यांचाही सहभाग होता. या संघटनेच्या थोड्या कामाविषयी, संघटनेचे संस्थापक बी. डी. शर्मा यांच्याविषयी थोडं जाणून घेण्यासाठी 'भारतीय प्रजासत्ताकाची बस व 'पेसा'' ही नोंद पाहावी. राऊत यांचा या घडामोडींमध्ये बराच सहभाग राहिलेला आहे. नोंदीत आधी म्हटल्याप्रमाणे, या कामावरून एल्गार परिषदेसंदर्भातल्या त्यांच्यावरच्या आरोपांचं निराकरण होणार नाही, हे खरंच. पण सरकारी विकासाच्या धोरणांना विरोध करणारं हे काम होतं, लोकशाही चौकटीतलं काम होतं, त्यात माओवादी नसलेले आदिवासीसुद्धा सहभागी होते, हे नाकारता येणार नाही.  पण या कामाची दखल घेतली जात नाही, त्याऐवजी संबंधित व्यक्तीवर कथितरित्या माओवादी असल्याचा शिक्का मारला जातो. समजा यात थोडंफार तथ्य असेल, तरीही त्या व्यक्तीला पूर्णपणे एका रंगात रंगवण्याचं समर्थन त्यातून कसं करता येईल? किंवा अशा व्यक्तीने हिंसक कृत्य केलंय, किंवा त्याला चिथावणी दिलेय असं सिद्ध होणारा कोणताही पुरावा सकृत्दर्शनी दिसत नसेल, तर त्याला विनाजामीन किती काळ तुरुंगात ठेवावं? पोलिसांनी असा पुरावा दिल्याचं आपल्यापर्यंत आलेलं नाही, या प्रकरणात प्राथमिक पुरावा म्हणून वापरलेली पत्रं ज्या कम्प्युटरमधून पोलिसांनी मिळवली, त्या हार्डडिस्कला मालवेअरची लागण झाली होती, अशी वार्तांकनही वाचायला मिळतात.

पण तरीही माध्यमं आपल्यापर्यंत काही माहिती थोड्या भडक पद्धतीने आणतात. उदाहरणार्थ,  'शहरी माओवाद्यांचे' संशयास्पद साहित्य, चालूगिरी आणि आनंद तेलतुंबडे' या मथळ्याखाली लोकसत्तामध्ये ३१ ऑगस्ट २०१९ रोजी प्रकाशित झालेला इंडियन एक्सप्रेसच्या बातमीदाराचा ब्लॉग-लेख पाहावा. माओवादी पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य राहिलेले श्रीधरन श्रीनिवासन यांचं ऑगस्ट २०१५ रोजी निधन झालं. त्यापूर्वी २००७ साली त्यांना अटक झालेली होती, नंतर सुटकाही झाली. तर, त्यांच्या निधनानंतर माओवादी पक्षाने एक पुस्तिका प्रकाशित केली. त्यानंतर, २०१६ साली मुंबईत त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी एक कार्यक्रमही झाला, त्या वेळी S Sridhar – Portrait of the revolutionary as a warrior intellectual अशा नावाचं एक पुस्तक प्रकाशित झाल्याचा उल्लेख त्या ब्लॉग-लेखात आहे. रेघेने माओवादी पक्षाची पुस्तिका पाहिली होती, पण हे नंतर प्रकाशित झालेलं पुस्तक आपल्या वाचनात आलेलं नाही. तर, या पुस्तकात आनंद तेलतुंबड्यांचाही लेख असल्याचं लोकसत्तेवरच्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. त्यानंतर लेखक म्हणतात: "इतकेच नव्हे तर विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांचाही लेख या पुस्तकात आहे. त्यात तेलतुंबडे म्हणतात,“….Every era has its Bhagatsinghs and Sridhar like Maoists are indeed Bhagatsinghs of our times. They cannot die; they will keep coming unless the humans are liberated in real terms. Sridhar also will live on…in the hearts of millions fighting his battle…..My red salute to this dear friend.” म्हणजे श्रीधर सारखे माओवादी आपल्या काळातील भगतसिंग असून ते कधीच मरणार नाहीत… तर मनुष्य खऱ्या अर्थाने मुक्त होईपर्यंत ते पुन्हा पुन्हा येत राहतील अशा आशयाची मांडणी तेलतुंबडेंनी केली आहे. प्रतिबंधित माओवादी चळवळ देशासमोरील मोठी समस्या आहे असे मानले तर या चळवळीच्या नेत्याची तुलना देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रातींकारी भगतसिंग यांच्याशी करणे संशयास्पद नाही का?"

तेलतुंबडे यांनी खरंच त्या पुस्तकात लेख लिहिला होता का, याची कल्पना नाही. पण लिहिला असणं शक्य आहे. पण यात संशयास्पद काय आहे? त्यांचं म्हणणं पटलेलंं नाही, असं म्हणता येईल; त्यावर टीकाही करता येईल. पण सध्याचं एल्गार परिषदेशी संबंधित प्रकरण आणि अशा लेखांचा थेट काही सांधा जोडता येत नाही. तेलतुंबडे श्रीधरन यांना ओळखतही असतील, तरीसुद्धा किंवा खुद्द तेलतुंबड्यांना माओवादाबद्दल काहीही वाटत असेल, तरीही त्यावरून त्यांना आरोपी किंवा गुन्हेगार ठरवणं अवघड वाटतं. तेलतुंबडे यांनी या संदर्भातली मतं कधी लपवलेली नाहीत, पण लेखनाच्या पातळीवर त्यांनी सरसकटपणे माओवादी पक्षाचं समर्थन केल्याचं आपल्या वाचनात आलेलं नाही. माओवादी पक्षाच्या केंद्रीय समितीच्या सदस्या अनुराधा गांधी यांच्या निवडक लेखनाचा खंड तेलतुंबडे व शोमा सेन (यांना भीमा-कोरेगाव प्रकरणी २०१८ साली अटक करण्यात आली) यांनी एकत्रित संपादित केला होता, तो विक्रीसाठीही उपलब्ध आहे. त्याबद्दल क्वचित काही मुख्यप्रवाही माध्यमांमध्येसुद्धा लिहून आलेलं आहे. तर, असं असतानाही त्यांचं असं एखादं मत नवीनच असल्याप्रमाणे समोर मांडून जनमानसात एक विचित्र प्रतिमा मात्र निर्माण करता येते, संबंधित व्यक्तीची एकच बाजू पुढे आणता येते,  वातावरण संदिग्ध करता येतं.

वर उल्लेख आलेले श्रीधरन माओवादी पक्षाचे सदस्य होते, हे खुद्द त्या पक्षाने आणि श्रीधरन यांना ओळखणाऱ्या लोकांनीही म्हटलेलं आहे. (पाहा: Sridhar Srinivasan: A life dedicated to the working class struggle, Rediff, २९ सप्टेबर २०१५). लोकसत्तेवरच्या ब्लॉग-लेखात ज्याचा उल्लेख 'चालूगिरी' असा केलाय, तो हा विरोधाभास माओवादी राजकारणामध्ये निर्माण होतोच. अनेकदा एखादी व्यक्ती आपल्याशी संबंधित नाही असं सांगावं लागतं, आपला माओवादी पक्षाशी संबंध नाही असं सांगावं लागतं, संसदीय लोकशाहीवर विश्वास नसला तरी या लोकशाहीतले मार्ग आपल्या सोयीसाठी वापरावे लागतात, आणि सोयीनुसार या लोकशाही चौकटीवर साच्यातले शेरेही मारता येतात. त्यात मग हिंसेचा मुद्दाही अनेकदा असाच विरोधाभासाने हाताळावा लागतो. श्रीधरन यांनी त्यांच्या वकिलांना २०१० साली लिहिलेलं एक पत्र या संदर्भात इच्छुकांना वाचता येईल.

हा विरोधाभास या संदर्भातल्या काही विपरित परिस्थितींना कारणीभूत ठरतो, हे खरंच आहे. तुलनेने विविध पातळ्यांवरचं संरक्षण लाभलेले लोक यातून कसेबसे सुटतात तरी, पण ज्यांना हे संरक्षण लाभत नाही, त्यांचं जगणं जास्त खडतर होतं. तुरुंगवासातून सुटल्यावर तुलनेने वरच्या वर्गातल्या, शहरी व्यक्तींना पुन्हा मुख्यप्रवाही जीवनात जम बसवता येतो, पण आदिवासी भागातल्या, सुशिक्षित नसलेल्या व्यक्तींची परिस्थिती अवघड होऊन जाते. शिवाय, या विरोधाभासाचा वापर करून अनेकदा इतरही मंचांना किंवा व्यक्तींना त्रास दिला जातो. हे पूर्वीपासून सुरू राहिलेलं आहे, आणि प्रत्येक वेळी त्यात खरं-खोटं ठरवणं अवघडही होऊ शकतं. तर, अशा आरोपांचा तपास करावा, पण विनाजामीन तुरुंगवास, 'बेकायदेशीर कृत्यं (प्रतिबंध) अधिनियमा'सारख्या कायद्यांचा वापर करू नये, असं तरी म्हणता येतं. अन्यथा, दलित पँथर, खैरलांजीनंतरची निदर्शनं, अशा विविध वेळी झालं तसं, दलितांशी निगडित कोणत्याही गैरसोयीच्या घडामोडींवर नक्षलवादाचा शिक्का मारणं सोपं जातं.

थोडं अधिक स्पष्ट करण्यासाठी वर उल्लेख आलेल्या ब्लॉग-लेखातला थोडा भाग पाहू. त्यात सुरुवातीलाच म्हटलंय: "एल्गार परिषद गुन्ह्यात प्रतिबंधित माओवादी संघटनेचे सक्रिय सदस्य असल्याच्या आरोपाखाली पुणे शहर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी वर्नन गोंसालवेस, अरुण फरेरा व सुधा भारद्वाज यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. सुनावणी दरम्यान न्यायाधीश सारंग कोतवाल यांनी गोंसालवेसकडून पोलिसांनी जप्त केलेल्या “War And Peace in Junglemahal:People, State and Maoists (लेखक – बिस्वजीत रॉय)” व अन्य साहित्याचा उल्लेख केला. मात्र त्याचा वेगळाच अर्थ काढून न्यायाधीशांनी गोंसालवेसला लिओ टॉल्स्टॉयचे “War And Peace” पुस्तक घरात का बाळगले? असे विचारल्याच्या चुकीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. या बातम्यांचा आधार घेऊन काही लोकांनी न्यायाधीशांविषयी व एल्गार परिषद प्रकरणाबाबत गैरसमज निर्माण होतील असा प्रचार सोशल मीडियावर सुरु केला."

सेतू प्रकाशनी, २०१२
हे कदाचित काहींना आठवत असेल. न्यायाधिशांनी 'वॉर अँड पीस'चा उल्लेख कसा केला, याबद्दल अनेक उपहासात्मक टिप्पण्या त्या वेळी प्रसिद्ध झाल्या होत्या. पुरोगामी वर्तुळांमधून, समाजमाध्यमांमधून त्याबद्दल काही तातडीचं लेखनही झालं. त्यानंतर मग लगेचच न्यायाधिशांनी दुसऱ्या पुस्तकाचा उल्लेख केल्याचं समोर आलं. मग पुरोगामी मंडळींचा उपहास करण्यासाठी सरकारसमर्थक मंडळींनी नेहमीचा मार्ग अनुसरला. सरकारविरोधकांनी पुरेशी माहिती न घेताच टॉलस्टॉयच्या पुस्तकाचा संदर्भ फुगवला, अशी टीकाही झाली. पुरेशी माहिती घेऊन टीका करायला हवी होती, हे खरंच. पण न्यायाधिशांनी 'वॉर अँड पीस इन जंगलमहल' या पुस्तकाचा उल्लेख केला असेल, तरीही ते निराळ्या अर्थी हास्यास्पदच ठरतं. त्या पुस्तकात तरी आक्षेपार्ह काय आहे, त्यावर बंदी आहे का, त्यात माओवाद्यांचं समर्थन आहे का, या प्रश्नांवर बोलणं व्हायला हवं. सरकारसमर्थकांना ती गरज न वाटणं स्वाभाविक आहे, पण न्यायालयाचं हे म्हणणं न पटलेल्यांनी तरी त्याबद्दल बोलणं गरजेचं होतं. पण अपवाद वगळता तसं झाल्याचं दिसलं नाही. त्यामुळे थोडासा विनोद झाला, सोशल मीडियावर थोडी मजा झाली, पण न्यायालयात झालेला पुस्तकाचा उल्लेख कोणत्याही अर्थी अपुराच होता, हे अधोरेखित केलं गेलं नाही. वास्तविक हे पुस्तक माओवादी पक्षाच्या ध्येयधोरणांचा प्रसार करणारं नाही. कोलकात्यातील पत्रकार बिस्वजीत रॉय हे या पुस्तकाचे संपादक आहेत (लेखक नव्हेत). ते डावे असतीलही, पण माओवादीसमर्थक असल्याचं त्यांच्या लिखाणावरून वाटत नाही (उदाहरणार्थ: फ्रंटीअर साप्ताहिकातला हा दीर्घ लेख पाहावा. गौतम नवलाखा यांच्या पुस्तकासंदर्भात हा लेख आहे, त्यात राज्यसंस्थेच्या आणि माओवाद्यांच्या हिंसेचा मुद्दाही तुलनेने चिकित्सकपणे आलेला आहे. नवलाखासुद्धा भीमा-कोरेगाव प्रकरणातील एक आरोपी असून आज त्यांनाही राष्ट्रीय तपास संस्थेसमोर शरण जायचं आहे). डाव्या आघाडीचं सरकार पश्चिम बंगालमध्ये असताना सिंगूरमधल्या प्रस्तावित टाटा नॅनो प्रकल्पाला विरोध होत होता, मग नंदिग्राममध्ये विशेष आर्थिक क्षेत्रावरून (सेझ: स्पेशल इकनॉमिक झोन) गदारोळ सुरू झाला, या सुमारे बाराएक वर्षांपूर्वीच्या गोष्टी काहींना आठवत असतील. त्याच दरम्यान जंगलमहल या पट्ट्यात माओवादी आणि राज्य सरकार यांच्यातला संघर्ष उफाळून आला होता. त्यात डाव्या आघाडी सरकारच्या तेव्हाच्या विरोधक ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस पक्षही सहभागी झालेला. त्या हिंसाचाराच्या बातम्या त्या वेळी अनेकदा येत असत. दरम्यान, २०११च्या मध्यात ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला राज्यात अभूतपूर्व विजय मिळाला, त्या मुख्यमंत्री झाल्या. या घडामोडींच्या अखेरच्या काळात, २०११च्या अखेरीला, माओवादी नेते किशनजी यांची हत्या झाल्याची बातमी तेव्हा मोठी झाली. त्या घडामोडींचे विविध पैलू तपासण्याचा प्रयत्न या पुस्तकातल्या ४२ लेखांमधून आणि दीर्घ परिशिष्टांमधून केलेला आहे. त्यात वारावरा राव यांच्यासारखे उघडपणे माओवादी पक्षाचं समर्थन करणारे लेखक आहेत (भीमा-कोरेगाव प्रकरणात राव यांना अटक झालेली आहे) आणि (दिवंगत) के. बालागोपाल यांच्यासारखे सरकारी व माओवादी अशा दोन्ही बाजूच्या हिंसाचारांबद्दल चिकित्सक भूमिका घेतलेले लोकही आहेत. काही विद्यापीठीय अभ्यासकही आहेत, पत्रकारही आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, नियोजन आयोगाचा अहवाल, जगात अशा प्रकारच्या घडामोडींवेळी झालेले शांततेचे प्रयत्न, याबद्दलची नोंद परिशिष्टात घेतलेली आहे.  याला माओवादी प्रचारसाहित्यात मोजणं हास्यास्पद ठरेल.

दोन टोकं आणि मधला विस्तार

तर, या 'वॉर अँड पीस इन जंगलमहल' पुस्तकासारखाच प्रकार असतो. एखाद्या रंगाची झालर असलेले, पण विविध विचारसरण्यांचे लोक एका ठिकाणी आहेत, म्हणून त्या सगळ्यांवर एकाच टोकाचा शिक्का मारणं योग्य नाही, असं वाटतं. माओवादी राजकारणातले विरोधाभास काहीही असले, तरी ते त्यांच्या ध्येयधोरणानुसार आहेत. त्याला सामोरं जाणाऱ्या लोकशाही राजकारणानेही तसेच विरोधाभास जोपासले, तर ते गैरच ठरेल. माओवादी चौकटीमध्ये निराळा विचार मांडायची मुभा नसेल, तरी कोणाला माओवादी विचाराचं बोलायचं असेल, तर त्याला लोकशाही चौकटीमध्ये बोलू द्यावं लागतं. मग एखाद्या माओवादी नेत्याला कोणी भगत सिंग म्हटलं, तरी त्यात काही संशयास्पद वाटत नाही, किंवा त्यावरून काही गुन्हाही सूचित होत नाही. हे असं मानणं माओवाद्यांचं सौम्य समर्थन करणारं किंवा भाबडं असतं, असाही मतप्रवाह सध्याच्या वातावरणात अधिक तीव्र झालेला आहे, हे खरंच. म्हणूनच या नोंदीच्या सुरुवातीला काही अवतरणं दिली. हे धृवीकरण अर्थातच दुर्दैवी आहे. त्याबद्दल आपण 'एवढं एकसुरी एकरेषीय' अशी नोंद दोन महिन्यांपूर्वी केली होती.

काम्यूने जर्मन मित्राला लिहिलेल्या तिसऱ्या पत्राच्या सुरुवातीला म्हटलंय: "आत्तापर्यंत मी तुझ्याशी माझ्या देशाबद्दल बोलतोय आणि माझा सूर बदललाय, असं तुला सुरुवातीला वाटलं असेलच. वास्तविक, तसं नाहीये. आपण एकसारख्या शब्दांचा समान अर्थ लावत नाहीयोत, एवढंच; आपण आता समान भाषा बोलत नाहीयोत."

तर या धृवीकरणात समान भाषा गायब होते, असं वाटतं. भारतासारख्या प्रचंड वैविध्य असलेल्या देशात कोणतंच टोक वास्तव समजून घ्यायला उपयोगी पडत नाही, पण या दोन टोकांच्या मधला विस्तार समजून घेण्यासाठी काहीतरी समान भाषा तरी लागेल, ती धृवीकरणात सापडत नाही. सत्ताधारी त्यांच्या एकसुरी भाषेत बोलतात, त्यांचा धार्मिक राष्ट्रवाद कुठेही लादतात, भावनेला हात घालतात, सगळं देशभक्तीशी जोडतात, एकाच नेत्याच्या व्यक्तिमत्वाला देशाशी जोडतात, हे आपण पाहतोच.

'बेकायदेशीर कृत्यं (प्रतिबंध) अधिनियमा'मध्ये 'बेकायदेशीर कृती'ची व्याख्या दिलेली आहे [पाहा: https://mha.gov.in/sites/default/files/UAPA-1967_0.pdf, पान १३]. देशाच्या सार्वभौमत्वाला धक्का लावणं, प्रादेशिक फूट पाडण्याचा प्रयत्न करणं, असे प्रयत्न करणाऱ्या संघटनांशी संबंध असणं, इत्यादी मुद्दे या व्याख्येच्या पहिल्या दोन मुद्द्यांमध्ये आधी आलेले आहेत, पण त्यानंतरचा तिसरा मुद्दा असा आहे: [एखाद्या व्यक्तीने वा संघटनेने, कृती करून किंवा तोंडी अथवा लेखी शब्दाद्वारे, किंवा चिन्हांद्वारे किंवा दृश्य सादरीकरणाद्वारे] भारताविरोधात अप्रीती निर्माण केली किंवा अप्रीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला, [तर ती बेकायदेशीर कृती ठरेल].

भारत म्हणजे काय, याची विद्यमान सरकारची व्याख्या संकुचित आहे, हेही आपण जाणतो. आणि पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीविरोधातली अप्रीती म्हणजे भारताविरोधातली अप्रीती, इथपर्यंत ही व्याख्या ताणली गेल्याचंही आपल्याला जाणवतं ['इंदिरा इज इंडिया'सारखाच हा प्रकार, पण त्याला धार्मिक राष्ट्रवादाची आणि संघ परिवाराची जोड असल्यामुळे अधिक विस्तृत पसारा लाभलेला]. अशा वातावरणात हा कायदा किती निष्ठूरपणे वापरला जाऊ शकतो, याची कल्पना आपल्याला यावी. आणि एल्गार परिषदेचं प्रकरण पंतप्रधानांच्या हत्येच्या कथित कटापर्यंत कसं ताणलं गेलं, तरीही त्याबाबत स्पष्टपणे पोलीस नंतर कधीच का बोलले नाहीत, हेही थोडंसं कळावं. तरीही, तपास करणं हा प्रक्रियेचा भाग मानता येतो. या तपासाबद्दल शंका उपस्थित करणं हा बाहेरच्या अवकाशात माध्यमांचा, नागरिकांचा, विविध संस्थांचा अधिकार मानता येतो. भीमा-कोरेगाव हिंसाचारासंबंधी सुरुवातीला कट्टर हिंदुत्ववादी संघटनांचा संदर्भ ठळक होता, तो नंतर कोणत्या आधारावर विरळ होत गेला. एल्गार परिषदेच्या आयोजनात समजा नक्षलवाद्यांचा हात असेल (यासंबंधी आपण नोंदीत आधी बोललो आहोतच), तरीही दुसऱ्या दिवशी भीमा-कोरेगावला झालेल्या दंगलीसाठीची स्थानिक साधनसामग्री त्यांच्याकडे होती का, की निव्वळ चिथावणीखोर भाषणांपुरतंच हे मर्यादित आहे, या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं आपल्यापर्यंत आलेली नाहीत. नक्षलवाद्यांच्या/माओवाद्यांच्या मर्यादा किंवा त्यांच्यावर टीका करणं, हा एक भाग झाला. पण इथे भीमा-कोरेगावमधल्या हिंसाचारासंबंधी त्यांचा सहभाग कुठे कसा होता, किंवा अटक झालेल्या व्यक्तींचा त्या हिंसाचाराशी संबंध होता का, याबद्दल समाधानकारक उत्तरं सार्वजनिक स्तरावर उपलब्ध झालेली नाहीत. अशा शंका उपस्थित करणं म्हणजे देशविघातक कृत्यं आहे, किंवा 'शहरी नक्षलवादा'चा तो भाग आहे, असं मानणं गैर वाटतं. काम्यूने जर्मन मित्राला लिहिलेल्या पत्रात म्हटलंय तसा तो प्रकार होऊन जातो.  तर, अशा परिस्थितीत एल्गार परिषदेच्या बाबतीत 'बेकायदेशीर कृत्यं (प्रतिबंध) अधिनियमा'चा असा वापर गैर आहे. त्यात हिंसेतल्या थेट सहभागाचे पुरावे दिसत नसताना विनाजामीन अटक करणंही गैर आहे. बाकी, आयोजक कोण, कोण काय बोललं, यावर टीका करावी, किंवा काय असेल ते आरोप-प्रत्यारोप करावेत. पण त्या परिषदेचा आणि दुसऱ्या दिवशीच्या हिंसाचाराचा संबंध संशयास्पद पुराव्यांच्या आधारे जोडणं अपुरं आहे.

यावरही आक्षेप येतच राहू शकतात. या नोंदीतही नक्षलवादी साहित्याचा उल्लेख आहे, तर त्यांच्या अभिव्यक्तीची बूज का राखायची, किंवा त्यांच्याच अभिव्यक्तीची दखल का घ्यायची, इत्यादी. पण हेच, उदाहरणार्थ, 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकालाही लागू आहे. त्या नाटकाच्या संहितेवर/प्रयोगावर बंदी नसावी, असंच म्हणावं लागतं. [य. दि. फडके यांनी लिहिलेल्या 'नथुरामायण' (अक्षर प्रकाशन) या पुस्तकात सदर नाटकाच्या संहितेची बरीच चिरफाड केलेय, तरीही बंदी घालण्याच्या बाजूने मत दिलेलं नाही- हे असंच नोंदवूया]. या व्यतिरिक्तही विविध धार्मिक, जातीय संघटनांच्या साहित्यात बऱ्याच प्रमाणात विविध समाजघटकांविषयी 'अप्रीती' निर्माण करणारा मजकूर असतो, हे आपल्यापैकी पुस्तकं चाळणाऱ्या लोकांना माहीत असेलच. ती आपण सहन करतच असतो वेळोवेळी, किंवा आपणही त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देतो. हे बहुधा नेहमीचं असावं. भारतासारख्या देशात अशी अनेक टोकं असतील, त्यांच्यातलं अंतर काही प्रमाणात अनेक छटांना, लवचिकतेला वाव देत असेल बहुधा. त्याऐवजी एकाच टोकाकडे जाण्याचा प्रयत्न धोकादायक वाटतो.

११ मार्च २०२०

भाईसाब, बेहेनजी आणि लक्स कोझी

'पंजाबी ड्रेस'मधली एक तरुणी दुकानात जाताना मागून दिसते. पुरुषांच्या आतल्या कपड्यांचं दुकान. घाईगडबडीत आत जाताजातच ती म्हणते, 'भाईसाब, एक अण्डरवेअर और बनियान देना.' दुकानदार विचारतो, 'कौनसा दूँ, बेहेनजी.' इतक्यात दुकानदाराच्या बाजूला हिंदी चित्रपटांमधला नायक वरुण धवन अवतरतो नि म्हणतो, 'वहीं जिसके साथ मिलता है एक डबल बॉक्स सेट बिल्कुल फ्री.' मग ती तरुणी आनंदाने म्हणते, 'लक्स कोझी!' त्यानंतर दुकानाच्या पार्श्वभूमीवर वरुण पुन्हा पुढे दिसतो आणि या योजनेचा तपशील सांगतो. साधारण पंधरा सेकंदांची जाहिरात.


त्या तरुणीचं सामाजिक स्थान पुरेसं स्पष्ट होत नाही. रूढ अर्थाने लग्न झाल्याची खूण तिच्या अंगावर नाही. धर्माचीही खूण अशी स्पष्ट नाही. कदाचित नोकरदार असेल किंवा नसेल. इतर कुठल्यातरी कामावरून गडबडीने इथे आल्यासारखी वाटते. आणि, सहजपणे नेहमीचीच वस्तू घेतोय, अशा रितीने वस्तूची मागणी दुकानदाराकडे करते. वरुणने योजनेची घोषणा करण्याआधी तरुणीचा चेहरा लगबगीत असलेला, काहीसा थकलेला वाटतो:



दुकानदाराचा चेहराही नेहमीच्या कामादरम्यान राहील असा. सहज. स्वाभाविक. नेहमी येतील तसेच ग्राहक, नेहमीचीच वस्तू, त्यात नवीन काही नाही, असा त्यामागचा रोजरोजपणा आपल्याला दिसतो.





मग वरुण येतो, तेव्हा दुकानदार आश्चर्याने दचकतो. योजनेची माहिती सांगितल्यावर दुकानदार स्मित करतो, आणि ती तरुणी खूप आनंदी होऊन उच्चारते: 'लक्स कोझी!' 

इथे त्या ग्राहक तरुणीने 'डबल बॉक्स सेट' असं उच्चारणं जास्त स्वाभाविक ठरलं असतं. अण्डरवेअर नि बनियन विकत घेणं तिच्यासाठी नवीन नाही, असं तिच्या नि दुकानदाराच्या देहबोलीतून कळतं. नवीन आहे ती योजना- मोफत मिळणारे दोन प्लास्टिकचे डबे. हे डबे स्वैपाकघरात उपयोगी पडतील असे, किंवा ऑफिसात किंवा कुठे खायचे पदार्थ न्यायला उपयोगी पडतील असे आहेत. तर तिच्या चेहऱ्यावरचा आश्चर्यासोबतचा आनंद त्या 'डबल बॉक्स सेट'मुळे आहे.

प्रचारतंत्र स्वतःच्या लाभासाठी कसं वापरावं, याची मांडणी केलेल्या एडवर्ड बर्नेसच्या 'प्रोपगॅण्डा' या १९२८ सालच्या पुस्तकाविषयी पूर्वी रेघेवर नोंद केली होती, त्यातलं बर्नेसचं एक वाक्य असं होतं: 'ग्राहक निर्माण करणं हीसुद्धा नवीन समस्या आहे. आता केवळ स्वतःचा व्यवसाय समजून पुरेसं नाही तर वैश्विक समाजाची रचना, व्यक्तिमत्त्व, पूर्वग्रह व क्षमता यांचा अंदाज असावा लागतो.'

त्यानुसार बरेचदा, आपल्या उत्पादनाचं/वस्तूचं मूळ काम काय आहे, यावर भर देण्याऐवजी दुसऱ्याच कुठल्या तरी मूल्याशी ते उत्पादन जोडून दाखवलं जातं, त्याला काहीतरी नैतिक डूब दिली जाते, प्रतिष्ठेची झालर दिली जाते, बळ किंवा ताकद यांच्याशी जोडलं जातं, इत्यादी. एक उदाहरण असं: एखाद्या साबणाने भांडी लवकर घासून होतात, त्यामुळे आता वेळ मोकळा मिळतोय, म्हणून संबंधित बाईने बऱ्याच वर्षांची दबलेली इच्छा पूर्ण करणं, आणि स्वतःची बेकरी सुरू करणं. भांडी कितीही लवकर घासून झाली तरी तो वेळ बेकरी चालवण्यासाठी पुरेसा नसतो, पण हे निमित्त करून स्वातंत्र्य या मूल्याशी साबणाची सांगड घातली जाते (पाहा: 'विम'ची जाहिरात.). अशी कित्येक उदाहरणं सापडतात. थोडक्यात, बर्नेसच्या सल्ल्यानुसार, समाजाची रचना, पूर्वग्रह, क्षमता (किंवा स्वतःच्या क्षमतांविषयीचे पूर्वग्रहच बहुधा) यांचा विचार जाहिरातीत झाल्याचं दिसतं.

पण काही वेळा असं मूल्य सापडत नसेल, तर दुसरी वस्तू मोफत देणं, हाही एक मार्ग असतो. लक्स कोझीच्या जाहिरातीत तेच आहे. हा मार्ग तसा सोपा आणि अधिक स्पष्ट आहे. फक्त या जाहिरातीत वस्तू वापरणारा ग्राहक पुरुष आहे, पण विकत घ्यायला बाई आलेली आहे, ही गोष्ट नेहमीच्या उत्पादनांपेक्षा काहीशी वेगळी दिसते.

बहुतांश जाहिराती वस्तू वापरणाऱ्या ग्राहकाला आकर्षित करू पाहतात, मोफत मिळणाऱ्या वस्तूही त्यानुसार ठरतात. लक्स कोझीसोबत (पुरुषांना वापरायचे) मोजे मोफत मिळतील, अशीही जाहिरात आधी दिसायची. किंवा साबणासोबत (सर्व कुटुंबाला उपयोगी) पेनं मिळतात/मिळायची. थोडक्यात, वस्तू ज्या ग्राहकाच्या वापरासाठी आहे, त्या ग्राहकाला आकर्षित करेल अशी वस्तू मोफत द्यायचा प्रकार जास्त प्रमाणात आढळतो. पण या नवीन योजनेत मात्र पुरुषांच्या अण्डरवेअर नि बनियनसोबत प्लास्टिकचे छोटे डबे मोफत मिळतायंत: खाद्यपदार्थ ठेवायला सोयीचे, स्वैपाकघरात वापरायला सोयीचे, किंवा मुलांना शाळेत घेऊन जायला सोयीचे, असे हे प्लास्टिकचे डबे आहेत. हे डबे पुरुषही वापरू शकतात हे खरं, पण त्यांची हाताळणी जास्त कोणाकडून होते, डबे कोण भरतं, किंवा स्वैपाकघरात जास्त कोण वावरतं, हे पाहिल्यावर जाहिरातीविषयी अधिक स्पष्टता येते. 

'जाहिरातींचा महिला दिन व एक जाहिरात'  या ८ मार्च २०१६ रोजीच्या नोंदीत आपण वॉल्टर बेंन्यामिनचा एक वेचा मराठीत नोंदवला होता, त्यातली दोन वाक्यं इथे परत: ''नितळ', 'निरागस' दृष्टी हे एक झूठ आहे, किंवा ती अकार्यक्षम भाबडी अभिव्यक्ती आहे असं म्हटलं तरी चालेल. सध्या सर्व गोष्टींच्या गाभ्यापर्यंत घेऊन जाणारी सर्वाधिक सच्ची व्यापारी दृष्टी म्हणजे जाहिरात. चिंतनाचा अवकाश ती नष्ट करून टाकते. चित्रपटाच्या पडद्यावर एखादी गाडी अवाढव्य आकार धारण करून आपल्या अंगावर येते, तसा हा प्रकार असतो.'

उत्पादनं आणि जाहिराती तयार करणारे लोक बर्नेसचा नव्वद वर्षांपूर्वीचा सल्ला अधिक सराईतपणे वापरतायंत आणि ग्राहकांची अवस्था बेंन्यामिन म्हणतायंत तशी होत जाते- जाहिरातीचा अवाढव्यपणा ग्राहकाच्या अंगावर येतो आणि मग बहुधा अंगात मुरून जातो. तरीही, बेंन्यामिनच्या म्हणण्यातला थोडासा भाग आपण आपल्या मुद्द्याला जोडून घेऊ. 'सर्व गोष्टींच्या गाभ्यापर्यंत घेऊन जाणारी सच्ची [...] दृष्टी म्हणजे जाहिरात'. तर या दृष्टीने पाहिलं, तर आपल्याला काय दिसतं, बहुधा खालचे मुद्दे दिसतात:

१) ही जाहिरात हिंदीत आहे, मुख्यत्वे भारतातल्या ग्राहकांसाठी आहे. त्यामुळे या 'समाजाची रचना, पूर्वग्रह' इत्यादींचा विचार त्यामागे असणं स्वाभाविक. तर, त्याचा अर्थ असा की, भारतामध्ये पुरुषांसाठी आतले कपडे आणायचं काम घरातल्या बायका सर्रास करतात. अगदी स्वाभाविक वाटावं इतकं हे काम नेहमीचं होऊन जातं.
२) लक्स कोझी हा ब्रॅण्ड काही अनन्यसाधारण नाही. म्हणजे आय-फोनवरचं सफरचंद दिसावं लागतं, किंवा आय-फोनची खास रिंगटोन इतरांपर्यंत जावी लागते, किंवा काही अण्डरवेअरींचा ब्रॅण्ड पॅन्टमधून बाहेर दिसावा लागतो, त्या वस्तूंना काही एक प्रतिष्ठा जोडण्याचं काम झालेलं आहे. तसं काही लक्स कोझीचं नाही. ते आपलं गरज म्हणून वापरणाऱ्यांपुरतं उत्पादन आहे. त्यामुळे दुकानात आलेली ग्राहक स्त्री, 'एक अण्डरवेअर और बनियान देना' एवढंच म्हणते. म्हणजे गरजेच्या वस्तूचा तपशील सांगते, पण ब्रॅण्डचं नाव काही स्वतःहून सांगत नाही. तर, इथे ब्रॅण्डचं महत्त्व वाढवण्यासाठी मोफत वस्तू देणं गरजेचं ठरतं. तीही मग मध्यमवर्गीयांना किंवा निम्न-मध्यमवर्गीयांना रोजच्या वापरात उपयोगी पडेल अशी. त्यातही वस्तू वापणाऱ्यांपेक्षा विकत घेणाऱ्यांना जास्त आकर्षित करेल अशी.
३) एखादी वस्तू वापणाऱ्यांपेक्षा ती वस्तू (त्या वापरणाऱ्यांच्या वतीने) विकत घेणारे लोक जास्त महत्त्वाचे मानणारी ही जाहिरात आहे. मुळातच धडधाकट माणसांच्या वापरातली एखादी वस्तू त्यांच्या वतीने सर्रास दुसरं कुणीतरी विकत घेतं, याचं हे लक्षणीय उदाहरण ठरावं. शिवाय, स्वतःला वापरायला न लागणारी वस्तू केवळ विकत घेण्याचं कौटुंबिक काम करणारे लोक (म्हणजे इथल्या संदर्भात स्त्रिया) हेच मुख्य ग्राहक असल्याप्रमाणे जाहिरात करणं, त्यासाठी मोफत द्यायची वस्तूही मुख्यत्वे त्या मध्यस्थ खरेदीदारांना आकर्षित करणारी ठेवणं, याचाही हा बराच विलक्षण म्हणता येईल असा दाखला आहे. अशी जाहिरात क्वचितच पाहायला मिळते.

११ जानेवारी २०२०

एवढं एकसुरी एकरेषीय!

माणूस, १० मार्च १९८३ [अंक]
‘माणूस’ साप्ताहिकाचा १० मार्च १९८४ या तारखेचा अंक मध्यंतरी वाचनात आला. (या साप्ताहिकाचे स्कॅन केलेल्या स्वरूपातले अंक आता इंटरनेटवर उपलब्ध आहेत). या अंकामधील पहिलं लेख वजा टिपण अनुराधा गांधी यांनी लिहिलेलं आहे. गडचिरोलीमधील कमलापूर या गावात आदिवासी किसान शेतमजूर संघटनेच्या पहिल्या अधिवेशनाला पोलिसांनी आडकाठी करून अनेकांची धरपकड केल्याचा वृत्तान्त या टिपणात नोंदवलेला आहे. ‘गडचिरोलीत भयानक दमन!’ असं या टिपणाचं खास नमुनेदार शीर्षक आहे. गांधी या सध्या बंदी असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) या संघटनेच्या सदस्य होत्या. त्यांनी १९७०च्या दशकामध्ये नक्षलवादी चळवळीसोबत कामाला सुरुवात केली आणि २००८ साली त्यांचं मलेरियाने निधन तेव्हा त्या माओवादी पक्षाच्या केंद्रीय समितीच्या सदस्य होत्या. [रेघेवरही साधारण सहा वर्षांपूर्वी गांधी यांचा एक लेख भाषांतरित करून नोंदवला होता. तो लेख आशयाच्या दृष्टीने विशेष नसला, तरी त्यांची एक बाजू नोंदवून ठेवण्यापुरतं ते झालं. शिवाय, कदाचित लहान पत्रांविषयीची आपली आस्थाही त्या नोंदीला कारणीभूत असेल. आपल्या आणि त्यांच्या आस्थेच्या आशयामध्ये फरक आहे, पण आस्थाविषय तरी सारखा दिसला. तर, त्यांचं एक 'ढोबळ निरीक्षण म्हणून त्याकडे पाहता येईल', असं त्या नोंदीच्या प्रस्तावनेत नोंदवलं होतं. : 'लोकसंस्कृतीच्या अभिव्यक्तीसाठी लहान पत्रं']

‘माणूस’ साप्ताहिकाचे संपादक श्री. ग. माजगावकर (१९२९-१९९७) हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे होते. हिंदू धर्मावर आधारित राष्ट्रवाद त्यांना पटत होता. पण तरीही त्यांना धुळे जिल्ह्यातील शहाद्यामध्ये आदिवासींना उठाव का करावा वाटतोय, हे समजून घ्यावं वाटलं. नक्षलवादी चळवळीचा आरंभिक दशकाअखेरचा प्रवास मांडणारा अनिल बर्वे यांचा ‘रोखलेल्या बंदुका, उठलेली जनता’ हा दीर्घ लेखही ‘माणूस’मध्ये आला होता. शेतकऱ्यांच्या चळवळीची आणि त्यातील तपशिलांची दखल घ्यावी, असंही ‘माणूस’कारांना तेव्हा वाटलं होतं. अशा आणखीही काही विचारप्रवाहांचं प्रतिबिंब ‘माणूस’च्या अंकात दिसतं. त्यातल्याही काही अंतर्विरोध आणि कमतरता अर्थातच नोंदवता येतील. पण विनोबांच्या भूदान चळवळीची प्रशंसा करणारा 'आद्य भूमिक्रांतिकारक' अशा शीर्षकाचा संपादकीय लेख 'माणूस'च्या ज्या अंकात येतो, त्याच अंकात 'रोखलेल्या बंदुका..' या लेखमालिकेची सुरुवात होते, आणि या लेखमालेत भूदानावर बरीच झोड उठवलेली आपल्याला वाचायला मिळते (२६ ऑगस्ट १९७०चा अंक). या उदाहरणांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. तर, असा आपल्यापेक्षा भिन्न विचारांविषयी किमान उदार दृष्टिकोन राखणारे ‘संघा’चे माजगावकर आणि आजची परिस्थिती पाहिल्यावर आपल्याला काय जाणवतं?

शेतकरी मोठा मोर्चा काढून राजधानी दिल्लीत जातात, शेतीप्रश्नाविषयी संसदेचं विशेष सत्र घ्यावं अशी मागणी करतात. पण त्यांची मागणी मान्य होत नाही किंवा पंतप्रधान वा सरकारी प्रतिनिधी या मोर्च्याची अधिकृत दखलही घेत नाहीत. पण हिंदी चित्रपटसृष्टीतल्या तारेतारकांना खास बोलावून भेट घेतात, त्याचे फोटो समाजमाध्यमांवरून फिरतात, बातम्या होतात, विद्यमान सरकारला सोईच्या विषयांवरचे चित्रपटही येतात. सरकारविरोधी सूर उमटवणाऱ्यांसाठी ‘शहरी नक्षलवादी’, 'देशद्रोही' किंवा तत्सम विशेषणं सर्रास वापरली जातात. खुद्द पंतप्रधानही विरोधी मत असलेल्यांवर आरोप करताना असे शब्दप्रयोग करतात. थोडक्यात, मतभिन्नता असलेल्यांशी संवाद पूर्ण थांबवायचा आणि धृवीकरण करून शक्यतो दोनच सोपे कप्पे पाडायचे.

या संदर्भात आपल्या आसपास वेगवेगळी मतं आपण ऐकतो. चाललंय ते बरोबरच आहे, असं बोलणारे असतात. किंवा, इतर वेळी उदार मतं व्यक्त करणारे काही लोक असं म्हणतात की, हे काही आजच सुरू झालेलं नाही, त्यामुळे एकदम चवताळल्यासारखं बोलायची गरज नाही. काही लोकांच्या मते, सध्याचे सत्ताधारी फॅसिस्ट आहेत, त्यामुळे त्यांच्या विरोधात बोलणं गरजेचं आहेच. साधारण हे तीन प्रवाह नोंदवले. त्यात काटेकोर विभागणी नाही. यात कमी-अधिक एकसुरीपणा आल्याचंही दिसतं. किंबहुना आपण वर 'उदार' असा शब्द वापरला, तर तो वापरणंही लगेच शिक्का मारायला सोईचं ठरू शकतं. पण वास्तव एवढं एकसुरी आणि एकरेषीय नसतं, हे आपल्याला खरं म्हणजे सहज कळू शकतं. उदाहरण म्हणून आपण रेघेवर पूर्वी सेन्सॉरशिपसंबंधी काही नोंद केली होती. य. द. लोकुरकर यांनी काँग्रेसच्या काळातल्या आणीबाणीसंदर्भात लिहिलेल्या पुस्तकाला धरून ती नोंद होती. त्याला धरूनच आजच्या भाजपच्या सरकारचीही दिशा सूचित होत होती. तर, ही काही सूत्रं सदासर्वकाळ समान राहिल्याचं दिसतं, हे नाकारता येणार नाही. आज 'नेहरूवादी' अशी उपाधी स्वतःला लावणाऱ्या लोकांना सरकारविरोधी असण्याचा, मतभिन्नतादर्शक गटात असल्याचा दिलासा सध्या मिळत असला, तरी नेहरूंच्या काळातही सेन्सॉरशिप होती, हे आपल्याला नाकारता येणार नाही. नेहरूंच्या विरोधी गाणं लिहिल्यामुळे डाव्या विचारसरणीच्या मजरूह सुलतानपुरी यांना १९४९ साली झालेला दीड-दोन वर्षांचा तुरुंगवास आपण विस्मृतीत ढकलायचा का? (तेव्हाचे संदर्भ वेगळे असले तरीही प्रत्येक जण या तथ्याचं आपापलं आकलन मांडणारच. शिवाय, नेहरूंचं एकंदर मूल्यमापन करणारा हा उल्लेख नाही. ढोबळ अर्थाने आधीचे सत्ताधारी, आत्ताचे सत्ताधारी, असं हे आहे). किंवा, नंतर काँग्रेसच्याच सत्ताकाळात सलमान रश्दींच्या 'सटॅनिक व्हर्सेस' कादंबरीवर बंदी आली, ही तशी नजीकच्या इतिहासातली घटना आहे. किंवा, शीखविरोधी दंगलींच्या बाबतीत प्रतिमा पूर्ण स्वच्छ न झालेले कमलनाथ मध्य प्रदेशात काँग्रेसचे आताचे मुख्यमंत्री झाल्याची घटनाही ताजीच आहे.

तर, विद्यमान सरकारच्या अशा स्वरूपाच्या कृतींबद्दल बोलताना सरकारसमर्थकांनी वरची तथ्यं समोर ठेवली तर काय करायचं? एक तर त्याकडे दुर्लक्ष करून आपली बाजूच पुढे मांडायची. किंवा, हा इतिहासाचा दाखला समजून घेऊन, कबूल करून, तरीही सध्याच्या परिस्थितीत कोणत्या गोष्टी अधिक गंभीर आक्षेपार्ह आहेत, ते मांडायचं. [म्हणजे काँग्रेसच्या माजी पंतप्रधानांनी शीखविरोधी दंगलींबाबत २००५ साली संसदेत माफी मागितली, तसं काही गुजरात दंगलींबाबत आताचे पंतप्रधान करतील का?] पण असं कोणी बोललं की त्या व्यक्तीवरही कोणतातरी शिक्का मारण्याची घाई होते का? बुद्धिजीवी वर्गात किंवा आपापल्या विद्रोही मानल्या जाणाऱ्या कंपूंमध्ये विशिष्ट प्रतिमा टिकवून ठेवण्याची काहीएक स्पर्धाही याला कारणीभूत असू शकते. त्यामुळे एखाद्या मुद्द्यावर आपण बोलायला जातो, तेव्हा आधी काहीच तपासणी न करता तत्काळ सध्याच्या बुद्धिजीवी वर्गात (म्हणजे आपल्या ओळखीतल्या बुद्धिजीवी मानल्या जाणाऱ्या मित्रमंडळींच्या गटात) सोयीची ठरणारी भूमिका नोंदवली की झालं, अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. हाताशी आपापलं माध्यम/साधन आहेच. मग आपण सगळे 'बंडखोर' किंवा 'विद्रोही' आणि त्याहून निराळं मत असलेले 'प्रस्थापित' किंवा 'सबगोलंकारी' अशी सोपी विभागणीही करता येते. हा एक भाग सध्या दिसतो.

याचबरोबर, आधीच्या सरकारांनी चुकीच्या गोष्टी केल्याच ना, मग आताच्या सरकारविरोधातच जास्त का ओरडताय? असा प्रश्न विचारणारेही आहेतच. पण हा प्रश्न अपुरा आहे. आपण नोंदीत वर काही इतिहासातले दाखले नोंदवले आहेत. ते सत्तेत आलेल्या व्यक्तींच्या त्रुटी दाखवणारे आहेत. म्हणजे सत्तेची अशी काही विकृत रचना असेल, त्याच्याशी जोडलेला अहंकार असेल, त्यातून त्या घटना किंवा घटनाक्रम उद्भवलेले असावेत. पण आताच्या, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वरचष्मा असलेल्या आणि भाजप बहुमत मिळवून सत्तेत असलेल्या काळामध्ये, या सत्तेच्या अहंकारात स्वतःच्या धार्मिक अस्मितेचा अहंकार मिसळून गेलेला दिसतो. त्यामुळे ही केवळ सत्तेत असलेल्या एखाद्या व्यक्तीची किंवा अनेक व्यक्तींची मुजोरी उरत नाही. त्यात सगळा धार्मिक अहंकार मानणारा विचारप्रवाहच दिमतीला आल्याचं दिसतं. त्यामुळे वास्तवात क्वचित एखादी सत्ताधारी व्यक्ती थोडं मवाळ बोलली, तरी वास्तवात तो प्रवाह अधिक उन्मादी पद्धतीने पुढेच जाताना दिसतो. हे आपण वेगवेगळ्या स्तरावर अनुभवतोय. हा प्रवाह आधीपासून एकसुरीच राहिलेला आहे. राष्ट्र, धर्म, इत्यादी विविध मुद्द्यांवर उक्ती काहीही ठेवली, तरी या प्रवाहातली कृती एकसुरीच राहिलेली आहे, हेही बहुतेकांना माहीत असावं. या गोष्टी नाकारता येतील का?

०

आज आधुनिक विकासाचं जे अवाढव्य आक्रमक रूप पाहतो, ते काही २०१४ साली सुरू झालेलं नाही. उदाहरणार्थ, स्वातंत्र्यानंतर काहीच वर्षांमध्ये ज्या भाक्रा नांगल प्रकल्पाची पायाभरणी झाली त्यातल्या अनेक विस्थापितांना अजूनही भरपाई मिळालेली नाही. अशा धरणांना 'उगवत्या भारताची तीर्थक्षेत्रं' संबोधलं गेलं होतं. हा प्रवाह आधीपेक्षा अधिक आक्रमक आणि क्रूर झाला हे खरं, पण मुळात तो धार्मिक अस्मितेच्या अलाहिदा सुरूच राहिलेला आहे. असे इतरही काही मुद्दे अर्थातच आहेत.  त्यामुळे त्या-त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांबाबत कोण कशा प्रकारची मतं व्यक्त करतं, याबाबत थोडी मोकळीक ठेवणं गरजेचं असावं. समाजमाध्यमांमध्ये अनेकदा केवळ 'माझं अमुकएक मत आहे (ते बहुधा बंडखोरीचंच असतं)' आणि 'तमुक मत असणारा प्रस्थापित आहे', अशी सोपी विभागणी आढळते. यात तथ्यं मांडून मग मत मांडण्याकडे कल नसतो. केवळ मतांचा कप्पा कोणता आहे, हे ठरवण्यावरच भर असतो. 'आपल्या मताचा आधार फक्त आपलं (प्रामाणिक किंवा अप्रामाणिक) मन', अशी काहीतरी ही रचना दिसते. पण आपल्या मनातच काही सेन्सॉर लागलेला असतो की काय, याची जागती जाणीव या रचनेत ठेवली जात नाही, असं वाटतं. शिवाय, आपली मतं पटलेल्यांच्या टाळ्या व वाहवा मिळवण्यासाठीच हे सगळं सुरू राहातं की काय, अशीही शंका येते. असा कप्पेबंद संवाद शेवटी धार्मिक अस्मितेवर आधारित राष्ट्रवाद पुढे रेटणाऱ्यांनाच सोयीचा ठरेल, असं वाटतं.

संसदीय लोकशाही, ही एक रचना आहे, ती (थोडीतरी) मान्य असेल तर इतकं एकसुरी असणं बरं वाटत नाही. ही रचनाच मान्य ऩसेल, तर त्याच्या पर्यायांबद्दल बोलावं लागेल. तसं बोलणारे बोलतातच. किंवा हे रचनेचं वगैरे असं नुसतं बोलून काही उपयोग नाही, सरळ ती संपवणं-बदलणं हाच एक मार्ग आहे, असंही काहींना वाटतं. नक्षलवादी किंवा आताचा माओवादी पक्ष हा त्यातच येतो. त्यांच्या कृतीसंबंधी वेगळं बोलता येईल. किंवा त्यांचे अंतर्विरोधही नमूद करता येतील. रेघेवर आपण यासंबंधी काही नोंदी केलेल्या आहेत. पण समजा कोणाला हा विचार पटत असेल, तर तोही नोंदवता आला पाहिजे. तो आपल्याला पटेल किंवा पटणार नाही. पण निव्वळ बोलण्याच्या पातळीवर कोणी कितीही उथळ किंवा उजळ काहीही बोललं, तरी ते बोलायला बंदी करणं बरोबर नाही. त्यावर आक्षेप/हरकती घ्याव्यात.

तर, इतपत मोकळीक वरती 'माणूस'च्या अंकात होती, ती एकाच अवकाशात दिसत होती. आता अशा संवादी अवकाशाऐवजी कप्पे अधिक घट्ट होतायंत का?

'माणूस'कारांशी विचारसाधर्म्य असलेले, पण त्यांच्या नियतकालिकात दिसणारी किमान सहनशीलताही नसलेले लोक सत्तेत आल्यावर धृवीकरण होणं ओघानंच आलं. पण या धृवीकरणाला आपणही हातभार लावायचा की तथ्यं समजून घेऊन आपलं मत मांडायचं, हे ठरवणं बहुधा गरजेचं असावं. त्यासाठी संवादाचा अवकाश हवा. या पार्श्वभूमीवर संवादाची माध्यमं हाताशी आल्यावर आपण संवाद वाढवतो की गोंगाट वाढवतो, हेही तपासता येईल.

०

आधुनिक विकासाचा फटका आदिवासी आणि इतर मुळातल्याच असुरक्षित घटकांना सर्वाधिक बसतो, हे आपण जाणतोच. रेघेवरही त्यासंबंधी थोड्याशा नोंदी करायचा प्रयत्न केला आहे. सध्या 'नागरिकांच्या राष्ट्रीय नोंदपटा'विषयी गदारोळ सुरू आहे, त्यातही अशा आदिवासी आणि भटक्या-विमुक्त गटांना गंभीर अडचणींना सामोरं जावं लागेल. यातले काही गट हिंदूही आहेत, म्हणजे हिंदूंनाही याचा फटका बसणार. शिवाय, 'नागरिकत्व (दुरुस्ती) अधिनियमा'विषयीही बरंच बोललं जातं आहे. त्यातला मुस्लीमविरोधी गर्भित सूर आहेच, शिवाय ईशान्येतल्या लोकांच्या तक्रारीही आहेत. ईशान्येतल्या तक्रारी अस्मितावादी आहेत, म्हणून त्याकडे तुच्छतेने बघण्याची वृत्ती मराठीत आणि इंग्रजीत काही पुरोगामी मंडळींच्या लेखनात दिसली. हेही वर उल्लेख केलेल्या एकसुरीपणातूनच आलं असावं. मूळ अडचणी तथ्यांच्या आधारावर समजून घ्यायच्या नाहीत, आपल्या विशिष्ट विचारसरणीत एखादं तथ्य बसत नसेल, तर त्याकडे दुर्लक्ष करायचं किंवा शेरे मारायचे. मार्क्सवादी विचारातून ईशान्येतल्या अस्मितांचं आकलन झालं नाही, की सरळ 'अस्मितावादी' असण्यावर विशिष्ट शिक्का मारायचा आणि तो कप्पा बंद करायचा. असं घडत असल्याचं दिसतं. [या संदर्भात सन्जिब बरुआ यांचा फ्रन्टलाइनच्या अंकात आलेला 'पार्टिशन्स अनफिनिश्ड बिझनेस इन आसाम' हा सांगोपांग लेख इच्छुकांना वाचता येईल. मतभेद इत्यादी वेगळं ठरवता येईल. टीकाही करायला हरकत नाहीच]. स्थलांतराच्या एकंदर शोकांतिकेवर काही बोलणं सदर नोंद लिहिणाऱ्याला शक्य होत नाहीये. फक्त हा प्रश्न स्वतःच्या संकुचित राजकीय प्रकल्पासाठी वापरणं भयानक वाटतं. सध्याचं सरकार तेच करताना दिसतं. आधीपासून असलेल्या प्रशासकीय मार्गांद्वारे स्थलांतराचा मुद्दा हाताळणं शक्य असताना नवीन कायद्याची टूम काढणं, त्यात निवडक गोष्टी सोयीनुसार ठळक करणं, हे गैर असल्याचं आता विविध ठिकाणी नोंदवून आलेलं आहे.

तर, आता आपली नोंद म्हणजे गोंगाट होऊ नये म्हणून शेवटी चार मुद्दे नोंदवावेसे वाटतात:

१) तथ्यांवर भर देण्याऐवजी आपापल्या मतांवर आणि विचारसरणीवर भर दिला जातो आहे, असं वाटतं. (उदाहरणार्थ- सावरकरांनी माफी मागणारी पत्रं ब्रिटिशांना लिहिली, हे तथ्य आहे. पण या एकाच कृतीवरून सावरकरांचं आपापल्या दृष्टिकोनातून मूल्यमापन करत राहून एका मर्यादेनंतर काय साधेल? कोणी म्हणेल, हा गनिमी कावा आहे. कोणी म्हणेल, हा पळपुटेपणा आहे. एक पुरोगामी पत्रकार मध्यंतरी टीव्हीवर म्हणाले, 'मी त्यांच्या जागी असतो, तर माफी मागितली नसती'! अलीकडे काँग्रसचे नेते राहुल गांधी यांनीही असंच विधान केलं, 'माफी मागायला मी राहुल सावरकर नाही'. अशा बोलण्यातून काय साधणार! आता कोणी काळ्या पाण्याच्या शिक्षेवर पाठवणार नाही, आणि सावरकरांच्या कृतीवरही यातून वेगळा काही प्रकाश पडत नाही. मुळातच हा मुद्दा नवीन नाही. तरीही हा मुद्दा पुढे आणून शेवटी धार्मिक राष्ट्रवाद जोपासणाऱ्यांचाच फायदा होणार नाही का? त्यांना या निमित्ताने स्वतःचा समर्थकवर्ग बळकट करायची संधी मिळणार नाही का?सावरकरांच्या विचारात किंवा इतर राजकीय प्रकल्पात काय चूक वाटतं, ते सांगावं. किंवा त्यांची अमुकएक प्रतिमा जाणीवपूर्वक कशी गौरवली जाते, इत्यादी बोलावं. त्याला असतील ते आधार द्यावेत. नुसत्या एखाद्या  विशिष्ट संदर्भातल्या कृतीवर आविर्भावाने बोलून शेवटी एकमेकांशी आविर्भावाचीच स्पर्धा केल्यासारखं होतं, कारण मतं तर ठरलेलीच असतात. तथ्यात काही नवीन शोधण्यासारखं उरलेलंच नसतं. मग फक्त चर्चेच्या कार्यक्रमांना खाद्य मिळतं. त्यापेक्षा तथ्यातलं काही नवीन शोधणं किंवा आपल्याला न पटणाऱ्या विचारातल्या गफलती दाखवून देणं, याला प्राधान्य देता येणार नाही का?)

२) आपापल्या बुद्धिजीवी गटांमध्ये प्रतिमा टिकवण्यासाठी काही सोपी नि सोयीस्कर मांडणी केली जाते, असं वाटतं. त्यातून सोपे कप्पे पडतात. आणि मुळात सोप्या कप्प्यांवरच स्वतःची आक्रमक संकुचित विचारसरणी पुढे नेणाऱ्या लोकांना हे पूरकच ठरतं. (उदाहरणार्थ- मुस्लीम धर्माविषयी हिंदू राष्ट्रवादी लोक एकरंगी मांडणी करतात, तर त्यांना विरोध करताना हिंदू धर्माविषयी एकरंगी मांडणी करायची. आपल्याला भले काही धार्मिक कृती करावीशी वाटत नसेल, हे ठीकच आहे. पण विशिष्ट धर्मातले दोष दाखवताना नुसतीच पोकळी निर्माण केली तर शेवटी त्या धर्माची अस्मिता चेतवू पाहणाऱ्यांना लाभच होत असावा, असं वाटतं. याचा अर्थ आंबेडकरांनी किंवा इतर अनेकांनी हिंदू धर्मावर टीका केली, तीही नकोच होती का, तर तसं नव्हे. पण त्यांनी इस्लामवर टीका केली, तिच्यावर लगेच बचावात्मक पवित्रा घेण्याची गरज नाही, इतकंच. एकंदर धर्मांची चिकित्सा करताना इस्लाम किंवा ख्रिस्ती धर्मांवर टीका करणारी व्यक्ती अल्पसंख्याकविरोधी असतेच असं नाही; आणि 'सेक्युलर' नसलेली हिंदू व्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराची असते असं नाही. [या संदर्भात 'अ हिंदू क्रिटिक ऑफ हिंदुत्व' हा अभिजीत पाठक यांचा गांधींच्या लाइनचा लेख वाचता येईल. आधीच्या लेखासंदर्भात म्हटल्याप्रमाणे मतभेद-टीका यांना इथेही जागा आहे]. बरेचदा पुरोगामी म्हणवले जाणारे घटक भाजपच्या बहुसंख्याकवादी राजकारणाला विरोध करताना असे पवित्रे घेतात. त्यातूनही विपरितच परिणाम होतो, असं वाटतं. कोण कोणत्या संदर्भात जाणीवपूर्वक काय अधोरेखित करतं, यावर गोष्टी ठरतात, हे खरंच. पण आपलं 'सेक्युलर' असणं अधोरेखित करण्यासाठी पुन्हा वेगवेगळे आविर्भाव घेतले जातात. आणि कोणी हिंदू माणूस 'सेक्युलर' नसेल, तर बहुसंख्याकवादीच असेल असं मानायची गरज नसावी.)

३) या नोंदीत दिलेली सगळी उदाहरणं अलीकडच्या काळात कुठे ना कुठे वाचनात आलेली किंवा ऐकण्यात आलेलीच आहेत. नेहरूंच्या काळातील सेन्सॉरशिपचा उल्लेख हिंदू राष्ट्रवाद मानणाऱ्या व्यक्तीच्या लेखात आला होता. आंबेडकरांच्या इस्लामविषयीच्या चिकित्सक मतांचा उल्लेख वेळोवेळी होत आलेलाच आहे. इतरही उदाहरणं अशीच अलीकडची. आणि भाजप, संघ, पंतप्रधान यांच्याविषयीची उदाहरणं तर रोजच आपल्यासमोर येत आहेत. तर, हे सगळं समोरासमोर ठेवून तपासावं, एवढ्याच पत्रकारी हेतूने नोंद झाली. शिवाय, या नोंदीत आलेले बहुतांश उल्लेख जनरल येता-जाताना लोकांच्या बोलण्यातूनही सापडलेले आहेत. आपल्या भौगोलिक अवकाशातली बहुविधता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चौकटीत बसणारी नाही. पण ही चौकट मान्य नसणाऱ्यांनी तरी बहुविधतेची जाण ठेवणं गरजेचं असावं. सुरुवातीला उल्लेख आलेल्या 'माणूस'च्या अंकात कव्हरवर 'हे सर्व माझेच आहे, तरी हे माझे का नाही?' असा प्रश्न (वेगळ्या संदर्भात) नोंदवलेला आहे. आणि अंकात 'सत्तांतर' कादंबरीच्या लेखकाची मुलाखत आहे. 'हे सर्व माझेच आहे, तरी हे माझे का नाही?' आणि 'सत्तांतर' हे दोन्ही शब्दसंच आपल्याला सध्याच्या काळाशी सुसंगत वाटू शकतात. चाललंय ते रुचत नाही, म्हणून आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न उपस्थित होतो, आणि 'सत्तांतर' होणारच नाही अशा भ्रमात असलेले सत्ताधारी वरचढ ठरल्यावर काय होतं, हेही आपल्याला पाहायला मिळतंय.

४) संवादाचा अवकाश अमुक असा असला, तर बरं- अशी अपेक्षा या नोंदीत सुचवली गेलेय. वास्तविक प्रत्यक्षात व्यक्ती-व्यक्तींमधला, माणसा-माणसांमधला, माणसा-प्राण्यांमधला, माणसा-झाडांमधला संवाद किंवा माणसांचा सामाजिक पातळीवरचाही संवाद इतक्या आदर्श पातळीला होत नाही, असं दिसतं. माणसं-प्राणी-झाडं या पातळीवरच्या संवादाचा मुद्दा अशा नोंदीत हाताळणं शक्य होत नाहीये. पण मानवी सामाजिक पातळीवर किमान हे इतपत संवादाचं सांभाळायला हरकत नसावी- प्रयत्न तरी असावा. नाहीतर राज्ययंत्रणा, धर्म, माध्यमं हे घटक संस्था म्हणून (कमी-अधिक, बरं-वाईट) काम न करता नुसत्या एकसुरी एकरेषीय झुंडी ठरण्याची शक्यता वाटते.

०३ नोव्हेंबर २०१९

आजच्या जगण्याच्या दोन जाहिराती

काही महिन्यांपूर्वी वर्तमानपत्रांमधे पहिल्या पानावर दिसलेले हे दोन फोटो आहेत. एक फोटो उघडच जाहिरातीचा आहे, दुसऱ्या फोटोत दिसणारा फोटो हासुद्धा एक प्रकारे जाहिरातच करणारा आहे.


'उत्तर शोधलं की जगणं बदलतं' अशी 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाची टॅगलाइन आहे. यात प्रश्न चुकीचा असण्याची शक्यता आपोआप पुसली जाते. जे काही आहे त्याचं उत्तर शोधत जा. प्रश्न विचारू नका, प्रश्न तपासू नका. तीन वर्षांपूर्वी रेघेवर वॉल्टर बेंजामिन/बेन्यामिनचा एक उपरोधिक वेचा आपण मराठीत नोंदवला होता, तो असा:
टीकेचा (criticism) ऱ्हास झाल्याचा शोक करणं हे मूर्खांचं काम आहे. कारण आता ते दिवस गेले. टीका हा योग्य अंतर राखण्याशी संबंधित मुद्दा होता. दृष्टिकोन व पूर्वचिकित्सा यांना किंमत होती नि काहीएक भूमिका घेणं शक्य होतं त्या काळात हा मुद्दा लागू होता. आता गोष्टी मानवी समाजाच्या खूपच निकट येऊन राहिलेल्या आहेत. 'नितळ', 'निरागस' दृष्टी हे एक झूठ आहे, किंवा ती अकार्यक्षम भाबडी अभिव्यक्ती आहे असं म्हटलं तरी चालेल. सध्या सर्व गोष्टींच्या गाभ्यापर्यंत घेऊन जाणारी सर्वाधिक सच्ची व्यापारी दृष्टी म्हणजे जाहिरात. चिंतनाचा अवकाश ती नष्ट करून टाकते. चित्रपटाच्या पडद्यावर एखादी गाडी अवाढव्य आकार धारण करून आपल्या अंगावर येते, तसा हा प्रकार असतो. [...] जाहिरातीला टीकेपेक्षा वरचष्मा प्राप्त होण्याचं कारण काय? याचं उत्तर लाल रंगाच्या फिरत्या निऑनी चिन्हांमधे नसून डांबरी रस्त्यावर त्या चिन्हांना परावर्तित करणाऱ्या प्रकाशझोतात आहे.
तर, असं डोळे दिपलेल्या अवस्थेत वावरणं अपेक्षित आहे, मग खालच्या फोटोसारखं वाटतं. '[कोल्हापूर] शहर वेगाने विस्तारत आहे आणि विविध सुविधांनी सज्ज होत आहे'- याचं चिन्ह काय तर कमी शटर स्पीड ठेवला की कॅमेऱ्यात चित्रित होणाऱ्या दिव्यांच्या रेषा. गाड्या अधिकाधिक स्पीडने जाऊ पाहतात हे खरंच, पण त्यांच्या दिव्यांच्या या रेषा कमी शटर स्पीडमुळे दिसतात. याहून कमी शटर-स्पीड ठेवला तर आकाशातल्या चांदण्याही इतक्या वेगाने फिरतायंत असा भास होतो, हे आपल्याला काही छायाचित्रांवरून माहीत असेलच. 



तर हा रोज आजपासून सुरू होणारा कार्यक्रम आहे. वास्तविक वरच्या छायाचित्रात प्रकाशापेक्षा अंधाराने जास्त अवकाश व्यापलाय, आणि वेगाने हलणाऱ्या वस्तूंपेक्षा गप्प उभ्या वस्तू-जीवांची-झाडांची संख्या जास्त आहे, ते सगळंच कॅमेऱ्यात आलेलं नसलं, तरी आपल्याला तसं डोळ्यांना दिसतंच, अनुभवावरून ताडता येतंच. कोल्हापुरात काही वर्षांपूर्वी १८०हून अधिक मर्सिडिझ बेन्झ गाड्यांच्या खरेदीसाठी एकाच वेळी नोंदणी झाल्याची बातमी होती (डीएनए, १५ डिसेंबर २०१०). औरंगाबादमध्ये एकाच वेळी ११५ मर्सिडिझ बेन्झ विकत घेण्यासाठी नोंदणी झाल्यावर त्यांना मागे टाकण्यासाठी कोल्हापुरातल्या मंडळींनी हा असा पुढाकार घेतला होता. त्यामुळे हे दुसरं छायाचित्रही विशिष्ट मनोवृत्तीची जाहिरात करणारंच दिसतं.

०७ जानेवारी २०१९

साहित्याचा सनसनाटी सोहळा

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता होणार आहे. त्या निमित्तानं एक नोंद:

१.
मराठी साहित्याचं सामाजिकीकरण (लिहिल्यानंतरचं प्रकाशन, वितरण, वाचन, त्यावर काही सकारात्मक-नकारात्मक बोलणं) आधीही अरुंद अवकाशातच होत होतं. पण अनेक कारणांमुळे हा अवकाश अधिकाधिक आकुंचित झालेला आहे. त्याची कारणं काय, हा वेगळ्या चर्चेचा विषय आहे. पण नियतकालिकांचं बंंद होणं, ग्रंथालयांमधली पुस्तकखरेदीची व्यवस्था आणखी खालावणं, वर्तमानपत्रांमधून मराठी साहित्याचा लेखाजोखा घेणारी जागा झिजत जाणं, सध्या अधिक प्रभावशाली ठरलेल्या दूरचित्रवाणी माध्यमात साहित्य या विषयालाच फारसं स्थान नसणं, अशा अनेक बाजू या प्रश्नाला असाव्यात. मुळात वाचनसंस्कृती म्हणता येईल असं काही फारसं इथे नाहीच. सुटे-सुटे वाचक असतात, ते आपापलं कुठूनतरी मिळवून वाचत राहातात. 

वजन नियंत्रणात ठेवण्यापासून ते स्वैपाकापर्यंत विविध विषयांवरची पुस्तकं वाचणं तुच्छ आहे, असं रेघेचं मत नाही. पण इथे कथा-कविता-कादंबरी, इत्यादी स्वरूपाच्या साहित्याविषयी बोलतो आहोत. या साहित्याचे दिवस इतके काही वाईट नाहीत, उगीचच रड लावलेली असते- असा सकारात्मक सूरही अधूनमधून ऐकू येत असतो. वाचक दिन, किंवा साहित्य संमेलन, अशा प्रसंगांच्या निमित्ताने माध्यमांमधून असे आवाज आपण ऐकू शकतो. त्यासाठी काही वरवरचे तात्कालिक दाखलेही दिले जातात. आपापली दुकानं चालावीत, यासाठी कोणी अवाजवी फुगवटा दाखवतात, त्यावर विश्वास ठेवायचा असेल, तर काही बोलता येणार नाही. पण प्रत्यक्षातली आकडेवारी पाहिली, तर हे आवाज आपोआपच फोल ठरतात, असं वाटतं. महाराष्ट्रातील सार्वजनिक वाचनालयांची (अ, ब, क, ड- दर्जाच्या वाचनालयांची एकूण संख्या) १२,८५८ इतकी आहे. [पीडीएफ यादी]. या पार्श्वभूमीवर नेहमीचीच रड असणारा आकडा नोंदवू- एका मराठी पुस्तकाची (कथा-कादंबरी) आवृत्ती एक हजार प्रतींची- खरं तर आता पाचशे प्रतींचीही निघते. ही विसंगती किती प्रचंड आहे! यात पुन्हा वैयक्तिक पातळीवर पुस्तक घेऊ शकणारा/घेणारा वाचकवर्ग धरलेला नाही. शिवाय, पुस्तकविक्रेत्यांशी वगैरे बोललं, तरीही या साहित्याचा ग्राहक किती आहे, याचा वास्तवदर्शी अंदाज कोणालाही येऊ शकतो. याच्या सोबतच आपण आपल्या आसपास बहुसंख्य लोक काय बोलतात, बहुसंख्य वर्तमानपत्रं काय छापतात, इत्यादीचाही लेखाजोखा घेऊ शकतो.

साहित्याविषयीचं लोकसत्ता या दैनिकाच्या संपादकियात अडीच वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेलं एक मत पाहा: "... [वि.ग.] कानिटकर, वि.स. वाळिंबे यांनी मळलेल्या चरित्र आणि इतिहासलेखनाच्या पायवाटेचा आज हमरस्ता झाला असून कचकड्याच्या कथा-कादंबऱ्या आणि उसासे टाकणाऱ्या कवितांपेक्षा असे मूल्यवर्धित माहितीपर लेखन मराठी वाचक प्राधान्याने वाचू लागला आहे." कानिकटकर आणि वाळिंबे यांच्या लेखनाचा दर्जा काय होता, याविषयीची ही नोंद नाही. पण त्यांच्या लेखनाला 'इतिहासलेखन' मानणं भयानक वाटतं. इतिहासावर आधारित असलेलं सगळं लेखन इतिहासलेखन असतं असा यामागचा समज दिसतो. शिवाय, आपल्या ओळखीचे लोक उत्तम दर्जाचे आणि आपल्या माहितीत नसलेले, आपण न वाचलेले, आपल्यापेक्षा वेगळं मत असलेले लोक दुय्यम, सुमार दर्जाचे- अशी शेरेबाजी मराठीत आधीपासूनच होत आलेली आहे. हाच मराठी समाजाचा छेद घेण्याचा विद्वत्तापूर्ण प्रकार असावा. मुळात अवकाश लहान असल्यामुळे कंपूबाजी जास्तच संकुचित होते. कंपू सगळीकडेच असतात, पण त्यात थोडं तरी वैविध्य असलं तर एकमेकांवर जरा चाप राहात असावा. मराठीत हा चापही राहाणं अवघड वाटतं. आपण आत्ता त्यात जास्त नको जाऊया, पण या सगळ्याकडे पाहिलं की साहित्याविषयीची अनास्था कोणत्या पातळीवर आहे, हे समजू शकतं. याच वर्तमानपत्रात दोन दिवसांपूर्वी शांता गोखले यांच्याविषयी 'व्यक्तिवेध' सदरात एक स्फुट आलं होतं. गोखले यांना महाराष्ट्र फौंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला, त्या संदर्भात हे स्फुट होतं. त्यातील तपशिलाविषयीचं एक न छापून आलेलं वाचक-पत्र इथे नोंदवतो. 
आत्मकथन नव्हे, कादंबरी
शांता गोखले यांच्यासंबंधीचा ‘व्यक्तिवेध’मधील (५ जानेवारी) मजकूर वाचला. “‘मौज’, ‘सत्यकथा’ आणि ‘लिटिल् मॅगझिन’च्या उदयास्ताच्या या काळात त्यांची ‘रिटा वेलीणकर’ ही कादंबरी प्रकाशित झाली”, असं या स्फुटामध्ये म्हटलं आहे. आधीच्या वाक्यात ‘साठोत्तरी’ काळाचा उल्लेख आहे. गोखले यांच्या लेखनाची सुरुवात साठच्या दशकात झाली असली तरी, ‘रिटा वेलीणकर’ची पहिली आवृत्ती बरीच नंतर- डिसेंबर १९९०मध्ये प्रकाशित झाली. ‘सत्यकथा’ मासिक १९८२ साली संपुष्टात आलं, आणि अनियतकालिकांच्या (साठोत्तरी) घडामोडी त्याच्या बऱ्याच आधी मंदावल्या होत्या. त्यामुळे काळाचा उल्लेख चुकलेला दिसतो. याच मजकुरात पुढे ‘उद्धव शेळके यांचे आत्मकथन मराठीबाह्य विश्वाला त्यांच्याद्वारे उमजले’, असाही उल्लेख आहे. गोखले यांनी भाषांतरित केलेल्या शेळक्यांच्या पुस्तकाचं मराठी नाव ‘धग’ असं आहे. ती कादंबरी आहे, आत्मकथन नव्हे. गोखले यांनी या कादंबरीच्या भाषांतराचा स्तुत्य प्रयत्न केला, त्या इंग्रजी पुस्तकाचं नाव ‘कौतिक ऑन एम्बर्स’ असं आहे. आधीची आवृत्ती ‘एम्बर्स’ नावाने प्रकाशित झाली होती.
[विषयांतर: रेघेवर लोकसत्तेवरच जास्त बोललं जातं, असं दोनेक वाचकांनी रास्तपणे सांगितलं. ते चूक नाही. पण आपण आपल्या वाचनात येणाऱ्या वर्तमानपत्रांबद्दल बोलतो म्हणून हे झालेलं आहे. तरीही, हा आक्षेप योग्य आहे.]

ही परिस्थिती सर्वच माध्यमांची आहे. उदाहरणार्थ, दुसऱ्या एका वर्तमानपत्रातून रेघ लिहिणाऱ्याला काही दिवसांपूर्वी फोन आला. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने 'लेखनाच्या प्रेरणा' लिहिण्याविषयी त्यांनी सुचवलं. आपण त्यांना नकार देताना जे कारण दिलं, तेच वरती नोंदवलं आहे. मुळात साहित्याचं सामाजिकीकरण खंगलेलं असताना, कधीतरी एखादा सोहळा असेल तेव्हा लेखक-व्यक्ती तेवढी एक क्रयवस्तू म्हणून वापरायची, हे बरं नाही. यात काही गोष्टी अपरिहार्य आहेत. लेखक-व्यक्तीचं क्रयवस्तू होणं कदाचित स्वाभाविक असेल. पण इथे मुळात मुख्य साहित्यकृतीचं बाजारपेठेतलं स्थान डळमळीत असताना, फक्त वैयक्तिक प्रतिमानिर्मिती किती करत राहायची, याला थोडी मर्यादा हवी. अर्थात, असं काही होत नाही. सगळं तसंच सुरू राहातं. याच वर्तमानपत्राने पूर्वी एकदा रेघेला संपर्क साधला, तेव्हा लेखकाने नक्की कोणतं पुस्तक लिहिलंय तेही संबंधित पत्रकाराला माहीत नव्हतं, आणि तरीही लेखकाने साहित्याविषयी सकारात्मक बोलावं, असं त्या पत्रकाराचा आग्रह होता. पुस्तक माहीत नसण्याबद्दल किंवा वाचलं नसल्याबद्दल तक्रार नाही, पण 'केवळ सकारात्मकच बोलावं' हा आग्रह भयानक आहे. सोहळामय वातावरणात हे साहजिकच आहे.

२.
तरीही लिहिणारा लिहितो, त्यामागच्या प्रेरणा वेगवेगळ्या राहातात. शिवाय, वरची नकारात्मक वस्तुस्थिती नोंदवली असली, तरी एखादी साहित्यकृती कशीतरी पाचशे प्रतींच्या आवृत्तीत तरी निघू शकते, काही सुटे-सुटे वाचक ती वाचतात, असा काहीएक व्यवहार होतो, हे नाकारता येणार नाही. किंवा, आपल्याला वर्तमानपत्रांविषयी किंवा नियतकालिकांविषयी समाधान वाटत नाही, म्हणून आपण ब्लॉग लिहितो. कोणी इतर काही माध्यमं वापरत राहातं. कोणी आपापल्या परीने यातून मार्ग काढत राहातं. त्याचे जमेल तसे कमी-अधिक 'सकारात्मक' परिणाम दिसत राहातात. हे सगळं तरीही उरतंच. फुटक्या बांधावर चढून अजून बकरी पाला खाते, हे तर असतंच.

पण अशा अरूंद साहित्य अवकाशात लाखो रुपये उडवून अवाढव्य संमेलन घ्यावं का? हा प्रश्न मात्र उरतो. सदर नोंद लिहिणाऱ्याच्या मते, एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा उडवण्यात काही मतलब नाही. वरती नोंदवलेलं कारणच इथेही लागू होतं. मूळ साहित्यव्यवहाराचा अवकाश इतका आकुंचला असताना, केवळ काही बाजारपेठीय आणि संस्थात्मक हितंसंबंधांसाठी हे सगळं सुरू ठेवण्यात काय मतलब? त्यातून प्रसारमाध्यमांना एक तात्कालिक निमित्त मिळतं, बातम्या होतात, जाहिराती मिळतात, लेखक-लेखिकांनी प्रेरणा सांगाव्यात- सकारात्मक बोलावं अशा मागण्या होतात, काही नावं छापून येतात, कोणी स्वतःच्या मते विद्रोही वाटेल अशी मतं मांडतं, हे सगळं केवळ वरवरचं सुरू ठेवून काय साधतं?

इथे आणखीही एक मुद्दा नोंदवावासा वाटतो: काही डाव्या मंडळींनी (खरं म्हणजे एका पक्षाने) काही काळापूर्वी एक श्रमिक संमेलन घेतलं. अखिल भारतीय साहित्य संमेलन, हे प्रस्थापित मानलं जातं, म्हणून दुसरं एखादं विद्रोही किंवा श्रमिक अशा शब्दांसह वेगळं संमेलन काढणंही फारसं इष्ट वाटत नाही. श्रमिकांना परवडतील अशी पुस्तकं खुद्द 'लोकवाङ्मय गृह'सुद्धा काढत नाही, तरीही सर्वसामान्य लोकांनी आमंत्रित वक्त्यांची तीच-तीच मतं ऐकण्यासाठी उपस्थित राहावं, ही अपेक्षा असंवेदनशील आहे. पुस्तकं अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत, तशी काही रचना असावी, यासाठी प्रयत्न करणं सोडून केवळ सोहळे करणं, हे कोणाच्या सोयीचं असतं? यातून कोणता विचार पुढे जातो? श्रोते-वाचक-प्रेक्षक अशा सोहळ्यांमध्ये जास्तकरून मूक असतात, पण त्यांच्या मनात काहीतरी सुरू असतंच.

३.
ही नोंद लिहिण्याला काही सलग घडामोडी निमित्त ठरल्या: स्वतःच्या लेखनामागची प्रेरणा सांगायची मागणी या नोंद करणाऱ्याकडे झाली, मग उपरोल्लेखित स्फुटामध्ये काही ढोबळ चुका सापडल्या, दरम्यान साहित्य संमेलनाच्या बातम्याही कंटाळवाण्या वाटून गेल्या. शिवाय, अगदी काल-आज आलेल्या बातम्यांनुसार, इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना या वर्षीच्या साहित्य संमेलनात उद्घाटक म्हणून बोलवण्यात आलं होतं, पण काही स्थानिक संघटनांच्या विरोधामुळे त्यांना देण्यात आलेलं निमंत्रण ऐन वेळी रद्द करण्यात आलं. 'कदाचित मुख्यमंत्र्यांना माझे भाषण आवडले नसेल म्हणून आयोजकांनी माझे निमंत्रण ऐन वेळी रद्द केले असावे,' असं सहगल यांनी प्रतिक्रियेत म्हटलं आहे. सध्या बातम्यांमधून मिळणाऱ्या माहितीनुसार तरी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक शाखेने आणि शेतकरी न्यायहक्क आंदोलन समिती नावाच्या संघटनेने या विरोधामध्ये पुढाकार घेतल्याचं दिसतं. या संदर्भात माध्यमांमधून रास्त टीका झाली, त्यानंतर आता सरकारी प्रतिनिधींनी आणि म.न.से.नेही अधिकृतरित्या तरी, सहगल यांना विरोध करणं योग्य नसल्याचं म्हटलेलं आहे. केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाविषयी सहगल यांनी अनेकदा मतभिन्नता व्यक्त केलेली आहे. त्याचाही संदर्भ या घडामोडींना असल्याचं बोललं जातं आहे. सहगल यांना परत निमंत्रित करणार का, त्या पुन्हा निमंत्रण स्वीकारतील का, हे सर्व येत्या दिवसांमध्ये उलगडेल. झालं ते लाजीरवाणंच आहे. आता संमेलनाच्या आयोजकांनी स्वतःची चूक दुरुस्त करायला हवी आणि माफी मागून सहगल यांना सन्मानाने बोलवायला हवं. [ही नोंद लिहायला काही कालावधी गेला, त्यामुळे मुद्देही त्या क्रमाने आलेले आहेत. तर, परत निमंत्रण येण्याची शक्यता वाटत नाही, आणि तसं आल्यास आपण ते स्वीकारण्याचा प्रश्न नसल्याचं सहगल म्हणाल्याचं दिसलं]. दरम्यान, उद्घाटनावेळी सहगल जे काही भाषण करणार होत्या ते (म्हणजे त्याचं मराठी भाषांतर) 'बीबीसी मराठी'वर प्रकाशित झालेलं दिसतं. ते इच्छुकांना वाचता येईल. त्यात काय पटलं, काय नाही पटलं, ते वेगळं बोलता येईल. पण बोलायचा अवकाश तर ठेवायला हवा. नाहीतर रेघेवरच्या पूर्वीच्या एका नोंदीत म्हटलेलं तशी सेन्सॉरलेली मनं तयार होण्याचा धोका असतो. नोंदीत आधी उल्लेख आलेले श्रोते-वाचक-प्रेक्षक प्रसिद्धीच्या अवकाशात मूक असले, तरी त्यांच्या मनात काहीतरी सुरू असतंच. त्याचं प्रतिबिंब तसं या सनसनाटी सोहळ्यात थेटपणे कुठेच उमटत नाही. 

०३ ऑक्टोबर २०१८

पाणी अश्लील?

‘पाणी कसं अस्तं’ ही दिनकर मनवर यांची कविता मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेतील तिसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केली होती. पण त्यात आदिवासी स्त्रीविषयी अश्लील ओळ असल्याचा आरोप काही संघटनांनी व आता राजकीय पक्षांनीही केला, ही कविता अभ्यासक्रमातून काढून टाकण्याच्या आक्रमक मागण्या झाल्या. आता ती कविता अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेय. इथवर हे सगळं थांबलेलं नाही. कवीच्या नावानं वैयक्तिक शिवीगाळ चालू आहे, त्याच्या विरोधात आणि मुंबई विद्यापीठाविरोधातही ‘अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमा’खाली (अॅट्रॉसिटी कायदा) तक्रार दाखल करायची मागणी काही संघटनांनी केली आहे. कठोर किंवा अगदी कटू टीका समजून घेता आली असती. कविता कशी आहे, बरी आहे का वाईट आहे, तिच्या आशयातून कोणकोणते अर्थ निघू शकतात, त्यात काही आक्षेप वाटतो का किंवा वरपांगी वाटतंय त्याहून वेगळा काही अर्थ त्यात आहे का, हे सगळंच बोलता येऊ शकतं. या सगळ्यावर लिहिता येऊ शकतं. पण कविता लिहिलेल्या व्यक्तीवर इतक्या आक्रमकतेनं तुटून पडणं खेदजनक आहे. कवितेचे काही सुटे 'स्क्रिनशॉट' समाजमाध्यमांवरून फिरत आहेत. आपण रेघेवरची मागची नोंदही एका कवितेच्या संदर्भात केली होती. ती कविता सर्वोच्च न्यायालयालाही अश्लील वाटली होती! आणि आता पुन्हा हा कवितेवरून गदारोळ. तर या गदारोळापेक्षा ही पूर्ण कविता वाचणंच अधिक योग्य होईल, असं वाटलं, त्यामुळं ही कविता खाली नोंदवली आहे. 

पाणी कसं अस्तं

पाणी हा शब्द
मला कसाही उच्चारण्याची मुभा नाहीये
मी ऐकू शकत नाही पाण्याचा आवाज
की चालून जाऊ शकत नाही पाण्याच्या पायरीवरून

पाणी कसं अस्तं आकाशासारखं निळंशार
किंवा अंगठा छाटल्यावर उडालेल्या
रक्ताच्या चिळकांडीसारखं लालसर
पाणी कसं अस्तं स्वच्छ पातळ की निर्मळ?

काळं असावं पाणी कदाचित
पाथरवटानं फोडलेल्या फाडीसारखं राकट काळं
किंवा आदिवासी पोरीच्या स्तनांसारखं जांभळं
किंवा पाणी हिरवं नसेल कशावरून?
(पाणी कसं अस्तं हे मला अजूनही कळू दिलेलं नाहीये)

जे तुंबवून ठेवलेलं अस्तं तळ्यात ते पाणी अस्तं?
पोहऱ्यानं पाणी उपसून घेतलं तर विहिरीतलं पाणी विटतं?
पाणी धारदार वाहतं झुळझुळतं मंजुळ गाणं गातं ते पाणी अस्तं?
गढूळ, सडकं, दूषित, शेवाळलेलं, गटारीतलं, मोरीलं
या पाण्यावरचे निर्बंध अजूनही उठिले गेले नाहीत काय?
पाणी ढगातून बरसतं तेच फक्त पाणी अस्तं?
नि दंगली घडवतं ते पाणी नस्तं?

पाणी पावसातून गळतं जमिनीवर
बर्फ वितळल्यावर पसरतं पठारांवर
नदीला पूर आल्यावर वेढून घेतं गावं
धरण फुटल्यावर पांगापांग करतं माण्सांची
ते पण पाणी पाणीच अस्तं?

पाणी स्पृश्य अस्तं की अस्पृश्य?
पाणी अगोदर जन्माला आलं की ब्रह्म?
पाणी ब्राह्मण अस्तं की क्षत्रिय की वैश्य
पाणी शूद्र अस्तं की अतिशूद्र
पाणी निव्वळ पाणीच असू शकत नाही का
या वर्तमानात?

आणि पाणी वरचं खालचं झालं केव्हापास्नं
की कुणाच्या हात लावण्यानं ते कसं काय बाटतं?
पाणी नदीतलं, नाल्यातलं, ओढ्यातलं, विहिरीतलं
पाणी तळ्यातलं, धरणातलं, सरोवरातलं, समुद्रातलं
पाणी ढगातलं, माठातलं, पेल्यातलं, डोळ्यातलं
हे पाणी कुणाच्या मालकीचं अस्तं?

पाणी नारळात येतं
छातीच्या बरगड्यात साचतं
फुफ्फुसातून पू होऊन स्रवतं
पोटात पाण्याचा गोळा होऊन राहतं
ईश्वराचा कोणता देवदूत हे पाणी न चुकता सोडत अस्तो?

पाणी पारा अस्तं की कापूर?
जे चिमटीत पकडता येत नाही
नि घरंगळून जात राहतं सारखं
किंवा कापरासारखं जळून जातं झर्कssन

पाणी हा शब्द फक्त एकदाच मला उच्चारू द्या
निव्वळ पाण्यासारखाच

(दिनकर मनवर, 'दृश्य नसलेल्या दृश्यात', पॉप्युलर प्रकाशन- पान १४ व १५)

'पाणी कसं अस्तं आकाशासारखं निळंशार/ किंवा अंगठा छाटल्यावर उडालेल्या/ रक्ताच्या चिळकांडीसारखं लालसर' या ओळी आदिवासी समूहांच्याविषयी काय सांगतायंत? 'आणि पाणी वरचं खालचं झालं केव्हापास्नं/ की कुणाच्या हात लावण्यानं ते कसं काय बाटतं?' या ओळीही याच कवितेत आहेत, तरीही त्यावर जातीयवादाचा आरोप करायचा? या ठिकाणी इतर जाती-जमातीमधल्या स्त्रीच्या अवयवांचा उल्लेख करून पाहा, मग कसं वाटतं, अशीही विचारणा समाजमाध्यमांवर होताना दिसते. पण खरं तर निरनिराळ्या संदर्भात विविध स्तरांमधील स्त्री-पुरुषांच्या अवयवांचे उल्लेख कथा-कादंबऱ्या-कवितांमध्ये सापडतातच. त्याचा संदर्भ न तपासता एक ओळ वेगळी काढणं धोकादायक वाटतं. शिवाय, लगेच कविता लिहिणाऱ्यावर हेत्वारोपही करणं गैर वाटतं. आधीच्या ओळींमध्ये आलेला 'छाटलेल्या अंगठ्या'चा उल्लेख आदिवासी समुदायाविषयी काहीतरी मत नोंदवू पाहातोय, त्याला धरूनच पुढची स्तनांची ओळही आदिवासी समुदायाविषयी काहीतरी म्हणू पाहतेय. त्यावर चर्चा करता येईल, कोणाला त्यात त्रुटी वाटल्या तर तेही मांडावं, पण यात अश्लीलता दिसत नाही.

*
पॉप्युलर प्रकाशन
*
टीप: 'पाणी निळेभोर । काळे । सावळे' या तुळसी परब यांच्या कवितेत पाण्याची उपमा कदाचित अधिक व्यामिश्रतेनं वाचायला मिळते. तीही या निमित्तानं समांतरपणे वाचता येईल.

०२ ऑक्टोबर २०१८

राष्ट्रातली प्रतीकं

‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर हा कालावधी ‘स्वच्छता ही सेवा आंदोलना’चा आहे, असं पंतप्रधानांनी अलीकडे जाहीर केलं. गांधींना खरी आदरांजली देण्याची ही संधी असल्याचं ते म्हणाले. दरम्यान, २९ सप्टेंबर हा ‘सर्जिकल स्ट्राइक दिवस’ म्हणून साजरा करायची सूचना विद्यापीठ अनुदान आयोगानं शिक्षणसंस्थांना केली. ‘हे राजकारण नसून राष्ट्रभक्ती आहे,’ असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी म्हटलंय (टीका झाल्यावर, हा दिवस साजरा करणं अनिवार्य नसल्याचंही ते म्हणाले). गेल्या वर्षी ‘स्क्रोल’ या संकेतस्थळावर एक लेख (दुवा: http://tiny.cc/scroll-sewer) आला होता. ११ सप्टेंबर २०१७ रोजी प्रकाशित झालेल्या या लेखात (साउथ एशिया टेररिझम पोर्टल आणि सफाई कर्मचारी आंदोलन यांनी दिलेल्या) काही आकडेवाऱ्यांची तुलना होती. उदाहरणार्थ, २०१० ते (ऑगस्ट) २०१७ या कालावधीत जम्मू-काश्मीरमध्ये प्राण गमवाव्या लागलेल्या सैनिकांची संख्या ४११ होती, म्हणजे वार्षिक सरासरी ५१ माणसं. याच कालावधीत गटारांत-नाल्यांमध्ये काम करताना मृत्युमुखी पडलेल्या सफाई कामगारांची संख्या होती ३५६, म्हणजे वार्षिक सरासरी ४४ माणसं. केवळ २०१७ या एका वर्षात, तो लेख प्रकाशित झाला तोपर्यंतची आकडेवारी पाहिली तर, काश्मीरमध्ये ५४ सैनिकांना प्राण गमवावे लागले होते, तर त्याच कालावधीत मृत्युमुखी पडलेल्या सफाई कामगारांची संख्या किमान ९० होती! सैनिकांच्या मृत्यूंची आकडेवारी जितकी अद्ययावत व बहुतांशी सर्वांगीणरित्या उपलब्ध होते, तितकी सर्वांगीण आकडेवारी सफाई कर्मचाऱ्यांच्या मृत्यूंबाबत उपलब्ध होणं अवघडच. पण या लेखात न आलेली आणि इतरत्र उपलब्ध होणारी आकडेवारी पाहिली, तर देशभरात वर्षाकाठी सरासरी १३०० कामगार मैलासफाई करताना मृत्युमुखी पडतात. हाती मैला उचलावा लागणारे सफाई कामगार गटारांमध्ये मरतात त्यामागं विषारी वायू, गुदमरणं, इतर अपघात, अशी विविध कारणं असतात. शिवाय त्वचेचे विकार, श्वसनाचे विकार, हे आहेच. 

तर, सैनिकी कारवाईत कोणालाही कुठल्याही सीमेवर प्राण गमवावा लागणं दुःखदच आहे, पण त्यात किमान जगताना व मरणोत्तर मान मिळतो (यातही अधिकारी वर्ग व सर्वसामान्य सैनिक यांच्यातील भीषण वसाहतवादी तफावत टिकवलेली आहे), काहीएक आर्थिक सुरक्षा मिळते. या तुलनेत, सफाई कर्मचाऱ्यांना मिळणारा मान, मानधन, सुरक्षितता यांचा विचार केला तर काय चित्र दिसतं? (कायमस्वरूपी नसलेल्यांमध्ये) महिन्याला जेमतेम चार-पाच हजार रुपयांपर्यंत कमावणारी सफाई कामगार मंडळी आहेत, त्यांना सुरक्षासाधनंही नाहीत, मान मिळण्याचा तर प्रश्नच नाही. साधारण ९५ टक्के सफाई कामगार दलित समुदायांमधून येतात. राष्ट्रातील मैला साफ करणाऱ्यांचं मरण ‘राष्ट्रभक्ती’च्या कक्षेत येत नाही, आणि मानवी जीवाचं मूल्य इतक्या विषम निकषांवर मोजलं जातं, हे क्रूर आहे.

(वरचे दोन परिच्छेद लोकसत्ता या वर्तमानपत्रात वाचक-पत्रांमध्ये प्रसिद्ध झाले होते.)

या संदर्भात ‘गांधी मला भेटला’ ही वसंत दत्तात्रेय गुर्जर यांनी लिहिलेली कविता (पहिलं प्रकाशन- जानेवारी १९८३) ही कविता आठवते. महापुरुषाची बदनामी व अश्लीलता, अशा मुद्द्यांवरून काही काळापूर्वी ही कविता न्यायालयीन खटल्याद्वारे गाजली. पण गुर्जरांची कविता ही खरं तर मोहनदास करमचंद गांधी या व्यक्तीविषयीची नाही. या व्यक्तीतून निर्माण झालेल्या प्रतीकाविषयीची ही कविता आहे. तिची सुरुवात अशी:
गांधी मला
वसंत दत्तात्रेय गुर्जरच्या १० x १२च्या खोलीत ६ x २१/५च्या बाजल्यावर
भारतीय जनतेच्या प्रतीकांत भेटला
तेव्हा तो म्हणाला-
सत्याहून सौंदर्य वेगळे असू शकत नाही
सत्य हेच सौंदर्य आहे, त्या सत्याच्या द्वारा मी सौंदर्य पहातो
सत्याचा आग्रह ठेवल्यामुळेच तडजोड करण्यात असलेल्या सौंदर्याचे मोल जाणता येते
ही कविता करणाऱ्याचं स्थान विचारवंत, कार्यकर्ता, इत्यादी प्रकारांमधलं नाही. तर चाळीतल्या दहा बाय बाराच्या खोलीत जगणाऱ्या साध्याशा माणसाचं आहे. या कवितेच्या प्रकाशनाला याच वर्षी पस्तीस वर्षं झाली. शिवाय, गांधींचं शतकोत्तर सुवर्णजयंतीचं वर्ष आता सुरू होतंय. रेडियोवर रोज ‘गांधीवंदना’ कार्यक्रम लागायचा. एका बाजूला तो ऐकायचा आणि दुसऱ्या बाजूला त्यापासून दुरावलेलं वास्तव पाहायचं, या गुंत्यातून ही कविता लिहिली गेल्याचं गुर्जर यांनी एका संवादात म्हटलंय. त्यांचेच शब्द असे: 
'आता मी फिरत असतो आणि शेकडो माणसं बघत असतो. काही रस्त्यांवर. . . संवादसुद्धा ऐकू येतात म्हणजे. एकदा मी इराण्याच्या हॉटेलात चहा पिताना, एक गांधीवादी माणूस दुसऱ्याशी बोलताना ऐकलं. तो स्वातंत्र्यसैनिक वगैरे होता. तो सांगत होता की, 'बघा स. का. पाटील, केशवराव बोरकर, आम्ही सगळे वगैरे एकत्र काम केलंय. आता स. का. पाटील कुठेयत, बोरकर कुठेयत आणि माझी अवस्था काय आहे'. ते एक उदाहरण झालं. आणि लहानपणापासून रेडियोवर मी 'गांधीवंदना' हा कार्यक्रम ऐकतोय. काय होतं, अप्रत्यक्ष असा परिणाम होत असतो. कित्येक वर्षं ती 'गांधीवंदना' ऐकून ‘गांधी मला भेटला’, ती तयार झाली कविता. म्हणजे कित्येक वर्षं मी ते ऐकतोय. समाजात कायकाय बघत असतो वगैरे, म्हणजे माणसं, त्याच्यातून ती कविता स्फुरत जाते.'
तर, सर्वसामान्य माणसाला जाणवलेल्या किंवा त्याच्यावर रोजच्यारोज थोपवण्यात आलेल्या ‘गांधी’ या प्रतीकाच्या निमित्तानं ही कविता आहे. सत्याशी केलेल्या तडजोडीतूनच ही प्रतीकं उभारली जातात. ती कल्पित आदर्श रंगवणारी असतात, त्यामुळं वास्तवापासून त्यांची फारकत झालेली असते. ती फारकत कवीनं टिपली. काँग्रेसच्या घराणेशाहीपासून सदाशिवपेठेतल्या समाजवाद्यांपर्यंत, आणि उक्ती व कृतीमध्ये फेरफार करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघापर्यंत कित्येक पातळ्यांवर ही भीषण तडजोड सुरू असल्याचं कवी नोंदवतो. हिंदू-मुस्लीम-ख्रिश्चन या धार्मिक घटकांमधल्या अंतर्विरोधांचीही नोंद करतो. सध्याचा काळ तर याहून अधिक प्रतीकं लादणारा झालेला आहे. जगडव्याळ तंत्रज्ञान आणि माध्यमांचा वापर करून प्रतीकांचा भ्रम निर्माण करणं अधिक सुकर झालेलं आहे. ‘स्वच्छ भारत’, ‘मेक इन इंडिया’, ‘स्मार्ट सिटी’- इथपासून विविध पातळ्यांवर हा भ्रम आपल्याला दिसतो. वास्तव अर्थातच प्रतीकांपेक्षा विपरित असतं. पण आता हा प्रतीकांचा एकांगी मारा उबग येईल इतका वाढलाय, असं वाटतं. पस्तीस वर्षांपूर्वी लिहिलेल्या गुर्जरांच्या कवितेतल्या ओळी आता अधिक तीव्र आशयासह वाढत जातायंत, असं हे वास्तव वाटतं.

स्वच्छ भारत अभियानाचं एक पोस्टर

०१ ऑगस्ट २०१८

आकारानं मोठं होण्याची स्पर्धा

लोकसत्ता या वर्तमानपत्राच्या जाहिरातींविषयीचं हे एक न प्रसिद्ध झालेलं वाचक-पत्र आहे. ते आपण सहज त्यांना पाठवलं होतं. पण ते प्रसिद्ध न होण्यात संपादकीय दोष आहे, असं बहुधा म्हणता येणार नाही. जाहिरात विभागाकडे त्यांनी हे पत्र पाठवलं असेल की नाही, माहीत नाही. पण जाहिरात विभागाच्या कामाविषयीचं असं पत्र नेहमीच्या वाचकपत्रांमधे (लोकमानस) जाणं तसंही कदाचित औपचारिकतेला धरून राहिलं नसतं. किंवा चौकट थोडी अधिक खुली ठेवून तसं करता येईल. पण तो आपला प्रश्न नाही. आपण असंच त्यांच्यापर्यंत पोचवलं. आता ते इथं नोंदवून ठेवू.

अधिक कल्पक जाहिराती आवश्यक

'जाणत्या जनांसाठी' या सूत्राला धरून आपल्या वर्तमानपत्राच्या जाहिराती गेल्या काही काळापासून दिसत आहेत. यामध्ये एखाद्या सार्वजनिक ठिकाणाचं छायाचित्र असतं आणि लोकसत्ता वाचणारी व्यक्ती- म्हणजे प्रत्यक्ष अंक हातात धरून वाचणारी व्यक्ती उर्वरित जगापेक्षा- म्हणजे आजूबाजूची माणसं, गाड्या, इमारती, झाडं या सर्वांच्या तुलनेत दहा-पंधरा पटींनी मोठी दाखवलेली असते, शारीरिकदृष्ट्या महाकाय झालेली असते. सर्वच जाहिरातींमध्ये उच्च-मध्यमवर्गीय वा त्या वरच्या गटातील (कॉर्पोरेट, उच्चशिक्षण, आदी क्षेत्रांत रोजगार करणारी) शहरी व्यक्तीच हा अंक घेऊन दिसतात. 'दृष्टिकोनच देतो व्यक्तिमत्वाला आकार' ही ओळही या जाहिरातींसोबत दिलेली असते, यातून अनेक अर्थांची वलयं तयार होतात. आपल्याला केवळ एका विशिष्ट गटातीलच वाचक अपेक्षित आहे, हा वाचक उर्वरित 'सर्वसामान्यां'पेक्षा वरचढ आहे, या सगळ्याच जगापासून आपला वाचक उंच जातो, असे काही अर्थ यातून दिसतात. सध्याच्या बाजारपेठ वजा जगामध्ये सगळेच आपल्या उत्पादनाची विक्री वाढावी यासाठी विविध खटपटी करतात, हे खरं असलं; तरी हे प्रयत्न इतके बटबटीत असावेत का? 'दृष्टिकोन व्यक्तिमत्वाला आकार' देतो म्हणून प्रत्यक्ष ती व्यक्ती महाकाय दाखवणं, म्हणजे उंच-उंच पुतळे बांधून समाज उंच होतो, असं मानण्यासारखं आहे. उंचीचा एवढा सोस कशाला? दृष्टिकोन ही गोष्ट सखोल जायला मदत करणारी असते ना? महाकाय उंच होऊन उर्वरित जगापासून तुटणारा दृष्टिकोन योग्य होईल का? शिवाय, आपला मुख्य वाचकवर्ग महानगरी असेलही कदाचित (या जाहिराती ते खूप जास्त अधोरेखित करू पाहातात), पण ‘लोकमानस’मधील पत्रांचा अदमास घेतला, तर उर्वरित निमशहरी-ग्रामीण भागांमध्येही वाचक असेल, असू शकतो, हे लक्षात येतं. मग त्यांची काही आठवण जाहिरातींमधून ठेवणं बरं राहील की नाही? सध्या ज्या स्वरूपाच्या या जाहिराती आहेत त्यातून अभिजनशाहीचं सूचन होतं. पण आपण 'लोक'सत्ता आहात, तर त्या छायाचित्रात उर्वरित लोक आहेत याची जाणीव ठेवून अधिक कल्पक जाहिराती शक्य नाहीत का?

लोकसत्ता, ५ जानेवारी २०१८
 ०००

या पत्राच्या विषयाशी जवळीक साधणाऱ्या काही नोंदी यापूर्वीही रेघेवर प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यातल्या दोन निवडक नोंदी अशा:

३१ जुलै २०१८

परत

गेल्या वर्षभरात इथं काहीच लिहिलं गेलेलं नाही. कारणं अनेक आहेत. सगळी नमूद करणं अशक्य. बहुधा तशी गरजही नाही. खासकरून माध्यमव्यवहाराविषयीच्या असमाधानातून या ब्लॉगची सुरुवात झाली. त्यात साहित्याविषयीचा रसही आपोआप मिसळून गेला होता. सुरुवातीपासूनच. हे सगळं पहिल्या नोंदीपासून इथं असं आहे. त्यात मग काही समकालीन घडामोडींचा मागोवा घेतला गेला. यातही बरेचदा वैयक्तिक रस/कल यांचाच संदर्भ होता. या घडामोडी कशा निवडल्या गेल्या, त्यांचा कितपत मागोवा ठेवला गेला, हा वेगळा विषय. साहित्याबाबत काही मंडळींविषयी दस्तावेजीकरण या सगळ्या काळात झालं. ते या पानावर कोपऱ्यात कायम दिसेल असं नोंदवलं आहे. हे साधारण २००९ पासून पुढच्या दोन-चार वर्षांमधलं काम आहे. त्या कामाविषयीचा सदर लेखकाचा दृष्टिकोनही बदलत गेला. पण काम झालं.

माध्यमव्यवहाराविषयी इथं जे काही लिहिलं गेलं ते काहींना बरं वाटलं, काहींना पटलं नाही. काहींनी चांगली मतं दिली, कुणी निबंध लिहून परिषदेत सादर करायला सांगितलं, कुणी इथल्या एखाद्-दुसऱ्या नोंदीला छापील माध्यमात पुन्हा प्रकाशित करण्याची विचारणा केली, कुणी शिव्याही घातल्या. तरी, एकूण मिळून माध्यमव्यवहाराचा थोडासा अदमास बांधण्याच्या दृष्टीनं काही नोंदी बऱ्या असाव्यात. यात थोडी पुनरुक्तीही झालेली जाणवतेय. ती काहीशी अपरिहार्य असेल, तरी धोकादायक पातळी ओलांडणारी नको, असंही वाटतं.

ब्लॉग लिहून वेळ का घालवायचा, हे इथं लिहिण्यापेक्षा फेसबुकवर टाकायचं ना, ब्लॉगचं फेसबुक खातं उघडून तिथं हे टाकलं तर जास्त लोकांपर्यंत पोचेल- अशा काही सूचना या सगळ्या काळात बहुतेकदा चांगल्या हेतूनं केल्या गेल्या. त्यावर पुरेसं स्पष्टीकरण असं देता येणार नाही. पण तरी काही नोंदवणं आवश्यक वाटतं.

ब्लॉगचे वाचक तुलनेनं कमी राहातात हे खरं. पण काही काळासाठी सुरू असलेल्या रेघेच्या फेसबुक खात्यालाही तसा प्रचंड प्रतिसाद होता, अशातला भाग नाही. रेघेवरच्या नोंदींची लिंक तेवढी तिथं टाकली जात होती, पण तरीही मित्रयादीतल्या अनेक जणांना ते माहिती व्हायचं नाही, असं त्यांच्या प्रतिक्रियेवरून कळतं. तरीही, काही जणांना तिथून या नोंदींची माहिती मिळतही असणारच. ते त्यांना अधिक सोयीचंही ठरलं असणारच. पण आता ते फेसबुक खातं नाही. इच्छुक वाचक स्वतंत्रपणे या ब्लॉगला अधूनमधून भेट देत असावेत, असं दिसतं. तर तसं आपापल्या इच्छेनुसार कुणी इथं यावं, वाटलं तर वाचावं- ही वाटही बरी आहे. कुणाला सोयीचं वाटलं, तर त्यांच्या इच्छेनुसार इथल्या नोंदी  मेलवर मिळाव्यात, अशी नोंदणीची तजवीजही समासात करून ठेवलेली आहे.

फेसबुकसारख्या समाजमाध्यमांचं स्वरूप ब्लॉगपेक्षा वेगळं आहे. देवाणघेवाण/शेअरिंग हा शब्द सोपा वाटला, तरी त्याच्या पातळ्या बहुधा अगणित असतील. शिवाय आपलं अख्खं प्रोफाइल किंवा प्रोफाइल नावाची एक काल्पनिक गोष्ट रचणं, त्यात काही ढोबळ रंग भरणं किंवा त्या रंगांनुसार अभिव्यक्ती करणं, वैयक्तिक अनुभवाची एखादीच बाजू रंगवून सांगणं, एखाद्या विषयात आधी काही म्हटलं गेलंय याची जाणीवही न ठेवता ठामपणे मतं मांडणं, किंवा मतांची वा अभिव्यक्तीची स्पर्धा साधणं, लक्ष वेधून घेण्यासाठी विविध क्लृप्त्या साधणं, अवाजवी स्तुती- हे वेगळं काम असावं. फेसबुकसारख्या ठिकाणी फक्त हेच होतं असं अर्थातच नाही. (किंवा ब्लॉगांच्या अवकाशात असं होतच नाही, असंही नाही). तिथंही अनेक रंग असतातच. पण शेवटी अनेक प्रकारच्या गोष्टींची आणि माणसांची गर्दी अशा समाजमाध्यमांवर आपल्याला जाणवते. (कोणाला जाणवत नसेल, तर त्यांनी याकडं दुर्लक्ष करावं.) ब्लॉगची चौकट त्या तुलनेत थोडीफार स्वतंत्रपणे हाताळता येते. तत्काळ प्रतिसादाची अनाठायी सक्ती राहात नाही. वाचक असू नयेत, असा याचा अर्थ नव्हे. पण वाचक आपापल्या इच्छेनुसार इथंही येऊ शकतात. इच्छा नसेल तर न येण्याचं स्वातंत्र्य त्यांनाही राहातं.

किंवा त्याहून महत्त्वाचं म्हणजे- तांत्रिक पातळीवरती ब्लॉगवरची काही साधनं लेखनाला अधिक सोयीची आहेत. फॉन्ट, फोटोंची मांडणी, आपल्या इच्छेनुसार पार्श्वभूमीचा रंग ठरवणं, नोंदी सलगपणे साठवून ठेवणं, शब्दसंख्येची थोडी अधिक मोकळीक, लेखनाव्यतिरिक्त इतर गोष्टींची गर्दी (किमान या चौकटीपुरती) बाजूला ठेवण्याची शक्यता, अशा काही गोष्टी इथं साधता येतात. वाचकाचं लक्ष विचलित करणाऱ्या अगणित गोष्टी एकाच चौकटीत कोंबण्यापासून ब्लॉग थोडासा वेगळा राहू शकतो. समाजमाध्यमांवर एकाच वेळी अनेक गोष्टींची गर्दी असते. साहजिकपणे त्यातून वाचकही- किंवा प्रेक्षकही जास्त मिळतात. पण शेवटी गोष्टी वेगानं बदलत असल्याचं आपल्याला माहीत आहेच. त्यामुळं कशातच काही स्पष्टपणे बोलता येत नाही, अशी गतही अनेकांच्या अनुभवात असेल. पण आपापल्या माध्यमनिवडीचा आदर करायला तरी काय हरकत आहे? अनेकदा तसा आदर राखला जात नाही, असं वाटतं. बाजारपेठेनं क्रयवस्तूंचे असंख्य वाटावेत असे पर्याय समोर ठेवले, तशी निवडीची विचित्र सक्तीही केली का? अशी ही अदृश्य सक्ती आपल्या अनेकांच्या अनुभवात असेलच. तरीही आपण काहीतरी थोडीफार स्वतंत्र खटपट करू पाहातो. त्यात अपुरेपणाही जाणवत राहातो. त्या अपुरेपणाच्या जाणीवेतूनच रेघेची सुरुवात झालेली आहे. ती रेघ आपण अधेमधे थांबत चालवत राहिलोय. आता परत थोडी चालवेल तेवढी चालवू.

१३ मे २०१७

गडचिरोली: सुरजागड प्रेस-नोट

लॉइड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीला गडचिरोलीमधील चामोर्शी तालुक्यातील कोनसरी गावातील काही जमीन प्रस्तावित स्पाँज आयर्न प्रकल्पासाठी हस्तांतरित करण्याचा व भूमिपूजनाचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल पार पडला. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खाणींना व तत्सम प्रकल्पांना विरोध करणारी सभा सुरजागड व भामरागड भागातील लोकांनी घेतली. त्याची संक्षिप्त प्रेस-नोट व फोटो रेघेकडं आले, ते जसंच्या तसं खाली नोंदवलं आहे. आणखी तपशिलात माहिती असलेली प्रेस-नोट मिळाली तर ती भर इथं नंतर टाकूया. इतर काही ठिकाणी विरोध दर्शवण्यात आल्याच्या क्वचित काही बातम्याही आज प्रसिद्ध झालेल्या आहेत. अधिक संदर्भ जाणून घेण्यासाठी पूर्वीच्या निवडक पाच नोंदींची यादी शेवटी दिली आहे.
०००

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या स्पाँज आयर्न प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमाला 
सुरजागड व भामरागड क्षेत्रातील जनतेने केला प्रखर विरोध

 सुरजागड व इतर खदानी रद्द करण्याची केली मागणी

मुख्यमंत्री व प्रशासनाद्वारे करण्यात येत असलेल्या या जनविरोधी कृतीचा सुरजागड इलाक्यातील व भामरागड पट्टीतील जनतेने सामूहिक विरोध केला. सुरजागड येथे सुरजागड इलाक्यातील लोक एकत्र आलेले होते, भामरागड तालुक्यात धोडराज येथे विरोध सभा घेण्यात आली. यावेळी क्षेत्रातील नागरिक बहुसंखेने उपस्थित होते.

स्थानिक जनतेचा सर्वच प्रकारच्या खदानी व खदानी पूरक कामांना प्रखर विरोध आहे. आम्हाला खदान नकोच, आम्ही खदान कदापीही चालू देणार नाही असा इशारा या वेळी स्थानिक जनतेने दिला. हे प्रकल्प अहेरी उपविभाग किंवा एटापल्लीत झाला पाहिजे अश्या फसव्या मागण्या करणाऱ्या व्यक्ती व संघटनांचासुद्धा स्थानिक जनतेने निषेध केला. स्थानिक ग्रामसभांनी हे स्पष्ट केले की आम्हाला कोणत्याही परिस्थतीत खदान मंजूर नाही. तेव्हा प्रकल्प कुठे व्हावा या मुद्द्याचा प्रश्नच येत नाही.

स्थानिक लोकांच्या या मागणीकडे जर सरकारने सतत असेच दुर्लक्ष केले आणि लोकांचा विरोध असतानासुद्धा अगोदर खदान व आता प्रकल्प सुरू करण्याच्या जो प्रयत्न केला जात आहे, तो जर त्वरित थांबविण्यात आला नाही तर तीव्र आंदोलनाला सरकारला समोर जावे लागेल असा इशाराही आजच्या विरोध सभांमधे देण्यात आला.

सुरजागढ़ येथील सभा: सैनु गोटा (उभे) व लालसु नोगोटी (बसलेले) प्रामुख्याने उपस्थित
भामरागड तालुक्यातील धोडराज येथील विरोध सभेत उपस्थित लोक

रेघेवरच्या आधीच्या काही नोंदी: