३० जानेवारी २०१४

एक्स्क्युज मी, प्लीज । वी आर गोइंग टू बी वर्ल्ड फेमस

वार गुरुवारच्या निमित्तानं ही नोंद.

You got to have some English Tuka
if you want to get ahead in the world
- Arun Kolatkar (From an Undated Sheet, The Boatride & Other Poems, page 234)

***

निळू दामले यांच्या 'यू-ट्यूब' वाहिनीवरचा व्हिडियो-


व्हिडियोतील काही :
किंग ऑफ इंग्लिश आणि क्विन ऑफ इंग्लिश असे उपक्रम. या उपक्रमाअंतर्गत काय करायचं, तर असे दहा शब्द आम्ही लिहायचे. आम्ही लिहितो किंवा एखाद्या मुलाचं चांगलं हस्ताक्षर असेल तर त्याला लिहायला सांगतो. एक ते चारच्या सिलॅबसमधले ते शब्द निवडून आम्ही त्याची एक फाइल केलेली आहे. त्यातले शब्द द्यायचे रोज. रोज आम्ही जाणीवपूर्वक मुलांना सांगत नाही की, 'हे शब्द बघा, लिहून घ्या, पाठ करा'. फळ्याची जागा रोज बदलतो, मुलं जाता येता त्याच्याकडे पाहत असतात. पंधरा दिवसांनी आम्ही तुम्हाला हे शब्द विचारणारे. भले ते लक्षात ठेवा रोज किंवा लिहून पाठ करा. पंधरा दिवसांनी ज्याला जास्तीत जास्त शब्द सांगता येतील त्याचा आम्ही सत्कार करणार. पंधरा दिवसांनी रोजचे जे शब्द होते ते मुलांनी वहीत लिहून दाखवायचे. त्याचं स्पेलिंग, त्याचा उच्चार आणि त्याचा अर्थ. आम्ही ते तपासतो. ज्याला जास्त शब्द लक्षात आहेत, तो किंग ऑफ इंग्लिश. आणि आम्ही एक किरीट, एक मुकुट आणलेला आहे. बाहेरून चाललेल्या गावकऱ्याला इथे बोलवून अनौपचारिक वातावरणात त्या विद्यार्थ्याला तो मुकुट घालायचा. दिवसभर तो मुकुट घालून शाळेत वावरणार, गावात वावरणार, संध्याकाळी पण तो मुकुट घालून घरी जाणार. दुसऱ्या दिवशीच तो परत आणणार. म्हणजे त्याला एक, आपण इंग्रजीचा राजा झालो. अशीच एक मुलगी निवडायची, क्विन ऑफ इंग्लिश. म्हणजे त्याला एक अभिमान वाटतो. म्हणजे मुलांच्यात एक ओढ वाटते. त्यांना मुद्दाम हे सांगावं लागत नाही, की हे वाचा. त्यामुळं मुलांकडे आज हजार-दोनतीन हजार शब्द आहेत. आमचा गुरुवारचा उपक्रम असतो, इंग्रजीत बोलायचं. -- इंग्रजीतल्या ऑर्डर आहेत, इंग्रजीतली देशभक्तिपर गीतं आहेत, इंग्रजीतली प्रार्थना मुद्दामहून घेतलेली आहे. -- असा प्रयत्न आमचा छोटासा दहा वर्षांपासूनचा सुरू आहे.-- मुलगा आमचा परिसराच्या आवारात 'एक्स्युज मी' म्हटल्याशिवाय बोलत नाही. सहज कोणाहीबरोबर बोलत असेल, तरी सराईतपणे 'एक्स्युज मी' हा त्याचा शब्द झालेला आहे. 'एक्स्युज मी, मामा', असा त्याचा एक जनरल शब्द झालेला आहे. आपण 'ए मामा', 'ओ मामा' असं म्हणतो, तर ते 'एक्स्युज मी' त्यांच्या व्यवहारात -
इथं आमच्या चौथी यत्तेपर्यंत तरी मुलं आहेत, आम्ही हे पाच-दहा वर्षांपूर्वी शिकवलेलं आहे, पण पहिलीला येणाऱ्या मुलाला हे शिकवलेलं नाही, पण तो (आधीच्यांचं) अनुकरण करतो नि बोलतो. म्हणजे इंग्रजीचा मुलं इतक्या सराईतपणे वापर करतात.
***

Like it or not
I'll make you world famous
          not you alone but both of us
we're going to be famous Tuka
you and I together

These translations are going to make me famous throughout the world

- Arun Kolatkar ((From an Undated Sheet, The Boatride & Other Poems, page 234)
***

अरुण कोलटकर
अरुण कोलटकर (१ नोव्हेंबर १९३२ - २५ सप्टेंबर २००४) यांनी मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांमधे कविता लिहिल्या. 'द बोटराइड अँड अदर पोएम्स' या 'प्रास प्रकाशना'नं प्रकाशित केलेल्या नि अरविंद कृष्ण मेहरोत्रा यांनी संपादित केलेल्या पुस्तकात त्यांच्या काही इंग्रजी कविता, त्यांच्याच काही मराठी कवितांचे इंग्रजी तर्जुमे, तुकारामांसह काही संतकवींच्या कवितांची त्यांनी केलेली भाषांतरं, इत्यादी मजकूर वाचकांना मिळू शकतो. कोलटकर मूळचे कोल्हापूरचे.

नोंदीत ज्या शाळेचा व्हिडियो जोडला आहे, ती शाळा सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातल्या तुंग या गावात आहे. त्या शाळेतील शिक्षक कृष्णनाथ पाटोळे यांना आपण व्हिडियोत बोलताना पाहिलं.

अरुण कोलटकर व कृष्णनाथ पाटोळे यांना आपण शेजारी-शेजारी बसवलं, हे अनेकांना आवडणार नाही किंवा पटणार नाही. ते दोघं जे काही बोलले, त्यावर तज्ज्ञ मंडळी आणखी काही बोलू शकतील. आपल्याला फक्त ते एकमेकांशेजारी दिसले, म्हणून नोंदवलं. आणि जाता जाता एक टांगतं राहणारं वाक्यही लिहूया. ह्या वाक्यापुढे पूर्णविराम, प्रश्न चिन्ह किंवा उद्गारवाचक चिन्ह यांपैकी कुठलं चिन्ह दिलेलं बरोबर नि कुठलं चूक हेच ठरवता आलं नाही राव ह्याला नि नोंद कसली करतोय.?! जाऊ दे. आता वाचकांनीच आपापल्या इच्छेनुसार किंवा मतानुसार किंवा गरजेनुसार या वाक्यापुढे त्यांना योग्य वाटेल ते चिन्ह उमटवावं-

जगात पुढे जाण्यासाठी इंग्रजीची गरज आहे

***


जगी मान्य केले     हा तुझा देकार। 
की काही विचार     आहे पुढे।।
- तुकाराम

२८ जानेवारी २०१४

एका मजकुराचा प्रवास : रेघ < दैनिक भास्कर < द हिंदू

१० ऑगस्ट २०१३ रोजी 'रेघे'वर एक नोंद प्रसिद्ध झाली होती. 'नावात काय आहे? बरंच काही' या शीर्षकाचा मोहम्मद नदीमुल्लाह खान यांनी लिहिलेला हा मजकूर होता. मुस्लीम नाव असलेल्या व्यक्तीला अहमदाबादमधे घर शोधताना आलेला अनुभव सांगणारा हा लेख होता. रेघेसाठीच खान यांनी लिहिलेला हा मजकूर मुळात इंग्रजीत होता, तो आपण मराठीत केला होता. हा मजकूर त्यानंतर लगेचच १४ ऑगस्टला 'दैनिक भास्कर'च्या नागपूर आवृत्तीमधे संपादकीय पानावर (डेंजर शीर्षकासह) प्रसिद्ध झाला होता. मुळात रेघेसाठी लिहिलेला हा मजकूर हिंदीतही प्रसिद्ध झाल्याचं इथं नोंदवता आलं असतं, पण राह्यलं. काही दिवसांपूर्वी हा मजकूर 'द हिंदू'मधे वाचकांच्या लेखनाला प्रसिद्धी देणाऱ्या 'ओपन पेज' या पानावरही प्रसिद्ध झाला नि त्यानंतर आता या घडामोडींची एक बारकी नोंद रेघेच्या मूळ वाचकांपर्यंत पोचवणं आवश्यक वाटलं.

या घडामोडीत 'दैनिक भास्कर'मधे मजकूर प्रसिद्ध झाल्यानंतर मूळ लेखकाला चारशे का पाचशे रुपये मानधन मिळालं, हे आपल्या दृष्टीनं एक नोंदवण्यासारखं. आणि 'द हिंदू'मधे मजकूर प्रसिद्ध झाल्यानंतर लेखकाकडे ऐंशीहून अधिक प्रतिसाद ई-मेलद्वारे आले. रेघेवर आपण आर्थिक मानधन देऊ शकत नसल्यामुळे इथला मजकूर दुसऱ्या कुठे मुख्य प्रवाहातल्या व्यासपीठावर छापून आला तर बरं, कारण त्यातून मूळ लेखकाला किमान आर्थिक परतावा मिळू शकतो, असा एक प्रयत्न. ह्या मजकुराच्या बाबतीत हे झालं. (लेखकाला मानधनाची अपेक्षा किंवा गरज तर अजिबातच नव्हती, पण माध्यमांसंबंधी एक आर्थिक बाजूचा मुद्दा आपण वेळो-वेळी नोंदवलाय, त्या संदर्भात हे आहे). आणि 'हिंदू'त इंग्रजी मजकूर छापून आल्यामुळे त्याला जरा जास्त प्रसिद्धी मिळाली नि आणखी तामीळमधेही अनुवादाची परवानगी मागणारी विचारणा लेखकाकडे झालेय, हेही एक या नोंदीबद्दल घडलेलं चांगलं.

रेघेवर नोंद करण्याच्या निमित्तानं लेखकानं मुद्दाम त्याचा अनुभव लिहून काढला होता, ते पुढे जाऊन जरा मूळ लेखकाला जास्त समाधान देणाऱ्या घडामोडी घडवणारं ठरलं, तर मोहम्मद नदीमुल्लाह खान यांनी हे  समाधान रेघेच्या इथल्या वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी खालील मजकूर पाठवला आहे :
''अहमदाबादमधे घर शोधत असताना एक मुस्लीम इसम म्हणून मला ज्या नकारांना सामोरं जावं लागलं त्यानं मी दुःखी झालो होतो, ही सुरुवात. त्यानंतर ज्यांच्या-ज्यांच्याशी बोलताना हा विषय निघायचा त्यांच्यापाशी मी ह्या दुःखातून निघालेला माझा राग व्यक्त करायचो. त्यावेळी 'रेघे'च्या माध्यमातून माझ्या रागाला वाट करून देण्याचा पर्याय माझ्यापुढे ठेवण्यात आला. मी माझा अनुभव इंग्रजीत लिहीन नि नंतर तो मराठीत भाषांतरित करून माझ्या कक्षेत अन्यथा न येणाऱ्या वाचकांपर्यंत तो पोचेल, असा हा पर्याय होता. मी तेवढं केलं नि आठवड्याभरात काही बऱ्या-वाईट प्रतिक्रिया माझ्यापर्यंत आल्या. बहुसंख्य प्रतिक्रिया माझ्या म्हणण्याबद्दल सहानुभूती व्यक्त करणाऱ्या होत्या.

दरम्यान, माझा एक जुना मित्र नि 'दैनिक भास्कर'च्या नागपूर आवृत्तीचा संपादक प्रकाश दुबे याला मी हा असा मजकूर लिहिल्याचं कळलं आणि त्याच्या पेपरसाठी मी या मजकुराचं हिंदी भाषांतर करून द्यावं असा आग्रह त्यानं केला. त्याला या लेखासंबंधी काय प्रतिक्रिया मिळाल्या ते मला कळू शकलं नाही, पण आणखी वेगळ्या प्रकारच्या वाचकांपर्यंत लेख पोचला, एवढं तरी झालं. त्यानंतर काही मित्रांनी सुचवलं की, मूळचा इंग्रजी मजकूर तसाही पडून आले, तर तोही कुठे प्रसिद्ध होईल का पाहायला हवं. त्या प्रयत्नातून 'द हिंदू'च्या 'ओपन पेज'वर १९ जानेवारीच्या रविवारी हा लेख छापून आला. आणि त्या दिवसापासून माझ्या ई-मेल बॉक्समधे पत्रांची आवक वाढत चाललेय. हा मजकूर लिहीपर्यंत (२४ जानेवारी) ऐंशीहून अधिक प्रतिक्रिया ई-मेलद्वारे मिळाल्या होत्या. मोठ्या प्रमाणात वाचक माझ्या मुद्द्याशी सहमत आहेत. या लेखाच्या निमित्तानं मला मुस्लिम समुदायातली माझ्यासारखी नास्तिक मंडळी सापडली. ह्या देशात असा मी एकटाच आहे, हा माझा समज त्या निमित्तानं दूर झाला! काही मुस्लिम मंडळींनी मला पापक्षालन करण्याचा प्रमाणिक सल्ला देऊन काही पुस्तकं वाचण्याची शिफारस केली. मी जो मुद्दा मांडू पाहत होतो त्यातून हिंदू-मुस्लिम यांच्यातली असमानता दाखवायची असल्याचा समज काही वाचकांनी करून घेतला असावा, असं काही प्रतिसादांवरून कळलं. मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया बिगरमुस्लिम समुदायातल्या वाचकांकडून आल्या, त्यातल्या जवळपास सगळ्यांनी आपला समाज ज्या कुठल्या दिशेनं जातोय त्याबद्दल चिंता व्यक्त केली. मुस्लिम भाडेकरू ठेवण्याबद्दल नकाराची भूमिका घेणाऱ्या हिंदू मंडळींचं समर्थन दोन वाचकांनी केलंय. हरयाणात कुठंतरी असलेल्या ओ. पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीतून मला व्याख्यान द्यायला बोलावणं आलं. नव्वद वर्षांच्या एका वाचकानं धर्मावर माझी श्रद्धा पुन्हा बसावी यासाठी माझं मन वळवायचा प्रयत्न सुरू केला. विचाराचा प्रवास सुरू आहे. ती विचाराची रेघ अशीच लांब लांब जाईल. आत्ता ह्या क्षणापर्यंत हे सगळं आनंद देणारं आहे. ह्या रेघेचं वर्तुळ पूर्ण होऊन ती माझ्या पाठीत घुसली नाही म्हणजे मिळवलं.''

पाठ

२३ जानेवारी २०१४

नामदेव ढसाळांच्या निमित्ताने कविता नि चळवळ

कवी नामदेव ढसाळ यांचं १५ जानेवारीला निधन झालं. त्या निमित्ताने ही नोंद इथे प्रसिद्ध होतेय.

नामदेव ढसाळ (१५ फेब्रुवारी १९४९ - १५ जानेवारी २०१४) [छायाचित्र : हेनिंग स्टेगमुलर]

'चळवळ' हा शब्द अनेक जण अनेक अर्थांनी वापरत असतील. या सगळ्या अर्थांनी बोलणं काही आपल्याला जमण्यासारखं नाही. पण ज्या ढसाळांच्या निधनाच्या निमित्ताने आपण बोलतोय त्यांची नि त्यांच्या कवितेची दलित चळवळीशी बांधिलकी होती असं खुद्द तेही म्हणत. शिवाय १९६०च्या दशकात अनियतकालिकांची चळवळ झाली, असंही म्हटलं जातं आणि या चळवळीशीही ढसाळांचा संबंध होता. तर, ह्या अनियतकालिकांच्या चळवळ प्रकरणासंदर्भात कवितेबद्दल लहानसं काही नोंदवता आलं तर पाहू. काही लोक एकत्र येऊन काही ना काही हालचाल करत राहातात, त्यांचे एकमेकांवर किंवा आसपासच्या भवतालावर परिणाम होत राहतात, या अर्थानं या नोंदीत 'चळवळ' हा शब्द वापरला आहे. ढसाळांच्या निमित्ताने आपण बोलतोय. या निमित्तामधे ढसाळांचे समकालीन कवी तुळसी परब आणि मनोहर ओक यांनाही आणतोय. का, ते नोंद पुढे जाईल तसं स्पष्ट होईल अशी आशा. आता पहिल्याच्या निमित्ताने नवीन दोघांसह पुढे जाऊ.

तुळसी परब यांनी चंद्रकान्त पाटील यांच्यासोबत 'मनोहर ओकच्या ऐंशी कविता' (लोकवाङ्मय गृह. दुसरी आवृत्ती : जानेवारी १९९९) हे पुस्तक संपादित केलं. या पुस्तकात मनोहर ओकांसंबंधी नि त्यांच्या कवितेसंबंधी दोघाही संपादकांचे लेख आहेत. यात परबांनी ते मुंबईला सचिवालयात असतानाचे काही अनुभवही नोंदवलेत. नामदेव ढसाळ, मनोहर ओक आणि परब यांचा तेव्हा एकमेकांच्या आसपास वावर होता. मैत्री होती असं काही लगेच इथे लिहावं वाटत नाही. तर, त्यासंबंधी परब लिहितात :
त्यावेळी आमच्या तिघांमध्ये प्रचंड सामुहिक कवितावाचन चालत असे. आम्ही तेव्हा एकमेकांना कविता घेऊनच भेटत असू.

नामदेव आणि मनोहरमध्ये हळूहळू फरक पडत चाललेला मला दिसत होता. त्याची एक दोन उदाहरणे सांगण्यासारखी आहेत.

सरकारी कारकुनांच्या टेबलावर असतो तसा एकेक पेपरवेट माझ्या टेबलावर पडलेला असे. एकदा नामदेव माझ्या शेजारी बसून पेपरवेटशी चाळा करत होता. तेवढ्यात मनोहर आला. त्यानं नामदेवच्या हातातला पेपरवेट घेतला आणि तो मला म्हणाला, ''साल्या तू दगड आहेस. वर तुला पेपरवेट कशाला? आधीच तू सगळ्या सरकारी कागदांवर नुसता झोपून राहतोस. मी आता या पेपरवेटची काय जादू करतो पाहा.'' मग तो पेपरवेट माझ्या टेबलावर नुसता फिरवत राहिला. मनोहरची कधी काय लहर लागेल त्याचा पत्ता नसायचा. म्हणून मी त्याला थोडा टरकूनच असे. त्याचा भोवरा थांबल्यानंतर तो काचेच्या पेपरवेटच्या आतल्या बुडबुड्यांकडे पाहत राहिला. नामदेवला म्हणाला, ''नाम्या, या पेपरवेटवर कविता लिहायची.'' मी या वेळी अंग काढून घेतलं. नामदेव म्हणाला, ''तू आधी लिही, मग मी लिहीन.'' दुसऱ्या दिवशी मनोहर या संग्रहातील कविता क्र. ६७  'एकुलतेपणाच्या पेपरवेटमधील' ही कविता घेऊन लंच-अवरमधे हजर झाला. त्यातला 'कोणत्याही क्षणी बाजूला सारला जाणारा । कांतीमान निर्लेब उघड पेपरवेट अस्पृश्यासारखा दबलेला नर्म ।' ही ओळ नामदेवला लागली. तिसऱ्या दिवशी नामदेव त्याची 'पेपरवेटमध्ये माणसं कुणी कोंडून टाकलीत' ही कविता घेऊन हजर झाला. या दोन कविता एकमेकांशेजारी ठेवून कुणालाही दोन वेगवेगळ्या धोरणांची जुगलबंदी सहज बघता येईल.
परबांनी ज्या जुगलबंदीची अपेक्षा ठेवलेय, ती इथं या नोंदीत घडवायची आपली इच्छा होती पण यातली ढसाळांची कविता रेघेला उपलब्ध झाली नाही. पण हा मुद्दा तेवढ्याच कवितेपुरता अर्थातच मर्यादित नाहीये. दुसरं एक उदाहरण आहे झाडासंबंधीचं. वरती उल्लेख केलेल्याच लेखात परबांनी लिहिलंय :
मनोहरच्या 'झाड' कवितेची गोष्ट थोडी मजेशीर आहे.... ही 'झाड' कविता नामदेवलासुद्धा तेव्हा खूप आवडली होती. (या आवडीचा उल्लेख चंद्रकान्त पाटलांच्याही लेखात आलेला आहे. 'अशी कविता लिहिता यायला पायजे', असं ढसाळ पाटलांना एकदा म्हणालेले.) मात्र नामदेवचं 'व्हायलन्सचं झाड' पूर्णतः वेगळ्या ध्रुवावरचं आहे.
ढसाळांची ही वेगळ्याच झाडासंबंधीची कविता साडेसहा पानं पसरलेली आहे, त्यामुळे सगळी इकडे नोंदवणं शक्य नाही. पण या कवितेची सुरुवात आणि शेवट इथे नोंदवूया. अशा अर्धवटपणासाठी माफी, वाचकांना मूळ कविता ढसाळांच्या 'मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले' (लोकवाङ्मय गृह) या कवितासंग्रहात सापडेल.

सुरुवात :
तुळशीवृंदावनासारखे त्यांनी आपल्या दारासमोर व्हायलन्सचे झाड लावले. लावणे अटळ होते. ते रोज झाडाला भक्तिभावनेने पाण्याऐवजी रक्त घालू लागले. खत म्हणून मांससुद्धा. नाकर्तेपणाचा चेहरा घेऊन येणारा सूर्य वरातीतला नवरा बनून पृथ्वीवर अवतरत होता. प्रत्येक संध्याकाळी नित्यनियमाने मरत होता. सूर्यमंडळे तारामंडळे यांचा शिवणापाण्याचा खेळ रोजच चालू होता. व्हायलन्सचे झाड वाढत होते. कणाकणाने आकाशाचा वेध घेत होते. माणसाचे रक्त पिणाऱ्या तस्करी शहराची हवा झाडाला भलतीच मानवत होती.
शेवट :
झाडाची शेकडो हजारो लाखो कोट्यवधी झाडे
झाडे झाडे झाडेच झाडे वाढत जातील
परिस्थितीवर घाव न घालणारं शासन मोडलं जाईल
जनतेकडून राजरोस मारलं जाईल
पार्लमेंट भातखेचरात भरून जाईल
मांगवाड्यातनं, मेहतरवाड्यातनं
महारवाड्यातनं, चांभारवाड्यातनं शेतकारखान्यातनं
तोरणं गुंफली जातील नव्या देशाच्या वेशीसाठी
आणि व्हायलन्सचं झाड देशाच्या आयुष्यात 
कल्पतरूची भूमिका बजावेल
बजावेल.

ओकांची झाड कविता सुरू होते अशी : 
झाड 
हे झाड नसतं
एक जंगल
अवघं साम्राज्य
हिरवी अभेद्य गढी
पानबंदी चहुवार

                    परतवत सूर्य
                    नमवत वारा
आणि संपते अशी :
झाड बेफिकीरपणे लुटवतं
सावली, असावध म्हशींवर 
गाई-बकऱ्यांवर

येणारे मोहोर दरवळते
वयात येणारी फळं डोलदार
गाणारे कोकिळ का कर्कटणारे कावळे
वाढणारे अंगावर वेल, फुलहीन वा ऋतुमती
या अवांतर घटनात संभवत नाही ते

ते असतं तेच मुळी निवांत म्हणून
जे असतं तेच मुळी एक आरोप घेऊन
या दोन झाडांबद्दल वाचकांनी आपापलं मत बनवावं. पेपरवेटसंबंधीची जी जुगलबंदी अपेक्षित होती ती इथे तितकी नाहीच. पण तरी..

तरीही असं खूप शोधता येऊ शकतं. त्या काळच्या परिसराशी या हालचालींचा संबंध, शब्दांचा संबंध, एकूण वातावरणातलं वारं, याचा परिणाम होत होत काय काय कसं घडत गेलं असेल? परबांनी ओक आणि ढसाळ यांच्यासोबतच्या त्यांच्या अनुभवांबद्दल लिहिलेलं आपण वाचलं आणि या अनुभवांमधून काही कविता कशा उभ्या राहिल्या तेही त्यात आलंय. यात सुटा कवी महत्त्वाचा आहेच, पण त्यासोबतीनं त्याच्या आसपासातल्या घडामोडी तेव्हा चळवळ म्हणता येईल अशा जोरकसपणे घडत होत्या असतील का? आणि या जोरकसपणात एकमेकांना आधारही मिळत असल्यामुळे पुन्हा जोरकसपणाला जोर मिळत असेल का? तपासायला हवं. इथे आपण वर काही उदाहरणं नोंदवली. तशी आणखीही देता येईल.

आणखी उदाहरणार्थ, मुंबईवर ढसाळांनी लिहिलेली कविता
मुंबई, मुंबई, माझ्या प्रिय रांडे
ये व माझा स्वीकार कर
सात घटकेचा मुहूर्त
आधीव्याधीनंतर
सर्वांगसुन्दर प्रतिमासृष्टी
अश्विनीरूप ऋतुस्नात कामातुर लक्ष्मी
सर्पस्वरूप विष्णू उर्ध्वरेत स्खलित
सूर्याचे अनुष्ठान
हे शेष सूर्याच्या चेहऱ्या
हे कामेच्छेच्या माते
हे अदिती
माझ्या प्रियेचा दगड
मला अधिकच प्रिय आहे
अशी सुरू होते. (कवितासंग्रह - खेळ. प्रास प्रकाशन. प्रकाशन - नाताळ १९८३)

तर, ओकांना मुंबईत गुदमरल्यासारखं वाटतं. म्हणून ते म्हणतात :
मी गुदमरतोय या मुंबईत
दारू पिऊन पावलं नीट पडतात
उघडा दरवाजे मोकळ्या खिडक्या
सुटी हवा द्या खुली मोकळी
- अशी सुरू होणारी त्यांची मुंबईवरची कविता
झुगारून दे बागुल संबंधांचे
या शरीराचं पान आत उघड कर
सगळी पदरीची लालूच वाऱ्याला दे.
- अशी संपते.

अनियतकालिकांशीच संबंधित आणखी एक कवी अरुण कोलटकर यांनी या मुंबईनं भिकेस लावलं हे एका कवितेतून नोंदवलं होतं, तेही इथे आठवू शकतं (अरुण कोलटकरच्या कविता, प्रास प्रकाशन, ऑगस्ट २००७). कोलटकरांना आपण यात जास्ती आणत नाहीयोत, कारण परबांच्या ज्या अनुभवाच्या सोबतीनं आपण ही नोंद करतोय त्या अनुभवात त्यांच्यासोबत ढसाळ आणि ओक होते. पण तरी-

तरी तरी खूप काही शोधता येईल. परत उदाहरणार्थ, ढसाळांच्या गोलपीठ्यात 'पाणी' नावाची एक कविता आहे. त्यात शेवटाकडे ते म्हणतात :
नदी राखते जन्मसिद्ध हक्क माण्सावरला
आम्ही जिथं जिथं पाय टाकू तिथं तिथं फुटतील उपाळ निवाळचंग पाण्याचं
आणि मग आमच्यासकट कुणीच राहणार नाही तहानेला
आणि भाजणार नाही हीर पाण्याचा
पाण्याला जातीय रंग देणारा तुमचा
एकुलता एक ईश्वर त्याला लागेल आफलातून बुळगा
न मग तुम्ही धोतराचे सोगे ओले ठेवण्यासाठी
मागाल भीक पाण्याची
आम्ही तुम्हाला पाण्याने भरलेले रांजण देऊ
हे छळकऱ्यांनो
पाण्यासारखं सुंदर कर्तव्य दुसरं कुठलंच नस्तं जगात
पाणीटंचाई आली तर
तुम्ही शर्टासारखी शहरं बदलता
मग सांगा पाण्यावाचून तडफडून मरणारांनी
काय बदलावं
(गोलपीठा, लोकवाङ्मय गृह, पाचवी आवृत्ती - जुलै २००८)

परबांचा बाजारात कदाचित उपलब्ध असलेला एकमेव कवितासंग्रह आहे - कुबडा नार्सिसस (लोकवाङ्मय गृह, पहिली आवृत्ती मे २००२). या कवितासंग्रहातल्या पहिल्या कवितेचं नाव आहे - 'पाणी : निळेभोर । काळे । सावळे ।'
मी तुम्हाला सांगतोय
ती सगळी पाण्याची हकिगत नाही
ही हकिगत आहे
पातळ्यांवर
जगणाऱ्या दुर्दम्य माणसांची
- असं परबांनी म्हटलंय. ही कविता पूर्ण वाचण्यासाठी वरती तिचं नाव दिलंय त्यावर क्लिक करा. ढसाळ ज्या पाण्याबद्दल बोलत होते त्या पाण्यात आणि परबांच्या कवितेतल्या पाण्यातही काही थेंब सारखे सापडतील.

मुळातला मुद्दा आपण काहीसा स्पष्ट करत आणला असावा अशी अपेक्षा आहे. चळवळ या शब्दाची प्रत्यक्षातली अंमलबजावणी घोषणांमधून किंवा व्यक्तिगत हेव्यादाव्यांमधून पण होत असावी. ती अगदी या अनियतकालिकांच्या घडामोडींमधेही झालेली सापडू शकेल. पण त्यापलीकडेही काही १९६०च्या दशकातल्या या शब्दांच्या वावरात सापडेल. तेही परबांच्या शब्दांत एकदा शेवटचं नोंदवूया, ते म्हणतात :
आम्हा तिघांच्यात तेव्हा कविता-लेखनाच्या बाबतीत निर्वैर स्पर्धा चाले. 'सुहास राखेचा आणि संगमरवराचा चेहरा' ही कविता नामदेवला खूप आवडली होती. आपल्या 'मंदाकिनी पाटील : मला अभिप्रेत असलेलं कोलाज'वर या कवितेचा प्रभाव असल्याचं त्यानं मान्य केलं होतं. अर्थात दोन्ही ठिकाणी रसायन वेगवेगळ्या प्रकारचं आहे.

एवढं सगळं सांगत बसणं म्हणजे आत्मप्रौढी केल्यासारखं होईल म्हणून आता आटोपतं घ्यायला हवं. पण चळवळीच्या संदर्भात अशा अनेक घटना घडत असतात आणि म्हणूनच तिला चळवळ म्हणतात.
नामदेव ढसाळ चळवळीचे कवी होते असं म्हणताना 'चळवळ' या शब्दाचे म्हटलं तर बारकेसारके पण कवितेच्या बाबतीत इंटरेस्टिंग ठरू शकणारे मुद्दे लक्षात ठेवावे वाटले तर ठेवता येतील. यात व्यक्तीच्या कामाचं महत्त्व कमी करण्याचा काही संबंध नाही, उलट व्यक्तीच्या आसपासाचा काही अंदाज त्यातून बांधावा वाटला म्हणून फक्त. आणि त्या आसपासामधून या व्यक्तींना काय सापडलं ते तपासावं वाटलं म्हणूनही. हा आसपास कसाही असू शकतो. ढसाळांच्या वेळी तो जसा होता तसा होता आणि आता जसा आहे तसा आहे. यात चळवळीचा मुद्दा आला तो प्रत्येक वेळी असायलाच हवा या आग्रहाने नाही, तर तो जेव्हा लागू होता तेव्हा त्याचा परिणाम कसा झाला याची नोंद करण्यासाठी आला.
***

जोड नोंद : १९६०च्या आसपास सुरू झालेल्या अनियतकालिकांच्या चळवळीबद्दल ढसाळांच्या निमित्ताने आपण काही मुद्दा नोंदवला, पण मुळात ती चळवळच नव्हती, असं मत या घडामोडींना जोर देणाऱ्या प्रमुख मंडळींपैकी एक अशोक शहाणे यांनी एकदा दिलेलं आहे. 'पण काही झालं तरी झाल्या प्रकाराला चळवळ म्हणणं काही बरोबर नाही', असं त्यांचं म्हणणं. आपल्या नोंदीतला मुद्दा तर या म्हणण्याच्या उलटा. आणि तो मुद्दा लागू करायचा झाला तर-

शहाण्यांच्या 'आजकालच्या मराठी वाङ्मयावर क्ष किरण' या १९६३ साली गाजलेल्या लेखाच्या घडणीत भालचंद्र नेमाडे यांचा हातभार आहे, हे शहाण्यांनीच त्यांच्या 'नपेक्षा' या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी २००५मध्ये उघड केलं होतं. आणि नेमाडे यांनी 'कोसला'बद्दल एकदा असं नोंदवलेलं : ही कादंबरी वाचून जर कुणाला वैताग आला तर आम्ही त्याची माफी मागूं. मात्र ही मोठ्यानं वाचावी. मनांतल्या मनांत वाचूं नये. चांगली वाटल्यास ज्यानं त्यानं अशोक शहाण्यांचे आभार मानावेत.

हे जे एकमेकांचे आधार आपापल्या घडामोडींना लागलेत ते मान्य केल्यावर या आधाराला कोणी चळवळ म्हटलं तर काय हरकत. भाषेशी जवळीक साधायची एक चांगली हातोटी या आधारांमधून प्रवाहात कशी आली हे उलट यात जास्तीचं स्पष्ट होईल.

हरकत घ्यायचीच तर यातल्या काही मंडळींच्या एका कंटाळवाण्या सवयीवर घेता येईल. आपलं काही चुकलं असेल असं उघडपणे मानायचं नाही, आपल्याला काही बाबतीत कमी माहिती असेल हे उघडपणे कबूल करायचं नाही आणि उघडीबाघडी शेरेबाजी करत राहायची ही (तशी नेहमीच वातावरणात असलेली पण या घडामोडींमुळे जास्त जोर मिळालेली) सवय या चळवळीतल्या अनेकांना होती. या सवयीची झाडं मात्र वर्तमानपत्रांपासून फेसबुकपर्यंत रुजलेली दिसतील. ज्या चळवळीच्यासंबंधीची ही नोंद आहे तिला काय वाट्टेल ते म्हटलं तरी एक वेळ चालेल, पण त्यात असलेली किंवा त्यात नसलेलीही एकेक म्हातारी झाडं कोलमडत असताना नवीन बरं-वाईट काय रुजलं किंवा रुजतंय हे तपासायला हवं. हे काम रेघेच्या क्षमतेबाहेरचं आहे, पण सक्षम लोकांना ते करता येईल.

३० डिसेंबर २०१३

थोडं थांबण्यापूर्वीची नोंद

१६ ऑक्टोबरला 'रेघे'वर नोंद केल्यानंतर दोन महिने कुठलीही नोंद केली नव्हती. ज्या नोंदीवर आपण थांबलेलो ती नोंद माध्यमांसंबंधी आर्थिक संदर्भात एखादा बिंदू नोंदवण्याच्या इच्छेने झालेली. त्यानंतर करण्यासारख्या काही नोंदी होत्या, पण काही कारणांमुळे त्या जमल्या नाहीत, मग पुन्हा २५ डिसेंबरला एक नोंद केली. आणि आता ही नोंद आज होतेय.

दरम्यानच्या दोन महिन्यांमधे आपल्याला वाचकांच्या काही प्रतिक्रिया प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मिळाल्या. कधी कौतुक आणि क्वचित व्यक्तिगत पातळीवरची निंदा, अशा स्वरूपातल्या प्रतिक्रिया. यातल्या पहिल्या प्रकारातल्या प्रतिक्रियांबद्दल आपल्याला काही प्रमाणात आश्चर्य वाटतं आणि दुसऱ्या प्रकारातल्या प्रतिक्रियांबद्दल काहीच आश्चर्य वाटण्यासारखं नाही. आश्चर्य वाटण्यासारख्या ज्या कौतुक प्रकारातल्या प्रतिक्रिया आहेत त्या ज्यांच्याकडून आल्या त्यामुळे आश्चर्य! म्हणजे इतिहासात संशोधन करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला 'रेघे'वर काय सापडत असेल किंवा साहित्याबद्दल काही संशोधन करणाऱ्या कुणाला इथे काय सापडत असेल, अशा शंका आपल्या मनात आहेत. अर्थात, काहीच न सापडता नुसता वाचून आनंद होत असेल अशीही शक्यता आहे. पण जे आहे ते ठीक आहे.

आणखी एका प्रकारातल्या वाचक-प्रतिक्रियांचीसुद्धा मुद्दाम दखल घ्यायला हवी ती पत्रकारांमधून आलेल्या. यातही काही वरिष्ठ पदावरच्या व्यक्ती आणि काही उप-संपादकीय काम करणाऱ्या व्यक्ती अशा ठिकाणांहून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रतिक्रिया 'रेघे'पर्यंत आल्या. हेही बरं. आणखी खोलातलं सांगायचं तर यातल्या उप-संपादकीय मंडळींच्या असण्यातून रेघेची सुरुवात झालेली आहे. ही सुरुवात तशी पाचेक वर्षांपूर्वी आणि आत्ता ह्या पत्त्यावर तीन वर्षांपूर्वी झाली. ह्या उप-संपादकीय पातळीवर काम करणाऱ्या उदास मंडळींसाठी रेघेचा काही उपयोग झाला असेल तर बरंय. उदास म्हणजे तशी चोवीस तास उदासी असेल असं नाही, पण एक ती सांगता न येण्यासारखी गोष्ट ही मंडळी आजच्या मराठी वर्तमानपत्रांमधे अनुभवतायंत. ते त्यांना तसं का होत असावं, याचे काही संदर्भ रेघेवरच्या नोंदींमधे सापडू शकतील. अर्थात, तरीही ती खूश असतात नि त्या उदासीन खुशीतच रेघेचं मूळ आहे. ह्यातल्या काही मंडळींना तरी रेघेमुळे काही बरं वाटलं असेल असं त्यांच्या प्रतिक्रियांवरून वाटतं आणि ते चांगलं झालं. 

हे मुद्दाम आज बोलण्याचं कारण काय? तर आपण वास्तविक ऑक्टोबरच्या नोंदीसोबत रेघेला थोडं थांबवणार होतो, पण नंतर एक नोंद करण्याची वेळ आली. आणि आता ही नोंदसुद्धा करण्याची वेळ आली म्हणून. वाचकांच्या प्रतिक्रियांची दखल घेण्याच्या इच्छेमुळे वेळ आली. आणि त्यासोबत गो. पु. देशपांड्यांची आठवण ठेवण्याचीही एक इच्छा जाता जाता लक्षात आली. नाटककार म्हणून मराठीत जास्त ओळख असलेल्या गो. पु. देशपांडे यांचं १६ ऑक्टोबरला निधन झालं. म्हणजे आपण ज्या दिवशी एक नोंद प्रसिद्ध केली त्याच दिवशी. त्यानंतर थोडा काही काळ नोंदींविना गेला नि आता पुन्हा थोडा काही काळ नोंदींविना जाणार आहे, त्यापूर्वी गो.पुं.ची आठवण ठेवू नि वाचकांनाही रेघेच्या थोड्या थांबण्याविषयी कळवू, या हेतूनं ही नोंद.

गो. पु. देशपांडे (२ ऑगस्ट १९३८ - १६ ऑक्टोबर २०१३)
[फोटो : 'नाटकी निबंध'च्या मलपृष्ठावरून]

गो. पु. देशपांडे यांचं रेघेच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं काम सांगायचं तर त्यांनी 'रहिमतपुरकरांची निबंधमाला' या मालिका शीर्षकाखाली 'नाटकी निबंध' आणि 'चर्चक निबंध' अशी दोन पुस्तकं उभी केली. गो.पु. हे एक मिश्कील विद्वान होते, अशी त्यांची प्रतिमा या निबंधांमधून वाचकाच्या मनात आपसूक तयार होऊ शकते. हा मिश्किलपणा 'इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली'मधे प्रसिद्ध झालेल्या लिखाणात एवढा असा नव्हता, असं आपलं सर्वसामान्य वाचक म्हणून मत आहे. पण त्यांच्या मराठी निबंधांमधे मात्र तो मुबलक सापडतो आणि प्रत्यक्ष त्यांच्यासोबत काळ घालवलेले लोक त्यांच्याबद्दल नंतर जे बोलले त्यावरून प्रत्यक्ष त्यांच्या व्यक्तिमत्त्वातही तो मुबलक सापडत असावा.

'चर्चक निबंधां'मधे एका ठिकाणी गो.पु. मराठी साहित्याबद्दल एक ढोबळ निरीक्षण मांडतात ते असंय पाहा :
आजचे लोकप्रिय मराठी साहित्य 'लोकप्रिय' चित्रपटापेक्षा फारसे निराळे नाही. लोकांना वाचून वाचून (पाहून पाहून) काही संकेतांची, मांडणीची काही तऱ्हांची सवय झालेली असते. त्यात अगदी सामान्य आशय व्यवस्थितपणे बसविता येण्याचे तंत्र माहिती असले तर 'लोकप्रिय' होणे फारसे अवघड नाही. मर्ढेकरांनी लय तोंडवळणी पडली आणि शब्दावर थोडी हुकमत असली की कविता लिहिणे फार अवघड नसते असे म्हणून या प्रक्रियेचे साररूप वर्णन केलेच आहे.

त्याच्या जोडीला उच्चर्गीय-उच्चवर्णीय भावभावना दुखावतील असे काही लिहू नये, शक्यतो त्यांच्या भावभावना, त्यांचे पूर्वग्रह जोपासतील असेच लिहावे हा मराठी साहित्याचा एक नियम होऊन बसला आहे. काही वैचारिक लिहायचे असेल तर गांधी थोर, मार्क्स थोर, सावरकर थोर, गोळवलकर थोर, राष्ट्र सेवादलही थोर, अशी सबगोलंकार उदारमतवादी-मानवतावादी या सर्वसाधारण शीर्षकाखाली येऊ शकेल अशी भूमिका घेतली की काम झाले. हे करणारा थोर चिंतक, विचारवंत अशी आजकाल चलती आहे.

त्याचा परिणाम नाही म्हटले तरी सार्वजनिक अभिरूचीवर होतोच. हिंदी चित्रपटाला इतके जण नावे ठेवतात म्हणून हिंदी चित्रपट बघणे कोणी सोडून देते का? ते शक्य नसते. विशुद्ध कलावादी विचारवंताला पटणार नाही इतकी कलेची आणि (दुर्दैवाने) अपकलेची ताकद असते. त्यामुळे माल विकला जातो. त्यात कमी अधिक कस असतो यात शंका नाहीय. पण 'लोकप्रिय' लेखनाचा सध्या माल (कमॉडिटी) झालेला आहे. त्याला इलाज नाही. मी त्याच्याविरुद्ध तक्रार करीत नाही. परंतु बाजारावर आधारलेल्या या समाजात ते अटळ आहे एवढेच मी म्हणतो आहे.

त्यामुळेही कदाचित् ही मरगळ जात नसावी. या सांस्कृतिकदृष्ट्या मंद, बाजारी पण उच्चभ्रू समाजाला एखादी कॅसेट लावून ऐकण्याव्यतिरिक्त साहित्यादी गोष्टीत रस राहिलेला नाही.
यावरून गो.पुं.च्या म्हणण्याचा आणि एकूणच आपण ही नोंद का करतोय याचा काहीसा अंदाज यावा. प्रसारमाध्यमांबद्दल आपण मर्यादित क्षमतेच्या का होईना पण ज्या नोंदी रेघेवर करू पाहत आलोय, त्याचा संबंध वरच्या परिच्छेदाशी आहेच आहे. गो.पुं.चे या पुस्तकांमधले निबंध काहीसे खेळकर पद्धतीचेही वाटू शकतील कोणाला, आणि त्यामुळे मतभेदालाही जागा राहते. पण ती कुठे नसते? आणि ती असते हे बरंच एका अर्थी, नायतर मतभेदालाही जागा नसणं म्हणजे डेंजर अवस्था!
संध्याकाळी 'वॉश' घेऊन 'फ्रेश' झाल्यानंतर 'कॉर्नर'वरच्या एका 'जॉईन्ट'वर 'तंदूरी' खायची त्याच्याआधी जरा 'ड्रिंक्स' घेऊ. नंतर एखादं हिंदी 'पिक्चर' आणि रात्री झोपण्यापूर्वी भीमसेन जोशींच्या 'अभंगवाणी'ची 'कॅसेट' ऐकू! सध्या लोकांच्या कलेविषयी वेगळ्या अपेक्षा नसतात. वेळ जात नाही मग कळले तर थोडे साहित्य. पु.ल. वाचू किंवा सोप्पं म्हणजे ऐकू! म्हणजे हे 'सपर' नंतर 'बेड टाईम'पर्यंतचे 'लाँगएज' जरा सुसह्य होईल.
असं गो.पुं.नी लिहिलं त्याला झाली आता बरीच वर्षं. शिवाय हे एक ठराविक आर्थिक वर्गापुरतंच निरीक्षण म्हणता येईल, पण उर्वरित जनतेच्या बाबतीत कदाचित यातले काहीच तपशील बदलतील. आणि वरचं निरीक्षण लिहिलं गेलं तेव्हा आजच्यासारख्या विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरती इतक्या अशा मराठी मालिकांच्या मालिकांवर मालिकाही सुरू नव्हत्या. तरीही आपण हे इथे रेघेवर कायतरी बडबडत बसलो. काय म्हणायचं ह्याला!

२५ डिसेंबर २०१३

'अन्वीक्षण' त्रैमासिकाच्या निमित्ताने नोंद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल १८९१ - ६ डिसेंबर १९५६) यांनी मनुस्मृतीची प्रत जाळली ती तारीख होती २५ डिसेंबर १९२७. आजही २५ डिसेंबर आहे, आणि त्यानिमित्ताने ही नोंद 'रेघे'वर होते आहे. नोंद फक्त ओळखीच्या पातळीवरची आहे आणि रेघेपर्यंत स्वतःहून आलेल्या एका त्रैमासिकाबद्दल ती असली तरी त्यांनी पाठवलं म्हणून आपण ओळख करून दिली एवढाच नोंदीमागचा हेतू नाही. तरीही, माध्यमांशी संबंधित ह्या वेगळ्या प्रवाहातल्या घडामोडी रेघेच्या वाटचालीत स्वतःहून तिच्यापर्यंत येतायंत, त्याअर्थी आपलं बरं चाललं असावं. ही नोंद 'अन्वीक्षण' या त्रैमासिकाच्या अलीकडे प्रसिद्ध झालेल्या एका विशेषांकाबद्दल आहे. 'जातीचे मानसशास्त्र आणि जात्यंताचा प्रश्न' याभोवती गुंफलेला हा अंक आहे. मुळात अंक 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेषांक' म्हणून एप्रिल ते जून २०१३ या तीन महिन्यांसाठीचा आहे, पण प्रसिद्ध व्हायला उशीर झाल्यामुळे बहुतेक तो आपल्यापर्यंतही उशिरा पोचला असावा.

अंकाचा विषय सांगितल्यानंतर त्याबद्दल रेघेवर नोंद का व्हावी हेही स्पष्ट करता येईल. जात आणि माध्यमं यासंबंधी आपण रेघेवर फार काही बोलू शकलेलो नाही, याचा उल्लेख पूर्वीही आलेला आहे. आणि हे होऊ न शकण्यामागे आपली मर्यादा एवढंच मुख्य कारण आहे. ही मर्यादा अजूनही कायम आहे, पण तरी या विषयाशी संबंधित काम करणाऱ्यांची ओळख करून देणं तरी आपल्याला शक्य आहे. आणि तसं करणं आपल्याला आवश्यक वाटतं.

मुळात हा विषय आताच्या काळात फार महत्त्वाचाच नाही, आताच्या पिढीतले बहुतेक लोक असलं काही मानतच नाही, अशा आशयाचा मजकूर वर्तमानपत्रांमधील सदरांमधून किंवा कदाचित 'फेसबुक'वरूनही आपल्या पाहण्यात आला असू शकेल. उदाहरणार्थ, प्रसिद्ध मराठी लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक असलेले सचिन कुंडलकर यांनी काही काळापूर्वी त्यांच्या एका सदरात असं लिहिलेलं : 'नशिबाने मला आणि माझ्या पिढीच्या अनेक भारतीय तरुणांना आडनावावरून जात ओळखता येत नाही.' 'आजच्या काळातही आपण जातींच्या आधारावर आपापले गट पाडणार असू तर ज्या इतिहासामुळं आपण ते करतो आहोत, त्या इतिहासाची पर्वा न करणं, त्याकडं दुर्लक्ष करणं, हेच आपल्या हिताचं आहे. हे म्हणजे 'रिअर व्ह्यू मिरर'मध्ये बघून कार चालवण्यासारखं आहे.' (लेखाचं शीर्षक- 'इथे कुणाला हवेत पुतळे?', सदराचं नाव- 'अलिखित', प्रसिद्धी - 'सकाळ'ची रविवार पुरवणी 'सप्तरंग' १६ जानेवारी २०११.)

पण प्रत्यक्षात जातवास्तव हा आपल्या एकूण वास्तवाचा किती प्रमाणात भाग आहे, याची जाणीव ठेवणं आवश्यक आहे. नायतर नेणीव आहेच, असं कोणतरी म्हणेल. ही जाणीव ठेवण्याची आवश्यकता विलास सारंगांनी त्यांच्या 'मॅनहोलमधला माणूस : मराठी वाङ्मय, समाज व जातिवास्तव' (मौज प्रकाशन) या पुस्तकात अशी सांगितलेय :
लेखकाला विविध प्रकारच्या वास्तवाला सामोरं जावं लागतं. काही प्रकारचं वास्तव लेखकाला नकोसं वाटलं, त्याचं समूळ उच्चाटण झालं असतं तर किती बरं झालं असतं असं वाटलं, तरी मानवी वास्तव- सार्त्र आपल्याला आठवण करून देतो त्याप्रमाणे- आपल्या स्थानाचा स्वीकार करायला बांधील असतं. त्या एका गोष्टीवर आपल्या मानवी वास्तवाचं काहीच नियंत्रण नसतं.
म्हणूनच कदाचित काही अप्रिय वास्तवाला टाळणारा लेखक झुकत्या वयांत त्या वास्तवाची अधिकृत दखल घ्यायला राजी होतो. तो प्रामाणिक, अवधानी लेखक असेल, तर त्याने अशा वास्तवाला आपल्या सर्जनशील लेखनात कुठेतरी स्थान दिलेलं असतंच. पण आता जरा पुढे जाऊन तो या वास्तवाची बुद्धिनिष्ठ रीतीने चिकित्सा करायला तयार होतो. वय होण्याचं एक बरं असतं; बऱ्याचशा गोष्टी अशा भासू लागतात, की आपला त्यांच्याशी काही आता विशेष संबंध नाही; त्यांच्याशी आपलं काही प्राणांतिक सोयरसुतक नाही. 'आपलं स्थान' म्हणून कित्येक वर्षं- बहुतांश जीवनभर- ज्याचा आपण विचार करत असतो, ते स्थान 'आपलं' फार काळ राहण्याची शक्यता नसली, तर आपण आपोआपच त्याकडे परकेपणाने पाहू लागतो.
टाळता आलं असतं तर बरं असं वाटण्याजोगं वास्तव म्हणजे जातिवास्तव.
सारंगांच्या ज्या पुस्तकातला उतारा आपण वर दिला त्या पुस्तकात सारंगांनी जातवास्तवाच्या संदर्भात लेखकपणाचे व्यक्तिगत अनुभव आणि मराठी साहित्यव्यवहाराबद्दलची त्यांची यासंबंधीची चिकित्सा असा मेळ घालण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. पण हा विषय एवढा आणि इतका गुंतागुंतीचा आहे की याबद्दल कोणताही एक माणूस काही परिपूर्ण बोलू शकेल असं एक सर्वसामान्य वाचक म्हणून आपल्याला वाटत नाही. पण म्हणून हे वास्तवच नाकारण्यात काहीच अर्थ नाही. मग त्या वास्तवाचा अर्थ लावायचा कसा?

अन्वीक्षण (वर्ष : ३, अंक : ४), एप्रिल ते जून २०१३
[मूळ मुखपृष्ठाचे छायाचित्र इथे तांत्रिक अडचणीमुळे खराब]
ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात 'अन्वीक्षण'चा ताजा अंक उपयोगी पडू शकतो. सेंट अँड्र्यूज विद्यापीठातल्या (स्कॉटलंड) 'स्कूल ऑफ सायकॉलॉजी अँड न्यूरोसायन्स'मधे पीएच.डी. संशोधन करत असलेले यशपाल जोगदंड या अंकाचे अतिथी संपादक आहेत. आणि अंकामधे डॉ. रावसाहेब कसबे (जातिअंत आणि जातीच्या मानसशास्त्राची शक्यता), कॉम्रेड शरद् पाटील (जात्यन्ताची दिग्नागीय 'स्व-लक्षणी' समाजक्रांती), डॉ. आनंद तेलतुंबडे (जातीच्या सातत्यामागचे मानसशास्त्रीय घटक), गौतमीपुत्र कांबळे (जातीचे मानसशास्त्र आणि जातिनिर्मूलनाचा प्रश्न), ललित जोशी (हिंदी सिनेमातील दलित प्रतिमा : नवी सामाजिक जाणीव हवी), विलास पाध्ये (जातिविषयक मनोबिंब व बोधात्मक संसाधनांचा अभाव), डॉ. राजू जाधव (आशिस नंदी, भ्रष्टाचाराची जात आणि दलित सेन्सरशिप), शमशुद्दीन तांबोळी (भारतीय मुसलमानांतील जातिव्यवस्था), राजू अडागळे (जातिअंतातील अडथळे : ग्रामीण महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील अनुभव), भीमराव हटकर (अनुसूचित जाती ह्या मूळच्या 'बौद्ध' : एक इतिहाससिद्ध सत्य), पांडुरंग भोये (भारतीय स्वातंत्र लढ्यातील आदिवासी स्वातंत्र्यवीर जननायक तंट्या भिल्ल), दत्ता भगत (बिसापाच्या गोष्टी) असे एकूण बारा लेख आहेत. यातल्या लेखांचे तपशील कंसांमधल्या शीर्षकांमधून कळतायंत त्या पलीकडे देणं या नोंदीच्या मर्यादेत शक्य नाही.

या अंकामधल्या आपल्या अतिथी संपादकीयामध्ये जोगदंडांनी 'अन्वीक्षण'च्या या अंकाची एक मर्यादा सांगितलेय ती अशी :
... या विशेषांकातील सर्व लेखांच्या गुणवत्तेची खात्री असतानाही जातीच्या मानसशास्त्रासंबंधी वाचकांच्या मनातील प्रश्नांना कितपत उत्तरे मिळतील याबद्दल मी साशंक आहे. या ठिकाणी मला थॉमस पिंचोन (Thomas Pynchon) या कादंबरीकाराचे एक वाक्य आठवते आहे जे कदाचित शोषक त्यांच्या हातातील शोषितांच्या मनाचे प्रभावी हत्यार कसे वापरतात हेही दर्शविते. थॉमस पिंचोन म्हणतात, 'If they can get you asking wrong questions, they don't have to worry about the answers.' अर्थात, जर तुम्हाला त्यांनी चुकीचे प्रश्न विचारायला लावले तर त्यांना उत्तरांची चिंता करावी लागत नाही. शोषकांनी जर शोषितांना चुकीचे प्रश्न विचारायला लावले तर शोषितांना उत्तरे अचूक मिळूनही काय उपयोग आहे? कारण सर्व प्रश्नच चुकीचे होते. उत्तरांची आम्ही काही हमी देत नाहीयोत हे कदाचित चांगले आहे. कारण उत्तरापेक्षा आपण प्रश्न कोणता विचारता हे अधिक अर्थपूर्ण आहे. दलित-शोषित समाजाने प्रश्न विचारूच नयेत अशीच आजवर तजवीज केली गेली आहे, असे आम्हाला वाटते. या पानाच्या पल्याड वाचकांना सुटसुटीत उत्तरे कदाचित मिळणार नाहीत पण एक नवीन दिशा आणि नवोन्मेषी प्रश्न विचारणारी प्रज्ञा जरूर भेटेल याची आम्हाला खात्री आहे.
रेघेवर या अंकाच्या निमित्ताने 'अन्वीक्षणा'बद्दल नोंद करण्याचं हेही एक कारण आहे. आपण रेघेवरच्या नोंदींमधे अनेकदा उत्तरापेक्षा प्रश्न जरा नीट लिहायचा प्रयत्न केलाय. पण एखाद्या प्रश्नाच्या वेगवेगळ्या मांडण्या समजून घेण्यासाठी आपल्यासारख्या सर्वसामान्य मराठी वाचकांना उपलब्ध असलेले नियतकालिक स्वरूपातले मार्ग दिवसेंदिवस कमी होत जातील, असं दिसतंय. आणि म्हणून आपण 'अन्वीक्षण' या त्रैमासिकाबद्दल ही नोंद केली. (अन्वीक्षण : अनुवेख म्हणजे अन्वीक्षण हा शब्द अशोकाच्या शिलालेखात वारंवार आढळतो. ईश म्हणजे पहाणे. त्याला अनु हे विशेषण जोडून 'अन्वीक्षण' हा शब्द बनला आहे. हे दोन्ही अर्थ एकत्र केले तर अन्वीक्षणचा अर्थ होतो- पहाणे, जाणणे, गहन, आत्मपरिक्षण, चिंतन, पुनर्विचार, अर्थ व कारणांचा विचार, परीक्षा करणे किंवा तपासून पहाणे आणि शेवटी सहमती. --- अंकाच्या मलपृष्ठावरून)

जाता जाता एक सांगण्यासारखं म्हणजे, आता समजा आपल्याला प्रश्न पडलाच की डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं, त्यासंबंधीच्या वेगवेगळ्या बाजू कोणत्या? तर ह्यावर वाचण्यासारखं एक पुस्तक म्हणून आपल्याला कोणीतरी सांगेल की, नरहर कुरुंदरकरांनी लिहिलंय ना, 'मनुस्मृती : काही विचार' (लोकवाङ्मय गृह, १९८३) असं पुस्तक. पण मग आपल्याला असंही कळेल की, हे पुस्तक आता बाजारात उपलब्ध नाही. मग आपल्याला कोणी असं सांगेल की, मग त्यासंबंधी शरद् पाटलांनी लिहिलंय ना परीक्षण स्वरूपात, कुठे लिहिलंय बरं.. 'सत्यशोधक मार्क्सवादी'च्या अंकात असेल कुठेतरी (कुरुंदकरांची स्मृती व मनुस्मृती : सत्यशोधक मार्क्सवादी, जुलै-ऑगस्ट १९८३). पण हा अंकही आपल्याला सहजी उपलब्ध होऊ शकणार नाही. मग कोणीतरी सांगेल की, अरे पण पुणे विद्यापीठाशी संलग्न असा कायतरी दस्तावेजीकरणाचा उपक्रम आहे, त्यात सापडेल तुम्हाला या अंकाची पीडीएफ प्रत. मग तसं शोधलं कोणी तर कळेल की ह्या दस्तावेजीकरणात अजून पाटलांच्या अंकांचं दस्तावेजीकरण झालेलं नाही. तरी एक सापडेल ते म्हणजे याच विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागातर्फे काढल्या जाणाऱ्या 'परामर्श' ह्या त्रैमासिकाच्या १९८३ सालच्या एका अंकात कुरुंदकरांच्या पुस्तकाचं परीक्षण आलेलं आहे. मग त्यावर आपण समाधान मानू. किंवा असेल हिंमत तर उदास, भकास मराठी ग्रंथालयांच्या कपाटांमधे शोधाशोध करू.

अशा ह्या मराठीतल्या चर्चापीठांच्या कमी होत जाण्याच्या काळाचीही नोंद ह्या निमित्ताने झाली. जाता जाता एक प्रश्न : छापील नियतकालिकांच्या रूपातल्या चर्चापीठांची मराठीतली कमतरता काही मराठी संकेतस्थळांमधून वेगळ्या प्रकारे भरून निघू शकेल का?
एक उत्तर : शक्यता आहे.
***

अन्वीक्षण : कार्यालयीन पत्ता-
द्वारा - सी. पी. थोरात, सं. नं. ७४अ, प्लॉट नं. १३, कॉलनी नं. ४, श्रावस्तीनगर, घोरपडी, पुणे - ४११ ००१.
फोन : ०२० - २६८१४३५३

१६ ऑक्टोबर २०१३

इच्छा आहे, पण पैसा नाही!

वरच्या वाक्याशी आपला, 'रेघे'चा काहीही थेट संबंध नाही. संबंध आहे तो इंग्लंडच्या 'द गार्डियन' ह्या वृत्तपत्राचा आणि त्या वृत्तपत्रासंबंधी अमेरिकेतल्या 'द न्यूयॉर्कर' या साप्ताहिकामधे छापून आलेल्या लेखाचा. लेख येऊन आठवडा उलटून गेलाय आणि आपल्याला नोंद करायला उशीर होतोय. इच्छा होती, पण राहिलं!

या लेखाचं शीर्षक आहे, 'फ्रिडम ऑफ इन्फर्मेशन'. केन औलेटा यांनी लिहिलेला हा सुमारे सव्वाआठ हजार शब्दांचा लेख. 'विकिलिक्स'ने अमेरिकी दूतावासांच्या तारांचा मजकूर चव्हाट्यावर आणला तेव्हा, अलीकडे एडवर्ड स्नोडेन याने अमेरिकेच्या टेहळणी कार्यक्रमाला प्रकाशात आणलं तेव्हा 'द गार्डियन' या ब्रिटीश वृत्तपत्राला कसकसा विविध दबावांचा सामना करावा लागला, याचे संदर्भ या लेखात येतात. आणि मुख्य म्हणजे सनसनाटी नसलेल्याही कित्येक छोट्यामोठ्या गोष्टींमध्ये मोलाची पत्रकारी भूमिका निभावणाऱ्या 'गार्डियन'ची आर्थिक ताकद कशी कमीकमी होत चाललेय आणि तरीही जमेल तशी ही ताकद टिकवत आपल्याला रुचणारी पत्रकारिता करण्याचा 'गार्डियन'चा प्रयत्न कसा सुरू आहे, याचं एक चित्र स्पष्ट करण्याचा प्रयत्न या लेखात आहे. 'गार्डियन'चा इतिहास १८२१पासून सुरू होतो. यात सी. पी. स्कॉट यांनी १८७२ला हे वृत्तपत्र विकत घेतलं नि संपादक व नंतर मालक म्हणून अर्धशतकाहून जास्तीच्या कारकिर्दीत ते घडवलं, हा या इतिहासातला एक मोठा टप्पा. त्यानंतर १९३६ साली सी. पी. स्कॉट यांच्या मुलाच्या पुढाकाराने वृत्तपत्र 'स्कॉट ट्रस्ट'कडून चालवलं जाऊ लागलं. यातला एक अगदी अलीकडचा आपल्या नोंदीच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा म्हणजे अॅलन रसब्रिजर हे १९९५साली 'गार्डियन'चे संपादक झाले.

या वृत्तपत्राबद्दलची एक महत्त्वाची माहिती वर उल्लेख केलेल्या लेखात आपल्याला मिळते. 'स्वतंत्र' आणि 'पुरोगामी' वृत्ती जोपासणाऱ्या या वृत्तपत्राची आर्थिक काळजी घेणारा 'स्कॉट ट्रस्ट' गेली नऊ वर्षं फक्त तोटा सहन करत आलाय. गेल्या आर्थिक वर्षामध्ये 'गार्डियन'च्या व्यवहारामध्ये ट्रस्टला तीन कोटी दहा लाख पौंड इतका तोटा झाला. अर्थात, त्याही आधीच्या आर्थिक वर्षात चार कोटी चाळीस लाख पौंडांचा तोटा झाला होता! या सगळ्या आर्थिक खड्ड्यात जाण्याच्या मार्गावर असलेल्या ट्रस्टच्या संचालकांनी म्हणूनच 'गार्डियन मीडिया ग्रुप'च्या कानात धोक्याची घंटा वाजवलेली आहे. वृत्तपत्राच्या व्यवहारांमधून होणारा तोटा अतिशय मोठ्या प्रमाणात खाली आणता आला नाही, तर तीन ते पाच वर्षांमध्ये ट्रस्टकडचा निधी संपून जाईल, असं या घंटेच्या आवाजाचं म्हणणं आहे.

या सगळ्या आर्थिक दुर्बलतेच्या पार्श्वभूमीवर अजूनही रसब्रिजर 'गार्डियन'च्या संपादकीय नावेची सूत्रं हातात घेऊन आहेत. रसब्रिजर यांनी संपादक झाल्यापासून 'गार्डियन'च्या रूपामध्ये सगळी पानं रंगीत करण्यापासून आकारापर्यंत काही बदल केले, हे तर झालंच, पण आपल्या दृष्टीने नोंदवण्यासारखी गोष्ट म्हणजे, १९९४साली रसब्रिजर सिलिकॉन व्हॅलीत सजग फेरफटका मारून आले नि त्यानंतर आपल्या वरिष्ठांना कळवते झाले की : येता काळ इंटरनेटचा असणार आहे.

त्यानंतर 'गार्डियन'ने आपल्या संकेतस्थळाकडे अधिक जोमाने लक्ष द्यायला सुरुवात केली. मग अमेरिकेसाठी वेगळी इंटरनेटीय आवृत्ती काढली, नंतर अलीकडे ऑस्ट्रेलियासाठीही तशी आवृत्ती काढली आणि आता भारतासह आणखी पाचेक देशांना वाहिलेल्या अशा आवृत्त्या काढण्याची तयारी सुरू आहे, हा सगळाच तपशील 'न्यूयॉर्कर'मधल्या लेखात आहे. आणि यातही नोंदवायला हवं ते हे की, 'गार्डियन' हा सगळाच मजकूर फुकट देऊ करतंय आणि ते तसंच राहावं अशी रसब्रिजर यांची इच्छा आहे.

आता हे सगळं असं सुरू राहण्यासाठी सध्या होत असलेला आर्थिक तोटा कमी करावा लागेल. याचा एक उपाय म्हणून नोकरीवरची माणसं कमी करावी लागतील, पगार कमी करावा लागेल, इत्यादी. हे पगार कमी करण्याचं काम रसब्रिजर यांनी स्वतःपासूनच सुरू केलं. गेल्या आर्थिक वर्षासाठी त्यांनी ४ लाख ३८ हजार पौंडांच्याऐवजी ३ लाख ९५ हजार पौंड एवढाच पगार घेतला!

असा तोटा कमी करत आणणं आणि त्यासोबत इंटरनेटवरच्या वावरातून आर्थिक कमाई वाढवणं आणि मुळात 'गार्डियन'ला ज्या पद्धतीची पत्रकारिता करायची आहे, ती आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढवत नेण्यासाठी इंटरनेटचा वापर करणं, त्याला अधिकाधिक लोकाश्रय मिळण्यासाठी प्रयत्न करणं - असा फारच मोठा पल्ला गाठायचा या लोकांचा इरादा आहे.

वृत्तपत्राला लोकाश्रय शोधण्यासोबत वाचकांना आता वृत्तपत्रात अधिकाधिक सामावून घ्यायला हवंय, हे ओळखत रसब्रिजर तसाही प्रयत्न करतायंत, असं लेखात म्हटलंय. 'बरं - वाईट जे काही असेल त्यासकट आता पत्रकारितेतलं हौशीपण वाढत जाणारच. त्यामुळे 'खुली पत्रकरिता' हा भविष्यातला मार्ग असेल. म्हणजे वृत्तपत्र वाचणं शुल्कमुक्त असेल एवढंच नव्हे तर वाचकांना पत्रकारितेमध्ये समाविष्ट करून घेणंही त्यात येईल. कारण वाचकांचा पत्रकारितेतला जास्त सहभाग म्हणजे वाचक/प्रेक्षक यांच्या संख्येत वाढ, म्हणजे जाहिरातींमधून होणारी कमाई जास्त', असा एकूण या मुद्द्याचा आशय आहे. यासंदर्भात रसब्रिजर यांनी एक उदाहरणही दिलंय, ते असं : गेल्या ऑलम्पिक स्पर्धांच्या वेळी, चिनी जलतरणपटूंच्या चमूचा प्रशिक्षक म्हणून काम केलेल्या मूळच्या ब्रिटीश माणसाने 'गार्डियन'च्या संकेतस्थळावर एक निनावी प्रतिक्रिया दिली. आपल्या क्रीडापटूंवर मोकळ्याढाकळ्या पद्धतीने खर्च करणाऱ्या चीनसारख्या देशात काम करण्यातला आनंद या प्रतिक्रियेत त्यानं नोंदवला होता. ती प्रतिक्रिया वाचल्यानंतर संपादकांनी त्या प्रशिक्षकाला 'गार्डियन'च्या संकेतस्थळासाठी 'ब्लॉग-पोस्ट' लिहायला आमंत्रित केलं.

वाचकांचा हा आश्रय आणि त्यांना सामावून घेण्याचे प्रयत्न, हे सगळं काळाला सुसंगत पत्रकारिता करण्यासाठी रसब्रिजर यांना आवश्यक वाटतंय. आणि त्यापेक्षा आवश्यक म्हणजे 'गार्डियन' ज्या प्रकारच्या शोध-पत्रकारितेवर विश्वास ठेवतं, ती आतापर्यंत होत आलेय त्या स्वतंत्रपणे पुढेही होत राहावी, तिचा अवकाश वाढावा यासाठी गरजेची आर्थिक पाठराखण म्हणून हे प्रयत्न गरजेचे आहेत, असा या लेखातला आपल्याला नोंदवण्यासारखा वाटलेला मुद्दा आहे. अर्थात, रसब्रिजर म्हणालेतच की, 'आम्हाला जी पत्रकारिता करायचेय, त्यासाठी पूरक आर्थिक प्रारूप असू शकतं का? यासाठीचे प्रयत्न आम्ही सगळे करतोय. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर आमच्यापैकी कोणालाच या प्रश्नाचं उत्तर मिळालंय असं म्हणता येणार नाही.'

अॅलन रसब्रिजर (फोटो : न्यू स्टेट्समन)

वाचकांना सामावून घ्यायला हवंय, हा मुद्दा तसा काही नवा नाही. बाकी वाचकांना सामावून घेण्याची पद्धत कशी ठेवली जातेय, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असाव्यात. अन्यथा, तरुणांसाठीच्या पुरवणीत 'ग्रुप फोटो' छापणं, किंवा मॉडेलिंगोत्सुक युवक-युवतींची सोय म्हणून त्यांचे सुटे फोटो प्रसिद्ध करणं, किंवा केवळ मनोरंजक प्रतिक्रियांसाठी प्रसिद्ध होणारा मजकूर छापणारी मोकाटपीठासारखी सदरं चालवत ठेवणं - हे वृत्तपत्रांमधले रोचक प्रकार आपण पाहतो आहोतच.

बाकी, 'गार्डियन'च्या दर दिवशी जेमतेम दोन लाख छापील प्रती निघतात आणि मराठीतल्या चांगल्या मजबूत अवस्थेतल्या चारेक वृत्तपत्रांचा तरी खप याच्या सरळ सरळ दुप्पट किंवा त्यापेक्षाही खूपच जास्त आहे. त्यामुळे ज्या प्रश्नाचं उत्तर रसब्रिजर शोधू पाहतायंत, तो प्रश्नच आपल्याकडे वृत्तपत्रांना आत्ता पडायचं कारण नाही, कारण 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकमत', इत्यादी मराठी वृत्तपत्रं गेल्या काही वर्षांत अधिक जोमाने जिल्हानिहाय छापील आवृत्त्या वाढवतायंत. शिवाय 'प्रहार', 'दिव्य मराठी'सारखी नवी वृत्तपत्रंही गेल्या काही वर्षांत सुरू झालीत. यात नव-साक्षर वर्गाची वाचनाची भूक भागवणं किंवा त्या भुकेचा फायदा घेणं यातला कुठलाही उद्देश असला, तरी वरच्या प्रश्नापासून फार काळ पळता येणार नाही. अर्थात, मराठी वृत्तपत्रं काही काळ यापासून पळू शकत असली, तरी मराठीतली साप्ताहिकं, पाक्षिकं, मासिकं यांचा वर्षानुवर्षं कमीच असलेला आणि आणखी कमीकमी होत चाललेला छापील वाचकवर्ग अऩुभवूनही त्यासंबंधीच्या लोकांना हा प्रश्न पडायला हरकत नाही. तो पडलेला नाही, असं एक निरीक्षण नोंदवूया. निरीक्षणाला पुरावा मागू नका, प्लीज. नाही पटलं, तर सोडून द्या. किंवा एक असं करा की, तुम्हाला जी मॅगझिनं दिसतात त्यांच्याशी संबंधित माणसांशी बोलून पाहा. नियम सिद्ध करण्यापुरते अपवाद सापडतील.

आपल्याला रुचणारी त्या प्रकारची पत्रकारिता टिकवणं आणि ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्यासाठी इंटरनेटचा वापर करणं, यासंबंधीचा हा प्रश्न जसाच्या तसा आपल्याला पडायला हवा असं नाही. कारण कोणी म्हणेल, अजून इंटरनेट आपल्याकडे तेवढं पोचलेलं नाही. पण बहुसंख्य मराठी मॅगझिनांचा वाचकवर्ग तसाही दोनपाच हजारांच्या पलीकडे जात नाही. मग अशा वाचकांचा किंवा मॅगझिनांचे वाचक होऊ शकतील अशा मराठी भाषकांचा इंटरनेटचा वापर कसा आहे, वयोगट काय आहे, याचं कोणीतरी सर्वेक्षण करायला पाहिजे. म्हणजे काही पत्ता लागू शकेल. आणि शिवाय, हाच प्रश्न वेगळ्या स्वरूपात पडायला काय हरकत आहे? म्हणजे छापील प्रकाशनाला पूरक म्हणून या नवीन गोष्टीचा वापर करता येईल का? (यात पूरक म्हणजे फक्त 'फेसबुक'चा वापर करायला हवा, असलं टाळा राव प्लीज. किंवा सगळ्यांत डेंजर म्हणजे इंटरनेट म्हणजे फेसबुक किंवा असलं कायतरी फुटकळ, असाही समज). पण अगदी मोजके अपवाद सोडता आपल्याकडे बहुतेक ठिकाणी हा प्रश्नच न पडल्यामुळे उत्तर शोधण्याचे प्रयत्नही नकोत. त्यामुळे मग जनता सुखाने नांदत आहे. कोणतरी म्हणालं, मराठीत पैसे नाहीत चायला लोक वर्गणी भरत नाही नि इंटरनेटचा कोण वापर करणार बोंबलायला! पैसा नाही म्हणून प्रश्न नाही?

विश्वाचा विस्तार केवढा ओ केशवसुत? (फोटो : रेघ)

***


उडाला तर कावळा
बुडाला तर बेडूक
    सदैव चघळावें
    हें व्यवहाराचें हाडूक
    अन् नाहींच जमला
    हा दोन दरडींचा डाव
    तर खुशाल काढावें दिवाळें
    नि व्हावें मोकळें
    फुंकून गांठचें किडूकमिडूक
कॉव्...कॉव्...
डराँव्...डराँव्...

- सदानंद रेगे (इकडे)

०४ ऑक्टोबर २०१३

खटपट-खटपट-खटपट । म. वा. धोंड जन्मशताब्दीनिमित्त नोंद

मधुकर वासुदेव धोंड
(४ ऑक्टोबर १९१४ - ५ डिसेंबर २००७)
[फोटो: 'सकाळ'च्या ग्रंथालयातून]
म. वा. धोंड यांचं जन्मशताब्दी वर्ष आजपासून सुरू होतंय. त्यानिमित्ताने त्यांच्या एका पुस्तकाबद्दलची ही नोंद. हे पुस्तक म्हणजे बा. सी. मर्ढेकरांच्या कवितांचा अर्थ शोधत शोधत धोंडांनी लिहिलेल्या लेखांच्या संग्रहाचं - तरीहि येतो वास फुलांना! हे पुस्तक तसं अनेकांना माहिती असलेलं आणि बाजारात मिळणारं, त्यामुळे आपण असं काय वेगळं नोंदवणार त्याबद्दल! पण असं काही नाही, आपण नोंदवतोय यातच आपल्यापुरतं त्याचं वेगळेपण असू शकतं. आणि हेही धोंडांकडूनच आपल्याला शिकायला मिळू शकतं. म्हणजे मर्ढेकरांच्या कवितांवर एवढं आत्तापर्यंत लिहिलं गेलंय तर आपण पुन्हा कशाला त्या कवितांचे आणखी अर्थ शोधत बसा, असा विचार न करता धोंडांनी जी अतिशय खटपट केली त्यातून या पुस्तकातले लेख तयार झालेले दिसतात. मुळात हे सगळं कशाला, याचं तसं साधं पण अनुत्तरित उत्तर धोंडांनीच या पुस्तकाच्या सुरुवातीच्या पानावर दिलंय, ते असं :
या आधी अनेकांनी मर्ढेकरांच्या कवितांवर भाष्ये केली
आणि आता मीही करीत आहे. -
तरीहि येतो वास फुलांना!
वास्तविक, कविता आपल्याला कळली नाही तर ती आपल्याकरता नाही, असं मर्ढेकरच सांगून गेले. पण हे वाचकांना सांगूनही धोंडांना काही ते जसंच्यातसं मान्य करवत नाही. ते त्यांच्या ताकदीनुसार पहिल्या भेटीत दुर्बोध वाटलेल्या कवितेचा वेध घेत जातातच. मग त्यासाठी मर्ढेकरांचं खाजगी आयुष्य, कविता जेव्हा लिहिली गेली असेल तेव्हाच्या काळातल्या घडामोडी असे संदर्भ तपासतात आणि कवितेचा अर्थ लावतात. हे करण्यामागचं त्यांचं म्हणणं असं आहे :
माणूस दुसऱ्याशीच नव्हेत, तर स्वतःशीच बोलतो तेव्हा त्याला काहीना काही संदर्भ असतोच असतो- अगदी ठार वेड्याच्या बडबडीलाही. भावकविता ही स्वयंभू, स्वतंत्र व स्वयंपूर्ण मानली, तरी ती संदर्भहीन कधीच नसते; असू शकत नाही. .. केवळ कवितेवरूनच तिचा संदर्भ कळणे अशक्य असते, तेव्हा तिचा परिसर धुंडावा लागतो आणि हा परिसर मर्यादित करण्यासाठी तिचा रचनाकाल लक्षात घ्यावा लागतो. .. कवितेचा रचनाकाल निश्चित केल्यावर कवितेचा संदर्भ तत्कालीन परिस्थितीशी असणार हे मानून ती जाणून घेता येते. ही परिस्थिती सार्वजनिक किंवा वैयक्तिक असू शकते. सार्वजनिक परिस्थिती समकालीनांना ठाऊक असतेच; उत्तरकालीनांना ती इतिहासादी ग्रंथांवरून जाणून घेता येते. वैयक्तिक परिस्थिती जाणून घेण्याचे एकमेव साधन म्हणजे कवीचे चरित्र.
कवितेचा अर्थ शोधण्यासंबंधीचं हे मत सरसकट पटण्यासारखं नसेलही. कारण मुळात कोण किती संदर्भ तपासत बसणार? (याचं एक उत्तर - असे संदर्भ तपासत बसता येत नसतील तर मग धोंडांचं पुस्तक वाचावं). आणि कवितेचा काळ आपल्या आवाक्यापलीकडचा कधीचा तरी असेल तर मग काय करायचं? आणि मुळातच लिहिण्याची प्रेरणा काळाचा आवाका ओलांडण्याची असेल, तर मग मुद्दाम सक्तीने काही अशा संदर्भांमध्ये संबंधित लेखनाचे अर्थ शोधावेत काय? या प्रश्नांची सरसकट उत्तरं असणं जरा अवघडच आहे, त्यापेक्षा व्यक्तिसापेक्ष मतंच असतील, आणि तेच बरं. म्हणजे तुम्हाला वाटलं की, असे अर्थ शोधून कविता जास्त कळू / आकळू शकते, आणि असे अर्थ शोधण्याएवढा वेळ, उत्साह व तसा शोधक कल तुमच्याकडे असेल तर तुम्ही तसा शोध घेऊ शकता. अर्थात, याचीही काही सक्ती करण्यात मजा नाही. शिवाय, कविता वाचताना नाही म्हटलं तरी ती कधी लिहिली गेली याचा साधारण अंदाज घेऊनच ती वाचली जातेच की. त्यामुळे तसा तिच्या लिहिलं जाण्याचा काही एक काळ आपण ठरवतोच, पण परत आपल्या काळातही तिचे काही अर्थ आपल्याला सापडतात, वगैरे गोष्टी होत जातात. 

कवितेचा अर्थ शोधण्याचा धोंडांचा मुख्य रस्ता एखादी कविता लिहिली जाताना कवीच्या खाजगी आयुष्यात आणि त्या काळात ज्या घडामोडी घडल्या त्यांच्या शोधामधून जातो. मर्ढेकरांच्या बाबतीत आपण या रस्त्याला का लागलो याचं त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण असं आहे :
मर्ढेकरांची कविता म्हणजे माझ्या लेखी त्यांची 'शिशिरागमा'नंतरची कविता. 'शिशिरागम' मी कधीच समरसून वाचला नाही; पुढे वाचवेल असेही वाटत नाही.

१९४३पासून मर्ढेकरांच्या कविता जसजशा प्रसिद्ध होत गेल्या, तसतशा वाचीत गेलो. काही सहज समजल्या, काही प्रयासाने उमगल्या, तर काही अखेरपर्यंत दुर्बोधच राहिल्या. त्या दुर्बोधतेने मला अस्वस्थ केले. मी मराठीचा प्राध्यापक असूनही मला त्या कळू नयेत, हे अपमानास्पद वाटले. त्याहून बलवत्तर कारण म्हणजे त्यांतील प्रतिमांनी मला खूळ लावले. परंतु, त्या काळी मनाला नाना छंद होते, एकाच फंदात गुंतून राहण्याची वृत्ती नव्हती. कालांतराने ही अस्वस्थता जुनाट होत होत प्रकृतीचाच भाग बनून गेली. दुर्बोधता हे मर्ढेकरांच्या कवितेचे व्यवच्छेदक लक्षण होऊन राहिले; त्यांची एखादी कविता सहज कळली, तर स्वतःला चिमटा घेऊ लागलो.

१९९२ साली डॉ. विजया राजाध्यक्ष यांचा 'मर्ढेकरांची कविता' हा द्विखंडात्मक प्रबंध हाती आला आणि चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी दुर्बोध वाटलेल्या कविता आता तरी उलगडतील, या आशेने तो वाचायला घेतला. परंतु, त्यांच्या भाष्याने दुर्बोध कविता उलगडण्याऐवजी अधिकच दुर्बोध झाल्या; एवढेच नव्हे तर पूर्वी सुबोध वाटलेल्या कविताही दुर्बोध होऊ लागल्या. मग टिपा, परिशिष्टे, इत्यादींकडे वळणे प्राप्त झाले. या कवितांवरीलच नव्हे, तर समग्र मर्ढेकरांवरील इतरांचे लेख वाचून काढले. कुणाचा कुणाशी मेळ बसत नव्हता आणि तरीही प्रत्येक आपल्या अभिप्रायावर ठाम होता. मीच करंटा निघालो. 'सारे धन्वंतरी प्राज्ञ । मीच रोगी' असा प्रत्यय येऊ लागला.

परंतु, मर्ढेकरांच्या पकडीतून इतक्या सहजी स्वतःची सुटकाही करून घेता येईना. वेळी-अवेळी त्यांच्या कवितांतील चरण आठवू लागले, त्यांतील प्रतिमा दिसू लागल्या. सकाळी नऊच्या सुमारास गाड्यांतून, स्कूटरवरून वा पायी लगबगीने पण उत्साहात कामावर निघालेली माणसे दिसू लागली की, निरुद्योगीपणे आपणच काय ते घरात बसून राहिलो आहोत याची जाणीव होऊन, 'गळ्यागळ्यांतुन सूर उसळतो । उरांच लटके लटके वाघुळ'; समोरच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पलीकडच्या इमारतीत गेलेली विजेची, टेलिफोनची वा केबलची तार मधल्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर दिसली की, 'आकाशांतिल अधोरेखितें'; दिवेलागणीच्या वेळी इमारतीखालून कुणी आई लेकराला साद घालून पुढे गेली की, 'हंबरून गाय गेली । वासराला', असा प्रतिमांनी छळ मांडला.

- आणि या छळवादातूनच तोवर दुर्बोध वाटलेल्या काही कविता अकल्पितपणे उलगडत गेल्या; संपूर्णपणे नव्हेत, तर काहीशा. संपूर्ण उलगडा होण्यासाठी बरेच काही करावे लागले - खूप वाचावे लागले, स्वतःशीच वाद घालावा लागला, विचारपूर्वक मांडलेला व्यूह विस्कटून टाकावा लागला, नव्याने मांडणी करावी लागली, असे बरेच काही. यांतून ज्या कवितांचा समाधानकारक अर्थ लागत गेला, त्यांच्यावर लिहीत गेलो. त्या गेल्या सहा वर्षांतील लेखांचा हा संग्रह. 
ज्या भूमिकेतून धोंडांनी हे केलं, त्याबद्दल आदर वाटून आपण ही नोंद करतोय. म्हणजे व्यक्तिगत शेरेबाजी हे मराठी साहित्याचं व्यवच्छेदक लक्षण आहे की काय, असं वाटू लागावं अशी परिस्थिती सारखी असतेच, तरीही धोंडांनी एखाद्या कवीच्या कवितेच्या व्यवच्छेदक लक्षणाचा (मर्ढेकरांच्या बाबतीत प्रतिमांचा) उलगडा करण्यासाठी कवीचं व्यक्ती म्हणून असलेलं चरित्र धुंडाळावं नि आपल्यापुरत्या काही गोष्टी स्पष्ट करू पाहाव्या ही किती सुंदर गोष्ट आहे! आणि धोंडांबद्दल एक असंही वाटतं की, समजा आपल्याला त्यांचा कवितेचा रस्ता शोधण्यासाठीचा असा रस्ता मान्य नसेल, तरीही ते ज्या पद्धतीने मांडणी करतात ती आपसूक एक स्वतंत्र गद्य रचनाच ठरते. अर्थातच, तिचा पाया मर्ढेकरांची कविता आहे. पण त्यात धोंड स्वतःच्या आयुष्यातले, आपल्या वाचनातले, कवीच्या आयुष्यातले असे संदर्भ टाकून काही एक अर्थ वाचकासमोर ठेवू पाहतात. हे वरच्या त्यांच्या परिच्छेदातूनही स्पष्ट होतंय. आणि हे बरं आहे. तसंही प्रत्येक वाचक आपल्या डोक्यात काहीतरी अर्थ उभा करतोच की नाही, धोंड असाच स्वतःच्या डोक्यातला अर्थ मांडतात, त्यासाठी त्यांनी अर्थातच अधिकचे काही संदर्भ मुद्दाम तपासलेले असतात. शिवाय या आधी कोणी काढलेले अर्थ तथ्याला धरून नसतील तर ते सहजपणे खोडत जाणं हाही भाग ते करतात. पण कुठे कसला आव आणलेला नाही. त्यामुळेच काही कविता कळत नसल्याची कबुली देण्याएवढा खरेपणाही त्यांच्यात आहे. नायतर असं कोणी उघड्यावर बोलतं काय!

आणि असलं कोणी उघड्यावर बोलत नसेल तर मग धोंडांनी केली तसली खटपट करणं दूरच. त्यामुळे ह्या आपल्यापासून दूर गेलेल्या खटपटीच्या आठवणीत धोंडांच्या एकाच पुस्तकाबद्दलची ही नोंद झाली.

राजहंस प्रकाशन । १८ एप्रिल १९९९


तरीहि येतो वास फुलांना,
तरीहि माती लाल चमकते;
खुरट्या बुंध्यावरी चढून
तरीहि बकरी पाला खाते
- बा. सी. मर्ढेकर